रूपं पूर्णब्रह्माची - सायली राजाध्यक्ष

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

पाचवी-सहावीत असेन तेव्हाची ही आठवण आहे. आम्ही तेव्हा बीडला राहात होतो. माझी आजी कॉफी घ्यायची. ती शाळेत असताना गांधीजींनी प्रत्येकाला स्वतःच्या एका आवडत्या गोष्टीचा त्याग करायला सांगितला म्हणून तिनं तिला अतिशय प्रिय असलेला चहा सोडला होता. तेव्हापासून ती कॉफी घ्यायची. आजी चिकोरीमिश्रित कॉफी प्यायची. ही कॉफी तेव्हा पत्र्याच्या लहान गोलाकार डब्यातून मिळायची. तर एका दुपारी मी आजीला उत्साहानं म्हटलं की, मी आज तुला कॉफी करून देते. मी गॅसवर शिस्तीत दूध गरम केलं, त्यात साखर घातली आणि कॉफीच्या डब्यातून कॉफी घालून उकळलं. पण मला कळेना की कॉफीचा वास असा का येतो आहे? मी कॉफी गाळून आजीला नेऊन दिली, तिनं कप नाकाजवळ नेला मात्र, तिनं शांतपणे तो कप बाजूला ठेवला. मी कॉफीच्या रिकाम्या झालेल्या डब्यात ठेवलेला काळा मसाला कॉफी म्हणून घातला होता! तर ही माझी स्वयंपाकाशी पहिली ओळख.

माझी आजी रमाबाई चपळगावकर ही मूळची चंद्रपूरची. तिचं माहेरचं नाव कमल शृंगारपुतळे. तिचे आई-वडील लहानपणीच कॉलर्‍याच्या साथीत गेले होते, म्हणून ती आपल्या मोठ्या भावाबरोबर राहात असे. भावाच्या नोकरीच्या निमित्तानं ती नाशिक, मुंबई अशा शहरांमध्ये राहिली होती. त्यामुळे लग्नानंतर ती बीडला आली, तेव्हा तिच्या स्वयंपाकाची पद्धत आणि बीडला त्यावेळी ज्या प्रकारचा स्वयंपाक होत असे ती, अगदीच वेगळी होती. मराठवाड्यात कडधान्यांचा फारसा वापर होत नाही. शिवाय त्यावेळी तरी बर्‍यापैकी तिखट स्वयंपाक केला जात असे. आजी मुंबईत राहिल्यामुळे तिला कडधान्यांचा वापर माहीत होता. वालाचं बिरडं बीडमध्ये तिनं पहिल्यांदा केलं. शिवाय पश्चिम महाराष्ट्रातल्या ब्राह्मणी घरांमधली स्वयंपाकात गूळ वापरण्याची पद्धत तिनंही आत्मसात केलेली होती. हे बीडमध्ये नवीन होतं. माझे आजोबा पुरुषोत्तम चपळगावकर गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते, त्यामुळे राहणी फार म्हणजे फारच साधी होती. म्हणजे खाण्यापिण्याची सुबत्ता होती, पण कुठलीही चैन नव्हती. रोजचं जेवण म्हणजे एक पालेभाजी किंवा फळभाजी, कोशिंबीर, भाकरी, वरण, भात आणि दही-ताक असंच असायचं. पोळी अगदी सणासुदीला. आजीआजोबा शेवटपर्यंत हेच जेवण जेवत असत. भाज्या कशा पारखाव्यात हे मी आजीकडून शिकले. मला तिच्याबरोबर मंडईत जायला खूप आवडायचं. हिरव्या पालेभाज्या, लिंबाचे पिवळेधमक ढीग, टोमॅटोचे लालभडक ढीग, केशरी गाजरं हे बघून माझं मन हरखून जायचं आणि विशेष म्हणजे इतक्या वर्षांनंतरही अजूनही मला ताज्या भाज्या पाहिल्या की तसंच प्रसन्न वाटतं. भेंडीचा शेपटाकडचा तुकडा तोडून भेंडी कोवळी आहे की नाही ते कसं बघावं, किंवा पालेभाज्या टवटवीत असल्या तरच त्या ताज्या असतात हे कसं ओळखावं हे मला आजीनंच शिकवलं. माझी मोठी मुलगी सावनी मला पूर्वी हसायची. ती म्हणायची की, आई, तुला भाज्यांचे ढीग बघून इतका आनंद कसा होतो? तीही आता स्वयंपाक करायला लागलीय. गंमतीची गोष्ट अशी की, ती मला हल्लीच म्हणाली की, आई ताज्या भाज्या बघितल्या की किती बरं वाटतं नं! मला वाटतं की, या सवयी अशाच एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे संक्रमित होत असतात.

