आम्ही, स्वाईन फ्ल्यु, आणि मास्क !

Submitted by कवठीचाफा on 20 August, 2009 - 09:41

" येतो गं अशु...." बाहेर पडण्यापुर्वी मी सौ. ला हाक मारली.
" अरे, पण मास्क घातलायस का?" सौ. ने आठवण करुन दिली.
हो ! आजकाल कुठे बाहेर पडायचं झालं तर डोक्यात हेल्मेट घातलेय की नाही यापे़क्षा तिची मी मास्क घातलाय की नाही यावर जास्त नजर असते. कारण सगळ्यांनाच माहीताय. आजकाल जगभर धुडगुस घालणारा ‘स्वाईन फ़्लु’.

या रोगाने माझ्या जीवनशैलीत मरणाचा फ़रक करुन ठेवलाय. पुर्वी बाहेर जाताना रुमाल, पाकीट, मोबाईल असल्या गोष्टी महत्वाच्या वाटत होत्या पण आता त्यात मास्कची भर पडलीये. या प्रकाराने माझ्यासारख्या सरळ नाकासमोर चालणार्‍या माणसाला बरेच चित्रविचीत्र अनुभव आलेत. मलाच नाही पण माझ्यासारख्या अनेक जणांची हिच तर्‍हा आहे.

आगदी परवा परवाचीच गोष्ट घ्या ना ! बाहेर नाक्यावर सहज रेंगाळलो तर तिथे चर्चा चालु होती.
" पक्या, च्यायला मी एन नाईन्टीफ़ाय घेतलाय."
" आईशपथ, कुठे मिळाला तो?"
"अरे, आपला एक दोस्त आहे त्याने दिला एकदम स्वस्तात"
" वाव, पक्या साल्या, वशीला दांडगा रे तुझा !"
त्यांच्या बोलण्यावरुन एव्हाना मला नोकीया कंपनीचे नवे मॉडेल बाजरात आल्याचा शोध लागला होता. मग मीही त्या संभाषणात उगीचच चोच मारली. तशी ही नाक्यावरची मंडळी माझ्या बर्‍यापैकी ओळखीची आहेत म्हणा !
" पक्या, काय फ़िचर्स आहेत रे या मॉडेलची?" माझ्या प्रश्नाबरोबर त्या ठिकाणी एकदम शांतता पसरली. सगळेजण माझ्याकडे विचीत्र नजरेने पहायला लागले. पण मी ही संभाषण पुढे रेटण्याच्या तयारीत त्याला विचारुन टाकले.
"कधी लॉच झाला रे? आणि परवडण्यासारखा आहे का?"
" काका, काय कधी लॉच झाला?" बुचकळ्यात पडलेल्या त्या तारुण्याने मला विचारले.
" अरे तोच तो तुझा एन नाईन्टीफ़ाइव्ह, त्याची फ़िचर्स काय आहेत रे ? टच स्क्रीन आहे का ? " आतामात्र त्या तरुण चेहर्‍यांवर एक मिश्कील हास्य पसरले.
" काका, हा मोबाईल नाहीये मास्क आहे तोंडाला लावायचा एकदम फ़ुलप्रुफ़" त्यातल्या एकाने मला समजावले.
घ्या म्हणजे आता गल्लोगल्ली अभिमानाने दाखवल्या जाणार्‍या नव्या महागड्या मोबाईलची जागा आता मास्कने पटकावली होती तर.

दुस-याच दिवशी कंपनीत हेच ते तथाकथीत, फ़ारच चर्चेत असणारे एन नाईन्टीफ़ाईव्ह असले एखाद्या मोबाईलच्या मॊडेलसारखे नाव असलेले मास्क सर्वांना वाटण्यात आले आणि इतकेच नव्हे तर त्यांची सक्तीही करण्यात आली. का? तर यांच्या ९५ % गाळण क्षमतेमुळे आपला या रोगाच्या विषाणुंपासुन बचाव होतो. मनात एक चुकार विचार चमकुन गेला ‘ तरीच अफ़गाणीस्तान आणि पाकिस्तानकडे स्वाईन फ़्लुचा प्रसार झाला नाही, नाहीतरी जेंव्हा केंव्हा हे तालीबानी टी.व्ही. वर दिसतात तेंव्हा त्यांची तोंडं कायम भल्या थोरल्या कपड्याखाली झाकलेलीच दिसतात की. काय बिशाद विषाणुंची आत शिरायची ! ’

