रंगबीरंगी दुनिया : पोशाख भाड्याने देण्याचा व्यवसाय : श्रीमती प्रेरणा जामदार (माझा छंद, माझा व्यवसाय)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 18 January, 2012 - 03:10

आयुष्यात वेगळे काहीतरी करावे, आपले छंद जोपासताना त्याबरोबरच अर्थार्जनही करावे आणि नव्या वाटा चोखाळताना त्यात आपल्या कुटुंबियांची सर्वार्थाने साथ मिळावी अशी आकांक्षा अनेक स्त्रियांच्या मनात असणे सहज शक्य आहे. परंतु सर्वांनाच ते साधते असे नाही. वयाची चाळीशी उलटल्यावरही आपण काही करू शकतो, त्यातून व्यावसायिक यशासोबत इतरही बरेच काही कमावू शकतो ह्याची कल्पनाच अनेकींना नसते. सांसारिक जबाबदार्‍या सांभाळून आपल्या छंदाला एका वेगळ्या प्रकारच्या व्यवसायाचे स्वरूप देणार्‍या नागपूर येथील प्रेरणाताईंनी आपली कल्पना प्रत्यक्षात आणून ते साध्य केले. फॅन्सी पोशाख तयार करवून घेऊन ते भाड्याने देण्याच्या व्यवसाय क्षेत्रात उतरलेल्या श्रीमती प्रेरणाताई जामदार यांनी एक तपाहून अधिक अशा व्यावसायिक कारकीर्दीत आपल्या छंदाला एका यशस्वी व्यवसायात प्रत्यक्ष साकार केले आहे.

शाळा - कॉलेजेसच्या स्नेहसंमेलने, फॅन्सी ड्रेस इत्यादी कार्यक्रमांसाठी तयार ड्रेसेस व आभूषणे - प्रावरणे भाड्याने देण्याचा प्रेरणाताईंचा व्यवसाय हा १२ - १३ वर्षांपूर्वी, 'रंगबीरंगी' नावाने, त्यांच्या वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी, एका शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या ड्रेस ऑर्डर पासून सुरू झाला व आज त्या किमान २५ ते ३० शाळा - कॉलेजेसना तसेच खासगी ग्रुप्सना वेगवेगळ्या कार्यक्रम - समारंभांसाठी 'रंगबीरंगी' च्या माध्यमातून तर्‍हेतर्‍हेची वस्त्राभूषणे पुरवतात. आपल्या व्यवसायात दर्जेदार सेवा व रास्त भाव याचबरोबर उत्तम संवाद राखण्यावर त्यांचा भर आहे.

संयुक्ताच्या 'माझा छंद - माझा व्यवसाय' उपक्रमांतर्गत त्यांच्याशी केलेली ही बातचीत :

प्रश्न : मला तुमच्याविषयी जरा थोडक्यात सांगाल का? तुमचे शिक्षण, तुम्हाला या क्षेत्रात का यावेसे वाटले, या व्यवसायाअगोदरचा प्रवास वगैरे.

प्रेरणाताई : मी फिजिकल केमिस्ट्री विषयात एम. एस्सी. केले आहे. माझे शाळा, कॉलेज शिक्षण वगैरे चंदिगढ येथे झाले. श्रीयुत जामदारांशी लग्न होण्याअगोदर मी वर्षभर नोकरीही केली. पण लग्न होऊन नागपूर येथे आम्ही स्थायिक झालो आणि मी मुलं, घर, संसारात रमले. तशीही आमच्याकडे मी कमावलेच पाहिजे अशी गरज नव्हती. मला दोन मुलगे व एक मुलगी अशी तीन अपत्ये आहेत. माझ्या मुलांना बाहेर शिकवणीसाठी न धाडता त्यांना मी हौसेने घरीच शिकविले. त्यांच्या मित्रमैत्रिणींनाही शिकविले. धाकटी मुलगी भरतनाट्यम् शिकत असताना तिच्या निमित्ताने नृत्य, नाटक इत्यादी कार्यक्रमांसाठी लागणारे तयार पोशाख भाड्याने देण्याच्या व्यवसायाशी माझा प्रथम परिचय झाला. तेव्हा मला वाटायचे की या मुलींसाठी यापेक्षा जास्त चांगले, स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून सरस व आणखी देखणे पोशाख बनविता येतील. मुलीच्या निमित्ताने मला नृत्य, नाट्य, स्नेहसंमेलने इत्यादींसाठी लागणार्‍या या प्रकाराच्या पोशाखांची, त्यांच्या तयारीची, शिलाई - कलाकारीची ओळख होत गेली. त्याबद्दल रुची निर्माण झाली, माहिती होऊ लागली.

प्रश्न : मग या व्यवसायात तुम्ही कसे काय पदार्पण केलेत?