माझी आजी पाच वर्षांपूर्वी गेली तेव्हा ती ९४ वर्षांची होती. पण त्या वयातही ती मी गेले की मला आवडतात म्हणून गुळपापडीचे लाडू करून घ्यायची किंवा मला आवडतो म्हणून आईला कणकेचा शिरा करायला लावायची. आम्ही बीडला होतो तेव्हा आजीच्या एकादशीच्या थालीपिठातला उरलेला तुकडा मिळावा म्हणून आमच्यात चढाओढ असायची, इतकं ते थालिपीठ (आजी त्याला चानकी म्हणायची) चविष्ट असायचं. चातुर्मास सुरू व्हायच्या आधी घरात कांदाभजी, कांद्याची भाजी, वांग्याची भाजी, वांगी भात, कांद्याची थालिपीठं हे सगळे पदार्थ झालेच पाहिजेत असा तिचा आग्रह असायचा, कारण पुढे चार महिने तिला हे पदार्थ खाता यायचे नाहीत. आमच्या बागेत मोठं आवळ्याचं झाड होतं. त्या झाडाखाली आवळीभोजन व्हायचं. आजीच्या सगळ्या मैत्रिणी एक-एक पदार्थ घेऊन यायच्या. मग मनसोक्त गप्पा व्हायच्या.

आम्ही मूळचे कर्नाटकातले, पण देशस्थ. माझ्या बाबांच्या (नरेंद्र चपळगावकर) सवयी या काहीशा आजीच्या वळणावर गेलेल्या आहेत. त्यांना गोडसर स्वयंपाक आवडतो आणि दुग्धजन्य पदार्थ अतिशय प्रिय. म्हणजे ते दिवस दिवस दूध-पोळी खाऊन राहू शकतात. याबद्दल आम्ही नेहमी त्यांची चेष्टाही करतो, कारण त्यांच्या खाण्याबद्दल खूप खोडी आहेत. म्हणजे साधं वरण केलं तर त्यात अमुक इतक्या प्रमाणातच गूळ हवा किंवा हिंग इतकाच हवा याबद्दल ते आग्रही असतात. बाबांना स्वयंपाकाबद्दल समाधानी करणं हे खरंच कठीण काम आहे. बाबांच्या सवयी अशा, तर त्याच्या अगदी उलट आईच्या आवडीनिवडी. माझी आई, नंदिनी चपळगावकर, ही अंबाजोगाई या बीड जिल्ह्यातल्या गावची. तिचे वडील नोकरीच्या निमित्तानं परळी वैजनाथ इथं होते. ही दोन्हीही खास मराठवाडी गावं. आईच्या माहेरी तिखट जेवणाची सवय. गुळाचा वापर फक्त गोड पदार्थात. शिवाय ठेचा, भुरका, दाण्याची, तिळाची, लसणाची, खोब-याची, जवसाची, कार्‍हळाची अशा चटण्या आणि तर्‍हेतर्‍हेची लोणची जेवणात हवीच हवी. आईकडे आमटी असायची ती अगदी पातळ रस्समासारखी. आमच्याकडे आमटी म्हणत नाहीत, फोडणीचं वरण म्हणतात. शिवाय हे वरण म्हणजे कधी कांदा फोडणीला घालून, तर कधी लसूण फोडणीला घालून केलेलं, त्यामुळे त्यात गूळ नाही. घट्ट वरण खायचं तर शिजवलेल्या वरणाच्या घट्ट गोळ्यात लाल तिखट, काळा मसाला, मीठ, कच्चं तेल आणि कच्चा कांदा घालून भाकरीबरोबर खायचं. आईकडेही रोजच्या जेवणात भाकरीच असायची. पोळी सणासुदीलाच. आई लग्न होऊन आली तेव्हा बाबांच्या खाण्याच्या सवयींशी जुळवून घेणं तिला फार कठीण गेलं असणार. कारण आई एक तर वयानं लहान होती आणि तिला स्वयंपाक करता येत नव्हता. बाबा अजिबात तिखट खात नव्हते आणि आवडलं नाही तर तसं स्पष्ट सांगणारे. आई एक आठवण सांगते - माझे आजोबा इतके शांत होते की, आईनं एकदा कारल्याची भाजी केली. कारल्याला मीठ लावून पाणी काढायचं असतं हे आईला माहीत नव्हतं. आईनं तशीच भाजी केली. आजोबा जेवायला बसले. आईनं भाजी वाढली ती अतिशय कडू झाली होती, पण आजोबांनी काहीही न बोलता ती शांतपणे संपवली. त्यांना ती आवडली आहे असं वाटून आईनं त्यांना अजून भाजी वाढली तीही त्यांनी खाल्ली. नंतर बाबा जेवायला बसले, पहिला घास घेतल्याबरोबर बाबांनी भाजी अतिशय कडू झाली आहे हे सांगितलं. तेव्हा बिचारी आई कानकोंडी झाली. आजोबांनी उलट बाबांनाच झापलं. आई आजोबांची अजून एक आठवण नेहमी सांगते - आमचं बीडचं घर फार मोठं होतं. वीस हजार स्क्वेअर फुटांच्या प्लॉटवर आमचा बंगला होता (मी आता मुंबईत ६४० स्क्वे.फु. घरात राहते). घराच्या मागे पुढे मोठं अंगण आणि मोठी बाग होती. शिवाय घर गावाबाहेर होतं. मागच्या बागेला लागून पुढे शेतीच होती. घरातले सगळे जर बाहेर गेले असतील आणि आई आणि आजोबाच घरात असतील, तर आजोबा नेहमी न बोलता आईला सोबत करायचे. ते बाहेर व्हरांड्यात वाचत बसायचे आणि आई जर स्वयंपाकघरात असली तर मधूनमधून जाऊन फक्त, “बाळ, काय करते आहेस?” एवढं विचारायचे. आईनं गॅस नीट पेटवला आहे ना, तिचा पदर गॅसजवळ नाही ना, याकडे त्यांचं लक्ष असायचं. शिवाय आईला भीती वाटू नये म्हणून ते अशी काळजी घ्यायचे.

