दुपारची झोप !

Submitted by kulu on 15 September, 2015 - 12:26

दु:ख राहे शून्य, जाहलो अनन्य,

घेता झालो धन्य , झोप दुपारची!!

असं कुणीतरी म्हटलेलंच आहे……………………………..कोणी म्हटलं नसेल तर आत्ताच मी म्हटलं असं समजा ! खर तर दुपारची झोप हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा आणि नाजूक विषय! आज याविषयी लिहून मला काही ठराविक प्रकारच्या लोकांवर सूड उगवायचा आहे. पहिला प्रकार म्हणजे जे स्वतः दुपारी झोपत नाहीत आणि दुसरा प्रकार म्हणजे जे दुपारी झोपू शकत नाहीत म्हणून जे झोपतात त्यांना तुच्छ समजणारे जन!

दुपारची झोप हा प्रकार जाणून घेण्यासाठी लागणारी रसिकता (काही लोक त्याला आळस म्हणतात…हाय रे दुर्दैव….अशा लोकांचे!) फार कमी जणांकडे असते. म्हणजे “छे! दुपारी काय झोपायचं!” अस म्हणणारा माणूस एक तर अरसिक असतो किवा तो तुमच्यावर जळत असतो! बर, नुसती रसिकता असून चालत नाही, जिद्द आणि चिकाटी हवी, म्हणजे कामात कितीही व्यस्त असलो तरी दुपारी झोपणारच अशी भीष्मप्रतिज्ञा करण्याचे आणि ती पाळण्याचे सामर्थ्य हवे. भीष्मप्रतिज्ञा या शब्दाबद्दल कुणीही आक्षेप घेऊ नये, कारण भीष्मदेखील समस्त कौरव-पांडवाना सकाळी युद्धाचे लेसन्स देऊन दुपारी झोपत नसतील कशावरून?

या झोपेचे पण वेगवेगळे प्रकार असतात! काही लोक वामकुक्षी आणि दुपारची झोप यामध्ये गफलत करतात! वामकुक्षी म्हणजे दुपारी येणारी अगदीच सामान्य अशी डुलकी जी फार फार तर अर्धा तास टिकू शकते! पण दुपारची झोप हा प्रचंड आणि राजेशाही प्रकार आहे. मस्त सुट्टीचा दिवस, एक च्या दरम्यान झालेलं पोटभरून जेवण (त्यात जर मत्स्याहार असेल तर अहाहा), पेलाभर मठ्ठा आणि वाऱ्याची हलकी झुळूक, हातात पुस्तक. ….अस सगळं जमून आल्यावर दोन तीन तास जी समाधी लागते तिला दुपारचे झोप अस म्हणतात! त्यामुळे या झोपेला वामकुक्षी म्हणणे म्हणजे कोल्हापूरच्या झणझणीत मिसळीची पुणेरी मिळमिळीत मिसळेशी तुलना करण्यासारखे आहे! पुणेरी लोकांनी वाईट वाटून घेऊ नये, कारण पुण्यातले दुकानदार म्हणजे दुपारच्या झोपेचे Brand Ambassador आहेत….का ते सांगायची गरज नाहीच! विषयांतर सोडून द्या! शाळेत असताना मी दुपारी झोपायचो, शिक्षकांच्या विरुद्ध दिशेला केलेल्या तोंडाला हातांच्या तळव्याचा टेकू द्यायचा आणि पुस्तकात तोंड खुपसल्याचे नाटक करून झोप काढायची! पण यासाठी साधना (साधना म्हणजे तपश्चर्या या अर्थी, “ती साधना काय सुंदर दिसते” अशी साधना नव्हे) हवी! जेव्हा शिक्षकांना आपण अशा अवस्थेत सापडतो तेव्हा साधना कमी पडल्याने निद्रादेवीचा कोप झाला असे खुशाल समजावे! उन्हाळ्यात फॅनखाली उघड्या फरशीवर पडल्यावर येणारी झोप वेगळी, पावसाळ्यात बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज ऐकत येणारी झोप वेगळी, भर थंडीत चहा पिऊन रजाईत शिरून घ्यायची झोप वेगळी! ही सगळी त्या निद्रादेवीची विविध रूपे!

