a home is where the heart is

Submitted by नानबा on 22 August, 2015 - 00:28

मी भारतात येऊन जवळपास दोन वर्षे झाली, म्हणून माझा अनुभव शेअर करतेय.
प्रत्येकाच्या स्वभावानुसार, बाहेर काढलेल्या वर्षांनुसार - प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकेल हे गृहीत धरून हा माझा व्यक्तिगत अनुभव लिहितेय.

अमेरिकेनं मला खूप काही दिलं, अनेक गोष्टींची जाणीव करून दिली (उदा. माझे हक्क, आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणं म्हणजे आगाऊपणा नव्हे हा दिलासा, इतर अनेक गोष्टी), माझ्यातली सहिष्णूता वाढवली (इतर विचार प्रवाह, संस्कृती ह्यांना अ‍ॅक्सेप्ट करणं), अनेक अनुभव दिले. एकंदरीत तिथला अनुभव सुखावह होता.
अमेरिकेतून परत येताना, अनेकांनी (प्रेमाने आणि त्यांच्या अनुभवानुसार) इथे न येण्याविषयी/परत न जाण्याविषयी सुचवलेलं. भारतात गेल्यावर पश्चाताप झालेल्या आणि प्रयत्न करूनही परत न येऊ शकलेल्या लोकांच्या कथा आम्ही ऐकलेल्या. निदान ग्रीनकार्ड तरी करून जा, असही अनेकांनी कळकळीनं सांगितलेलें (आस्थेपोटी).
आम्ही ग्रीनकार्ड साठी अ‍ॅप्लायही केलं नाही - कारण आम्हाला परत यायचं होतं असं सुरुवातीपासून वाटत होतं. (आणि हे होईतो, ते होईतो ह्यात अडकायचं नव्हतं).
एच१ वर एक वर्ष राहिल्यावर मात्र जरा सटपटायला झालेलं. (परत येण्यापूर्वी) ग्रीनकार्ड अ‍ॅप्लाय करण्याचा शेवटचा चान्स सोडून वेडेपणा करतोय का असं वाटायला लागलेलं. ग्रीनकार्ड करावं असा अल्मोस्ट विचार करून कंपनीत तशी सूत्र हलवायलाही सुरुवात केलेली, पण मग जाणवलं की आपण असं करत इथेच राहिलो (ग्रीन कार्ड, मग सिटिझनशिप वगैरे) - तर सतत 'गेलो असतो तर' असं वाटत रहाणार, कारण डीप डाऊन परत यावं, असंच दोघांनाही वाटतय.
अजून विझा वर काही काळ शिल्लक होता, मग ठरवलं, एक वर्ष भारतात परत जाऊन तर बघू, अगदीच वाटलं तर परत येता येईलच (कदाचित ह्यावेळेस त्रास पडेल, खटपटी/लटपटी कराव्या लागतील, कदाचित एखादे वेळेस वाटूनही येण्याची संधी मिळणार नाही). पण येऊन बघावच कारण आयुष्यभर 'गेलो असतो तर' घेऊन, 'पुढ्च्या वर्षी जाऊ' असा विचार करत बसणं त्रासदायक होईल.

इथे आल्यावर जवळपास ८ महिने मी रजेवरच होते, त्यामुळे घरच्यांबरोबर, माझ्या मुलीबरोबरचा वेळ, मदतीला कामवाल्या बायका आणि ट्रॅफिक वगैरे गोष्टींना फारसं तोंड न द्यायला लागणं - ह्यामुळे हा काळ आनंदात गेला.

काही निगेटिव अनुभवः
१. इन्टरनेट प्रोव्हायडर (यु टेली) ह्यानी ह्या काळात वात आणलेला
२. मी आधी रहायचे तिथे लाईटही अनेकदा जायचे. मी MSEB ला ह्या काळात खूप कॉल्स करून तक्रारी केल्यात. पण बर्‍यापैकी वैताग व्हायचा
३. जवळच एक कार्यालय होतं, रात्री अपरात्री फटाके उडवणार्‍या लोकांमुळे, मोठ्यांदा स्पीकर लावणार्‍या लोकांमुळे प्रचंड चिडचिड व्हायची.
४. इथे आल्यापासून मुलीच्या कमी असलेल्या वजनाचे आणी तब्येतीचे (डे केअर मधे सतत कोणी ना कोणी आजारी असतं, मग इतर पोरही आजारी पडतात - त्यात आमची लेक वरचा नंबर लावून असते) इशुज फेस करतोय, पण ते अमेरिकेत झाले असते का नाही ह्याची कल्पना नाही.
५. डॉक्टरांच्या कन्स्ल्टिंगच्या पद्धतीतली फरक, इतर ठिकाणी ग्राहकाला मिळणारी ट्रीटमेंट अशा काही गोष्टींवरून आम्ही असमाधानी होतो.

