भरली ढेमशी

Submitted by चिनूक्स on 22 April, 2011 - 03:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. अर्धा किलो कोवळी ढेमशी
२. कांदा - एक मोठा
३. लसूण - सहा पाकळ्या
४. आलं - अर्धा इंच
५. सुक्या खोबर्‍याचा कीस - दोन चमचे (भाजलेला)
६. भाजलेले तीळ - दोन चमचे
७. जिरेपूड - एक लहान चमचा
८. धणेपूड - एक लहान चमचा
९. लवंग - ४
१०. वेलदोडा - दोन (सालासकट)
११. कोथिंबीर - अर्धा वाटी
१२. गूळ
१३. आमचूर
१४. तेल
१५. मीठ
१६. तिखट

क्रमवार पाककृती: 

१. ढेमशी धुऊन, त्यांची देठं काढून घ्या. ढेमशी मोठी, आणि जरा जून असतील तर सालंही काढावीत. नंतर चमच्याने आतला गर काढून घ्यावा. थोडा गर ढेमशांमध्ये राहू द्यावा. बिया असतील तर त्या टाकून द्याव्यात. गर मात्र राखून ठेवावा.
२. कांदा बारीक चिरावा. किंचित तेलावर तो गुलाबी परतावा.
३. थोड्या तेलावर आलं, लसूणही परतून घ्यावं.
४. लवंग आणि वेलदोडे भाजून घ्यावेत.
५. परतलेला कांदा, आलंलसूण, खोबर्‍याचा कीस, तीळ, लवंग-वेलदोडे, कोथिंबीर, धणेजिर्‍याची पूड, चवीप्रमाणे तिखट, मीठ, गूळ, आमचूर आणि ढेमशांतला गर एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.
६. हे सारण ढेमशांमध्ये भरावे.
७. कढईत नेहमीपेक्षा जरा जास्त तेल गरम करावे. उरलेलं वाटण तेलात परतावे.
८. वाटणाला तेल सुटलं की त्यात ढेमशी घालावून थोडा वेळ परतावीत.
९. नंतर भाजीत पाणी घालून कढईवर ताट ठेवून शिजवावी.
१०. भाजी शिजत आली की त्यात थोडं हिंग आणि हवा असल्यास अर्धा लहान चमचा गरम मसाला घालावा.
११. भाजी शिजली की वरून कोथिंबीर घालावी.

वाढणी/प्रमाण: 
तीन माणसांसाठी
अधिक टिपा: 

१. ढेमशी शक्यतो कोवळी घ्यावीत. जून ढेमशी लवकर शिजत नाहीत.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या अजूनही लक्षात येत नाहीये ढेमशी म्हणजे नक्की काय ( घोर अज्ञानी, ढ )?

इथे मुंबईला दुसरे काही नाव आहे का? खुपदा माहिती नसते. मला इथे डिंग-या माहिती नव्हत्या, श्रीरामपूर येथे काही वर्षे होतो तेव्हा त्या माहिती झाल्या कि मुळ्याच्या शेंगा असतात आणि त्याची भाजी करतात. श्रीरामपूरला काही जणांना सुरण माहिती नव्हता, तसेच तिथे लाल भोपळ्याला डांगर म्हणतात आणि दुधीभोपळयाला भोपळा, थोडक्यात असा नावात प्रदेशानुसार फरक असतोना तसेच ढेमशीची अजून काही नावे आहेत का? (थोडे अवांतर लिहिल्याबद्दल सॉरी).

आमच्या वर्गात एका मुला ला ढेमश्या म्हणायचे.

मस्त लागते ही भाजी. कविता महाज नांची बहीन हैद्राबादेत दिली आहे, तिने खिलवली होती.

ढेमशी विदर्भात फेमस आहेत. इतकं की तश्या प्रकारच्या मुलाला/मुलीला किंवा तत्सम नाक असणार्‍यांना ढेमश्या/ ढेमशी म्हटल जातं.
नक्की आठवत नाही, पण ताशामधेसुद्धा एक ढेमसा नावाचा (ताल्/सुर्/इ.) प्रकार आहे.
दिलपसंद नाव ऐकलं अन कुठे दिलपसंद अन कुठे ढेमसं (नाव) असं वाटलं होतं.

