शेक्सपिअरचं अस्वस्थ जग - नील मॅकग्रेगर

Submitted by भारती.. on 7 July, 2015 - 08:26

शेक्सपिअरचं अस्वस्थ जग - नील मॅकग्रेगर

‘’Shakespeare’s Restless World - An unexpected history in twenty objects "- नील मॅकग्रेगर (Neil MacGregor) यांचं हे पुस्तक, Penguin Books ने २०१४ मध्ये प्रकाशित केलेलं , वाचनात आलं .

एखाद्या मोठ्या प्रतिभावंताला, त्याच्या निर्मितीला समजून घेण्याच्या अनेक वाटा असतात. एरवीही विद्वत्ताप्रचुर ( कित्येकदा विद्वज्जडही ) समीक्षेची पुस्तकं आपण कधीतरी वाचतो, त्यातले विविध प्रवाह उपप्रवाह आपलं आकलन समृद्ध करत असतातच,

नील मॅकग्रेगर यांचं वेगळेपण असं की त्यांनी केलेला हा शेक्सपिअरचा अभ्यास म्हणजे वाचक-प्रेक्षकाच्याच परिप्रेक्ष्यातून एक मननीय अशी सफर आहे.शेक्सपिअरचा प्रेक्षक कसे होते ? ते कोणकोणत्या स्तरातून आले होते ? काय होतं त्यांचं भावविश्व ? त्यांना वेढणारा समाज? काळाची आव्हानं ? कसं होतं ते थिएटर ?

’’ज्या गावाला जायचं ते गाव स्वत:च व्हायचं !’’ हे नक्की.

म्हणून तो काल उभा करण्यासाठी लेखकाने वापरल्या आहेत त्या काळातल्या वीस वस्तू, जसं की एक चांदीचं जुनं नाणं, चांदीचा चर्चमधील पवित्र चषक ,लोखंडी काटा (काट्याचमच्यामधील ) ,समशेर ,जुनी चित्रं, पुस्तकं ,सापडलेल्या हॅट्स,जादूटोण्यासाठी वापरलेला आरसा,जुनं लाकडी जहाजाचं मॉडेल ,काचेचे व्हेनिशियन मद्यचषक,प्लेगचे जाहीरनामे वगैरे वगैरे वगैरे.

या वीस वस्तू आणि तत्कालीन परिस्थिती यांचे दुवे जोडणारे ढीगभर संदर्भग्रंथ आणि हो, लेखकाची स्वत:ची सूक्ष्म विचक्षण प्रतिभा, हे सगळं चित्र कष्टाने चिकाटीने जुळवून त्यात एका धगधगत्या काळाचा प्राण फुंकणारी.

मग ही सफर आपणही आपल्या काळाचं भान न हरवताच (ते हरवत नसतंच) शेक्सपिअरच्या समकालीन परिसराचा – सोळाव्या शतकातील इंग्लंडचा एक भाग होऊन करायची आहे.तत्कालिन इंग्लंडमधील सामान्य प्रेक्षकाचा आवेश अभिनिवेश स्वत:मध्ये भिनवून घेत त्याच्या नाटकात लपलेलं अधिकाधिक सूक्ष्म नाट्य शोधायचं आहे. .

हा वानोळा हाती लागला तेव्हा त्यातून एक सुंदर अनुभव सिद्ध झाला.

एरवीही ललित साहित्याचं वाचन म्हणजे एक परकायाप्रवेश असतो. त्यातली गंमत ही असते की माणसाला स्वत:पासून काही वेळ सुटका करून वारंवार स्वत:कडेच परत यायचं असतं. या प्रत्येक आवर्तनात नेमकं काय होतं मनोरंजनाशिवाय ? एक नक्कीच होतं. वाचकाची/प्रेक्षकाची समज वाढत जाते.या अद्भुत खेळात त्याला मदत करतं मुख्यत्वे ललित कथनात्म साहित्य . कविता वाचताना/ अनुभवताना आपण समोर जणू आरसा धरला असतो, कथनात्म ललित साहित्याच्या वाचनात हरवताना आपण स्वतःच तो आरसा होतो, ते कथानक बिंबवून घेतो. कथेच्या तपशिलात स्वत:चं अस्तित्व विसरून जातो.याहीपुढे जाऊन आपणच ते कथानक होतो. याच प्रातिभ खेळाची संवेदनांना अधिक प्रत्यक्षपणे घेरून टाकणारी उत्कट पातळी आपण नाटक /चित्रपट पाहाताना गाठतो.

नील मॅकग्रेगर यांनी शेक्सपिअर हा जो भलताच आव्हानात्म विषय निवडला आहे,त्याच्यावर आधीच कितीतरी अभ्यास झालेला आहे. या विश्वविख्यात इंग्लिश नाटककाराची भाषाशैली, त्याचे व्यक्तिगत अभाव आणि प्रभाव , त्याच्या आयुष्यातल्या घटना-दुर्घटनांचे पृष्ठपातळीखाली वाहणारे प्रवाह हे सगळं या आजवरच्या संशोधनाच्या ऐलतीरावर आहेच.आधी आपल्याला त्याच्या समकालीन प्रेक्षकांच्या पैलतीरावर म्हणजेच इ.स. १६०० मधल्या इंग्लिश प्रेक्षकाच्या भावविश्वात जायचं आहे.वीस प्रकरणांमध्ये वीस वस्तूंच्या सहाय्याने विभागलेला हा प्रदीर्घ प्रवास आहे.

पहिल्याच ‘Inside the Wooden O ‘’या परिचयात्मक प्रकरणापासून हा थरार आपण अनुभवू लागतो. “Wooden O” या नावानेही शेक्सपिअरची ‘’द ग्लोब थिएटर्स’’ ही नाटककंपनी ओळखली जात असे. शेक्सपिअरकालीन लंडनमधील लाकूड आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करून बांधलेल्या उघड्या थिएटर्सचा दुरून दिसणारा आकार. जिथे नाटकातला घनगंभीर कोरस आणि प्रेक्षक यांच्यातून एक संवाद वाहत आहे अशी भारलेली जागा.

