तू माझी माऊली .....

Submitted by पुरंदरे शशांक on 8 December, 2015 - 22:10

तू माझी माऊली .....

हे ज्ञानदेवा, हे ज्ञानराजा,

तुमचे -माझे नाते तरी काय आहे बरे नेमके ? का तुमच्या नावाने, आठवाने ह्रदयात कालवते, डोळ्यात आसवं दाटून येतात ? एक मराठी भाषिक म्हणून ? का तुमच्या ज्ञानदेवीने वेड लावलेला कोणी एक सामान्य रसिक म्हणून ? का तुमच्या तत्वज्ञानाची भूल पडलेला कोणी एक अभ्यासक म्हणून ? का अजून काही ??

तुम्ही खरे तर योगीयांचे योगी, ज्ञानीयांचे देव, प्रत्यक्ष श्रीविष्णूंचा अवतार...
तुम्ही जो वाक् यज्ञ उभारला, जे शब्दब्रह्म निर्माण केले तिथे माझी थिटी कल्पनाही पोहोचू शकत नाही तर ते आकळणे किती कठीणतम गोष्ट - केवळ दुष्प्राप्यच !! त्यामुळे तुम्हासारख्या असामान्य, लोकोत्तर महापुरुषाला दुरून वंदन केले तरी भागतेच की ...

पण जनलोकांवर रुसून तुम्ही कधी दार बंद करुन बसला होतात ते रुप मला जवळचे वाटते, (आणि तुमची लाडकी मुक्ताई चक्क तुमची समजूत काढत होती म्हणे...) तुम्हीही कधी तरी सर्वसामान्यांसारखे वागता हे ऐकताना, वाचताना तुम्ही जास्त जवळचे वाटला होता... पण हे वाटणे कसे तर क्षणभराचेच, क्षणभरच आपली दिठी कशी एकदम झाकोळते तसे हे आहे सारे... कुठेतरी अगदी उंच ठिकाणीच तुम्ही आहात हे पुन्हा पुन्हा जाणवत रहाते - केवळ हा मनुष्यदेह धारण केल्यामुळे तुमच्यातल्या या उर्मी तुम्ही या भुईतलेच आहात असा आभास निर्माण करते झालं ...
आकाशात अगदी उंच उंच उडणारे एखादे पाखरु क्वचित जमिनीवर काही काळासाठी उतरावे तसे हे वाटते - त्या पाखराला कायमची ओढ असते ती त्या आकाशाचीच... कधी साद घातलीच या भुईने तर ते पाय इथे काही काळासाठी लागतीलही या मातीला - पण ती काही क्षणांचीच गोष्ट - पुन्हा उड्डाण होणार ते त्या अथांगतेतच ...

एक बाळपणाचा काळ सोडला तर लौकिकाचा साधा स्पर्शही होऊ शकला नाही तुम्हाला... श्रीगुरुंनी "तत्वमसि"चा उपदेश केला काय अन् जे तुम्ही चिदाकाशात विहार करायला सुरुवात केली काय - सारे काही सामान्यांच्या आकलनाच्या पार पार पलिकडले .... कित्येक वरुषे, कित्येक जन्म तप करुन करुन थकलेले तपी, योगी अशांना जे गवसणार नाही ते प्राप्त करुन तुम्ही त्यापलिकडेही उडी मारलीत - हेही एक अद्भुतच ...
अशी अतिदुर्मिळ गोष्ट लाभूनही तुम्ही जनसामान्यांच्यात प्रसार केलात तो मात्र भक्तिचा, सगुणाशी नाते जोडण्याचा - हे तुमचे विशेषत्व अधिक भावते - जनांचा कळवळा येऊन तुम्ही जो उपदेश केलात तो अगदी साध्या-सोहोप्या उदाहरणांनी ...

