कोणते हे शहर आहे...

Submitted by सत्यजित... on 6 November, 2015 - 11:22

कोणते हे शहर आहे,कोणता दर्बार आहे...
सूर्य मावळलाच नाही,पण इथे अंधार आहे!

पाय नाही ज्यांस त्यांचा,थांबला संसार आहे...
भाकरीवर मीठ-चोळा,पांगळा आधार आहे!

काळजाला काजळू दे,लाविला मी तीट नाही...
थांब थोडेसे सुखा तू,वेदना गर्भार आहे!

चालतो त्यांच्यासवे पण,सारखा का थांबतो मी...
वाट त्यांची वाकडी अन्,पाय हा लाचार आहे!

पेटले नाही दिवे तर,सूर्य मी होणार आहे...
मागणे नाही कुणाला,सांगणे साभार आहे!

युद्ध माझ्याशीच माझे,चालले झुंजार आहे...
जाणिवांना जाग आहे,लेखणीला धार आहे!
-सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काळजाला काजळू दे,लाविला मी तीट नाही...
....... सत्यजीतजी , तीट हा शब्द स्त्रीलिंगी आहे, लाविली अथवा लावली असे घ्यावे लागेल.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद बाळ पाटिलजी
काही रचनांमध्ये 'तीट' पुल्लिंगी वापरल्याचेही वाचनात आले होते पण नेमके माहित नाही!
तसेच 'तीट' हा शब्द स्त्रीलिंगी असेलच,तर आपण सुचवलेला बदल करण्यास काहिच हरकत नाही!
कृ.मा.क.