अर्थात हळूहळू शिकत आई सुरेख स्वयंपाक करायला लागली. माझी आई काहीही मोजमाप न करता, उत्कृष्ट स्वयंपाक करते. ती नेहमी आम्हा तिघींना म्हणते की, मला तुमच्यासारखा वेगळ्यावेगळ्या प्रकारचा स्वयंपाक करता येत नाही, पण ती ज्या प्रकारचा स्वयंपाक करते तो उत्कृष्ट असतो. आईच्या हातचं चिंचगुळाचं किंवा आमसुलं-गूळ घातलेलं वरण, कढी, भरल्या वांग्याची खास मराठवाडी, गूळ न घालता केलेली भाजी, पीठ पेरून केलेल्या भाज्या, पेंडपाला, उकडशेंगोळे, वरणफळं, थालीपिठं, धपाटे, मेथीफळं, विविध प्रकारच्या चटण्या, गाजराचा भुरका, ताकातलं पिठलं, वेगवेगळी लोणची केवळ लाजवाब असतं. माझ्या किंवा माझ्या बहिणींच्या मैत्रिणी अजूनही माहेरी आल्या की आईच्या हातचं जेवायला येतात. आज माझ्या आईचं औरंगाबादमध्ये 'स्वयंपाकघर' नावाचं खाद्यपदार्थांचं मोठं दुकान आहे. तेही या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे आईनं वयाची चाळीशी ओलांडल्यावर एका मैत्रिणीबरोबर ते सुरू केलं. औरंगाबादमधलं हे पहिलं पोळी-भाजी केंद्र. आता बरीच अशी दुकानं सुरू झाली आहेत. पण अजूनही 'स्वयंपाकघर' हेच पहिल्या क्रमांकावर आहे. आता या दुकानाचा व्याप खूप वाढला आहे. जवळपास ४० बायका दुकानात काम करतात. इथे पोळी-भाजी तर मिळतेच, पण त्याचबरोबर भाताचे प्रकार, आमट्यांचे प्रकार, नाश्त्याचे प्रकार, सुक्या-ओल्या चटण्या, गोड पदार्थ आणि कोरडं खाणंही मिळतं. सांबारवडी (कोथिंबीर भरून केलेली बाकरवडी), पाटवड्यांची आमटी, धपाटे, ठेचा असे तिथले काही खास पदार्थ मला फारच आवडतात. कारण हा स्वयंपाक करणार्‍या बायका वेगवेगळ्या जातीधर्मांच्या आहेत, त्यांच्या स्वयंपाकाची पद्धत आमच्यापेक्षा फार वेगळी आहे. त्यांचा तो झणझणीत स्वयंपाक मला फार आवडतो. दुर्गाबाई भागवतांनी एका पुस्तकात म्हटलंय की, मला भारतातली जातव्यवस्था एकाच कारणासाठी आवडते आणि ते कारण म्हणजे वेगवेगळ्या जातींच्या खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमुळे आपल्याला कितीतरी प्रकारचं खाणं खायला मिळतं. दुर्गाबाईंच्या या विधानाशी मी शंभर टक्के सहमत आहे!

माझ्या दोघी बहिणीही सुरेख स्वयंपाक करतात. मेघना या माझ्या मधल्या बहिणीचा नवरा मराठा आहे. त्यामुळे आता ती त्यांच्या पद्धतीचाही स्वयंपाक मस्त करते. स्वतः शाकाहारी असलेल्या मेघननं मध्ये रानडुक्करही शिजवलं होतं! भक्तीही खास देशस्थी स्वयंपाक छान करतेच, पण त्याचबरोबर माझ्या मुलींना आवडतात ते सर्व पदार्थ म्हणजे कॉन्टिनेटल, इटालियन वगैरेही सुरेख करते. माझी काकू कोकणस्थ होती, त्यामुळे तिचे गोड पदार्थ उत्तम होत असत.

