खान्देश दुर्गवारी - भाग ३ (अंतिम)

Submitted by योगेश आहिरराव on 7 September, 2015 - 06:58

खान्देश दुर्गवारी
भाग ३ (अंतिम)

भाग १
भाग २

टिंघरी गावात शिरल्यावर एका घरापाशी गाडी उभी केली. लगेच चौकशी करण्यासाठी काही उत्साही मंडळी हजर झाली. पुन्हा तेच कुठून आलात, कुठे निघालात, काय काम करतात, पेपरात छापता काय, तुम्ही असेच फिरत असतात का ? ते अगदी ' शुटींग लेवाणे वनात का, चला मी तुमले पुर्ण किल्ला दखाडी आणस, पण शुटींग एक नंबर व्हाल पाहिजे.' असे सुध्दा एकाने सांगितले. गाडी भोवती बरीच गर्दी जमु लागली. सगळ्यांचे शंका निरसन केल्यावर कमी झाली.
एव्हाना सायंकाळचे सहा वाजून गेले होते. आता चढाईला सुरूवात केली तर वर जाई पर्यंत नक्कीच अंधार पडणार आणि या मोहिमेतील सर्वांत जास्त चाल व चढाई हि या डेरमाळ किल्ल्याचीच होती, त्यात अंधारात मुक्कामाची गुहा, पिण्यायोग्य पाणी सापडणे पण अवघड होणार. मनात आलेला हा विचार लगेच अंकल जवळ बोलून दाखविला. थोड्या चर्चेनंतर आमच्या समोर दोन पर्याय होते.
पर्याय १- उशिर झाल्यामुळे टिंघरी गावातच मुक्काम करून सकाळी शक्य तितक्या लवकर निघून गडदर्शन करून दुपार पर्यंत गावात येऊन पिसोळ कडे रवाना होणे. ( जास्त वेळ लागला तर, पिसोळ बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.)
पर्याय २- आत्ताच गडावर मुक्कामी जाऊन दुपारच्या आत खाली उतरून, पिसोळ किल्ला पाहून सायंकाळी कल्याणला रवाना होणे. (यात फक्त गुहा आणि पिण्यायोग्य पाण्याचे टाके सापडणे हे महत्वाचे होते.) या साठी गावातून वाटाड्या घेणे गरजेचे होते.
आम्ही पर्याय- २ निवडला. तेवढ्यात ज्या घरासमोर गाडी लावली होती, तिथले आजोबा बाहेर आले. त्यांच्या सोबत बोलणे झाल्यावर ते म्हणाले, 'थांबा कुणीतरी येईल संगतीला.' त्यांच्या सांगण्यानुसार समोरच्या घरातले ‘सुनिल पवार’ आमच्या सोबत येण्यास तयार झाले.
टिंघरी गावाच्या उजव्या हाथाला डेरमाळ किल्ल्याची पठारवजा सोंड उतरली आहे. डाव्या हाथाला पिसोळच्या रांगेतले पठार आहे. पिसोळहून डेरमाळला परस्पर ट्रेक करताना, टिंघरीत उतरून पुन्हा याच वाटेने डेरमाळवर जावे लागते.
गाडीतून सर्व सामान काढून पाठीवर चढविले. गावातून उजव्या हाथाला चालु पडलो, वाट हळूहळू तिरक्या रेषेत वर चढू लागली. समोर पठारावरून गाई गुर, शेळ्या मेंढ्या त्यांच्या घराकडे परतत होत्या. चढाईच्या त्या अरूंद वाटेत ते समोर आल्यामुळे चांगलीच तारांबळ झाली. गुरांचा हा दररोजचा दिनक्रम ठरलेला, कदाचित त्यामुळेच त्या चढाईच्या अरूंद वाटेतली माती उकरली गेल्यामुळे प्रचंड घसारा झालाय. हि वाट वर चढत असताना डाव्या हाथाला दरी आणि खाली टिंघरी गाव दिसते. पाऊण तासात ती घसारायुक्त वाट पार करून पठारावर आलो. सुर्यास्त झाला होता, समोरच्या दोन छोट्या टेकड्यांना वळसा घालून डेरमाळच्या समोर असलेल्या लांबच लांब अशा हिरव्यागार पठारावर आलो. या किल्ल्याला एकंदर खुपच मोठे पठार लाभले आहे. समोरच झाडीभरला डेरमाळ

