श्रीलंका सहल - भाग १ - प्राथमिक माहिती

Submitted by दिनेश. on 27 August, 2015 - 04:15

श्रीलंकन एअरलाइन्सने जेव्हा नवे रुपडे घेतले त्यावेळी गोव्यात तिचा ग्राऊंड हँडलींग एजंट म्हणून काम बघणार्या कंपनीत मी नोकरीला होतो. त्यांचे लोक मला एकदा श्री लंकेत ये, असा आग्रह करत असत.त्यावेळी मी फारसे मनावर घेतले नव्हते. पुढे मी मालदीवला गेलो होतो, तेव्हा श्रीलंकन एअरलाइन्सनेच गेलो होतो. तिथल्या मर्यादीत तासांच्या ट्रांझिटमधे तसेच विमानातून दिसणार्या दृष्यांमूळे तिथे जायचे तेव्हाच नक्की केले होते.

ते यावेळच्या भारतवारीत साधले.

पुढे प्रत्येक जागेचे फोटो देईनच, पण या भागात या सहलीसंबंधी काही प्राथमिक माहिती देतो.

१) कसे जायचे ?

श्रीलंका, भारताच्या दक्षिणेला असलेला एक छोटासा देश. मुंबईतून जेट एअरवेज आणि श्रीलंकन या दोन थेट विमानसेवा आहेत. श्रीलंकन पहाटे ३ वाजता आहे तर जेट त्याच्या आधी तासभर आहे. चेन्नई, बंगरुळु पासूनही थेट विमाने आहेत. कोलकात्यातूनही थेट सेवा आहे. इतर देशांतूनही थेट विमानसेवा आहे. मुंबईपासून कोलंबो ( श्रीलंकेची राजधानी ) केवळ दोन अडीज तासांच्या अंतरावर आहे. ( मुंबईतून काही सेवा, व्हाया चेन्नई पण आहेत. ) त्यामूळे प्रवासात वेळ अजिबात जात नाही व गेल्या गेल्या भटकायला सुरवात करता येते.

२) व्हीसा

श्रीलंकेचा व्हीसा ऑनलाईन मिळतो. २४ तासात तो मिळतोच. प्रत्यक्ष पासपोर्ट द्यायची गरज नसते. एजंटमार्फत केल्यास साधारण पंधराशे रुपयात हे काम होऊन जाते. स्वतः केले तर आणखी स्वस्त पडेल.

३) चलन

श्रीलंकेचे चलन पण रुपयेच आहे ( अर्थात श्रीलंकन ). भारतीय रुपये थेट चालत नाहीत. ( काही ठिकाणी स्वीकारतात, पण खात्रीने सांगता येणार नाही ) सध्या साधारण एका भारतीय रुपयाला दोन श्रीलंकन रुपये असा विनिमयाचा दर आहे. पण आपल्याला ते आधी डॉलर्समधे बदलून घ्यावे लागतात.
सध्या परकिय चलन मिळवायला फारसा त्रास होत नाही. ट्रॅव्हल एजंटही ते करु शकतो. कोलंबोला पोहोचल्यावर प्रत्यक्ष चलन दाखवावे लागत नाही. हॉटेलचा ( किंवा इतर ) पत्ता मात्र द्यावा लागतो. म्हणून हॉटेल बुकिंग आधी केले तर चांगले.

४) रहायचे कुठे ?

श्रीलंकेतील महत्वाच्या ठिकाणी सर्व दर्जाची हॉटेल्स भरपूर आहेत. पर्यटकही भरपूर येत असतात. रमझान महिन्यानंतरचे दिवस व एप्रिल ते मे हे जास्त गर्दीचे दिवस. तसेच त्यांच्या काही सणांनाही हॉटेल्स आधी बूक होतात. त्यामूळे आधी नियोजन केले तर छान. हॉटेल्स मधली सेवा उत्तम आहे ( निदान माझ्या अनुभवावरून तरी. )

५) काय बघायचे ?