कोणताही चेतनापूर्ण भाषिक-सांस्कृतिक समूह दोन प्रकारची ओळख जपू इच्छितो. आपली गौरवशाली परंपरा. आपला विजीगिषु वर्तमान.शेक्सपिअरचा हा काळ दोनही अर्थांनी विशेष होता

या काळातल्या लंडनच्या वातावरणात या दोन्ही शक्ती पुरेपूर श्वसत होत्या. प्राचीन रोमन कलासंस्कृतीचा,स्थापत्यशैलीचा ( जिचा प्रभाव राजघराण्यावरही प्रकर्षाने होता, ज्यावर पुढे एक स्वतंत्र प्रकरण आहे ), एकूणच सौंदर्यदृष्टीचा वारसा , आणि हा ठेवा जोपासून ‘’अभिजन’’ वर्गाचा शिक्का मिरवण्याची धडपड. आणि अर्वाचीन जगात ब्रिटीश साम्राज्याला आणि त्याच्या धाडसी नागरिकांना देशाचा उंबरठा ओलांडून पूर्ण पृथ्वीगोलाची मुसाफिरी आणि त्यावर स्वामित्व गाजवण्याची झालेली घाई. शेक्सपिअरच्या नाटककंपनीच्या ‘’ग्लोब थिएटर्स’’ या नावातही हेच आकर्षण प्रतिध्वनित झाले आहे. त्याप्रकारचे साहसनामे प्रत्यक्षात घडू लागले होते. सर फ्रान्सिस ड्रेक या पहिल्या ब्रिटीश दर्यावर्दी उमरावाने जहाजातून तीन वर्षात (१५७७-१५८० ) पृथ्वीप्रदक्षिणा करून कहाण्यांची , मसाल्यांची आणि चांदीची लयलूट बरोबर आणली. त्या चांदीतून त्याच्या सन्मानार्थ नाणं पाडलं गेलं. राजखजिन्यालाही नजराणे मिळाले,व्यापाराच्या,सत्तेच्या नव्या संधी प्रकाशात आल्या. जनमानसात एक नवी लहर दौडली.विश्वावर सत्ता गाजवण्याचे दिवस आता दूर नव्हते.

या समाजजीवनाचं प्रतिबिंब शेक्सपिअरच्या सर्वस्पर्शी प्रतिभेत उमटत होतं. त्याच्या नाटकात आणि त्याच्या प्रेक्षकात समाजाचे सर्व स्तर प्रतिनिधीत्व करत होते.जीवन आपलं आत्मरूप कलेत पाहात होतं.त्याच्याMidsummer Night’s Dream मधील हा स्वप्नरंजनी बढाईखोर संवाद –

Oberon- We the globe can compass soon

Swifter than the wandering moon

Puck- I’ll put a girdle round about the earth

In forty minutes.

तर Comedy of Errors (1592) मध्ये ड्रोमिओ हा मस्कऱ्या नोकर घरातील गोलमटोल स्वयंपाकीणबाईंची पृथ्वीगोलाशी सावयव तुलना करून खजिन्याचा शोध घेण्याची अश्लील भाषा करतो !

एकाच काळात घडणाऱ्या अनेक घटनांना शेजारी ठेवून आणि शेक्सपिअरच्या रचनांना मध्यवर्ती स्थान देऊन नील मॅकग्रेगर एक विशाल चित्र त्याच्या सर्व बारकाव्यांसहित आपल्या मनात उभं करतात , तेव्हा आणि आज आपल्या काळातही याच निर्मितीच्या प्रेरणा कशा काम करतात याचंही भान देतात तेव्हा मर्ढेकरांचे शब्द वेगळ्या संदर्भात आठवतात –‘’आम्हांस आम्ही पुन्हा पाहावे काढून चष्मा डोळ्यांवरचा ‘’!

एखादा विशिष्ट काळ उभा करण्यासाठी जनमानसाचे पडसाद जिथे गुंजतात ते नाटकातले संवाद हे एक प्रत्यक्ष साधन आहे. नील मॅकग्रेगर पुढील काही प्रकरणांमध्ये अधिक सूक्ष्म साधनांचा जसे की संहितेत वापरल्या गेलेल्या प्रतिमांचा अभ्यास करून काही निष्कर्ष नोंदवतात.

श्रद्धांतर आणि सत्तांतर. व्यक्तिमन आणि समाजमन डहुळून टाकणाऱ्या घटना.शेक्सपिअरचा काळ या दोन्हींचा साक्षी होता.रेनेसांच्या काळात राजसत्तेने आत्यंतिक प्रोटेस्टंट धारणेचा स्वीकार करून त्या जुन्या कॅथलिक परंपरा संपवल्या होत्या , ज्या अजूनही समाजमनात आणि चर्चच्या भिंतीवर रंगवलेल्या पुरातन अभिजात चित्रांमध्ये विद्यमान होत्या. वरून रंगसफेदी करून लपत नव्हत्या. नवी कर्मकांडे अस्तित्वात आली. चर्चमधील पवित्र मद्यचषकातील पेय जे पूर्वी फक्त धर्मगुरू प्राशन करत,त्याचा आता communion service – सर्वांनी प्राशन करायचा नवा विधी- झाला होता. त्या चषकाभोवती राजाज्ञेच्या आणि ती मोडली तर प्राणभयाच्या सावल्या होत्या. धार्मिक श्रद्धा जेव्हा राजाज्ञेच्या धाकात बदलल्या जातात तेव्हा सुप्तप्रतिमांमध्ये त्या घोटाळत राहतात.. शेक्सपिअरच्या हॅम्लेटसारख्या नाटकांमध्ये ही नवी अस्वस्थता विषाच्या प्याल्याच्या/विषप्रयोगाच्या प्रतिकात वारंवार आली.

राजगादीला वारस नसण्यातून उद्भवणारी अनिश्चिती, प्रासादाताल्या छुप्या कुटिल कारवाया ,त्यातून घडणारी यादवी युद्धं , रक्तपात हेही आम जनतेसाठी एक नित्याचं दु:स्वप्न होतं. तत्कालीन ट्युडर राजघराण्याच्या एका तैलचित्रातील राजव्यक्तींच्या देहबोलीतून जाहीरपणे कुठेही न चर्चिली जाणारी ही परिस्थिती व्यक्त झाल्याचं नील मॅकग्रेगर इतिहासाचे अनेक संदर्भ देत सप्रमाण मांडतात .शेक्सपिअरने War of Roses –लाल आणि पांढऱ्या गुलाबांच्या युद्धाच्या (जी दोन वेगवेगळ्या राजघराण्यांशी निष्ठा दर्शवतात ) प्रतिकांमधून ही परिस्थिती Richard III मध्ये रंगवली.शांतीची स्वप्नं पाहिली..त्याच्या नाटकांमध्ये ही अनिश्चिती, हा संघर्ष प्रतीकात्म स्वरूपात अनेक ठिकाणी येतो. या सर्वांतून येणारं, निद्रानाश झालेल्या चौथ्या हेन्रीचं झोपेलाच उद्देशून असलेलं हे तळमळतं सुप्रसिद्ध स्वगत ..

