सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ६- हेमिस गोंपा

Submitted by मार्गी on 24 July, 2015 - 11:10

सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग २- बुधखारबू- फोतुला- लामायुरू- खालत्सी- नुरला
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ३- नुरला- ससपोल- निम्मू- लेह...

सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ४- लेह दर्शन
सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ५- सिंधू दर्शन स्थळ आणि गोंपा

सर्व माबोकर मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन आणि धन्यवाद...

६ जून! आज लेहला येऊन पाच दिवस होतील. लेहमध्ये इतके दिवस थांबण्याचा विचार नव्हता. पण थांबावं लागलं. हिमालयामध्ये अशा प्रवासात आपली योजना आपल्या मनातच राहते आणि प्रत्यक्षात जे असतं त्याप्रमाणेच पुढे जावं लागतं. आता हळु हळु हे बरंच स्पष्ट झालं आहे की, मला मनाली रोडवरही जाता येणार नाही आणि त्सोमोरिरीकडेही जाता येणार नाही; तेव्हा एकच लक्ष्य बाकी‌ आहे. खर्दुंगला! त्याला जगातला सर्वाधिक उंचीचा मोटरेबल रस्ता म्हणतात. पण वास्तवात तो सर्वाधिक उंच मोटरेबल रस्ता नाही आहे. कारण लदाख़मध्येच त्याहून उंच आणखी एक 'ला' आहे जो जीपेबल आहे. आणि तिबेटमध्येही ह्याहून जास्त उंचीचे रस्ते आहेत. खर्दुंगला लेहपासून फक्त ४० किलोमीटर दूर आहे. पण लेहपासून खर्दुंगलापर्यंत सुमारे २१०० मीटर उंचीचा घाट आहे; कारण खर्दुंगला ५६०५ मीटर उंचीवर आहे. लेहला आल्यानंतर लगेचच खर्दुंगलाला जावसं वाटलं; पण वातावरणामध्ये शरीराला चांगलं जुळवून घेता यावं म्हणून थांबलो. आता जर मनाली आणि त्सोमोरिरीकडे जाता येत नसेल तर खर्दुंगला तर जायलाच पाहिजे.

खरं बघितलं तर मी थोड्या भितीमुळेसुद्धा मनाली आणि त्सोमोरिरी रस्त्यावर जाऊ शकत नाही आहे. मनाली रस्ता तर अजून ६ जूनपर्यंत उघडलाच नाहीय; पण त्सोमोरिरी रस्त्यावर जाण्यासाठी थंडी आणि हवामान सोडलं तर काहीच अडचण नाही आहे. हां, एक समस्या अशी आहे की, वाटेत गावं फार थोडी आहेत आणि तीसुद्धा लांब- लांब आहेत. म्हणजेच दररोज किमान साठ- सत्तर किलोमीटर सायकल चालवावी लागेल. आणि दिवसाचं‌ तपमानही शक्यतो शून्यच्या जवळ असेल. इतक्या प्रतिकूल परिस्थितीसाठी तयार नसल्यामुळे मला जाता आलं नाही. पण ह्याची खंत राहील. कदाचित मी ह्याआधी हिमालयामध्ये एकदा जरी ४५०० मीटर उंचीच्या ट्रेकला गेलो असतो किंवा अशा उंच जागी कधी तंबूत राहिलो असतो, तर मी निश्चितपणे पुढे गेलो असतो. पण आत्ता तितकी हिंमत होत नाहीय. एका अर्थाने मी शिडीच्या खालच्या पायरीवर आहे. त्यामुळे इतकी मोठी उडी घेता येत नाहीय. जर दोन पाय-या जरी वर असतो, तरी पुढे जाऊ शकलो असतो. असो.

लेहमध्ये काही दिवस राहिल्यामुळे आळससुद्धा आला आहे. मनाची इच्छा होत नाहीय. जसं काही मनाला तीन दिवसाच्या सायकलिंगनंतर एक टेकण्याची जागा सापडली; रजई मिळाली; राहण्याची व्यवस्था झाली; त्यामुळे मन आळशी झालं आहे. ह्या खोलीबद्दलही आसक्त झालं आहे. इथून निघायला मन तयार होत नाहीय. पण नाही. पुढे जायचं आहे.

