वृक्षवल्ली आम्हा सोयरे..

Submitted by मी बावरी on 8 October, 2015 - 21:19

गरमागरम Jasmine Tea चा दर्वळ आणि खिडकीतून डोकावणाऱ्या Maple Tree च्या सोबतीने होणारी प्रत्येक दिवसाची सुरुवात…तसं बघायला गेलं तर विशेष काहीच नाही; पण तरीही माझ्यासाठी खुप खुप खास..!

कारण माझ्या खिडकीत डोकावणार हे झाड साधसुधं नाहीये. त्यात नक्की काहीतरी जादू आहे;जी मला दिवस दिवस त्याच्यासमोर खिळवून ठेवते. कसाही मुड असो,या झाडा सामोर येऊन नुसतं त्याला न्याहाळत राहिलं तरीही हलक हलक वाटायला लागतं. ‘शब्देविण संवादु’ साधला जातो आमच्यात. कधी माझ्या मनातला आनंद त्याच्या हिरव्यागार पानांच्या रूपाने सळसळू लागतो तर कधी मळभ दाटल असतांना त्याचं ते खंबीरपणे उभं रूप धीर देऊन जात.नव्या नवरीला जशी ‘पाठराखीण’ सोबत म्हणून जाते ना, अगदी तसंच परदेशातल्या माझ्या नव्या सुरुवातीला सोबत करत, माझी पाठराखण करत उभं असलेलं झाड, माझ्या आईनेच माझ्यासाठी पाठवल्या सारखं… ऊन,वाऱ्या-वादळात माझ्यासाठी खिडकीशी उभं आहे.

तशी त्याच्या आणि माझ्या मध्ये काचेची ही प्रचंड खिडकी;पण फांद्या इतक्या विस्तारलेल्या आणि खिडकीला टेकलेल्या कि घरातच खिडकीशी झोपलं तरी झाडाखाली झोपल्यासारख वाटावं. या झाडाच्या प्रचंड विस्ताराला न्याहाळत खिडकीशी पहुडल ना कि एक वेगळीच आंतरिक शांतता, स्तब्धता अनुभवायला येते. ‘Living in the moment’ सारखी अवस्था. ना चिंता,ना आठवणी,ना सततचे चुक-बरोबरचे मापदंड…..फक्त शांतात…. Peaceful contemplation! आणि तेही अगदी सहज कोणत्याही guided meditation किंवा साधने शिवाय. अशी सहज शांतात आणि निवांतपण मी फक्त आईच्या कुशीत,तिच्या पदराच्या सावलीतच अनुभवली आहे. आणि आता हे विस्तीर्ण झाड आणि त्याची प्रेमळ सावली…. विटेवर उभी जशी विठुमाऊली!

खिडकीशी उभ्या उभ्याच हे झाड असे काही सुंदर नजराणे दाखवतं कि सगळा थकवा,कंटाळा क्षणात नाहीसा व्हावा. लोकरीच्या गोंड्या सारखी झाड्भर लटकणारी छोटी छोटी फळ, त्यावर मनमुराद ताव मारणाऱ्या खारुताई, येता जाता नकळत खिडकीवर आपटणारे भुंगे, छोट्याश्या humming bird च छोटुस घरट आणि त्यात चिवचिवणार इवलस पिल्लू, झाडावर रंगणारी वेगवेगळ्या पक्षांची जुगलबंदी,या झाडावरून वाहत घरात शिरणारा मंद सुगंधित वारा, अंधार पडताच लुकलुकणारे एवढेसे काजवे… या आणि अशा कितीतरी गमतींचा खजाना घेऊन उभं असतं हे झाड… एकदातर, एखाद्या जादुगाराने जादू दाखवल्यासारखी, अचानक फक्त पाचच मिनिटात ५-६ प्रकारचे सुंदर सुंदर पक्षी दाखवत मला थक्कच करून टाकलं याने. याच्याच सावलीत नित्य नव्या ओळखी सुद्धा होतात. आता तर Blue jay, Northern Cardinal, American Goldfinch सारखे मस्त पक्षी माझे Hi –Hello Friends झाले आहेत.

या झाडाच्या सावलीत असा निवांतपणा अनुभवत मी पडून राहाते…आणि मग अचानक आठवणींची एक मालिका सुरु होते…अगदी लहानपणीच सांगलीच्या घरातलं ‘पेरूचं झाड’ आणि त्याच्या अंगाखांद्यावर खेळणारे आम्ही – सांगोल्याच्या घरासमोरच ‘बाभळीच झाड’…नाग पंचमीला त्याला बांधला जाणारा झोका – सांगलीच्या राजवाड्यातल्या घरा समोरचं प्रचंड ‘पिंपळाच झाड आणि जाई च्या वेलीची कमान’ – आजोळच्या अंगणातल ‘बकुळीच झाड’ – विद्यानगरच्या घराच्या खिडकीत डोकावणार ‘शेवग्याच झाड’ – पुण्याच्या होस्टेलच्या खिडकीतला ‘सोनचाफा’ आणि त्याचा धुंद करणारा सुगंध – औरंगाबादच्या घरी रुजलेलं मम्मीच्या आवडीच ‘Purple Allamanda’ – मम्मीची सतत आठवण करून देणारं वैजुड्याच्या शेतातलं विस्तीर्ण प्रेमळ सावलीच ‘भोकराच झाड’ – बंगलोरच्या जुन्या घराजवळच ‘शेवरीच झाड’, नवीन घराच्या खिडकीतून दिसणार,नुकतंच लावलेलं छोट ‘गुलमोहोराच झाड’, ऑफिस कडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेली आणि सकाळ प्रसन्न करणारी पिवळी आणि गुलाबी ‘Tabebuia’…… अरेच्चा ! एक ना दुसर झाड लहानपणापासून सोबत आहेचं की ! आणि नुसती सोबत आहेत असं नाही तर प्रत्येक झाडाशी काही ना काही आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. आजुबाजूची झाड सुद्धा आपल्या जगण्याचा आणि आठवणींचा अविभाज्य भाग आहेत याची जाणीव नव्याने माझं हे लाडक झाड मला करून देत राहात….

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ वगैरे आजपर्यंत खुपदा ऐकलं,निबंधात वापरलं सुद्धा पण खऱ्या अर्थाने जाणवलं आणि अनुभवलं ते माझ्या खिडकीतून अत्ता डोकावणाऱ्या या ‘Maple tree’ च्या सावलीत आणि म्हणूनच ते खास आहे…खुप खास !

Group content visibility: 
Public - accessible to all site users