ह्यातल्या १,२,३ आणि ५ ह्या गोष्टी आम्ही काही प्रमाणात सॉल्व करू शकलो (घर इतर कारणांनी बदलंलं, इन्टरनेट प्रोव्हाईडर बदलला वगैरे)

हे वगळता फायदे खूप दिसले:
१. घरच्यांचा सहवास - मुलांना आजी आजोबा, मावशी काका, ताया आणि इतर अनेक नातेवाईक खूप मॅटर करतात. लेक खूप खूष असते ह्या गोष्टीमुळे. अनेक लोकांच्या सहवासामुळे तिला विविध ढंगी व्यक्तिमत्व, त्यांच्या विचार पद्धती, वागण्याच्या पद्धती, अनेक प्रकारचे खेळ, गोष्टी सांगण्याच्या पद्धती - ह्यांना आपोआप एक्स्पोजर मिळतं. मुख्य म्हणजे आई वडीलांव्यतिरिक्त खूपजणांचं प्रेम अनुभवायला मिळतं.
२. नातेसंबंधात सहजता असल्यानं भेटणं, एकत्र येणं ह्या सगळ्यात सहजता असते. ठरवून मैत्र्या करायची गरज पडत नाही. २-३ नातेवाईक फारच जवळ आहेत, त्यांना कधीही न ठरवताही भेटणं होतं ( आम्ही ते एन्जॉय करतो)
३. सोसायटीत खाली, फ्लोअर वर अनेक मुलं खेळत असतात. सतत २४ तास मुलांना एन्टर्टेन करावं लागत नाही. फ्लोअर वरतीच लेकीच्या वयाचा अजून एक मुलगा आहे, दोघ कधीही प्लॅन्ड प्लेडेट शिवाय दिवसातून असंख्य वेळा एकमेकांच्या घरी असतात, खेळतात. त्याशिवाय अनेक मोठ्या मुलीही खेळताना ह्या दोन पिल्यांना सामावून घेतात.
४. सण-उत्सव - चांगल्याप्रकारे साजरे होतात. गणपती/नवरात्रात स्पीकर चा त्रास ही होतो. दिवाळीत शक्य झालं तर लांब शांत ठिकाणी जायचा विचार आहे. पण हे वगळता अनेक सणात मजा येते.
५. नातेवाईकांच्या प्रॉब्लेम ला आपण आणि आपल्या प्रॉब्लेम्सना ते धावत येतात. (शॉर्ट नोटिसवरही)
६. आईवडील आणि भावंडाम्च्या जवळ असणं म्हणजे सूख असतं (आमच्याकरता). आमच्या कुटुंबातल्या एका ज्ये.नांना एक म्हातारपणाशी निगडीत आजार डिटेक्ट झाला. डिटेक्शन, इनिशियल अ‍ॅक्सेप्टन्स ह्या सगळ्या गोष्टींकरता, तसंच इतर ज्येनांच्या मोठ्या आजारपणात आम्ही त्यांच्या बरोबर असू शकलो. तिथे बसून टेंशन आणि गिल्ट ह्या दोन गोष्टींचा फार त्रास झाला असता. इथे असल्यानं त्यांना आणि आम्हालाही फार आधार झाला.
७. अ‍ॅज अ सोसायटी अनेक अनॅक्सेप्टेबल गोष्टींबरोबर असंख्य चांगल्या गोष्टीही घडताना दिसल्या.
तिथे असताना रेप ही गोष्ट जाता येता घडते असं वाटायचं - पण इथे आल्यावर तसं काही नाहिये, हे जाणवलं. सतत दहशतीत रहावं अशी अवस्था नाहिये (काही घडतच नाही असं नाही, पण ते मिडिया दाखवते तितक्या % वरही घडत नाही, असा आतापर्यंतचा अनुभव. हा अनुभव न बदलो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.).
८. कामवाल्या बाया: हे दुधारी अस्त्र आहे.. मदतही होते, मधेमधे डोक्याला व्यापही होतो. पण त्यांच्या मदतीनं (आणि घरातल्या इतर लोकांच्या मदतीनं) मी माझ्या मुलीबरोबर भरपूर वेळ घालवू शकते. स्वतःसाठी वेळ काढू शकते.
९. वर्क लाईफ बॅलन्सः काही काळाचे अपवाद वगळता, मी माझ्या मुलीबरोबर भरपूर वेळ घालवू शकलेली आहे. थँक्स टू माय ऑर्गनायझेशन (आणि पीपल आय वर्क विथ) - त्यांनी मला आधी सबॅटिकल, मग फुल टाईम आणि पुन्हा गरज पडल्यावर पार्ट टाईम अशा सगळ्यात सपोर्ट केलय.
१०. जगण्यातली सहजता: सोसायटीत फिट होण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. लहानपणापासून इथेच वाढल्यानं एक सहजता आहे. इतर अनेक गोष्टीत सहज मिसळून जाता येत असल्यानं, काही गोष्टीत 'आय डोंट केअर' म्हणणं सोपं जातं.
११. जगण्यातलं श्रेयस, प्रेयस शोधण्याचा प्रयत्न (नोकरी, घराव्यतिरिक्त) आल्यापासून सुरु आहे. अनेक संधी आहेत. पहिला प्रयोग पूर्णपणे यशस्वी झाला नाही, पण त्यातून अनुभव, स्वतःला समजून घेण्याची संधी मिळाली.
सध्याही काहीतरी सुरु आहे, त्यावर वेळ मिळाला तर वेगळं लिहिन.

