शोषीत समाजातील आरक्षित वर्गाची वाटचाल, समाजापुढील आव्हाने आणि वास्तव

Submitted by खडी साखर on 8 August, 2015 - 12:08

प्रस्तावना : आरक्षित वर्गाच्या राजकारणाबद्दल बोलायचं तर आरक्षित वर्गाबद्दल बोलणं हे टाळता येण्यासारखं नाही. आरक्षित वर्ग हा असा वर्ग आहे की ज्याबद्दल उघड काही बोललं जात नाही पण सर्वात जास्त त्याविषयी खाजगीत बोललं जातं. त्याच चुकीचं किंवा बरोबर किती हे तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत त्यावर शांतपणे चर्चा होणार नाही.

प्रशासनाला हा विषय संवेदनशील वाटू शकतो, त्यामुळे बाफ ग्रुपात गेल्यास चर्चेचा हेतू साध्य होणार नाही. किमान हेडर मधे लिहीलेल्या लेखास फक्त आणि फक्त लेखक जबाबदार आहे असं एव्हढ्यासाठीच जाहीर करावंसं वाटतं. जर खरोखर चर्चा व्हावी असं वाटत असेल तर उकसाऊ प्रतिसाद टाळण्यात यावेत. उकसाऊ प्रतिसाद आलेच तर सरळ दुर्लक्ष केलं जावं.

पहिलीतल्या मुलांना शिकवावं तसं प्रत्येक चुकीचे मुद्दे खोडून काढण्याची आवश्यकता नाही. सूज्ञास सांगणे न लगे या उक्तीवर विश्वास ठेवून आपण पुढे जाऊ शकतो.

थेट मुद्यालाच हात घालू.

आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नव्हे. तर ते प्रतिनिधित्व आहे. त्याला तात्त्विक भूमिका आहे. मुस्लिमांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात भूप्रदेश आणि रिझर्व्ह बँकेतील गंगाजळीमधून लोकसंख्ये च्या प्रमाणात वाटा देण्यात आला जो ७५ कोटी भरला. त्याआधी टिळकांनी १९१६ साली केलेल्या लखनौ कराराप्रमाणे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. तसंच त्यांच्या कम्युनल अ‍ॅवॉर्ड ला गांधीजींनी पाठिंबा दिला होता. शीख, जैन, मुस्लीम या सर्वांना कम्युनल अ‍ॅवॉर्ड मिळत होतं, पण अस्पृश्यांना कम्युनल अ‍ॅवॉर्डच्या विरोधात गांधीजी होते . हा गांधी आंबेडकर वादाचा पाया आहे. डॉ. बाबासाहेबांनी अस्पृश्यांना नाकारले गेलेले शिक्षण, संपत्ती, रोजगार, व्यवसाय इत्यादी मूलभूत बाबींचे नाकारले गेलेले हक्क, आणि इतरांना ब्रिटीशांना दिलेले हक्क यांची तुलना करून त्यांना अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यास भाग पाडले. गांधीजींनी येरवड्यात बेमुदत उपोषण सुरू केले. हे उपोषण अस्पृश्यांच्या हक्कांविरुद्ध आहे असं कुठेही म्हटलं नाही. पण बाबासाहेबांना अनेकांच्या विनंत्या येऊ लागल्या. जस जसं वेळ जाऊ लागला तस तसं बाबासाहेबांविरोधात उग्र निदर्शनं होऊ लागली. या काळात प्रचंड दबाव बाबासाहेबांवर आला होता. हिंदुस्थान स्वतंत्र झाला तर हिंदू आणि मुस्लीम सत्तेतला वाटा मिळवतील आणि अस्पृश्यांना त्यांचा वाटा कधीच मिळणार नाही ही बाबासाहेबांची रास्त भीती होती.मस्पृश्यांच्या हक्कांसाठी तटस्थ तिसरा पक्ष स्वतंत्र हिंदुस्थानात नसणार होता आणि बहुसंख्य हिंदू समाज जो अस्पृश्यांच्या प्रश्नांविषयी उदासीन होता तो कधीही न्याय्य हक्क देणार नाही या भीतीला कुणाकडे उत्तर नव्हतं.

उपोषण जरी सत्याग्रह होता तरी त्यामुळे हिंदी जनतेत असंतोष वाढू लागला. याचा परिणाम म्हणून बाबासाहेबांना गांधीजींशी बोलणी करणे भाग पडले. गांधीजींचे प्राण वाचवले वगैरे गोष्टींना काहीही आधार नसून जर अस्पृश्य वस्त्यांवर हल्ले झाले तर ज्यांच्यासाठी हक्क मिळवायचे तेच राहीले नाहीत तर उपयोग काय असंही काही नेत्यांनी बाबासाहेबांना बोलून दाखवलं. हा मुद्दा आपल्या जागी ठीकच होता. त्यामुळे तत्त्वांना मुरड घालणं हा शहहापणा होता. पुढे पुणे करार झाला. या कराराप्रमाणे अस्पृश्यांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी तडजोड झाली जे कॉग्रेसवर बंधनकारक होतं. पण जेव्हां घटनासमितीवर निवडून जाण्याची वेळ आली तेव्हां कॉंग्रेसने निवडणुकीतली आपली मास्टरी सिद्ध करताना सर्वांना बाबासाहेबांच्या विरोधात एकाच उमेदवाराला मत देण्यास सांगितलं आणि बाबासाहेबांचा पराभव केला.

बाबासाहेबांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे जोगेंद्रनाथ मंडल हे सदस्य बंगालमधून निवडून आले होते. त्यांनी बाबासाहेबांसाठी राजीनामा देऊन रिक्त झालेल्या जागेवर बाबासाहेबांना निवडून आणले आणि बाबासाहेब घटनासमितीत पोहोचले. पटेलजी म्हणाले की बाबासाहेबांना घटनासमितीचे दर्वाजेच काय पण खिडक्याही बंद आहेत. बाबासाहेब ज्या मतदारसंघातून निवडून आले त्या मतदारसंघात ४८% मुस्लीम आणि ५२% हिंदू होते. फाळणीमधे काँग्रेसने हा मतदारसंघ पाकिस्तानला देऊन टाकला , त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या बाबासाहेब पाकिस्तानच्या घटनासमितीचे सदस्य झाले. त्यामुळे त्यांनी उपहासाने पाकिस्तानची घटना मी दोन दिवसात लिहून देतो अशी घोषणा केली. काँग्रेसच्या या खेळीविरुद्ध बाबासाहेबांनी इंग्लंडच्या संसदेतील खासदारांना सदसद्विवेकबुद्धीचे आवाहन केले. त्याचा परिणाम होऊन ब्रिटीश सरकारने बाबासाहेबांना घटनासमितीत घेण्यासाठी आग्रह धरला. याचा परिणाम म्हणून मूबईतून बॅ जयकरांना राजीनामा द्यायला लावून त्यांच्या जागी बाबासाहेबांना निवडून आणले.

घटने मधे पुणे कराराप्रमाणे आरक्षणाचे तत्त्व लागू झाले. पाकिस्तानला वेगळा देश देणं आणि अस्पृश्यांना आहे त्याच राष्ट्रात अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी प्रतिनिधित्व देणं हे थोडंसं एकसारखं पण ब-याच अर्थी भिन्न आहे. त्यावर वेगळी चर्चा होऊ शकेल. आरक्षणा बद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी हा इतिहास थोडक्यात इथे आपण पाहिला. इथे हा भाग दुय्यम, कमी महत्वाचा आहे. पण पार्श्वभूमी म्हणून तो टाळता आला नाही हे ही खरं .(तपशीलाबाबत मतांतरं असू शकतात पण पुढे जी चर्चा करणार आहोत तो महत्वाचा भाग आहे हे लक्षात येईलच).

पुढे आरक्षणाचा फायदा समाजाच्या उत्थानासाठी झाला का ? आरक्षित वर्गाने आपले योगदान दिले का ? त्यांचं नेमकं काय चाललेलं आहे ? जर आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर समाजासाठी त्यांचं उत्तरदायित्व नाही का ? महत्वाच्या पदांवर काम करताना ज्या कारणासाठी आरक्षित अधिकारी सरकारात आहेत त्याचे ते पालन करतात का ? आपल्या समाजाच्या हिताविरुद्ध घेतल्या गेलेल्या निर्णयांना ते विरोध करतात का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे कदाचित नकारार्थी येऊ शकतात.

बाबासाहेब एकदा म्हणाले होते की एक आंबेडकर शिकला त्याने एव्हढं काम आजवर केलं, जर असे शंभर एक आंबेडकर समाजाला मिळाले तर मी सुखाने डोळे मिटू शकेन. हा आशावाद पूर्ण झालाय का ?

