सखीचा गाव

Submitted by जयश्री हरि जोशी on 20 October, 2015 - 12:14

फिकी होत गेली निळ्या संभ्रमात
सखीच्या गावाची अनुरक्त वाट

मनाच्या तळाशी कलंडले दिवे
दरीत ओढाळ पाखरांचे थवे

तहानकहाणी निथळत्या नभी
थेंबांची सावली गोंधळून उभी

स्मरणगावाची ओलांडता वेस
जांभळी रेशमी आठवण नेस

विरहाची वेल माझ्या अंगणात
कळीच्या रंगाचे सखी तुझे हात

मऊ अंधाराचा फुलवून प्राण
सावरीचा जन्म वेचूनिया आण

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहेरी परत आल्यावर मित्रमैत्रिणी आणि भावंडांची कशी लगबग होते, तस्सं वाटलं. खूप छान.

वेल्कम बॅक जया !!!

>>फिकी होत गेली निळ्या संभ्रमात
सखीच्या गावाची अनुरक्त वाट

!!!!

मनाच्या तळाशी कलंडले दिवे....
आहाहा...
कुठे होतिस बाई... बरं झालं परतली आहेस.. आता हरवू नकोस.. हात जोडते

दाद +१११११
लिहीत रहा गं....
तुझी कविता पाह्यल्यावर अगोदर तारीख पाहिली.. आणि छान वाटंल! Happy
कविता सुंदर !!