एका 'अध्यक्ष' निवडीची गोष्ट

Submitted by धनुर्धर on 28 October, 2015 - 02:47

"उद्या देवळात ग्रामसभा हाये, तवा सगळ्यांनी उपस्थित राहायच" सत्यनारायनाच्या पुजेचे आमंत्रण दिल्यासारखा बब्या शिपाई गावात घरोघरी फिरून सांगत होता. एरव्ही कोणत्याही कामा टाळाटाळ करणारा बब्या हे मात्र मन लावून करत होता. त्याला कारण ही तसंच होतं. उद्याच्या ग्रामसभेत 'तंटामुक्ती' च्या अध्यक्षांची निवड होणार होती. आणि ग्रामसभेत होणारा गोंधळ बघायला त्याला मजा यायची. तंटामुक्तीच्या अध्यक्षपदासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. जो तो आपले नाव चर्चेत येण्यासाठी गावातील सरपंच, पाटील व इतर प्रतिष्ठीत लोकांच्या गाठीभेटी घेऊ लागला. संधीचा फायदा घेऊन काहीजण संध्याकाळची सोयपाणी या उमेदवारांकडून करून घेत होते. आणि तो दिवस उजाडला. लोक हळूहळू मंदिरात जमू लागले. कधीही मंदीराची पायरी न चढलेले लोकही मंदीरात आलेले पाहून देवालाही आश्चर्याचा धक्का बसला. 'येवढे लोक जर रोज माझ्या दर्शनाला येत असते तर किती बहार आली असती' असा एक विचार देवाच्याही मनाला चाटून गेला.

बहुतेक जणांनी पांढरे कपडे
घातल्यामुळे बगळे झाडावर बसल्यावर जस झाड पांढरे दिसते तसे संपुर्ण देऊळ पांढरे दिसत होते. लोक आपआपसात चर्चा करत होते. इच्छुक व त्यांचे समर्थक इथे तिथे कोंडाळे करून बसले होते. काहींनी पाठींब्यासाठी महिलाही मोठ्याप्रमाणात जमविल्या होत्या. एवढ्यात पाटील, सरपंच आणि ग्रामसेवक देवळात आले. चार लोकांनी बाजूला सरून त्यांना बसायला जागा दिली. आपपसातली चूळबुळ थांबवून लोक त्यांच्याकडे पाहू लागले. मग ग्रामसेवकांनी कामकाजाची वही हातात घेऊन बोलायला सुरूवात केली. "ग्रामस्थ मंडळी शासकीय आदेशानुसार आपल्याला आज तंटामुक्त समिती नेमायची आहे. त्यासाठी आज आपण इथे ग्रामसभा बोलावली आहे." मग त्यांनी त्यातल्या तांत्रिक बाबी सांगितल्या. व "सर्व सहमतीने ही समिती व अध्यक्ष निवडली जावी" असे बोलून ते खाली बसले. त्यानंतर थोडा वेळ शांतता पसरली. कुणीही कुणाशी बोलेना. मग शेवटी रानबा तात्या उठून उभे राहीले. ते गावातले जेष्ठ जाणते पुढारी व माजी सरपंच होते, "मी काय म्हण्तो आमच्या टायमाला म्हन्जी मी जवा सरपंच हुतो तवाच्या टायमाला ही असली लफडी काय नव्हती बघा" असं म्हणत ते स्वतःच वर बघू लागले. वरती जुन्या काळातले दोनतीन फोटो टांगले होते. त्याकडे बघून की काय ते सभेचा विषय विसरून जुन्या आठवणीत रमले, "आमच्या टायमाला म्हन्जी आमी लय इकास कामं कीली. च्यायला आख्ख गाव त्या वड्याला हागत हुतं, आमी संडासं बांधली. गावात रस्ता व्हता का धड पाटील?" हा प्रश्न पाटलांना होता. त्यांनी नकारार्थी मान हालवली. पण उत्तराची वाट न पहाता तात्या पुढे बोलू लागले.