प्रेरणाताई : सर्वात धाकटी असलेली माझी मुलगी दहावी पूर्ण झाल्यावर मी घरातून बाहेर पडून काहीतरी करायचे मनाशी ठरविले होते. घरच्यांचाही त्यासाठी पूर्ण पाठिंबा होता. मला आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे होते. पण शिकवण्या वगैरे घ्यायच्या नव्हत्या. नेहमीच्या ठराविक पद्धतीच्या व्यापार-उदीमात मला रस नव्हता. घरी माझ्या कमाईची कधीच गरज नव्हती. पण आपण जे काही काम करायचे ते क्रिएटिव्ह असावे, त्यातून इतर लोकांशी संवाद साधता यावा, वर्षभर गुंतवून टाकणारे काम नसावे असे मला वाटायचे. त्या दृष्टीने हा व्यवसाय मला सोयीचा वाटत होता. शिवाय या क्षेत्राबद्दलची बरीच माहितीही माझ्याकडे जमा झाली होती. मुलीमुळे अनुभवही होता. माझ्या ओळखीत स्नेहसंमेलनांसाठी लागणारे पोशाख भाड्याने देण्याचा अगदी घरगुती पातळीवर व्यवसाय करणार्‍या एक बाई होत्या. त्या आपला व्यवसाय बंद करणार होत्या. माझा उत्साह व तयारी पाहून त्यांनी त्यांच्याकडील एका शाळेच्या स्नेहसंमेलन पोशाखांची ऑर्डर माझ्याकडे सोपवली. मी ती ऑर्डर यशस्वीपणे पूर्ण करू शकले. तिथूनच माझ्या व्यवसायाची खरी सुरुवात झाली.

प्रश्न : मग तुम्ही व्यवसायासाठी लागणारे भांडवल कसे उभे केलेत? त्यात तुम्हाला घरातून कशा प्रकारे पाठिंबा मिळाला?

प्रेरणाताई : मला सुरुवातीला या धंद्यातील भांडवलासाठी लागणारे पैसे माझ्या यजमानांनीच देऊ केले. त्यासाठी मला बाहेरून कोठून कर्ज घ्यावे लागले नाही वा स्वतंत्रपणे भांडवल उभारावे लागले नाही. यजमान इंडस्ट्री व फायनॅन्स या दोन्ही क्षेत्रांतील अनुभवी असल्यामुळे त्यांच्या या अनुभवाचा व सल्ल्याचा मला व्यवसायाच्या बाबतीत खूपच फायदा झाला.

व्यवसायाची सुरुवात मी घरूनच केली व आताही १३ वर्षे झाल्यावर हे काम मी घरूनच करते. वेगवेगळे फॅन्सी पोशाख शिवण्यासाठी शिंपी निवडणे, वेळेनुसार हाताखाली मदतनीस ठेवणे हे तर करावे लागतेच! वेळोवेळी घरातील इतर मंडळीही मदत करतात. खास करून माझ्या दोन्ही सुना आपापले व्यवसाय - जबाबदार्‍या वगैरे सांभाळून मला आवर्जून मदत करतात. त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा असतो. त्या मला पोशाखांच्या सध्याच्या लेटेस्ट ट्रेंड्स, फॅशन बद्दल सांगतात, सुचवतात. अगदी मनापासून मदत करतात. त्यांच्या भरवशावर तर मी हे काम करते.

प्रश्न : तुमच्या या व्यवसायाचे स्वरूप जरा विस्ताराने सांगाल?

प्रेरणाताई : माझ्याकडे फॅन्सी ड्रेस भाड्याने घेऊन जाण्यासाठी तूर्तास २५ ते ३० शाळांच्या स्नेहसंमेलनाच्या नियमित ऑर्डर्स असतात. शिवाय प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, स्पेशल डेज् वगैरेंसाठीही लोक भाड्याने ड्रेस नेतात. व्यवसाय तसा वर्षभर चालणारा असला तरी साधारण सप्टेंबर - ऑक्टोबर (दिवाळी) ते फेब्रुवारी (महाशिवरात्र) हा आमचा सर्वात व्यस्त व धावपळीचा सीझन असतो. याच काळात सर्व शाळांमधील स्नेहसंमेलने भरतात. मग त्या काळात आम्हाला विविध वयोगटांतील मुलामुलींच्या मापाचे ऐतिहासिक, पौराणिक, सांस्कृतिक पोशाख तर तयार ठेवायला लागतातच, शिवाय त्याबरोबर लागणारी छोटी मोठी प्रॉप्स, उदा. पर्‍यांचे पंख, हातातील जादूची कांडी, गदा, तलवारी, धनुष्यबाण, गणपतीचे मुखवटे, फुलपाखरांची सोंड इत्यादी साहित्यही आम्ही त्या काळात तयार ठेवतो व भाड्याने देतो.

