जंबलाया

Submitted by स्वाती२ on 15 July, 2015 - 09:54

सध्या लेक घरी रहायला आलाय त्यामुळे बरेचदा शुक्रवारी संध्याकाळी माय-लेक मिळून स्वयंपाक करतो. काही वेळा पारंपारीक मराठी तर काही वेळा इतर प्रांतातले/देशातले त्याच्या आवडीचे पदार्थ केले जातात. या वेळी मूड क्रिओल पद्धतीच्या जेवणाचा होता. या विषयी थोडेसे. लुझियानाच्या न्यु ओरलिन्स भागात फ्रेंच लोकांनी वसाहती केल्या आणि काही काळ स्पॅनिश वसाहती देखील होत्या. त्याशिवाय वेस्ट आफ्रीकेतून १८ व्या शतकात गुलाम आणले गेले. तसेच 'फ्री कलर पिपल' या प्रकारात मोडणारे इतरही लोकं आले. वसाहतीत जन्मणारे युरोपिअन वंशाशी नाते सांगणारे ते फ्रेंच क्रिओल आणि इतर वंशाचे ते लुझिआना क्रिओल असे ओळखले जात असत. श्रीमंत मालक वर्गाकडे स्वयंपाकाचे काम करणारे गुलाम वेगवेगळे मसाले वापरुन तसेच क्रिम, बटर वापरुन विविध प्रकारचे पदार्थ बनवत. अमेरीकेच्या इतर भागातील पदार्थांपेक्षा वेगळ्या चवीचे हे पदार्थ क्रिओल फूड म्हणून ओळखले जातात. क्रिओल पदार्थांवर स्पॅनिश , फ्रेंच, वेस्ट आफ्रिकन, कॅरीबियन, इटालिअन वगैरे विविध खाद्यसंस्कृतीचा प्रभाव आहे.
जास्त खटपट नको म्हणून वन डीश मील असा जंबलाया हा स्पॅनिश आणि फ्रेंच प्रभाव असलेला भाताचा प्रकार करायचे ठरवले. घरात कोलंबी आणि चिकन ब्रेस्ट होते पण स्मोक्ड सॉसेज नव्हते म्हणून लेकाला ते आणायला पाठवून मी बाकी तयारीला लागले.

साहित्य-
१ कांदा बारीक चिरुन
२ सेलरीच्या दांड्या बारीक चिरुन
१ लाल किंवा हिरवी बेल पेपर बारीक चिरुन
४ लसूण पाकळ्या सोलून आणि बारीक चिरुन
१ कप बोनलेस स्किनलेस चिकन ब्रेस्ट चे साधारण १ इंचाचे चौकोनी तुकडे (बोनलेस, स्किनलेस थाईज चालतील)
१/२ पौंड मध्यम आकाराची कोलंबी( २० ते २५), सोलून , काळा धागा काढून
१ १/२ कप तांदूळ धुवून बाजूला ठेवणे . साधा लॉन्ग ग्रेन राइस वापरावा, बासमती न्को. मी घरात सोना मसुरी होता तोच वापरला.
१४ औस चिकन स्टॉक
१ कॅन (१४ औस) चिली स्टाइल टोमॅटो किंवा ४ -५ टोमॅटो बारीक चिरुन
२ टेबलस्पून तेल ( १ १/२ टेबलस्पून आणि १/२ टेबलस्पून)
१ टी. स्पून जीरे पावडर
२ टीस्पून ड्राइड ओरेगानो
१ टीस्पून ड्राइड थाइम
१ टी स्पून पाप्रीका
१/२ टी स्पून तिखट
५-६ मीरे भरड कुटलेले
१ टे स्पून वुस्टरशायर सॉस
मीठ चवीप्रमाणे

