कासरा :- एक वर्हाड़ी लघुकथा

Submitted by सोन्याबापू on 8 July, 2015 - 11:56

"भाऊsssss लौकर चालसान होssss थे कपिला कसच्याकशी करू राहली"

असा कल्ला शंकर दादांन केला तवा म्या भाकर खायाले बशेल होतो. वरनाचा घट पेंड संग फोडेल कांदा, तेल अन बुडी च्या हातची गरम भाकर. बाबा सकाउनच कामापाई अकोल्याले गेलते ते झाकट पडल्यावरीच आले, त्याहीले ज्योन बनून देल्ते माय न अन त्येच् ज्योन झाल्यावर म्या चुली म्हावरे बशेल होतो. थंडी च्या राती चुली म्हावरे बश्याले लै ख़ास वाटते. बाबा वसरीवरी बंगई वर बशेल होते थ्याइचा पान लाव्याचा कार्यक्रम ठरेल होता रातीचा, अन नेमका तवाच शंकर दादा चिल्लावत येऊ रायल्ता आमच्या बेबटीच्या अंद्रे.

म्या थाली वरुन उठुच रायल्तो तदलोग बुडी कनारली "तू काहाले वलवल करतं रे नसानकोंबड्या, पैले भाकर गिटजो मंग जाय कुटी जायतां तर"

तिचा आम्हा लेकराइवर लै जीव हाय! दादा सद्द्या नागपुर वेटर्नरी ले होता शिक्याले अन ताई च एक बरस आंदी लगन झालते.लायना म्या होतो घरचा अन तिले तर हरघडी लायनाच वाटो.

मीन कशी बशी भाकर गिटली तदलोग बाबाचा आवाज आला ते आईले आवाज देत होते "अरे तो लायना काय अंद्रे भजे तळू राहला काय हो!!!??"

आई माया इकळे पलटली अन म्हने "पय बाबू बावाजी बलाऊ राहले"

म्या बिंग धावत भैर आलो त बाबा शर्ट अन लुंगी लपेटुन रेड़ी होते ते मले बोलले

"बाबू हे घे 100 रूपये अन बिंग पयत जा असोलकाराच्या दुकानावर त्याच्याइकुन एक पाव गुड़, बाळांत शेप, लवण अन आटा आनजो मी वावरातनी जाऊ राहिलो, ते सामान आनुन आइले दे ते जे उंड्याचे गोये बनवन ते घेऊन फटकन येजो वावरात"

अन दरवाज्या मांगुन पायणाऱ्या माय कड़े एकडाव पाहुन ते वावरातनी निंगाले. मॅटर लक्षात आल्याच्यान मी बी साईकल काढून पायडल खैचत असोलकारा च्या दुकानावरी पोचलो, त्याहीचा लायना पोरगा जयंता माया ख़ास दोस्त होता.

तटीसा गेलो त जयंता चे बाबा म्हनाले "का बे?? इतल्या रातीचा झाक्टी नंतर कुकडे हिंडू राहला"

मी त्येच्या इकडे यादी सरकोली अन म्हनलो "काका बालंतसोपा पाहिजे कपिला गामन होती आमची, जनु राहली वाट्टे"

विषय बातच समजल्यावर काका नोकरावर चिल्लावले "नामदेव लाकड़ावानी काहाले उभा राह्यला सायच्या सामान बांध, बापू तुवा साइकल अटीच् ठु तुयाले बाबा त तुमची गाड़ी घेऊन गेले आस्तीन न तू मायी स्प्लेंडर घेऊन जाई बापा म्या साइकिल नेतो माया घरी, सकाउन घरी घेऊन येजो गाडी"

मी मनापासून बोललो "हाव काकाजी असंच करा लागते"

तदलोग सामान बांधून झालते. ते घेऊन म्या फूल स्पीड न गाडी पंगवत घरी आलो व गाडी स्टॅंडवरी लावतालावताच चिल्लावलो

"आई सामान घेशीन व " आई धावत वसरी वरून खाली आली अन थैली घेऊन अंद्रे गेली.
15 मिंटाच्या अंदर आई न कपिलेसाठी उंड्याचे गोये बनोले त्यांच्यात नी कुटलेली बालंत सोप गुड़ पानी अन लवन घालेल होते

"जाय बर बाबू बातच!! आत्तालोग जनली असन ते मुकी माय"

मी वावरात जाता बाबा म्हनाले "गनेशभाऊ न गाडी देली वाटते?"