शाळा सामान्यतः आम्हाला घाऊक स्वरूपाची ऑर्डर देतात. त्यानुसार लागणारे साहित्य खरेदी करणे, वेळेत तेवढ्या संख्येचे - त्या त्या मापांचे पोशाख तयार ठेवणे, त्यांचे पॅकिंग, डिलिव्हरी या सर्व गोष्टींना सांभाळावे लागते. बाहेर विकत मिळणारे साहित्य - दागिने इ. अनेकदा महाग असते किंवा जसे हवे आहे तसे नसते. मग त्याचा कच्चा माल घरी आणून ते दागिने बनविणे / बनवून घेणे आम्हाला जास्त सोयीचे पडते. अर्थात कामाचा व्याप वाढतो. परंतु त्याला पर्याय नसतो.

शाळा आम्हाला पोशाखांसाठीचे त्यांचे बजेट सांगतात. त्या बजेटमध्ये बसणारे, त्यांच्या कार्यक्रमांस अनुरूप असे दोन - तीन तर्‍हेचे पोशाख मी त्यांना सुचविते. त्याची सँपल्स द्यावी लागतात. त्यानुसार ठरलेले पोशाख त्या संख्येत पॅक करणे, त्यांची डिलिव्हरी देणे, ते पोशाख वापरून परत आल्यावर ड्रायक्लीनसाठी पाठविणे, त्यांचा मेन्टेनन्स व ते पुन्हा व्यवस्थित पॅक करून वर्गवारीनुसार खोक्यांत ठेवणे हे सारे करायचे असते. कधी एका शाळेच्या तयार पोशाखांची शिंप्याकडून डिलिव्हरी आलेली असते, त्यांचे चेकिंग चालू असते, दुसरीकडे आणखी एका शाळेला लागणार्‍या पोशाखांचे पॅकिंग चालू असते, तेव्हाच तिसरीकडे काही पोशाख पोचवायचे असतात तर कोणा शाळेचे पोशाख वापरून परत आलेले असतात.... आणि हे सर्व एकाच वेळी सांभाळायचे असते. या काळात माझ्या घरी त्यामुळे अगदी धामधूम असते. या काळात आमची खर्‍या अर्थाने शारीरिक व मानसिक दमणूक असते.

सध्या हा व्यवसाय मी घरूनच चालविते. वेगवेगळ्या तर्‍हेचे, वयोगटाचे, हर प्रकारचे पोशाख आम्ही जमवतो, शिवून घेतो, त्यांवरच्या अ‍ॅक्सेसरीज बनवतो किंवा खरेदी करतो. मग निरनिराळ्या खोक्यांमध्ये ते सर्व सामान वर्गवारी करून ठेवतो. त्यासाठी आवश्यक रॅक्स वगैरे सोयी मी घरीच करून घेतल्या आहेत. अगदी शिशुशाळेपासून ते महाविद्यालयीन मुलामुलींपर्यंत सर्व तर्‍हेचे पोशाख आम्ही भाड्याने देतो. अगोदर अशा पोशाखांच्या विक्रीवर माझा जास्त भर नसे. त्यात ग्राहकांना अगोदर ड्रेसचे सॅम्पल दाखवावे लागते. ते पसंतीस पडल्यास त्यानुसार ड्रेसची ऑर्डर येते. त्यात जरा जरी अधिक उणे झालेले कित्येक ग्राहकांना खपत नाही. शिंप्यांकडूनही खूप वेळा छोट्या छोट्या चुका किंवा त्रुटी अनवधानाने राहून जातात. त्यामुळे असे ड्रेस विकण्याकडे अगोदर माझा कल नव्हता. मात्र इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर आता त्या क्षेत्रातही अधिक लक्ष द्यायचे मी ठरविले आहे.

प्रश्न : या व्यवसायात तुम्हाला कशा प्रकारची आव्हाने समोर येतात?

प्रेरणाताई : बर्‍याचदा आमच्याकडे ऑर्डर देणार्‍या २-३ शाळांची स्नेहसंमेलने एकाच वेळी, त्याच तारखांना असतात. त्यावेळी आमची खरी धावपळ उडते. कधी एखाद्या नाचातील सदस्य अचानक वाढतात, आयत्या वेळी शिक्षक कोणा पात्रासाठी किंवा त्यांनी बसविलेल्या नाचासाठी जास्तीच्या पोशाखांची मागणी करतात, कधी आमच्याकडचे पोशाख त्यांना ऐन वेळेला कमी पडू लागतात. अशा वेळी ती वेळ निभावून नेणे फार महत्त्वाचे असते. तेव्हाच खरी धावपळ उडते. जर आमच्याकडे त्यांना हवे तसे जास्तीचे पोशाख उपलब्ध नसतील तर आम्ही समव्यावसायिकांकडून तसे पोशाख मागवून शाळांची ती मागणी पूर्ण करतो.

