'फिर जिंदगी’- Phir Zindagi - संपूर्ण चित्रपट

Submitted by Admin-team on 4 December, 2015 - 20:53

अवयवदानाच्या प्रक्रियेत सर्व संबंधित व्यक्ती, रुग्णालय व संस्था यांच्यांत समन्वय साधण्याचं, रुग्णांच्या नातेवाइकांना मार्गदर्शन करण्याचं, गरजू रुग्णांच्या याद्या अद्ययावत करण्याचं, जो अवयव देणार त्याच्या आणि ज्याला अवयव मिळणार आहेत त्याच्या नातेवाइकांना सर्व प्रकारची मदत करण्याचं, अवयवदानाविषयी जनजागृती करण्याचं काम करते झेडटीसीसी, म्हणजे झोनल ट्रान्स्प्लांट को-ऑर्डिनेशन कमिटी. ही एक सरकारमान्य, पण बिगर-सरकारी अशी कमिटी आहे.

अवयवदानाविषयी समाजात व्यापक जाणीव निर्माण व्हावी, या हेतूनं झेडटीसीसीच्या पुणे विभागानं प्राज फाऊंडेशनच्या सहकार्यानं 'फिर जिंदगी...' या लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

हा संपूर्ण चित्रपट आपण इथे बघू शकता -

***

आपल्या देशात दरवर्षी लाखो रुग्ण अवयव निकामी झाल्यानं आजारी पडतात किंवा मृत्यूला सामोरे जातात. मृत्यूवर अजून आपण विजय मिळवला नसला, तरी वैद्यकीय क्षेत्रातल्या नवनव्या संशोधनांमुळे संबंधित व्यक्तीच्या अवयवांना पर्याय म्हणून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरातले अवयव काढून त्यांचं प्रत्यारोपण करता येणं आज शक्य झाले आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे सात लोकांचे प्राण वाचू शकतात. मात्र भारतात दुर्दैवानं अवयवदात्यांचं प्रमाण अत्यंत अल्प आहे. भारतातल्या लाखो रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची गरज भासत असली, तरी अवयवदानाबाबत फारशी जनजागृती नसल्यानं गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळू शकत नाही. अवयवदान-चळवळीबद्दल भारतात सामाजिक, आर्थिक, धार्मिक कारणांमुळे सामाजिक जागृती करणं अतिशय कठीण असल्यानं अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचं प्रमाण अत्यंत नगण्य आहे.

एखादा ‘ब्रेन-डेड‘ झालेला रुग्ण किडनी, डोळे, यकृत, हृदय, फुफ्फुसं, त्वचा दान करू शकतो, अवयवदान नक्की कोणाला करता येतं, 'ब्रेन-डेड' असणं म्हणजे काय, अवयवदानाची नक्की प्रक्रिया कशी, अवयवदानामुळे नक्की योग्य त्या व्यक्तीला मदत मिळते का, असे अनेक प्रश्न रुग्णांच्या नातेवाइकांच्या मनांत असतात. जोडीला असतात अंधश्रद्धा, गैरसमज आणि मर्गदर्शनाचा अभाव. हा चित्रपट आपल्या काही शंका दूर करण्यास मदत करेल, अशी आशा आहे.

6Standy copy.jpg

आपल्या सर्व शंकांचं निरसन आणि अवयवदानासाठी मदत यांसाठी झेडटीसीसीशी आपण संपर्क साधू शकता.

http://www.ztccpune.com/

http://donatelifeindia.org/the-network/donate-life-maharashtra/ztcc-mumbai/

***

हा चित्रपट मायबोली.कॉमवर प्रदर्शित करण्यास परवानगी दिल्याबद्दल प्राज फाऊंडेशन, झेडटीसीसी व विचित्र निर्मिती (श्रीमती सुमित्रा भावे - श्री. सुनील सुकथनकर) यांचे मनःपूर्वक आभार.

