रेलकथा २ - पासहोल्डर राण्या, रणरागिण्या वगैरे..

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

आज लांब पल्ल्याच्या गाड्यांमधल्या १८ पासहोल्डर महिलांवर बोईसर स्थानकात कारवाई केल्याची बातमी वाचली पेपरमधे. जागा धरणे, ठराविक जागांवर हक्क समजणे आणि त्यातून होणारी भांडणे, अरेरावी हे सगळं त्या कारवाईच्या मुळाशी होतं असं बातमीमधे आहे. हे वाचून अनेकांची प्रतिक्रिया ’बरी खोड मोडली!’ अशी असणार. आणि त्यात चुकीचे काही नाही. पासहोल्डर्सचा असा अनुभव आलेले खूप जण असणार. मी पण होते की एकेकाळी पासहोल्डर असूनही नवखी असल्याने कळपातली जागा निश्चित नव्हती. मग मलाही इकडून तिकडे हुसकले जात असेच बसायच्या जागेसाठी. मनापासून राग यायचा त्यांचा.

मग कधीतरी हा राग थोडासा निवळायला लागला. मुंबईकडे चाललेल्या गाडीत कुणीतरी कुणालातरी विचारलं ’तू आजच परत जाणारेस का संध्याकाळी?’ तिने उत्तर दिले ’नाही आज नाही. आता उद्या. दादरला चढेन. मला जागा ठेवा.’ दुसर्‍या दिवशी दादरला परतीची गाडी पकडणार्‍या ताई सायन हॉस्पिटलात नर्स होत्या. डेक्कन क्वीनने पुण्याहून निघून, हॉस्पिटलात पोचून, ड्युटीचे कपडे वगैरे घालून त्या दुपारी त्यांची शिफ्ट सुरू करत ती रात्रीपर्यंत. मग तिथेच कुठेतरी झोप काढून पहाटे दुसरी शिफ्ट सुरू करत ती दुपारी संपे. मग परत कपडे बदलून परतीची गाडी गाठत. रात्री १०:३० - ११:०० ला घरी पोचत. घरी दोन दिवसांच्या पोळ्या बडवणे, एक दिवसाची भाजी करणे, दुसर्‍या दिवशीच्या भाजीचे चिरणे/ निवडणे करून ठेवणे असं सगळं मॅनेज करून त्या परत दुसर्‍या दिवशी सकाळची डे क्वी पकडत. हे सगळं का? तर अर्थातच पोटासाठी. पुण्यातल्या हॉस्पिटलात बदली करून मिळत नव्हती काही कारणाने आणि नोकरी सोडणे परवडण्यासारखे नव्हते मग लटका.

एक मैत्रिण होती. तिची तिच्या बँकेच्या मुंबई ब्रांचला बदली झाली होती. मैत्रिणीचं माहेर पुण्यात. सासर नाशिकला. नवर्‍याची नोकरी बदली करून घेण्यासारखी नाही. बदली घेतली नाही तर नोकरी सोडायला लागायची परिस्थिती. ते शक्य नाही. नाशिकला मुलीला सांभाळणारे कोणी नाही. मग मैत्रिण मुलीला घेऊन चक्क माहेरी रहायला आली. आठवडाभर तिची आई सांभाळे मुलीला आणि ही रोज पु-मु अपडाऊन. शनिवारी नवरा पुण्यात येत असे या दोघींना भेटायला किंवा कधी ही जात असे. माहेरी रहायचं, मूल आईच्या भरवश्यावर सोडायचं या सगळ्याचं नाही म्हणलं तरी दडपण येतंच. मग ते कमी करायला माहेरी जेवढा वेळ घरात असे तेवढा वेळ जास्तीत जास्त घरातली कामं करायची. पैशाने मदत करायची वगैरे आलंच. ती सांगायची पासमुळे मिळेल ती गाडी, मिळेल तिथे बसून पुण्याला परत येता येते. बसायला नीट सीट मिळाली तर तेवढाच आराम मिळतो. नाहीतर मग दारात, कधी कुठल्या लांब पल्ल्याच्या तीन टियरवाल्या एक्स्प्रेसच्या वरच्या बर्थवर किंवा दोन सीटसच्या मधोमध जमिनीवर असं कुठेही बसून यावे लागते.

अशा हजारो कहाण्या. सगळ्या नोकरीपायी धावणार्‍या, घरातून बाहेर पडायची आणि पोचायची वेळ अशी की कुणाशी काही संवाद व्हायची सोय नाही पण घरच्या जबाबदार्‍या पार पाडल्या नाहीत तर टोमणे हाणायला सगळे तयार. बहुतेक सगळ्या जणी निम्नमध्यमवर्गीय ते मध्यममध्यमवर्गीय स्तरातल्या त्यामुळे घरातली कुठलीही जबाबदारी मोलाने देणं यासाठी मानसिकता व खिसा दोघांची परवानगी नाही. सुट्टीचा दिवस हा अपराधभावाने केवळ घरासाठी लिहून दिलेला. शरीराला विश्रांती, मनाला विश्रांती ही फक्त रेल्वेच्या प्रवासात.