एवढुश्या देशात शंभरच्या वर नद्या आहेत, त्यामूळे पुर्ण देश हिरवागार आहे. समुद्रकिनारे, निसर्ग उद्याने, चहाचे मळे भरपूर आहेत. सरोवरेही बरीच आहेत. मी सहसा भारतीय पर्यटक जात नाहीत अशी काही ठिकाणे बघितली, त्याची माहिती ओघात येईलच. पण साधारणपणे प्रत्येकाला आवडेल असे काहितरी इथे आहेच.

६) फिरायचे कसे ?

मी स्वतः तिथल्या सार्वजनिक वाहनांनी प्रवास केला नाही, पण ती व्यवस्था चांगली आहे. बहुतेक बसेस या टाटा किंवा अशोक लेलँडच्या आहेत आणि चांगल्या स्थितीत आहेत. रस्तेही उत्तम आहेत. त्यामूळे बजेट ट्रॅव्हल करायचे तर तो उत्तम पर्याय आहे. रेल्वे पण आहेत आणि त्यांचे मार्ग अगदी रम्य आहेत, फक्त त्या वेळेच्या बाबतीत काटेकोर नाहीत. स्थानिक ठिकाणी फिरायला, रिक्षा हा पर्यायही आहे. ( त्यांचे भाव आधी ठरवले पाहिजेत. ) आता एअर टॅक्सीज पण उपलब्ध आहेत. पायी भटकण्यातही अजिबात धोका नाही. माझ्या पवासाबद्दल ओघात येईलच.

७) भाषा

इंग्रजी हि तिथली कार्यालयीन भाषा आहे. बहुतेकांना ती येतेच. बोर्डदेखील इंग्रजी भाषेत आहेत. सिंहला हि स्थानिक भाषा तशीच तामिळही. त्यामूळे त्या भाषेतही बोर्ड आहेत. या सिंहला भाषेची मजा सांगायलाच हवी, ती ऐकली तर फारशी कळत नाही पण त्या भाषेत लिहिलेले अनेक शब्द ओळखीचे वाटतात ( बालिका, विद्यालय वगैरे ) तसेच काही शब्दांबाबत माझा गैरसमजही दूर झाला. त्यांच्या माजी पंतप्रधानांचे नाव, भारतीय वर्तमानपत्रात बंदरनायके असे छापून येत असे. ( ते बहुदा इंग्रजी स्पेलिंगवरून ) पण त्याचा मूळ उच्चार भंडारनायके असा आहे आणि भंडार आणि नायक या दोन्ही शब्दांचे अर्थ तेच आहेत.
ते लोक तसे आपल्या नाकासमोर चालणारे आहेत. पर्यटकांना त्रास दिला जात नाही, पण एखाद्या स्थानिक माणसाशी मैत्री झाली तर तो खुपच मोकळेपणे बोलतो. ( मी तर एकाच्या घरी जेऊनही आलो. )

८) खादाडी

श्रीलंकेत मसाल्याचे अमाप पिक येते. दालचिनी ही मूळ स्वरुपात तिथेच होते ( आपण भारतात तमालपत्राच्या झाडाची साल दालचिनी म्हणून वापरतो. ) त्यामूळे त्यांचे जेवण मसालेदार असते तरी तिखट नसते. तसेच घश्याशी येईल एवढे तेलकटही नसते. मुख्य जेवण भात आणि भाजी. भाज्यातही एक परतून केलेली व एक रस्सेदार अशी. मसूराच्या डाळीची घट्टसर आमटी असते. पापड तळलेल्या मिरच्या, डाळवडे असतात. शिवाय त्यांचा म्हणून एक खास पदार्थ म्हणजे सांबळ. हे ब्रम्हीच्या पानापासून केलेले असते ( त्यात मिरची, खोबरे व तेल घालून. ) मालदीव माश्याची चटणी पण असते. हा मासा शिजवून वाळवलेला असतो, आणि त्याचे तूकडे जेवणात स्वादासाठी वापरतात. पण तो न घालता केलेले पदार्थही सहज मिळतात. इतर वेळेस इडली, डोसा ( ते ठोसा म्हणतात ) आणि नयी अप्पम ( हॉपर्स आणि स्ट्रींग हॉपर्स ) असतात. कोठू रोटी म्हणून एक खास पदार्थ चाखला ( त्याची कृती येईलच ) दूध म्हशीचेच असते व मोठ्या गाडग्यात लावलेले दही सर्वत्र मिळते. फळांची रेलचेल आहे आणि हे सर्व अगदी माफक किमतीत मिळते. मी सकाळचा हॉटेलमधला ब्रेकफास्ट सोडला, तर बाहेरच जेवलो.