***

'फिर जिंदगी' हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, अशी इच्छा आहे. हा चित्रपट यापुढे 'मायबोली'वर कायम उपलब्ध असेल. आपण या पानाचा दुवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, अशी आपल्याला विनंती आहे.

***

फिर जिंदगी

निर्मिती - प्राज फाऊंडेशन व झेडटीसीसी (पुणे विभाग)
दिग्दर्शन व संकलन - सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर
कथा, पटकथा, संवाद - सुमित्रा भावे
छायालेखन - धनंजय कुलकर्णी
संगीत - साकेत कानेटकर
कविता - सुनील सुकथनकर
ध्वनिलेखन - गणेश फुके
कलादिग्दर्शन - संतोष सांखद
वेशभूषा - योगिनी कुलकर्णी
रंगभूषा - आशीष देशपांडे
दिग्दर्शन साहाय्य - वरुण नार्वेकर, तुषार गुंजाळ

कलाकार - रत्ना पाठक शाह, नासीरुद्दीन शाह, नीरज काबी, विक्रम गोखले, उत्तरा बावकर, अमृता सुभाष, ज्योती सुभाष, ग्यानप्रकाश, डॉ. शेखर कुलकर्णी, रेणुका दफ्तरदार, पर्ण पेठे, अलोक राजवाडे, कृतिका देव आणि सिद्धार्थ मेनन

***

यापुढेही असेच उत्तमोत्तम चित्रपट बघण्यासाठी ’मायबोली.कॉम’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

www.youtube.com/maayboli

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर प्रभावी सिनेमा. रत्ना पाठकचा अभिनय तर अगदीच हेलाऊन टाकणारा. अवयव दानासंबंधी सामान्यजनांच्या मनात येणार्‍या शंकांचा वापर करुन खुप परिणामकारक निर्मिती केली आहे. मायबोलीचे विषेश आभार!

एक गोष्ट खटकली. सुमेधची आई डॉक्टर आहे असे दाखवले आहे. ती सहा तासाच्या प्रवासात एकदाही डॉक्टरांशी बोलत नाही? डॉक्टर खुप बिझी आहेत असे मानले तरी हे पटत नाही. तसेच ते पुणे-मुंबई ६ तास वेळेचेही खटकले. अर्थात त्याने चित्रपटाचा संदेश पोहोचण्यात काही अडथळा येत नाही..

अवयवदानाचे महत्व सांगणारा संदेश मनाच्या फळ्यावर अगदी ठशठशीत अक्षरात उमटवतो हा सिनेमा.
इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल admin team ला धन्यवाद!

वत्सला, एक प्रेक्षक म्हणून खूपदा आपण पडद्यावरचे चित्र पहाण्यात आणि पात्रांचे संवाद ऐकण्यात आणि ते समजून घेताना चुक करतो/चुक करु शकतो असे तुला वाटत नाही? तू अशीच चुक करुन इथे अभिप्राय लिहिते आहे. परत एकवार बघ सिनेमा होऊनी दंग दंग..

थोडीशी सुरूवात पाहिलीय, पहाणार आहे. एका आईसाठी हे बघणे खरंच जड परंतु अत्यावश्यक आहे.

ती सहा तासाच्या प्रवासात एकदाही डॉक्टरांशी बोलत नाही? >> तिला प्रवासात नेटवर्क इशयूज किती येत अस्तात? पोहोचल्यावर रिपोर्ट मागते तेव्हा १००% डॉक्टर सारखी वागते. ( आईपण बाजूला ठेवून.) त्यात तिला आधार असे कोणीच नाही. मुलगाच आधार तो तर आजारी. सिंगल पेरेंट फॅमिलीत किती तरी गोष्टी अश्या अस्तात की त्या आई= मूल ह्या नात्यालाच समजतात. तो तिचा दुवा तुटलेला आहे. दु:खातही तिने जशी डिग्निटी जपलेली आहे स्वतःची ते कमेंडेबल आहे. व योग्य
निर्णय घ्यायचा माइंडसेट. सर्व करायचे ते पार पडल्यावर ती एकटी असताना आकांत करेल दु:ख व्यक्त करेल असे आपले मला वाटले.