ज्या वर्गाने आरक्षण घेतले आहे त्यांच्याबद्दल समाजाचे मत काय आहे ?
शरणकुमार लिंबाळे यांनी अक्करमाशी नावाची एक कथा लिहीली होती. रामनाथ चव्हाण यांनी बामणवाडा नावाचं नाटक लिहीलं होतं. त्यात वास्तव मांडण्याचा प्रयत्न प्रांमाणिकपणे केला होता. शिकून मोठे साहीत्यिक, अधिकारी, वकील, डॉक्टर्स, इंजिनियर्स झालेले लोक समाजासाठी काय करतात याचं उत्तर चटकन देता येत नाही. पुरस्कार, प्रसिद्धी याची सवय झालेले अनेक जण आहेत. ते स्वतः मोठे होत गेले पण समाज अंधाराच्या गर्तेत जात राहीला.

गाडगेबाबांसारख्यांनी वस्त्यावस्त्यात जाऊन लोकांमधे प्रबोधन केलं. महात्मा फुलेंनी क्रांतीकारी काम उभारलं. बाबासाहेबांनी न भूतो न भविष्यती काम केल. पण ज्या वर्गाला आधी पोटोबा मग विठोबा न्यायाने पोटाची सोय केली त्यांच्याकडून विठोबा झाला का या प्रश्नावर संबंधित समाजात चर्चा व्हायला हवी. देशभरात दबक्या आवाजात चर्चा चालूच असते हे मागेच म्हटलेले आहे.

आरक्षणाविरुद्ध देखील सुनियोजित प्रचार चालू आहे. प्रत्येकाचे मुद्दे असतातच. पण या अंडरग्राउंड प्रचाआराने जनमत किती विरोधात आहे याची कल्पना आरक्षित वर्गाच्या तथाकथित उच्चभ्रू वर्गाला नाही. या वर्गात काही लोक नक्कीच असे आहेत की ज्यांना देशातील सर्व सूक्ष्म प्रवाह, मतमतांतरं आणि पुढील दिशा यांचं भान आहे. पण राजकीय आघाडीवर असलेल्या दिशाहीनतेचं कारण देऊन ते आला दिवस ढकलताना दिसतात.

काहींना काम करायचे आहे पण दिशाच सापडत नाही आणि कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करूयात म्हटले की साठ गटांचे साठ विचार समोर येतात. किमान या लोकांना काहीतरी करायचं तरी आहे. पण ज्यांना रोल मॉडेल समजायचं ते प्रगत झालेले लोक, यांच्याबद्दल या वर्गातून फारसं चांगल बोललं जात नाही.

या सगळ्याला छेद देण्याचा प्रयत्न कांशीराम यांनी केला आणि महाराष्ट्रापासून दूर जाऊन यशस्वी होऊन दाखवलं. त्यासाठी लागणारी लवचिकता, तडजोडी त्यांनी करून दाखवल्या.नेमक्या याच गोष्टींचं नकारार्थी भांडवल करून महाराष्ट्रात कांशीराम यांना खलनायक ठरवण्यात आले. कांशीराम यांच्यानंतर तर त्यांचा प्रयोगही संपुष्टात आला.

या गोंधळात आरक्षणाचा लाभार्थी वर्ग काय करत असतो हे कुणीच सांगू शकत नाही. त्यापैकी मोठा वर्ग असा आहे की ज्याला वाटत राहतं की काहीतरी होऊन समाजाची प्रगती झाली पाहीजे. पण माझ्या अंगाला तोशीस नको. खैरलांजी सारख्या आंदोलनात आंतरजालावर तप्त पोस्टी टाकण्यात हा समाज आघाडीवर असतो. पण मोर्च्यात सामील व्हायला सर्वात मागे.

हा वर्ग समाजाचा हितचिंतक नक्कीच आहे, पण आपली सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रगती ही आपल्या हुषारीच्या जोरावर झालेली आहे आणि इतर सर्वांप्रमाणेच आपल्यालाही प्रगत समाजाप्रमाणे जगता यावे, आपल्यालाही मान्यता मिळावी अशी त्याची धारणा आहे. उच्चभ्रू सोसायटीत राहतांना आम्ही तुमच्यापेक्षा कांकणभर पुढेच असं दाखवताना फिल्मी पार्ट्यांप्रंमाणे महागड्या पार्ट्या, महागड्या कार्स याचं दिपवून टाकणारं प्रदर्शन करण्यास तो मागे पुढे पाहत नाही . आम्ही जात सोडली आहे हे ही असतंच. पण लोकांमधे याचा सकारात्मक संदेश जातो का याचं उत्तर देखील बहुतेक वेळा नाही असं येतं.

याउलट आपली परिस्थिती कबूल करून , शिवराळ भाषेत का होईन पण अचूक मुद्यांवर चाबूक ओढणा-या टिपीकल कार्यकर्त्याला इतर उच्च वर्गाकडून दाद मिळते. फेसबुक वर एक मास्तर सध्या खूप चर्चेत आहेत. स्पष्टवक्ता म्हणून आपलं मत चोख मांडण्याच्या त्यांच्या शैलीला भरभरून दाद मिळते. त्याचबरोबर चुका दाखवल्या आणि त्या पटल्या तर प्रांजळपणे कबूल करण्याची तयारी यामुळे इतरांच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल घडला आहे.

एकांगी विचारातून साधक बाधक विचाराकडे नवे तरूण वाटचाल करत आहेत. आरक्षण असावे का ? किती काळ आरक्षण असावे अशा चर्चा या तरुणांमधे पहायला मिळतात. मागच्या पिढीला त्यांनी विचारलेले प्रश्न निरुत्तर करत आहेत.

एका निवृत्त आएएस अधिका-याने त्याच्यावर आलेल्या संकटात या तरुणांची मदत मागितली तेव्हां त्यांनी समाजासाठी काय केलं याचा हिशेब लिहून द्या अशी आडमुठी भूमिका घेतली, त्यावर त्यांना शिकवायला गेलेल्यांनाही त्यांनी फटकारलं. मुलांचा मुद्दा इतका चोख होता की त्या अधिका-याला खजील होऊन अक्षरशः पाय धरण्याचीच वेळ आली. मदत केली गेली तो भाग वेगळा, पण जेव्हां संकट येतं तेव्हाच समाजाची आठवण होणा-या आरक्षित वर्गाला हे मिळालेलं चोख उत्तर आहे का हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

ज्या समाजाचे ११९ खासदार निवडून येतात त्यांना आजही आपले प्रतिनिधी नाहीत अशी खंत वाटते हे गंभीर आहे. आरक्षण बंद केलं तर हे ११९ बिनकामाचे लोक घरी बसतील असं ही मुलं म्हणतात. सरकारी नोक-यांची संख्या आता एक कोटीच्या घरात आहे. त्यात १६% आरक्षण, ज्यातलं ६ ते ८ % भरलं जातं. म्हणजे सहा सात लाख लोक लाभार्थी आहेत, पण तीस कोटी जनता हवालदील आहे. आरक्षणाचं राजकारण करणारे सुद्धा ही परिस्थिती ओळखून आहेत. उद्या आरक्षणाच्या मुद्यावर सरकार आलं तरी विशेष काय होणार आहे ? कारण परंपरागत व्यवसाय, जमीन जुमला हा आजही बहुसंख्य लोकांकडे नाही. रोजगार खाजगी क्षेत्रातच आहे. त्यामुळं चांगलं सांगणारा प्रत्येकजण आपल्या विरोधातच आहे हा माईण्डसेट बदलायला पुन्हा अलौकिक व्यक्तीमत्व जन्माला यावं लागेल. दुर्दैवाने एकापाठोपाठ एक अशी रत्नं या वर्गासाठी जन्माला येऊन गेली, असे चमत्कार पुन्हा घडत नसतात. आपलं भविष्य आपणच घडवावं लागणार आहे. त्यात मोठा भाऊ म्हणून आरक्षणाचा फायदा घेतलेल्यांचा रोल महत्वाचा आहे.

त्यामुळं पुढे काय हा प्रश्न आहेच. तसंच धडा शिकवण्यासाठी आरक्षण नको ही आत्महत्या ठरेल असं वयस्कर लोकांचं म्हणणं देखील चुकीचं कसं म्हणता येईल ?

( लखनौ कराराचं साल चुकलं होतं. सचिन पगारे यांनी चूक निदर्शनास आणून दिल्याने योग्य तो बदल करता आला याबद्दल त्यांचे आभार).

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाफच स्वरूप सवाल जवाब असं झालेलं आहे. हीरा तुम्ही ठोस अ‍ॅक्शन प्लान लिहा. वाचायला आवडेल. समाजासाठी ठोस अ‍ॅक्शन प्लान हे मान्य करत आहात ही चांगली गोष्ट आहे. त्यासाठी आभार. पण मग काही करता येऊ शकत नाही हा विरोधाभास आहे असं नाही का वाटत ? ठोस अ‍ॅक्शन प्लान कोण बनवू शकतं ? या मुद्यांसहीत इतरही सर्व मुद्यांवर सगळं वर बोलून झालेलं आहे. अगदी जबाबदारीसहीत. त्यात अस्पष्ट असं काहीही नाही. उलट रिपीटेशन झालेलं आहे. आता पुन्हा कशाला ?