"रस्ता केला. आमदारबी टरकुन व्हता आमाला काय पाटील?" प्रतिक्रियेसाठी त्यांनी पाटलांकडे पाहिले. पाटलांनी पुन्हा मान डोलावली. तात्यांनी पुढे सुरु केले. "गावं नदीच गढूळ पाणी पेत व्हतं पाण्याची सकीम मी आण्ली" तेवढ्यात "माझ्या नळाला पाणी येत नाय, तेवढ वाईच बघा" बायडाक्का मधेच उठत बोलल्या. "हो ! हो! आमच्या बी येत नाय" इतर दोनचार जणींनी त्याला पाठींबा दिला. प्रकरण अंगाशी येतंय असं दिसताच सरपंच बोलू लागले, "आर ही मीटींग कशासाठी बोलावलीया आणि इशय काय चाललाय हिथं, तात्या बसा वाईच जरा खाली आणि बायडाक्का तुमी नंतर हापिस मधी भेटा पाण्याच बघतो तुमच्या" सरपंचानी तात्या आणि बायडाबायला खाली बसवले. "मग कोण कोण इच्छुक आहे तंटामुक्तीसाठी" ग्रामसेवकाने हातात वही पेन घेत विचारले. तेवढ्यात वरच्या आळीचे ग्रामपंचायत सदस्य बंडुनानांनी सुचना केली, " मी काय म्हन्तो की पहिल्यांदा समिती नेमा आणि मग अध्यक्ष निवडा. काय मंडळी?" तेवढ्यात ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्याविरोधात उभे राहून पडलेले उमेदवार रघू तांदळे यांनी त्याला आक्षेप घेतला, "नाय नाय! पयल्यांदा आध्यक्ष निवडा आणि मग समिती निवडा" मग अध्यक्ष पहिला का समिती पहिली ह्यावरूनच दोघांची जुंपली. दोन्ही बाजूंचे चारपाच लोक एकमेकांशी भांडू लागले. गोंधळ सुरु झाला. पाटील आणि सरपंच त्यांना थांबवून शांत करू लागले. कसंबसं त्यांना शांत केलं. शेवटी समिती पहिली निवडून मग नंतर अध्यक्ष निवडावा असं ठरलं. मग पुन्हा ग्रामसेवक बोलू लागले, "हे बघा आपल्याला जी जुनी कमिटी होती त्यापैकी एक तृतीअंश सदस्य तेच ठेवावे लागतील, व उरल्याल नवीन भरावं लागतील." मग त्यावर रमेश शिंगणे जो गावात सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध होता. तो उसळून म्हणाला, "भावसाहेब मागची जी कमिटी व्हती त्यांनी गावात किती तंटे सोडवले? एकदा सांगा तरी लोकांना! च्यायला सत्कार आणि नारळ घेण्यासाठी नुसते हापापले आसायचे सगळे." त्याच्या या बोलण्यावर विद्यमान अध्यक्ष दत्ता पगारे खूप चिडले. "ये रम्या! कुणाला बोलतो रे तु?" दात ओठ खात दत्ता पगारे बोलू लागले, "भडव्या त्या मागच्या आळीच्या कोंड्यांच्या भावाभावांचा वाद कुणी सोडावला तुझ्या बापानी का रे?"
"ओ बाप काढायचं काम नाय." आत्ता रमश सुद्धा गरम झाला होता. "ज्या आयला भाडांण मिटावतो म्हणून दोघांकडून पाच पाच हाज्जार रूपये खाल्ले की तुमी! आमाला काय मायती नाय का काय?" त्यात आपला वाटा मिळाला नसल्याने तो दुखावला गेला होता.
"आर आस कस बोलतो तु रमेश काय पण" भिंग फुटल्यामुळे अध्यक्ष थोडे नरमले. "आमच्या कार्याकाळात बरीच भांडणं मिटली. गावात शांतता निर्माण झाली.ह्या रम्याच काय आयकता तुमी!"
"काय आयकता म्हंजी, आम्ही काय गोट्या खेळाय आलो का हिथ?" रमेश काय शांत
व्हायला तयार नव्हता. तेवढ्यात उपाध्यक्ष असणारे चंदू कारळे अध्यक्षांच्या मदतीला धावले, "ये रम्या लय बडबड करू नकोस. तुझी लफडी काय आमाला मायती नाय काय? त्या बागड्याच्या संगीला नोकरी लावतो म्हणून कुठ घिवून गेल्ता सांगु का आख्ख्या गावाला?" त्यांच्या या बोलण्यामुळे रमेश चांगलाच पिसाळला. दोघेही एकमेकांच्या आईबापाचा उद्धार करत एकमेकांची लफडी बाहेर काढू लागले. पुन्हा गोंधळ वाढला. गदारोळात कोण काय बोलतय काहीच कळेना. पाटील आणि सरपंच लोकांना शांत होण्याचे अवाहन करीत होते. शेवटी थोड्या वेळानंतर वातावरण कसेतरी शांत झाले. शेवटी पाटील बोलायला उभे राहिले, "हे बघा मंडळी! आपल्याला गावात शांती ठेवायची हाये." त्यांच्या ह्या वाक्यावर तरुण पोरात जरा खसखस पिकली. