इंग्लिश मिडीअम मध्ये शिकणारी मराठमोळी मुलं

Submitted by पल्लवी अकोलकर on 11 July, 2015 - 09:00

नुकतेच मुलांच्या परीक्षेचे टाईम-टेबल मिळालेले आहे.
त्यामुळे सध्या घरात अभ्यासाचे वातावरण आहे.
अभ्यासाचे म्हणण्यापेक्षा, आभासाचे म्हणणे जास्त योग्य ठरेल.
असो,
टाईम-टेबलवर नजर टाकल्यावर मी नकळतच निवांत झाले होते.
पहिलाच पेपर मराठी भाषेचा आहे.
म्हणलं, चला मराठीचा पेपर म्हणजे, सुरुवात तरी चांगली आहे.
निदान विषय तरी सोप्पा आहे.
कारण अर्थातच, इंग्लिश मिडीअमच्या विद्यार्थ्यांना, लोअर लेव्हलचे मराठी असते.

पण माझ्या, इयत्ता ५ वीच्या मुलाचा अभ्यास घेतांना लक्षात आले, प्रकरण फारच गंभीर आहे.
घरात जरी मातृभाषा बोलली जात असली तरी, इंग्लिश मिडीअमच्या मुलांचे, मराठीचे ज्ञान किती अगाध असू शकते, याची प्रचिती, मला मुलाचा अभ्यास घेतांना आली.
माझा मुलगा, आणि त्याचा मित्र दोघेही अभ्यासाला बसल्यावर, मी त्यांना समानार्थी शब्द विचारायला सुरूवात केली.
मी : वाढदिवस = ? त्यांचे उत्तर : बर्थ डे
मी : पाचोळा = ? त्यांचे उत्तर : वाळलेल्या झाडांचा कुस्करा (?)
मी : पक्षी = ? त्यांचे उत्तर : पशू
मी : तोंड = ? त्यांचे उत्तर : थोबाड
मी : रात्र = ? त्यांचे उत्तर : गगन
मी : निधन = ? त्यांचे उत्तर : डोळे
इतका वेळ संयमाने घेत असूनही, हळूहळू माझा पारा चढायला लागला.
मी म्हणाले, निधन म्हणजे डोळे?
तर ते आत्मविश्वासाने ’हो’ म्हणाले.
मी विचारले, काय संबध ? निधन म्हणजे मृत्यू!
तर ते म्हणाले, ओके ओके, आत्ता आठवलं, नयन म्हणजे डोळे...”आमचा थोडा(?) गोंधळ झाला.”
अशा रितीने त्यांना, बहर, मोहोर इत्यादी शब्दांचा अर्थ समजावून सांगूनही लक्षात येत नव्हते, या दोन्हीत नक्की काय फरक आहे.

माझा पुढचा प्रश्न होता :-
पुढील शब्दांचे अनेकवचन सांगा.
मी : आंबा? त्यांचे उत्तर : आंबेज
अशा रितीने आमच्यात, अभ्यास कमी आणि खडाजंगीच जास्त होवू लागली.
संतापाच्या भरात मला काहीही बोलता येत नव्हते.

मी मैत्रीणीला, माझे दू:ख सांगितल्यावर, तिने तिच्या दू:खाची त्यात भर टाकली.
तिच्या मुलाने, "पुढील शब्दांचे वाक्यात उपयोग करा" नावाचा प्रश्न पुढीलप्रमाणे सोडविला होता.
१. तुरुतुरु : मी तुरुतुरु जेवतो.
२. थूई थूई : पाऊस थूई थूई पडतो.
३. सळ सळ : नदी सळसळ वाजत होती.
४. मुळूमुळू : मोर मुळूमुळू चालत होता.
५. रिमझिम : मी रिमझिम नाचतो.
आता, यात नेमकं काय चूकलं आहे, हे त्याला समजावून सांगणे हे, माझ्यासारखेच माझ्या मैत्रीणीच्याही आवाक्याबाहेरचे होते.
कारण हसण्यातच आमचा बराच वेळ गेला.
परंतु, परिस्थिती अशी आहे, आपल्यास जे शब्द कानाला ऐकून सहज सोपे वाटतात, ते ह्या मुलांच्या डोक्यावरून गेलेले असतात.
आणि चूक त्यांचीही नाहीये, कारण मुळूमुळू, रिमझिम सारखे शब्द आपल्या बोली भाषेतही क्वचितच येतात.

पण त्यामुळे, मला अचानकच एक शोध लागला आहे, तो म्हणजे जगातील सगळ्यात आनंदी, आणि हसून गडाबडा लोळणारी व्यक्ती कोण असू शकते?
तर ती म्हणजे, इंग्रजी मिडीअमच्या शाळेतील, मराठी विषय शिकवणारी शिक्षिका.