Canst thou, O partial sleep, give thy repose

To the wet sea-son in an hour so rude ,

And in the calmest and most stillest night ,

With all appliances and means to boot,

Deny it to a king? Then, happy low, lie down!

Uneasy lies the head that wears a crown..

या सर्वाची उघड चर्चाही करण्याची बंदी करणारा कायदा होता ! पण जनमानसातली खळबळ एका श्रेष्ठ लेखकाच्या लेखणीच्या शाईवाटे मॅकबेथ , किंग लिअर अशा नाटकांमधून अशी झरत राहिलीच .

राजप्रासादात या कारवाया. आणि रस्त्यावर, तिठ्यावर ? एवढ्यातेवढ्या कारणाने रस्त्यावरच्या गल्लीतल्या शूरवीरांनी एकमेकांवर तलवार उपसून केलेली द्वंद्वयुद्धे ! तलवार ही एक फॅशन असण्याचा काळात ती वापरली जाण्याचा मोह ही आजच्या गन लायसेन्स परिस्थितीइतकीच स्फोटक संभाव्यता होती ! एक संवेदनशील लेखक ही परिस्थिती कशी टाळू शकतो ? म्हणूनच तलवार हे एक प्रतीक होऊन अवतरत राहातं शेक्सपिअरच्या लेखनात.रोमिओ हा प्रेमवीर असेलही, पण त्याआधी तो एक शांतीदूत आहे ,मध्यस्थी करून अकारण रक्तपात टाळू पाहणारा. हा आकांत शेवटी अरण्यरूदनच ठरणार आहे..

‘’Gentlemen, for shame ! Forbear this outrage !

Tybalt, Mercutio, the Prunce expressly hath

Forbid this bandying in Verona streets’’

आणि तरीही तल्लख तलवारींच्या आणि हल्लक समशेरींच्या या खेळात मृत्यूचं संगीत आहे !समकालीन पौरुषाचं ते एक विपरीत असं समाजमान्य लक्षणही आहे !

आणि म्हणून ‘’Romeo and Juliet’’मध्येच हा मर्क्यूशिओ जेव्हा म्हणतो - ,’’He fights as you sing the prick-song: keeps time,distance, proportion. He rests his minimum rests, one, two, and the third in your bosom .’’ - तेव्हा मरणाच्या त्या लयबद्ध खेळातलं अघोर आकर्षणही शेक्सपिअरच्या शब्दसृष्टीत झळाळून जातं .

या सफरीत नील मॅकग्रेगर आपल्याला शेक्सपिअरकालीन जनमानसातून जसे फिरवतात तसे लौकिक सृष्टीच्या सर्व तपशिलांचं भान देतात. ‘’नाटकाला जाणं ‘’ आणि ‘’नाटक बघताना खाणं-पिणं ‘’ यावर त्यांनी केलेलं अभ्यासपूर्ण आणि रसपूर्ण विवेचन आपल्याला तत्कालीन लंडनमधील खाद्यसंस्कृती बरोबरच एका मोठ्या नाटककाराचा तो प्रेक्षकवर्ग कसा समाजाच्या सर्व स्तरांतून आलेला होता याची जाणीव करून देतं . रोझ थिएटर मध्ये सापडलेला एक साधा लोखंडी काटा एवढ्या धाग्यावरून आपापल्या सामाजिक स्थानानुसार वेगवेगळे पदार्थ खातपीत मजा करत नाटकाचा आनंद घेणारे ते बहुविध प्रेक्षकगट नील मॅकग्रेगर आपल्यासमोर रंगवतात.नाटक बघण्याचं हे नाटकही खूपच करमणूक करणारं आहे ! खरोखरच इतक्या विभिन्न प्रकृतीच्या लोकांना एकवटायला लावणारी ती नाटकं पुढे काळावर मात करून जगाच्या कानाकोपऱ्यात वाचली पचवली रिचवली गेली यात काही नवल नाही. हा संपूर्ण अभ्यास अतिशय रंजकतेने मांडला आहे ! त्यात अगदी स्वच्छतागृहाच्या सोयी-गैरसोयीचे काळोखे कोपरेही सुटलेले नाहीत.

जनसमुदायाचा एक लाडका इतिहास असतो. त्यात वीरश्रीने भारलेले आणि इतरांना भारणारे वीरपुरुष असतात. आजही ते प्रेरणा देत असतात. त्याच्या उल्लेखांनी , पोवाड्यांनी राष्ट्रभावनेला उधाण येतं. किती देश-कालातीत असतात या गोष्टी. नील मॅकग्रेगर शेक्सपिअरच्या नाटकातली तत्कालीन इंग्लिश लोकभावनेला असले आवाहन करणारी स्थळे प्रकाशित करतात. पाचव्या हेन्रीची जपून ठेवलेली शस्त्रास्त्रे, शिरस्त्राण आपल्या समोर ठेवून.मध्ययुगीन पाचव्या हेन्रीच्या वीरमरणाचा हा जणू राष्ट्रानेच केलेला आकांत मग शेक्सपिअरच्या शब्दात थेटपणे येणारच -

Bedford-

Hung be the heavens with black, yield day to night !

Comets, importing change of times and states,

Brandish your crystal tresses in the sky

And with them scourge the bad revolting stars

That have consented unto Henry’s death –

King Henry the fifth, too famous to live long!

England ne’er lost a king of so much worth.

हा विलाप वाचताना आपल्याला कुठेतरी गडकऱ्यांची शब्द्वैभवी शैली आठवते तर कधी धूमकेतूच्या शेक्सपिअरियन प्रतिमेत कुसुमाग्रजांच्या पृथ्वीच्या प्रेमगीतातील आयाळ पिंजारलेला धूमकेतू दिसतो !

