प्रांजली - श्रद्धांजली

Submitted by बेफ़िकीर on 9 September, 2015 - 00:38

ज्येष्ठ गझलकार प्रदीप निफाडकर ह्यांच्या मुलीच्या, प्रांजलीच्या अपघाती निधनानंतर तिला श्रद्धांजली म्हणून रचलेली ही कविता प्रदीप निफाडकर ह्यांच्याच सुप्रसिद्ध 'माझी मुलगी' ह्या गझलेवर बेतलेली आहे.

परमेश्वर बिचारीच्या आत्म्यास श्रद्धांजली देवो!

तीव्र दु:खात!

-'बेफिकीर'!
============================

त्याची मुलगी:

कालकालवर हासत होती त्याची मुलगी
आज शब्दही बोलत नव्हती त्याची मुलगी

एक खिन्नसा जमाव बघुनी सभोवताली
श्वास जरासे मागत होती त्याची मुलगी

बाळ न होवो अनाथ ह्यासाठी शर्थीने
मृत्यूसंगे झुंजत होती त्याची मुलगी

बाप कोसळत होता, आई थिजली होती
स्मशान मृतवत, मृतवत होती त्याची मुलगी

सगेसोयरे परतपावली निघू लागले
कणाकणाने संपत होती त्याची मुलगी

प्रदीपची 'माझी मुलगी' ही गझल कधीही
बहुधा कधीच वाचत नव्हती त्याची मुलगी

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad

खरच खुप खुप वाईट बातमी...
अशी वेळ कोणारवही येउ नये..
प्रांजलीच्या आत्म्याला शांती मिळो ही मनापासुन प्रार्थना !!

स्तब्ध करणारी कविता.. Sad
खरोखरच अशा वेळी सांत्वना तरी कशी द्यायची समजत नाही.. !!! फारच वाईट झालं.. Sad

बापरे ! Sad

तिला शांती लाभो. बाकीच्यांना दु:ख सहन करायची शक्ती मिळो. आजून काय लिहिणार !!:-(

-गा.पै.

श्रद्धान्जली. खूपच दुर्दैवी घटना. तिला दीड वर्षाचा मुलगा आहे. खूप वाईट वाटलं. दुचाकीवरून पडून मेंदूला गंभीर दुखापत झाली. तिच्या वडलांच्या मते हेल्मेट घातलं असतं तर ती वाचली असती. त्यांनी हेल्मेट जागृती अभियान सुरु केले आहे. इतरांनीही यापासून बोध घेऊन हेल्मेट वापरावे तीच प्रांजलीला खरी श्रद्धांजली ठरेल असे त्यांनी म्हटले आहे.

होय, निफाडकरांचा तो संदेश व्हॉट्स अ‍ॅपवरही आलेला आहे. हेल्मेट असते तर प्रांजली वाचली असती.

प्रान्जलीला श्रद्धान्जली Sad
<<हेल्मेट असते तर प्रांजली वाचली असती>> अस नाहीये. दुर्दैवाने. आमच्या जवळच्या ओळखीत यंग माणसाचा हेल्मेट घातलेलं असतानाही असाच अपघाती मृत्यू झालेला आहे . त्याला पण त्यावेळी २ वर्षाची मुलगी होती. शेवटी ज्याचा जसा मृत्यू लिहिलेला असतो तसा तो येतोच. कितीही खबरदारी घेतली तरीही Sad

बेफी, तुमची ही कविता व्हॉट्स अ‍ॅप वर देखील फिरते आहे... अर्थात तुमच्या 'बेफिकीर' नावासहीत...
प्रांजलीला श्रद्धांजली.. Sad