९) प्यायचे काय ?

श्रीलंकेत चहाचे अमाप पिक येते. ते मळे बघून मला खुपदा चहा प्यायची हुक्की यायची, आणि खास चहासाठी म्हणून असणारी अनेक हॉटेल्स तिथे आहेत. चहासोबत नारळाचेही अमाप उत्पादन होते. त्यांचा किंग कोकोनट सगळीकडे दिसतो. भल्यामोठ्या शहाळ्यातले मधुर पाणी निव्व्ळ अप्रतिम लागते. फक्त ते संपता संपत नाही.
त्याशिवाय ताजे फळांचे रसही छान मिळतात. नेहमी आपण पितो त्यापेक्षा वेगळ्या फळांचे रस मी चाखले ( बेलफळ, कवठ, फणस वगैरे )

१०) खरेदी साठी काय ?

चहा आणि मसाले तर आहेतच, शिवाय तिथली खासियत म्हणजे सूती साड्या. अत्यंत तलम अशा या साड्या अगदी माफक किमतीत उपलब्ध आहेत. त्यांची रंगसंगतीही छान असते.
ओडेल हा तिथला प्रसिद्ध ब्रांड आहे आणि त्यांचे कपडे खुपच छान असतात. मी तिथे भरपूर खरेदी केली.
श्रीलंकेचे प्राचीन नाव रत्नद्वीप. अर्थातच तिथे रत्नेही भरपूर मिळतात. त्याचीही खरेदी, सरकारमान्य दुकानातून करता येते. त्याशिवाय बाटीक, पितळी वस्तू, वेताच्या वस्तू सुंदर मिळतात.
काजूगरही खास असतात. आयुर्वेदीक औषधे, तेले, अगरबत्ती, लाकडी वस्तू, वेताच्या वस्तू पण खरेदी करण्यासारख्या आहेत.

११) खर्चाचा अंदाज

तिकिट व व्हीसा मिळून वीस हजार रुपये पुरेसे आहेत. राहण्याचा खर्च ज्या हॉटेल्समधे रहाल तसा. पण तरीही भरपूर स्वत. खाण्यापिण्याची रेलचेल असल्याने त्यावरही फारसा खर्च होत नाही... आणि माझा खर्च म्हणाल तर , थॉमस कूकने माझी ५ दिवसाची व्यवस्था, त्यात स्टार हॉटेलमधले वास्तव्य, सदा सर्वकाळ ( एअरपोर्ट ते एअरपोर्ट ) दिमतीला गाडी व गाईड, सर्व ठिकाणची प्रवेश फी, सर्व प्रवास.. असे सगळे फक्त १ हजार यू एस डॉलर्स मधे करून दिली. खरे तर हे म्हणजे फारच लाड झाले म्हणायचे. यापेक्षा बजेटमधे आणि जास्त प्रवासी असतील तर आणखी कमी खर्चात ही सहल होऊ शकते.

पण या सर्वांपेक्षा एक जास्त महत्वाचा मुद्दा म्हणजे का जायचे ?