आणि त्याच्या उजव्या बाजूच्या कड्यात काही गुहा दिसत होत्या. थोडे अंतर चालल्यावर टॉर्च चालू केल्या, सुनिलच्या मागोमाग आम्ही आपले चालत होतो. खऱच त्या अंधारात वाटेबद्दल फारसे काही समजतच नव्हते. पुढे चढ लागला, ऐके ठिकाणी वळसा घालुन झाडीतून वर आल्यावर कातळकोरीव पायर्या लागल्या. मग साधारण अर्ध्या तासाच्या चालीनंतर टाक्यांच्या समुहाजवळ आलो. सुनिलने दाखविल्या प्रमाणे बाजूच्याच एका टाक्यातून पिण्याचे पाणी भरून घेतले. पुढे छोटे टेकाड चढून, डाव्या बाजूने पुर्ण झाडीतून चालत मुक्कामाची गुहा गाठली. स्थानिक लोक या गुहेला 'कोरडी वखार' म्हणतात. गुहेत आत जाण्यासाठी मान वाकवून खाली बसून उतरत जावे लागत होते. एकंदर भूमीगत प्रकाराची ही गुहा. लगेच आतमध्ये जाऊन शक्य तितक्या बारकाईने टॉर्च मारून चारही बाजूंना व्यवस्थित पाहून घेतले, गुहेत खाली माती व एका बाजूला दगडांचा खच पडला होता.

सामान गुहेत ठेवले व गुहेच्या बाहेरच जास्तीचे वाढलेले गवत साफ करून रात्रीच्या जेवणासाठी स्टोव्ह पेटवला. गावातून निघाल्यापासून जवळपास अडीच तास झाले होते. विवेकने मस्त पैकी मसाले भात तयार केला जोडीला पापड आणि लोणचे. जेवण झाल्यावर गुहेच्या वरच्या बाजूच्या कातळावर जाऊन बसलो. वर बर्यापैकी निरभ्र आकाश मिणमिणत्या चांदण्यांचे तारांगण, बाजूला मधूनच शांतता छेदणार्या बेडूक व रातकिड्यांचा आवाज. त्यात गार वार्याची मंद झुळुक मध्येच सुखावुन जात होती. बराच वेळ तिथेच रेंगाळलो, नंतर खाली गुहेत जाऊन झोपी गेलो.
सकाळी जाग आली ती पाखरांच्या किलबिलाटाने, ऊठून बाहेर आलो तर डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता, काल रात्री कसे त्या झाडीभरल्या वाटेने पायपीट करून गुहेपर्यंत आलो.

लवकरच चहा नाश्ता करून तिथुन निघालो, गुहेच्या वरच्या कातळावरून गडमाथा गाठला. वर गणपतीची व मारूतीची मुर्ती दिसली, पुढे काही जुने अवशेष आहेत.

माथ्यावरून सेलबारी-डोलबारी रांगेतले साल्हेर, मुल्हेर, मांगी तुंगी व अलीकडे भामेर यांचे व्यवस्थित दर्शन झाले.

फोटोत उजव्या बाजूला साल्हेर दिसत आहे. माथ्यावरून पलीकडच्या बाजूला उतरून, काल अंधारात बघितलेल्या टाकी समुहापाशी आलो.

हाताशी थोडा वेळ होता, मग काय लगेच अंघोळीचा ठराव मंजुर झाला. त्या सकाळच्या वातावरणात अंघोळ केल्यावर, शरिरात एक वेगळीच तरतरी आली, एकदम फ्रेश.