निबंध लिहा,
"माझा आवडता प्राणी"
माझा आवडता प्राणी कुतरा आहे.
आता एखाद्या निबंधाची सुरूवातच अशी असेल, तर विचार करा, पुढे किती गमती जमती असतील.
”माझे आवडते फळ”
पहिलीच ओळ.....
माझे आवडते, फळ कलंगड आहे.
ते वाचून मी म्हणाले, अरे कलंगड काय ? ते कलिंगड असते.
माहीत नाही तर, एवढे अवघड फळ लिहावे कशाला परीक्षेत ? आंबा तरी लिहावे. सोप्पे आहे ना लिहायला...
झेपत नाही तर अवघड काहीतरी लिहू नये माणसाने.
त्यावर मुलाचे उत्तर असे होते, माझे आवडते फळ कलिंगडच आहे, आणि तसंही आंबा सगळ्याच मुलांनी लिहीले होते, मग काही तरी वेगळे म्हणून मी हे फळ लिहीले आहे.
मी म्हणलं, म्हणजे तुला मार्कही सगळ्यांपेक्षा वेगळेच पडणार आहेत, असं दिसतंय.

एकदा मुलाला, मी पोलीस आणि चोराची गोष्ट सांगत होते.
गोष्टीच्या शेवटी मी मुलाला म्हणाले, ”अशा रितीने, पोलीस त्या आरोपीला पकडतात.”
ते ऐकल्यावर त्याने थंड आवाजात प्रश्न विचारला, लॉँग-फॉर्म काय?
मी विचारले, कशाचा लॉँग-फॉर्म ?
त्याने विचारले, आरोपीचा ?
त्याला आरोपी म्हणजे R-O-P असे वाटले.
ऐकून माझ्यावर ढसाढसा रडण्याचीच वेळ आली.

कधी कधी विचार मनात येतो, का मी माझ्या मुलांना इंग्लिश मिडीअममध्ये घातलं?
मुलांनी पाढे म्हणावेत असे जेव्हा मला वाटते, तेव्हा त्यांना असे सांगावे लागते, ”मुलांनो, टेबल्स म्हणा रे..."
मग ते ओरडून, ”आम्ही टेबल्सही म्हणणार नाही आणि चेअर्सही..." असले फालतू विनोद करतात.
”बे एके बे’... ची लय आणि सर कुठूनही, ” टू वन्स आर टू..." ला काही केल्या येत नाही.
त्यामुळे मुलांकडून पाढे म्हणवून घेतांना, पाढे पाठ असूनही, नेहमी पाढ्यांचे पुस्तक आधी हातात घ्यावे लागते.

अभ्यासाचे पुस्तक वाचले का? विचारल्यावर, मुलगा म्हणतो, ”ते मी कधीच Mind मध्ये read केलंय..."
काय उत्तर आहे वा...ना धड इंग्रजी, ना धड मराठी.
हे असं असल्याने, शिवाजी महारांजाच्या थोर इतिहासातील, "गड आला पण, सिंह गेला" या वाक्यातील गंभीरता, मुलाला इंग्रजीत समजावून सांगतांना, मी निश्चितच कमी पडते.

मध्यंतरी शाळेतून फोन आला, तुम्ही तुमच्या मुलांशी घरी इंग्रजीतून बोलत जा.
कारण शाळेत आम्ही जे इंग्रजीत बोलतो, ते पूर्णपणे तुमच्या मुलीला समजत नाहीये.
मी म्हणाले, अहो, घरात कुठल्याही भाषेत बोलण्यापेक्षा, मुलांवर ओरडण्याचीच वेळ जास्त येते.
मग इंग्रजीतून परिणामकारक वाटेल असे, मी मुलांवर नेमके कसे ओरडू ज्यामुळे माझी, त्यांच्यावर (थोडी तरी) दहशत बसेल...?
म्हणजे, पु. लं नी विचारल्याप्रमाणे, इंग्रजीत कसे गहीवरतात हो ?
त्याप्रमाणे, इंग्रजीतून कसे खेकसतात हो? असे निदान मला तरी विचारावेसे वाटते.
आणि तसंही, मुलांशी मराठीत बोलूनही, त्यांच्या मराठीची ही अशी बिकट अवस्था आहे, तर इंग्लिशमध्ये बोलल्यावर काय होईल ? असाही प्रश्न आहेच.
या बिकट अवस्थेत, ही मुलं, कुसूमाग्रज, पु.ल. कधी वाचणार?
आणि कधी ती त्यांना समजणार व आवडणार असा विचार मला बर्‍याचदा अस्वस्थ करून जातो.