काही शाळांचे याबाबतीत असलेले मापदंड फारच कडक असतात. त्यांना एका ग्रुपचे सर्व ड्रेस अगदी सर्व तर्‍हेने सेम टू सेमच हवे असतात. जराही फरक खपत नाही. पण तिथे येणार्‍या व्यावहारिक अडचणी, उदा. विकत आणलेला कापडाचा तागा अपुरा पडणे, त्याच रंगाचा - छटेचा दुसरा तागा लगेच न मिळणे किंवा तशी मागणी नोंदवूनही तो तागा वेळेत न येणे यासारख्या अडथळ्यांवर वेळोवेळी प्रसंगावधान राखून उपाय शोधायला लागतात. शिंपी लोक ऐनवेळेला दगा देऊ शकतात. तरी मी कार्यक्रमाअगोदर किमान दोन दिवस माल तयार ठेवते, म्हणजे आयत्यावेळी काही दुरुस्त्या करायला लागल्या तर थोडा वेळ तरी मिळतो. एक वेळ मापाने मोठा शिवला गेलेला ड्रेस लहान करता येतो, पण आखूड किंवा लहान झालेला ड्रेस मोठा कसा करणार? त्यावेळी तशाच मापाचा ड्रेस हुडकण्यासाठी समव्यावसायिकांची मदत घ्यावी लागते. तेही माझी मदत घेत असतात. वेळप्रसंगी शिक्षकांची, पालकांची समजूत घालायला लागते. काही कारणाने तुम्ही दिलेले पोशाख त्यांच्या पसंतीस उतरले नाहीत तर त्याबद्दल त्यांची माफी मागणे, सॉरी म्हणणे हेही करावे लागते.

कधी कधी स्वतंत्रपणे काही पालक किंवा ग्रुप्स आमच्याकडून पोशाख भाड्याने घेऊन जातात. काही शाळा पालकांना परस्पर पोशाख अ‍ॅरेंज करायला सांगतात. मग त्या पालकांच्या झुंडी आमच्याकडे येतात. अशा वेळी त्यांची मागणी व आमच्याकडे उपलब्ध असलेले पोशाख यांचा ताळमेळ खुबीने बसवावा लागतो. त्यांना पर्यायी वेशभूषा सुचविणे, त्याच वेषात परंतु वेगळ्या तर्‍हेने सादरीकरण करण्यास सुचविणे हेही करावे लागते. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर एकदा फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी एका मुलीचे पालक माझ्याकडे आले. त्यांना आपल्या मुलीसाठी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा वेष हवा होता. त्यांच्या मुलीच्या मापाची हिरवी घागरा-चोली माझ्याकडे होती. मग तिला मी ती घागरा-चोली घालून ''मी पृथ्वी आहे, माझ्या पर्यावरणाचा नाश करू नका,'' अशा अर्थाचे वाक्य बोलण्यास सुचविले. त्यांनाही ती कल्पना आवडली व त्या स्पर्धेत तो वेष घालून ती मुलगी पहिली आली. आता जर तिने त्यावर घुंगट घेतला असता तर ती राधिका म्हणून वावरू शकली असती. तीच गत कृष्णाची. कृष्णाच्या वेशभूषेत आता काय नवीन देणार? त्या वेळी त्या चिमुकल्या कृष्णाने समजा वेगळा डायलॉग म्हटला, की, 'लोणी खाऊन खाऊन कंटाळा आला बुवा.... आता मला चॉकलेट्स पण पाहिजेत!'.... तर तेच त्याचे वेगळेपण ठरू शकते. आणि हे सर्व आम्हाला शाळेतील शिक्षकांना, पालकांना कधी सुचवावे लागते, तर कधी पटवावे लागते.

आमच्याकडे झडणारे संवादही कित्येकदा ऐकणार्‍याला मोठ्या मजेचे वाटतील. उदा. ''अगं, शिवाजीच्या डब्यात औरंगजेबाची टोपी असेल का?'' आमच्याकडे ज्ञानेश्वर व येशू ख्रिस्त गुण्यागोविंदाने एकाच डब्यात राहतात!
एकदा एक मजेचा प्रसंग झाला. एका शाळेने आयत्या वेळी शाळेच्या सार्‍या पालकांना परस्पर आमच्याकडून पोशाख घेऊन जाण्यास सांगितले. दिवसभर ते पालक कधी वेगवेगळे तर कधी थव्याथव्याने आमच्या घरी येत होते. त्या दिवशी घरात आम्ही सहाजण अखंडपणे त्याच कामात होतो. माझा मुलगा सतत फोनवर पालकांशी बोलत होता.... फोन वाजला की तो रिसीव्हर उचलून पलीकडील व्यक्ती काही बोलायच्या आतच ''हं, कोणता वर्ग? कोणता ड्रेस?'' एवढंच विचारत असायचा.... आम्ही बाकीचे सगळेजण फक्त ड्रेसेसचे पॅकिंग सांभाळत होतो, तर माझे मिस्टर कॅश घेणे, पावत्या देणे, नोंद करण्याचे काम करत होते. त्यांना तसे काम करताना पाहून त्यावेळी आमच्याकडे आलेले त्यांचे समव्यावसायिक मित्र मिश्किलपणे म्हणालेही, ''क्यों जामदार साहब, रिटायर हो गये क्या? वैसे यह साईड बिझनेस भी बुरा नहीं है!''