६ जूनची‌ सकाळही वेगळी नव्हती. काल संध्याकाळी पाऊस पडला होता आणि सकाळीसुद्धा पावसाचं लक्षण आहे. काही क्षण आकाशात ढगांचा गडगडाट झाला. जेव्हा लदाख़चे लोक ढगांचा आवाज ऐकतात, ते थोडे घाबरतात. कारण पूर्वी अर्थात् क्लायमेट चेंज/ ग्लोबल वॉर्मिंगच्या आधी इथे पाऊस फार थोडा पडायचा. लदाख़मध्ये पावसाचा मुख्य स्रोत पहाडी नद्यांचं पाणी आणि बर्फ पडल्यानंतर येणारं पाणी हाच आहे. अर्थात् पर्वतावरचा बर्फ हाच पाण्याचा स्रोत आहे. उन्हाळ्यात बर्फ वितळतो आणि जलधारा निघतात. सिंधू, जांस्कर, श्योक अशा नद्या उन्हाळ्यात वाहतात आणि हिवाळ्यात अधिक प्रमाणात गोठतात. पाऊस आणि मान्सून इथे थोड्याच प्रमाणात येतो.

पण गेल्या काही वर्षांपासून हिमालयाच्या उंच पर्वतरांगांना ओलांडून मान्सूनही इथे येतो आहे आणि त्यामुळे नुकसानंच होतं आहे. १० ऑगस्ट २०१० रोजी लेहजवळ क्लाउडबर्स्ट झालं. ढग गडगडले की लोकांना तेच आठवतं. त्या वेळी मोठी हानी झाली होती. त्यानंतर लदाख़मध्ये पाऊस वारंवार पडू लागला. हे लिहितानासुद्धा पहाडी राज्यांमध्ये पावसाचा कहर सुरू झाला आहे. जम्मू- श्रीनगर मार्ग बंद झाला आहे. चार धाम यात्रा स्थगित करण्यात आलेली आहे. खरं तर लदाख़ला हिमालयापलीकडील प्रदेश (ट्रान्स हिमालयन रिजन) म्हणतात. भौगोलिक दृष्टीने हा तिबेटच्या पठाराशी जोडलेला प्रदेश आहे. पण इथेही आता मैदानी प्रदेशांप्रमाणे पाऊस पडतो आहे. त्यामुळे प्रश्न पडतो की, मग लदाख़मध्ये येण्याचा सर्वांत चांगला काळ कोणता? जून ते ऑक्टोबरमध्येच लदाख़मधले बहुतांश रस्ते सुरू असतात आणि हवामान थोडं गरम असतं. पण आता ह्या चार महिन्यांमध्येही पावसाचा अडथळा येतो. मागच्या वेळेस २०११ ऑगस्टमध्ये आलो होतो; तेव्हासुद्धा मनाली रस्ता बंद झाला होता. जून महिना संपताना मान्सूनने लदाख़कडे जाणा-या हिमाचल आणि कश्मीरच्या रस्त्यांवर प्रवेश केला आहे. म्हणून लदाख़मधली कनेक्टिव्हिटी मर्यादित झाली आहे. ह्या वेळी ऑगस्टच्या ऐवजी जूनचा विचार केला; कारण मान्सून सुरू होण्याआधी प्रवास पूर्ण करायचा होता. पण त्याचा फटका असा बसला की, मनाली- लेह रस्ताच बंद मिळाला. जर जुलै- ऑगस्टमध्ये आलो असतो; तर तांत्रिकदृष्ट्या रस्ते चालू मिळाले असते. पण तरीही मान्सूनचा कहर; वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ढगफुटी आणि लँड स्लाईडची शक्यता. तसंच जसा लदाख़मधला उन्हाळा पुढे जातो; पर्वतातून बर्फ वितळून खाली येतो. त्यामुळे रस्त्यांवर मोठे धोकादायक नाले वाहू लागतात. थोडक्यात सांगायचं‌ तर लदाख़ला येण्याची विंडो छोटी होत आहे. आणि त्यातला सर्वांत महत्त्वपूर्ण घटक नशीबसुद्धा आहे. आपण ज्या रस्त्यावर आणि ज्या भागात जात असू; तिथे रस्ते तर सुरू राहिलेच पाहिजेत; पण लँड स्लाईड व्हायला नको; टोकाचा बर्फ पडायला नको. आणि क्लायमेट चेंज व ग्लोबल वॉर्मिंगनंतर तर हवामाचा काहीच अंदाज लावता येत नाही. असो.

