जुगार

Submitted by tilakshree on 1 March, 2008 - 18:56

"आयुष्य हा तद्दन जुगार आहे आणि मी इरी-शिरीने खेळीवर खेळी खेळणारा अस्सल जुगारी आहे;" हे त्याचं ब्रीदवाक्य होतं. वेळोवेळी या वाक्याचा उल्लेख तो मोठ्या अभिमानाने करायचा. खरोखरंच त्याचा जन्म हा एक जुगारंच असावा. अट्टल जुगार्‍यासारखं बेमुर्वतखोर; तरीही उत्कट, असोशीपूर्ण आयुष्य तो जगला आणि अनपेक्षितपणे डाव उधळून जावा तसंच त्याचं आयुष्य संपूनही गेलं. सर्वस्व गमावलेल्या जुगार्‍याच्या विषण्णतेनेच...
सिंधुदुर्गातल्या कुठल्याशा खेडेगावातून आलेल्या एका पापभीरु , सरळमार्गी दांपत्याच्या पोटी अशा छंदी-फंदी, रजोगुणांचं प्राबल्य असणार्‍या या बाळाला जन्माला घालून विधात्यानेच त्याच्या आयुष्यात जुगाराचा डाव सुरू केला. शाळा-कॉलेजमधे त्याचं आयुष्य तसं सरळसोट मार्गानेच गेलं. बुद्धिमत्तेचं देणं जन्मजातंच लाभलेलं. त्याच्या आधारावर एकेक इयत्तांची पायरी न थांबता पुढे सरकत गेली. त्या बिचार्‍या आई-बापांनी कधी काळी काही अपेक्षा ठेवल्या असतीलही. पण त्याला कधी त्याची तमा होती! बी.कॉम.ची पदवी मिळाल्यानंतर कुठेतरी कारकुनी नोकरीही त्याला मिळाली. मूळ स्वभावाला अनुसरून कधींच कुठे फार काळ स्थिरावला नाही. मात्र लौकिकार्थाने ज्याला स्थैर्य म्हणतात त्याच्या वाचून त्याचं तेव्हा फारसं अडलंही नाही. प्रत्येक नोकरी बदलताना त्याचा पगार दोन-पाचशे रुपयांनी वाढत होताच; शिवाय त्याचं घर त्याच्या उत्पन्नावर चालत नव्हतं. सर्वसाधारण मध्यमवर्गीय रिवाजाप्रमाणे आयुष्यभर कष्ट करून मिळवलेल्या पुंजीतून म्हातारपणच्या भाजी-भाकरीचा आणि आवश्यक तर औषधपाण्याचा खर्च भागेल एवढी तरतूद त्याच्या आई-वडलांनी टुकीने संसार करून; करून ठेवलीच होती. याशिवाय त्यांच्या अपेक्षांना चिरंजीवांनी विद्यार्थीदशेपासूनच वाटाण्याच्या अक्षता लावायला सुरुवात केल्यामुळे म्हातारपणात 'एकला चालो रे' ची मानसिक तयारी त्या दोघांनी करुन ठेवली होती. सरकत्या काळाबरोबर त्यांचा निर्धार अधिकाधिक पक्का होत गेला.
इकडे कारकुनी करता करता त्याचं लक्ष 'शेअर मार्केट'ने वेधून घेतलं. वास्तविक मध्यमवर्गीय पठडीत वाढलेल्यांना शेअर व्यवहारांचं अप्रूप असलं तरीही स्वतः त्यात गुंतवणूक करणं शक्यही नव्हतं आणि ती मानसिकताही नव्हती असा तो काळ! त्यांच्या मते शेअर व्यवहार आणि जुगार यात फारसा फरक नसे. अशा काळात त्याला शेअर मार्केटने खुणावलं. त्यासाठी आवश्यक असलेला अभ्यास हे त्याच्या चिकित्सक आणि विश्लेषणक्षमता असलेल्या बुध्दीला आव्हान होतं; तर शेअर मार्केटमधली अनिश्चितता, अस्थैर्य त्याच्यातल्या जुगार्‍याला आकृष्ट करंत होती. आजपर्यंत निरस कारकुनी आकडेमोड करणार्‍या त्याला नवं क्षितीज खुणावत होतं. या क्षेत्राचा पध्दतशीर अभ्यास व्हावा; प्रत्यक्ष कामकाजाची सखोल माहिती व्हावी यासाठी त्याने एका शेअर ब्रोकरकडे नोकरी पकडली. एकेक बाब शिकता शिकता तो शेअर व्यवहारात तरबेज झाला. पगारातून ठराविक रक्कम बाजूला काढून; प्रसंगी कर्ज काढून फायदेशीर शेअर्समधे गुंतवणूक करू लागला. त्यातून पगाराव्यतिरिक्त मोठी रक्कम त्याच्या गाठीशी जमू लागली.