प्रत्येक राष्ट्राची गृहच्छिद्रेही असतात. वेळोवेळचे आयरिश उठाव, स्वातंत्र्यासाठी केलेलं गनिमी युद्ध हे ब्रिटनचं गृहच्छिद्र .जॉन डेरिक या लेखकाच्या त्या काळात प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या आधारे नील मॅकग्रेगर या राष्ट्रीय वाहत्या जखमेचा शोध घेतात. हा इंग्लंडला नेहमीच सलत आलेला रक्तरंजित विषय Henry V व Richard II या नाटकात शेक्सपिअरने मांडला आहे.अर्थातच स्वदेशाच्या बाजूने केलेलं हे स्वप्नरंजन, आयरिश बंड दडपून परतलेल्या ब्रिटीश सरदारांचं आणि सेनेचं जनतेने केलेलं हे भव्य भावनिक स्वागत नंतरच्या इतिहासाने खोटं पाडलं ही गोष्ट वेगळी, पण आपण ब्रिटीश जनमानसाचं प्रतिबिंब शेक्सपिअरच्या प्रतिभेत पाहत आहोत तेव्हा त्याची मर्यादा आपण समजून घ्यावी ..

Chorus-Were now the general of our gracious Empress

As in good time he may- from Ireland coming

Bringing rebellion broached on his sword ,

How many would the peaceful city quit

To welcome him!

समाजात भाषेचा व्यवहार आणि व्यवहाराची भाषा काळाबरोबर बदलत जाते. काही अर्थपूर्ण गोष्टी चक्क हरवून जातात. नील मॅकग्रेगर याची दखल आपल्याला घ्यायला लावतात. मराठीत तू ,तुम्ही ,आणि आपण अशा द्वितीयपुरुषी श्रेणी आहेत त्या आदरार्थी चढती भाजणी दर्शवतात ,इंग्लिश भाषेत आज फक्त You चा प्रयोग होतो, त्यात आदरार्थी बहुवचन हा भागच नाही. पण ही परिस्थिती पूर्वीपासून अशीच नव्हती. Thou हे फक्त परमेश्वरासाठी राखून ठेवलेलं संबोधन व्यवस्थित प्रचलित होतं .शेक्सपिअरकालीन भाषेत Thou चा सर्रास वापर सलगी दाखवण्यासाठी आणि You हे थोडं अंतर, अदब दाखवण्यासाठी निरनिराळ्या नात्यांमधल्या संभाषणात वापरलं आहे.

शेक्सपिअरचा प्रेक्षकवर्ग समाजाच्या सर्व स्तरांमधून आला आहे. हे स्तर त्यांच्या भाषा, त्यांचे पेहराव, त्यांच्या टोप्या , त्यांच्या सवयी या सर्व तपशिलांसह ,त्यातल्या प्रतीकात्म वैशिष्ट्यांसह नील मॅकग्रेगर जिवंत करतात. पिटातल्या तरुण बेबंद कामगारांच्या उडणाऱ्या वर्गविशिष्ट लोकरी टोप्या म्हणजे अन्याय्य व्यवस्थेवरील भाष्य करणाऱ्या नाटकातील संवादांना दिलेली दाद होतीच,पण एका अस्वस्थ ऊर्जेचं ते प्रकटीकरण होतं,ही अस्वस्थता एक सामाजिक आव्हान म्हणून पुढे ठळक होणार होती..

जादूटोणा मंत्रतंत्र . अद्भुत शक्ती, चेटकिणी, पिशाच्चे आणि अतिमानवी अनुभव.आपल्या सत्ताकांक्षेने झपाटलेली लेडी मॅकबेथ . रक्त गोठवणारं तिचं हे आवाहन .

‘’Come, you spirits

That tend on mortal thoughts , unsex me here,

And fill me from the crown to the toe top-full

Of direst cruelty ..

शेक्सपिअरकालीन लंडनमध्ये याचा पूर्वापार प्रभाव तर होताच, पण अगदी नवीन शास्त्रीय शोध आणि प्रबोधनकाळातही याचा अभ्यास होत होता. काळ्या चकचकित दगडात बसवलेला एक जड आरसा. एक सामान्य वाटणारी गोष्ट. पण ते या जादूटोण्याच्या प्रभावाचे एक महत्वाचे स्मृतीचिन्ह आहे. डॉ. जॉन डी यांचा हा जादूटोण्यासाठी वापरला जाणारा आरसा आजही ब्रिटीश म्युझियममध्ये विद्यमान आहे.त्यांच्यासारखे काही विचक्षण वैज्ञानिक गणित आणि शास्त्रांबरोबर परामानसशास्त्राचाही अभ्यास व प्रत्यक्ष जीवनात वापर करण्याच्या शक्यता पडताळत होते. नील मॅकग्रेगर हे सोदाहरण बिंबवतात तेव्हा राजेरजवाड्यांनी ज्योतिष्यांच्या सल्ल्यानुसार काही महत्वाचे निर्णय घेण्याची प्रक्रिया जगात सार्वत्रिक आहे याचं आपल्याला भान येतं. डॉ. जॉन डी हे गणितज्ज्ञ व ज्योतिषशास्त्रज्ञ संशोधक म्हणून सर्वसामान्य जनतेत खूप प्रसिद्ध तर होतेच, पण याहीपुढे राणी दुसऱ्या एलिझाबेथला ते महत्वाचा राजकीय सल्ला देत असत. शेक्सपिअरचं प्रॉस्पेरो हे ‘द टेंपेस्ट’ मधील पात्र त्यांच्यावरून आले असावे असा लेखकाचा कयास आहे. कारण न्याय्य व्यवस्था पुनर्स्थापित झाल्यावर ते पात्र जादूटोण्याचा वापर सोडून द्यावा असं सुचवतं .हा जादूटोणा पंचमहाभूतांशीही उपद्व्याप करणारा आहे. समुद्रात वादळे निर्माण करून जहाजे त्यावरील महत्वाच्या सत्ताधारी व्यक्तींसकट बुडवणे,मसलती फोल पाडणे हे सर्व खेळ केवळ निसर्गाच्या लहरीतून होत नाहीत तर या काळ्या जादूचेही हे प्रयोग असतात ..शेक्सपिअरच्या मॅकबेथमधील स्कॉटिश चेटकिणींचं ( या इंग्लिश चेटकिणींपेक्षा भयावह कारनामे हाती घेत असत ! ) हे प्रसिद्ध कोरस-गान.

All - Double double,toil and trouble

Fire burn and couldren bubble.