तेव्हां फिरून फिरून पुन्हा तिथेच येण्यापेक्षा सदस्यांनी आपापली मतं मांडावीत हे बरं राहील.

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्शण ह्या पातळीवरच हा वर्ग मागे पडतो. त्यामूळे उच्च शिक्षणाच्या संधी उप्लब्ध असुनही वाया जातात.

बर्याच मागासवर्गीय मुलांना शाळा पातळीवर विशेष मार्ग्दर्श्न मिळाले तर त्यांचे आणि पर्यायाने देशाचे भले होइल.

चांगला लेख. मुद्देही अचूक व बर्‍याच मुद्यांवर सहमती.
(लेखात तसा कसलाही उल्लेख नाही तरीही फक्त अशी आशा करतो की नेहेमीप्रमाणे गाडे "ब्राह्मणद्वेष्टेपणावर घसरणार नाही, किंबहुना, "ब्राह्मणद्वेष्टेपणा" हीच अफुच्या गुंगीसारखी भुल नेते सातत्याने देताहेत हे जेव्हा कळेल तेव्हा तो सुदिन असेल. सातत्यपूर्ण ब्राह्मणद्वेष्टेपणा करुन कोणतीही "प्रगती" साधणार नाहीये हे निश्चित)

ज्यांना लाभ मिळालेत, त्यांनी समाजातील इतरांना हाताला धरुन वर काढावे ही अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही हे समाजांचे दुर्दैव आहे.
आजही मटा/लोकसत्ता /सकाळ किंवा तत्सम वृत्तपत्रातुन, या समाजातुन उत्कृष्ट मार्कांनी पास झालेल्या १०/१२ च्या विद्यार्थ्यांकरता सार्वजनिक सहाय्याचे आवाहन केले जाते, तेव्हा दोन प्रश्न पडतात की या समाजातले आर्थिक दृष्ट्या सुस्थिर झालेले लोक काय करताहेत, व असे गरिबीतून/झोपडपट्टीत राहुनही शिक्षण घेत असलेले विद्यार्थ्यांचे वर्णन पेपरातुन करुन "सार्वजनिक" मदत मागवणे यातुन काय साध्य होणारे? या समाजाला सहानुभूतीची सवय लावणे? की मिडीयाचा टीआरपि वाढविणे? की कुणाला तरी कुठेतरी काहीतरी स्वतःच्या अंगाला फारशी तोशीस न लावता फुटकळ केल्याचे समाधान मिळवुन देणे?
अर्थात समाजातच सुधारणेला खूप वाव आहे, बर्‍याच चांगल्या गोष्टींचे अनुकरण करण्यासही वाव आहे.
न की निव्वळ मोर्चात सहभागी होऊन घोषणाबाजी करुन, तोडफोड/जाळपोळ करीत, विशिष्ट समाजाला टारगेट करित परिस्थितीत बदल होणारे.

>>>> महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने आपली प्रगती केली याचं उदाहरण सर्वांनी समोर ठेवायला हवं. १९४८ साली गांधीहत्येनंतर गाव सोडून पुणे , मुंबई आदी शहरात स्थायिक झालेल्या या समाजाने आपल्या समाजातील गुणी मुलांना माधुकरी पद्धतीने शिकवले. या मुलांनीही त्याचे ऋण फेडले. अर्थात समाज प्रगत असल्याने नवे शिक्षण आणि त्याचे फायदे याबद्दलचे एक्स्पोजर होतेच. पण पुढे एकीने राहून संस्था काढणे, त्या वाढवणे, त्यात एका पैचा भ्रष्टाचार न होणे आणि अशा प्रामाणिकपणातून फक्त स्वतःपुरती प्रगती न करता संपूर्ण समाजाची आर्थिक, सांस्कृतिक, वैचारीक आणि राजकीय प्रगती घडवून आणली गेली. राजकीय बाबतीत महाराष्ट्रात तरी अधोगतीच झाली. पण त्याने काही अडलं नाही. <<<<<
हे तुम्हीच लिहीलेत व ग्यानबाची मेख इथेच आहे राजे. मी लिहायला जाणार होतो, पण मागिल पान वाचले पूर्ण तर हे देखिल सापडले.
यातिल मताशी सहमत.
पण याच बरोबर हे देखिल लक्षात घ्या की माधुकरी मागुन शिक्षण ही पद्धती निव्वळ १९४८ नंतर निर्माण नाही झाली, तर पूर्वापार होती. तसेच ती निव्वळ गुणी मुलांना अशी नव्हती, तर जो शिकू पहातो त्या प्रत्येकाला मार्कांच्या टक्केवारीकडे न बघता होती.
जे माधुकरि घालणारे होते ते देखिल फार श्रीमंत वगैरे नव्हते. माझ्या मागिल पिढीतील यच्चयावत नातेवाईक व अन्य मंडळी ही माधुकरि मागुनच शिकल्याची उदाहरणे आहेत व हे नातेवाईक आत्यंतिक दरिद्री अवस्थेतील होते, फक्त त्याचे वर्णन करणे ब्राह्मण समाजात भुषणावह मानले जात नाही म्हणून शामची आई हे पुस्तक वगळता अन्यत्र कुठेही त्याचि वर्णने नाहीत. (निदान मला दिसली नाहीत).

सुधारणांना विरोध: अव्वल इंग्रजी अमदानित नविन शिक्ष णाची वाट चोखाळताना अन अर्थात "वेदाध्ययन/भाषा /धार्मिक विषयाचे" शिक्षणा व्यतिरिक्तचे शिक्षण घेताना एकोणिसाव्या व विसाव्या शतकात अक्षरशं दर पिढीदरपिढि गणिक मूळ संस्कार/नितीनियम व नविन रचना याबाबत घमासान कलह झाले आहेत. कुटुंबात झाले आहेत तसेच समाजातुनही विरोध झाले आहेत. त्या काळात कोणत्याही क्षेत्रात उतरणार्‍या ब्राह्मणांस पराकोटीचा कौटुंबिक तसेच सामाजिक विरोध सहन करायला लागला आहे. यास जसे डॉ.आनंदीबाई जोशी अपवाद नव्हती, तसेच तिच्यानंतर पन्नासएक वर्षांनी कुटुंबनियोजनाचे महत्व समाजात पटवु पहाणारे रघुनाथ धोंडो कर्वे हे देखिल अपवाद नव्हते. अन असा विरोध असुनही, याच समाजातील स्त्रियाही अधिक लौकर शिकुन बाहेर पडू शकल्या. स्त्रीयांचे उदाहरणच अशाकरता की त्यापूर्वी ब्राह्मण समाजातही स्त्रीशिक्षण नव्हते.
(मागेही उदाहरण दिले होते, आत्ता परत देतो की १९१० च्या सुमारास जन्मलेली माझी आजी कोकणातल्या खेडेगावात मराठि दुसरी शिकली होती तर १९३५ च्या सुमारास जन्मलेली आई मराठि सातवी शिकलेली होती ते केवळ " ब्राह्मणी वर्चस्व वगैरे मुळे नव्हे तर त्यांना आच होती, व शिकविणारेही भेटत होते).
हाच प्रकार व्यवसाय शिक्षणाचाही, कारण इंग्रजांचे पूर्वी राजेशाहीत, ब्राह्मणांनी विद्यार्जना व धार्मिक पुजापाठाशिवाय दुसरा व्यवसाय करणे अपेक्षित नसायचे. अन तरीही अनेक ब्राह्मण अक्षरषः उमेदवारी करीत कामे शिकले, उद्योजकही बनले ते कामाप्रतीच्या निष्ठेमुळे. ते जर निव्वळ पूर्वज अन त्यांचे नियम यांचेबाबत मोर्चे/संप/हडताळ्/मोडतोड व जळखाऊ भाषणे करीत राहिले असते तर त्यांची प्रगती शून्य झाली असती.

