संकेत - भाग १

Submitted by मुग्धमानसी on 14 December, 2015 - 05:58

माझी ही कथा मायबोलीवर मी आजपासून काही भागांत प्रसिद्ध करते आहे.

पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' - दिवाळी २०१४

ही कथा मायबोली.कॉमवर प्रसिद्ध करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्रीमती सुजाता देशमुख यांचे मनःपूर्वक आभार.
___________________________________

नाट्यगृहाचे कॅन्टीन हे काय कुणाच्या लीगल इश्युज विषयी चर्चा करण्याची जागा आहे?

पण नाही. पेडणेकरांना असल्या चित्रविचित्र जागाच सुचतात मिटिंग्ज घेण्यासाठी. बरं मिटींग ठरवण्याआधी कुणाचे मत वगैरे विचारात घेण्याच्या भानगडीत न पडता परस्पर व्हेन्यू, वेळ, तारिख वगैरे ठरवून मोकळं व्हायचं ही त्यांची स्टाईल. आपण फक्त त्यांनी ठरवलेल्या वेळेला आणि जागेला ’जमेल की नाही’ ते सांगायचं. तेही नुस्तं नाही... कारणासहीत! आणि नाट्यगृह ही जागा कायद्यासारखे विषय चर्चिण्यासाठी योग्य नाही... ’का?’ हे त्यांना पटेल अश्या संयत भाषेत, त्यांचे शंकानिरसन करत आणि माझे मस्तक हलू न देता त्यांना समजून सांगणे... असला अवघड पेपर देण्यापेक्षा मी निमुटपणे शुक्रवारी दुपारी बरोब्बर दिड वाजता त्या नाट्यगृहाच्या कॅन्टीनच्या दारात हजर झाले.

पेडणेकर भयंकर शंकासूर माणूस. वयाने माझ्या दुप्पट आणि अर्थातच अनुभवानेही. त्यातून माझे क्लायंट. त्यामुळे मी त्यांचा जरा आब राखून असते. या माणसाची आर्थिक परिस्थिती रग्गड मजबूत! पुढ्च्या सात नाही तरी २-३ पिढ्यांची नक्कीच बेगमी झालेली होती. पण ती काही यानं स्वत:नं नव्हे... याच्याही बापाने केलेली. बापाने खरंतर सात पिढ्यांचीच सोय केली होती. पण पेडणेकराने आणि त्याच्या भावाने स्वकर्तृत्वाने ४-५ पिढ्यांची मजा स्वतःच लुटून घेतली आणि पेडणेकर घराण्यातल्या अजून काही पिढ्यांना ’स्वयंपूर्ण’ बनावेच लागेल अशी सोय करून ठेवली. बरं दोन भाऊ तरी मिळून वाटून सगळं खातील तर कसलं आलंय? आपल्या ’बाण्याला’ जागून दोघेही शेवटी एकमेकांविरुद्धच न्यायालयात उभे होते. आणि मी या भांडणात माझ्या सद्ध्या चालू पिढीची तरी सोय करून घेता येईल का या विचारात पेडणेकरांची वाट बघत नाट्यगृहाच्या दारात उभी होते.
अरे हो... सांगायचं राहिलं. हा माणूस कधीही कुठेही वेळेत पोचत नाही!

काही मिनिटं कॅन्टीनच्या दारात घुटमळताना नाट्यगृहाचा परिसर न्याहाळत होते. अनेक आठवणी होत्या माझ्या त्या परिसराशी जोडलेल्या. कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धेत भाग घेतला होता. बॅक स्टेज. (ऑन स्टेज कोण घेणार होतं मला?) तेंव्हापासून हा परिसर अत्यंत जिव्हाळ्याचा झालेला. माझी नाळच कुठेतरी त्या परिसराशी जोडली गेलेली. नुसत्या नजरेनेच पुर्ण नाट्यगृहाची इमारत आंतर्बाह्य दिसत होती मला! ते भव्य स्टेज, त्यावरचं नेपथ्य, उतरंडीप्रमाणे मांडलेल्या प्रक्षागृहातल्या खुर्च्यांच्या रांगा, आतली ’ग्रीन रूम’, त्यातले मोठे मोठे आरसे, मेकपचं सामान, अरुंद जिने, स्टेजमागचा अंधार, पडदे... आणि तो जल्लोष! रेल्वेच्या धडधडणार्या लोखंडी रुळांना कान लावून दूSSSर कुठेतरी त्या रुळांवरून धावत असणार्या आगगाडीची चाहूल घ्यावी तसं मी पहात होते त्या नाट्यगृहाकडे! अनिमिष, मायाळू नजरेने.... बराच वेळ.

पेडणेकरांना फोन केला. दहा मिनिटांत पोचतो म्हणाले. म्हणजे किमान अर्धा तास लावणार हा माणूस!