या मास्कची वेगळीच अडचण आहे, एकतर हे मास्क पार घुसमटवुन टाकतात, वर ते चेहर्‍यावर लावल्यानंतर माणसाचा चेहराही त्याच्या पुर्वजांप्रमाणे दिसायला लागतो. असे आपले मला वाटते. एव्हाना आमच्या कंपनीतल्या भाषा सुध्दा बदलायला लागल्यात. त्याच दिवशी एक सहकारी दुसर्‍याला विचारत होता.
" आजचा स्कोअर काय झालाय रे?" यावरुन मी आपला भारताचा क्रीकेट सामना चालु असल्याचा गैरसमज करुन घेउन तासभर नेटवर लाईव्ह स्कोअर शोधत होतो. मग हळूच मला साक़ात्कार झाला हा क्रीकेटचा स्कोअर नसुन या स्वाईन फ़्लु ला बळी पडलेल्यांची संख्या विचारण्याचा कोड होता.

या मास्क प्रकाराने काही कमी गोंधळ घातलेला नाहीये ! दिवसभर मास्क घालुन फ़िरत राहील्याने त्याची इतकी सवय होते की तो आपल्या चेहर्‍यावर असल्याची जाणिवच रहात नाही. आमचा ‘पंडीत’ असले विद्वान नाव असलेला सहकारी या मास्कचा पहीला बळी ठरला. दुपारी चहाच्या वेळी महोदयांनी अंगावर गरमागरम चहा सांडवला. दिवसभराच्या मास्कच्या सवयीने त्याला आपण मास्क घातल्याचे ल़क्षातच राहीले नाही आणि त्याने चहाचा कप तसाच तोंडाला लावला. नायरची आणखी वेगळी कहाणी. ‘नायर’,आमच्याकडे जुनाट झालेला इंजीनीयर, गुटख्याचे रवंथ हा त्याचा दिवसभरातला पार्टटाईम जॉब. या महाशयांनी तोंडावरच्या मास्कचे भान न राहील्याने आपल्या मुखरसाची पिंक टाकुन मास्कचे अंतरंग रंगवलेच पण तोच मुखरस नाकात गेल्याने तासभर तरी माणसात नसल्यासारखा वागत होता.

यथावकाश मास्कची सवय झाली, त्याचे नाविन्य संपले आणि मग सुरुवात झाली ती आपापल्या मनात दडलेल्या कलाकाराला वाव देण्याची. हळूहळू या सुप्त कलाकारांच्या मास्कवर हलकासा रंगाचा एखादा फ़राटा दिसायला लागला. पुढे त्यावर काहीच प्रतिक्रीया न आल्याने या कलाकारांची कला पुर्णपणे जागॄत झाली. मग काय ! कुठे चेहर्‍यावर मास्कचे मांजराच्याच चेहर्‍यात रुपांतर झाले तर कुणाच्या चेहर्‍यावर वाघोबांनी वस्ती केली. पहातापहाता आख्ख्या ऑफ़ीसचे प्राणीसंग्रहालयात रुपांतर व्हायला लागले. शेवटी आमच्या वाघोबांला अर्थात जी.एम. ना यात हस्त़क्षेप करावा लागला.