पट्टीचे गाणारे, पट्टीचे खाणारे असतात तसे पट्टीचे दुपारचे झोपणारे पण असतात माझ्यासारखे! (आणि बऱ्याचदा ह्या तिघांची पट्टी जुळते कारण तीन्ही ठिकाणी रसिकता लागते.) आम्हाला रात्रीचे जागरण चालेल पण दुपारचे जागरण म्हणजे काळ्या पाण्याचे शिक्षा! पण अशा आमच्यासारख्या लोकांचं सुख ज्यांना बघवत नाही असे लोक आम्हाला त्रास देतात. आणि बऱ्याचदा त्या स्त्रिया असतात. म्हणजे नवऱ्याने दुपारी झोपू नये म्हणून मुद्दाम दुपारी भिंतीवरची जळमटे काढणे (जेणेकरून एखादे जळमट नवऱ्याच्या नाकात जाऊन त्याला अशी शिंक यावी कि त्याला तर जाग यावीच पण आजूबाजूच्या घरात झोपलेल्या इतरेजनांच्या झोपेचं पण वाटोळ व्हावं), स्वच्छ असलेली भांडी जोरजोरात आवाज करत पुन्हा पुन्हा घासणे अशी कामे बायका करतात असे मी माझ्या काही विवाहित (बिचारे!) मित्रांकडून ऐकले आहे. आया सुद्धा महाबिलंदर असतात. पोराने दुपारी झोपू नये म्हणून बऱ्याच युक्त्या लढवतात. एकतर त्यांना आपल्या पोराचे वीक-पॉईण्ट्स माहीत असतात. मी दुपारी झोपायला लागलो कि माझी आई मुद्दाम गुलाबजामून (जाम कि जामून ह्यात जरा माझा गोंधळ आहे) तळायला घेणे, रसमलाई साठी रबडी तयार करणे अशा गोष्टी करते. वर आणि मला म्हणते “बाबू, तुला झोप आली असेल ना, झोप हो तू! ” म्हणजे इकडे झोप न तिकडे गुलाबजामून अशी विचित्र अवस्था होते माझी! बर काही लोक जे दुपारी झोपू शकत नाहीत ते अफवा उठवतात कि दुपारी झोपल्याने नैराश्य येते, पोटाचा घेर वाढतो, वगैरे..पण असं म्हणणाऱ्या किती तरी लोकांच्या वाढत्या पोटाचा घेर मी पहिला आहे. आणि ज्याला नैराश्य यायचच आहे त्याला काहीही कारण चालते अगदी “भारतात मंदी आली” ते “साबुच्या खिचडीत मीठ कमी पडलं” पर्यंत कुठल्याही करणावर नैराश्य येणारे लोक मी पाहिले आहेत! काही लोकांना तर त्यांच्या आयुष्यात सगळच ठीक सुरुय याच नैराश्य येत, कारण काय तर “काहीच कसं चुकीचं घडत नाहीय?” आता बोला!

उलट दुपारच्या झोपेमुळे उत्साह येतो, आनंद शोधण्याची वृत्ती वाढते. जेव्हा कामाला किंवा कॉलेजला जायचं म्हणून आपण सगळ आवरतो आणि अचानक जाण रद्द होऊन सुट्टी मिळते, त्यावेळी आज दुपारी झोपायला मिळणार या गोष्टीमुळे जो आनंद होतो तेवढा आनंद कोलंबसाला पण अमेरिका सापडल्यावर झाला नसेल (झाला असेलही कदाचित. इतके दिवस हलणाऱ्या बोटीवर काढल्यावर त्याला देखील दुपारी झोपायला शांत जागा सापडल्याचा आनंद झाला असेल!)

एका संशोधनानुसार दुपारी झोपणारे लोक न झोपणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आनंदी असतात. दुसऱ्या एका संशोधनातून याच्या विरुद्ध निष्कर्ष सिद्ध झाला आहे …पण मी मुळातच नेहमी सकारात्मक गोष्टींचा विचार करतो त्यामुळे पहिल्या संशोधनावर माझा जास्त विश्वास आहे आणि दुसऱ्या संशोधनातले संशोधक अरसिक होते असा माझा दावा आहे! तरी या पहिल्या संशोधनाला ध्यानात घेऊन शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस या सर्व ठिकाणी Lunch Time नंतर दोन तासांची झोपेची सुट्टी असावी अशी माझी “अखिल भारतीय दुपारनिद्रा” संघटनेतर्फे मागणी आहे! त्यासाठी आम्ही संसदेसमोर लवकरच भव्य “जांभाई आंदोलन” करणार आहोत. ज्यामध्ये दुपारी २ ते ५ संसदेसमोर बसून मोठ्याने एकसाथ जांभया देणे हा कार्यक्रम आहे! नाहीतरी संसदेच्या आत बसून आपले मंत्री संत्री देखील हेच उद्योग करतात, त्यामुळे जांभयांची भाषा त्यांना लवकर कळेल! हल्ली आरोळ्या देऊन कोणी ऐकत नाही, जांभया देऊन तरी ऐकतात का ते बघू!