त्याची बदलती जीवनशैली; चिरंजीवांबाबत पूर्वीपासून साशंक असणार्‍या पिताश्रींच्या डोक्यात शंकेचा किडा वळवळायला कारणीभूत ठरली. त्यांच्या दृष्टीने 'कामातून गेलेल्या' चिरंजीवांचा हा थाट निश्चितपणे वाममार्गाच्या कमाईतून होत असणार. बरं बाप-लेकातला संवाद संपून अनेक वर्ष उलटलेली... मग उलगडा होणार तरी कसा! बिचार्‍या माऊलीचा जीव मात्र तीळा-तीळाने तुटत होता. पण ती नि:शब्द! चाळीस वर्ष निगुतीने संसार करुनही घरात मान वर करुन बोलण्याचा अधिकार 'बाई'ला नव्हता. त्यामुळे आपल्या पोट्च्या गोळ्याची बाजू समजाऊन घेण्याची तिची संधी आपोआप हिराऊन घेतली गेली. इकडे आईचं मौन म्हणजे तिचा वडलांना पाठींबा अशी समजूत त्याच्या मनात पक्की होऊन गेली. कायमची...
एकीकडे रक्ताची नाती अशी सैलावत असताना त्याच्या आयुष्यात एक नवं नातं फुलत होतं. त्याच्या ऑफीसमधली रिसेप्शनिस्ट आणि त्याच्यात एकमेकांबद्दल एक अनामिक ओढ निर्माण होत होती. चोरट्या नजरभेटीतून अबोलपणे व्यक्त होणारी भावना प्रेमाच्या रुपाने प्रत्यक्षात आकाराला आली. रक्ताची नाती जन्माने जडलेली असतातं. या नात्याला समाजमान्यता मिळण्यासाठी मात्र विवाह-बंधनाची मोहोर उमटावी लागते. त्या दोघांनी त्या दृष्टीने विचार पक्का केला. त्याच्या बाबत निर्णय घ्यायला तो सक्षम आणि स्वतंत्र होता. त्याची जबाबदारी कोणावर नव्हती; तो कुणाला जबाबदार नव्हता. प्रश्न होता तिच्या घरुन परवानगी मिळण्याचा. एकदा भावनावेगात ती बोलून गेली; "परवानगी मिळाली तर ठीकच. नाही मिळाली तरी मी तुझीच आहे; तुझीच राहीन ही काळ्या दगडावरची रेघ!" तिच्या निर्धाराने तो ही सुखावला. नव्या आयुष्याच्या स्वप्नात हरखून गेला. काळ वेळ बघून तिने घरी याबद्दल सुतोवाच केलं. तिच्या घरी अर्थांतच खळबळ माजली. 'त्याची पार्श्वभूमी काय; आपलं समाजातलं स्थान काय; तो तर आपल्या आई-बापालाही नकोसा झालेला... तो सरळ असता तर असं का घडलं असतं; समजा उद्या वेळ आली तर कोण उभे राहील याच्या पाठीशी...' तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती डागली गेली. तिचा भाऊ तर हाता-पायीवर उतरला. मात्र तिच्या आई-वडलांनी 'एकदा भेटून तर घेऊ' अशी सामंजस्याची भूमिका स्वीकारली. त्याला एका रविवारी सकाळी नाश्त्याला बोलावलं. प्रत्यक्ष भेटीत त्याने तिच्या आई-बाबांवर चांगलीच छाप पाडली. तो तसा 'हँडसम' वगैरे नव्हता पण 'स्मार्ट' होता. व्यवस्थित रहाणी, बोलण्यातलं चातुर्य, मार्दव आणि चेहेर्‍यावर झळकणारी हुशारी यामुळे ते प्रभावित झाले. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याने आपला भूतकाळ, घरच्यांशी ताणलेले संबंध, त्याची कारणं, आपल्या क्षमता आणि मर्यादा लक्षात घेऊन स्वबळावर केलेली प्रगती आणि भविष्याची आखणी या सर्व बाबी आपल्या 'भावी सासू-सासर्‍यां'समोर सविस्तरपणे उलगडून त्यांचा विश्वास संपादन केला आणि सहानुभूतीही! अखेर त्यांचं लग्न त्याचे मित्र आणि तिचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत पार पडलं. भाड्याच्या फ्लॅटमधे त्यांनी संसार थाटला.
