मुंबई - पुणे - मुंबई २ (अलर्ट)

Submitted by सक्रिय on 18 November, 2015 - 02:38

मुंबई - पुणे - मुंबई २

नाते ठरण्यापासून ते लग्न होईपर्यंतचा प्रवास राजवाडे यांनी अप्रतिम मांडला आहे. लग्न हा एक उंबरठा आहे एकदा तो ओलांडला की जे काही आयुष्यात होते ते अलिकडे राहते आणि पलिकडे नव्याने सुरुवात होते किंवा करावी लागते. हा उंबरठा काहीजण आपल्या पसंतीने ओलांडतात तर काही घरच्यांच्या पसंतीने ओलांडतात. काही स्वतःच्या मर्जीने ओलांडतात तर काहींना नापसंतीने ओलांडावा लागतो. असं म्हणतात की "लग्न झाल्यावर मुलगा बदलतो", हे हमखास ऐकले जाते अर्थात मुलगी देखील बदलते पण ते तितकसे जमेत धरले जात नाही. "लग्नाआधी तु असा होतास, आता काय बायको हक्काची झाली ना, काळजी घ्या अथवा न घ्या घरातच राहणार आहे." अशी वाक्ये बर्याच जणींकडून ऐकली आहेत. लग्नानंतर हा बदलला तर आपण काय करणार? याच टु बी ऑर नॉट टु बी मध्ये नविन लग्न होणार्‍या दांपत्याची घालमेल होत राहते. या कालावधीध्ये एकमेकांच्या सहवासात आल्यावर एकमेकांची प्रतिमा मनात कायमची कोरली जाते. कधी ती चांगली असते कधी वाईट. ती आपल्याच मनात आपणच ठरवलेली प्रतिमा असते. पण दोष मात्र आपण त्या व्यक्तीला देतो. व्यक्ती कितीही समजुतदार असली तरी तिचा ही तोल कधीतरी जातो. स्वप्निल एके ठिकाणी म्हणतो " माणूस काय मीठ किंवा मिठाई आहे का? की दरवेळी एकच चव देत राहील" नाते हे नेहमी देणे-घेणे यावर अवलंबून असते जसे द्याल तसे मिळत जाते. खर्‍या नात्याची ओळख फार कमी लोकांना वेळेवर होते. बर्याच जणांना व्यक्ती दुर गेल्यावरच त्यांची किंमत कळते.

गौरी देशपांडे आणि गौतम प्रधान यांचे एका अचानक झालेल्या भेटीतून लग्न ठरते. गौरी काटेकोर मुंबईची तर गौतम ऐसपैस पुण्याचा. मुलांनी एकमेकांना बघून पसंत केलेले असते तर आता पुढची बोलणी करण्यासाठी गौतमचे आणि गौरीचे कुटुंबीय एकत्र येतात. लग्नाची तारीख ५-६ महिन्यांनंतरची ठरते. या दरम्यान बर्‍याच घडामोडी घडतात. गौतमचा स्वभाव गौरीला कळू लागतो, ती समजून घेते. गौरीचा आधीचा प्रियकर अर्णव तीची माफी मागत परत तिच्या आयुष्यात येतो. इकडे गौतमला पण गौरी, तीची लाईफस्टाईल , तिचा स्वभाव हळूहळू कळायला लागतो. पहिल्या भेटीत एकदम आयुष्यात फोकस्ड, परफेक्ट, प्रत्येक गोष्टीत ठाम असणारी गौरी प्रत्यक्षात कुठेच ठाम नसते. एकदा मिळालेल्या जखमेमुळे ती आतून कोसळलेली आहे, त्यामुळे तिला मिळणारा आधार जरा जरी हलला किंवा हलेल असे वाटले की ती लगेच स्वतःला असुरक्षित समजु लागते. याउलट गौतम आई वडीलांसाठी सुंची ला (त्याची आधीची प्रेयसी) सोडतो. आईवडील त्याला पुर्णपणे मोकळीक देतात त्यानुसार त्याच्या स्वभावात एक मोकळेपणा आलेला आहे. मला जी स्पेस मिळते आणि हे जितके गरजेचे आहे तितकीच स्पेस समोरच्या व्यक्तीला देखील मिळणे अथवा देणे महत्वाचे आहे, हे बाळकडू त्याला त्याच्या वडीलांकडून मिळालेले असते.

अर्णव परत आल्यापासून गौरीची चलबिचल वाढते. त्यात गौतमचा स्वभाव त्यात होणार्‍या घडामोडी देखील तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. गौतम हे सगळे समजुन घेत असतो. त्यात जसेजसे लग्नाची वेल समीप येऊ लागते तसतसे दोघांमधली घालमेल वाढत जाते. ती कुठपर्यंत वाढत जाते आणि शेवट काय होतो यासाठी चित्रपट बघायलाच हवा.....