माझं लग्न झालं ते सारस्वत कुटुंबात. बरं, आमचं लग्न हे ठरवून झालेलं आहे, त्यामुळे मी आधीपासून राजाध्यक्षांच्या घरात येतजात नव्हते. लग्न ठरल्यावर ते होईपर्यंतच्या काळात जे काय पाचसहादा मी त्यांच्या घरी आले ती तेवढीच. शिवाय औरंगाबादला माझ्या माहितीतली फक्त दोन सारस्वत कुटुंबं होती. तीही वर्षांनुवर्षं औरंगाबादेत राहत असल्यानं त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी साधारणपणे आमच्यासारख्याच होत्या. पुन्हा औरंगाबादमध्ये मासे मिळत नाहीत. म्हणजे क्वचित मिळतात, पण ताजे मासे मिळत नाहीत. माझे बहुतेक मित्रमैत्रिणी शाकाहारी. फार तर फार कधीतरी चिकन खाणारे. बाबा कधीतरी मटण-चिकन खायचे, पण ते बाहेर. घरात कधी शिजवलेलं नव्हतं. आजी-आजोबा बरोबर राहत असल्यानं अंडं करायलाही वेगळी भांडी होती. त्यामुळे राजाध्यक्षांकडे लग्न होणार म्हटल्यावर घरातल्या सगळ्यांनाच, आता ही कसं करणार, असा प्रश्न पडला. कारण मी शाकाहारी तर आहेच, तीही तात्विक कारणांसाठी. अर्थात दुसर्‍यानं मांसाहार करायला माझा आक्षेप कधीच नव्हता आणि नाही!

मी लग्न होऊन आले, पण वाटलं होतं त्यापेक्षा खाण्यापिण्याच्या सवयींतला हा बदल अंगवळणी पाडणं मला सोपं गेलं. त्याचं पहिलं कारण म्हणजे मला उपरं वाटायला नको म्हणून माझ्या सासूबाईंनी वर्षभरासाठी मांसाहार सोडला होता. शिवाय माझे सासरे मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे सारस्वत असले तरी माझ्या सासूबाई विजया राजाध्यक्ष या मूळच्या कोकणस्थ, पूर्वीच्या विजया आपटे. त्यामुळे आमच्या घरात दोन्ही प्रकारचा स्वयंपाक होत होता. शिवाय मावशीची (माझ्या सासूबाईंना मी मावशी म्हणते) आई, तिचे वडील गेल्यानंतर इथे मुंबईतच आमच्या घरी राहायला आली. त्यामुळे घरात ब्राह्मणी स्वयंपाक होत होताच. कोल्हापूरला रणजित देसाई, शंकर पाटील हे मावशीचे मित्र, तसंच काही मैत्रिणीही मांसाहारी असल्यानं तिला त्यांच्या घरी मांसाहारी जेवणाची सवय होती. मासे म्हणजे सारस्वतांच्या जिव्हाळ्याचा आणि अभिमानाचाही विषय. सगळ्याच जातींचे लोक आपापल्या पद्धतीच्या स्वयंपाकाबद्दल प्रेमानं बोलतातच. पण सारस्वतांना त्यांच्या खाद्यसंस्कृतीचा जाज्ज्वल्य अभिमान असतो! सारस्वतांचं एक वैशिष्ट्य म्हणजे बाजार पुरूष करतात. म्हणजे दोन्ही अर्थानं, बाजार म्हणजे मासळी आणणं आणि शिवाय बाजारातून इतर गोष्टी आणणंही. माझ्या नवर्‍यानं, निरंजननं मात्र सारस्वत पुरूषांचा हा गुण अंगी बाणवून घेतलेला नाही! त्यानं ती सगळी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे.

