स्वित्झर्लंड भाग १३ - बेल्लीकॉन इन विंटर

Submitted by kulu on 30 August, 2015 - 03:03

आधीचे भाग
स्वित्झर्लंड भाग १ - होहेर कोस्टन http://www.maayboli.com/node/52047
स्वित्झर्लंड भाग २ - इन्टर-लाकेन http://www.maayboli.com/node/52801
स्वित्झर्लंड भाग ३ - एगेल्सी http://www.maayboli.com/node/52810
स्वित्झर्लंड भाग ४ - बोसविल आणि परिसर http://www.maayboli.com/node/52827
स्वित्झर्लंड भाग ५ - बॉटॅनिकल गार्डन http://www.maayboli.com/node/52991
स्वित्झर्लंड भाग ६ - युफ http://www.maayboli.com/node/53065
स्वित्झर्लंड भाग ७ - सुरसी http://www.maayboli.com/node/53248
स्वित्झर्लंड भाग ८ - अर्नीसी ! http://www.maayboli.com/node/53359
स्वित्झर्लंड भाग ९ - आईनसिडऽन आणि इन्नरथाल http://www.maayboli.com/node/54499
स्वित्झर्लंड भाग १० - रिगी http://www.maayboli.com/node/54543
स्वित्झर्लंड भाग ११ - मेन्झबर्ग ! http://www.maayboli.com/node/55213
स्वित्झर्लंड भाग १२ - ले प्लेएत्स्झ http://www.maayboli.com/node/55284

( हा भाग बघण्याआधी भाग ३ मधले एगेल्सी चे फोटो एक विंडो मध्ये ओपन करुन ठेवा. ते फोटो आणि हे एकत्र पहा, कारण त्याच मार्गावरुन हा प्रवास आहे , पण हिवाळ्यातला. दोन्ही वेळच्या निसर्गामध्ये किती ड्रास्टिक फरक आहे हे बघता येईल! )

तर २४ डिसेंबर चा दिवस होता. रात्री ख्रिसमसचं सेलिब्रेशन होतं, सकाळचा पुर्ण वेळ हाताशी होता. फार लांब जाता येत नसलं तरी मी जिथे रहात होतो त्या बेल्लिकॉन या खेड्याचा आजुबाजुचा परीसर पाहता नक्कीच आला असता. मार्था ख्रिसमसच्या तयारीत व्यस्त असल्याने माझ्या बरोबर तिला येण शक्यच नव्हतं! पण एगेल्सी च्या वाटेनं जायचा तिचा सल्ला मी मानला, आणि त्या वाटेला मी माझे पाय लावले!
पुर्ण रात्रभर हिमसेक सुरु होता!

त्यात कुणीतरी हा स्नोमॅन बनवुन ठेवला होता!

ही बर्फाच्या रजईत बुडलेली गाडी!

या कॉलनीत आमचं घर!

सुदैवाने दिवस लख्ख होता!

घरामागचा चढ चढुन वर आलो तर समोर हिमाने सगळा माळ अच्छादुन टाकला होता! खरं तर तिथे एव्हढा बर्फ कधीच पडत नाही. पण त्यावेळचा हिवाळाच जरासा हटके होता. जिथे एरव्ही नसतो तिथे पण फुट फुट भर बर्फ!

ही एगेल्सीला जाणारी वाट. एव्हढसं खेड पण हिमसेक थांबल्या थांबल्या ग्रामपंचायतीने लगेच शोवेलिंग करुन रस्ते मोकळे केले!

हे रस्त्यावरुन खाली दिसणारं बेल्लिकॉन!

आणि वर दिसणारी बेल्लि हिल. त्यावर ते एका शेतकर्‍याचं घर!

वैराग्याची शांतता लेऊन आलेला हिमसेक ! पाना-फुलांचा त्याग केलेली झाडे, त्यावर थोडं साचलेलं भस्मासारख हिम, आणि पाठीमागुन आलेला सुर्यप्रकाश. त्यामुळे पुर्ण दृश्यातुन एक विलक्षण विरक्त अशी शांती झिरपत होती!

रंगुनी रंगात सार्‍या , रंग माझा वेगळा - असं म्हणणारा हा संन्याशी!

तिथे बसायला असल्या गोठवणार्‍या थंडीत माझ्यासारखा दिडशहाणा कोणीच आला नव्हता!

या तिघांना सुर्यदेव कसली संथा देत होता न कळे. तिघे त्या सवित्यापुढे स्तब्ध उभे, शिष्यासारखे! तिघांच्या सावल्या पण अशा एका रेषेत पडलेल्या की जणु सुर्यदेवाचा एखादा गुप्त मंत्रच त्यातुन प्रवाहित होतोय!

विंटर वंडरलँड

हा बेल्लिकॉनमधला सगऴ्यात जुना वृक्ष! काय काय बघितलं असेल याने आत्तापर्यंत काय माहित. त्याचा शाखासंभार पण डंबलडोर च्या दाढीसारखा पांढराशुभ्र आणि भावही तसेच शांत पण डोळ्यात खट्याळ!