सर्व तयारी करुन ठेवली आणि लेक येइपर्यंत नेटवर टाईमपास केला. सॉसेज न वापरता कोलंबी आणि चिकन वापरुनही जंबलाया करु शकता. तसे केल्यास कोलंबी आणि चिकनचे प्रमाण वाढवा. तसेच अंडूइ ऐवजी इतर स्मोक्ड सॉसेजही वापरले तरी चालेल. लेकाने आणलेल्या अंडुइ सॉसेजमधल्या निम्म्या (७ औस) सॉसेजच्या साधारण १ सेमी जाडीच्या चकत्या कापून घेतल्या. मी चकत्या कापे पर्यंत लेकाने गॅस पेटवून मोठे जाड बुडाचे पातेले मध्यम आचेवर तापत ठेवले आणि त्यात दीड टे स्पून तेल घातले. तेल तापले तसे त्यात कापलेला कांदा, सेलरी, बेलपेपर आणि लसुण घालून परतायला सुरुवात केली. खाली लागू नये म्हणून माझ्या सुचना आणि लक्ष देणे सुरु होते. कांदा पारदर्शक दिसू लागला तसे त्यात पाप्रीका, ओरॅगानो, थाईम, तिखट, मीरे, जीरे पावडर आणि कॅन मधले टोमॅटो घातले. २-३ मिनीटे परतले. त्यात तांदुळ आणि सॉसेज घालून परतले. चिकन स्टॉक घातला. सर्व नीट ढवळून त्यात दोन कप गरम पाणी घातले. चव घेवून मीठ घातले. भांड्याखालची आच वाढवली. मिश्रण उकळू लागले तसे मी कोलंबी आणि चिकनच्या तुकड्यांवर १ टे स्पून वुस्टरशायर सॉस घालून नीट ढवळून घेतले. दुसर्‍या लहान भांड्यात तेल तापत ठेवले. तेल तापल्यावर त्यात चिकनचे तुकडे परतून घेतले आणि भाताच्या मिश्रणात घालून ढवळले. भात शिजत आला तसे मुरवत ठेवलेली कोलंबी भातावर पसरली आणि आच मंद करुन भांड्यावर झाकण लावले. १० मिनीटांनी आच बंद केली. झाकण उघडून कोलंबी भातात मिसळून घेतली. चव बघितली. थोडे तिखट आणि थोडे मीठ घातले.
बोलमधे भात वाढला. तेवढ्यात नवर्‍याने बागेतून कांद्याची पात आणून चिरली आणि भातावर शिवरली. पटकन फोटो काढला आणि जंबलायावर ताव मारला.
IMG_5292 (400x300).jpg

अधिक टीप : तिखटाचे प्रमाण प्रत्येकाच्या आवडीनुसार ठेवण्यासाठी जोडीला हॉट सॉस ठेवा. हा भात मोकळा नसतो. ओलसर असतो. पाण्याचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करु शकता तसेच पाणी न वापरता पूर्णपणे चिकन स्टॉक वापरुन जंबलाया करु शकता. टोमॅटोचे प्रमाणही आवडीप्रमाणे बदलता येइल. कांद्याच्या पाती आमच्याकडे आवडतात म्हणून घातल्या नाही घातले तरी चालेल किंवा त्याऐवजी पार्सली देखील छान लागते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सस्मित,
>>कोलंबी + चिकन कुछ जम्या नही >> असा माझाही सुरवातीला सूर होता. पण वेकेशनला गेलो तेव्हा नवर्‍याने ही डीश ऑर्डर केली. आग्रह केला म्हणून त्यातले दोन चमचे चाखून बघितले आणि माझे मतपरीवर्तन झाले! Happy

बी,
असे काही नाही. इथे भारतातून रेसीपी लिहिणारे बरेच जण आहेत आणि त्यांना अमेरीकेतले लोकं प्रतिसाद देतात.
मी इथे फार कमी वेळा रेसीपी, लेख वगैरे टाकते. त्यातल्या काहींना प्रतिसाद मिळतो काहींना नाही. इनफॅक्ट हमखास जमणार्‍या आणि प्रत्यक्ष आयुष्यात नेहमीच पसंतीची पावती मिळवणार्‍या काही रेसीपी इथे टाकल्या तेव्हा १० प्रतिसाद सुद्धा मिळाले नाहीत. ठीक आहे ना. प्रत्येकाची आवड असते. मी स्वतः देखील इथल्या सगळ्या रेसीपीजना प्रतिसाद देते असे नाही. माझ्यासाठी महत्वाची गोष्ट - मला तो पदार्थ बनवताना येणारी मजा आणि माझ्या जिवलगांनी तो पदार्थ आवडीने खाणे. इथे रेसीपी टाकणे म्हणजे तो आनंद शेअर करणे बस्स!

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार!

निसर्ग चक्र, पुण्यात असाल तर दोराबजी मध्ये स्मोक्ड सॉसेजेस मिळू शकतील. मुंबईत असाल तर एकदा स्टार बझार च्या नॉनव्हेज सेक्शन ला पाहा.

इथे (डॅलसमध्ये) Razzoos नावाचं केजन रेस्टॉरंट आहे तिथे सगळे केजन/क्रेओल पदार्थच मिळतात. आमचं फार आवडीचं ठिकाण आहे.
रेसिपी सोप्पी वाटते आहे.
मिळून स्वयंपाक करणं खरच खूप आवडलं.

छान वाटतेय रेसिपी. इथे मिळणारे पदार्थ वापरुन करुन पाहिन.

वाशीच्या हायपरमार्टात सॉसेजेस वगैरे सगळे पदार्थ मिळतात. ब-यापैकी चांगले असतात. स्मोक्ड वगैरे पण असावेत. आता आठवत नाही. किंमतीही ब-यापैकी नॉर्मल आहेत. बहुतेक सगळे स्टोरमेड असते. इम्पोर्टेड सेक्शनमध्ये फ्रोजनप्रकारही आहेत. अगदी ब्लु चिजसहित सगळे काही आहे. अर्थात यांच्या किंमती मात्र अगदी इम्पोर्टेड आहेत.

Pages