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व पुढे बोलू लागले, "तवा मी काय म्हन्तो की, ज्यांना 'आध्यस्क' व्हायच हाये त्यांनी हात वर करा बघू." पटपट चार पाच हात वरती झाले. मग ग्रामसेवकाने त्यांची नावे वहीवर लिहून घेतली. त्यातले बहुतेक जण तयारीत आले होते. अंगावर खादीचे पांढरे कपडे, गळ्यात सोन्याची चैन तर काहींच्या गळ्यात भलेमोठे सोन्याचे गोफ होते. काहींनी हाताच्या सगळ्या बोटांमध्ये अंगठ्या घातल्या होत्या. काहीजणांनी आपल्या बरोबर आपले कार्यकर्ते आणले होते. त्यातल्या बहुतेकांनी कुठले कार्य केले होते हे त्यांच्या लाल झालेल्या डोळ्यांवरून व जाणार्या झोकांड्यावरून सगळ्यांच्या लक्षात येत होते. इच्छुक उमेदवारांपैकी साधूआण्णा यांचा एक कार्यकर्ता नानू हा कसा बसा उभा राहीला, व बोलू लागला, "आमचे साधू आण्णा म्हणजे लय भारी माणूस. गावातला एक नंबर माणूस, खर्च करायला मागं पुढं बघत नाय. गावात हाये हाये का कोण आसा दानशुर? आण्णाच आध्यक्ष व्हायला पायजे. खरच साधू माणूस हाये त्यो" तेवढ्यात दुसरे उमेदवार राजू लांडगेंचा चेला बंट्या उभा राहिला पण उठता उठता त्याचा तोल गेला आणि तो पडला. कडेच्या लोकांनी त्याला धरून उभा केला. मग तो बोलू लागला, " हा साधू नाय! संधीसाधू हाय संधी साधू" त्याच्या तोडातून बाहेर पडणार्या भपकार्यामुळे अनेकांना मळमळल्या सारखे झाले. "त्यांच्यापेक्षा आमचा राजू दादा बरा. गावातल्या कुठल्याही कामाला हजर आस्तो. त्योच आध्यक्ष झाला पायजे"
"मग आमी काय माशा मारत बसायच का?" तिसरे उमेदवार लक्ष्मण सावरे गर्जत उठले. "च्याआयला गावात फकस्त तुमीच चांगल आणि आमी काय येरवड्यात जावून आलो व्है रे? ते काय न्हाय ह्या येळस मला चान्स पायजे" तेवढ्यात अजून एक उमेदवार बापू साने उठला, "न्हाय, सगळी पद तुमच्याकडं घ्या नि आमी बसतो ढोल वाजवीत! तुमच्या मायला तुमच्या" ये बाप्या नीट बोल जरा! काय घरी बोलतुस काय?" राजू दादा भडकला. "मग काय खाणार हायेस का मला?" तेवढ्यात साधू आण्णा उभे राहून बोलू लागले, " ये तुमच्या दोघांचबी राहूद्या, ह्या येळस मी व्हतो."
"ओ तुमाला काय कळतंय त्यातलं, कागदावर सय करायला दिवस जातोय तुमचा आणि आध्यक्ष व्हायला निघाले." राजू लांडगेनी आण्णांची टर उडवली. आण्णांचा राग अनावर झाला. रागाच्या भरात त्यांनी "राज्या भडव्या" म्हणत खाड्कन त्याच्या मुस्काडात मारली. राजू लांडगेही अण्णांच्या अंगावर धावून गेला. इकडे बाकीचे उमेदवारही "आध्यक्ष मीच व्हणार" असे म्हणत एकमेकांच्या अंगावर धावून गेले. उमेदवार आणि त्यांचं कार्यकर्ते यांची जोरदार धुमचक्री चालू झाली. कुणीही कुणाचे एकेना. एकमेकांच्या आईबापाचा उध्दार होऊ लागला. चपला, दगड, लाथा बुक्क्यांचा प्रसाद वाटला जाऊ लागला. ग्रामसेवकाने आपले दप्तर उचलून हळूच पळ काढला. पाटील सरपंचसुध्दा निघून गेले. 'हाण, मार, तुडव, बडव ' इत्यादी शब्द जोशात उच्चारले जात होते. अनेक उमेदवारांचे पांढरे इस्त्रीचे कपडे चुरगाळले होते, फाटले होते. कुणाचे डोके फुटले होते. कुणाच्या हाताला तर कुणाच्या पायाला तर कुणाच्या पाठीत मार बसला होता. थोड्या वेळाने वातावरण शांत झाले. "बघून घेईन तुला" म्हणत जो तो निघून गेला. गालातल्या गालात हसत बब्या शिपायान देवळाचा दरवाजा ओढून घेतला तेंव्हा देवळात काही फुटलेले मोबाईल, चपलांचा खच, एक विझलेली पणती आणि निशब्द देव एवढेच उरले होते.

. . . . धनंजय . . . .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users