... सकाळी दहा वाजता अचानक हवामान बदललं. बघता बघता ऊन पडलं आणि अर्ध आकाश निरभ्र झालं. आज सायकलवर दूर नक्की फिरता येईल तर! खर्दुंगलाशिवाय एक ठिकाण अजून बाकी आहे. जसं खर्दुंगला सर्वाधिक उंच ठिकाणांपैकी एक आहे; तशीच ही जागासुद्धा विशेष आहे. लदाख़मधला सर्वांत मोठा गोंपा- हेमिस! तिथे गेलो तर खर्दुंगलाला जाण्याआधी थोडं वार्म अपसुद्धा होईल. हेमिस गोंपा मनाली रोडवरील कारूपासून सात किलोमीटर आहे आणि चोगलमसरपासून सुमारे छत्तीस किलोमीटर आहे. तिथे थोडा चढसुद्धा आहे. आत्ता साडे दहा झाले आहेत. आत्ता निघालो तर संध्याकाळपर्यंत परतसुद्धा येऊ शकतो. एक क्षण वाटलं की, हा जुगार तर नाही! पण आतल्या आवाजाने सांगितलं की, हवामान इतकं बदललं आहे तर ही संधी सोडू नकोस. लवकरच मी बाहेर होतो.

इथून शे, ठिकसे, स्टॅक्ना आणि कारू ह्या रस्त्याने हेमिस गोंपा! हा रस्ता सिंधू नदीसोबतच जातो. खरोखर ह्या लदाख़ प्रवासाला सिंधू यात्रासुद्धा म्हणता येईल. रस्त्यामध्ये शे आणि ठिकसेच्या वास्तू मागच्या वेळेस बघितल्या होत्या आणि इतक्या आकर्षक वाटल्या नव्हत्या. म्हणून बाहेरूनच त्यांना जुले जुले केलं आणि पुढे निघालो. ह्या रस्त्यावर विशेष हे दिसलं की, वस्ती जवळजवळ अखंड सुरू आहे. केरळच्या गावांमध्ये आपण बघतो त्याप्रमाणेच. तिथे गावं‌ संपतच नाहीत. एक गाव संपायच्या आधीच दुसरं सुरू. इथेही तसंच. स्टॅक्नाच्या नंतर थोडी सामसुम झाली. नजारे अद्भुत आहेतच! खरं तर लदाख़चा अनुभव शब्दांच्या पलीकडे आहे. फोटो, व्हिडिओसुद्धा अपुरे आहेत. कुठे सूर्य आणि कुठे त्याचं प्रतिबिंब! असो.

कारूच्या आधी एक वेगळीच जागा आहे. इथे शिंदे मोड नावाचा एक बोर्ड आहे. मागच्या वेळी जेव्हा आम्ही मित्र आलो होतो; तेव्हा आमच्या ड्रायव्हरने त्याची कहाणी सांगितली होती. ती अजूनही पूर्ण लक्षात आहे! तेव्हा आमचे ड्रायव्हर हैदरभाईंनी सांगितलं होतं की, एक मिलिटरी अधिकारी होता शिंदे. रस्त्यावर ह्याच जागी अपघातात तो गेला. त्यानंतर मध्यरात्री इथून ज्या गाड्या जातात; त्यातल्या काही जणांनी त्याला बघितलं आहे! जेव्हा गाडीत ड्रायव्हर एकटाच असतो; तेव्हा 'शिंदे मोड' पाशी तो गाडीमध्ये येतो आणि ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसून फक्त सिगारेट मागतो. करत काहीच नाही. पण भेटतो तर खरा. हैदरभाईंनी सांगितलं होतं की, एका ड्रायव्हरचा त्यावर विश्वास बसला नाही आणि म्हणून तो रात्री उशीरा लेहमधून हे खरं आहे का खोटं हे बघायला निघला! आणि तेव्हा त्याला तो शिंदे भेटला! तेव्हापासून सगळे‌‌ ड्रायव्हर्स तसं मानतात. त्यावेळी रस्त्यावर 'शिंदे मोड' स्पष्ट लिहिलं होतं.

आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, जेव्हा आम्ही त्सोमोरिरीहून परत येत होतो; तेव्हा कारूमध्ये पोहचतानाच रात्रीचे साडे आठ वाजले होते. आम्ही तिघे आणि ड्रायव्हर होतो. पण योगायोगाने ड्रायव्हरजवळ मीच बसलो होतो. आणि हो ना हो, योगायोगाने आम्हांला शिंदे मोडजवळच रस्त्यावर एक मिलिटरी अधिकारी भेटला! आणि तोसुद्धा अनपेक्षित प्रकारे रस्त्यावर मांडी घालून बसला होता. जसा जेवायलाच बसला आहे. आणि तेही रस्त्याच्या मधोमध. हैदरभाईंनी विलक्षण शिताफीने गाडी वळवून समोर नेली. त्यावेळी गाडीमधलं वातावरण अजून विसरू शकलेलो नाही!!! आणि दुसरी गमतीची गोष्ट म्हणजे मी जेव्हा त्या रात्री उशीरा चोगलमसरला पोहचत होतो; तेव्हा प्रोद्युतजी मला अजून पुढे यायला सांगत होते! तेव्हा एका क्षणी वाटलं की, ते अजून किती पुढे बोलावत आहेत! शिंदे मोड आला तर? त्या रात्री रस्त्यावर जागत बसलो असतानासुद्धा मी शिंदेची वाट बघत होतो! पण तो आला नाही!

तेव्हा कारूच्या आधी ह्या शिंदे मोडवरून जायचं आहे. इथे सिंधू नदीसोबत जाणा-या रस्त्यावर काही वळणं आहेत. वाट बघत होतो; शिंदे मोडचा परिसर आला; कारूसुद्धा जवळ आलं; पण शिंदे मोड दिसला नाही. कदाचित बीआरओने आता तो बोर्ड हटवला असेल..

कारू पोहचायलाच तीन तास लागले. इथून एक रस्ता चांगलामार्गे पेंगाँग त्सोकडे जातो. एक रस्ता उपशीमार्गे मनालीकडे जातो. इथे चांगले आलू पराठे मिळाले. इथून आता हेमिस! सिंधू नदीचा रोमहर्षक किनारा! इथे एक विदेशी सायकलस्वारही भेटला. तो न थांबता पुढे निघून गेला. तोसुद्धा हेमिसलाच जातोय. पण कारूच्या पुढे सात किलोमीटर चढताना हाल झाले. पहिले दोन किलोमीटर तर सायकलीवर जाता आलं; पण त्यानंतर चांगलाच चढ होता. थोड्याच वेळात पायी पायी! “सजन रे झूठ मत बोलो; खुदा के पास जाना है| हाथी न घोड़ा है बस पैदल ही जाना है!”

कारूमधून हेमिसला पोहचायला दिड तास लागला. ऊर्जा स्तर अगदीच कमी झाला आहे. मध्ये मध्ये शेतांमध्ये लदाख़ी शेतकरी भेटले. त्यांनी प्रोत्साहन दिलं. बैलांसोबत शेतात कसणारे शेतकरी लदाख़ी गाणी म्हणत आहेत. जून ते ऑक्टोबर हे चारच महिने लदाख़मध्ये सर्वाधिक कामं होतात. इथे उंची सुमारे ३५०० मीटर आहे. त्यामुळे थोडी शेती होऊ शकते. समोर लांबवर विदेशी सायकलस्वार पुढे जाताना दिसतोय. नक्कीच तो सायकलवरच जातो आहे. हेमिस येण्याच्या थोडं आधी तो परत क्रॉस झाला. हात आणि स्मितहास्याने परस्परांचं अभिवादन केलं!