पुढे थोडे गेल्यावर पठारावर हे बांधकाम दिसले.

उजवीकडे उतरून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडा सारखाच डेरमाळचा प्रसिध्द असा 'भैरव कडा' लागला.

स्थानिक लोक याला 'बहिराम कडा' म्हणतात, कड्यावरच हा 'भैरमदेव' आहे.

कडा अंदाजे सात आठशे फूट सरळसोट तुटलेला आहे आणि पुढे तीव्र उतार खालच्या बाजूला प्रतापपूर गाव दिसते. डावीकडे समोरच पिसोळ किल्ला दिसतो.

फोटोग्राफी करून, परत खाली उतरून किल्ल्याच्या डाव्या बाजूला चालू लागलो.

बर्यापैकी वळसा घालून पुढे कातळात खोदलेले पाण्याचे टाके व एक नैसर्गिक गुहा.

ह्याच त्या गुहा ज्या आम्हाला पठारावरून उजव्या बाजूला आम्हाला दिसल्या होत्या.
पुन्हा माघारी येऊन, मुख्य वाटेने खाली पठारावर उतरू लागलो वाटेत पडझड झालेली तटबंदी नजरेस पडली. पठारावरून भराभर पावले टाकत

पुन्हा त्या घसारायुक्त वाटेने दुपारच्या आत टिंघरी गावात उतरलो. सुनिल पवार यांचे आभार प्रदर्शन करून त्यांचा निरोप घेऊन वाडी पिसोळ कडे निघालो. टिंघरी ते श्रीपुरवाडेपासून उजवी मारून जायखेडा रोड पकडला पण लगेचच दहा मिनिटांच्या अंतरावर एका चौफुली पासून परत उजवीकडे वळालो, हा रस्ता आम्हाला सुनिलने सांगितला. अन्यथा आमचा नियोजीत मार्ग टिंघरी-श्रीपुरवाडे-जायखेडा- मंदिन- वाडी पिसोळ हा साधारण २० किमी चा मार्ग होता. थोडक्यात हा शॉटकर्ट पण फायद्याचा ठरला.
वाडी पिसोळ गावातून किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्या मारूतीच्या पारापर्यंत कच्चा गाडी रस्ता आहे. अगदी कंक्राळाच्या पायथ्याच्या रस्ता सारखा किंबहूना जरा जास्तच अरूंद एका वेळी एकच छोटी गाडी जाईल, बर्या पैकी मोठ्ठाली खडी व चढउतार असलेला. आजुबाजूला शेतजमीन आणि मधोमध तो अरूंद कच्चा रस्ता, सावकाशपणे गाडी चालवत उघड्या चौथरावरच्या मारूतीच्या अलीकडे एका घराजवळ गाडी उभी केली. थोडे खायचे पदार्थ व पिण्याचे पाणी बरोबर घेतले.
एव्हाना दुपारचा एक वाजून गेला होता. समोरच पिसोळ किल्ला दिसत होता.

किल्ल्याच्या दोन भागामुळे त्यामध्ये तयार झालेली खिंड दिसली. ( काही प्रमाणात कंक्राळा सारखी )
मारुतीरायाला नमस्कार करून त्याच्या मागच्या टळक पायवाटेने खिंडीच्या दिशेने निघालो.

वाट अगदी ठळक असल्यामुळे चुकण्याचा प्रश्नच नाही. थोडे अंतर गेल्यावर डावीकडे एक पीर दिसला, फॉरेस्टवाल्यांनी विश्रांतीसाठी काही चौथरे उभारले आहेत. वाट चढणीला लागून डावीकडे खिंडीच्या दिशेला वळाली. पुढे डाव्या हाथाला रांगेत पाण्याच्या दोन मोठ्या टाक्या दिसल्या.
भर दुपारी त्या कडक ऊन्हात घामाघुम होत चढाई करताना खुपच कंटाळा येत होता.ऑगस्ट महिन्यातले दिवस असुनही पावसाचा मागमुस नव्हता. पण निव्वळ दुर्ग प्रेमापायी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत, साधारणपणे,अर्ध्या तासात खिंडीत पोहचलो. जवळच तटबंदी व दरवाज्याची ढासळलेली कमान आहे. थोडे वर गेल्यावर डाव्या हाथाला तीन गुहा दिसल्या, त्यामध्ये पाणी आहे व एका गुहेसमोर महादेवाची पिंड व नंदी आहे.