हे म्हणजे सहा आसनी रिक्षाला कोल्हापुरात (?) टमटम म्हणतात, तर विदर्भात डुक्कर... तसच काहीसं. Lol

माझ्या अजूनही लक्षात येत नाहीये ढेमशी म्हणजे नक्की काय ( घोर अज्ञानी, ढ )? >>> सायन, दादर ला वैगरे या नावानेच मिळते का?

http://en.wikipedia.org/wiki/Tinda

हे बघा. इथे सगळ्या भाषात काय म्हणतात आणि वगैरे.... लिहिलय... आणि फोटो पण आहे.

किंवा tinda गुगल करा. इमेजेस मिळतील.

आणि ही ढेमशी घरी कुंडीत लावता येतात असही कुठेतरी वाचलय....

आज लावा आणि ७० दिवसांनी ढेमशी तयार. Wink

अहाहा!! तोंपासु फोटु, दिनेशदा. Happy

चिनुक्स, रेसिपी सही आहे एकदम. करुन पहायला हवी या पद्धतीने. आज कित्येक वर्षांनी ह्या भाजीचे नाव वाचले. विस्मरणातच गेली होती ढेमशी.. आई बनवायची याची मस्त भाजी. मात्र, भरुन नाही, चिरुनच. भारी चवदार लागायची ही भाजी.

कोणीतरी एकदा याला कोठे आणि काय म्हणतात हे सगळं एकत्र करुन टाकाल का ? म्हणजे एकाआड एका पोस्टमध्ये तेच लिहावे लागणार नाही Uhoh

मस्त Happy

आमच्याकडे सुकं खोबरं, तीळ, गोडा मसाला, तीळ असा मसाला वाटून रस्साभाजी करतात. पुढच्यावेळी ह्या कृतीतला मसाला वापरुन करेन. चिरुनच करेन पण बहुतेक. ढेमसे नाव फारच unappetizing वाटतं म्हणून मी टिंडेच म्हणते.

जुन्या मायबोलीवर लिहीलेल्या कृती, मूळ कर्त्याच्या नावासोबत
--------------------------------------------------------------------
भरले टिंडे संपदा

टिंडे ताजे, तुकतुकीत सालीचे बघून घ्यावेत. ते देठाकडून कापून घ्यावेत. हा कापलेला भाग झाकण म्हणून प्रत्येक टिंड्यावर ठेवता येतो. खालून सुद्धा टिंडे कापून घ्यावेत, ज्यामुळे ते पातेल्यात नीट उभे करता येतील. आता आतील गर पोखरुन घ्यावा.

घरी पनीर तयार करुन घ्यावे (पाऊण लिटर दुधाचे पुरेसे होईल). घरचे पनीर मऊ असल्याने त्याचे सारण मऊ होते. १ कांदा बारीक चिरुन, १ छोटा बटाटा उकडून, कुस्करुन घ्यावा. यात २ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन, चवीपुरते मीठ, थोडी कोथिंबीर, जिरेपूड घालून एकत्र करावे. हे मिश्रण टिंड्यांमध्ये भरावे. एवढा मसाला साधारणपणे ८ ते १० टिंड्यांना पुरतो.

पातेल्यामध्ये जरा जास्त तेल घेऊन आले लसूण पेस्ट परतावी. २ बारीक चिरलेले कांदे आणि २ टोमॅटोंची प्युरे घालून बाजूने तेल सुटेपर्यंत पुन्हा परतावे. नंतर हळद, तिखट, मीठ चवीनुसार घालावे. थोडेसे फ्रेश क्रीम घालावे, त्यामुळे ग्रेव्हीला छान केशरी रंग येतो. मग त्यात टिंडे ठेवून, झाकण ठेवून शिजवावे. टिंडे जास्त शिजत नाहीत ना यावर लक्ष ठेवावे, कारण जास्त शिजल्यास वाढतानाच सर्व मसाला बाहेर येण्याची शक्यता असते. सर्व्ह करताना वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालून द्यावे.

