खान्देश दुर्गवारी भाग २

Submitted by योगेश आहिरराव on 28 August, 2015 - 02:59

खान्देश दुर्गवारी
भाग २
भाग १

मुक्काम गडावर करायचा असल्यामुळे, डोंगरपिशव्या पाठीवर चढविल्या.

मठातून निघताना, एकाने विचारले : ‘आता सायंकाळी वरती जाणार, मग परत कधी येणार ?’
मी: ‘आम्ही वरती मुक्काम करणार आहोत’. तर तो म्हणाला, " वर फॉरेस्टवाले येतात."
मी: ‘ठिक आहे, बघुया काय ते.’
बाहेर आल्यावर डावीकडच्या रस्त्याने गडाच्या दिशेला चालु लागलो. एकदम प्रशस्त वाट आहे.
मध्येच गडाचा ईतिहास व माहिती दर्शक फलक लावला आहे.

वाटेत आणखी दोघे तिघे आमच्याकडे पाहून म्हणाले, "ऊपर जा रहे हो, अभी थोडी देर मे अंधेरा हो जायेगा, वहा जानवर और शेर है." हे ऐकून काय बोलावे, त्यांच्याकडे कानाडोळा करून पुढे निघालो. बरिच पिकनीक टाईप मंडळी वाटेत दिसली. आम्ही फक्त सुर्यास्त होण्याआधी वर मुक्कामी पोहचायचे या हेतूने पाऊले पटापट टाकत जात होतो.
लगेच पहिला दरवाजा, खालच्या अंगाची तटबंदी लागली. दरवाज्यात पहारेकर्यांच्या देवड्या आहेत.

पुढे दुसर्या दरवाज्या वरती एक शिलालेख कोरलेला दिसला. सरळ पुढे गेल्यावर दिंडी दरवाजा दिसला.

त्याच्या अलीकडे उजवीकडे वळून तिसर्या दरवाज्यात पोहचलो. तो पार करून डावीकडच्या बाजूने , चौथ्या दरवाजातून बाहेर आल्यावर, उजवीकडचा नजारा तर खुपच सुंदर…. ती कमनीय तटबंदी आणि त्यावर बांधलेले ते कलात्मक सज्जे म्हणजे हवा खाण्यासाठी पंचतांराकित बाल्कनीच जणु.

त्यातला एक फक्त दोन खांबावर ऊभा आहे आणि दुसर्यात सज्जात ( बाल्कनी ) व्यवस्थित जाता येते.

ईथुनच आपण आलो ती वाट व किल्ल्याचे दरवाजे दिसतात.


पुढे गेल्यावर डावीकडे कातळात सहा गुहा दिसल्या, त्यापैकी तिसर्या गुहेत महादेवाची पिंड व एका जोड गुहेत पाणी आहे.

आणखी पुढे गेल्यावर तटबंदी आणि वरच्या बाजूचा बुरूज दिसतो. फोटोग्राफी करून, परत चौथ्या दरवाज्यातून वर आल्यावर समोरच पांढरा रंगाचा दर्गा दिसला. जो खाली गावातून स्पष्ट दिसतो.

सामान दर्ग्यात ठेवून, मागच्या बाजूला’ विवेक’ पिण्याच्या पाण्याचे टाके शोधायला गेला. सुर्यास्त होत आला होता, दर्ग्याच्या खिडकीतून ते दृश्य न्याहाळत बसलो. पाण्याचे टाके विवेकला दिसले, पडक्या तीन भिंतीत छोटेखानी कुंडासारखे बांधलेले हे टाके, पटकन नजरेस पडनार नाहीच. त्याच्या आजुबाजूला एक दोन मोठी शेवाळलेली टाकी आहेत.
सर्व पाणीसाठा व्यवस्थित भरून ठेवला. अंकलनी झटपट फक्कड चहा तयार केला, चहासोबत दिवसभराचा शारिरिक थकवा त्या खिडकीतून सुर्यास्ताच्या छटा पाहत कुठच्या कुठे पळाला. रात्री मस्त मुगाची खिचडी पोटभर खाऊन झोपी गेलो.
सकाळी उजाडण्याआधीच जाग आली ती खालच्या गोरखनाथ मठाच्या घंटानाद / लाऊडस्पीकरच्या आवाजाने. लगेच दर्गाच्या गच्चीवर गेलो. पूर्वेला धुरकट ढगाळ वातावरणात सुर्योदय फारसा दिसला नाही. दुरवर पुसटसा लंळीग दिसला, कंक्राळा ओळखण्याचा प्रयत्न केला. खाली परत उतरून चहा झाल्यावर, लगेच पोहे बनविण्याच्या कार्यक्रम, अंकलने तयार केलेले स्वादिष्ट पोहे खाऊन. सगळी स्वच्छता व आवराआवर करून सामानासकट गडमाथ्यावर निघालो.