राज्यकर्त्यांचा सातत्यपूर्ण विरोध: हिंदुस्थानात मोंगलाची/मुसलमानी राजवट असुनही जिथे तिथे असणारे हिंदू सरदार दरकदार संस्थाने यांचे आश्रयाने ब्राह्मण टीकून होते पण इंग्रजांचे काळात राजेशाही संपुष्टात आल्यानंतर ब्राह्मणांचा उपजिविकेचा आधार जवळपास संपुष्टात आलेला होता व मोजके अपवाद वगळता ब्राह्मणातील बहुसंख्य लोकसंख्या अठराविश्वे दारिद्र्य भोगत होती हे ऐतिहासिक सत्य.
त्यातुन इंग्रजांविरुद्धचि बंडे, चळवळी, लोक उभे करणे यामुळे इंग्रजांच्या नजरेतन ब्राह्मण त्यांच्या सत्तेला "धोकादायक" असल्याने त्यांचा रोष होताच, (जो पुढे कॉन्ग्रेसी राजवटीनेही जसाच्च्या तस्सा जोपासला).
पण इथेच ब्राह्मणांचे वेगळेपण उठून दिसते ते म्हणजे, एकीकडे काही लोक चळवळी/क्रांतीकार्ये करीत असतानाच दुसरी फळी इंग्रजांची इंग्रजी विद्याच शिकुन बदल घडवुन आणण्यात पुढे होती. याच सूप्त पण सुनिश्चित बदलांचे परिणाम स्वरुप माझी आजी वा आई यांचे शिक्षण.
अन तरीही, आजही ब्राह्मण समाज हे मानित नाही की निव्वळ दहावीबारावी पर्यंतचे शिक्षण पुरेसे आहे.... त्यांच्यातील ज्यांचा शैक्षणीक "वकुबच" नाही,ते प्राप्त दिवस दुसर्‍या कुणावरही दोषारोप न करता ढकलतात, व जे हुषार आहेत ते पुढे जातात. जे पुढे गेलेत, ते मागच्या "हुषार - वकुबवाल्या"ना उचलुन हात देतात.
माझ्या वडीलांनी ठाण्याच्या ब्राह्मण सहाय्यक संघा कडून कर्ज घेऊन ग्रॅज्युएशन पूर्ण केले व पै अन पै परत फेडली, वर काही एक रकमेची देणगीही दिली. हे एक माझ्या वडीलांचे कौतुक नाही, तर शिक्षणाकरता समाजाकडून कर्ज काढून नंतर ते परत न फेडणारी अशी घटना अक्षरष अपवादात्मक असेल, निदान माझ्यातरी ऐकण्यात नाही, व अशा प्रकारे सहाय्य करणार्‍या संस्थांमधे "कर्ज बुडित खाती जमा' अशा रकमा अत्यल्प आढळतील.
या गुणांचे समजुन उमजुन अनुकरण करण्यास तर कोणी कुणाला बंदी केलेली नाही ना?

माझी एक मैत्रिन आहे.आरक्षणवाली ब्राम्हणांचा सल्ला घेतल्या शिवाय काही करत नाही.

उदा; मुलांना कुठे प्रवेश घ्यायचा?बाहेर देशात पाठवायचे की नाही? मराठी की इंग्लिश? वगैरे...आणि ते जो सल्ला देतिल डोळे झाकुन बिल्कुल त्याच्या उलटे करते. असे का? मला ही माहित नाही.

>>>>> उदा; मुलांना कुठे प्रवेश घ्यायचा?बाहेर देशात पाठवायचे की नाही? मराठी की इंग्लिश? वगैरे...आणि ते जो सल्ला देतिल डोळे झाकुन बिल्कुल त्याच्या उलटे करते. असे का? मला ही माहित नाही. <<<<
सोप्प आहे, पगारेंची "चाणाक्ष लोकांची" मात्रा तिच्यावर भलतीच जास्त पडली आहे... Rofl

आजही मटा/लोकसत्ता /सकाळ किंवा तत्सम वृत्तपत्रातुन, या समाजातुन उत्कृष्ट मार्कांनी पास झालेल्या १०/१२ च्या विद्यार्थ्यांकरता सार्वजनिक सहाय्याचे आवाहन केले जाते, तेव्हा दोन प्रश्न पडतात की या समाजातले आर्थिक दृष्ट्या सुस्थिर झालेले लोक काय करताहेत, >>> चांगला प्रश्न आहे लिंबू भौ. तुम च्या पोस्ट्समधून सहमत नसलेला भाग वगळूनही सकारात्मक असं घेण्यासारखं बरंच आहे.

विशेषतः माधुकरी म्हणजे फक्त जेवायला घालणे एव्हढाच अर्थ न घेता ती एक मदत करणारी कायमस्वरुपी संस्था बनवली गेली तर अशा संस्थेचं पालकत्व आरक्षण घेऊन पुढे आलेला समाज का नाही करू शकणार ? बाबासाहेबांनी या समाजाकडून अपेक्षा व्यक्त करताना सांगितलं होतं की आरक्षणाचा फायदा घेतलेल्यांनी आपल्या उत्पन्नाच्या वीस टक्के रक्कम समाजासाठी खर्च करावी. पण आपल्या संपूर्ण आयुष्यात एक पैसाही खर्च न करणारे महाभाग आहेत. (आपल्या जातीच्या नावावर असलेल्या जागेवर शिक्षण घेताना एका विद्यार्थ्याची सीट आपण अडवली आहे ही जाणीव असणं आवश्यक आहे. नाहीतर कितीही प्रगती झाली तरी मदतीचा हात देण्याच्या स्थितीत आहोत कि नाही हे कसं काय कळणार ? )

रिपब्लीकन पक्षाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी टाळण्यात अर्थ नाही. सध्या रिपब्लीकन पक्षातअसे लोक आहेत जे कमी शिकलेले आहेत. क्रिमी लेयरने सर्व संधी घेतल्यानंतर त्यांनी समाजाचे कुठलेही नेतृत्व न केल्याने उर्वरीत समाजातून ज्यांना काही कामधंदा नाही ते लोक राजकारण करत असतात. त्यांनी कसं राजकारण करावं हे सांगण्यासाठी शिकले सवरलेले लोक हवे असतात. पण त्यांचं समाजाशी काही नातंच उरलेलं नाही. त्यांना कुणी ओळखत नाही तर त्यांच कोण ऐकणार ?

समाजात सतत चर्चा घडवून आणणारं एखादं विचारपीठ, प्रतिष्ठान, संस्था उभी करणे हे अवघड काम आहे का ? टॉप क्रीमला अशा प्रकारे आपण काही देणं लागतो, आपण काही करू शकतो, करायला पाहीजे याची जाणीवच नाही. खूप वेळ द्यावा लागतो असं काही नाही. आठवड्यातले दोन दिवस, काही तास सुद्धा पुरेसे असतात. लक्झुरीयस जीवनशैलीतून अगदी अल्प वेळ देण्याने काही फरक पडत नाही. मग आपण आपले आपल्या कामाला मोकळे.

जरी या लोकांनी आपल्या जबाबदा-या पार पाडल्या नाहीत तरी ज्यांना आरक्षण व्यवस्थेतून काही मिळालेलं नाही असे लोक आपल्या जबाबदा-या पार पाडत असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही इतकंच. चळवळीचं काम पोटाला चिमटा घेऊन जगणारा , हातावर पोट असणारा कष्टकरी वर्गच पुढे नेत असतो.

साता-यात एका शिक्षकाने आपल्या ग्रॅच्युइटी, फंड आणि पेन्शनमधून गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह बांधले आहे. त्यांचे नावगाव आता लक्षात नाही. खडकी रेंजहील्स इथे एका कांबळे नावाच्या गृहस्थाने एक संस्था उभी केली आहे. गावातून येणा-या गरीब मुलांपैकी संस्थेला शक्य तितक्या मुलांचा खर्च ती करते. त्यासाठी देणग्या स्विकारल्या जातात.

येरवड्यात आंबेडकर कॉलेजमधे आमची एक संस्था होती, जी आता जवळच्याच एका घरात हलवण्यात आलेली आहे. हे घर आम्हाला मालकाने फुकट वापरायला दिले आहे. इथे करीयर गाईडन्स, एमपीएससी, युपपीएससी संबंधित वर्ग च्गालवले जातात. अडचणी आहेत. सुरुवात अशा उपक्रमांपासून केली आहे. जसजसे लोक येत जातील तसतसं पुढे पाहता येईल. या लोकांना फोन करणे, आठवड्याचे नियोजन करणे यासाठी तासभर सुद्धा लागत नाही. मग अधून मधून फक्त चक्कर टाकणे सुद्धा खूप होते. त्यानंतर कॉबोर्ड बडवायला पुस्।कळ वेळ शिल्लक राहतो. आंबेडकर कॉलेजमधे माझी पत्नी मोफत संगणक वर्ग चालवत असे. त्यासाठी लागणा-या वर्गखोल्या माझ्या भावाने बांधून दिल्या. संगणकाचा खर्च मी स्वतः केला.

सध्या या संस्थेत माजी सनदी अधिकारी आपलं योगदान देत आहेत. करीयर गाईडन्ससाठी आपापल्या क्षेत्रात यशस्वी असलेल्या खाजगी / सरकारी क्षेत्रातल्या समाजातील लोकांना लेक्चर देण्यासाठी आम्ही आवाहन केलं होतं. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे अनुभव ऐकायला मिळावेत हा हेतू होता. पण वेळ नाही हे कारण ऐकायला मिळालं. काहींचा तुसडेपणा तर फार जाणवणारा होता. डीसकेंनी मात्र चटकन होकार दिला आणि आम्हालाच म्हणाले तुम्ही सांगा कधी येऊ ? डीएसके बिझी नसतील का ?

अर्थात ही झाली सेवाभावी कामं. समाजात जागृती आणण्यासाठी करण्यासारखी बरीच कामं आहेत. ही जागृती करू शकणारा जो वर्ग आहे त्याला जबाबदारी घेणं म्हणजे काय हे अद्याप समजलेलं नाही. ज्याने जागृती करायची त्याचीच जाग्रुती करण्याची वेळ आलेली आहे.