हेमिस गोंपा! ख्रिश्चन मान्यतेनुसार जीसस क्राईस्ट वय १८ ते ३० कुठे होते ह्याची काही माहिती मिळत नाही. त्यांच्या जीवनातील ह्या कालखंडाबद्दल ख्रिश्चन शास्त्रे मौन आहेत. परमहंस योगानंद आणि ओशो सारख्या ज्ञानी व्यक्तींनी म्हंटलं आहे की, जीसस ह्या काळात पूर्वेमध्ये आले होते आणि भारत आणि तिबेटमध्ये त्यांनी ज्ञान प्राप्त केलं. त्याच कारणामुळे त्यांचा उपदेश परंपरागत यहुदी विचारधारेपेक्षा वेगळा झाला आणि शेवटी त्याच परंपरागत यहुद्यांनी त्यांना सुळावर चढवलं. परमहंस योगानंद आणि ओशो म्हणतात की, जीसस १८ ते ३० वयाच्या काळात भारतात कश्मीरमध्ये आणि तिबेटला आले होते. इतकंच नाही तर जीससना सुळावर चढवल्यानंतर त्यांचा मृत्यु झाला नव्हता आणि नंतरही ते भारतात आले होते. असे म्हंटले जाते की, गौतम बुद्ध, झरतुष्ट्र, मोझेस, लाओत्से, बोधिधर्मा ह्या परमज्ञानी व्यक्तींप्रमाणेच जीससनीसुद्धा आपली जीवन यात्रा हिमालयातच समाप्त केली. ह्याचा पुरावा कश्मीरच्या पहलगाममध्ये आहे जिथे एक प्राचीन यहुदी समुदाय अजूनही राहतो. पहलगाममध्ये जीजस ह्यांच्या काही खुणाही आढळतात. उल्लेखनीय आहे की, परमहंस योगानंद आणि ओशोंच्या म्हणण्याप्रमाणे जीसस ह्यांनी जिथे ज्ञान मिळवलं; त्या ठिकाणांमध्ये एक स्थान हेमिस गोंपासुद्धा आहे. त्या संदर्भात स्वामी स्वामी अभेदानन्द ह्यांनी रिसर्च केला होता आणि त्याची काही माहिती इंटरनेटवरसुद्धा उपलब्ध आहे. हो ना हो, अनेक ज्ञानी व्यक्तींचं म्हणणं आहे की, जीससला मिळालेलं ज्ञान पूर्वेकडून मिळालं होतं. ही गोष्ट मान्य करण्याची गरज नाही; फक्त काही लोकांचं असं मत आहे, इतकं जाणून घेतलं तरी पुरेसं आहे. असो.

हेमिस पोहचताना इतका थकलो होतो की, वाटतंय जाताना लिफ्ट घ्यावी. इथे अनेक व्हॅन्स परत जात आहेत. लेहमधून हेमिसला जाण्याआधी काही जणांनी सांगितलं होतं, की हेमिस गोंपा इतका श्रीमंत आहे की, जर जम्मू- कश्मीर सरकारकडे पैसे नसतील; तर पूर्ण राज्याचा कारभार हा एकटा गोंपा एक वर्ष तर संभाळूच शकतो. हेमिस गोंपा आजवरच्या गोंपांपेक्षा वेगळा वाटला. विशाल बुद्धमूर्ती आणि पर्वताच्या मधोमध! आत म्युझिअमसुद्धा आहे. दुपारचे साडेतीन वाजले आहेत; त्यामुळे जास्त वेळ नाहीय. निघताना वाटलं की, चला, कारूपर्यंत उतारच आहे. तिथपर्यंत सायकलवर जातो. कारूमध्ये परत नाश्ता केल्यानंतर ऊर्जा मिळाली. आत्ता साडेचार वाजलेले आहेत. तीन तासांमध्ये पोहचेन. अंधार व्हायच्या आधीच चोगलमसर पोहचेन. पुढे निघालो. शिंदे मोडच्या जवळच एक बोर्ड मिळाला. कॅप्टन आर. शिंदेंचं‌ स्मरण चिह्न. बहुतेक 'शिंदे मोड' बोर्ड काढला आहे.