प्रेमसाफल्याच्या समाधानाने नवा संसार फुलू लागला. फुललेल्या संसाराला एक नव्हे तर दोन दोन फळं लाभली. दरम्यानच्या काळात त्याचीही भरभराट झाली. एका नामवंत 'फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी'त व्यवस्थापकीय पदावर त्याला नोकरी मिळाली. अल्पावधीतंच त्याने कंपनीत स्वतःच्या कामाचा ठसा उमटवला. मुंबईत कंपनीकडून फ्लॅट, पुण्यात डहाणूकर कॉलनीसारख्या ठिकाणी स्वतःचा दोन बेडरूमचा फ्लॅट, कार... सगळी स्वप्न साकार झाली. त्याहूनही महत्वाचं म्हणजे पत्नीच्या रुपाने साक्षात लक्ष्मी घरी अवतरली. आई-वडलांकडून कधी न मिळालेलं प्रेम सासू-सासर्‍यांकडून मिळालं. दोन बछड्यांनी या सुखावर कडी केली... तो सुखाच्या शिखरावर उभा होता. डोळ्यात स्वप्न होतं आभाळ कवेत घेण्याचं! मात्र उंच उडी मारताना बांबूचा टेकू घेऊन जितक्या वेगाने वर जाता येतं; त्या बांबूचा आधार सुटल्यावर तितक्याच; किंबहुना जास्तच वेगाने जमिनीवर यावं लागतं हेच खरं!
त्याच्या घरात लक्ष्मी पाणी भरत असतानाच 'बिग बुल' हर्षद मेहेताचं शेअर घोटाळा प्रकरण उघडकीला आलं. हर्षद मेहेता, केतन पारेख असे अनेक शेअर दलाल, इन्व्हेस्ट्मेंट कंपन्या संशयाच्या गर्तेत आणि कायद्याच्या कचाट्यात आल्या. गुंतवणूकदारांचा शेअर व्यवहारांवरचा विश्वास उडाला. या घोटाळ्याचे काही सूत्रधार जीवाला काहीही तोशीस न लागता निजधामाला गेले. बाकी बहुतेक उजळ माथ्याने वावरंत आहेत. देशोधडीला लागले ते त्यांचे सरदार, दरकदार, मानकरी, शिपाई आणि हुजरे! या सगळ्यांपैकीच 'तो'ही एक ठरला. या भानगडींमधे त्याचं आजपर्यंतंच यश भासमान ठरलं. घोटाळे करणारे एकतर कोर्टाच्या खेट्या घालत होते किंवा काही निवांतपणे सरकारी पाहुणचार घेत पहुडले होते. समाजात संशयाच्या विखारी नजरा मात्र 'या'च्या सारख्यांवर! कंपनीला केंव्हाच टाळं लागलेलं. कारकुनाची तर सोडाच; पण चपराशाची नोकरीसुद्धा कोणी देईना! आजपर्यंत जिला लक्ष्मी म्हणून पुजलं ती वास्तवात अलक्ष्मी ठरली. खडकाळ समुद्रात भिरकाऊन एखाद्या विराट लाटेने जहाज कस्पटासारखं नेस्तनाबूत करावं; तशी अवस्था झाली त्याची आणि त्याच्यासारख्या हजारो जणांची!
'घर फिरलं की वासेही फिरतात;' हे खोटं नव्हे. आजपर्यंत जी पत्नी, प्रेयसी लक्ष्मीच्या पावलानी आपल्या घरात आली असा त्याचा ठाम विश्वास... नव्हे निष्ठा होती; ती ही वैरिण बनली. आई-बापानी आपल्यावर अजाणतेपणानी राग धरला; पण सासू-सासर्‍यांनी सुजाणपणे प्रेम दिलं; अशी त्याची भावना होती. त्याच सासू-सासर्‍यांनी त्याच कारणासाठी त्याचा तिरस्कार करायला सुरुवात केली... अविश्वास!!! 'शेअर घोटाळ्यात याची कंपनी बुडली; कायद्याच्या पंजात आली म्हणजे हा ही त्यातलाच! एवढी वर्ष काम करताना कंपनीचे धंदे लक्षात न यायला काय बोळ्याने दूध पितात काय;' हीच सर्वांची भावना! दारच्यांची आणि घरच्यांची ही!
अखेर प्रकरण घटस्फोटापर्यंत येऊन ठेपलं. 'माझा नवरा विश्वासघातकी आहे. 'फ्रॉड कंपनीचा फ्रॉड एम्प्लॉई' आहे. माझं आणि मुलांचं भवितव्य त्याच्या हाती सुरक्षित नाही' असा तिचा दावा होता. खरंतर कंपनीच्या प्रकरणात त्याच्यावर कोणताही कायदेशीर आरोप नव्हता. तो कुटुंब न्यायालयात तिला प्रतिवाद करू शकला असताही. पण प्रेमाची तुटलेली बंधनं कायद्याच्या हुकुमाने नाही जोडता येत. त्याने घटस्फोट मान्य केला. पोटगी देण्यासाठी त्याच्याकडे काहीही नव्हतं. तोच रस्त्यावर आला होता. ज्या काळात तो ऐन भरात होता आणि प्रेमातही नव्याचे नऊ दिवस सुरू होते तेव्हा त्याने घेतलेला फ्लॅट बायकोच्या नावावर घेतला होता. घटस्फोट होताच तिने त्याला अक्षरशः लाथ घालून बेघर केलं.