Fair is foul and foul is fair

Hover through the fog and filthy weather

या प्रकारच्या जादूटोण्याचा आणखी एक प्रत्यक्ष वापर जहाजप्रवासात अडथळे आणून ते बुडवण्यासाठी किंवा तो प्रवास निर्विघ्न पार पडावा म्हणूनही कधीकधी केला जात असे याचा उल्लेख मघाशी आलाच. त्याचं प्रतीक असलेलं एक लाकडी रंगीत जहाजाचं मॉडेल. खेळणं नव्हे तर जादूटोणा करण्यासाठी वापरलेलं आजही स्कॉटलंडच्या राष्ट्रीय वस्तूसंग्रहालयात आहे , ते नील मॅकग्रेगर यांनी आपल्या मुद्द्याच्या स्पष्टीकरणार्थ दाखवले आहे. इंग्लिश राजा जेम्स आणि डेन्मार्कची राजकन्या अॅन यांच्या विवाहात अडथळे आणून त्यांना संपवण्यासाठी असले प्रयोग तत्कालीन चेटकिणींनी केले होते आणि मग चेटकावर बंदी आणणारे कायदे होऊन चेटकिणींना जिवंत जाहीर देहदंडही फर्मावले गेले.

सुन्न करून टाकणाऱ्या या गोष्टींचे अर्थ कसे लावायचे ते प्रत्येकाने ठरवावे. शेक्सपिअरच्या संहितांमध्ये आणि प्रेक्षागृहामध्ये या अगदी सर्वमान्य संकल्पना होत्या..

आणि मग राजद्रोह,बंडाळी, कारस्थाने, घातपात .समाजात चर्चिल्या जाणाऱ्या , उलथापालथ घडवणाऱ्या गोष्टी. यामागे परदेशी हातही असतात . देश अस्थिर करण्याचं हे राजकारण प्रत्यक्ष युद्धापेक्षा सोपं. शेक्सपिअरच्या Richard II, Julius Caesar आदि नाटकांमध्ये वारंवार येणारे हे विषय नील मॅकग्रेगर सामाजिक वास्तवाच्या आरशात पहायला शिकवतात. मग सीझरच्या वधानंतरचं अँटनीचं हे भाषण केवळ गतकालरुदन वाटत नाही..त्यातून पाचव्या हेन्रीच्या जिवाला असलेल्या धोक्याची घंटा वाजत राहते ..

Antony- O what a fall was there , my countrymen !

Then I and you, and all of us fell down,

Whilst bloody treason flourished over us.

शेक्सपिअरच्या मरणोत्तर काळात कार्लटन यांनी लिहिलेल्या ‘’A thankful remembrance’’ यां पुस्तकात राजद्रोहाच्या सर्व घटनांचा स्पष्ट दस्तावेज आहे.. तो समोर ठेवून नील मॅकग्रेगर यांनी शेक्सपिअरच्या संहितांचे विश्लेषण केले आहे.

समाजात प्रत्येक काळात एक फ़ँटसी विद्यमान असते. सगळ्यांना अनुभवायचं असतं एक विमुक्त धुंद शहर, जीवनाच्या सर्व दबलेल्या वासनांचा जल्लोष,उत्सव साजरं करणारं. शेक्सपिअरकालीन लंडनवासियांच्या मानसिकतेत हा मान व्हेनिसला होता. नील मॅकग्रेगर आपल्यासमोर एक तत्कालीन व्हेनिसमधील नखरेल मद्यचषक ठेवतात – काच,सोनं ओतून घडवलेला, आवाहक स्त्रीचं चित्र मिरवणारा , त्या रम्य विलासी नगरीचं प्रतीक म्हणून.

या उतू जाणाऱ्या विलासामागे,समृद्धीमागे आर्थिक उदार धोरणांची कारणं असतात ! बँकिंग ,दलाली,इन्शुरन्स यातून समृद्ध, सर्व वंशाच्या लोकांना सामावून घेणारं उदार आणि अनेकरंगी व्हेनिस . नव्या सामाजिक शक्यतांची, मिश्रविवाहांचीही प्रयोगशाळा. पण या बहुढंगी समृद्धीमागे असतात व्यापारी आणि सावकार..अधिक स्पष्ट वांशिक-धार्मिक परिभाषेत ज्यू सावकार , धाडसी आफ्रिकन सरदार .. संघर्षाचं बीज इथेच रुजतं.. अशा ठिकाणचं कामजीवनही बरंच सैल असल्याच्या वदंता असतात, वेश्यावस्त्या तर उघडपणे आवाहक असतातच, सभ्य स्त्रियांच्या चारित्र्यावरही सहज शंका घेतली जाते, हातरुमालांची देवाणघेवाण हा एक अनाचार संकेत असतो. .. यातूनच व्हेनिसमध्ये वाढलेली निरागस देस्डिमोना प्रेमळ पण संशयी नवऱ्याच्या, ऑथेल्लोच्या- जो व्हेनिसचा नाही तर आफ्रिकेतून आला आहे - संशयाच्या विषारी धुक्यात अकारण घुसमटून जाते.. सांस्कृतिक पूर्वग्रह असं विनाशी काम करत असतात.यामागे उत्तर आफ्रिकेतून येणाऱ्या सरदारांचेही एक महत्वाचे सामाजिक-राजकीय अंग या नवसमाजात विद्यमान आहे. ज्यांना शेक्सपिअर मूर म्हणतो ते हबशी वंशाचे , इस्लामी धाडसी सरदार आफिकेच्या सुवर्णभूमीतून सोने आणि साहस यांची आयात युरोपात करू लागले आहेत. बहुवांशिकतेला वर्ग-वंशविग्रहाचे नवे पदर लाभत आहेत. राजकारण समाजकारण बदलत आहे.जग अधिक व्यामिश्र होत आहे.

ग्रेट ब्रिटनच्या ध्वजावर राजघराण्याच्या राजकारणी युत्यांबरोबर अनेक बदल झाले.ट्युडर घराण्याची राणी एलिझाबेथ वारसाशिवाय मृत्यू पावल्यावर स्कॉटलंडचा सहावा जेम्स तिचा वारस म्हणून प्रिव्ही कौन्सिलने घोषित केला. त्यानेही स्कॉटलंड व इंग्लंड एकत्र आणण्याचे प्रयत्न केले.ही युती म्हणजेच ब्रिटन.जेम्सने नवा ध्वज तयार केला. या सर्वात राजनिष्ठांवरही प्रहार झाले, राष्ट्राच्या आत्मप्रतिमेत बदल झाले. इतिहासाच्या या किचकट कंगोरयांचा त्या जुन्या ध्वजांच्या सहाय्याने नील मॅकग्रेगर एक अभ्यास पेश करतात आणि ही खळबळ शेक्सपिअरच्या नाटकात सुप्तपणे कुठे कशी उमटली असेल त्याचा वेध घेतात.Cymbeline नाटकाच्या शेवटी एका काल्पनिक शांततापूर्ण तहानंतर ब्रिटन व रोम एकत्र येतात. नवे ध्वजारोहण होते. प्रेक्षक नक्कीच या कल्पनाविलासात आपल्या आशांचं प्रतिबिंब पाहात होते..

