भरली ढेमशी

Submitted by चिनूक्स on 22 April, 2011 - 03:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. अर्धा किलो कोवळी ढेमशी
२. कांदा - एक मोठा
३. लसूण - सहा पाकळ्या
४. आलं - अर्धा इंच
५. सुक्या खोबर्‍याचा कीस - दोन चमचे (भाजलेला)
६. भाजलेले तीळ - दोन चमचे
७. जिरेपूड - एक लहान चमचा
८. धणेपूड - एक लहान चमचा
९. लवंग - ४
१०. वेलदोडा - दोन (सालासकट)
११. कोथिंबीर - अर्धा वाटी
१२. गूळ
१३. आमचूर
१४. तेल
१५. मीठ
१६. तिखट

क्रमवार पाककृती: 

१. ढेमशी धुऊन, त्यांची देठं काढून घ्या. ढेमशी मोठी, आणि जरा जून असतील तर सालंही काढावीत. नंतर चमच्याने आतला गर काढून घ्यावा. थोडा गर ढेमशांमध्ये राहू द्यावा. बिया असतील तर त्या टाकून द्याव्यात. गर मात्र राखून ठेवावा.
२. कांदा बारीक चिरावा. किंचित तेलावर तो गुलाबी परतावा.
३. थोड्या तेलावर आलं, लसूणही परतून घ्यावं.
४. लवंग आणि वेलदोडे भाजून घ्यावेत.
५. परतलेला कांदा, आलंलसूण, खोबर्‍याचा कीस, तीळ, लवंग-वेलदोडे, कोथिंबीर, धणेजिर्‍याची पूड, चवीप्रमाणे तिखट, मीठ, गूळ, आमचूर आणि ढेमशांतला गर एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.
६. हे सारण ढेमशांमध्ये भरावे.
७. कढईत नेहमीपेक्षा जरा जास्त तेल गरम करावे. उरलेलं वाटण तेलात परतावे.
८. वाटणाला तेल सुटलं की त्यात ढेमशी घालावून थोडा वेळ परतावीत.
९. नंतर भाजीत पाणी घालून कढईवर ताट ठेवून शिजवावी.
१०. भाजी शिजत आली की त्यात थोडं हिंग आणि हवा असल्यास अर्धा लहान चमचा गरम मसाला घालावा.
११. भाजी शिजली की वरून कोथिंबीर घालावी.

वाढणी/प्रमाण: 
तीन माणसांसाठी
अधिक टिपा: 

१. ढेमशी शक्यतो कोवळी घ्यावीत. जून ढेमशी लवकर शिजत नाहीत.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आताच बाजारात पाहिलीत ढेमशी. पण ह्ये मोठाली. त्याची भरली ढेमशी म्हंजे फारच झालं असतं. शेवटी लाल भोपळा/ कोहोळं आणलं न काय.

सध्या बर्‍याचश्या मायबोलीकरांचे वजन घटवण्याचे प्लॅन चालू आहेत. या काळात असले बीबी उघडण्यास बंदी घालावी अशी विनन्ती अ‍ॅडमिन यांना कराण्यायेत हय ::फिदी:

ढेमशाची साधीशी भाजी (वाटण घाटण न करता) करता येते का? कृती माहिती असल्यास कृपया सांगावी.

अचानक बाफ वर आला. Happy

रॉहू,
पुण्यात हल्ली बरेचदा मंडईत ढेमशी, तीही कोवळी, मिळतात. मिळाल्यास भाजी करून बघा. नक्की आवडेल.

अकु,
फोडी करून, डाळ घालून ढेमशांची मस्त भाजी होते. अशी भाजी केली तरी तेल जरा सढळ हाताने घातल्यास चव भारी येते.

जाई.,
वजनाचा विचार न करता कुठलाही पदार्थ खाल्ल्यास वजन वाढत नाही.

टीना,
कृपया तुमची कृतीही वेगळ्या पानावर लिहाल का?

चिनूक्सा, हो, तशी एक कृती वहिनीने सांगितली आहे. लसूण, मिरची व भिजवलेली हरभरा डाळ / मूग डाळ घालून, तेल सढळ हाताने घालून परतून भाजी. चमचमीत केली तरच मजा येते, इति वहिनी. उद्या करून बघणार आहे. थँक्स लगेच सांगितल्याबद्दल! Happy

चिनूक्स , टाकतेच आता रेसिपी..
फोटो नसल्यामुळे देण जिवावर येत होत मला..पण भाजीची डिमांड बघता टाकावीच लागेल Wink ..
आणि हो..तुम्ही वगैरे नकोच..उगा बहोत मोठ्ठ झाल्याचा फिल येतो Lol

भारतात मी कधीही ढुन्कुन ही न पाहिलेल्या ह्या भाजीला उसगावात काहिच्या काही किन्मत आहे, लई महाग मिळतात इथे.

चिनूक्सा, भाजी केल्यावर तुझी पोस्ट पाहिली! Proud भाजीत मला कळालेल्या कृतीत अॅडिशन म्हणून आमचूर पावडर घातली. लसूण पेस्ट, हिरवी मिरची व लाल तिखट हे तेलासारखेच सढळ हाताने वापरल्यामुळे गरम मसाला न घालताही चांगली वाटत होती चव. आता गरम मसालाही घालून बघेन.

बायदवे, ढेमसे शिजवताना त्याचा एक विशिष्ट वास येतो का? मला असा गंध बराच जाणवला. प्रत्येक भाजीला तिचा स्वत:चा गंध असतोच. कदाचित ही भाजी तशी अपरिचित असल्यामुळे गंध जास्तच जाणवला. तसेच साले काढून भाजी करावी का? मी साले न काढता केली, परंतु तसे केल्याने भाजी अगदी किंचित करकरीत वाटली.

नाम क्यु नही लेती >>> Happy कारण ढेमशी दोडकी आहेत ना ! (म्हणजे लाडकी नसलेली ती दोडकी. नाहीतर जवस, अळशी, फ्लॅक्स सीड टाइप वाद सुरु व्हायचा) Happy

धन्यवाद योकु. भाजी चांगली झाली होती. मी चिनुक्सच्या रेसिपीत बदल केले थोडे (वेळ वाचवायला) आणि माझ्याच्याने तिखट फारसं घातल्या जात नाही. त्यामुळे असेल पण अगदी टिपिकल चव नव्हती.

नताशाच्या फोटोतली ढेमशी बर्‍यापैकी सुदृढ आहेत. आमच्या घरी अशी मोठी मोठी ढेमशी असली तर चिरून बिया काढून, चण्याची डाळ घालून भाजी करतात.
जर लहान लहान ढेमशी (लिंबाएवढ्या आकारातली) असतील तर भरली ढेमशी हमखास!

टीना धन्यवाद. हो, क्वचित कधीतरी खायला हरकत नाही Happy
योकु, ढेमसं लिंबाएव्ढीच आहेत. ते पॅन अगदी छोटं आहे (६ इंची), म्हणून ढेमसंं मोठे दिसत आहेत. Happy

वजनाचा विचार न करता कुठलाही पदार्थ खाल्ल्यास वजन वाढत नाही.>>>>> सर, सर तुम्ही डायटिशिन का नाही झालात !! काश आप डायटिशिन होते Lol Proud

Pages