खिशात दीड-दोनहजार रुपये,वीस हजाराचा क्रेडिट बॅलन्स असलेलं क्रेडीट कार्ड आणि घरातून उचललेला बाड-बिस्तरा घेऊन तो जो बाहेर पडला तो थेट बारमधे घुसला. व्हिस्कीचे घुटके घेता घेता त्याला वारंवार भरुन येत होतं. एकेकाळचं भाव विभोर प्रेम... त्या आणा-भाका... सासू-सासर्‍यांच्या कौतुकभरल्या नजरा... 'बाप' बनल्याच्या आनंदाबरोबर होणारी जबाबदारीची जाणीव... अनंत वेदनांनंतर जुळ्यांना जन्म दिल्यावर तिच्या नजरेत दिसलेले कृतार्थ भाव...ते पहातांच एकमेकांचा हात हातात घेऊन अबोलपणे परस्परांबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता... उभं आयुष्य त्याच्या नजरेसमोर तरळून गेलं. जसं एखादं स्वप्न... एखादा चकचकीत चित्रपट... आताचं वर्तमान भूतकाळाला छेद देऊन जाणारं होतं. वर्तमानात तो एकटा होता... आणि त्याचं अज्ञात भविष्य! लोक दु:ख विसरण्यासाठी दारू पितात म्हणे! पण त्याच्यावर दारूचा अंमल जसजसा चढंत होता तसतसा तो अधिकाधिक भावनिक, नोस्तॅल्जिक होत होता. अचानक एक अनिवार ओढ मनात चमकून गेली. मृत्यूला कवटाळ्ण्याची! 'आजपर्यंत मांडलेला डाव उधळला गेला. संपलं सगळं... आपलं भवितव्य... आपल्या अस्तित्वाची निकड... संपवून टाकू स्वतःलाही... लोकं आत्महत्या करणर्‍यांना भेकड किंवा पळपुटे म्हणतात खरं; पण अशा शूरांनी तरी ती करण्याचं धाडस दाखवावं तर कधी... आम्ही भ्याड म्हणून धाडस नाही होत... मृत्यूने यावं... पण नकळत... जगण्याचं बळ नाही; मरण्याचं धाडस नाही... करावं तरी काय?????' विचाराच्या गर्तेत गुरफटंत तो कोपरं टेबलावर ठेऊन हातानी डोकं धरुन बसून राहिला. किती वेळ गेला कुणास ठाऊक; वेटरने हात धरून हलवल्यावर तो भानावर आला. पण प्रश्न कायम होता. करायचं काय?
तो यंत्रवत उठून बाहेर आला. रिक्षात बसून स्टँडपर्यंत आला. एका बसमधे बसला. त्याच्या बहिणीच्या गावाकडे जाणारी बस! त्याची बहीण हा आता एकमेव आशेचा किरण होता त्याच्यासाठी! एकीकडे या परिस्थितीत तिनेही झिडकारलं तर काय ही धुकधुकंही होती; पण पर्याय नव्हता.
त्याचा विश्वास इथे तरी सार्थ ठरला. बहिणीकडे आधार मिळाला. तिच्या ओळखीने एक नोकरीही मिळाली. बातमीदाराची. पगार रुपये तीन हजार! एकेकाळी इतरांच्या गुंतवणुकीचं नियोजन करणार्‍याला आता मासिक पगार तीन हजार! पण एकदा आयुष्याशी जुळवून घ्यायचं ठरलं की बाकी गोष्टी गौण ठरतात. त्याच्यातल्या 'फायनान्स मॅनेजर'ने त्या पगारातही सगळं मॅनेज केलं. बातमीदार म्हणून मिळणारं 'इतर उत्पन्न', काही पी.आर.ची कामं, कुणाच्या 'प्रेस नोट' करुन देणं अस काही बाही केलं पण जगला. बरं जगला. 'जिंदगी के गम को' बोटांच्या बेचकीत जुन्या 'स्टाईल'ने धरलेल्या सिगरेटच्या 'धुएं मे उडाता' आणि 'हम ने पीना सीख लिया' म्हणूनच 'तुम बिन जीना सीख लिया'म्हणत जगला. कसं का होईना पण गाडं रुळावर येतंय म्हणता म्हणता एकदा खोकल्याची मोठी ढास लागली. छाती कफाने भरली. पेपरच्या मालकाने सरकारी रुग्णालयात दाखल केलं. तिथेच त्याने 'राम' म्हटलं. कुणी म्हणाले टी.बी. झाला. कुणी म्हणाले एड्स झाला. काय झालं देव जाणे; पण अखेर डाव संपला. एकदा सर्वस्व गमावूनही तो पुन्हा उभा राहिला. नवा डाव मांडला आणि इरी-शिरीने खेळत राहिला. अखेरपर्यंत!!!