मी अजिबात न चिडता शांतपणे कॅन्टीनच्या आत नजर टाकली. एकदम मध्यात, ’गल्ल्याच्या’ बरोब्बर समोर... म्हणजे मला अजिबात बसायला आवडत नाही अशाच नेमक्या जागी एकमेव टेबल रिकामं दिसलं. तरिही न चिडता मी शांतपणे त्या टेबलपाशी गेले आणि खुर्चीवर पाणी सांडलेले पाहून ती खुर्ची दूर सारून दुसरी खुर्ची स्वतःच ओढून त्यावर बसले. खुप वर्षांनी भेटलेल्या एखाद्या वयोवृद्ध, भारदस्त पण प्रेमळ असामीसमोर आपण कसे आपोआपच दबून, अदबीनं वागू लागतो... तसं माझं झालं होतं बहुतेक.
लेमन सोडा मागवला. स्वीट. आणि अत्यंत संथपणे एक एक घोट घशाखाली उतरवत आजुबाजूच्या टेबलांकडे अभावितपणे पहात राहीले.

जिवंत माणसांच्या नमुन्यांचे संग्रहालय कुणाला पहायचे असेल तर या जागेसारखी दुसरी जागा नाही! प्रत्येक टेबलवर काहीतरी धीरोदात्त, गंभीर चर्चा चाललेली असावी. कुणाच्या टेबलवर चहाच्या कपांशेजारी कागदांच्या थप्प्या होत्या तर कुणाच्या टेबलवर पुस्तकं. काही बायका सुद्धा होत्या एका टेबलवर... तोकड्या पांढर्‍याशुभ्र केसांच्या. खाद्यावर शबनम लटकवलेली. कुणी हवेत पेन नाचवत होते, कुणी नुस्तेच आकाशात गंभीर नजर लावून बसले होते, कुणी दोन्ही हातांच्या अंगठ्यांवर हनुवटी टेकवून खाली मान घालून विचारमग्न झाले होते, कुणी नुस्तेच बोलत होते आणि कुणी नुस्तेच ऐकत होते! सगळे फार फार गंभीर होते हे मात्र नक्की. हसणं सुद्धा किती गंभीर... मोकळं नाही, पण खोटं सुद्धा नाही! बर्फाच्या टणक लादीखालून वाहणार्‍या खळाळत्या झर्‍यासारखं.
अचानक मला जाणवलं की माझ्यातल्या वकिलाला मागे सारत माझ्यातली अनोळखीच कुणी मी... माझा ताबा घेऊ लागले आहे. तसंच होत होतं... खरंच! नाहीतर टेबलवर घोंगावणार्‍या माशीमुळं कपाळावर आठ्या उमटल्या तरी मला दूर कॅन्टीनच्या खिडकीशी आडोशाला निवांत पंख पसरून बसलेलं पिवळंजर्द फुलपाखरू नेमकं कसंकाय दिसलं? आणि वर मी त्याला बघून हसले सुद्धा! हे मात्र फारच झालं.
त्या परिसराचीच नशा असावी! ह्म्म्म....

’अहो मॅडम... पण आपण कशासाठी आलोय इथे? क्लायंटशी मिटींग आहे आपली....’ अचानक भानावर आल्यासारखं मलाच माझं ऐकू आलं आणि नेमकं त्याचवेळेस फोन वाजला. पेडणेकर. जेमतेम १००० स्क्वे. फुटांच्या कॅन्टीनच्या जागेत माझ्यासारखं ’अधोरेखित’ ऐसपैस व्यक्तिमत्त्व सापडू नये या माणसाला?
असो.
पेडणेकर त्यांच्या नेहमीच्या संथ चालीत त्यांचा भरभक्कम थुलथुलीत देहाचा भार सावरीत सावकाश माझ्या समोरच्या खुर्चीत येऊन बसले. त्यांच्या शेजारी त्यांचे असिस्टंट कम सेक्रेटरी कम हेल्पर कम नोकर वगैरे वगैरे असलेले श्रीयुत मोगरे नेहमीचा निर्विकार चेहरा घेऊन स्थानापन्न झाले. ’मगाशी मी पाणी पडलं म्हणून बाजूला सारलेल्या खुर्चीत तर नसतील ना बसले?’ - हा प्रश्न मला उगाचच काहीही कारण नसताना पडला. ’उठतील तेंव्हा कळेलच....’ मी माझ्याशीच हसले. नेमक्यावेळी. कारण पेडणेकरांना वाटलं मी त्यांचं प्रसन्न स्वागत करते आहे.
’गुडाफ्टर्नून्मॅडSSम...’ भारदस्त पण तरी काहीश्या विचित्र आर्जवी आवाजात पेडणेकर म्हणाले आणि त्यांच्या पुढे आलेल्या उजव्या हाताला मी माझा व्यक्तिगत उजवा हात भेटवला. मोगरे नेहमीच्याच अवघडल्या अवस्थेत त्यांचं नेहमीचंच लोचट हासू चेहर्यावर पांघरून तांबट डोळ्यांनी बघत होते. त्या पांघरुणात गुरफटून लपलेले त्यांचे पिंगट पिवळे दात बोलताना अजागळपणे उगाच मधेमधे डोकावतात. या मोगरेला पहाताना का कोण जाणे... नेहमी बुळबुळीत शेवाळ्याची आठवण होते! आबाच्या अंगणातल्या पाण्याच्या हौदाच्या कडेनं साचलेलं... हिरवंगार घसरडं शेवाळं.