हे शेतकरीबुवांच घर. उन्हाळ्यात आम्ही यांच्या स्ट्रॉबेरी फार्म वर येऊन स्वतः स्ट्रॉबेरी काढायचो आणि गट्टम करायचो!

आणि बर्फाच्छादित जंगलात शिरलो!

हे लंबु चिंगु-टिंगु!

शुभ्राच्या तव अनंत छटा,
पाहु रे मी कशा अनंता!

ही माझी पदचिन्हे!

सुखी माणसाचा सदरा!

बेल्लिकॉनचं सुंदर इवलंसं चर्च!

चर्चच्या समोरचं गार्डन

बेल्लिकॉनच्या सुताराचं घर, आणि समोर दिसतोय तो त्याचा छोटासा वर्कशॉप

त्याच्याकडे सुंदर घोडे पण होते, देखणे, त्या शुभ्रात ते घर, तो घोडा, सगळ्या तपकिरी रंगाच्या छटा उठुन दिसत होत्या!

लाकडाचे ओंडके बर्फाखाली लपलेले!

खाली दिसतेय त्या छोट्याशा दरीत बेल्लिकॉन बर्फाच्या कुशीत लपलेलं! स्वप्नवत!

घरी येताना, आकाशला भेटायला चाललेल्या या ख्रिसमस ट्री ला नमन केलं! काय माहित हा बाबा भुतलावरच्या सगळ्या आशा अपेक्षा त्याच्यापर्यंत पोहोचवत असेल!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भागही सुंदरच..
एका पांढर्‍या रंगात सगळं इंद्रधनुष्य अवतरलयं Happy प्रसन्न..

मस्तच!!! Happy

राग्याची शांतता लेऊन आलेला हिमसेक ! पाना-फुलांचा त्याग केलेली झाडे, त्यावर थोडं साचलेलं भस्मासारख हिम, आणि पाठीमागुन आलेला सुर्यप्रकाश. त्यामुळे पुर्ण दृश्यातुन एक विलक्षण विरक्त अशी शांती झिरपत होती!>>>>>> क्या बात है!!! वर्णन आणि तो फोटो खुपच आवडला Happy

सर्वांचे खुप खुप आभार! Happy
जिप्सीजी, तुमच्यासारख्या कसलेल्या फोटोग्राफर कडुन दाद मिळणे ही माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे! Happy

फारच गोड सर्वच, तुझे फोटो, तुझं लिखाण कुलु. मध्ये मध्ये अध्यात्मिक टचही आहे लिखाणाला, क्या बात है. सो लकी यु आर. तू राहिलास ती जागाही गोड.

ही शुभ्र आभा आमच्याबरोबर शेअर केलीस म्हणून आम्हीही लकी. Happy

एका पांढर्‍या रंगात सगळं इंद्रधनुष्य अवतरलयं प्रसन्न.. टीना, फार सुरेख वाक्य.

चिन्नु, ललिता-प्रीति, जो_एस खुप खुप आभार!
भारतीताई खुप धन्यवाद Happy तुझ्यासारख्या प्रतिभासंपन्न कवयित्रीला या फोटोज मध्ये कविता दिसणे म्हणजे नवल ते काय! Happy

ओहोहो! 'शुभ्र काही जीवघेणे.... !खुपच सुरेख फोटो!
कसली निरव शान्तता ही! इथुन तिथुन निर्मनुष्य! सगळे आपापल्या घरात गुडुप!

<<वैराग्याची शांतता लेऊन आलेला हिमसेक ! पाना-फुलांचा त्याग केलेली झाडे, त्यावर थोडं साचलेलं भस्मासारख हिम, आणि पाठीमागुन आलेला सुर्यप्रकाश. त्यामुळे पुर्ण दृश्यातुन एक विलक्षण विरक्त अशी शांती झिरपत होती!<< हे हे अस फोटोला साजेस वर्णन! छान लिहिलय कुलु!

एका पांढर्‍या रंगात सगळं इंद्रधनुष्य अवतरलयं ..>>>..टीनाने एकाच वाक्यात या स्वप्नसृष्टीच परफेक्ट शब्दात वर्णन.केलय.शांततेच्या खूप मोहक प्रतिमा ....

कुलु.....

तुझ्या मागील एका लेखात स्वीसमधील रेल्वे स्टेशनचा फोटो तू दिला आहेस....तो पाहताना लक्षात येत होते की चक्क रेल्वे स्थानकावर वा आजुबाजूच्या परिसरात एकही "मनुक्ष" नावाचा प्राणी अस्तित्त्वात नाही. आता रेल्वेसारख्या गजबजलेल्या ठिकाणी स्वीस नागरिक दिसत नाही तिथे निव्वळ बर्फांच्या असल्या शुभ्र ढिगात तरी माणूस दिसणे केवळ अशक्य....एकाही फोटोत नसणार हे पहिला फोटो पाहताच लक्षात आले होते....तसेच झाले.

असो...असला निर्मनुष्य प्रदेश तुला आनंदीत करत होता हे मात्र खरे....त्यामुळेच लिखाणही तसेच झाले आहे.