मावशीनं तिच्या लग्नानंतर सारस्वतांचा स्वयंपाक आत्मसात केला. कारण एकतर राजाध्यक्षांनी ब्राह्मण बायको केली म्हणजे, आता त्यांचं कसं होणार, असा प्रश्न बहुधा समस्त सारस्वतांना पडला होता. त्यामुळे मावशीनं ते आव्हान स्वीकारलं. आणि मुख्य म्हणजे ती सारस्वती पदार्थांबद्दल बोलताना, “आमच्याकडे असं करतात,” असं म्हणते. मी अजूनही असं म्हणत नाही. म्हणजे त्यात काही कुठला पवित्रा घ्यायचाय असं नाही, पण मी नाही म्हणत. मावशीच्या हातचे काळ्या वाटाण्यांची आमटी, चण्याच्या डाळीची आमटी, मुगागाठी, डाळीची कांदा-खोबरं घातलेली आमटी, तिरफळं घातलेली आमटी, आंबट बटाटा, फणसाचा तळ, खतखतं, फणसाची भाजी, ऋषीची भाजी किंवा कंदमूळ, उडदा मेथी, कोलंबीचं लोणचं, माशांच्या आमट्या, हळदीच्या पानातलं सुकं असे पदार्थ फार सुरेख असतात. शिवाय मावशी इतर पद्धतींचेही बरेच प्रकार फार छान करते. सारस्वती स्वयंपाक मी तिच्याकडूनच शिकले आहे. शिवाय मावशीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ती कोल्हापूरसारख्या त्यावेळी अगदीच लहान असलेल्या गावातून, साध्या कुटुंबातून मंगेश विठ्ठल राजाध्यक्षांच्या सोफिस्टिकेटेड वर्तुळात आली. भाईंचे, माझ्या सासर्‍यांचे, जवळचे मित्र म्हणजे पु.ल. देशपांडे, द.ग. गोडसे, शां. शं. रेगे. हे सगळेजण आमच्या घरी नेहमी जेवायला येत असत. मावशी या सगळ्या पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं खाणं करत असे. शिवाय त्या काळातही मावशी स्पॅनिश राईस किंवा रशियन सॅलड यांसारखे त्याकाळी नवलाईचे असणारे पदार्थ बनवत असे. बाहेर कुठेही नवीन काही खाल्लं तर ती तो पदार्थ घरी करून बघण्याचा प्रयत्न करत असे. आणि हेही त्या काळात जेव्हा त्यासाठी लागणारे पदार्थ मिळणं दुरापास्त होतं. मावशी फार विचार करून मेन्यू ठरवते. म्हणजे कडधान्याची आमटी असेल तर उसळ नको, किंवा कुठल्या पदार्थात चण्याची डाळ वापरली असेल तर मग डाळीच्या पिठाचा पदार्थ नको. किंवा त्रिकोणी सँडविचेस असतील तर मग कोथिंबीर वडी त्रिकोणी कापता कामा नये. मावशीच्या या मेन्यूचा सखोल विचार करण्याच्या पद्धतीची तिच्या विद्यार्थ्यांमध्ये अजूनही चर्चा होते. कारण कॉलेजच्या कार्यक्रमांच्या वेळची जेवणं ठरवताना त्यांनी हे सगळं अनुभवलं आहे. आता मलाही ही सवय लागली आहे.

माझे सासरे, सासूबाई, नवरा आणि नणंदा या सगळ्यांचा एक मोठा गुण म्हणजे ते जेवणाला कधीही नावं ठेवत नाहीत. माझे सासरे आता नाहीत, पण त्यांनी कधीही जेवणाला नावं ठेवली आहेत, असं मला आठवत नाही. माझा नवरा म्हणतो की, जी गोष्ट मला करता येत नाही तिला नावं ठेवण्याचा अधिकार मला नाही. माझं लग्न झालं तेव्हा मला बर्‍यापैकी स्वयंपाक येत होता, म्हणजे खरंतर रोजचा सगळाच स्वयंपाक येत होता. पण काही काही पदार्थ आईकडे नुसते खाल्ले होते, कधी केले नव्हते. एकदा मी उत्साहानं म्हटलं की, मी आज कणकेचा शिरा करते. आणि शिरा करायला घेतला. कणकेच्या शिर्‍याला कणीक खूप भाजावी लागते. पण ती किती भाजायची याचा अंदाज नसल्यानं ती कमी भाजली गेली आणि तिचा लगदा झाला. पण आमच्या घरच्या कुणीही नावं ठेवली नाहीत, उलट कौतुक करून तो शिरा खाल्ला. आमच्या घरात मला नवनवीन पदार्थ करायला नेहमीच उत्साह वाटत राहिला याचं कारण घरातल्या सगळ्यांनी त्याला कायम प्रोत्साहन दिलं, शिवाय नवीन प्रकार खाऊन बघायला सगळे तयार असतात.

तर मला रोजच्या स्वयंपाकाबद्दल काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण जेव्हा माशांचा प्रश्न आला, तेव्हा मात्र माझं अवसान गळालं. मला घरात कुणीच बळजबरी केली नाही किंवा साधं सांगितलंही नाही की, तू हे पदार्थ शीक म्हणून. पण मलाच असं वाटायला लागलं की, नवरा खातो, घरातले सगळे खातात तर आपल्याला निदान करता तरी आलं पाहिजे. म्हणून मी हळूहळू माशांचे प्रकार शिकायचा प्रयत्न केला. पहिल्यांदा मासे तळताना मासा हातात घ्यायला मला किती मानसिक तयारी करावी लागली होती ते माझं मलाच माहीत! नंतर माझ्या दोन्ही मुलीही आवडीनं मासे खायला लागल्या, त्यामुळे मी माशांचे पदार्थ करायला लागले. आणि आता ते सवयीनं बरे होत असावेत. 'असावेत' असं म्हणतेय कारण मला त्याची चव माहीत नाही, मी ती कधी घेतलीही नाही.