येण्यापूर्वीच्या आणि आल्यानंतरच्या काळात जाणवलं की आपल्याला खरं काय हवय हे कुठेतरी आत जाणवत असतं, ते ओळखून डिसिजन घेतला तर आलेल्या छोट्यामोठ्या गैरसोयींचा त्रास होत नाही. आपल्या आतल्या वाटण्याला टाळून आपण निर्णय घेतला तर कुठेतरी आत ते खदखदत रहातं. (डिसिजन रहाण्याचा असो वा जाण्याचा असो!).

गेल्या दोन वर्षाच्या अनुभवावरून तरी - इथे परत येणं, हा आमच्याकरता योग्य निर्णय होता. आमच्या आनंदाचं पारडं जड आहे. शेवटी 'A home is where the heart is' हेच खरं!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त माझी गोष्ट वाचत असल्या सारखे वाटले . ५ वर्षे राहिल्यावर परतलौय मागच्या महिन्यात .ठरवुन ग्रीन कार्डला एप्लाय केले नाहि . मुलीला भारतातच वाढवायचे होते . भारतात परतन्यातले तोटे असे कधी डोक्यात पण आले नाहि कारण मनाने कायम पुणेकरच आहे . अमेरिके पेक्शा मुलगी ईथे प्रचंड खुष आहे . मुळात ईलेक्ट्रीसिटी नसणे सेवा नीट नसणे ह्या मला कधी गैरसोयी वाटतच नाहित कारण त्यांच्या बरोबरच मी मोठी झालीये . शेवटि तिथे राहुन अमेरिकन कधीच होणार नव्हते. पाहुणे म्हणुन गेलो होतो त्यामुळे घरी परतणे आवश्यकच होते .

छान लिहीले आहेस नानबा.
मला तुझी 'परतोनि पाहे' वरची पहिली पोस्ट आठवते आहे. Happy

जिज्ञासा- तुलाही मनःपूर्वक शुभेच्छा.

छान लेख. ते शीर्षक Home is where the heart is असे हवे. a ची गरज नाही.

बी एम एम च्या संदर्भाने आलेले लेख, ओळखी वाचून मला वाटले होते की अमेरिका हे एक व्हायेबल लिव्हींग ऑपशन आहे पुढील जनरेशन साठी. किती लोकांनी तिथे चांगले जीवन निर्मिले आहे. इथल्या पेक्षा सोयी सुविधा चांगल्या. जास्त सुरक्षित वगिरे आहे. पण हा लेख वाचून परत विचार करत आहे. घरी डिस्कशन केले तर हो आहे क्वालिटी ऑफ लाइफ चांगली ओन्लि इफ यू आर व्हाइट अँड अ मॅन.
असे फार प्राग्मॅटिक उत्तर मिळाले. हे निर्णय त्यांचे त्यांनीच घ्यावे. हे बेस्ट.

नानबा, फारच सहज छान लिहीले आहेस. आपला एखादा मोठा निर्णय बरोबर ठरला हे समजण्यातही सुख असतं. असे लेख लिहून वाचून सकारात्मक ऊर्जा वाढत राहो. शुभेच्छा तुला.

चांगले लिहिलेय.
परत जाण्यापुर्वी ग्रीनकार्ड किंवा सिटिझन्शिप न करता गेले तर बेस्ट.