या व्यवसायाची एक बाजू अशी आहे की सर्व वर्षभर तुम्ही गुंतून न राहता ठराविक काळातच व्यस्त राहता. घरून काम करता येऊ शकते. तुमची कल्पकता, निरीक्षण, संवादकौशल्य यांचीही कसोटी असते. समयोचितता दाखवावी लागते. गिर्‍हाईकांना दुखावून चालत नाही. इतर व्यवसायांप्रमाणेच इथेही शेवटी गिर्‍हाईक बोलेल तेच प्रमाण असते. पण तरीही त्यात एखादी गोष्ट तुम्ही त्यांना कशी पटवून देता यावरही बरेच अवलंबून असते. खूप लोकांशी या निमित्ताने गाठीभेटी-ओळखी होतात. बाजारातील माल, लेटेस्ट ट्रेंड्स, नवी गाणी - नाच यांवरही लक्ष ठेवावे लागते. अनेक तरुण मुलंमुली, पालक वगैरे रिअ‍ॅलिटी शो मधील नाच, बॉलीवूड डान्स पाहून तसाच ड्रेस हवा म्हणून मागणी करतात. पण त्यांना समजावावे लागते की त्या तर्‍हेचा ड्रेस बराच महाग असतो. तसाच पण स्वस्तातील ड्रेस शिवताही येईल, परंतु त्याचा प्रभाव तसाच पडेल असे नाही. बॉलीवूड डान्समधील कपडे शाळा - कॉलेजांच्या स्नेहसंमेलनात चांगले दिसतीलच असे नाही. शिवाय ते मापाप्रमाणे शिवून घेतले तरच चांगले दिसतील. व्यक्तिशः मला ते तशा प्रकारच्या ड्रेसची नक्कल करणे पटत नाही. पण कधी मागणीनुसार थोडे फेरफार करून तसे ड्रेसही द्यावे लागतात.

प्रश्न : या व्यवसायातील आर्थिक समीकरणाविषयी सांगाल?

प्रेरणाताई : नव्याने या व्यवसायात येणार्‍याला सध्याच्या काळात तरी सुरुवातीला किमान पन्नास ते साठ हजारांची गुंतवणूक निव्वळ कपड्यांमध्ये करावी लागते. शाळांमध्ये सध्या स्नेहसंमेलनात जास्तीत जास्त मुले मंचावर दिसण्याचा आग्रह असतो. अगदी तीस-पस्तीस मुले एका वेळेस स्टेजवर असतात. एका ग्रुप डान्ससाठीच्या पोशाखांचे साधारण पंधरा ते वीस हजार रुपये तरी किमान होतातच! शिवाय ज्यांना काही संवाद नसतील, तरी स्टेजवर काम आहे, असे झाड, फूल, पक्षी, डोंगर, घर, प्राणी इ. झालेल्या मुलांसाठीचे पोशाखही लागतातच! आम्ही हे पोशाख एकदा तयार करून घेतल्यावर ते पुन्हा पुन्हा वापरले जावेत याकडेही आम्हाला लक्ष द्यावेच लागते.

जर तुम्ही व्यवसायासाठी कोठे भाड्याने जागा घेणार असाल तर तो खर्च, सामान व्यवस्थित पॅक करणे, साठविणे यासाठी सोयी, मदतनिसांचे वेतन हेही पाहावे लागते. एक पोशाख तीनदा भाड्याने दिला की सर्वसाधारणपणे त्याचे मूल्य वसूल होते व चौथ्या वेळेपासून तो तुम्हाला उत्पन्न देऊ लागतो. क्लासिकल डान्सच्या पोशाखांना तुलनेने गुंतवणुकीचा खर्च जास्त होतो परंतु त्याच प्रमाणात ते भाड्याने घेतले जातीलच असे नाही! अर्थात ही येथील नागपुरातील स्थिती आहे. हे त्या त्या ठिकाणावर अवलंबून असू शकते.