माझ्या, कॉन्व्हेंट-स्कूल मध्ये शिकणार्‍या, लहान मावस भावानेही, एकदा असाच दारूण विनोद केला होता.
आमची घरात, मराठी वाङ्मय या विषयावर चर्चा चालली असता, त्याने विचारले होते, वाङ्मय...? ”हे कोणाचे आडनाव आहे’?
मी म्हणाले, आडनाव नाही रे, वाङ्मय म्हणजे साहित्य.
त्यावर तो म्हणाला, ओके, You mean tools? त्यावर त्याला, tools नाही रे, वाङ्मय म्हणजे, साहित्य, आणि साहित्य म्हणजे लिटरेचर... आणि लिटरेचर म्हणजे काय, तर त्यासाठी तूला थोडे मोठे व्हावे लागेल असे समजावून सांगतांना, केलेली बोळवण मला अजुनही आठवते.
आमच्या लहानपणी, आम्ही किशोर, चांदोबा, विचित्र विश्व, भा.रा. भागवतांचे फास्टर फेणे इत्यादी बालसाहीत्य वाचले.
आज जेरोनिमो स्टील्टन, टीन-टीन, आस्क मी व्हाय? चा जमाना आहे.

मुलांचं आपल्यासारखे पुढे काही अडू नये म्हणून, त्यांच्यासाठी इंग्रजी माध्यमाची शाळा मी निवडली.
मात्र, मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने, आपलं नेमकं काय अडलं, याचा शोध मला अजुनही लागलेला नाही.
आणि जे काही अडलं, त्यात भाषेचा खरंच काही संबध होता का, असा प्रश्न जेव्हा मी स्वत:ला विचारते, तेव्हा त्यांचे उत्तर निश्चितच, ’नाही’ असे येते.
माझ्या आजूबाजूला कित्येक मंडळी मी अशी बघितली आहेत, जे आपापल्या मातृभाषेतून शिकूनही आयुष्यात प्रचंड यशस्वी झालेली आहेत.
ज्यांनी समाजात मोठं नाव आणि प्रतिष्ठा कमावलेली आहे.
थोर असे, धिरुभाई अंबानी यांनी तर विशेष असे कुठलेही शालेय शिक्षण न घेताही, आयुष्यात दैदीप्यमान असे यश प्राप्त केले आहे.

असो,
एकूणच, इंग्रजी माध्यमातल्या शाळेत घालून मराठीभाषेच्या सुधारणेसाठी, मी माझ्या मुलांकडून, कधी हतबल होवून, तर कधी जोमाने, प्रयत्न करत रहाते.
आणि आज ना उद्या, निदान या दोन्ही भाषेंवर तरी ते अधिपत्य गाजवतील अशी आशा करते.
बाकी, परदेशी भाषा जसे फ्रेंच, चायनीज, जपानी, किंवा जर्मन तर फारच लांबचा पल्ला आहे.
https://www.facebook.com/PallaviAnecdotes

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलेय..

मुलाची शाळेतली भाषा कुठलीही असली तरी मुलाच्या लहानपणापासुन आपण त्याच्यासाठी वेळ काढुन, आपले डोके शांत ठेऊन त्याच्या लेवलला उतरुन जर त्याला मराठी/इंग्रजी/इतर कुठलीही मातृभाषेतली पुस्तके वाचुन दाखवली, अर्थासकट समजावली तर फारसा त्रास होणार नाही. मुळात भाषा हा विषय शाळेत अभ्यासायचा विषय म्हणुन न घेता मुल दिडदोन वर्षांचे झाल्यावर त्याची बाहेरच्या जगाशी ओळख होण्याचे एक साधन म्हणुन घेतला आणि या कामात आपण मुलाच्या वयाचे मुल होऊन रमलो तर मुलाला भाषा हा एक विषय म्हणुन सुद्धा आवडायला लागेल आणि कालांतराने त्याला कदाचित पुल, कुसूमाग्रजही आवडायला लागतील.

(रच्याकने, तसे आवडले नाहीत तरी काही फरक पडत नाही. ही सगळी मंडळी आपल्याला जरी खुप जवळची असली तरी शेवटी जे साहित्य कालातीत असते ते पिढ्यांपिढ्या टिकते. मुलांना ते आवडावे यासाठी आपण धडपड करु शकतो. फक्त ह्या धडपडीत मुलांना एकुणच साहित्य या विषयाबद्दल तिटकारा निर्माण होणार याची काळजी घेणे आवश्यक आहे. Happy )

आता अशी परिस्थिती असल्यावर कुठल्या तोंडानी मराठी चा अभिमान बाळगायचा?
मला असे वाटते की हे महाराष्ट्रा चे दुर्दैव आहे