गुलमोहर: 

टिळक तुमची शैली फारच छान आहे हो.. आणि जे विषय तुम्ही पुढे घेउन येता ते खरच खुप वेगवेगळे असतात.. माणुस बघणारा माणुस आहेस तु...

धन्यवाद तान्या. माणूस बघणं आणि बघितलेलं कागदावर उतरवणं हा माझा पेशा आहे आणि छंदही.

श्री छान लिहीता तुम्ही. सरळ साधं सांगत जाणं.
कसं असतं ना. गोष्ट खोटी असती तर शेवटी ती येईल असा भरवसा असता. तो पुन्हा त्याच जोमानं साम्राज्य उभारेल आणि तिला पश्चाताप होईल अशी आशा असती. किमान मुलं तरी तो इरीशिरीनं मिळवेल आणि उत्तम सिंगल पेरेंट होऊन दाखवेल असलं काहीतरी. पण खर्‍या आयुष्यात असं घडत नसतं त्यामुळंच तुमच्या गोष्टी कसं वळण घेतील याची उत्सुकता असते शेवटपर्यंत.
असली सत्यं मध्यमवर्गिय मानसिकतेवर शहारे आणतात. म्हणून मग खोट्या गोष्टींचे सहारे हवे असतात पण जिंदगी किसी और चीज का नाम है.