नानबा, तुम्ही लिहिलेले एकुण एक फायदे पटले. निगेटिव अनुभव #४ अमेरिकेत सुद्धा अनुभवायला मिळाला असता. अमेरिकेत मी स्वतः १ वर्ष मुलीला डे केअर मधे ठेवून नोकरी केलीये. त्यावेळी मीपण लेकीची सततची आजारपणं आणि वजन न वाढणे ह्या समस्या अनुभवल्या आहेत.
भारतात परतणे हे आमच्या अजेंड्यावर आहे. मला तर खूप तीव्रतेने भारतात परत जावसं वाटतं. पण नवर्‍याला अनेक शंका आहेत. त्यातली महत्वाची शंका म्हणजे भारतातली वाढती महागाई. त्याबद्दल तुमची मतं जाणून घ्यायला आवडतील.
दुसरी शंका म्हणजे आयटी क्षेत्रातील नोकरीच्या संधी. सध्या काय परिस्थिती आहे? एक नोकरी नाही पटली तर ती सोडून दुसरी चांगली नोकरी मिळू शकते का? वाढत्या महागाईला पुरून शिल्लक राहिल असे पगार मिळतात का?
भारतात आम्ही दोघं नोकरी करू हे निश्चित. कारण मुलीला सांभाळायला आजी-आजोबा आहेत.

खूप गोड लिहिलं आहेस नानबा.
तुमच्या मनात यायचं होतंच, त्यामुळे इथल्या अडचणींचा बाऊ झाला नाही. पण मनात किंतु असेल तेव्हा लहानातला लहान मुद्दादेखील बागुलबुवाइतका मोठा वाटतो.

तुझ्या लेखाशी अवांतर, पण प्रतिसादात आलेला शिक्षणाचा मुद्दा मात्र चिंताजनक वाटतो आहे खरंच. डॉक्टर- इंजिनियरिंगसाराखं शिक्षण घ्यायचं असेल तर प्रचंड स्पर्धा आहे आणि खर्चिकही आहे. अधलीमधली मुलं उच्चशिक्षणात लटकतात- पैसा नाही म्हणून किंवा आवश्यक तेवढी बुद्धीमत्ता नाही म्हणून. सगळेच बुद्धीमान कसे असतील ना आणि? करियरच्या वेगळ्या वाटाही खूप आहेत. पण प्रत्येकच ठिकाणी भयानक स्पर्धा आहे.

कुटुंबाचा अंदाजे मासिक खर्च किती येइल ह्याचा अंदाज घेउन मग त्या अनुषंगाने पगार देऊ शकेल अशी नोकरी शोधली तर महागाईचा प्रश्न बर्‍यापैकी सुटेल. एकदा भारतात बेस-सॅलरी मिळाली की मग नोकरी बदलायची झाली तरी सहसा मूळ पगाराइतका अथवा जास्त पगार मिळायला अडचण येत नाही. भारतात कोणत्या शहरांत कोणत्या प्रकारची आयटी इंडस्ट्री आहे, त्यानुसार आपल्या क्षेत्रांतील जास्तीत जास्त कंपन्या ज्या शहरांत असतील तिथे राहायची तयारी असेल तर नोकरी बदलायला अडचण येऊ नये. शहरांनुसार मासिक खर्चात बर्‍यापैकी फरक पडू शकतो.

मुलगा/मुलगी यू.एस. ची नागरीक असेल तर शिक्षणात अजून एक मह्त्वाची अडचण येते - हे मला हल्लीच समजलं आहे.

PIO/OCI च्या फायद्यात 'Student will be at apr with Indian Student' असा फायदा असतो. पण ते खरे नाहीये. ही मुले NRI कोट्यात बसतात. एक तर फी ३ पट जास्त असते आणि अभियांत्रिकीकरता ठराविकच कॉलेजात प्रवेश मिळू शकतो. परत अशी मुले जरी कमी असली तरी तो कोटा पण कमीच आहे त्यामुळे स्पर्धा जीवघेणीच आहे.

पण तरीही अमेरिकेपेक्षा कमी खर्चात आणि वेळात (फक्त ४ वर्षेच) भारतात अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करता येते हा मोठा फायदा आहेच. Happy

बाकीच्या कोर्सेसबद्दल मला खात्रीलायक माहिती नाहीये - पण मेडीकलला त्यांना प्रवेश नसतो .

छान लिहिलंयस नानबा. Happy

>> जगण्यातलं श्रेयस, प्रेयस शोधण्याचा प्रयत्न ... सुरु आहे
बेस्ट! तेच महत्त्वाचं - बाकी सगळे तपशील असतात फक्त. Happy

#४ अमेरिकेतसुद्धा झालंच असतं. डेकेअरमध्ये जायला लागल्यावर सुरुवातीला किरकोळ सर्दीखोकल्यासारखे आजार वारंवार होतातच - पण त्यातूनच इम्यूनिटी बिल्ड होते मुलांची. Happy

Pages