सुरुवातीला आमच्या ऑफ सीझनमध्ये आम्ही व शिंपी लोक जरा निवांत असताना मी काही पोशाख किंवा प्रॉप्स तयार करून घेतले होते. त्यात हेतू असा होता की आयत्या वेळी धावपळ कमी व्हावी. पण नंतर लक्षात आले की अशा प्रकारे पोशाख त्यांच्या मागणी अगोदरच तयार करून ठेवण्यात तसा काही अर्थ नाही. कारण त्यावेळच्या करंट ट्रेंड्स नुसार ग्राहकांची मागणी असते व ती कोणत्या प्रकारच्या पोशाखाची असेल हे तुम्ही सांगू शकालच असे नाही! एखाद्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हिट्ट बॉलीवूड गाण्यातल्या पोशाखांची मागणीही सर्वाधिक असू शकते. अर्थात काही पौराणिक, ऐतिहासिक इत्यादी पोशाखांना कायमच मागणी असते. त्यांच्यात गुंतवणूक केली तरी ते पोशाख पडून राहत नाहीत. तसेही कोणता पोशाख तसा कधीच वाया जात नाही. तो कोठे व कशा प्रकारे वापरता येईल याचा विचार मात्र तुमच्या डोक्यात हवा. जेव्हा ग्राहक ऑर्डर द्यायला येतात तेव्हा आपल्याकडे असा कोणता पोशाख आहे का - जो त्या ऑर्डरसाठी वापरता येईल, हेही तेव्हा सुचायला हवे!

मी व्यवसाय सुरू केला तेव्हा एका ड्रेसला आम्ही त्या वेळेसाठी दिवसाला साठ रुपयांच्या रेटने द्यायचो. आता तोच रेट इथे दीडशे रुपयाचा आहे.

कधी आम्हाला त्या वर्षीच्या कार्यक्रमासाठी एखाद्या प्रकारच्या पोशाखाची मोठ्या प्रमाणात मागणी असते. पण तो पोशाख पुढे मागणीत राहीलच असे नाही. तेव्हा ती ऑर्डर घेतल्यावर ते पोशाख आणखी कोणकोणत्या ठिकाणी वापरता येतील याचाही अभ्यास हवा. उदा. सध्या स्पोर्टस् डे ला देखील काही शाळांमध्ये फॅन्सी ड्रेस असतो. एकदा आमच्याकडे अशीच नर्सरीतील मुलांच्या गटासाठी पन्नास हनुमानाच्या पोशाखांची 'हनुमान पी. टी.' साठी ऑर्डर आली. ती पुरी केल्यावर या पोशाखाला आता इतर कोठे वापरणार असा प्रश्न होता. पण लक्षात आले की त्या पोशाखातील धोतरे इतर ठिकाणीही वापरता येतील. अशी कॅल्क्युलेशन्स तयार ठेवायला लागतात.

मला या व्यवसायातून घर चालवायचे नव्हते. परंतु वर्षातील हे चार - पाच महिने जर तुम्ही आपलं मार्केटिंग व मालातील गुंतवणूक व्यवस्थित केलीत, मेहनत घेतलीत तर तुम्हाला त्या ऑर्डर्स पुर्‍या केल्यावर मिळणार्‍या उत्पन्नातून वर्षभर घर चालविण्याइतका पैसा नक्कीच मिळतो.

समजा पहिल्या वर्षी तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा परतावा त्या वर्षी नाही मिळाला तरी दुसर्‍या, तिसर्‍या वर्षी तर तो मिळू लागतोच. पण तुमच्याकडे तेवढा पेशन्स हवा. या व्यवसायात कधी थोडीफार झळही लागतेच, कधी कोणी फसविते. पण ते इतर व्यवसायांप्रमाणेच आहे. त्यातून शिकून पुढे जायचे. खूप नुकसान असे सहसा होत नाही.

जसजसे तुमचे उत्पन्न वाढत जाते तसतसे या व्यवसायात अधिक प्रमाणात पैसे गुंतविण्यासाठीही आत्मविश्वास येतो. आणि ती या व्यवसायाची गरजही आहे. तुम्हाला तुमच्याकडचा माल कालानुरूप अद्ययावत व चांगल्या कंडिशनमध्ये ठेवावाच लागतो. चांगली सर्व्हिस द्यावी लागते. सुरुवातीला मला पोशाखासाठी दिवसातून एक ग्राहक जरी येऊन गेले तरी त्याचे कौतुक वाटायचे. कारण त्या वेळी माझ्या व्यवसायाचे नाव झाले नव्हते. पण इतक्या वर्षांच्या कामाच्या गुणवत्तेमुळे, व्यक्तिगत संपर्कांमुळे आता या व्यवसायात खूप माणसे, ग्राहक जोडले गेले आहेत.

प्रश्न : आर्थिक गुंतवणुकीखेरीज तुम्ही व्यवसायात इतर कशा प्रकारे काळजी घेता?