म्हनले "हाव"

गोठ्यातनी 60 च्या बल्ब मंदी पाह्यले तर पुरी थकेल कपिला हुबी होती अन एक बारका गोळा आपल्या चार टांगावर उभा राहाची कोशिस करू रायल्ता. बाबानं ते उंड्याचे गोये घेतले अन कपिलेले जीव लावत चारले एक माया हाती देला अन मी चारत होतो तवा बोलले

"माय लेकराच्या हातून बाळंतईडा खाय व तुया पोटच्या लेकरावानी ह्याले बी दूध देजो" अन तिच्या पाया पडलो आम्ही मंग बाबान ते लायने प्रकरण उचलले भैर आनले अन कोमट पान्यान पुसले अन ते आपल्या टांगावर हुबे राह्यताच त्याले कपिलेच्या थानाले लावले अन माया इकळे वउन म्हनाले

"हे पाय गड्या गोऱ्हा वह्य हा अन मंगळवारी पैदा झाला, लाल रंगाचा हाय अन लै तेज हाय!! आपुन ह्याले बजरंग म्हनू हा!"

मी म्हनो "हाव" अन एकदमच मी अन बाबा घरी जायाले पलटलो

दुसऱ्या दीसा पासून मायावाला एक अल्लगच गेम सुरु झालता, म्या अकरावी मधे होतो तवा कालेज च काई टेंशन नाही रायत जाय, म्या दिवसभर कामधाम आटोपले का बाबा संग वावरात जात जाओ तटीसा बजरंगा संग खेळणे माया टाइमपास झालता, मित्र म्हनत

"सायच्या आता काय डुबरा हायस का बे !!! गोर्ह्या संग खेळाले??"

मी हसून वापस येत जाओ, कारण आता मी गाय दुहाले बी शिकलो व्हतो मीच कपिला दुहत जाओ अन नंतर बजरंग संग खेळत जाओ. होता मोठा तेज सायचा, होता माया कमरी इतकुसा पर सायचा बम उधम करे. हरनावानी टनटन उड्या मारे! त्या उड्याई पाई एकड़ाव आनले होते त्यानं घरावर गोटे. आमच्या गोठ्या बाजुन हीर होती आमची, मस्त बांधकाम करेल बावड़ी होती ते. एक राती कपिला दुहल्यावर म्या बजरंगा खुल्ला सोडला खेळाले . तो मस्त कुद्या मारत जाय, बारक्या आवाजातनी ऊँ ऊँ आवाज करत जाय, मस्त काही वेळा नंतर त्याचा आवाज बंद झाला अन एकदम शंकर दादा चिल्लावला

"भाऊ गोऱ्हा हिरीत पडला होsssss" मले अन बाबाले 2 सेकंद काहीच समजेच ना!!

जाग्यावर आलो त दोघ धावलो तर हीरी च्या अंदरुन आवाज येत जाय बाबा चिल्लावले

"बापू मार अंद्रे कूदी" मी घातल्या कपड़यानच कुदलो हिरीत पान्यात माया दोस्त डूबत होता म्या त्याच्या दोन टांगा इकुन अन दोन तिकुन घेतल्या खांद्यावर त बाबान खाली कासरा देला तो मी माया कमरीले लपेटला अन बजरंग ले घट धरले मंग बाबा अन शंकर दादान जीव लावून आम्हाले वर खैचले!. भाइर आलो त बेज्या थंडी पडेल होती, मंग शंकर दादा न तुराट्या परहाट्या जाळून ताप केला तो मी शेकला अन थरथर करणारा बजरंगा बी तिथेच धरला नंतर त्याले थोड़े दूध पाजले अन शांत केले आम्ही. असा हा आमचा बजरंगा. बाबा चा बी लै आवडता होता . मही 12वी झाली तवा मले भरोसा नाही वाटे इतला मोठा झालता बजरंगा पूरा
5 फुट, भरेल खांदे,टोकदार शिंग मस्त डुरकन्या मारत जाय तो!!. मी अन बाबा दिसलो का खुटा नाही त कासरा तोडून पयत आमच्यापाशी येत जाय .