भविष्यात समाजाला स्वतःच्या पायावर उभे रहायचे आहे. त्यासाठी त्याला मानसिक दृष्ट्या तयार करणे, संधी मिळवून देणे अशी कितीतरी कामं लायक लोकांची वाट पाहताहेत.

आंतरजालावार येऊन वादविवाद करून कुणाला काही शष्प फरक पडणार नाही. परिस्थिती जैसे थे राहणार आहे. त्याऐवजी समविचारी लोकांना एकत्र आणता येतंय का हे पाहणं सुद्धा मोठं काम होऊ शकेल.

ब्राह्मण समाजाचं खरोखर कौतुक करावं तेव्हढं थोडं आहे. योग्य वेळी योग्य संधीची पारख करून प्रगती करून घेतली. बिहार, युपीतले ब्राह्मण लोक जेव्हां युपीएससीच्या मागे लागले तेव्हां महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज एमएनसी मधल्या संधी शोधत होता. खाजगी क्षेत्रात महत्वाच्या जागांवर लक्ष दिल्याने खाजगी क्षेत्रात मोठं नेटवर्क निर्माण झालं आहे. हे शक्तीस्थान ठरलं. पुढे आयटी उद्योगाचं महत्व लक्षात घेऊन परदेशी जाण्यावर भर दिला. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा देशातही ब्राह्मण समाजाच्या संस्था खूप आहेत. एकीतूनच प्रगती होते.

धन्यवाद सर्वांचे.

तुम्ही मांडलेले विचार पटले. आरक्षित समाजापुढले प्रश्न यावर एक नीट मुद्देसूद लेखमालिका लिहा जमल्यास.
शिकुन्-सवरून आपल्याच 'समाजाला' विसरणे, 'सामाजिक बांधिलकी' नसणे आणि कुठलीही किंमत चूकवून भौतिक प्रगती हे आरक्षित समाजापुढलेच नाही, तर पूर्णच समाजापुढले वास्तव आहे हो.

- आरक्षणामुळे शिक्षणातील संधी, सरकारी नोकरीतील संधी याने लोकांच्या जीवनमानावर काय फरक पडला?(अंदाजे) किती टक्के आरक्षित समाजाला उपयोग झाला ?
- आता जातीनिहाय आरक्षण ही सामाजिक गरज नसून, वार्षिक उत्पन्न हा निकष जास्त योग्य ठरेल का ? (अशी योजना भारतात प्रत्यक्षात राबवणे अवघड आहे हे मान्य करुनही)
- आरक्षित समाजातील स्त्रियांना समान संधी मिळते का? स्त्रियांचे आयुष्य थोडेतरी सुकर झाले असे म्हणता येईल का ?
- आर्क यांनी मांडलेला मुद्दा तुम्हाला पटतो का ? असे का होत असावे ? आऱक्षित समाजात घरोघरी अजूनही शैक्षणिक वातावरण नाही का ?

ब्राम्हण समाजात एकी? ऐकावे ते नवलच. Happy सर्वच समाज एकुणातच फार fragmented आहे. आणि त्याचाच उपयोग करुन आता ते जातीनिहाय एकी वगैरे विसरुन, समविचारी लोकांनी जात-पात-धर्म न पाहता, फक्त करावयाचे मानवतावादी, पर्यावरणवादी कार्य यासाठी एकजूट होणे, ही इतकी अशक्यप्राय गोष्ट आहे का?

रैना, इंटरेस्टिंग मुद्दे:

यातील दोन मुद्द्यांबद्दल
- आर्थिक बाबींवर आरक्षण आवश्यक आहे पण त्याव्यतिरिक्त जातीवरून आरक्षण अजूनही आवश्यक आहे. कारण खेड्यापाड्यात जातीमुळे समाजाबाहेर असलेल्या मुलामुलींना त्यामुळेच संधी मिळू शकते. केवळ आर्थिक निकषांवर असलेले आरक्षण पुरेसे नाही त्याकरता. शहरात त्यामानाने बराच फरक आहे - तेथे केवेळ आर्थिक कदाचित चालू शकेल.
- आरक्षण असलेल्या समाजांमधे "घरोघरी" शैक्षणिक वातावरण होणे कदाचित अशक्य असेल. कारण गरिबी, व्यवसायाकरता शालेय शिक्षणाची फारशी गरज नसणे यामुळे त्याला तेवढे महत्त्व सगळ्या घरी दिले जाणार नाही. पण आरक्षणामुळे ज्यांची शिक्षण घेण्याची कुवत आहे, व ज्यांना संधी मिळते - किमान त्या घरांमधे शैक्षणिक वातावरण निर्माण होईल. शिक्षणाची संधी सर्वांना तितकीच उपलब्ध हवी, पण सगळे शिकतील असे नक्कीच नाही.

ब्राह्मण समाजात एकी वगैरे नसण्याशी सहमत. उलट १०० लोकांची १०० मते असला प्रकार :). पण पूर्वी आपल्या समजातील लोकांना मदत करायची प्रवृत्ती जवळजवळ सर्वच समाजात होती, ते आता कालबाह्य व्हायला हवे. त्यामुळे "जातीनिहाय एकी वगैरे विसरून..." शी सहमत.

रैनाशी बहुतेक मुद्द्यांवर सहमत.

ब्राह्मण समाजात एकी? असं काहीही नाहीये. जेवढी टाळकी तेवढ्या दिशा असला प्रकार आहे. त्यात काही चुकीचेही वाटत नाही मला. असो..

आर्थिक निकषांवर याबरोबरच जातिच्या निकषांवर आरक्षणही गरजेचे आहे असे माझे मत. पण खरंच गरजू लोकांपर्यंत हे किती पोचते हा संशोधनाचा मुद्दा ठरावा.

खूप गुंतागुंतीचे मुद्दे डोक्यात येत आहेत अजून पण माझा पुरेसा अभ्यास नाही त्यामुळे मी वाचनमात्रच राहते सध्या.

एरवड्याच्या संस्थेसाठी पुण्याबाहेरच्या लोकांना मदत करायची असेल तर ती कश्या प्रकारे करता येईल?

निच

संपादन : तुम्ही पत्ता वाचला असल्यास त्याचे काम झाले आहे असं समजून तो संपादीत करत आहे. अद्याप नसेल वाचला तर मेल करीन.
वरच्या पोस्टमधे कुठेही मदतीचं आवाहन केलेलं नाही. कारण आम्ही सुमारे २५ जण सगेसोयरे मिळून हा खर्च उचलत असतो. पुढे गरज लागली तरी अनेक लोकांनी तयारी दर्शवलेली आहे. पण सध्या त्याची आवश्यकता वाटत नाही.

त्या पोस्टमधे इतर उदाहरणंही दिलेली आहेत ती यासाठी की करायचंच म्हटलं तर खूप मार्ग आहेत. एक नकारात्मक पोस्ट वाचनात आल्याने ही उदाहरणं दिलेली आहेत. याचा अर्थ असंच तुम्ही करा असा सुद्धा घेण्यात येऊ नये. काम सुरू केलं की अनेक मदतीचे हात येतात हे सांगण्याचा उद्देश होता . डीसकेंचं उदाहरण यासाठीच दिलं. पुण्यातले ते एक सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत. बांधकाम क्षेत्रातलं अग्रगण्य नाव आहे. १९ उद्योगसमूह आहेत. असा माणूस वेळ देऊ शकतो. त्याउलट एका मोठ्या अमेरीकन अमेरीकन कंपनीत अधिकाराच्या पदावर असणा-या एका समाजातील उच्चशिक्षित उच्चपदस्थ व्यक्तीने इथे येत जाऊ नका, फोन सुद्धा करत जाऊ नका माझ्या करीयरवर परिणाम होईल असा निरोप दिला.

हा लेख मला आलेल्या अनुभवातून आणि अल्पमतीप्रमाणे लिहीला आहे. धागाकर्त्याची मुलाखत असं स्वरूप त्याला येऊ नये असं वाटतं. प्रत्येकाने आपली जी काही मतं असतील ती व्यक्त केली तर बरं होईल. प्रश्न विचारण्याने मुलाखतीचं किंवा प्रश्नपत्रिकें स्वरूप येत चाललं आहे. लेख लिहीला म्हणजे या विषयातला सर्वज्ञ असा दावाही नाही. जिथे थोडीफार माहीती देता येईल ती देईनच की.

Rains

Magachya panavar akadewari dileli aahe. Nantar lihin Marathi madhe.