माझं लग्न झालं तेव्हा साहित्य सहवासातले बरेच मूळ सभासद थकले होते. ते सगळे सक्रिय असताना आमच्या घरी नेहमी पार्ट्या व्हायच्या, असं मला निरंजननं आणि मावशीनं सांगितलंय. शांता शेळके, गंगाधर गाडगीळ, वा.ल. कुलकर्णी, विंदा करंदीकर, मे.पुं. रेगे, अरविंद गोखले, दीपा गोवारीकर, व.पु. काळे, अनंत काणेकर, रमेश तेंडुलकर, के.ज. पुरोहित, य.दि. फडके यांच्यासारखे दिग्गज लेखक 'साहित्य सहवास'चे मूळ सभासद. या सगळ्यांच्या मैफली काय रंगत असतील नं! याचा विचार अजूनही माझ्या मनात येतो. अर्थात यातल्या काही लोकांना मी भेटले आणि त्यांचा सहवासही मला मिळाला. २६ जानेवारी हा आमचा कॉलनी डे असतो. 'साहित्य सहवास'चा हा वर्धापन दिन आम्ही फार जोषात साजरा करतो. २६ जानेवारीला कॉलनीचा कुठलाही सदस्य स्वखुशीनं दुसर्‍या कुठल्या कार्यक्रमासाठी बाहेर जायला तयार नसतो. सकाळी झेंडावंदनानंतर ब्रेकफास्ट होतो, मग विविध खेळ, नंतर आरामात दुपारचं जेवण, मग मनसोक्त गप्पा आणि संध्याकाळी एखादं नाटक किंवा गाण्याचा कार्यक्रम, तसंच कॉलनीतल्या मुलांचे कार्यक्रम होतात. शिवाय रात्रीचं जेवणही आम्ही एकत्र करतो. या दिवसाची आम्ही 'साहित्य सहवास'कर वर्षभर वाट पाहात असतो. निरंजन मला सांगतो की, पूर्वी पंगती व्हायच्या. 'साहित्य सहवासा'तले दिग्गज लेखक एका पंगतीत बसलेले बघण्याची माझी संधी हुकली, याची मला चुटपुट लागते.
साहित्य सहवासात माझ्या मैत्रिणींचा एक ग्रूप आहे. यातल्या सगळ्यात ज्येष्ठ सदस्या ७० वर्षांच्या आहेत, तर सगळ्यात कमी वयाच्या मी आणि माझी एक मैत्रीण ४२-४३ वर्षांच्या आहोत. आमच्या या ग्रुपामधल्या तेराही जणींना स्वयंपाक आणि खाणं या गोष्टींबद्दल प्रचंड जिव्हाळा आहे. त्यामुळे आम्ही किमान महिन्यातनं एकदा जेवणासाठी भेटतो. मग त्या-त्या सीझननुसार मेन्यू ठरतो. किंवा एखादी मैत्रीण एखादा पदार्थ सुंदर करते, हे माहीत असल्यानं तिच्या हातचा तो पदार्थ खाण्याची फर्माईश होते. तनुजा बांदिवडेकर गोड पदार्थ मस्त करते, उमा भणगे या मूळच्या कोल्हापूरच्या. त्या मटण, कोल्हापुरी मिसळ मस्त करतात. विंदा डोंगरे खास सणासुदीचे गोड पदार्थ अप्रतिम करते. नलिनी अहमद या बिर्याणी उत्तम करतात. मैथिली दाक्षिणात्य पदार्थ सुरेख करते. यशोदा सगळंच छान करते, शिवाय तिचं प्रेझेंटेशन अत्युत्कृष्ट असतं. शैलू कोलते ही मूळ खानदेशातली. ती खानदेशी मिरचीची भाजी, कढी-मुठे, खिचडी-तेल असे पदार्थ अफलातून करते. तर जसा बुक-क्लब असतो तसा आमचा हा एक फुड क्लब आहे म्हणा ना! बुक-क्लबमधे जशी पुस्तकांवर चर्चा होते, तशी आमच्या या ग्रुपामध्ये खाद्य पदार्थांबद्दल चर्चा होत असते.

आमच्या कुटुंबाच्या खाद्यसंस्कृतीबद्दलच्या या लेखात विजय आणि मंगल केंकरेचा उल्लेख केला नाही तर हा लेख अपूर्ण वाटेल. हे दोघे आमच्या कुटुंबांचे जवळचे मित्र. 'साहित्य सहवास'च्या जवळच असलेलं त्यांचं घर म्हणजे आम्हा दोघांसाठी अगदी हक्काचं ठिकाण आहे. मनात आलं की मंगलला माशाच्या कालवणाची किंवा रस्सम वड्याची किंवा मिसळीची फर्माईश करायची आणि खायला जायचं असा आमचा शिरस्ता आहे. विजय-मंगलचं घर हे आमच्यासाठी फक्त आवडीच्या खाण्याचं ठिकाण नाही तर तिथे आमच्या आणि आमच्या मित्रमंडळीच्या सिनेमा, नाटक, संगीत, पुस्तकं आणि अर्थातच खाण्याबद्दलंही तासन्-तास गप्पा रंगतात.