टीप : मी स्वतः मोजून मापून करत नाही, म्हणून जमेल त्याचीच मापे दिली आहेत. प्रत्येकाने चवीनुसार मापात बदल करुन घ्यावा.

------------------------------------------------------------------------------------
नागपुरी भरलेले टिंडेदिनेश

मूळ पद्धतीत हे जरा जास्त मसालेदार असतात. ज्यांना तिखट चालत नाही त्यांच्यासाठी हा सोपा प्रकार

५/६ मध्यम आकाराचे टिंडे घेऊन ते देठाकडून पोखरावे. आतला सर्व गर बाहेर काढून आतून मीठ लावून निथळत ठेवावे.

एक वाटी बेसन खमंग भाजून घ्यावे. त्यात चमचाभर तीळ, थोडे वाटलेले आले, लसूण, हिंग, हळद, तिखट व मीठ घालावे. थोडा चिंचेचा कोळ किंवा आमचूर घालावा. भाजलेला खोबरे कीस पण घालता येतो. हे मिश्रण पाण्याने भिजवायचे नाही.
हे आता टिंड्यात भरायचे. पाऊणच भरायचे. मग हे टिंडे थोड्या तेलात रचून वर झाकण ठेवून शिजवायचे. पाणी शक्यतो लागणार नाही. वाटलेच तर थोडे शिंपडावे. आतले पाणी शोषून हा मसाला फुगतो व टिंड्याच्या काठापर्यंत येतो.

हाच मसाला भरुन तासलेली कारली, पडवळ, परवर, मोठ्या मिरच्या (साध्या आणि सिमला सुद्धा ) भरता येतात. भेंडीही करता येते. हे सगळे एकदमही करता येते. मंद आचेवर सर्व खरपूस तळावे. मसाला बाहेर येईल अशी भिती वाटत असेल तर दोर्याने बांधावे.

मला चक्क ढेमशी डोंबिवलीत मिळाली.

भरली ढेमशी रेसिपिज समजल्या पण त्याव्यतिरीक्त कशी भाजी करता येईल. अगोनी रस्सा भाजी दिलीय वरती, योकुनी पण एक प्रकार लिहिलाय, अजुन काही प्रकार समजले तर बरं होईल. पहिल्यांदा करणार आहे.

अर्रे..इथ तर अर्ध्यांना ढेमसेच माहित नाही अस दिसतय..
डाळ ढेमस्/ढेमशे प्रकार पन मस्तच लागतो..हरभर्‍याची डाळ हवी पन त्यासाठी..घरी सहसा नुसती ढेमशी चिरुन किंवा डाळ घालुन करतात..पण भरली ढेमशी सुद्धा करत असते मी वेळ काळ पाहुन.. मस्त लागते भाजी ही..
गुळ आंम्ही पन नाही टाकत यात.. मुळात ढेमश्याला अशी काही चव नसते म्हणून तिखट आणि काळा मसाला जास्त टाकण्यात येतो.. आमचुरपन सहसा वापरत नाही.. त्याएऐवजी चिंच घालतात.. तिळ तिखटपणा कमी करते त्यामुळे त्यालाही पास Lol ..
खरच पण ढेमश्याच्या भाजीची रेसिपी बघुन धन्य धन्य झाले.. धन्यवाद चिनुक्स..
कुणी नसेल टाकली तर डाळ ढेमश्याची पाक्रू टाकेल मी Happy

टाक टीना डाळ-ढेमशी. पण डाळ घालून कुठलीही भाजी रस्सा करतो तेव्हा त्यात गोडा मसाला आणि गुळ घालतो (थोडासा).

अरे हो . हे पान डायरेक्ट ओपन झाल्याने ते वाचनात आले नव्हते. निषेध मागे घेण्यात येत आहे आणि माफीही मागण्यात येत आहे. अंतःपुरात चौकशी केली असता ढेमसे म्हणजे घोसाळी नव्हेत असे 'फाडकन ' उत्तर आलेले आहे. अब मैं क्या करूं ? कहां जाऊं. ?

Pages