प्रश्नः खरी मराठी भाषा कोणती? भाषा तर बदलतच असते. बहुसंख्य लोक जसे बोलतात ती खरी भाषा असे मानले तर त्या बिचार्‍या शिक्षकांचा काय दोष? त्यालाच भाषा म्हणायचे झाले! नाहीतरी कसली मराठी, अर्धे अधिक इंग्रजी शब्द वापरून लिहीतात, बोलतात. वाचन नाही, मग अगदी सोप्या शब्दांचीहि आयत्या वेळ आठवण होत नाही म्हणून खुषाल इंग्रजी घुसडायचे.
सगळ्यात वैताग येतो म्हणजे इथून भारतात पुण्या मुंबईला अस्सल मराठी नातेवाईक सुद्धा आमच्याशी इंग्रजीतून बोलतात नि त्यांचे भारतीय इंग्रजी मुलांना विनोदी वाटते. आम्ही आपले मराठीतूनच बोलतो. आणि अमेरिकेत सगळे इंग्रजीतून.
वाचन हा मुख्य मुद्दा आहे, जेव्हढे अधिक वाचाल तेव्ह्ढे कुठल्याहि भाषेतले अधिक शब्द, चांगली शब्दरचना शिकाल. नाहीतर उगाच सिनेमात नि रस्त्यावर ऐकलेली टपोरी भाषाच बोलणार.

नाऊ प्लिज डोन्ट आस्क मी टू ट्रान्सलेट इन इन्ग्लिश "दुखर्‍या नसेला हात घातलात"... फिदीफिदी )
च्च! अहो तुम्ही कोकाटे यांचा फाड फाड इंग्रजीचा क्लास घेतला असतात तर लग्गेच
Don't insert hand in my paining nerve असे पट्कन लिहून टाकले असते! म्हणजे आम्हाला कळले असते की तुम्ही उच्चभ्रू, श्रीमंत, शिवाय मराठीचे अभिमानी. अश्या लोकांसारखे भारतात इंग्रजी माध्यमातून शिकलात.
Light 1 Happy

वाचन हा मुख्य मुद्दा आहे, जेव्हढे अधिक वाचाल तेव्ह्ढे कुठल्याहि भाषेतले अधिक शब्द, चांगली शब्दरचना शिकाल. नाहीतर उगाच सिनेमात नि रस्त्यावर ऐकलेली टपोरी भाषाच बोलणार +१००००

आणि ह्याची सुरवात जितकी लवकर तितके चांगले.

मस्त लेख.. ( आधी वाचल्यासारखा वाटतोय, फेसबूक वर नाही )

आरोपी चा फुल फॉर्म.. रॉयल ओमान पोलिस !!

लेख छान आहे.
या मुलांचा अभ्यास घ्यावा लागतो हीच खंत आहे. आपल्या पालकांनी घेतला का कधी .....? तरीही शिकलोच कि
याबाबतीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची वाटते. चांगले शिक्षक असतील तर मुले आवडीने वाचतात.

इथे अगदी सहजच लिहावेसे वाटले म्हणून लिहितो.भरकट्ल्यासारखे वाटल्यास क्षमाप्रार्थी आहे.

आज कामनिमित्ते 'इंदुरास' येणे झाले! "भई इन्दॉर जाना है!" म्हणून हळूच हिन्दी मानसिकतेत गेलो. इथे 'विमानपत्तन' (की 'हवाई पत्तन? )ला आगमन होताच 'घरेलू आगमन' अशी पाटी दिसली ('Domestic Arrival') अन खुद्कन हसू आले!

दिवसभर बाहेर हिन्दी व कार्यालयात आंग्ल भाषेत बागडलो. सायंकाळी हॉटेल परिसरात चक्कर टाकावी म्हणून पाय मोकळे करवयस गेलो. रस्त्यात जुने; थोडेसे छोट्या राजवाड्या सारखे वाटले म्हणून डोकावले तर ते एक सुंदर व प्रसन्न ठिकाण निघले. 'नाथ मंदिर'.

विशेष म्हणजे पूर्ण मराठमोळे वातावरण. आरती, मंत्रपुष्पांजली वगैरे झाल्यावर 'ब्रम्हो वाचे...' , 'पुंडलिका वरदे..' वगैरे ऐकून चक्क महाराष्ट्रात असल्याचा भास झाला !

आणी काय सांगू महाराजा......! साक्षात्कार झाला...!! ज्ञानोबांच्या ओळी कानात घुमल्या...!!!
"माझ्या मराठीची बोंलू कवतिके...." माझ्या अवतीभवती माझेच 'इन्दॉरी' कि 'इंदूरी'? मराठी बांधव आपले मराठीपण परराज्यात दृढपणे 'टिकवून' होते! पिढ्यान पिढ्या..!

तेंव्हा पूर्णपणे 'आकळले' .......जोपर्यंत मराठी माणूस आहे तोपर्यंत मराठी (अगदी कुठेही) टिकून आहे! अहो म्हणूनच तुमच्यासरखे तळमळीनं, आपुलकिनं मराठी माउलीची विचारपूस करणारे बांधव लाभले!