----

सतिश राजवाडें चे मनापासून अभिनंदन!!! प्रचंड मेलोड्रामा, ओव्हर अ‍ॅक्टींग, यांव न त्यांव डायलॉग मारण्याची भरपूर संधी असुन देखील त्यांनी चित्रपटाची अतिशय संयत मांडणी केली आहे आणि कलाकारांकडून सुद्धा करून घेतली आहे. पहिल्या चित्रपटात फक्त दोनच कलाकार होते. पण यात कलाकारांचा भरणा असुन सुध्दा कुठेही गर्दी झालेली वाटत नाही. गौतमचे वडील म्हणून प्रशांत दामले परफेक्ट वाटतात. घरातले वातावरण फ्री ठेवण्यात त्यांच्या स्वभावाचा मोठा वाटा आहे. आपल्या मुलाला आलेले टेंन्शन लगेच ओळखून, त्याची जास्त ओढाताण होऊ न देता हलक्या फुलक्या उदाहरणाद्वारे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगणारे वडील हे पात्र उत्तम साधलेय दामलेंनी. प्रशांत दामलेचा हसतमुख चेहरा बघून सगळ्यांनाच हायसे वाटते. असेच गौरीचे बाबा विजय केंकरे यांचे कॅरेक्टर. मुलीच्या प्रत्येक निर्णयामागे ठामपणे उभे राहणारे बाबा क्वचितच आढळतात, मग ते चुक असो वा बरोबर. माझी मुलगी आहे मी तिच्या मागे उभा राहणारच हा त्यांचा निश्चय देखील गौरीला खुप आधार देउन जातो. बाकीच्या कलाकारांची निवड अचुक आहे. अर्णवचे कॅरेक्टर करणारा अंगद याला देखील योग्य ठिकाणी दिग्दर्शकाने थांबवले. अन्यथा हिंदी चित्रपटासारखी अवस्था झाली असती ती टाळली गेली आहे.

स्वप्निल आणि मुक्ता ही जोडी अजोड आहे. दोघांमधे कमालीची केमिस्ट्री आहे. मुंबई-पुणे-मुंबई, एका लग्नाची दुसरी गोष्ट या दोन्हींमधे यांनी अप्रतिम काम केले होते. तोच धागा पुढे घेऊन आलेले आहेत. पहिल्या चित्रपटात स्वप्निलचे कॅरेक्टर उनाड ,स्वच्छंदी होते तर मुक्ताचे काटेकोर, प्रॅक्टिकल होते या चित्रपटात अगदी उलट आहे. स्वप्निल मॅच्युअर्ड झालेला आहे तर मुक्ता कन्फ्युज्ड. अर्थात पहिल्या भेटीत जी व्यक्ती जशी असते तशी आयुष्यभर असेल असा काही नियम नाही. नाते जसे हळु हळू उलगडत जाते तसे माणसाच्या स्वभावाचे कंगोरे दिसू लागतात. आणि यातून जो अवघडपणा आणि मनाची घालमेल उमटते ती मुक्ताच्या बोलक्या चेहर्‍याने अप्रतिम दाखवली आहे. तिच्या चेहर्यावर क्षणात मोकळेपणा येतो तर पुढच्या क्षणी मनात होणारी घालमेल दिसू लागते. मंगळसुत्र निवडण्याच्या सीनमधे तिने दोन्ही स्थिती समतोल साधल्या आहेत. ती आजच्या काळातली सर्वोत्तम अभिनेत्री आहे.
चित्रपटाचे संवाद फार सरळमार्गी आहेत. नेहमीच्या बोलण्यातील सहजपणा चित्रपटात बघायला मिळतो, भरभक्कम डायलॉग, आरडाओरडा घेणे मुद्दाम टाळले आहे हे दिसून येते. एक खुसखुशीतपणा चित्रपटात दिसून येतो. काही सीन सुध्दा परिणामकारक झाले आहेत. विशेषतः गौरी आणि तिच्या आई मधील संवाद आणि शेवटचा सीन. अप्रतिम जमून आले आहेत.

बर्‍याच जणांना शेवटचा सीन चालू असताना पडद्यावरचे अंधूक दिसू लागते. डोळ्यांवरून हात फिरवल्यावर पुढचे दृश्य दिसते. गाणी काही केल्या लक्षात राहत नाहीत, "बँड बाजा वरात घोडा" सोडले तर इतरांमधे पहिल्या चित्रपटाच्या गाण्यासारखा "चार्म" नाही आला. सिग्नेचर ट्युन मात्र मनात घर करून राहते.