तुम्ही आम्हा सार्‍यांनाच नेऊ पहात आहात ते एका निर्गुणाकडेच ... - पण ते सारे मात्र सगुणाच्या मदतीनेच.. आम्हा सामान्यांना निर्गुण काय कळणार ? पण, नुसत्या एकविध भावाने त्या परमात्म्याचे आकलन करता येते हा केवढा मोठा दिलासा आहे आमच्यासाठी..
अगदी अंतःकरणापासून घेतलेले एक साधेसे नाम (म्हणजेच त्याचा मनापासून केलेला आठव) , सर्वस्व समर्पून केलेली पूजा - बस्स - एक "समर्पण भाव" - पण कसा विविधतेने साधता येतो हेच तुम्ही शिकवून राहिलात आम्हाला, भक्तिचे अंतरंग उलगडून दाखवलेत ते तुम्हीच ...
वेदांचेच रहस्य, पण किती सोपे केलेत तुम्ही - आमच्यासाठी...
अशा या भक्ताचार्याला "माऊली" हीच पदवी किती शोभून दिसते - किती यथार्थ वर्णन आहे हे तुमचे - सगळा जिव्हाळा, सगळे प्रेम या तीन अक्षरात कसे अलगद सामावले गेलंय ना ?

-अजाण लेकराने कितीही अपराध करावेत आणि माऊलीने ते पोटात घ्यावेत ...
- खूप पक्वान्ने सोसत नाही का लेकराला - मग माऊलीने अगदी साधे पण पौष्टिक, रुचकर घास भरवावेत त्या लेकराला..
- लेकरु खूप संतप्त झाले आहे का संसार तापाने - एक असा अभंग समोर ठेवावा की जणू चंदनाचा लेप या मनाला लावतंय कुणी ...
- लेकराला खूप अहंकार झालाय का - माऊलीची भाषा मला थोडीबहुत कळली म्हणून - त्याच्या समोर अशा काही ओव्या माऊलीने ठेवाव्यात की हा परमार्थ किती अथांग आहे याची जाण त्या लेकराला यावी, पुन्हा नम्रपणे त्याने वाटचाल सुरु करावी ...

पण हे सगळं कोणासाठी तर जे लेकरु आहे त्यासाठीच - लेकरुच जर माऊलीला माऊली समजणार नसेल, तिला कळवळून हाक मारणार नसेल तर त्या माऊलीचाही नाईलाज आहे....

जेव्हा माऊली हा शब्द येतो तेव्हा सहाजिकच त्याबरोबर लेकरु येतेच. मूल जन्मण्याआधी तर ती असते केवळ एक "स्त्री", पण मुलाच्या जन्मानंतर मात्र ती होते "माऊली-आई". हे माय-लेकरु नाते केवळ विलक्षण - एकमेकावर अवलंबून असलेलं.

आणि मग जाणवते की तुमच्या स्मरणाने मला का कालवते ते !!
"माऊली"ने एकदा का या लेकराचा पत्कर घेतला की त्या लेकराचे तिला कधीही विस्मरण होत नाही हेच खरे. एकवेळ लेकरु माऊलीचा हात सोडून धावेल - एखाद्या आकर्षक रंगीत खेळण्याकडे !! पण माऊली मात्र त्याच्याकडे लक्ष ठेऊनच असेल - या गर्दीत आपले पोर हरवून तर जात नाही ना या ध्यासाने ..

कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति हेच एक सत्य ....

माझे पोरपण काही संपत नाहीये आणि तुझ्या प्रेमाला काही मर्यादा नाहीये - त्यामुळे याच जन्मी काय पण जन्मोजन्मीही काय वाटेल ते होवो हे माझे माऊली, माझे माये, माझे बोट सोडू नको गं ...

तू माझी माऊली, देवा तू माझी साऊली ....

------------------------------------------------------------------------------------------------------------------

कार्तिक वद्य त्रयोदशी - श्री ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधी सोहळा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! किती साध्या सोप्या शब्दांत माऊलींबद्दल वाटणारा अतीव जिव्हाळा व्यक्त केलात …

अतीव सुंदर, शशांक. अतीव सुंदर.
<<माझे पोरपण काही संपत नाहीये आणि तुझ्या प्रेमाला काही मर्यादा नाहीये - त्यामुळे याच जन्मी काय पण जन्मोजन्मीही काय वाटेल ते होवो हे माझे माऊली, माझे माये, माझे बोट सोडू नको गं ...>>