खडीसाखर, वरील पोस्टा उत्कृष्ट सकारात्मक आहे.
मला सहजच "रयत शिक्षण संस्थेची" आठवण झाली, कष्ट करुन शिक्षण अशी काही योजना होती, व कॉलेजच्या शेतात काम केले असता बर्‍याच सोई सुविधा व थोडे फार पैसेही मिळायचे. मला त्या योजनेचा भाग घ्यायची गरज पडली नाही, पण कॉलेज/एकंदरीतच संस्था अतिशय कोऑपरेटीव्ह व मुलांच्या गरजांचा वास्तव विचार करुन वागणारी होती. माझ्या आठवणीप्रमाणे, माझ्यावर मी सिन्सिअर/कलाकार वगैरे म्हणून कॉलेज प्रशासनाचा काय अनुग्रह झाला माहित नाही, पण, त्या वेळेस बुकबँक म्हणून असायची, वीस टक्के किमतीला पुस्तके घ्यायची, वापरायची व वर्षाअखेरअपरत करायची अशा योजनेत, ते वीस टक्के रक्कम भरायचीही शामत नसल्याने बिनापुस्तकच अभ्यास करायचो, तेव्हा कॉलेजने, ते वीस टक्केही माफ केले होते. नंतर शेवटची दोन वर्षे मात्र मी फक्त गाईड्स/२१ अपेक्षित वापरुन परीक्षा दिल्या. क्रमिक पुस्तकांचे तोंडही बघितले नाही. शक्यच नव्हते.
मुद्दा असा की, जातपात न पाळता ही मदत दिली जायचि, पण असाही अनुभव की अशी मदत घेणे "कमसरपणाचे" वाटणारे व म्हणुन न घेणारे अनेक ब्राह्मणेतरही पाहिले.

वर >>>>ब्राम्हण समाजात एकी? ऐकावे ते नवलच.<<<< व त्यावर प्रतिक्रिया आहेत. त्यावर फार सुस्पःष्ट भाष्य करणे या क्षणी शक्य नाही, तरी इतके सांगतो, की ब्राह्मण समाजातल्या, व खास करुन कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण समाजाच्या वरकरणी दिसणार्या चार दिशांना चार तोंडे व दुही मागेही असलेल्या समान शिस्त व सुत्राच्या एकीचे कोडे तत्कालिन इंग्रज सरकारलाही कायमच पडलेले होते. व तशा अर्थाचे प्रतिवृत्ताचे उल्लेख मी वाचलेले असले तरी आता इथे संदर्भासहित उद्धृत करू शकत नाही कारण निव्वळ आशय तितकाच लक्षात राहिलेला आहे.

पण हे समजणे फार अवघड नाही, व एकंदरीतच हिंदू समाजाचे आसेतूहिमालय त्यांच्या धर्मश्रद्धा व देवादिकांमुळे एक ऐक्य जसे बघायला मिळते, व जसे ते राममंदिर आंदोलनात प्रत्यक्षात दिसूनही आले, अगदी तद्वतच, त्याचेच लहान रुप म्हणजे न दिसणारे, अनुभवास न मिळणारे, अदृष्य, अन तरीही अस्तित्वात आहे असे जाणवत रहाणारे ब्राह्मणी समाजाचे ऐक्य. अर्थात इथे काहि विशिष्ट गोष्टी समुहाने/झुंडीने येऊन एकत्र करणे जसे की मोर्चे/संप/हडताळ वगैरे केल्या की च ऐक्य सिद्ध होते असे मानलेले नाही याची विशेष नोंद घेणे गरजेचे आहे.

या समाजाकडून शिकण्यासारखे बरेच आहे पण त्याच बरोबर हे देखिल लक्षात घ्या की या समाजानेही काळवेळगरज पाहून वेळेस अन्य प्रत्येक समाजाकडे जाऊन तिथे उमेदवारी/कष्ट करुन निरनिराळी कलाकौशल्ये शिकलेली आहेत.
अगदी जेव्हा अन्य लोक "पहिले आद्य क्रांतिकारक कोण" यावर जळखाऊ भाषणे देताना दिसतात, तेव्हा ते एक गोष्ट सोईस्कर विसरतात वा दुर्लक्ष करतात की सैनिकी विद्या शिकण्याकरता वासुदेव बळवंत फडके ज्यांच्याकडे गेले ते लहुजी (चु.भु.दे.घे.) हे ब्राह्मण नव्हते, अन तरी त्यांचेकडून त्या त्या विद्या आत्मसात करुन शिवाय रामोशांची सेना उभारण्यास पुण्यातील सपेमधे त्यांना कुणी आदेश दिला नव्हता.... कित्येकजण, त्यांचे विरोधीही असतील, अगदी घरातुनही पाठिंबा असेलच असे नाही तरी त्यांनी ते केले. तीच बाब मल्लविद्येची वा शरिरसंपदेच्या मल्लखाम्बादिक अनेक गोष्टींची. फार कशाला? तिनही सावरकर बंधू तुरुंगात डांबले गेल्यानंतर त्यांचे स्त्रीयांची अन्नान्न दशा होऊन शेवटी स्मशानात वाहून टाकले ल्या पिंडाचा भात खाऊन जगण्याची वेळ आली, तरी हा समाज, "त्यावेळच्या नाशकातल्या ब्राह्मणांनी त्यांना गिळायला का घातले नाही" म्हणत तत्कालिन ब्राह्मणांवर आगपाखड न करता तत्कालिन परिस्थितीनुसार बाकी गृहस्थी ब्राह्मण व इतरसमाजाची इंग्रजांच्या दमनशाहीपुढे झुकावे लागण्याची अपरिहार्यता समजुन घेतो, व या बाबीचे फार उदात्ति करण करत नाहीच, शिवाय, "मग काय झाले होते तत्कालिन नाशिककरांना त्यां स्त्रीयांना सांभालायला, घाबरट कुठले, इंग्रजांचे हस्तक कुठले" असली आचरट विचारही बाळगत नाही. असो. हे विषय असे खूप आहेत. पण सहज, न दिसणारी एकी कुठे आहे, असे प्रश्न वर दिसले म्हणून "न दिसणार्‍या व तरीही असलेल्या अस्पष्ट एकीचे " वर उदाहरण दिल आहे. याबाबत मतमतांतरे असू शकतात.

वर दुसर्या समाजाकडून आदरबुद्धिने जाऊन शिकण्याचे फडकेंचे उदाहरण दिले तशी अक्षरषः शेकड्यानी उदाहरणे दिसतील. बाकि समाज एकलव्य व गुरू द्रोणाचार्य यांच्यातील अंगठ्याच्या गुरुदक्षीणेवरुन निव्वळ आगपाखड करीत असताना, एकलव्याचे (वा कचाचे) शिष्य बनुन शिक्षण घेण्याचेही गुण कुणी आत्मसात केले असतील तर ते ब्राह्मणांनीच हे खात्रीने आकडेवारीनिशी सांगता येते, जेव्हा की बाकी समाज आपापल्या पिढीजात कलाकौशल्येही बापाकडून शिकुन घेण्या ऐवजी कारकुन बनण्याकडे वळलेला व पर्यायाने बेकारांच्या फौजेत भर घालताना दिसतो.
दुसर्‍यांचे उदाहरण देत नाही, पण मी मूर्तिकार बनलो त्याचे बेसिक्स जरी आईने सांगितले तरी प्रत्यक्ष कार्यशिक्षण हे मी "मिस्त्री" आडनावाच्या बहुधा जातीने सुतार असलेल्या मुर्तिकाराकडुन घेतले. सकाळी ८ ते रात्री ८ व मधे फक्त अर्धा तास सुट्टि, विनावेतन/मोबदला एक सिझन त्यांचेकडे केला. असे करण्याला माझ्या घरातुन विरोध झाला नाही हे विशेष कारण कोणतेही कलाकौशल्य किमान एकतरी येतच असावे हा पूर्वापारचा आग्रह.
पुढे मी आत्यंतिक हलाखीच्या अवस्थेत असताना मला रोज भाकरी खाऊ घालणाराही जातीने सुतारच होता, तो माझ्याकडुन काही शिके, मी त्याच्याकडून.
मी शिकलेलो गवंडीकाम, सुतारकाम, चांभारकाम, गाड्यांची रिपेरी इत्यादि अनेक बाबी ब्राह्मणेतरांकडूनच शिकलो. त्याकरता त्यांना "गुरु" मानले. व आजही "गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो.... " म्हणताना त्यांचीही आठवण होतेच होते व त्यांच्या उपकाराची जाणिव विसरण्याची शिकवण सुदैवाने मिळालेली नसल्याने त्यांचे आठवणिपुढेही नतमस्तकच व्हायला होते.
ब्राह्मण गुरु ही बरेच भेटले, पण ते भेटले तर नवल वाटायचे कारण नाही म्हणून त्याबद्दल जास्त सांगितले नाही.

रैना

- आरक्षणामुळे शिक्षणातील संधी, सरकारी नोकरीतील संधी याने लोकांच्या जीवनमानावर काय फरक पडला?(अंदाजे) किती टक्के आरक्षित समाजाला उपयोग झाला ? >> कुठलीच आकड्वा॓री आत्ता माझ्याकडे नाही. रोजगाराच्या ९७% संधी खाजगी क्षेत्रात आहेत. सरकारी क्षेत्रात एकूण रोजगार १ कोटी आहे. त्यातले सात आठ टक्के जागा एससी आणि सहा टक्के एसटी अशा भरल्या गेल्या आहेत. म्हणजे दहा ते बारा लाख असाव्यात. सेन्सस वरून अचूक आकडेवारी मिळेल. एकूण लोकसंख्या तीस कोटी आहे. आरक्षणातल्या ९०% जागा या क्लास ४, क्लास ३ आणि क्लास टू च्या असतात. क्लास वन मधील १०% जागेपैकी पूर्वेकडचे लोक ५% च्या आसपास असतात. पण आरक्षण कशासाठी हेच क्लीअर नसेल तर त्यांच्याकडून काही होणे नाही हा सारांश आहे.