"आचंद्रसूर्य नांदो...."माझी मराठी.

-इती.

छान

>> मध्यंतरी शाळेतून फोन आला, तुम्ही तुमच्या मुलांशी घरी इंग्रजीतून बोलत जा.>>
इंग्रजी शाळांनी असा आग्रह धरणं पूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटतं.

>>>
+७८६
पालक म्हणून आपणच मग शाळेला उलट प्रश्न विचारावा की मग मातृभाषा मुले कशी शिकणार?

कारण ही मागणी काहीच्या काही तर आहेच, तसेच अतार्किक देखील आहे. कारण मातृभाषेत दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले देखील सरावाने उत्तम ईंग्रजी बोलतात, तर ईंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्यांनी ते चांगले बोलणे सहज शक्य आहे. त्यासाठी चोवीस तास इंग्रजीतच बोला ही अपेक्षाच चुकीची आहे.

मुळात ईंग्रजी भाषा गरजेची आहे ती संवाद साधण्यासाठी, त्यासाठी गरजेची फ्ल्युएन्सी येणे पुरेसे आहे, भावना व्यक्त करतानाही उत्स्फुर्तपणे तोंडातून ईंग्लिशच आले पाहिजे या लेव्हलला जाण्याची काहीएक गरज नाही.

maazyaa gharee pan aasech aahe
sakaLee shalet jatanaa "aai ruk maazyasathe"

मध्यंतरी शाळेतून फोन आला, तुम्ही तुमच्या मुलांशी घरी इंग्रजीतून बोलत जा.>>> माझ्या भावजयीने शाळेत सरळ सांगितले, आम्ही मातृभाषा शिकवतोय. तुम्ही इंग्रजी शिकवा, त्यासाठीच शाळेत घालतो आहोत.

मस्त लिहिलाय लेख...मला भविष्यात याला तोंड द्यावं लागणारच आहे असं दिसतय....

माझ्या भावजयीने शाळेत सरळ सांगितले, आम्ही मातृभाषा शिकवतोय. तुम्ही इंग्रजी शिकवा, त्यासाठीच शाळेत घालतो आहोत >>>
हा हा हा....मस्त उत्तर आहे हे...
आमच्या पण टीचर ने असं सांगितलय शाळेत की घरी ईंग्रजी बोलत जा म्हणुन...पण मग माझ्या मनात सेम प्रश्ण येतो की जर सगळीकडे ईंग्रजी बोललं तर मराठी कधी शिकणार आणि आमची मुलं मराठी साहित्य कसं वाचणार....

मी मराठी मिडियम ची त्यामुळे ईन्ग्रजी पेक्शा मराठी शब्द पटकन तोंडात येतात .
लेकही आता तेच शिकला आहे .शाळेत त्याला थोडं जडं जायचं म्हणून मी मध्ये मध्ये ईन्ग्रजी बोलायचा प्रयत्न केला .
तर चिरंजीवानी सरळ सांगितलं " तू नीट बोल ना . टीचर सारखी का बोलतेस घरी ? मम्मासारखी बोल "

आपण घरी मुलाशी ईन्ग्रजी बोलत नाही , त्याला पुढे कस समजणार या विचाराने मला काळजी वाटायची , पण माझ्ह्यासारखी ईतरही काही जण आहेत आणि मी अगदी काही चुकीच करत नाही हे वाचुन जरा हुश्श्श वाटलं .

आमच हिन्दी-मराठी-ईन्ग्रजी सगळं धेडगुजरी प्रकरणं आहे .

" आजोबा , मी काल सोचत होतो की .... "

काहीतरी गल्लत होतेय. घरी इंग्रजी बोलायचे म्हणजे फ़क्त इंग्रजीच् नाही बोलायचे. पण दिवसातला एखादा तास फ़क्त इंग्रजीच् बोलायचे. त्या तासाभरात जो मराठी बोलल त्याला काहीतरी मजेदार शिक्षा. असे खेळता खेळता इंग्रजीची प्रॅक्टीस करून घेता येईल. हा खेळ रोज वेगवेगळ्या वेळेस खेळायचा म्हणजे शब्दसंपदा वाढते.