माझ्या दोघी मुली सावनी-शर्वरीही (वय वर्षं १९ आणि १६) आता स्वयंपाक करायला लागल्या आहेत. अर्थात त्यांना रोजच्या जेवणातले पदार्थ करता येत नाहीत आणि ते शिकावेत असंही वाटत नाही. पण त्या दोघी जे काही करतात ते छान करतात. सावनीनं गेल्या ख्रिसमसमध्ये पूर्ण ख्रिसमसचा मेन्यू करून तिच्या मैत्रिणींना जेवायला बोलावलं होतं. शर्वरी जे काही करते ते फारच नीटनेटकं करते, जे पाहून मला फार बरं वाटतं. परवा तिनं अप्रतिम स्टफ्ड मश्रूम्स बनवले होते. मी काही दिवसांपूर्वी गंमत म्हणून फेसबुकवर एक रेसिपी पेज सुरू केलं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि बर्‍याच जणांनी सुचवलं की ब्लॉग सुरू केला तर आम्हाला हवं तेव्हा आम्ही रेसिपीज बघू शकू. मग मी ब्लॉग सुरू केला. रोजच्या जेवणातल्या साध्या रेसिपींबद्दल लिहायचं असंच मी ठरवलं आहे. अर्थात त्या-त्या सणाला किंवा विशेष दिवसाला खास रेसिपी मी टाकत असते. लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय असं मी निरंजनला सांगत होते, त्यावर शर्वरीची प्रतिक्रिया अशी - “आई हे बोअरींग खाणं लोकांना कसं काय आवडतं? किती बोअर रेसिपीज टाकतेस तू!” पिकतं तिथं विकत नाही हेच खरं!

काही वर्षांपूर्वी आम्ही स्वतंत्र राहायला लागलो. परवाच आम्ही काही मैत्रिणी गप्पा मारत होतो. तेव्हा आईच्या घरी गेल्यावरच आपल्याला आपल्या आवडीचं जेवायला मिळतं असा विषय चालला होता. मी म्हटलं की, अगं मी तर आता स्वतंत्र राहते. स्वयंपाक मी करते. मला कुणीच कसलंच बंधन घालणारं नाही (खरंतर एकत्र राहात होतो तेव्हाही नव्हतंच, पण लोक जास्त असल्यावर आपणच सगळ्यांच्या आवडीनिवडींचा विचार करतो) पण तरीही माझ्याकडे माझ्या आईसारखा स्वयंपाक होत नाही. मीही आईकडे गेल्यावरच माझ्या आवडीचे पदार्थ खाते. याचं कारण असं आहे की, आता माझ्या स्वयंपाकात माझ्या आजीची, आईची, काकूची, माझ्या मैत्रिणींच्या आयांची, माझ्या मैत्रिणींची आणि माझ्या सासूबाईंच्या पद्धतींची सरमिसळ झाली आहे. कुठेही एखादा पदार्थ खाल्ला आणि तो आवडला की आपण नकळत ती पद्धत उचलतो. शिवाय मुलींना आवडणारे इतर पद्धतींचे प्रकार मी करतेच. म्हणजे हमस किंवा श्वारमा हे लेबनीज प्रकार असतील किंवा बेक्ड फिशसारखे पाश्चात्य प्रकार असतील किंवा पाव भाजी, ओपन टोस्ट यासारखे फास्ट फूडचे प्रकार असतील, माझ्या स्वयंपाकाची पद्धत पूर्ण बदलून गेली आहे. आणि मला वाटतं की ते अपरिहार्य आहे. उद्या माझ्या मुली जेव्हा त्यांच्या घरी स्वयंपाक करतील तेव्हा त्यांची पद्धत तर अजूनच निराळी असेल नाही का?

या लेखाच्या निमित्तानं मी जेव्हा माझ्या स्वयंपाकावर प्रभाव पाडणार्‍या माझी आजी, आई, काकू, बहिणी, सासूबाई यांचा विचार करत होते, तेव्हा मला एक गोष्ट जाणवली. या सगळ्याजणी आपापलं घर सोडून एका नवीन वातावरणात राहायला आल्या, त्या वातावरणाला त्यांनी नुसतं आपलं म्हटलं नाही तर आपलंसं केलं. प्रत्येक माणूस हा लहानपणापासून आपल्या घरातल्या एका विशिष्ट प्रकारच्या खाण्याशी मनानं बांधला गेलेला असतो. जसंजसं आपण मोठं होतो, आपण खाण्यापिण्याचे वेगवेगळे प्रयोग करतो. म्हणजे मी आणि निरंजन कुठेही बाहेरगावी गेलो किंवा परदेशी गेलो तर आम्ही तिथे आपल्या पद्धतीचं खाणं शोधत नाही, तर तिथलं जे काही वैशिष्ट्य असेल असे पदार्थ आवर्जून खातो. आम्हाला ते मनापासून आवडतंही. पण असं असलं तरी जेव्हा बर्‍याच दिवसांनंतर घरी येतो, तेव्हा घरचा गरम वरण-भात किंवा पिठलं-भातच हवासा वाटतो. तो खाण्याची ओढ असते. याचं कारण मला असं वाटतं, की प्रत्येक घराचं एक कम्फर्ट फूड असतं. त्या घरातले सदस्य त्या कम्फर्ट फूडनं घट्ट एकत्र बांधले गेले असतात. आणि त्यामुळेच ते घर एकत्र राहतं. निदान मला तरी असं वाटतं.