पुढे लगेच गडमाथ्यावर आलो, गडमाथ्याचे साधारणपणे दोन भाग पडले आहे.

डावीकडच्या भागात एका ऊंचवट्यावर छोटेखानी वाड्याचे जुने बांधकाम आहे आणि वाटेत काही शेवाळलेल्या पाण्याच्या टाके आहेत.

वाडाच्या मागील बाजूने अलीकडे असलेल्या तटबंदी वर गेलो. समोर मांगी तुंगी आणि खाली सेलबारी घाटातला ताराहाबाद- पिंपळनेर रस्ता दिसला.
पुन्हा खिंडीच्या दिशेला परतून, गडाच्या दुसर्या बाजूला आलो.

वाटेत मोठे तळे व काही अवशेष नजरेस पडले.

पुढे कड्याच्या डाव्या बाजूला दोन मोठ्या टाक्या दिसल्या, इथुनच डेरमाळचा कड्याचा भाग स्पष्ट दिसतो.


टाक्याजवळून सरळ पुढे चालत शेवटच्या टोकावरच्या बुरूजावर गेलो. बुरूजावर छोटासा दरवाजा ? दिसला.

बुरूजावरून खाली पाहिले कि मध्ये भलीमोठी खाच दिसते. ती खाच पाहून धोडपची आठवण झाली.

बुरूजावरून नजारा बाकी झकास. डावीकडे डेरमाळ किल्ला व उजवीकडे दुरवर चौलेर किल्ला दिसला. मागच्या महिन्यातल्या सह्यमेळावाच्या आठवणी जाग्या झाल्या. घड्याळ्यात पाहिले तर साडेचार वाजून गेले होते. पूर्ण किल्ला पाहताना वेळ कसा गेला ते कळालेच नाही. गड उतरायला सुरूवात केली, पाऊण तासात खाली गाडीजवळ आलो.

आता परतीचा प्रवास सुरू होणार होता, पल्ला बराच लांबचा होता. पुन्हा त्या कच्या रस्त्यावरून वाडी पिसोळला आलो, तेथुन उजवीकडे वळून जायखेडा मार्गे सरळ ताराहाबाद गाठले. तिथेच सायंकाळचा चहा घेऊन सटाणा-नाशिक रोड पकडला.
वाटेत देवळा सोडल्यावर भावड बारीच्या दिशेने जात असताना सातमाळा रांगेतले भाईबंद खुणावत होते, त्या सांयकाळच्या संधीप्रकाशात ते भलतेच उठून दिसत होते. स्टेअरींग वरून हाथ फिरवताना, मनात तीन दिवसांच्या आठवणी उफाळून येत होत्या. पुन्हा पुन्हा साद घालणारे हे खान्देशातले दुर्ग.
खऱच या सहा दुर्गांचा षट्कार घडून आमची खान्देश दुर्गवारी सफल झाली होती.
योगेश चंद्रकांत आहिरे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है! खानदेशची सुंदर सफर घडवली आहेस.

हे सगळ वाचताना आमच्या गाडी ट्रेकच्या आठवणी जागा झाल्या.

@ दिनेश, मित, विजय, संदिप, कंसराज, चिन्नु खुप खुप धन्यवाद !

ईद्रा - कोणता गाडी ट्रेक ?

मस्त वर्णन...

डेरमाळच्या कड्याचा पिसोळ वरुन फोटो पाहिजे होता.. त्या कड्याचा अंदाज आल असता.