माझ्या साबा आणि साबुनी मृत्यूनंतर अवयवदान आणि देहदान केले. तसे त्यानी ठरविलेच होते.

पण अशा जिवंत अवस्थेतील अवयवदान हे खरोखर प्रशंसनीय आहे. मी नक्कीच किमान माझ्यासाठी याचा निर्णय घेईन आणि आप्तजनाना सांगून ठेवेन.

विनिता....

~ खूप आनंद झाला आहे मला तुमचा वरील प्रतिसाद वाचल्यानंतर. तुमचे सासरे आणि सासुबाई यानी घेतलेल्या त्या निर्णयाचा समाजासाठी किती आणि कसा उपयोग झाला असेल तेच 'फिर जिंदगी...." मध्ये शेवटी दाखविले आहेच. देहदानाची इच्छा व्यक्त करणे, तो फॉर्म भरून इस्पितळाला देणे....आणि ती वेळ आल्यावर त्यानुसार अन्य काही चर्चा न करता त्यांच्या इच्छेला मान देवून पुढील कार्यवाही तुम्ही निकटच्या लोकांनी केली...त्याबद्दल तुम्ही सर्वच अभिनंदनास पात्र आहात.

मी स्वतःही देहदान आणि नेत्रदानाबद्दलचे फॉर्म्स स्थानिक इस्पितळ आणि नेत्रपेढीकडे जमा केले आहेत. मुलगा, निकटचे मित्र आणि भाचे याना अर्थातच कल्पना दिली आहे....मला विश्वास आहेच, इच्छेनुसार ही पोरे जरूर आवश्यक ती पावले उचलतील. आपण आपल्या देहाबद्दल निर्णय घेऊ शकतो हे जरी सत्य असले तरी त्या संदर्भातील पुढची हालचाल शेवटी मुलांनीच करायची असल्याने त्यांचेही मन आपण अगोदरपासून या निर्णयापोटी घट्ट करणे गरजेचे आहे.....तुम्ही ते करून दाखविले आहे.

माझ्या साठी हे सगळ वातावरण रोजचेच आहे. नवरा स्वतः ट्रान्स्प्लांट को-ऑर्दिनेतर आहे. त्याचे फोन, पेपर कटिंग्ज,मिर्त्र -मंडळी, सगळे याच विषयावर बोलतात. त्याने अम्रुता सुभाश ला काही टिप्स दिल्या आहेत असे ऐकुन आहे.
फिल्म शांतपणे पाहाणर आहे.

'फिर जिंदगी' हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, अशी इच्छा आहे. हा चित्रपट यापुढे 'मायबोली'वर कायम उपलब्ध असेल. आपण या पानाचा दुवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, अशी आपल्याला विनंती आहे.

चित्रपट पाहिला. हा प्रबोधनपट असल्याने त्याचा विचार व्यावसायिक चित्रपटासारखा करु नये. चित्रपट पाहिल्यावर मला निर्मला सामंत प्रभावळकर यांची आठवण आली.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Nirmala-Samant...

"फिर जिंदगी...." पाहून झाल्यावर (वा त्या आधीही...) प्रकाश घाटपांडे यानी आवर्जून दिलेली वरील लिंक पाहावी आणि निर्मला सामंत प्रभावळकर यानी हेमांगीच्या आकस्मिक निधनानंतर घेतलेल्या अवयवदान संदर्भातील निवेदन जरूर वाचावे.

निर्मलाताई शेवटी म्हणतात, "...माणसाच्या आयुष्याला अर्थ असतो तसाच मरणालाही असू शकतो..." ~ अवयवदान निर्णयामुळे ते मरण स्मरणाचे होते.....चित्रपट देखील नेमका हाच संदेश देत आहे.