भारतीय पर्यटक म्हणून प्रेम आणि आदर मी स्विस आणि ओमानमधेही अनुभलेय. पण श्रीलंकेत तर त्यापुढे जाउन भारतीयांना खास सवलती दिल्या जातात. केवळ भारतीयांसाठी म्हणून हॉटेल्स, दर स्वस्त लावतात. अगदी सरकारी उद्यानात वगैरेही भारतीय ( सार्क देशांचे नागरीक म्हणून ) सवलतीच्या दरात तिकिटे मिळतात.
तिथल्या बहुतेक लोकांची चेहरेपट्टी भारतीय आहे.. आणि हो केवळ सीतेचाच नव्हे तर इतरही अनेक ऐतिहासिक संदर्भ असल्याने, त्या देशात आपल्याला अजिबात परके वाटत नाही.. शिवाय स्वच्छता हि आपल्यासाठी अप्रूपाची असलेली गोष्ट तिथे आहेच.

मला वाटतं, बहुतेक माहिती मी दिली आहे. आणखी काही शंका असल्यास जरूर विचारा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त
उद्या भारत श्रीलंका मालिकेतील शेवटचा सामना ..
पण ती मालिका संपता संपताच आपल्या सौजन्याने इथे मायबोली-श्रीलंका मालिका सुरू होतेय.

वॉव, मस्त आहे साईट ती!!!
नेक्स्ट डेस्टिनेशन प्लान करताना याचाही विचार करू नक्कीच!! Happy

मला श्रीलंकेत त्यांचा नाश्ता प्रकार खूप आवडायचा. अगदी जेवणच असते. मासे भरपूर पण भाज्या सुद्धा मस्त असतात पोरीयल टाएपच्या , न्ना दू वापरोइन.

फोटो द्या भरपूर खादाडीचे.

रामायण वगैरे श्रीलंकेत काहीही घडलेले नाही. तिथल्या बर्‍याच लोकाना ते माहीतही नाही. भारतीय पर्यटक येतात विचारतात म्हणून काही लबाड लोकांनी आताशा काही जागा रावनाची राजधानी ,अशोकवन म्हणून दाखवायला सुरुवात केली आहे. उगीच तुम्ही येथे बसून लिहायचे की भारतातल्या राजाने बाझील वर चढाई केली आणि ब्राझीलच्या राजाचा पराभव केला आणि आपण तिथे जाऊन विचारायचे की ती जागा दाखवा म्हणून. बाबूराव अर्नाळकरांच्या नायकांची घरे लोक मरीन ड्राईव्हला शोधत फिरत तसलेच . यात लिहिणार्‍यांचे चित्रमय कसबाचा विजय आहे. आम्हीही वेडपटासारखे भेटेल त्याला हे रावणाचे लफडे विचारत असू. ते बिचारे ओशाळे होऊन माहीत नसल्याचे सांगत.

छान माहिती दिनेशदा. ब्राह्मीची चटणी एकदा खाल्ली होती. पण त्यात इतके तेल होते की ब्राह्मीची चव कळलीच नाही.

अमि, तिथे एवढे तेल नाही वापरत. अजिबात दिसून येत नाही तेल.

( आता पुढच्या आठवड्यापासून सुरवात करतो लिहायला )

छ्या: . अयोध्या थायलंड मध्ये आहे

अयोध्या पाकीस्तानातही आहे.

Ayodhya, the birthplace of Hindu warrior-god Ram, is in Pakistan, claims a book by a top Muslim leader.

Ayodhya in Faizabad district of Uttar Pradesh is not the original city by the same name as it was inhabited by human beings only in 7th century BC while Rama is believed to have been born 18 million years ago, says "Facts of Ayodhya Episode" authored by Abdul Rahim Quraishi, assistant general secretary of the All India Muslim Personal Law Board (AIMPLB).(ToI news)

चलो मंदीर वहीं बनायेंगे ...

तात्पर्य काय रामायण लंकेत शोधण्यात काय पॉइन्त नाय

अतिशय सुंदर माहिती!
खाद्यपदार्थांबद्धल थोडे अजून वाचायला आवडेल.

Pages