चित्रपट बरेच प्रश्न उभे करतो आणि बर्‍याच प्रश्नांची उत्तरे सुध्दा देतो. एखाद्याचा चांगुलपणा किती असावा आणि त्याचा फायदा कितपत घेतला जावा यालाही मर्यादा असतात. आपल्या चुका समजुन घेऊन शांत राहणार्‍यावर आपण किती आगपाखड करावी याचा विचार यानंतर बरीच कपल्स करतील. सगळ्याच गौरींना गौतम मिळत नाही आणि मिळाला तरी सगळ्याच गौरी नसतात. ही जाणिव उशिरा होते. लग्नानंतर असुरक्षितता फक्त मुलींना नसते तर मुलांना देखील असते. बदल सगळ्यांमधे होतात त्यामुळे योग्य वेळेस निर्णय घ्यायचा असतो. लग्नानंतर झालेले बदल नुसते आयुष्यभर सहन करत बसण्यापेक्षा लग्नाआधीच काय ते ठरवा. नंतर इतरांच्या सुखी संसाराकडे बघत बसावे लागत नाही. लग्न ही तडजोड आहे पण तिला तडजोडीसारखे न घेता एकमेकांना समजून घेतले तर संसार सुखाचा होण्यास वेळ लागणार नाही. चित्रपटात दोन्ही कॅरेक्टर जे काही करतात ते आपापल्या परीने योग्य करतात एकीकडे असुरक्षितता तर दुसरीकडे ओव्हर कॉन्फिडंस यातून नाट्य घडते. फक्त मोकळीक देण्यापेक्षा तिला समजून घेऊन तिच्या प्रश्नांची उत्तरे तिला कशी मिळतील / मिळवून देता येतील याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. इथे नायक कमी पडतो आणि पुढचे रामायण घडते.

चित्रपट अप्रतिम / उत्तम आहे. फार जणांना गौतम आणि गौरी ओळखीचे वाटतील काही स्वतःमधे बघतील तर काही इतरांमधे. जरूर बघा!!!

शुभ मंगल सावधान..!!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाहिला सिनेमा..ठीक आहे बऱ्यापैकी predictable म्हणजे फक्त शेवट नाही तर सीन्स सुद्धा..प्री-लग्न एक आई -मुलीचा, एक बहिणी -बहिणींचा, एक बाबा - मुलीचा, एक आई - मुलाचा आणि एक बाबा - मुलाचा असे compulsory सीन्स. आता इतके मोकळे आणि छान कुटुंबीय असताना गौरीला wedding anxiety बद्दल बोलायला आणि मुख्य म्हणजे समजवायला कोणीच सापडू नये? तसा फक्त एकच सीन आहे तिच्या मैत्रिणीचा जेव्हा ती ऐकवते. तो छान आहे.
पण शेवटी सगळं इतकं गोड गोड झालं..सगळी पंचपक्वान्न एकाच घासात खाल्ल्यासारखे! बाकी प्रशांत दामले बेस्ट!

आता इतके मोकळे आणि छान कुटुंबीय असताना गौरीला wedding anxiety बद्दल बोलायला आणि मुख्य म्हणजे समजवायला कोणीच सापडू नये?
>>>
असतं गं असं Happy

चांगले लिहिले आहे.

चित्रपट चांगला आहे पण गौरीची घालमेल जरा अतिच ताणली आहे असे वाटले. शिवाय बहुतांशी चित्रपटांप्रमाणे सगळे फारच गुडी गुडी आहे त्यामुळे तर ती घालमेल अजूनच खटकते. तरीही बरेच प्रसंग, संवाद सुंदर जमून आले आहेत. 'साथ दे तू मला' गाणे अतिशय सुंदर !
उल्लेखनीय म्हणजे स्वप्नीलच्या कॅरॅक्टरची कंटिन्यूटी मस्त राहिली आहे. पहिल्या भागात त्याचा अभिनय बर्‍याच ठिकाणी इरिटेट झाला होता. ह्या भागात बोलण्याची-हसण्याची लकब तीच आहे पण टोन डाऊन केली आहे, त्यामुळे पहिल्या भागातला स्वप्नील आठवतो पण डोक्यात जात नाही Wink त्याचा अभिनय आवडला.
मुक्ता मात्र पहिल्या भागातील वाटत नाही. वेगळी दिसते. अभिनय अर्थात चांगलाच आहे.
प्रशांत दामले, श्रुती मराठे, आसावरी जोशी मस्त !

फेसबुकवर हे उदय इनामदार ह्या नावाने लिहिलेले वाचले. तुम्ही तेच का इथे फक्त कॉपी पेस्ट केलेय?

छान लिहिलेय. पहिल्यांडा वाचलेले तेव्हाच आवडलेले.

परवानगी दिलीये असा उल्लेख करा आणि रेफरन्स द्या! असा कोणाचा ही लेख उचलून कसे काय टाकता!
<<
साधना, धनि, dmugdha
जास्त लोड करून घेऊ नका.
त्यांच्याकडे परवानगी आहे. मी पाहिली आहे. Wink

छान लिहिलंय, मिळाला की बघणार.
पहिला आवडला न्हवता, बळेच टिपिकल जोक करायला प्रसंग रचलेत असा फील आलेला.

मला पण पहिला भाग बोर झाला होता. स्वप्निल अज्जिबात आवडत नाही. आता हा बघितलाच तर प्रशांत दामले, सुहास जोशी हेच मोटिवेशन असेल.