मले 12वी ले मार्क चांगले आलते त दादा च्या सांगन्या नुसार मी पुन्याले एडमिशन घेल होती, 6-6 महिन्याचे सेमिस्टर नीरा पागल होत जाओ मी जिकडे पाहो तिकडे बिल्डिंगीच बिल्डिंगी. माया सारखा धुर्यावर जगेल पोर्याले हे कैदेवानी वाटे!. मंग मी उपाय म्हनुन ट्रेकिंग ले जाओ भैर हिंडो पुन्याच्या ग्रामीन भागातनी हिंड्याले गेलो का मले गाय अन वासरु पायल्या बरोबर लाड का कराव वाट्ते म्हणून मित्र मैत्रिणी दुचक्यात असत पर त्याहिले काय मालूम म्या माया बजरंगा अन कपिला शोधु राहलो.

दूसरे सेमिस्टर संप्याले आल्ते तवाची गोठ, मोबाइल परवड़े नाही त्या वख्ती हॉस्टेल ले बाबाचा फोन आला हाल चाल झाल्यावर बाबा हळूच फोन वर बोलले,

"बापु, माया लेकरा, ह्या दुष्काळान कपिला खाल्ली, चारा ख़तम, माही नोकरी हाय पर मास्तरकी मधे किती पैशे घराले लावा किती वावराले?? डेपो चा चारा आन्याले पैशे नोते त तिले लंबे सोडले चराले! तटीच काई खाल्ले का काही डसले माहिती नाही बापा पर लेकरा तुले दूध देनारी यक माय त गेली बापा" अन बाबा रडू लागले,

थोड्या वेळाने मीच म्हनलो "बाबा सोताले सांभाळा, माय तर गेली पर बजरंगा?"

बाबा सांगू लागले "बापा कपिला गेली त 3 दिवस चुलीत धुपट नोते!, मंग मीच त्याले गौरक्षण संस्थेत सोडून आलो रे"

बाबा परत रडू लागले त्याइले कशेतरी समजोले अन फोन ठेवता मीच रडू लागलो, तर माया रूममेट होता एक कराड चा विशाल जाधव तो मले समजवु बसला. त्यानं फोन करून चार मित्र मैत्रिणी अजुन बलावले अन भैर चाय पियाले घेऊन गेला!. दोस्त बी माये दोन दिवस उदास होते मह्या कपिला बजरंगाचे ऐकून तवा आमच्या मित्रायन लै काळजी घेतली मायी, सेमिस्टर संपता म्या भेटन ते गाडी घेऊन घरी गेलो तर माय लै रडली मले घट धरून अन उलशेक सावरलेले बाबा "रामकृष्ण हरी करत" बसले होते,
बंगई वर दादा बशेल होता, मी त्याइले म्हनले "चाला आपुन आपल्या बजरंगा ले भेटून येऊ"

तवा बाबा बोलले "नोका जासान तिकडे, त्यानं चारा सोडेल हाय"
पुरा बावला झाल्यागत मी साइकिल घेऊन गौरक्षण संस्थे च्या इकडे धावत सुटलो अन माया मांगे गाड़ीवर बाबा अन दादा येऊ लागले,

तिकडे गेलो तर तिथला नौकर पुंडलिक म्हने "भाऊ बरे झाले आला,तुयाला गोऱ्हा लै जिद्दी हाय लेक"

मी पोटात भरू लागेल हुली(ओकारी) ले सावरत त्याच्या पाशी पोचलो तर पुर्या हड्डीया दिसू लागेल माया बजरंगा धडपड करू लागला म्या पान्याची बाल्टी त्याले लावली त दोन घोट पानी पेला तो. मंग मी त्याले मह्या हातान हराळी चारली त्यानं ते एकच डाव जीभ लंबी करून घेतली अन एकदम मागं पडला! दादा बाबा पुंडलिक धावत आले अन मी तसाच गव्हानी वर हात टेकुन उभा राहलो.

"बजरंगा रेsssss गेले बापा माये लेकरु मले सोडून गेले होsssss" बाबा एकदम रडू लागले.

दादा त्यांना सावरत होता तवा ते उठून माया पाशी आले अन बोलले "लेकरा म्या मारले रे तुयाल्या बजरंगा ले मले माफ़ कर बापा पर काय करू तुले तरी सेमिस्टर च्या मधून कसे बोलावा अन हे जिद्दी जनावर बिलकुल चारा नाही खाये, म्या लै कोशिस केली, पर म्या मारले बजरंगाले रेssss"

मले आयुष्यात मोठे होनेच होते आज!