नील मॅकग्रेगर यांचा हा अनेकांगी लेखाजोखा असाच सामूहिक जाणिवेनेणिवेचे अनेक पैलू पुढेही स्पष्ट करत जातो. घड्याळाची टिकटिक आणि त्यातून येणारं काळाचं भान शेक्सपिअरच्या काळात एक नवाच अनुभव होता. त्याच्या नाटकातल्या अनेक संवादांमध्ये (आणि कविता-सुनीतांमध्येही )काळाची ही टिकटिक वेगवेगळ्या स्वरूपात उमटली आहे.The Winter’s Tale मध्ये तर चक्क काळच व्यक्तीरूपात रंगमंचावर अवतरून भाष्य करतो ! काही ओळी -

Time- I that please some , try all;both joy and horror

Of good and bad ; that makes and unfolds error..

प्लेग ही एक मोठीच समस्या , जीवन विस्कळित आणि खंडित करणारा हा अनुभव शेक्सपिअरच्या व्यक्तिगत जीवनातही येऊन दुर्घटना घडवून गेला आहे, पण आश्चर्यकारकरित्या त्याचे उल्लेख शेक्सपिअरच्या संहितांमध्ये मात्र कमीच आणि अप्रत्यक्ष असे आहेत असं नील मॅकग्रेगर नोंदवतात.प्लेगचा एक जाहीरनामा त्यांच्यासमोर आहे या विवेचनाला पुष्टी देण्यासाठी. Romeo and Juliet च्या कथानकात एक महत्वाचं पत्र प्लेगच्या साथीमुळे स्थानबद्ध लॉरेन्स रोमिओला देऊ शकत नाही हा एकच काय तो प्रत्यक्ष परिणाम..

सोळाव्या शतकातील त्या मध्ययुगीन समाजात क्रौर्य मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे. छळ करून मृत्युदंड , जाहीर देहदंड , देहविटंबना कोणालाच नवीन नाही. लोक हे सर्व पाहायला जमतात..एखादा जाहीर शिरच्छेद बघून पुढे नाटक बघायला जाऊ शकतात ! मग या क्रौर्याचे अगदी थंड उल्लेख शेक्सपिअर जागोजाग करतो यात काय नवल !अगदी नेपथ्यातले सहज केलेले उल्लेख.’’Enter King Henry VI with a supplication and the Queen with Suffolk’s head.Re-enter one with the heads .. ‘’असा प्रकार बराच वेळ पुढे अजून सहा शिरे येईपर्यंत वर्णिला जातो. ‘किंग लिअर’ मध्ये ग्लाउसेस्टरचे डोळे काढण्याचा प्रसंग आणि संवाद अमानुष क्रौर्याचा भयंकर नमुना आहे. पण भयाने थरकाप उडवणारी अशी त्या काळाची एक खूण – काढलेल्या डोळ्याचा चांदीत बसवलेला अवशेष नील मॅकग्रेगर पुराव्याची वस्तू म्हणून आपल्यासमोर ठेवतात तेव्हा त्या असीम क्रौर्याची पक्की ओळख पटते.

आणि मग चरचरून जाणवतं की अरे हे मानवी क्रौर्य एकाच काळात नाही तर सर्वच काळात करुणेच्या सर्व संकल्पनांना शह देऊन नेस्तनाबूत करत आलं आहे. म्हणूनच तर या सर्वाचा मिश्र-गूढ अनुभव देणारा तो महान लेखक कालातीत आहे! ‘Shakespeare goes global’ या शेवटच्या प्रकरणात नील मॅकग्रेगर एक प्रसंग वर्णितात . १९४२मध्ये ज्यूंचं ‘निर्वासन’ करण्याच्या त्या भयाकारी आदेशाचा अर्थ एका तरुण ज्यू अधिकाऱ्याला लगेच कळला. मृत्यूच्या छायेत त्याने प्रथम आपल्या प्रेयसीशी लग्न करायचं ठरवलंआणि तातडीने ते केलंही.पण त्याच्या मनात पहिली प्रतिक्रिया म्हणून उमटले ते शेक्सपिअरचे शब्द.

’’Was ever woman in this humour wooed?’’ (Richard III )!

नेल्सन मंडेलाला आणि अनेक स्वातंत्र्यसैनिकांना , सत्याग्रही आणि डाव्या विचारवतांनाही तुरुंगातही साथ आणि बळ देणारी ही शब्दसृष्टी.

Caesar- Cowards die many times before their deaths;

The valiant never taste of death but once.

Of all wonders that I yet have heard,

It seems to me most strange that men should fear,

Seeing that death, a necessary end,

Will come when it will come..

प्रतिभेची ही अनमोल संपत्ती इतकी शतके टिकून कशी राहिली ? सोळाव्या शतकातल्या लंडनमधला एक लोकप्रिय लेखक,जगाच्या गळ्यातला ताईत कसा झाला?त्या काळांत इंग्लिश नाटके पुस्तकरूपात प्रकाशित करायची पद्धतही प्रचलित नव्हती. आणि खुद्द शेक्सपिअरला तर आपली नाटकं प्रकाशित करण्याची जराही तमा नव्हती पण त्याचा निस्सीम चाहता आणि जिवलग मित्र जॉन हेमिन्ग्स याने शेक्सपिअरच्या मृत्यूनंतर सहा वर्षांनी त्याची सगळी प्रसिद्ध अप्रसिद्ध छत्तीस नाटकं संकलित करून Mr. William Shakespeare Comedies, Histories & Tragedies या नावाने प्रकाशित केली नसती तर काही ठळक नाटकांशिवाय बाकीचा शेक्सपिअर विस्मरणात लोपून गेला असता, त्याची महत्ता मनामनात इतकी कोरली गेली नसती.ही शेक्सपिअरच्या नाटकांची आद्य स्थळप्रत .

या प्रतीच्या सुरुवातीला या मित्राचं अत्यंत हृद्य मनोगत आहे.. अर्पणपत्रिका आहे- ‘’onely to keepe the memory of so worthy a Friend, & Fellow alive’’!