या नंतर सुरु झाला जास्तिच्या खबरदारीचा खेळ. ऑफ़ीसात पाउल टाकण्यापुर्वीच सगळ्यांना थर्मामिटरच्या चाचणीला सामोरं जायला लागलं. चुकुनमाकुन भर उन्हातुन तापुन आलेला एखादा प्राणी या टेस्टला बळी पडायला लागला. ९९.५ पर्यंत जरी थर्मामिटरचा पारा चढला तर वाळीत टाकल्यासारखा त्या माणसाला फ़स्टएड रुम मधे बसवला जायला लागला. भिक नको पण कुत्रे आवर या चालीवर तो स्वाईन फ़्लु परवडला पण काळज्या आवर अशी गत होवुन बसली. यातुन सुटका केली ती आमच्या ऑफ़ीसबॉयने, त्याने सरळ एका व्हीजीटरलाच असा वाळीत टाकला, मग नाईलाजास्तव ही प्रक्रीया बंद करावी लागली पण........

दुसर्‍याच दिवशी अशी दवंडी पिटवण्यात, आय मीन सर्क्युलर काढण्यात आले की कुणालाही अंगात कणकण जरी जाणवत असेल त्याने कामावर येउ नये. मग काय? दर दोन दिवसांनी एकाला तरी अशी कणकण जाणवायला लागली. एकुणच कंपनीतली संख्या रोडावायला लागल्यावर हा ही हुकुमनामा रद्द करण्यात आला.
प्रकरण इतक्यावरच संपले असे वाटत असतानाच पुण्यावरुन आमचे एम.डी. आपल्या फ़ौजफ़ाट्यासह आले. आणि दुर्दैवाने, कुणाच्या ते माहीत नाही, त्यातला एक इथल्या मलेरीयावाहु ( ते विमानवाहु असतात तसं) मच्छरांच्या तडाख्यात सापडला. त्याचा ताप चढत गेला आणि इकडे आफ़वांचा आलेखही चढत गेला त्यांना आता पंख फ़ुटले, तोंडावरचे मास्क आणखी घट्ट आवळल्या गेले. इतकेच काय पण समोरुन त्यांच्यापैकी कुणी येताना दिसलेच तर लोक चक्क रस्ता बदलायला लागले. त्यातच कुणीतरी संधिसाधुने हळूच सुऱक्षा विभागाला चिठी पाठवली की पुण्यातल्या शाळांप्रमाणे आपणही कंपनी सात दिवसासाठी बंद ठेवावी.

पण घोळ वेळीच निस्तरल्या गेलाय आमच्या शहरात तरी या स्वाईन फ़्लु चा कुणी रोगी नसल्याची खात्री शहरातल्या तमाम डॉक्टरांनी दिलीय. त्यामुळे देशभरातला स्वाईन फ़्ल्युचा विळखा जसा सैलावलाय तसे आमच्या चेहर्‍यावरचे मास्कही सैलावलेत म्हणजेच केराच्या टोपलीत गेलेत. हे सगळं खरं पण गेल्या दहा-पंधरा दिवसात हे मास्क सतत घालुन बसल्याने चेहर्‍यावर त्यांचा एक गोरा गोमटा ठसा उमटलाय त्यामुळे सध्या तरी चेहर्‍यावर रुमाल बांधण्याशिवाय दुसरा पर्याय सुचत नाहीये.

************************************
तळटीप : या लिखाणातुन स्वाईन फ़्ल्यु सारख्या महामारीचा नेटाने सामना करणार्‍या पुणेकर, मुंबईकर यांची खिल्ली उडवण्याचा हेतु नसुन त्यातुनच थोडासा विरंगुळा म्हणुन हे लिहीले आहे. म्हणतात ना अती झाले आणि हसु आले त्यातला हा प्रकार.

गुलमोहर: 

मस्तच!

<<या महाशयांनी तोंडावरच्या मास्कचे भान न राहील्याने आपल्या मुखरसाची पिंक टाकुन मास्कचे अंतरंग रंगवलेच पण तोच मुखरस नाकात गेल्याने तासभर तरी माणसात नसल्यासारखा वागत होता. >>
Rofl
सहीच चाफ्फ्या...

