चांदणचुरा

Submitted by माउ on 14 August, 2015 - 12:16

चांदणचुरा हा शब्द बरेच दिवस मनात घर करून होता..त्यासाठीच केलेला हा प्रयत्न!

दिवस सरतो सोनसळी, रंगांची अवचित दाटी
केशर ओली सांज भेटते कालिंदीच्या काठी

बहरत जाते आसावरी, दरवळती फूलथवे
निळासावळ्या रात्रीला चांदरुपेरी स्पर्श नवे

स्तब्ध शांत पाण्यावरती चंद्रकोर ती हिंदकळे
चांदफुलांनां वेलींना अनंतरांची जोड मिळे

सावळ्या कुंतली धरतीच्या जाईचा पडदा शुभ्र दिसे
प्रेमविरहीणी नवथर कोणी मुखचंद्रमा झाकितसे

चांदणे पिऊन वार्‍याला रातीची मग नशा चढे
स्वप्नांच्या दारी अलगद तेव्हा तृप्तीची चाहूल पडे

उमजत जाते..समजत जाते..रात्र भासते गंधितशी
बासुरीचे होते मन अन सावळ्याची साद जशी

गाभार्यातून जाग येते भूपाच्या पहिल्या स्वरा
धुके पसरते पहाटेवरी उधळून चांदणचुरा!!

- रसिका

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर शब्दकळा !!! आवडली..

ग्रुप सभासदाकरता का ठेवलिये ? सार्वजनिक करा म्हणजे इतर लोकही वाचतील Happy

सुंदर कविता. आवडली.

पहिल्या द्विपदीत सायंकाळची वेळ आणि सोनसळी हे शब्द एकत्र वापरले गेले आहेत. ते बरोबर आहे का ?

सोनसळी किरणे म्हणजे सकाळच्या वेळी सूर्य वर येत असतांना पाण्यावरून परावर्तित होणारी या अर्थाने हा शब्द वापरतात हे ठाऊक आहे. संध्याकाळच्या वेळेसाठी हा शब्द योग्य आहे किंवा कसे याबद्दल कल्पना नाही (शंका आहे).

सुरेख कविता
छान रंगत गेली आहे

सोनसळी म्हणजे सोन्याचा वर्ख ल्यालेली ( वस्त्राचा पोत/ छटा या अर्थाने मूळ शब्द आहे बहुधा)
त्यामुळे संध्याकाळीसाठीसुद्धा वापरणे चूक नसावे.

>>>गाभार्यातून जाग येते भूपाच्या पहिल्या स्वरा
धुके पसरते पहाटेवरी उधळून चांदणचुरा!!<<<वाह्...छान!