लेख खुसखुशीत असला तरीही गंभीरपणे विचार करायला लावणारा आहे.माझी मुलं आता मोठी झाली आहेत. ती पण इंग्रजी माध्यमातुनच शिकली आहेत. पण त्यावेळी मी व माझ्या मैत्रीणी, आम्ही जेंव्हा महाराष्ट्रात कधी जाऊ तेंव्हा आम्ही मराठीची पुस्तकं आणायची. पहिली ते पाचवी आम्ही दर वर्षी पुस्तकं आणली. ती वाचून घेऊन त्याना प्रश्नं विचारायचे. अभ्यास करून घ्यायचा.. त्यांना मराठी विषय नव्हता पण हिन्दी असल्यामुळे ती मुलं वाचू शकत होती. पाचवी नन्तर मात्र अभ्यास वाढला आणि पुस्तकं आणणं बंद झालं.आता ती मुलं मराठी छान बोलतात. इन्ग्रजीही उत्तम बोलतात. अजुनही त्यांना एखादा मोठा लेख वाचायचा म्हटलं कि कंटाळा येतो. कारण तसं भरभर वाचता येत नाही. तेंव्हा मी अजूनही त्यांना एखादी चांगली कविता, एखादा चांगला लेख असेल तर वाचून दाखवते. पु.ल. सारख्या लेखकाचे साहित्य वाचू शकत नाहीत ह्याची खंत मनाला वाटते. आनंद एवढाच आहे कि ते मराठी छान बोलु शकतात. आम्ही कधी महाराष्ट्रात गेलो तर लोक म्हणतात तुम्ही हैदराबादमध्ये राहून एवढे चांगले मराठी कसे चांगले बोलू शकता. सुदैवाने आम्ही महाराष्ट्रीयन लोकात जास्त राहिलो. मराठवाडीची मराठी, हैदराबादची मराठी ह्यांचा परिणाम त्यांच्या भाषेवर होत होता. पण आम्ही घरी सतत चांगले मराठी बोलायला शिकवत होतो.

हल्ली आई वडिलांना वेळ नसतो. आणि अभ्यासच एवढा असतो कि त्याच्याव्यतिरिक्त काही शिकायला वेळच नसतो. शाळेची वेळही जास्त, त्यानंतर शिकवणी, गृहपाठ आणि उरलेला वेळ टी.व्ही. पहाणे त्यामुळे वाचनच बंद झाले आहे. आणि पालकांना बोलायलाही वेळ नाही. शब्दांचा संग्रह होणार कसा?.मराठी कानावरच पडत नाही तर चांगलं बोलायला येणार कसे. हल्ली माझा देश, माझं गाव, माझी संस्कृती, माझी मातृभाषा असा अभिमानच लोप पावत चालला आहे.त्यातून दोन भाषेचा ताण मुलावर का द्यावा? मोडी संस्कृत सारख्या भाषा आता कुठे अस्तित्वात आहेत. कधीतरी मराठीही जाणारच ना असा उदासीनपणा असेल तर मग मराठी लोप पावायला वेळ लागणार नाही.

मातृभाषेतून शिक्षण केंव्हाही चांगले. लहान असताना एकाच भाषेचा पगडा असणे जास्त चांगले. म्हणजे मुलांना आपले विचार मांडायला सोपे जाते. मग ती कुठलीही भाषा असो. मातृभाषेत शिकणार्‍या मुलानी गोष्टीचं पुस्तक वाचलं तर लवकर गोष्ट कळते. व कळल्यामुळे वाचनाची गोडी लागते. पण इन्ग्रजीत शिकणार्‍या मुलाना गोष्टी कळत नाहीत. त्यामुळे मुलं वाचायचा कंटाळा करतात. सध्या मराठी शाळा वाइट अवस्थेत आहेत. पण अजुनही सर्वानमिळुन विचार केला तर मराठी फुलायला वेळ लागणार नाही. कारण पुण्यात असे प्रयोग चालु आहेत.

सस्मित +१

माझी मुलगी आता ९वी मधे आहे. तिला ही समस्या फारशी आली नाही. कारण दुसरी पासुन ती इंग्रजी व मराठी वक्तॄत्व स्पर्धा आणि नाट्य शिक्षण घेते आहे. त्या मुळे त्या भाषेशी खुप चांगला सराव झाला आहे. मुळात अगदी लहान असल्या पासुन तिला गोष्टी ऐकणे व सांगणे(मराठी मधुन ) ह्यांचा खूप चांगला सराव होता. घरात आम्ही सगळे मराठी माध्यम वाले. त्यामुळे बोलणे फक्त मराठी मधुनच होते. त्या मुळे तिची भाषा बरीच शुद्ध राहिली. बोली व लेखी सुध्धा. ७वी पासुन तिला शाळे तर्फे वाद्विवाद स्पर्धा, उत्स्फुर्त भाषण स्पर्धा ह्यात सातत्याने बाहेर पाठवले जाते. तसेच शाळेच्या अंतर्गत स्पर्धांमधे ही ६वी ते अत्ता पर्यंत तिन्ही भाषांतिल( इंग्रजी, मराठी, हिंदी व सध्या संस्क्रुत) , सगळ्याविभागातिल(कविता, लेख, गोष्ट, भाषण) प्रथम किंवा द्वितिय बक्षिसे तिला मिळाली आहेत.