- आता जातीनिहाय आरक्षण ही सामाजिक गरज नसून, वार्षिक उत्पन्न हा निकष जास्त योग्य ठरेल का ? (अशी योजना भारतात प्रत्यक्षात राबवणे अवघड आहे हे मान्य करुनही) >> जातीनिहाय आरक्षण नको असेल तर आर्थिक आरक्षणाचीही गरज नाही. जे लोक आरक्षणास पात्र ठरत आहेत त्यांना जबाबदा-या कळाल्या तर इथून पुढे का होईना समाजाचं हित पाहू शकणारा एक वर्ग निर्माण होईल. हा हेतू साध्य होत नसल्यास आरक्षणाची गरज नाही. ( हे म्हणणं कितपत अचूक याची कल्पना नाही).

- आरक्षित समाजातील स्त्रियांना समान संधी मिळते का? स्त्रियांचे आयुष्य थोडेतरी सुकर झाले असे म्हणता येईल का ? :: आरक्षणाचा आणी सामाजिक प्रगतीचा संबंध नाही. बाबासाहेबांबरोबर गेलेल्या समाजामधे स्त्रियांची स्थिती ब-याच अशी चांगली आहे. मागच्या एका पोस्टीत त्या बद्दल लिहीलेले आहे. तसंच या स्टडीबद्दलची लिंक दिलेली आहे. आपण शोधून घेऊ शकता. हिंदू समाजापेक्षा चांगली स्थिती आहे असं हा अभ्यास दर्शवतो.

- आर्क यांनी मांडलेला मुद्दा तुम्हाला पटतो का ? असे का होत असावे ? आऱक्षित समाजात घरोघरी अजूनही शैक्षणिक वातावरण नाही का ? >>> नाही. जागृती सर्वत्र नाही. जातीजातीत भांडणे लावण्याचे काँग्रेसचे उद्योग सुद्धा याला कारणीभूत आहेत. उदा. आमच्या गावात आंबेडकरी समाजाऐवजी दुस-या समाजातून उमेदवार देणे आणि त्या समाजाला यांच्यापासून दूर रहा तर तुम्हाला हवं ते मिळेल असं आश्वासन देणे. बारीक तपशिलात जाणे इथे टाळत आहे. आपण समजून घ्यालच.

राहता राहीला मुद्दा पटण्याचा भाग. तो मला पटणे न पटणे हे महत्वाचे नाही. जे योग्य आहे ते योग्यच राहील. हा बाफ जितक्या ठिकाणाहून वाचला जाईल त्यातून चांगलं ते घेतलं जाईल हा हेतू आहे. मी मान्यता देणारा कोण ?

डबल पोस्ट. संपादीत.

लिंबू भौ एकी संस्थांबाबत म्हटले होते.

१. साहीत्य महामंडळ, परीषद
२. गायन समाज
३.वत्क्तृत्वोत्तेजक संस्था
४. नगर वाचनालये
५. जनता, रुपी सारख्या बँक
६. मराठा चेंबर ऑफ कॉमर्र्स
७. केसरी , सकाळ सारखी वृत्तपत्रे
८. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन, डेक्कन एज्युकेशन सारख्या शैक्षणिक संस्था
९. https://www.facebook.com/WorldBrahmanOrganisation
१०. http://www.brahmin.com/info/contactUs
११. http://www.brahminsamaj.us/

मत मतांतरं आपल्या जागी, आणि अवघे धरू सुपंथ असं म्हणायचं होतं. आरक्षित समाजात भिन्न विचारधारांमधे आताशी प्रगल्भता दिसू लागली आहे.

धन्यवाद खडीसाखर,

प्रश्न तुम्हाला मुद्दाम विचारले असं नाहीये. माहिती साठी धन्यवाद. नक्की काय म्हणावे, कशाप्रकारे 'पोच' द्यावी हे न कळल्यामुळे प्रश्न विचारले, कारण आम्हाला पुरेशी माहिती नाही. नी+१.

तुम्ही फक्त मनातले 'सल' बोलून दाखवायला, काही 'निरीक्षणं' नोंदवायला धागा काढला असेल तर मान्य आहे. पटले आहे. त्याबाबत दुमत नाहीच आहे.
समाजातील तरुणांना/ अमक्या, तमक्यांना.. कोणाला कसली 'चाड' राहिलेली नाही. 'जाण' नाही. सगळे मान्यच आहे. पुढे काय हो ?

हे तुमच्याच समाजात नाही. हे 'सगळीकडे' तसेच आहे. वर आम्ही दोन तीन लोकं तेच सांगायचा प्रयत्न करतोय.
कुठलेही कार्य करायला घेतले की पहिले भेटते ती apathy. हे(च) वास्तव आहे. ते स्वीकारुनच पुढे जायला हवे. आणि पुढे जायला(च) हवे. कारण ज्याला ती 'चाड' आहे, त्याला स्वतःला आंतरिक उर्मी गप्प बसु देत नाही. दोलायमान अवस्था आणि नको हे झेंगट, आपल्याला तरी काय पडली आहे असे उद्वेगाने थोडाफार काळ वाटले तरी, करणारा माणूस करतोच. त्याचा स्वतःचाही नाईलाज असतो. करेल काय बापडा !

हाँ आता आपण कोणीच 'महामानव' नाही. तो शतकातून एखादा येतो बिचारा. पण जमेल तितके आपल्याला करायला हवे. तुम्हीही कदाचित हेच म्हणताय.
जीवनविषयक ठोस प्रणाली, vision आणि धोरण कोणाकडे असते? फार कमी लोकांकडे. इतरेजन just happen to stumble across . ध्येयाने प्रेरित व्हायला, ध्येय दिसणारी माणसेच फार कमी आहेत.

समाजाचं हित पाहू शकणारा एक वर्ग निर्माण होईल. >> हेच मला समजत नाही आहे. असा वर्ग मी पाहिला नाहीये कदाचित. माझ्यामते कसला डोंबलाचा वर्ग. जो मूर्ख मानव स्वतःच्या बुडाला आग लावतोय, पृथ्वीच्या मर्यादित रिसोर्सेस चा नाश करतो, तिथे कुठले आलेत जात, धर्म आणि वर्ग ?

प्ण मुळात मुद्दा असा आहे की भारतरत्न घटनाकार डॉक्टर आंबेडकर यानी आरक्षण हे स्वातन्त्र्य प्राप्तिनन्तर केवळ दहा वर्षे असावे असे म्हटले होते . दुर्दैवाने १९५६ साली त्यान्चे महापरिनिर्वेवाण झाल्याने वर्सर्षानन्तर देखिल आरक्षण सुरूच राहिले . ते का व कोणामुळे? याचीदेखील कारणे समजली नाहित. त्यातच परत मन्डल आयोगाने डॉक्टर आंबेडकर यानी सुचविल्यापेक्षा कितितरी अधिक टक्के आरक्षण वाढवून घेतले व ते व्ही पी सिन्घ सरकारने लागू देखिल केले , असे का घडले?

डॉक्टर आंबेडकर यानी ज्या उदात्त विचाराने आरक्षण ची तरतूद केली होती ,त्या मूळ गाभ्यालाच धक्का लागला आहे असे वातट नाही का? आणखी किती वर्षे हे असे भेदभाव पूर्ण व सामाजिक विषमता वाढवणारे आरक्षण चालू ठेवणार ? त्याला काही कालमर्यादा आहे कि नाही ?

उडनखटोला, तुमच्या दुसर्‍या परिच्छेदातील प्रश्नांना मजपाशी उत्तरे नाहीत. काही अंदाजही नाहीत.
अन ब्राह्मण समाजापुरते सांगायचे, तर मध्यंतरी ब्राह्मण समाजातही "टूम" निघाली होती की आपणही आरक्षण मागावे, तर त्यास समाजातूनच कठोर विरोध झाला. तो का, कसा हा या धाग्याचा विषय नाही.
अर्थात इतर समाजात, नव्याने आरक्षण मिळविणे, असलेले आरक्षण सातत्याने टीकवून धरणे, ही त्या त्या समाजातील सामान्य घटकांची गरज नसून, सत्तेवर रहाण्याकरता त्या त्या समाजातील "नेत्यांची" गरज आहे हे सत्य फार काळ लपुन रहाणार नाही, व त्या त्या समाजातील सामान्य लोकच तेव्हा जे काही ठरवतील, ते ते होईल हे निश्चित. यास काही काळ जावू द्यावा लागेल.
लोकशाहीतील जे काही अपरिहार्य दोष आहेत, वरील परिस्थिती त्यातिलच एक भाग असून, तो लोकशाहीद्वारेच सुटेल असा विश्वासही आहे.
आगलावु/भडकाऊ एकतर्फी विद्वेषपूर्ण मते मांडणार्‍यांची चलती व सद्दी संपुन सकारात्मक सहकार्याची भाषा बोलणार्‍यांची व कृती करणार्‍यांची सद्दी जेव्हा चालू होईल तो सुदिन.