खूप लिहिलं! दुपारचे दोन वाजले आहेत! दुपारची झोप माझी वाट पाहत आहे…..हे निद्रादेवी तुझी अशीच अखंड कृपा माझ्यावर राहो…….ऽऽऽऽऽ!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Biggrin

सगळं जमून आल्यावर दोन तीन तास जी समाधी लागते तिला दुपारचे झोप अस म्हणतात >>>> अगदी अगदी.

हलणाऱ्या बोटीवर काढल्यावर त्याला देखील दुपारी झोपायला शांत जागा सापडल्याचा आनंद झाला असेल >>> Biggrin नक्कीच.

मध्यंतरी पावर-नॅप नामक एका दळभद्री कल्पनेबद्दल ऐकलं. दुपारची झोप कशी दोनेक तासांची पावरफुल नॅप हवी. पावरनॅप वगैरे सब झूट.

छान लिहिलेय पण......

मी तुमच्या विरुद्ध गटातला .. किंबहुना दुपारी झोपणार्‍या मित्रांची टिंगलटवाळीच उडवणारा.. इथेही दुपारच्या झोपेची बाजू घेतलेली पाहून तावातावाने भांडायचा विचार आला मनात, पण डोके म्हणाले कंट्रोल ऋ कंट्रोल .. म्हणून तुर्तास एथे माझा रुमाल ! Happy

मस्तच.

कुलु हा लेख मला जुन्या दिवसात घेऊन गेला. अगदी मी पूर्वी अशी दुपारी झोपायचे ते आठवलं. मला फार प्रिय होती झोप आणि लागायचीपण लगेच. मी क्लासेसमध्ये शिकवायचे घराजवळच्या तेव्हा दुपारी झोप मिळण्यासाठी मी पिरेड adjust करायची. Lol

ठाण्याला नोकरी करत होते तेव्हा मात्र नाही मिळायची दुपारची झोप. Sad

चौथीत असताना मी गाढ झोपले होते वर्गात, जाम ओरडा खाल्ला होता बाईंचा.

लेख खूपच आवडला कुलू.

मी लहानपणापासून अजिबात दुपारी झोपत नसे. पण सध्या अनेक कारणांमुळे दुपारीच झोपावं लागतं क्लास नसेल तर.
आजच दमून चक्क ५ तास झोपले दुपारी ! इतकं मस्त वाटत होतं उठल्यावर Happy

अहाहा किती हा जिव्हाळ्याचा विषय!! मस्त लिहिलंय अगदी मनातलं!
दुपारची झोप न मिळणारे लोकं फार बिचारे वाटतात.

माझ्या जिव्हाळ्याचा विषय..
मला वामकुक्षी कशाशी खातात हेच नै माहिती..
लोक दुपारी झोपुन लगे अर्ध्या तासात क्स्काय उठु शकतात काय माहिती बा..
मी पन निदान २ अडिच तासाच्या लाईनीत आहे.. P

कुलदीपबाबा.....

~ तुझे माझे मामाभाचे असे नाते असल्याने तुझ्या अनेक गोष्टी आणि गुणांचा मी खूप चाहता आहेच शिवाय स्वित्झर्लंड मालिकेविषयीचे तुझे सहजसुंदर लेखन वाचून मायबोलीवरील अनेक सदस्यांप्रमाणे मीही तुझ्या लेखनशैलीवर खूप खूष झालो...आजही आहे.