हे असे का? मी तिच्यावर खुप मेहेनत घेतली म्हणुन? माझ्या कडे तेवढा वेळच नव्हता त्या वेळेस. माझी तिच्या घडणीत येवढीच कामगीरी आहे की तिला खुप लहान वयात स्टेज वर उभी केली. त्यामुळे भाषेवर आपोआप प्रभुत्व आले. आज ती इंग्रजी तर उत्तम वाचतेच त्याच बरोबर राजीव तांबे, माधुरी पुरंदरे ह्यांच्या मराठी पूस्तकांच्या सीरीज मी तिला आणुन दिल्या. तिला गुढ कथा वाचायला आवडतात. म्हणुन मग मतकरींच्या कथा वाचायला दिल्या. सुबोध जावडेकरांच्या विज्ञान कथा वाचायला दिल्या. एका गोष्टीला कधी कधी तिला एक महिना सुध्धा लागतो वाचायला. कारण मराठीत विचार करत नसल्याने प्रत्येक अक्षर जोर देवुन वाचावे लागते. पण आता सरावाने ती त्या पातळीवरचे वाचन करु शकते.

सुरुवातीला तिने ही खुप गमती केल्या " फळ्या काळ्या असतो" बाबांचे नाव "मोहन" ऐवजी "माहन" भावाचे नाव "गैतम" "माझ्या आई चे नाव मारा अहे" " दशरथाचा मुलगा रम" " त्याने तिची मेकोटी (बकोटी)धरली" असे खून तिनेही केले. एका काना मात्रे मुळे किती फरक पडतो ते तिला सप्रमाण दाखवुन दिल्यावर मात्र तिच्यात खूप सुधारणा झाली. तेंव्हा आमची हसुन हसुन मुरकुंडी वळायची. पण तिच्या समोर कधीच हसलो नाही. माझा नवरा तर तिची मराठीची वही घेवुन एकटाच हसत बसायचा. पण तिला मात्र तुझ्यात काही कमी आहे. हे जाणवु सुध्धा दिले नाही. उलट तिला आमच्या इंग्रजीच्या गमती सांगितल्या.

मी मराठी माध्यमात असताना पाचवीच्या पहिल्या इंग्रजीच्या चाचणीत मला २० पैकी ५ मार्क मिळाले होते. बाईंनी "आय एम अ बॉय" हे फळ्यावर लिहायला सांगितल्या वर बाकी सगळी स्पेलिंगे येतात पण आय चे "स्पेलिंग" येत नाही म्हणुन मार खाल्लेला आहे. कॉलेजच्या पहिल्या दिवशी इकॉनॉमिक्स च्या तासाला "व्हॉट इज ट्रेड" ह्या प्रश्नातला 'ट्रेड" हा शब्दच समजला नव्हता. तिच मी आज १००-२०० मुलां समोर अस्खलित इंग्रजीत ३ तास लेक्चर कसे घेते ..हा प्रश्न ती मला विचारते.

भाषा ही भाषा म्हणुन शिकली गेली तर ती लौकर समजते. तीचा जर "विषय" झाला तर गई भैंस पानी मे.....

दुसरे एक....

आपली मुले मराठी वाचत नाहीत म्हणुन गळा काढुन रडण्यात काय अर्थ आहे. त्यांची भाषा जर इंग्रजी असेल व त्यात ते मराठी पेक्षा सकस वाचन करत असतिल , तर ते वाचन करत आहेत हेच खूप नाही का? कोणत्याही भाषेत वाचु दे पण विचार तर करु दे!!! ज्याला आवड असेल तो ती भाषा वाचेलही पुढे.

मुली ने व तिच्या मैत्रिणींनी अनेक नव्या हिंदी गाण्याचे संस्क्रुत मधे भाषांतर केले आहे . ती गाणी मोठ्या मोठ्या ने म्हणुन धुडगुस घालत असतात. ( चिटिया कलाईया रे = शुभ्रमणी बंधन हो... माय नेम इज शिला = मम नामम शिला शिलाया तारुण्या......इ.इ.इ)

शाळेची वेळही जास्त, त्यानंतर शिकवणी, गृहपाठ आणि उरलेला वेळ टी.व्ही. पहाणे त्यामुळे वाचनच बंद झाले आहे.>>>>

पहिले तर आपल्या पाल्याची अभ्यासाची स्टाईल कोणती आहे ते समजुन घ्या. मी माझ्या मुलीची डी.एम.आय.टी ( फिंगर प्रिंट अ‍ॅनॅलिसिस) ची टेस्ट २ वर्षां पुर्वी करुन घेतली. त्यात तिची लर्निंग स्टाईल "पर्सनल अटेंशन व वन टु वन" अशी आली. आर्थातच तिला क्लास मधे जाउन उपयोग नाही. तिने कायम समोरा समोर नाहितर स्वतःचा अभ्यास केला पाहिजे म्हणुन मग तिला अत्ता पर्यंत कोणताही क्लास लावलेला नाही..... म्हण्जे अभ्यासाच्या विषयांचा. त्या मुळे तिच्या कडे तिच्या स्वतः साठी भरपुर वेळ असतो. सध्या संस्क्रुत चा लावला आहे. तो ही आठवड्यातुन एकदा २ तास. त्या बाईंकडे एका वेळेस २ मुलेच असतात. ज्या काही अडचणी येतात त्या ती शाळेतिल शिक्षकांना त्यांचा स्पेशल वेळ मागुन घेवुन विचारते. नाहीतर आम्ही आहोतच घरी....