प्रेरणाताई : आमच्याकडे स्नेहसंमेलनांच्या सीझनमध्ये सर्वात जास्त उलाढाल होते. तेव्हा मोठ्या ऑर्डरबरहुकूम त्या त्या वेळेला आवश्यकतेप्रमाणे आर्थिक गुंतवणूकही करावी लागते. प्रॉफिट मार्जिनही या व्यवसायात भरपूर आहे. मात्र इतरांवर खूप विसंबून राहून चालत नाही. तुम्हाला हवा असलेला कच्चा माल, कापड, दागिने इत्यादींच्या खरेदीस व्यक्तिशः जाणे, शिंप्यांकडून किंवा अन्य कलाकारांकडून ऑर्डरबरहुकूम पोशाख, प्रॉप्स बनवून घेणे, इस्त्री - ड्रायक्लिनिंग - मेन्टेनन्स, त्यांचे पॅकिंग व डिलिव्हरी येथे सगळीकडे जातीने लक्ष द्यावे लागते. ग्राहकसंबंधही सांभाळावे लागतात. एका वेळेस जरी कपड्यांची डिलिव्हरी द्यायला जाता आले नाही तरी पालक किंवा शिक्षक थोडे नाराज होतात, नंतर सांगतात की तुम्ही यायला हवे होते, खूप गोंधळ झाला वगैरे! खरे तर तसा काही फारसा गोंधळ झालेला नसतो... पण ती ग्राहकाची मानसिकता असते. त्यांना पर्सनल सर्व्हिस असेल तर बरे वाटते.

कोणत्याही व्यवसायात असतात त्याप्रमाणे इथेही तुमच्या काही जबाबदार्‍या असतात व त्या तुम्ही कशा पार पाडता यावर तुमचे व्यावसायिक यश अवलंबून असते. वेळप्रसंगी घरच्या इमर्जन्सीज, स्वतःची तब्येत, पाहुणे, घरकाम, नात्यातील कार्य हे सर्व सांभाळून किंवा त्यांपेक्षा व्यावसायिक जबाबदारीला अग्रक्रम देऊन काम करावे लागते. कधी कधी गर्दीच्या काळात मला स्वयंपाक केलेला असताना दिवसातून पाच मिनिटे काढून दोन घास खायलाही फुरसत होत नाही. त्यावेळी मुलं-सुना सक्तीने मला थोड्या मिनिटांची विश्रांती घेऊन खायला भाग पाडतात. पण घाई, गडबड, आयत्या वेळच्या मागण्या, दिवसरात्र ग्राहकांची वर्दळ, फोन, घायकुतीला आलेले ग्राहक हे सर्व या व्यवसायाचा भागच आहेत. जर तुम्ही घरीच हा व्यवसाय करणार असाल तर पसार्‍याची तयारी असलेलीही बरी! माझ्या घरातही तीन-चार दिवस असे येतातच की जेव्हा बेडरूमपासून ते बैठकीच्या खोलीपर्यंत सगळीकडे कपडे, खोकी, गठ्ठे, पॅकिंगचे सामान यांचा भरपूर पसारा असतो. एखादा बाहेरचा पाहुणा आला तर त्याला खुर्चीवरचा कपड्यांचा गठ्ठा बाजूला करून स्वतःला बसायला जागा करून घ्यावी लागते. तेव्हा तुमची व घरच्यांची असा पसारा सहन करायची तयारी हवी! बाहेरच्या जागेत व्यवसाय करणार असाल तर घराबाहेर १०-१२ तास थांबायची तयारी हवी.

प्रश्न : तुम्ही व्यावसायिक स्पर्धेला कसे तोंड देता?

प्रेरणाताई : अन्य व्यवसायांप्रमाणे याही व्यवसायात स्पर्धा आहेच! पण आमच्या येथे प्रत्येक व्यावसायिकाकडे त्या त्या भागातील ठराविक शाळांच्या ऑर्डरी असतात, व आम्ही सहसा एकमेकांच्या एरियात ढवळाढवळ करत नाही. संघर्ष सहसा होत नाहीत. उलट आमच्याकडे नसलेले किंवा कमी पडणारे पोशाख आम्ही इतरांकडून मागवितो व त्यांचेही तसेच धोरण असते. मुख्य काय, तर आपण एखादा पोशाख, एखादी वस्तू ऑर्डर देऊन बनवून घेतली की आम्हाला त्या वस्तूची गरजही निर्माण करावी लागते. त्यासाठी शिक्षकांना, पालकांना वेगवेगळ्या कल्पना सुचविणे, त्यांना ती वस्तू उपयोगात येईल असे पर्याय देणे याचे कौशल्यही अंगी बाणवावे लागते.

प्रश्न : ह्या तेरा वर्षांच्या कारकीर्दीत या व्यवसायाने तुम्हाला काय दिले?