पण या "दुपारच्या झोपे" संदर्भात मात्र मी तुझ्या मताच्या बिलकूल आणि पूर्णपणे विरोधात असणार आहे. साहजिकच मी अशा झोपेच्याबाबतीत कधीच अनुभव घेतला नसल्याने (म्हणजे सकाळी दहा ते सायंकाळी सहा अशी नोकरी करीत होतो, त्यामुळे झोप नावाचा सो-कॉल्ड आनंद घेता आलेलाच नाही...नोकरी करणार्‍या कोणत्याही स्त्री वा पुरुषाला हा आनंद मिळत नसतोच म्हणा...) त्यापासून मी लांबच राहिलो आहे. सेवानिवृत्त झाल्यावरही माझ्या दुपारच्या कार्यक्रमात ज्याला वामकुक्षी म्हटले जाते तिचा लाभ घेतला नसल्याने त्यामुळे नेमका कोणता आनंद मिळतो याचे वर्णन तू जरी लेखात केले असले तरी तो कधी मला मिळेल याची शक्यता नाही. जालीय दुनियेतील सदस्यांसमवेत वैचारिक देवाणघेवाण करणे किंवा आरामखुर्चीत पडून मनसोक्त वाचन करणे यात माझी दुपार खर्च होते....आणि त्यामुळे मला मिळणार्‍या आनंदाची छटा आगळीच.

अर्थात वरील कित्येक प्रतिसादकांनी तुझ्या झोपेबाबतच्या भूमिकेचे स्वागत केल्याचे दिसत असल्याने मामाच्या प्रतिसादाकडे तू काही गंभीरपणे पाहणार नाहीस हे तर उघडच आहे....तेव्हा झोप मस्तपैकी.

कुलू, तुला प्लस १०,०००.. हा लेख वाचून मस्त मस्त फ्रेश वाटलं !!

रात्री काय सगळेच झोपतात ,पण दुपारी कमीतकमी तासाभराच्या झोपेच्या वेळेची आतुरतेने वाट पाहणार्‍यांतलीये
एक मी पण!!
दुपारी झोप काढली तर रात्री झोप येत नाही असे म्हणणारे मला बिच्चार्रे वाटतात Proud
याउलट दुपारी झोप घेतली नाही तर मला रात्री झोपच लागत नाही.. असतो अपना अपना फंडा!! Happy

भन्नाट लिहिलंय. बर्‍याच जणांच्या मनातला सलच म्हण ना Wink
... अखिल भारतीय 'दुपारची झोप व्हायलाच पाहिजे' संघटनेचा एक आजन्म सदस्य Happy

मस्तच लिहलय Biggrin

पहिल्या संशोधनाला ध्यानात घेऊन शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस या सर्व ठिकाणी Lunch Time नंतर दोन तासांची झोपेची सुट्टी असावी अशी माझी “अखिल भारतीय दुपारनिद्रा” संघटनेतर्फे मागणी आहे! >>> लवकर ही मागणी पुर्ण करुन घ्या.
एरवी तर दुपारी नाही जमत झोपायला म्हणुन सुट्टीच्या दिवशी झोपायचे ठरविले तर कुणीतरी मध्येच कडमडतं किंवा लेकीला परत परत खोटी भुक लागते (म्हणजे आई झोपलेली बघवत नाही म्हणुन तिला उठवायचे आणि खुप भुक लागलेली असताना अर्धे बिस्किट खायचे) किंवा नवर्‍याला मोठ्या आवाजात टिव्ही पहायचा असतो Angry
अशा सर्व प्रकारांमुळे हल्ली कितीतरी वर्षे दुपारची झोप पाहिलीच नाही त्यामुळे दुपारी झोपणर्‍यांबद्दल असुया निर्माण होते आता. Proud

अशोकमामा, तुम्ही दुपारच्या काय, रात्रीच्या झोपेच्या पण विरुद्ध आहात त्यामुळे जागेच असता हे माहितेय आम्हाला ;). (बाकी चर्चा विपुत करूया, इथे कुलुचा धागा नको हायजॅक करायला).

कुलू लेख एकदम मस्त आणि खुसखुशित Lol

माझं झोपेशी मुळात वाकडं आहे खरंतर. शिवाय दुपारची झोप २-३ तास घेणारे महाभाग मी ही पाहिले आहेत. (काही घरातच आहेत Wink :दिवा:)
अलिकडे मला ही दुपारची झोप प्रिय झाली आहे. सुदैवाने शनी रवी साप्ताहिक सुट्टी असते तेव्हाच या झोपेचा लाभ घेते. पण माझी झोप पाखरासारखी आहे आली तर आली नाही तर नाही. मला अगदी १५ मिनिटांची झोप सुद्धा पुरते आणि कधी एक तास सुद्धा निर्धास्त झोपते.