अत्यंत संवेदनशी आणि महत्वाचा विषय तितक्याच संवेदनशीलतेने आणि ताकदीने हाताळलेला हा सिनेमा बघताना एकीकडे पोटात तुटत होतं, खड्डा पडत होता, फ़ार इमोशनल होऊन डोळे वहात होते.. बरेचदा तर मला परत थोडं मागे जाऊन परत तो सीन बघावा लागत होता आणि त्याचवेळी हा विषय लोकांपुढे आणण्याचं महत्वाच काम होतय हे मनाला सुखावून जात होतं.

सिनेमा पहाणारे १० च्या १० जण लग्गेच उठून अवयव दानाचा फ़ॉर्म भरुन ठेवतील अशी खूळी आशा अजिबात नाही पण किमान या विषयाची माहिती होईल. याबद्दलची जाणीव होईल... कोणी सांगावं १० त ला १ जरी पुढे आला तरी तो हे वाण आणखी १० जणांना देईल.

सिनेमा जरुर बघा... इतरांना रेकमंड करा आणि जमलं तर नक्की या दिंडीत स्वत:ला जोडून घ्या.

चित्रपट पाहिला. रत्ना पाठक यांचा अभिनय कमाल! या माध्यमातून अवयवदानाचा जो संदेश द्यायचा आहे तो व्यवस्थित पोहोचतो आहे.

धन्यवाद मायबोली. अप्रतिम चित्रपट आहे. सर्व कलाकारांचे काम उत्तम झाले आहे... खास करून रत्ना पाठक. तिचे सिन्स बघताना डोळे भरुन येत होते.
अमांची पोस्टही आवडली.

काल एसेम जोशी सभागृहात रोटरी क्लब व झेडटीसीसी याच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाचे प्रदर्शन व परिसंवाद झाला.कार्यक्रमा अगोदर आरती गोखले यांना भेटलो. त्यांनी कार्यक्रमातही मायबोलीचा आवर्जून उल्लेख केला.
रत्ना पाठक आल्या होत्या.

मी अर्धाच पाहिला, उरलेला अर्धा पाहण्याच्या मनःस्थितीत काल नव्हते. आता पुढच्या वीकेंडला पाहायला मिळेल Sad

माझं मतप्रदर्शन खूपच लवकर होईल, पण राहून राहून असं वाटतंय की पेशंटच्या नातेवाईकांना (जे निर्णय घेणारे नाहीत) अवयवदानाविषयी इतक्या लगेच सांगणं हे मार्केटिंग (कटू शब्द : धंदा! Sad ) केल्यासारखं नाही वाटलं का कोणाला? चित्रपटात तर पेशंटचे निर्णय घेणारे नातेवाईक डॉक्टर दाखवले आहेत, ते येईपर्यंत वाट नसती का पाहता आली? किंवा तिथे उपस्थित नातेवाईकांनी पेशंट ब्रेन डेड आहे हे कळल्यावर 'पुढे काय?' असा प्रश्न उपस्थित करेपर्यंत वाट पाहता आली असती ना?
चित्रपट पूर्ण पाहिल्यावर याविषयी अधिक लिहीन, तोवर माझे हे प्रश्न चुकीचे वाटत असल्यास सॉरी!

वीकएंडला बघितला हा चित्रपट. सगळ्यांची कामं छान झालीत. अवयवदानासंबंधित थोडी आणखी टेक्निकल माहिती यायला हवी होती असं वाटलं.

अवयवदानाविषयी इतक्या लगेच सांगणं >>>> मला पण खटकलं, कदाचित निर्णय घेऊन प्रोसिजर सुरू करणं यासाठी वेळ कमी हे कारण असु शकेल.

अवयवदान हे विशिष्ट मुदतीतच करता येतं. एका ठरावीक वेळेनंतर अवयवांचा उपयोग करणं कठीण होऊन बसतं. पेशंट कोलॅप्स होऊ शकतो. ब्रेनडेड व्यक्तीचे अवयव उपयोगात आणायचे असतील तर एका ठरावीक मुदतीत पोलीस, नातेवाईक, डॉक्टर या सर्वांची मोट एकत्र बांधण्याचं आणि आवश्यक त्या परवानग्या मिळवण्याचं काम झेडटीसीसीच्या सोशल वर्करांना करावं लागतं.