बसायची जागा मिळणे आणि तिथे थोडावेळ शांतपणे बसता येणे, सगळं काही विसरता येणे, आपल्यासारख्याच बाकीच्या सगळ्यांबरोबर थोडेसे हास्यविनोद करता येणे हे एकमेव सुखनिधान आयुष्यातलं. ते कुणी काढून घेतंय म्हणल्यावर तडफड होणारच. कायदा, नियम माहिती असले तरी चिडचिड होणार. जी समोरच्याला समजणार नाहीच. मग यातून येत असेल ती बसायच्या जागेची अरेरावी वगैरे. खरंतर अर्ध्या अधिक जणी थोड्या थोड्या वेळाने जरा वेळ तू बस गं. मग अमुक स्टेशनला मी बसेन परत वगैरेही करतात एकदा तुम्ही त्यांच्या आतल्या ग्रुपच्या जवळपास पोचलात की.

शेवटी कधीतरी जाणार्‍याला एकदाच तीन चार तास बसायचे असते सीटवर आणि यांच्यासाठी रोजची लढाई. अरेरावी, इतरांना बसू न देणे वगैरे गोष्टी नियमबाह्य, समाजासाठी अयोग्य वगैरे ठिकच. त्याचे समर्थन नाही पण या सगळ्यांच्या आयुष्यातल्या एकमेव विश्रांतीचे काय? प्रश्न बाकी राहतोच...

- नी

रेलकथा १

विषय: 
प्रकार: 

शुगोल, गा.पै. , Happy

शर्मिला, गाडीतून उडी मारून २ मिनिटांत घरी पोहोचण्याचा आपला एकच अनुभव हे वाचून मजा वाटली!

फारएण्ड,
हो. पूर्वी फास्ट ट्रेन्स स्टेशन वरून पुढे जाताना गाड्यांचा वेग कमी करत नसत. रूळ ओलांडणा-यांनासुद्धा फास्ट ट्रेन न थांबता पुढे जाणार आहे याची माहिती असायची!!
दुसरे म्हणजे गाडी पूर्ण थांबण्या अगोदर चालत्या गाडीतून उडी मारून उतरायचे, सगळ्यांच्या अगोदर रेल्वेचा जिना चढायचा, गर्दी टाळायची आणि सगळ्यांच्या अगोदर स्टेशन बाहेर पडायचे!! वयाचा महिमा. Happy

वयाचा महिमा.>> खरं आहे Happy

आता व्हिटीहून ठाण्याला येताना सुखरूप उतरायचं असेल तर दारातच वार्‍याशी खेळ करत उभं राहणं श्रेयस्कर झालं आहे. ठाणे-वाशी लोकलमुळे ठाण्याला उतरणार्‍यांची आणि चढणार्‍यांची गर्दी अतोनात वाढली आहे. एखाद वर्षापुर्वीपर्यंत लोकल प्लॅटफॉर्मला लागल्यावर गती मंदावायची त्यावेळी प्लॅटफॉर्मवर सुखरूप लँड व्हायची कसरत करू शकायचे.. पण आता कितीही उशीर झाला तरी जलद ट्रेनचा मोह टाळून ठाणे ट्रेननेच येते, जेणेकरून उतरताना शांतपणे उतरायला मिळेल.

इथलं वाचून माझ्याही ट्रेन प्रवासाच्या आठवणी जाग्या झाल्या. मुंबई-पुणे प्रवासातच ही जागांची दादागिरी चालते असं नाही तर लोकलमध्येही उभं राहायच्या जागा बर्‍याचदा ठरलेल्या असतात. वेगळा चेहरा दिसला की मग त्याला दादागिरी करून आत ढकलायचं.

५ च्या अंबरनाथ ट्रेननंतर अजून अशीच एक डबल फास्ट अंबरनाथ होती. ५.५८ बहुधा दादरची वेळ होती तिची. दादर नंतर ठाणे आणि डोंबिवली. डोंबिवली नंतर मात्र स्लो ट्रॅकवर जायची ती. मी केलाय त्या ट्रेनने २-२ १/२ वर्ष प्रवास, अगदी दारात उभं राहून. काय शान होती तिची, अशी टेचात धडधडत जायची सगळ्या स्टेशन्सवरचा धुरळा उडवत.

आडो,

तुम्ही म्हणालात ती १७४० ची अंबरनाथ. दाठाडोंक पुढे धीमी. Happy

या डबल फास्टची उलट आवृत्ती सकाळी धावत असे. ०८४३ कल्याणहून सुटे. ठाकुर्ली, डोंबिवली, ठाणे, दादर, बोरीबंदर अशी महाजलद होती. ठाण्याला ०९०९ ला यायची. दिवा गेल्यावर जलद मार्गावर वळवायचे तिला. आज चालू नाहीये. बंद केली बहुतेक.

आ.न.,
-गा.पै.

चांगली आहे लेखमाला. मागे मुंबई - अम्दाबाद सकाळच्या ट्रेनीत बसल्यावर पासधारकांचा राग आलेला. तो कमी झाला हालअपेष्टा वाचून.

Pages