पाचेक मिनिटात छोटे टेकाड चढून वर गेलो. माथ्यावर झाडी फार विरळ त्यातही बहुतांश सीताफळांची झाडे. वरती काही कबरी व जुन्या वाड्यांचे बांधकाम आहे.

इथुन गडाची अजुनही चांगल्या स्थितीत असलेली तटबंदी नजरेस पडते. काही ठिकाणी तटबंदी वरून चालत जाता येते.

तटबंदीत जंग्या व तोफांसाठी झरोके केलेले आहेत.

माथ्यावरून तासभरात गडफेरी पूर्ण करून खाली गाळणा गावात आलो.
पुन्हा सर्व सामान गाडीत टाकून पुढचा किल्ला कंक्राळासाठी निघालो. आमचा नियोजीत मार्ग हा पुन्हा डोंगराळे गावातून दहिडी मार्गे, करंजगव्हाण - लेंडाणे वरून उजवीकडे वळून दाबिल मार्गे कंक्राळा हा होता.
सवयीप्रमाणे,खाली गाळणा गावात रस्त्याची चौकशी केली. तर त्यांनी मधला शॉर्टकट रस्ता सांगितला, त्याप्रमाणे डोंगराळे गावात परत जाण्याची काहीच गरज नाही. आमचे बरेच अंतर कमी व वेळ ही वाचणार होता.
मठाच्या बाहेर मुख्य रस्त्यावर आल्यावर, लगेचच उजव्या हाथाला एक छोटा दर्गा लागला तिथुन उजवीकडे वळालो. आता गाळणा किल्ला आमच्या उजव्या बाजुला दिसत होता. सरळ रस्ता पकडून ५ ते ६ किमी गेल्यावर टिघरी गावाच्या अलिकडे दहिडी साठी डावीकडे वळालो.
वाटेत हा एक आगळावेगळा बंगला दिसला.

दहिडी पासून सरळ करंजगव्हाण गावातल्या पुला पलीकडच्या पेट्रोलपंप पासून उजवी मारली, हा आमचा दुसरा शॉर्टकट होता. जो डायरेक्ट कंक्राळा गावाच्या जवळ मधल्या रस्त्यावर मिळणार होता. थोडे अंतर पुढे गेल्यावर जो पहिला उजवीकडे रस्ता वळेल तो रस्ता पकडायचा होता. बरोबर तिथे पोहचलो, उजवीकडच्या रस्त्याचे काम चालु दिसले. गाडी बाजुला घेऊन, उतरून परत एकाला विचारले. तो म्हणाला, "हाच रस्ता आहे." मी म्हणालो "हे तर काम चालू आहे, गाडी कशी जाणार ?"
बाजुला मोठे डंपर उभे, रस्त्यावर मोठी मोठी खडी. मग शांतपणे विचार केला, परत माघारी फिरलो तर पुन्हा करंजगव्हाण लेंडाणे मार्गे फिरून जावे लागेल. आत्ता पर्यंत टिघरीहून दहिडीत आलो तो रस्ता पण मातीचा आणि रेतीमिश्रीत होता, तरी त्यातला त्यात बरा होता. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. मनात एक विचार आला कंक्राळा सोडून परस्पर डेरमाळ ला जावे, पण नाही दुरवर किल्ला दिसतोय आणि असा विचार नाहीच करायचा.
आमची घालमेल बघून चक्क डंपरचा चालक पुढे येऊन म्हणाला, "हे फक्त सुरूवातच आहे, पुढे रस्ता मातीचा पण ठिकठाक आहे. एवढा भाग जपुन पार करा, मी सांगतो तुम्ही निघून जाशाल." त्याचे बोलणे ऐकून हुरूप आला. पण टोकदार खडीभरल्या रस्त्यावर ‘डिझायर’ सारखी कार घालायची, गाडीला काही झाले तर, बरेच विचार मनात आले. तसाच गाडी जवळ आलो, लगेच सुचले गाडीतले वजन कमी करूया, निदान तेवढीच रिस्क कमी . ठरलेतर तिघांना थोडे अंतर चालायला सांगितले, ‘विवेक’ पुढे पळत मोठी व टोकदार खडी हेरायचा प्रयत्न करून मला सांगत होता.१०- १५ मिनिटात तो टप्पा पार करून, परत सर्वांना गाडीत सामावून मातीच्या कच्चा रस्त्यावरून सावकाश गाडी चालवत कंक्राळा गावात एकदाचे पोहचलो.
गावाच्या मागून, शेताच्या बाजूने देवीच्या मंदिरापर्यंत अत्यंत कच्चा रस्ता गेलेला आहे. मग काय, पुन्हा त्याच रस्त्याने बरेच चढ- उतार, खाच खळगे पार करत, मंदिराजवळ गाडी लावली.