अंतर्मुख करणारा चित्रपट. चित्रपटाच्या निर्मितीमागे जो नेक आणि उदात्त हेतू आहे तो नक्कीच साध्य होईल अशी कथा, पटकथा, अभिनय आहे. संयत हाताळणी अतिशय आवडली. सगळ्यांनीच सुंदर काम केलंय पण रत्ना पाठक लक्षात राहतात. अमृता सुभाषने वावर, संवादफेक सगळंच जाणीवपूर्वक परफेक्ट टोन डाऊन केलं आहे त्याबद्दल तिचं स्पेशल कौतुक.
चित्रपटाशी संबंधित सर्व आणि मायबोली ह्यांना मनःपूर्वक धन्यवाद !

अवयवदानाविषयी इतक्या लगेच सांगणं >>>> हो. खटकलं ते. खुपच घाई करतात असं वाटलं मला. बाकी वर चिनुक्स ने उत्तर दिलेय.

अवयवदान हे विशिष्ट मुदतीतच करता येतं.>> हो मान्य आहे.

पण चित्रपटाचा उद्देश जनजागृती आहे तर चित्रपटात पेशंटच्या नातेवाईकाला पेशंट ब्रेनडेड आहे म्हणजे नक्की काय ही तांत्रिक माहिती समजावून सांगायला हवी होती. नातेवाईकांकडून 'पुढे काय?' असा प्रश्न आल्यावर अवयवदानाची माहिती आणि त्याच्या तांत्रिक बाबींची माहिती यायला हवी होती. चित्रपटात ब्रेन डेड पेशंट मिळाल्याची संधी 'ग्रॅब' केल्यासारखी वाटते आहे, निदान मला तरी. हे असं चित्र लोकांसमोर उभं राहायला नको असं वाटतं.
डिस्क्लेमरः अजून मी चित्रपट संपूर्ण पाहिलेला नाही.

मंजुडीचा वरचा प्रतिसाद +१

तरीही अवयवदानाचे महत्व पटवुन देण्यात आणि काळजाला हात घालण्यात चित्रपट १००% यशस्वी होतो हेही तितकेच खरे.

इथे सहजासहजी उपलब्ध करून दिल्यामुळे चित्रपट पाहिला गेला …

आणि पाहील्याचे खरच समाधान वाटले .
दर्जेदार अभिनय , दिला गेलेला मेसेज आणि त्यातील कविता …
सारेच आवडले …. बरेच गैरसमज दूर झाले

मायबोली टीमचे आभार

>>पेशंटच्या नातेवाईकांना (जे निर्णय घेणारे नाहीत) अवयवदानाविषयी इतक्या लगेच सांगणं हे मार्केटिंग (कटू शब्द : धंदा! अरेरे ) केल्यासारखं नाही वाटलं का कोणाला>> मंजूडी, मला वाटलं. कबूल आहे की व्यक्ती गेल्यानंतरच्या एका ठराविक कालावधीतच अवयव दान करता येऊ शकतं. पण बाकी लोकांनी त्या मामाच्या गळी उतरवणं- ते ही त्याला निर्णयक्षमता नसताना- हे जरा अतीच वाटलं. तो फोनवर पेशंटच्या आईशी ह्याबाबत बोलून तिला प्रवासात कन्विन्स करणार नव्हाताच, मग ती येईपर्यंत थांबू शकले असतेच की.

अप्रतिम चित्रपट! ह्याच विषयावर काही वर्षापुर्वी युट्युबवर हॉलमार्कचा चित्रपट पाहीलेला. तेव्हाच अवयव दानाबद्द्ल विचार सुरु झाला. मायबोलीवर चर्चाही केली. आणि गेल्यावर्षी आम्ही दोघांनीही फॉर्म भरला.

Pages