हा वरच्या पोस्ट मधला "शिकवणी" ह्या प्रकाराने मुलांना खुप म्हणजे खुपच ताण येतो...... तो कसा कमी करता येइल ते पहा.......

मोहन की मीरा >>> मस्त पोस्ट्स.

चिटिया कलाईया रे = शुभ्रमणी बंधन हो... माय नेम इज शिला = मम नामम शिला शिलाया तारुण्या.>>> हे भारीये Lol

तरीही रुढ आर्थाने माझी लेक शाळेत खूप हुशार म्हणुन गणली जात नाही. तिची टक्के वारी ८० ते ८५ टक्क्यां दरम्यान असते. पण तरीही शाळेत प्रत्येक टिचर तिला ओळखते, तिच्या क्लास वर्क ची तारिफ करते, तिचा कच्चा विषय गणित असल्याने टक्केवारी वाढत नाही. आता सिली मिस्टेक्स खुप कमी झाल्या आहेत. त्या मुळे तिचे ती त्यावर काम करत आहे.

मी माझ्या मुलीची डी.एम.आय.टी ( फिंगर प्रिंट अ‍ॅनॅलिसिस) ची टेस्ट २ वर्षां पुर्वी करुन घेतली. त्यात तिची लर्निंग स्टाईल "पर्सनल अटेंशन व वन टु वन" अशी आली.>>> अशी काही टेस्ट असते ह्याची कल्पना नव्हती पण हे माझ्या मुलीलाही लागू होते असे मला वाटते. तिलाही जर्मन सोडता मोठा क्लास लावला नाही.

काल माझ्या लेकाने त्याचे अभिज्ञ हे नाव अभइदनय असं लिहिलं होतं (वय ७) आत्ताच शाळेत मराठी लिहायला सुरुवात केली आहे. त्याने लिहिलेले स्वतःचे नाव वाचून मला डोके कुठे फोडू हे कळेनासे झाले होते. पण चूक माझीच की मी त्याला मराठी अक्षरओळख करून दिली नाही.

मोकामि पोस्ट्स मस्त Happy
प्राचीची आयडियाही मस्त.
आणि हा खेळ एक दिवस इंग्रजी, एक दिवस मराठी, एक दिवस हिंदी असं करून खेळल्यास सगळ्याच भाषा किमान बोलण्यापुर्त्या तरी परफेक्ट जमतील Happy

पहिले तर आपल्या पाल्याची अभ्यासाची स्टाईल कोणती आहे ते समजुन घ्या. मी माझ्या मुलीची डी.एम.आय.टी ( फिंगर प्रिंट अ‍ॅनॅलिसिस) ची टेस्ट २ वर्षां पुर्वी करुन घेतली >> मीरा ताई याबद्दल थोडी माहिती द्या ना .

मस्त लेख. रिमझिम नाचणार्‍या मोराचा अनुभव आहे, मैत्रिणीच्या पाचवी, सहावीतल्या पुण्यात शिकणार्‍या मुलाशी बोलून. Happy तो उत्तम इंग्लिश बोलतो मात्र. माझ्या नवर्‍याशी न लाजता सोप्या इंग्लिशमधून गप्पा मारतो.

वेल, अभइदनयला माझ्यातर्फे शाब्बासकी! ७च वर्षाचा आहे, पण फोनेटिकली बरोबर अक्षरे बरोबर गोळा केली आहेत. मस्तच काम.

१ तास बोलण्याविषयी प्राचीशी सहमत. आमच्या पाल्याची Wink मातृभाषा इंग्रजी. पण शनि/रविवारी थोडा वेळ मी आणि पाल्य असू तेव्हा मराठी आणि त्याचा बाबा आणि तो फक्त असतील तेव्हा मलयाळम्. समजावून सांगताना भाषांतर करण्याचा मोह टाळणे अतिशय अवघड जाते. कारण इंग्रजीत सांगितले तर लगेच न समजण्यामुळे येणारा त्याचा वैताग कमी होतो. मला साधारण १५/ २० मिनिटे जमते मराठीत संभाषण (!) चालू ठेवणे.

Pages