म्या बाबा ले सावरले त्याइले पुंडलिक न आनेल स्टूल वर बसोले पानी देले,मह्या लाडक्या बजरंगाची 5 माणसाच्या मदतीने गाडून मौतमाती नीट केली त्याच्यावरी एक दगड अन 2 अगरबत्त्या लावल्या. अन भकास तोंडाच्या बाबा अन दादा कड़े पायत होतो तवाच माये मोठेपनाचे सोंग गळून पडले, मी हलकेच साइकिल काढली अन मागे न वळता निंगालो, दादा बाबा धावत मांग आले माया गाडीवर , बंडी ची चाकोरी धरून मी वावरात पोचलो ते शंकर दादा शुन्यात पायत बशेल होता,

मले पाहुन त्याले तोंड फुटले "भाऊ मले समजले...."

मी पुढले ऐकलेच नाई,मागून उदास झालेले बाबा अन दादा आले, सरका चालत म्या गोठ्यात गेलो रिकाम्या खुट्याले पाहुन तिथच सुख्या शेनात बसलो तवा दादा अन बाबा न मले सहारा देला, अन पहिल्यांदाच अनावर होऊन म्या बोंबललो

"बजरंगाsssssssss"

पर आता माया हाती होतेच काय ??

फ़क्त एक नायलॉन चा कासरा सोडून!

(लेखनसीमा) बाप्या

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान जमली तुम्हाला वर्‍हाडी भाषा. काही ठिकाणी चुक वाटली जसे की 'अटीसा तटीसा' हे शब्द विदर्भात नाही तर 'अथि सा.. तथिसा.." असे आहेत ते. अर्थात इथे आणि तिथे.

हुली नंतर कंसात ओकारी नको होते कारण तसे पाहिले तर इथे अनेक शब्द आहेत ज्याचे अर्थ वर्‍हाडी खेरीज इतर कुणाला कदाचित कळणार नाही.

तदलोक (तोपर्यंत) हा शब्द खूप दिवसानंतर वाचला.

बी

माझा जन्म अमरावती चा आहे हो! Happy अन ग्रेजुएशन पर्यन्त जिंदगी अकोल्यातली! वर्हाड़ी मायबोली आहे माझी, अतिसा बद्दल बोलायचे झाले तर मी बाळापुर पारस किंवा आमचे गाव उमरी इकडे "अटिसा" असेच बोलायचो, बाकी हुली ज़रा जास्त आउट ऑफ़ प्लेस वाटला लोकांना समजनार नाही ऐसा वाटला म्हणून कंसात अर्थ ! Happy

आवो राजेभाऊ म्या पन च्यार वर्शे अमरावतीले राहूनच काळ्ले. मले पन माईत हाये अमरावतीले कसे बोल्तात. अन मी पन अकोल्याचाच हाये. अनिकटात राऊन मावाले ईस वर्शे गेले Happy तुमाले काय वाट्ल मले येत नाही इदर्भातली भाश्या. अव लय चांगली येत्ये Happy

नाही देवा तसे त आपुन म्हनतच नाई ना!! म्या फ़क्त क्लियर केले गड्या!! म्हनले नाही बंड़ा तर बारका गोटा माराव! आपलाच गववाला अशीन तर आपल्याच भाषेत शिव्या देईन! Lol Lol

म्हनले नाही बंड़ा तर बारका गोटा माराव! >>>> Lol
वरची नसानकोंबड्या तर लै भारी आहे. मला वापरायची आहे! काय अर्थ आहे त्याचा?

नसानकोम्बड्या हे एक पॉलीमोर्फिक विशेषण आहे!! साधारण प्रचलित शब्दात सांगायचे झाल्यास चळवळी करणारे किरकिरे पोरगे किंवा "नालायक" चे एक रांगड़े वैदर्भीय वर्शन

मस्त लिहिलं आहे सोन्याबापू.
आम्ही 'नसानकुकड्या' वापरतो. अर्थ - सगळं व्यवस्थित असताना उगाच किरकिर करणारा किंवा कुठलीही गोष्ट आवडून न घेऊन उगाच नावं ठेवणारा.

मस्त लिहिलं आहे सोन्याबापू.>> +१००
आम्ही 'नसानकुकड्या' वापरतो. अर्थ - सगळं व्यवस्थित असताना उगाच किरकिर करणारा किंवा कुठलीही गोष्ट आवडून न घेऊन उगाच नावं ठेवणारा.>> +१

मस्त मस्त कथा.. छान जमली बापु. खरी घटना आहे ना ? शेवटी फार वाईट वाटल वाचताना..