परत जातानाही अजिबात पाऊस पडला नाही. फक्त एक चहाचा ब्रेक घेऊन प्रवास पूर्ण झाला. जिथे चहा घेतला, तिथे दोन मुलांनी सायकल चालवून बघितली. ठिकसेजवळ छानसं इंद्रधनुष्य दिसलं. अंधार तर राहोच; सूर्य मावळायच्याही आधी सात वाजता चोगलमसरला पोहचलो. सांगणे न लगे की, चोगलमसरच्या छोट्या चढानेही त्रास दिला. प्रोद्युतजींच्या रूमवर पोहचेपर्यंत ऊर्जा होती. त्यानंतर जो थकवा आला; तो दुस-या दिवशी उठेपर्यंत होता. थोडं ताप आल्यासारखंसुद्धा वाटतं आहे. सायकलिंगच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रवासानंतर थोडा वेळ ताप यायचा. रात्री इच्छा नसूनही थोडं जेवण केलं. इतका थकलो होतो की, उद्याच्या प्रवासाचा विचारही करू शकत नाहीय. आज सुमारे बहात्तर किलोमीटर सायकल चालवली. आणि कारूला जाऊन आलो; त्यामुळे मी नाम के वास्ते म्हणू शकतो की, मीसुद्धा 'मनाली- लेह' रस्त्यावर सायकल चालवली आहे! हा हा!


काय आपणसुद्धा आपल्या उगमाच्या दिशेने पुढे जाऊन अशी जीवनधारा प्राप्त करू शकतो?


जैसे... बरसों में‌ कोई... सिन्धू नहाए... धूल सा गया है ये मन खुल सा गया हर बन्धन... जीवन अब लगता है पावन मुझको. . . .


आज एकूण सुमारे ११०० मी. चढ. जाताना जास्त चढ व येताना जास्त उतार.

पुढील भाग: सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ७- जुले लदाख़!!

मूळ हिंदीमधील ब्लॉग:
साईकिल पर जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना

साईकिल पर जुले लदाख़ भाग १- करगिल- मुलबेक- नमिकेला- बुधखारबू
साईकिल पर जुले लदाख़ भाग २- बुधखारबू- फोतुला- लामायुरू- खालत्सी- नुरला


साईकिल पर जुले लदाख़ भाग ३- नुरला- ससपोल- निम्मू- लेह...

साईकिल पर जुले लदाख़ भाग ४- लेह दर्शन

साईकिल पर जुले लदाख़ भाग ५- सिंधू दर्शन स्थल और गोंपा

साईकिल पर जुले लदाख़ भाग ६- हेमिस गोंपा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी! मस्तच भाग Happy

मला तिथल्या रस्त्यांचा हेवा वाट्तो. मागे केदारच्या लेखमालिकेत तो म्हणाला तसं आपल्याइथल्या रस्ते बांधकामवाल्यांनी बिआरोकडून ट्यूशन्स घ्यायला हव्यात. खरंच त्या लोकांनी भर डोंगरांमध्ये दुर्गम भागांत कसले काळेशार गुळगुळीत रस्ते बांधलेत. नाही तर इथे, भर सिटीतही आनंदच आनंद रस्त्यांच्या नावानी...

काय आपणसुद्धा आपल्या उगमाच्या दिशेने पुढे जाऊन अशी जीवनधारा प्राप्त करू शकतो? >>>

यावरुन श्रीसमर्थांच्या या ओवीची आठवण झाली ... "एक बळाचे निवडले | ते उगमाकडे पोहत गेले | उगमदर्शनी पावन झाले | तीर्थरुप || दासबोध ||"

मस्त प्रवास चालू आहे तुमचा...

शिंदे मोड -आश्चर्यकारक
हेमिस गोंपा - भारी प्रकरण दिसते आहे हे ...

यावर्षी हिमाचलात दोन महिने काढले तरी मनाली हून लेह लदाखला जायचा रस्ता बंद होता..

यू आर लकी..

मस्त वाटलं वाचताना..