बाकी सकाळी दणकून काम करावे, स्वच्छ अंघोळ करून गरमा गरम जेवावे. बेडरूमचे पडदे ओढावेत आणि मस्त अंधार करावा. बारिक आवाजात विविधभारती लावून एक हलकंसं पांघरूण अंगावर ओढून एक छानसं पुस्तक वाचायला घ्यावं. तत्पुर्वी त्या मोबाईलचा गळा घोटायला विसरू नये. ५ मिनिटात झोप आपला ताबा घेतेच घेते.

वर्षु म्हणाली तसं पुर्वी मलाही दुपारी झोपलं की रात्री झोप येत नाही असं वाटायचं आणि तसं व्हायचं सुद्धा, पण अलिकडे मी तसा विचार करायचा बंद केला तर उलट व्हायला लागलं. दुपारी झोपलं तर उलट रात्री लवकरच झोप येते. Proud

दुपारची झोप हा एकदम जिव्हाळ्याचा विषय Happy हापीसामुळे दुपारची झोप मिळत नाही Sad पण रविवारी दुपारी जर झोपले नाही तर नविन आठवड्याची सुरवातच कराविशी वाटत नाही Wink

मला खुप आवडते दुपाराची झोप!

मस्त लिहीलय!

हल्ली शक्य तेव्हा पॉवर nap वर भागवावं लागतं!

मला भारीतल (गोड/कुलधर्माच जेवण) पोटभर जेवून मस्त ताणुन दिली की उठल्यावर काहीतरी गोड खायची जबरदस्त इच्छा होते. जिलेबी, गुलाबजाम किंवा बासुंदी असं काही असेल तर अहाहा!

कुलु...आपण आमचेच बन्धु आहात! खुसखुशीत लिहिलाय लेख...अगदी पटला! तुझ्या अखिल भारतीय दुपारनिद्रा सन्घटनेची मी आजीव सभासद होणार Lol
आठवड्यातुन एकुलत्या एक रविवारी मिळणार्‍या दुपारच्या झोपेवर कुणी अतिक्रमण केल तर अजिबात खपत नाही मलाही. 2 तास झोप हवीच...त्याशिवाय 'सुट्टी' असल्यासारख वाटत नाही.
इतरवेळी ऑफीसमधे मी माझ्यापुरता उपाय शोधलाय. अजिन्ठावेरुळ येथील शिल्पासारख अर्धवट मिटलेले ध्यानस्थ प्रकारात डोळे ठेउन १५ मिन्टे झोप काढायची... Wink Lol

एक नंबर! मन की बात Lol दुपारच्या समाधीसाठी मी आतुरतेने वाट पाहात असते. शनि रवि मला अशी झोप मिळाली नाही की कशासाठी आपण राबतोय एवढं? असं वाटून नैराश्य येतं. Proud

दुपारच्याच काय पण सकाळच्या साखरझोपेबद्दलही वाकूडपणा ठेवणारे ज्येष्ठ घरात असल्याने उशीरा उठणे वा दुपारी झोपणे याची सवय लागलीच नाही कधी पण दुपारच्या झोपेचे आकर्षण खूप आहे. वर्षातून तीन चारदा हीही हौस भागवून घेतो पण खरी दुपारची झोप कोल्हापुरात विशेषतः पावसाळ्यात. हलकी हलकी थंडी असताना पांघरूण घेऊन मुटकुळी केल्यावर येते ती.

मात्र हल्ली कोल्हापुरात गेल्यावर, बऱ्याचश्या दुपारी एका ज्येष्ठ मित्रांची अखंड बडबड ऐकण्यातच जात असल्याने तेही सुख हिरावून घेतले गेलेले आहे Wink Lol

अन्जू....आर्या....अमेय.....तुम्हा तिघांच्या दुपारच्या झोपेचे खोबरे एका 'अ' मुळे होत असेल तर ती बाब तुम्ही आणि लेखक कुलु यानी स्वागतार्ह मानायला हवी.

दक्षे Lol

उगी उगी करतेयस पण ते मस्त हसत बसलेले
आता तू बाजू घेतलीस म्हणून गहिवरल्याचं नाटक करतील उलट Wink

Pages