सोन्याबापु आणि बी.. तशी वर्‍हाडी गावागणिक बदलते..
चपाती ला जस विदर्भात पोळी हा शब्द आहे.. त्यातच नागपूर कडले बरेचसे लोक पोडी, पडत गेलो ( पळत गेलो ), हडू चल असे म्हणतात .. तेच अमरावती मधे परतवाड्या कदे ळ चा उच्चार र होतो. जसे पोरी खाल्ली, परत परत गेलो, हरु चाल.. अशा तर्‍हेने.. अर्थात सगळीकडेच नाही बोलत पण गावांमधे अस बोलतात. तिथले बरेच लोक संपर्कात आहे. चंद्रपुर गडचिरोली कडे आणखीनच वेगळं,,

आपल्याइकडे बरेच हिंदी आणि इंग्रजी शब्द सुद्धा आहेत ना बोलीभाषेत..
वर कथेत बापुंनी दिल्याप्रमाणे.. मॅटर झाला.. वापस, कोशिस, दिवाल (दिवार) , बेस झाल ( बेस्ट्=चांगल झाल) असे कित्येक..

टीना,
अहो कुठल्या न कुठल्या गावात ही घडलीच आहे , २००३ ची पाणी टंचाई प्रचंड भयंकर होती अकोल्यात तर महिन्यातून एकदा नळ येत असत फ़क्त, तो हाहाकार अन माझे धुर्यावरचे अनुभव+माझ्या वावरातल्या जनावराई सोबत असलेल्या काही आठवणी मिळून हे जमले.

गा पै,

आपल्याला कोणचे शब्द लागले नाहीत सांगा, यथामती अर्थ नक्की द्यायचा प्रयत्न करतो नाही तर वर्हाड़ी एक्सपर्ट्स पण आहेत की माबो ला.

इतर सर्व,

खुप खुप आभार

सोन्याबापू...
लय दांगळो एकदम...
बाकी माबोवरचे अन् तशेही आकोलावाले (जुना अकोलावाला 'अकोल्या'ले आकोला म्हनते) आहेतच टॅलेण्टेड. [म्हंजे मी पण अकोलावाला आहे म्हणून म्हणत नाहीये बरं का ;)]

नुसत्या बोलण्यावरून माणूस शहरातला की उमरीतला की रामदासपेठ-जठारपेठवाला की आकोट फाईलवाला हे ओळखायला जिंदगी तिथल्या धुळमातीत घालवा लागते. बाकी इतर गावांप्रमाणे वर्‍हाडातल्या शहराचं, माणसांचं हवं तेवढं डॉक्युमेंटेशेन झालेलं दिसत नाही. लेखकांनी फक्त ग्रामीण साहित्यापुरतंच प्रादेशिक बोलींना बांधून ठेवलंय. शहरी धेडगुजरी मराठी (आम्ही बोलतो ती, इंग्र्जीमिक्स नव्हे) फारशी क्रीएटीव्ह लेखनात ,निदान माझ्या वाचनात तरी आलेली नाही.असो.

माझ्या सासुबाई म्हणायच्या 'माझे टोंगळे दुखत आहेत' तेव्हा काही दिवस कळलेच नाही टोंगळे म्हणजे काय. तीच गोष्ट 'गंजा'ची. पातेल्याला गंज म्हणतात हे काही दिवसांनी कळलं.

अस्सल वर्‍हाडी भाषा आणि ह्रदयस्पर्शी कथा ... अगदीच जमलीये ....

आताच एका शेतकरी मित्राला वाचायला दिली तर बिचार्‍याच्या डोळ्यात अश्रू तरळले .... म्हणाला जनावराला (गाय असो म्हैस असो की बैल) एकदा का माया लावली की ते तस्सेच आपल्यालाही जीव लावते ....

खूप सुरेख लेखन! कथा भिडली.

नसान्कोंबड्या हा हेंबाडतुत्रीला समानार्थी शब्द दिसतोय Lol हो ना? बरोबर का?

पातेल्याला गंज म्हणतात हे काही दिवसांनी कळलं.>> गंज हा शब्द कोकणातही प्रचलित आहे. पातेलं = गंज नाही. गंज उभा असतो. आम्ही ताक घुसळण्यासाठी गंज वापरतो.

थेट कळली गोष्टं... भाषा वेगळै असूनही... लिहिण्याची पद्धत आणि विषय ह्यामुळेच असणार.
केवळ अप्रतिम, सोन्याबापू

Pages