आगलावु/भडकाऊ एकतर्फी विद्वेषपूर्ण मते मांडणार्‍यांची चलती व सद्दी संपुन सकारात्मक सहकार्याची भाषा बोलणार्‍यांची व कृती करणार्‍यांची सद्दी जेव्हा चालू होईल तो सुदिन.>> +१००

खुप माहितीपुर्ण लेख आणि चांगले प्रतिसाद.

दुर्दैवाने आरक्षणाबद्दल फारशी माहिती नाही. जी माहिती मिळते ती आरक्षण किती चुकीचे आहे याबद्दल मिळते. गुणवत्ता कमी असतानाही केवळ आरक्षणामुळे प्रवेश मिळाले आणि मग मिळालेल्या संधीची कशी वाट लावली गेली याच्याच कथा ऐकल्यात्/पाहिल्या.

जिथे खरेच गरज आहे तिथे कितपत संधी आहेत, किती संधींची माहिती दिली जातेय आणि या संधी घेतल्या जाताहेत याबद्दल मला माहिती शुन्य. ही माहिती इतर समाजाला मिळावी याबद्दल कोणी प्रयत्नही करत नाही. त्यामुळे इतर समाजाच्या मनात आरक्षणाबद्दल थोडी कटूता आहे.

माझे मत आरक्षण देताना गुणवत्ताही पाहिली जावी असे असले तरी मुळात ज्यांना विकासाच्या संधी मिळाल्याच नाहीत त्यांची गुणवत्ता इतर समाजातील अशा संधी मिळालेल्या लोकांबरोबर करणे चुक आहे हेही मला पटते. पण गुणवत्तेच्या बाबतीत चित्र हे असे आहे हे इतर समाजाला कोण दाखवणार? इतर समाजाला आरक्षणामुळे आर्थिक दृष्ट्या समर्थ झाल्यानंतरही आरक्षणाचा लाभ उठवणारे लोकच दिसतात आणि हेच चित्र सगळीकडे असेल असे वाटते.

तुम्ही आरक्षित समाजातले चित्र काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहात याबद्दल तुमचे अभिनंदन. समाजासाठी जे काम करत आहात याबद्दलही अभिनंदन. तुमच्यासारखे बहुसंख्य उभे राहिले तर कालांतराने आरक्षणाची गरज राहणार नाही. एकमेकांना मद्त करुन सगळे सक्षम होतील.

लिंबू, तुमच्या पोस्टी पण चांगल्या आहेत.

इतर समाजही आरक्षण मागायला लागलाय याच्याशी सहमत. जातीच्या उतरंडीवर स्वतःला अगदी ठासुन वरच्या कुळातला मानणारा एक वर्ग केवळ आरक्षण मिळावे यासाठी स्वतःला मागासवर्गीय म्हणवुन घ्यायचे ठरवतो तेव्हा हसु येते या वर्गाचे. आणि सोबत लक्षात येते की आरक्षणाकडॅ एक ढाल म्हणुन लोक पाहतात. आरक्षण असले की गुणवत्तेची चिंता नाही. ती नसतानाही आपल्याला वरच्या पायरीवर चढता येईल. हा जो संदेश समाजात आहे तो एकुण देशालाच घातक आहे हे माझे मत आहे. जर पहिल्यापासुनच आरक्षण का हे इतर समाजासमोर प्रभावीपणे मांडले गेले असते तर आरक्षणाला विरोध झाला नसता. आज एका बाजुने आरक्षणाला विरोध होतोय आणि त्याच वेळी दुस-या बाजुने "आम्हालाही आरक्षण हवे" ही ओरड केली जातेय.

जे आरक्षण फक्त १० वर्षेच ठेवावे लागेल असे आंबेडकरांना वाटलेले ते आज ७० वर्षांनंतरची तसेच चालु ठेवले जातेय हे पुर्ण देशालाच लांछनास्पद आहे. याचा एक अर्थ असाही निघतो की ७० वर्षांनंतरही समाजातल्या एका वर्गाचा काहीही विकास झाला नाही. तर त्याचवेळी असाही अर्थ निघतो की ७० वर्षानंतर मुळ आरक्षण कशासाठी निर्माण केले गेलेले तो मुद्दा कधीच मागे पडलाय आणि आज आरक्षण हे सत्तेचे एक रुप झालेय. दोन्ही अर्थामध्ये नुकसान देशाचे आहे.

<<सर्वच समाज एकुणातच फार fragmented आहे. आणि त्याचाच उपयोग करुन आता ते जातीनिहाय एकी वगैरे विसरुन, समविचारी लोकांनी जात-पात-धर्म न पाहता, फक्त करावयाचे मानवतावादी, पर्यावरणवादी कार्य यासाठी एकजूट होणे, ही इतकी अशक्यप्राय गोष्ट आहे का?>>

ज्जे बात रैना ! १००% सहमत Happy

समविचारी लोकांनी जात-पात-धर्म न पाहता >> जो खचलेला वर्ग आहे त्याबद्दलचे अहवालच्या अहवाल आहेत. आजवर कुणी जात धर्म विसरून काही केल्याचे ऐकीवात नाही. यासाठी त्याच समाजातून काम झाले पाहीजे. यात कसला आलाय जातीयवाद ? इतर लोकांनी येऊन बेसिक काम उभारले तर भारतातले प्रश्न संपलेच समजा. मग कसलं आलंय आरक्षण आणि अ‍ॅट्रोसिटी वगैरे ... याच क्षणाची वाट आपण सगळे पाहत नाही का ?

@ उडन खटोला

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असं विधान केल होतं याबद्दल तुम्ही खात्री केली आहे का ? तसं असेल तर मूळ भाषण संदर्भासहीत द्यायचा प्रयत्न करावा ही नम्र विनंती.

बऱ्याच दिवसापासून लिहायचे म्हणतो या बाफ वर, राहूनच जात होते.. आज मुहूर्त लागला..
तर मला असे म्हणायचे आहे कि, यामध्ये जी अपेक्षा व्यक्त केली आहे कि 'आरक्षित समाजातील लोक जे आता उच्चभ्रू गटामधे दाखल zale आहेत त्यांनी आपल्या समाजातील इतरांना हात द्यावा, आपले काहीतरी उत्तरदायित्व आहे याची जाणीव ठेवावी' हि अपेक्षा रास्त आहे..
हि अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही असे एकंदर चित्र असल्याचे वरील लेख, प्रतिसाद ई मधून दिसते..

यावर मला असे वाटते कि,
हे लोक ज्यांच्याकडून अपेक्षा केली जातेय ते तसे करताना दिसत नाहीत याचे मूळ कारण शोधले पाहिजे.
ते कारण म्हणजे सामाजिक बांधिलकीची जाणीव नसणे हे असेल..
तर असे का आहे याचा विचार केल्यास, यासाठी सरळ सरळ ब्राह्मण समाजाशी तुलना केल्यास फरक जाणवेल तो लहान मुलांच्या संगोपनामध्ये जाणवेल असे मला वाटते..
ब्राम्हण समाजामध्ये लहान मुलांना विविध कथा,स्तोत्रे शिकवली/ सांगितली जातात. वाचनाची आवड़ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो,
अशा धर्म-अधर्म, योग्य-अयोग्य सांगणाऱ्या कथांमधुन आणि पुढे चौफेर वाचना मधून या 'जाणिवा' विकसित होत असाव्यात असे मला वाटते..
यातून मग पुढे असे संस्कार असलेले मुल समाजाचे ऋण फेडण्याचा विचार करू शकते. आणि ते नसल्यास मग तोकड़े कपड़े, दारू ई माध्यमांमधून उच्चभ्रू पणा दाखवण्याकडे कल वाढू शकतो..

अर्थात, या समाजाचा खरच मुळापासून विकास करायचा असेल तर शिक्षणा बरोबर संस्कार या गोष्टीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे असे मला वाटते. जेणेकरून एक समूळ सम्पूर्ण असा बदल होउ शकेल..
तसेच,
मोठ्याने बाबा साहेबांची स्तुति करणारे गाणे लावणे, zende फड़काउन राजकारण करणे यापेक्षा त्या महामानवाचे विचार समाजात खालपर्यन्त पोहोचवता आले तर खूप फरक पडू शकेल...

वरील maze जे मत आहे ते आभ्यासातून काढलेले निष्कर्ष नव्हेत. या समाजासाठी काम करताना हि दिशा लक्षात घेणे महत्वाचे आहे ऎसे मला वाटले म्हणून हा प्रतिसाद. कृ गै न..

Pages