आबा म्हणायचा.... "हास की जरा नेटकं दात काढून! मिटल्या वठांत डांबून काय ठेवायचंय हासू... धरणात कोंडलेल्या नदीगत?"
धरणाच्या प्रचंड तुरुंगात कोंडून घातलेली नदी.... आतूनच घुमघुमणारी, हुंकारणारी विचित्र, अस्वस्थ, अदृष्य नदी! नलाक्काच्या डोळ्यांत कोंडलेली... तिच्यासोबत धूर होऊन आकाशात गेलेली.
आकाश म्हणूनच मला कायम असं कोंदटलेलं दिसतं...!

एक घट्ट शेकहॅण्ड झाल्यावर आमची चर्चा सुरू झाली. त्यांनी फाइल्स काढल्या. संपूर्ण कॅण्टीनमध्ये फक्त आमचं टेबल फाईलींना व्यापलेलं दिसत होतं. मला सारखं उगाचच वाटत होतं की तिथे उपस्थित उर्वरीत जनता आमच्याकडे अधून मधून बघत कसले कसले गंभिर कटाक्ष टाकते आहे. हे खरं असूच शकत नव्हतं. तिथलं प्रत्येक टेबल हे एक स्वतंत्र बेट होतं. त्या कॅन्टीनरुपी सागरात एक-एकटंच तरंगणारं. अर्थात आमचं टेबल सोडून. आमचं बेट दाहक वास्तवाच्या किनार्याला लागून चक्क नांगर टाकून बसलं होते.

"तर मॅडम, हे असं आहे बघा. या प्रॉपर्टीचा ७/१२ अजुनही सायबांच्या एकट्याच्या नावावर आहे. सात वर्षांपुर्वी सायबांनी ही कंपनी काढली आणि आता वर्षभरापुर्वीच ही जमिन कंपनीच्या नावावर झाली. हा बघा फेरफार. आता या फेरफारला इतर कुणी च्यालेंज करायचं कारणच नाही मॅडम. सायबांना या जमिनीवर एक रेसिडेन्सियल टाऊनशिप डेव्हेलप करायची आहे... बाकिच्या कुणाचाही या जमिनीशी काहीच संबंध नाही मॅडम..."
मोगरे बोलत होते आणि मी त्यांनी समोर केलेला एक एक कागद बघत होते. हे ’इतर’, ’बाकिचे’ म्हणजे यांचे स्वत:चेच बंधू हे मला अर्थातच माहित होते. एखाद्याकडून उगाचच असलेल्या फुटकळ भंपक भावनिक वगैरे अपेक्षांना जेंव्हा संपूर्ण पूर्णविराम मिळतो आणि संबंधातली गुंतागुंत संपून एक साधं सोपं स्पष्ट नातं उरतं... तेंव्हा तो एखादा ’इतर’ आणि ’बाकिचे’ होतो. त्या दृष्टीने पाहिलं तर आपण स्वत: सोडून उरलेलं सगळं जग ’इतर’ आणि ’बाकिचे’ या यादित येणं म्हणजे जीवनाची आदर्श परिपूर्ती!
स्वतः पेडणेकर शांतपणे सगळं पहात होते. मोगरे बोलायचे थांबले की मग हा बोलायला लागणार याची कल्पना होती मला.