कोण म्हणतं ' चाफा बोलेना, चाफा चालेना

तळटिप : वायरस मुळे माझे प्रत्येक प्रतिसाद ३ वेळा येत आहेत तरी त्या कडे ल़क्ष देऊ नये ही विनंती (इथे कोणालाह्री त्रास देण्याचा हेतु नाही कळावे)

चाफ्या, सहीच लिहिलयस. Lol

वैभवदा, तुमच्या व्हायरसला मोजणी येत नाही असं दिसतय.. प्रतिसाद दोनदाच आला Proud

स्वाईन फ़्ल्यु सारख्या महामारीचा >> खरच आहे का ही महामारी. ज्या दिवशी सार्‍या भारतात स्वाईन फ़्ल्युच्या बळींची संख्या ११ होती (४-५ दिवसात मिळून) त्याच दिवशी DD वर बातमी होती की महाराष्ट्रातील एका गावात कॉलरामुळे एकाच दिवशी ७ माणसे दगावली. टीबी, मलेरीया यासारखे कर्दनकाळ तर सदैव तयार असतात.

दिवसभर मास्क घालुन फ़िरत राहील्याने त्याची इतकी सवय होते की तो आपल्या चेहर्‍यावर असल्याची जाणिवच रहात नाही. >> Lol अगदी अगदी....

समोरुन त्यांच्यापैकी कुणी येताना दिसलेच तर लोक चक्क रस्ता बदलायला लागले. हा हा... पहिल्याच दिवशी (जेव्हा स्वाईन फ्लु चे नुसते नाव पसरत होते मुंबईमध्ये) स्टेशनवर मला एक माणूस मास्क घालून जाताना दिसला तेव्हा मला वाटलं की त्याला स्वाईन फ्लु झालाय Lol (घरी टी. व्ही. नसल्याचा परीणाम...) नंतर बरेच जण असे दिसले तेव्हा मला फेफरं आलं ! एवढे जण? मी त्याच दिवशी नवर्‍याच्या मागे लागले (चेकअप करून घेण्यासाठी आणि टि. व्ही घेण्यासाठी...: D ) नवर्‍याने "कित्ती बाई मठ्ठ ही "अस्सा चेहरा करून समजावले.. "तो मास्क स्वाईन फ्लु प्रोटेक्शनसाठी आहे... "

खरंच ना कित्ती बाई मठ्ठ मी !!! Sad

हो पण कोणी साधा शिंकला/खोकला तरी नापसंतीच्या तीव्र नजरांचा त्याला सामना करावा लागतो... पण विरार कल्स मधे जागा करून घेण्यासाठी ही छान आयडीया आहे नाही? Wink

छान लिहीलेय...

Searching for guaranteed search engine optimization services at affordable rates? Your search ends here!!! Find your website on the top of popular search engines with our seo services...

भाऊ, एक IDEA
मास्कला झिप बसवली तर........
म्हणजे थुंकताना झिप काढून थुंकावे.
कशी वाटली आयडीया!

चाफा, एकदम सह्ही!!!!!
ड्रीमगर्ल Happy

मजा आली. हे लिखाण विनोदी लेखनात ही फिट्ट बसलं असतं की!! केव्ह्ढ मोठ्ठ समाज कार्य केलसं. स्वाईन फ्ल्यू च्या बागुलबुवाला हसता हसता पळवून लावलसं.. Lol

धन्यवाद मित्रमंडळी ! मी इकडे त्या स्वाईन फ्ल्यु पासुन खुप लांब आहे त्यामुळे असलं काहीबाही सुचतं, पण स्वाईन फ्ल्यु चे भुत पाठीवर घेउन हसत खेळत रोजचे जिवन जगणार्‍या समस्त मंडळींना माझा सलाम !

चाफा मस्त लिहिलयस रे :स्मित:, आवडल,
स्वाईन फ्लु कमी झाला नाहीये अजुन, पण लोक आता सरावलेत ह्या गोष्टीला पण
त्यामुळे भीती कमी झाल्यासारखी वाटतेय खरी आणि तुझ्या लेखामुळेही Happy
पण लहान्मुलांच वाईट वाटत, मास्क बांधुन शाळेत जा,खेळायला जा, कीव येते खरच , काय कय प्रसंगाला तोंड द्याव लागत बिचार्यांना, आपल बालपण किती निर्धोक होत नाही ?

Pages