समोरच किल्ला दिसत होता. मोजकेच सामान व पाण्याचा आवश्यक साठा घेऊन, भर दुपारी आम्ही ‘कंक्राळा’ चढाई साठी निघालो. वातावरण ढगाळ असल्यामुळे उन्हाचा तडाका नव्हता. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत शेती केलेली आहे. तसेच गाई गुरे शेळ्या मेंढ्या तर पार. किल्ल्यावरती पण दिसत होत्या

किल्याकडे पाहिल्यावर मुख्य खिंड नजरेस पडते, तिच्या वरच्या बाजूला निरखून पाहिल्यावर पडिक तटबंदी दिसली. किल्ला उजव्या हाथाला ठेवून, खिंडीच्या दिशेने वर चढायला सुरूवात केली.

२० मिनिटात खिंडीच्या उजव्या बाजूला कातळात असलेल्या टाक्यापाशी आलो. एकाच रेषेत ४ ते ५ टाकी आहेत.

पुन्हा खिंडीतून थोडे वर चढून, तटबंदीकडून किल्ल्याच्या उजवीकडच्या माथ्यावर आलो. माथ्यावर झाडी जवळपास नाहीच, पण बरिच मोठी शेवाळलेल्या पाण्याची टाकी व काही चौथरे आहेत.

समोरच आमचा कालचा मुक्काम असलेला तटबंदीयुक्त ‘गाळणा’ किल्ला दिसला. गडमाथा फारसा मोठा नाही. पुन्हा खिंडीच्या वरच्या अंगाला येऊन समोर डावीकडचा उंचवटा चढून गेलो. इकडे पण पडिक तटबंदीचे अवशेष वगळता काही नाही. पण या किल्ल्यावरून आजुबाजुचा पूर्ण मुलुख व्यवस्थित न्याहाळता येतो.

दुरवर नामपूर गावाच्या दिशेला पाऊस पडताना दिसत होता. अचानक गार वारे वहायला लागले. आल्या मार्गे खिंडीतून खाली उतरलो. शेवटी मंदिरापर्यंत जाताना पावसाची बारीक सर आम्हाला भिजवून गेली.
एव्हाना २ वाजून गेले होते. परत कंक्राळा गावात आल्यावर एका घरापाशी आमची विचारपूस केली. कुठून आलात ? कुठे निघालात ?
‘दिपक पाटील’ हे त्या विचारपूस करणार्या व्यक्तीचे नाव.
मी : "कल्याणहून आलोय, कंक्राळा किल्ला पाहिला, आता अजग मार्गे नामपूरहून डेरमाळ ला जाणार आहोत."
दिपक : "एक काम करा, एवढ्या लांबतीन फिरसन कशाले जाई राहिनात, मी तुमले एक मधला रस्ता सांगस. मी आत्तेच नामपूरतीन म्हनी गाडी लई वनु. तुमना २० ते २५ किमी वाचतील"
त्यांच्या महिंद्रा पिकअप कडे पाहून मी म्हणालो, " काका तुमची गाडी कुठल्याही रस्त्यावर चालणार, पण तो रस्ता ही कार जाईल असा आहे का ?"
दिपक: "हो, फक्त थोडा रस्ता खराब शे, पण तुम्ही लवकर जाई लागशाल."
पुन्हा बदल करावा लागणार होता, पण अंतर कमी होऊन वेळ वाचणार असेल तर काय वाईट आहे. तसेही काही करून आजच सायंकाळी डेरमाळ मुक्कामी जायचे आहे. त्यांनी सांगितलेला रूट असा होता: नामपूरच्या दिशेने गेल्यावर पहिलीच उजवी मारा, मग पुढे पहिल्या डावीकडे वळा, थोडे सरळ गेल्यावर पुन्हा उजवीकडे मग टिपे, मोरधर हि गावं सोडून सरळ वडनेरच्या पुढे नामपूर.
हे उजवा डावा गणित थोड अवघड होतं पण लगेच एका कागदावर लिहून घेतले. अगदीच वाटले तर वाटेत कोणाला तरी विचारू की.
चला पाहुया काय होईल ते, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सुरूवात केली. काही ठिकाणी खराब खडी, डांबर उकरल्यासारखा रस्ता होता, पुढे तर चक्क मातीचा रस्ता सुरू झाला. आजुबाजूचे शेतात काम करणारी मंडळी आमच्याकडे पाहत होती. काही जागी भर चिखलातून व पाण्यातून गाडी टाकावी लागली. एका ठिकाणी तर चक्क शेताच्या बांधावरून पायवाट जाते तसा रस्ता होता, एका वेळी एकच गाडी जाऊ शकेल असा तो मधला भाग पटापट पार केला. मग परत कच्चा पण रूंद रस्ता लागला. वाटेत सांगितलेली टिपे, मोरधर ही गावं पार करून नामपूरात दाखल झालो. ध्यानात आले की दुपारचे जेवणाचे काय ? घड्याळात ३ वाजत होते. तसे आमचे बरेच अंतर व वेळ वाचला होता. चला तर जेवण करूनच निघू, पण नामपूरात आम्हाला काही चांगले हॉटेल मिळाले नाही. मग चौकशी केल्यावर कळाले की साक्री रोड ला काही चांगले धाबे आहेत. नाहीतरी डेरमाळसाठी साक्री रोडवरूनच जायचे होते. पुढे वाटेत २ ते ३ किमी अंतरावर 'समाधान' नावाच्या धाब्यात जेवणासाठी थांबलो. चिकन हंडी, काजू भाजी, चपाती, जीरा राईस. मग काय, मनसोक्त जेवण करून निघायला साडेचार वाजले. मनात विचार आला, अंधार पडायच्या आधी डेरमाळची मुक्कामी गुहा सापडेल ना. पाहुया पुढे काय ते, नामपूर - साक्री हा रोड पण सुंदर, रस्त्याच्या दुतर्फा वडाची मोठी झाडे व दोन्ही बाजूला हिरवी शेतं, कुठे बाजरी तर कुठे ऊसाची तयारी तर कुठे डाळींबाच्या बागा. पुढे’ वरचे टेंबे’ या गावापासून डावीकडे वळून पुढे सरळ श्रीपुरवाडे मार्गे ‘टिंघरी’ या डेरमाळच्या पायथ्याच्या गावी पोहचलो. सायंकाळचे साडेपाच सहा झाले होते. आजचा प्रवास फक्त ७० किमी पण बरीच ऑफ रोड ड्राईव्ह झाली होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान ओघवत लिहिल आहे. कुठेच थांबवत नाही वाचताना. सरकन वाचून होत. फोटोही खूप छान जमले आहेत. ते देऊळ फारच छान आहे. जेवणाचे फोटोपण टाकत चला. छान वाटत आपले खायचे पदार्थ इथे परदेशात बघून बघायला Happy