प्रेरणाताई : आपल्या कौशल्यांचा, क्षमतेचा कस लागणे व त्यांचा विकास हे मी ह्या व्यवसायाच्या निमित्ताने पुरेपूर अनुभवले व आजही अनुभवत आहे. मला आज वयाच्या एकसष्टाव्या वर्षीही या व्यवसायाचा व्यक्तिगत पातळीवर खूप फायदा होत असतो. मी आता कधी निवृत्तीचे उद्गार काढले तरी मला आजूबाजूचे सगळेजण म्हणतात, की तू काही पुढची किमान दहा वर्षे निवृत्त होत नाहीस!!! मोकळा असा वेळच नसतो. आणि मिळालेला वेळ नव्या गोष्टी पाहणे, बाहेर गेल्यावर तेथील वस्तू, वस्त्रांचे व्यावसायिक दृष्टिकोनातून निरीक्षण, त्यातून सुचलेल्या नव्या कल्पना राबविणे यांत कसा जातो तेच कळत नाही! मुख्य म्हणजे मन व मेंदू ताजे टवटवीत राहतात. नव्या गोष्टी शिकायला मिळतात. लोकांशी संवाद साधायची मला जात्याच आवड असल्यामुळे या व्यवसायाच्या निमित्ताने लोकसंग्रहही भरपूर झाला आहे. कधी बरेवाईट अनुभव येतात, पण आजही माझा 'बहुतांशी माणसे ही चांगलीच असतात,' हा समज ठाम आहे. एखाद्या माणसाच्या वाईट अनुभवामुळे बाकीचे वाईट ठरत नाहीत. व्यवहारचातुर्य, लोकांना आपल्या कल्पना खुबीने पटवून देणे, पेशन्स हेही सर्व शिकायला मिळते. कधी स्नेहसंमेलनांच्या गडबडीच्या काळात कोणा ग्राहकाचा पारा चढतो, वातावरण गरम होते तेव्हा सरळ, ''आमच्याकडून चूक झाली, माफ करा'' असे म्हटल्यावर निवळणारे वातावरणही बरेच शिकवून जाते.

प्रश्न : नव्याने या व्यवसायात कोणी पदार्पण करू इच्छित असेल तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?

प्रेरणाताई : अवश्य या. वेळेनुसार भरपूर मेहनत करण्याची तयारी ठेवा. या व्यवसायात स्पर्धा जेवढी आहे तितक्याच संधीही भरपूर आहेत. लोकांशी सुसंवाद साधण्याची आवड ठेवा. आर्थिक सुनियोजन करा. ह्या व्यवसायात नफा जसा आहे तसेच परिश्रमही आहेत, आणि कल्पकतेसोबत प्रसंगावधान हवे. घाई-गर्दी-गोंधळ-पसारा यांचीही तयारी हवी. पेशन्स हवा. आणि या प्रकारच्या कामाची आवडही हवी. एवढे तर मी नक्कीच सांगू शकेन.

अधिक माहितीसाठी प्रेरणाताईंचा संपर्क :

श्रीमती प्रेरणा जामदार
१०१, वर्मा ले आऊट, नागपूर - ३३.
भ्रमणध्वनी : +९१ ९५४५२१५५५१.

-- मुलाखतकार : अरुंधती कुलकर्णी

-----------------------------------------------------------------------------------------

* मायबोलीकरीण वत्सला हिच्या ओळखीतून व माहितीतून ही मुलाखत शक्य झाली. तिचे खास आभार. Happy
आणि कविताचे वाचून अभिप्राय दिल्याबद्दल. Happy

** संयुक्ताच्या माध्यमातून स्त्रियांसाठी व्यक्त होण्याचे एक वेगळे व्यासपीठ मायबोलीने उपलब्ध करून दिले आहे. व्यवसाय, करियर, आरोग्य, सल्ला-मार्गदर्शन, आधार, मदत, माहिती, संवादाच्या माध्यमातून स्त्रियांना व्यक्त होण्याचे, जाणिवा प्रगल्भ करण्याचे प्रयत्न संयुक्ताच्या माध्यमातून सातत्याने चालू असतात. आज अडीचशेहून अधिक स्त्रिया संयुक्ताच्या सदस्या आहेत व या व्यासपीठाचा लाभ घेत आहेत. नव्या मैत्रिणी मिळवत आहेत. मायबोलीवरील कोणीही स्त्री सदस्या संयुक्ताचे सभासदत्व घेऊ शकते.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरुंधती, छानच झाली आहे, मुलाखत.

खरेच काही व्यवसाय आपण बघतो, पण हेही करता येऊ शकते असे वाटत नाही. एकंदर वेगळी वाट दाखविल्याबद्दल धन्यवाद. >> ++१

मुलाखत खूप प्रेरणादायी आहे. या व्यवसायाबद्दल नेट वर सर्च करत असताना एवढीच एक मुलाखत मिळाली प्रेरनाताईना फोन केला असता त्यांनी खूपच चांगली माहिती दिली त्याबद्दल त्याना मनापासून धन्यवाद

Pages