***

पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' वर्षारंभ अंक (जानेवारी - २०१५)


***

हा लेख मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करण्यास परवानगी दिल्याबद्दल सायली राजाध्यक्ष व सुजाता देशमुख (संपादक, माहेर) यांचे मनःपूर्वक आभार.


***
विषय: 
प्रकार: 

स्वयंपाक करायला आवडतो त्यामुळे, लेख आवडला.

मात्र, रोजचा स्वयंपाक हे फक्त स्त्रियांचेच काम अथवा कर्तव्य असू नये असे मात्र मला आवर्जून आणि कळकळीने वाटते. आता बदलत्या काळानुसार त्यांच्यासारख्या अन्नपूर्णेनं असा आग्रह धरणे (म्हणजे जर त्या धरत असतील तर) योग्य नव्हे.

स्वयंपाकाचे स्तोम माजवू नये आणि होताहोईतो लागेल ती मदत घरातील सर्व सदस्यांनी करावीच, त्याशिवाय नैमित्तिक स्वैपाक पुरुषांनीही आवर्जून करावा. हे सहजगत्या करावे. तसेच चवींची गुलामगीरी आपण स्वतःच लादून घेतो. त्यामुळे ती आटोक्यात ठेवावी झालं.

१२-१४ तास नोकर्‍या करुन, वर पुन्हा सगळ्यांच्या रुची, आणि रुचीपालटाची काळजी घेणे हे वाटते तितके सोपे नाही. त्याची ' सक्रीय जाण' ठेवावी.

दुर्गाबाई भागवतांनी एका पुस्तकात म्हटलंय की, मला भारतातली जातव्यवस्था एकाच कारणासाठी आवडते आणि ते कारण म्हणजे वेगवेगळ्या जातींच्या खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमुळे आपल्याला कितीतरी प्रकारचं खाणं खायला मिळतं.>> १००% सहमत..

१२-१४ तास नोकर्‍या करुन, वर पुन्हा सगळ्यांच्या रुची, आणि रुचीपालटाची काळजी घेणे हे वाटते तितके सोपे नाही. त्याची ' सक्रीय जाण' ठेवावी.>> अगदी अगदी Happy

चिनुक्स धन्यवाद, छान लेख इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल ..

लेख खूपच आवडला.
मोहसीना मुकादम किंवा दुर्गाबाईंसारखे अन्न : संस्कृति आणि इतिहास असे लेखन वाचायला खूप आवडते.
आपली (चिनूक्स यांची) अन्नं वै प्राणा: ही माझी ऑल टाइम फेवरिट लेखमालिका आहे.
लक्ष्मीबाई धुरंधर यांचे हजार पाकक्रिया (किंवा तत्सम नाव), तमाम सारस्वतांची गीता असलेले रसचंद्रिका अशी जुनी पुस्तके म्हणजे एकप्रकारचे तत्कालीन संस्कृतिदर्शनच असते. कालनिर्णय ८७ हेही दुर्गाबाईंची अभ्यासू आणि मौलिक प्रस्तावना लाभलेले पुस्तक मला त्या प्रस्तावनेसाठीच आवडते. माझ्याजवळ एक सुमारे ८०-९० वर्षांपूर्वीचे पुस्तक आहे, त्यात चुली कशा पाडाव्यात, शेगड्या कश्या भराव्यात, बेगमी कशी करावी, नेटका संसार कसा करावा यासंबंधी अनेक सूचना किंवा टिप्स आहेत. तोळा, छटाक, शेर, पावशेर अशी मापे आहेत. कुसर/कुसरी किंवा उसर म्हणजे सुकवलेली भाजी हे मला अशी पुस्तके वाचल्यावर कळले आणि 'कसूरी मेथी' आपलीशी वाटू लागली. हे सर्व
वाचताना एका वेगळ्याच जगात गेल्यासारखे वाटते.

सुरेख लेख.
हीरा,
प्रतिसाद आवडला.'अन्न्पूर्णा" हे पुस्तक वाचताना तंद्री लागायची आणि लागलेली भूक मरूनही जायची.

हीरा,

>> कुसर/कुसरी किंवा उसर म्हणजे सुकवलेली भाजी हे मला अशी पुस्तके वाचल्यावर कळले आणि 'कसूरी मेथी'
>> आपलीशी वाटू लागली.

आयला, हे माहीत नव्हतं. मला वाटलं की पंजाबातल्या कुस्सूर गावाजवळ उगवणारी मेथी! Uhoh

आ.न.,
-गा.पै.