या सच्च्या मित्राच्या रूपाने जणू नियतीलाच ही प्रतिभासंपदा हवेत विरून जाणं मंजूर नव्हतं. आज नेटवर सहजपणे फिरणारी ही अद्भुत अशरीर तरल सृष्टी म्हणजे शेक्सपिअरच्याच शब्दात (‘’The Tempest’’)-

Prospero-That our actors

As I foretold you, were all spirits, and

Are melted into air,thin air,

And ,like the baseless fabric of this vision,

The cloud-capped towers, the gorgeous palaces,

The solemn temples, the great globe itself,

Yea , all which it inherit, shall dissolve,

And like this insubstantial pageant faded,

Leave not a rack behind. We are such stuff

As dreams are made of .

आज हे साक्षात्कारी शब्द वाचताना मन थरारून जातं, मूक होतं. नाटकांमधले अनेकानेक प्रसंग,संवाद आता एका वेगळ्याच प्रकाशयोजनेत झळाळून जातात . एका महान लेखकाच्या लेखनात किती शक्यता, किती स्तर असतात याची जाणीव नव्याने होते

नील मॅकग्रेगर यांचं लेखन समकालीन आणि सर्वकालीन अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करत आपल्याला या कालपटावरच्या थरारक सफरीवर स्वत:सोबत फिरवत नेतं तेव्हा आपण खऱ्या अर्थाने त्या महान लेखकाचे प्रेक्षक होतो.तत्कालीन महत्वाचे पत्रव्यवहार, प्राचीन नाणी, चित्रे ,ध्वज , अनेकानेक पुरातत्वविशेष अशा वस्तू ,या सर्वांचे मौलिक फोटो, तेव्हाचे वृत्तविशेष, इतर समकालीन व अद्यकालीन लेखकांची, इतिहासकारांची उद्धृते आणि सर्वात महत्वाची, सर्वात आनंददायी अशी शेक्सपिअरचीच अवतरणे यातून समृद्ध झालेले हे लेखन आपल्याला अभ्यासाचा आनंद आणि आनंदाचा अभ्यास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याचा प्रत्यय देतं.
-भारती बिर्जे डिग्गीकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"दी आर्टिकल" अशाच सार्थ नामाने अगदी गौरविले जाण्याच्या योग्यतेचे हे लेखन आहे. मी एकदा वाचले... दोनदा वाचले, तरीही ते वाचून झाले असे होत नसून यातील प्रत्येक परिच्छेदाचा स्वतंत्रपणे पुन्हा अभ्यास करण्याची अतिशय गरज आहे असेच मला वाटत आहे. ठराविक वीस वस्तूंच्या मदतीने विल्यम शेक्सपीअर नावाच्या जगप्रसिद्ध लेखकाच्या साहित्य साम्राज्याचा शोध घेऊन त्यावर आडाखे बांधणे यासाठी कोणत्या दर्जाची कल्पनाशक्ती आणि अथक शोधकासाठी आवश्यक असणारी सहनशक्ती नील मॅकग्रेगर यानी किती सखोलरित्या पूर्ण केली आहे तिच्याबद्दल भारतीताईंनी किती गाढा अभ्यास केला आहे त्याचे लखलखीत प्रतिबिंब त्यांच्या प्रदीर्घ अशा लेखावरून स्पष्टपणे जाणवते. हे फार अभिनंदनीय असे कार्य केले आहे.

कालपटाच्या थरारक सफरीसोबत मॅकग्रेगर यानी नेले असले तर ते कशाप्रकारे काम पूर्ण केले आहे याचा तितकाच रोमहर्षक असाच तक्ता मराठीतून समोर आणल्याबद्दल भारतीताईंचे मनःपूर्वक आभार मानले पाहिजेत. शेक्सपीअरने इंग्रजी भाषेस दिलेल्या विविधज्ञानदातृत्वाची विद्यार्थी म्हणून त्या विषयाचा अभ्यास केलेल्या अनेकांना माहिती असते, पण ती नक्कीच परिपूर्ण मानता येणार नाही इतके ते कार्य प्रचंड अशा रुपाचे आहे. विद्वता आणि सौंदर्यदृष्टी एकत्र आणून मॅकग्रेगर यानी वेगळ्या पद्धतीने केलेले नेत्रदीपक असे संशोधन आणि त्याची ओळख तितक्याच तुल्यबळ रितीने इथे करून देण्यात आली आहे. सबब लेख वाचताना झालेल्या आनंदाला तोड नाही असेच म्हणावे लागेल.

भारतीताई, तुमच्या लौकिकाला साजेसा लेख आहे. अगदी तपशीलवार, सौंदर्यस्थळे उलगडून दाखवणारा, तुम्हाला भावलेले मुद्दे आवर्जून नोंदवणारा, पुस्तकाचं महत्व समजावणारा.
तुमचं एखाद्या साहित्यकृतीवरचं भाष्य वाचलं की त्या लेखकांचे कष्ट सार्थकी लागल्याचीच भावना येते.

मी लेख वाचता वाचता दमून गेले. त्यामुळे प्रत्यक्ष पुस्तक कसे आणि किती झेपेल शंका आहे.

मात्र झेपणे, न झेपणे यापलिकडे जाऊन बोलायचं झाल्यास तुमच्यामुळे या अशा अनवट कॅटॅगरीतल्या पुस्तकांची खुप चांगली ओळख होत असते याबद्दल कृतज्ञ आहे.

अरे व्वा....सई...

~ तुझ्या प्रतिसादातील "..त्या लेखकांचे कष्ट सार्थकी लागल्याचीच भावना येते...." हे वाक्य फ़ारच अचूक आहे. यात भारतीताईंविषयी आपल्याल वाटणा-या आदराचे प्रतिबिंब उमटले आहे असेच मला वाटले.

अशोक , लिहिण्याचे कष्ट सार्थ करणारे असे तुमचे प्रतिसाद . ज्या कुणाला आनंद आणि अभ्यास यातलं अद्वैत समजलं त्या सुखी लोकांमध्ये तुम्ही आहात नक्की .
सई , हे पुस्तक दमवतानाच रमवणारं, याच्या निमित्ताने शेक्सपिअर पुन: हाती धरला जातो हा स्वानुभव .. कधीतरी अशी थोडी तरी सवड तुला सापडो ..

सुंदर परिचय. किती रसिकपणे लिहिलंय हे.

अनॉनिमस, हा चित्रपट बघितला का ? http://www.theguardian.com/film/2011/nov/04/anonymous-shakespeare-film-r...