तो ग्रीन / पोपटी शर्टवाला मुलगा कोण आहे? Happy हल्लीच्या पिढीत असेच पोज देतात बाहेर फोटो काढताना Happy

हा ही भाग मस्त जमलाय..... किल्ल्याचं बरच बांधकाम सुस्थितीत दिसतय.... पुनर्बांधणी केली आहे का?

हल्लीच्या पिढीत ? बी तुझा वटवृक्ष झाला कॉय ? Wink

आणि बघून बघायला हा विदर्भी वाक्प्रयोग आहे का ? प्रामाणिकपणे विचारतोय.

बाकी वर्णन मस्त. मजा येतेय वाचायला

बागुलबुवा, नाही वटवृक्ष व्हायला खूप वेळ आहे पण त्या पोपटी शर्ट घातलेल्या मुलाइतका यंग नाही मी.
हल्लीच्या पिढीत असेच तर म्हणतात ना पुण्यामुंबईतसुद्धा Happy मला चुक लक्षात येत नाही Happy वटवृक्षाचे झाड लिहिले असते तर लक्षात आली असती चुक Happy

योगेश.. खूप सुरेख वृत्तांत. फोटोही झकास..
एडिट कर थोडे व वॉटरमार्क टाकत जा फोटोंवर.. गांवांमधील अंतरे देता आली तर बघ.
लेखातील महितीचा सगळ्यांना नक्कीच उपयोग होईल..
तुला अहिराणी येते हे समजले.. Happy
बी चे निरिक्षण बरोब्बर आहे. Happy

वाह, मजा आली वाचायला.. फोटो ही सुरेख आहेत..

कड्यावरून पाय लटकावून बसायला केव्हढं धाडस पाहिजे __/\__ नुस्ता फोटोच पाहून माझेच बसल्याजागी पाय लटपटले Happy

@ बी - तो पोपटी शर्ट वाला मुलगा 'विवेक' आहे.

@ शापित गंधर्व - किल्ल्याचे बरेच बांधकाम अजुनही सुस्थितीत आहे. पुनर्बांधणी बद्दल ठोस काही सांगु शकत नाही, पण किल्ल्यावर जाण्याची प्रशस्त वाट व वरती काही ठिकाणी बसायला बाकडे (मोडकळीस आलेले) हे काम बहुधा पुरातत्व / फॉरेस्ट खात्याने केलेले वाटत आहे.

@ हेम - सुचनेबद्दल धन्यवाद, नक्कीच प्रयत्न राहील

पद्मावती, बागुलबुवा, ईनमीन तीन, मित आणि वर्षू नील धन्यवाद तुमच्या प्रतिसादाबद्दल.