संघमित्रा,
मी एकेरीत बोललो तर चालेल ना? तुझा प्रतिसाद आवडला. मी यापूर्वीच स्पष्ट केलय की मे काल्पनिक लिहीत नाही. अजून एक कथा लवकरच पोस्ट करीन. वाच आणि अभिप्र्याय कळवं!!!

श्री, वेगवेगळ्या विषयांवरचे तुझे लेख वाचण्यासारखे आहेत. त्यातही मुंबई च्या दैनंदिन जीवनावरचे खूप माहितीपूर्ण आहेत.

तुमच्या याआधीच्या कथाही वाचल्या, त्या आवडल्याही.

मी स्वतः लेखक नाही त्यामुळे बोलण्याचा अधिकार नाही, पण तरीही एक सांगावेसे वाटते, तुमच्या कथांची मांडणी जरा डॉक्युमेंटरीसारखी वाटते. म्हणजे, जे जसे घडले ते लिहीले. त्यावर लेखनाचे संस्कार झाले नाहीत. जरा लहान पॅरॅग्राफ, आवश्यक तिथे नवीन ओळ, कुठेतरी थोडे संवाद असे झाले तर प्रवाही वाटेल. कदाचित तुमची शैलीच अशी असेल.

अर्थात वरील मत हे माझे मत आहे. आवडले नाही तर सोडुन द्या...

साधना.

साधना सूचनांबद्दल धन्यवाद!
मी यापुढे सुधारणेचा प्रयत्न तर करीनंच; तोपर्यंत घ्या सांभाळून!!!
श्री

फरेंड प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
मुंबईसंदर्भात अजून २-३ विषय डोक्यात आहेत. अजून भट्टी जमत नाहीये. पण लवकरच लिहून काढीन म्हणतोय. बघूया कसं जमतय ते...

हे खरे घडलेले आहे? असेल तर... तुमच्यातला बातमीदार ग्रेटच आहे......

नितीन हे अगदी खरंच घडलेलं आहे. हे ज्याच्या आयुष्यात घडलं तो माझा मित्र आणि काही काळ सहकारी ही होता...

खूप छान लिहीलं आहेत, पण तुमच्या मित्राची शोकांतिका वाचून वाईटही वाटले....

सुंदर लिहिल आहेस रे.. खेचाखेची नाही ओढाताणी नाही, निर्मळ वास्तव लिहील आहेस, तुझी शैली मला खासच आवडली...

धन्यवाद सत्यजित आणि आयटी.

खुपच छान लिहिलं आहे.... मनात अगदी आतपर्यन्त पोहोचल

आपल्या अवती भवती कितितरी अशा कथा वावरत असतात, पण फार थोड्या लोकांना ती अजातद्रुष्टी असते, या कथांना समजण्याची, तु त्यापैकीच एक... अतिशय ओघवती भाषा आणि नायकाच्या तत्वज्ञानाशी ईमान राखणारी कथा...
आशिष दामले
वरीष्ठ सल्लागार, मानवाधिकार आयोग, अफगाणिस्तान

कथा छान आहे........

श्री,
ही तुमची वाचलेली पहीलीच कथा; खरोखरी खूप सूंदर आहे. उगिच पानभरू नाहीए. कथेची गती ही एकसंध आहे, खूप लेन्दी किंवा खूप वेग नाही वाटला अजिबात. कथेत दम तर आहेच, पण तुमची लेखनशैली जास्त भावली.

पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा!

दक्षिणा......

टिळक्,फार सुंदर लिहिता तुम्ही!!!तुम्ही लिहिलेल्या घटना खर्‍या असल्याने त्यात एक वेगळेच सौंदर्य आहे