चित्रपट थोडासा वात्रट होता, पण ते थिएटर आणि त्या काळातले नाट्यप्रयोग बर्‍यापैकी सादर केले होते.

नाही दिनेश , आता पाहीन . माझा एकूण कल वाचनाकडे असल्याने पाहायचं खूपसं राहून गेलंय ,मनोमंचावरच पाहणे होते बरेचसे , पण तुम्ही अवश्य सुचवा असं काही Happy , यू ट्यूबवर आहे का हे ?

अनोखा विषय. शेक्सपिअरवर पृथ्वीमोलाचे लिहून झाले असूनही अशा माध्यमाद्वारे त्याच्या स्मृतिरंजनाची रीत निराळीच आणि याबद्दल लेखकाचे प्रचंड कौतुक वाटले.
तुमची लेखणी छान सुरेल झालीय परिचय परिक्रमेत.

शेक्सपिअर हा खरेतर खोल डोह. तत्त्वज्ञान, समाजव्यवस्था, नीतिनियम, नातेसंबंध, राजकारण, अर्थकारण....सर्वांचा मिलाफ. प्रत्येकाच्या वकूबानुसार तळ गवसणार, प्रत्येक बुडीत नवे रत्न मिळण्याची शक्यता. एक पकडताना दुसरे निसटते असेही होते पण या पुस्तकासोबतच, वाक्यावाक्याला दमवणारे मूळ लेखन- निदान tragedies- पुन्हा एकदा अधिक जाणतेपणे डोळ्याखालून घालण्याचा संकल्प नुसता हा परिचय वाचूनच केला हे मात्र नक्की.

भारती, यात साधारण असा पवित्रा घेतलाय कि कुणा दुसर्‍याचेच लेखन या नावावर खपवले गेले ( वॉज शेक्स्पियर अ फ्रॉड ?, असे उपशीर्षक होते या चित्रपटाचे ) पण तरीही त्या थिएटरसाठी, तिथल्या प्रयोगांसाठी ( म्हणजे त्याच्या चित्रीकरणासाठी ) तो बघायलाच पाहिजे.

अवांतर :

भारतीताई,

खरंच तुम्ही लिहिलेल्या लेखावर काही भाष्य करावं इतकी माझी योग्यता नाही. अशोकमामांनी समर्पक शब्दंत प्रतिसाद लिहिलाच आहे.

एक नाव वाचून राहवलं नाही म्हणून हा संदेश लिहितोय. शेक्सपियरच्या काळात सर जॉन डी यांचं नाव आदराने घेतलं जात असे. शेक्सपियरच्या प्रसिद्ध कलाकृती त्यांनीच लिहिल्या होत्या अशीही वदंता आहे. गुगलून पाहिलं तर हे सापडलं : http://www.fengshuiseminars.com/tours/SoFrance/study-notes-dee-shakespea...

आ.न.,
-गा.पै.

टीप : प्रश्न - शेक्सपियरचा ग्लोब म्हणे तो धुरकट्या रंगाचा स्फटिक तर नाही?

तुम्हाला आरशाच्या पलिकडचं दिसतंय आणि ते सांगता आहात ते वाचून आम्हालाही दिसू लागलं आहे.
हे आपलं मी माझ्या तह्रेने लिहिलं.

भारतीताई, वरती अमेयनी व्यक्त केलेला संकल्प वाचून आणखीही एक इथे आवर्जून सांगावंसं वाटलं..

तुमचे लेख वाचल्यावर आमच्या वाचनकट्ट्यावरही त्यावर चांगली चर्चा घडते. दि. पु. चित्रेंवरचा तुमचा लेख वाचल्यानंतर आम्ही तिरकस चौकस मधला हंगेरियन रंगारी वाचला होता आणि त्यावर फार छान उहापोह झाला होता. या वरच्या लेखावरही मी मला तो अवघड गेल्याचा अभिप्राय दिल्यावर त्या अनुषंगाने आणखी बोललं गेलं, ज्यांनी शेक्सपियर अभ्यासलाय त्यांच्याकडून आणखी काही अनुषंगिक भर घातली गेली.

थोडक्यात, तुम्ही लिहितानाच एकीकडे अशा मौलिक चर्चांनाही उद्युक्त करताहात आणि माझ्यासारख्या सामान्य वाचकांना त्याची खुप मदत होतेय Happy ही पोच देतेय तुम्हाला Happy

स्वत:शीच आश्चर्य करीत हे लिहिलं होतं ! आणि आता इतक्या समधर्मी लोकांचे प्रतिसाद वाचून छान वाटतं आहे.
खूप सुंदर प्रतिसाद अमेय.. खूप खोल पाणी आहे हे खरंच .
गा पै, तुम्ही , दिनेशनी दिलेली माहिती नवीन माझ्यासाठी, चेक करेनच.
SRD, तुमची आरसेवाली प्रतिक्रिया मस्त आहे, लॅकान नावाच्या तत्वज्ञाचं एक मोठं विश्लेषणच आहे आरसा या संकल्पनेवरून, ते आठवलं.
सई खूप आभार, असं होत असेल तर माझा हेतू साध्य झाला ..

वरील सर्वांच्या प्रतिसादांना माझ्याकडून दोनशे टक्के अनुमोदन.
अप्रतिम पुस्तक परिचय. शेक्सपियर ह्या अफाट विषयाला हात घालणारे नील मॅक्ग्रेगर हे तर ग्रेट आहेतच. पण त्या पुस्तकाचे अंतरंग इतक्या सफादारपणे उलगडून दाखविणार्‍या तुमचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे. अतिशय माहितीपूर्ण ओळख.

अप्रतिम लिहिलंय!

मिश्र-गूढ अनुभव देणार्‍या शेक्सपिअरच्या लेखनाप्रमाणेच मिश्र-गूढ अनुभव देणारा लेख आहे हा ...!!

आभार पद्मावती, ललिता-प्रीती, अमा !
अमा, >>छान लेख. एकेक नाटकावर स्वतंत्र लिहा.>>

- हजारो ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिशपे दम निकले असं होतं या एकुलत्या एका जगण्याचं Happy

जागतिक रंगभूमीदिनी हा लेख अधिक लोकांकडून वाचला जावा म्हणून धागा वर काढत आहे! शेक्सपिअर हा एकच विषय किती रोचकपणे आणि अभ्यासाने चर्चिला जातो रंगदेवतेच्या दरबारी..