कागदपत्र बघताना बराच वेळ गेला. पण तेवढ्यातही आमच्या शेजारचं टेबल रिकामं होऊन आता तिथे एक एकटाच मनुष्य येऊन बसलेला अगदी त्याच्या फिकट निळ्या शर्टसकट माझ्या मेंदुने नोंद केला. शर्टच्या खिशाला उजव्या कोपर्यात एक छोटासा शाईचा निळाजर्द डागही! कसला अमेझिंग असतो ना आपला मेंदू...!!!
काही सेकंद नुस्तंच बसून राहिल्यावर त्यानं त्याच्याजवळच्या मळकट राखाडी आडव्या हॅंडबॅगमधून एक वर्तमानपत्राच्या कागदाची पुडी काढून समोर ठेवली आणि त्या पुडीकडे तो नुसताच पहात विचार करत थांबून राहिला. कुठेतरी सहजच फिरत फिरत येऊन एखाद्या चौकात थबकल्यासारखा, विचारात गढल्यासारखा. माझं लक्ष आता वारंवार त्या टेबलकडे जाऊ लागलं.
वेटर आमच्या टेबलपाशी आला. "काही घ्यायचंय का?" - अस्सल माजोरडा टोन. माझ्या लक्षात आलं. त्याच्या ऐन धंद्याच्या टाईमाला आम्ही त्याचं एक टेबल नुसतं अडवून बसलो होतो.
"तीन व्हेज सॅंडविचेस, फिंगरचीप्स आणि हो... एक प्लेट गरम भजी आण. आणि नंतर तीन चहा..." पेडणेकर बोलले.
"मला चहा नको..." मी घाईघाईत म्हणाले. हा माणूस स्वतःच सगळं ठरवतो च्यायला.
"बरं. दोन चहा. ठिके?"
"हं." म्हणून वेटर कर्तव्य पार पाडल्याप्रमाणे निघाला. मोगर्यांची टेप पुन्हा सुरू होणार तेवढ्यात माझं लक्ष पुन्हा शेजारी गेलं. तो मनुष्य आता ते पुडकं उघडत होता. माझी उत्सुकता आता शिगेला पोचली. त्याने ते पुडकं उघडलं आणि त्यात जे काही होतं ते बघून त्या माणसाचे डोळे चमकले. चेहरा मात्र अधिकच गंभीर झाला. काय आहे त्यात? मी उगाचच मानेला झटके देत पुन्हा पुन्हा तिकडे पहू लागले. छे!!! काही केल्या त्या पुडक्याच्या आतलं दिसेना. मोगर्यांचं बोलणं मला ऐकू येईनासं झालं.
"मॅडम... ऐकताय ना?"
"अं... हो."
"अहो मोगरे, मॅडमना भुक लागलीये. आता पुढचं जे काही बोलायचंय ते दोन घास पोटात गेल्यावर बोलू. काय मॅडम?" - पेडणेकर उगाच हसत बोलले.
"अं... हो... चालेल." माझं चित्त अजूनही शेजारच्या टेबलवरच्या पुडक्याकडे. ते दोघंही हसले. मी एकदम उठले. "एक्सक्युज मी. एकाच मिनिटात आले."
"शुअर." पेडणेकर म्हणाले आणि मी मोर्चा ’त्या’ टेबलच्या दिशेनं वळवला. सहज म्हणून त्या निळ्या शर्टवाल्या मनुष्याच्या मागून जाताना मी अखेर त्या पुडक्यात डोकावून पाहिलंच. अवाक् झाले, निराश झाले, पोपट झाला की कोड्यात पडले ते काही अजूनही नाही सांगता येणार... पण त्या पुडक्यात रांगेत उभी होती... मातीची तीन छोटी छोटी मडकी!
______________________________

फक्त तीन मडकी. हो. एवढंच. बाकी काही नाही.
ती मडकी रंगीत नव्हती.
ती मडकी भरलेली नव्हती.
मडक्यांचं तोंड बांधलेलं नव्हतं.
मडक्यांचा आकार मडक्यांसारखाच होता. अगदी एकसारखा.

मडकीच का? मातीचीच का? तीनच का?.... माहीत नाही.
थोडक्यात...
जगाच्या, संपूर्ण विश्वाच्या पसार्यात ’मडकी’ म्हणून त्यांनी स्वत:चं असं काही वेगळेपण जपलेलं वगैरे नव्हतं. जे काही होतं... ते हे एवढंच. केवळ एक पोकळ मडकेपण!

पण तरी ती तीन्ही मडकी माझ्या लक्षात राहीली. कायमची.
माझ्या मेंदूतून बाहेरच्या जगात कधीतरी तडक भिरकावल्या गेलेल्या काही विचारांनी, आठवांनी किंवा नुसत्याच तरंगांनी माझ्या कवटीला पाडलेल्या भोकांतून ती मडकी भरभरून ओतत राहीली... एक नवंच पोकळपण! जाणवेल असं. टोचेल असं.

आबा म्हणायचा... "कवटीच्या मडक्यात मेंदूचा खुळखूळा होऊ देऊ नगंस... ईचारांच्या गच पान्यात तरंगत ठेवावं त्याला. वाहून जाऊ द्यायचं नाय आन बुडू पन द्यायचं नाय!"
_________________________

क्रमशः
_________________________

पुढचा भाग - http://www.maayboli.com/node/56815

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच छान आहे ग, मी ही कथा दिवाळी अंकातच वाचली होती. खुप छान आहे, मला वाटतच होते की लेखिकेला कळवावे आवडल्याचे पण ही संधी मायबोली वरील लेखनामुळे मिळाली.

छान!!