"वळणाचे पाणी"

Submitted by अमेय२८०८०७ on 20 May, 2015 - 04:46

अतरंगी खेळ खेळायचो लहानपणी. दूरदर्शनही तेव्हा भरपूर स्पोर्ट्स कव्हरेज करायचे. क्रिकेट आद्य असले तरी फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन असे इतरही खूप खेळ पाहूनपाहून भरपूर रस निर्माण झाला होता. "बी बी सी स्पोर्ट्स राऊंडप" भक्तिभावाने ऐकत असू. विंबल्डन सुरु झाले की गणपतिउत्सवापेक्षा मोठी धामधूम वाटायची मला आणि भावाला. बेकर, अगासी, एडबर्ग ही जणू आमच्या गल्लीतील बरोबरीची पोरे आहेत अशा थाटात त्यांच्या खेळाचे मूल्यमापन केले जाई. आकर्षक स्कर्टमधील स्टेफीच्या सणसणीत फोरहँड इतकेच तिच्या बांगड्यांचेही कौतुक वाटायचे.

टीव्ही वरील खेळ संपला की आमची रात्रीची सभा सुरु होई. घराला मोठी ओसरी होती. कपडे वाळत घालायची दोरी सोडवून आणि आईची जुनी साडी घालून मस्त टेनिसचे नेट तयार व्हायचे. ओसरीचे मग मिनी सेंटर कोर्टमध्ये रूपांतर होऊन जायचे. बॅडमिंटन रॅकेट आणि प्लास्टिक बॉल यांनी सामने खेळले जात, जागतिक क्रमवारी मांडून ठेवली जायची. विजेता मुलाखत-बिलाखत देत असे. सुदैवाने घरात कुणी आडकाठी करून बिनभांडवली मौजेत विघ्नसंतोषीपणा केला नाही.

तीच गत क्रिकेटची. अंगणात मी आणि भाऊ दोघेच खेळताखेळता धावते वर्णन करत, धावफलक लिहीत संपूर्ण कसोटी सामना खेळत असू. स्टंप्सच्या मागे फुलझाडे होती ती नैसर्गिक विकेटकीपर असायची. स्लिप्स म्हणून एक चटई कुंपणावर लावली की बाकी मैदानात आम्हीच बॉलर आणि फील्डर. दिवस हां हां म्हणता सरायचे, बकासुरागत पानात पडेल ते निमूट पोटात जायचे आणि सदैव भयंकर उत्साही वाटत राहायचे. पुढे अनेक वर्षांनी स्टीव्ह वॉच्या "आऊट ऑफ माय कम्फर्ट झोन" या उत्कृष्टआत्मचरित्रामध्ये त्याची जिगरबाज खेळाडू आणि कर्णधार म्हणून झालेली घडण याबरोबरच तो आणि जुळा भाऊ मार्क लहानपणी असेच अंगणात सामने खेळत असत, स्विंगसाठी टेनिसबॉलला चिकटपट्टी लावून "शिवण" तयार करत असत वगैरे वाचताना आनंदाचे भरते आले होते एकदम.

बाकीच्या मुलांना यातले काही अपील होत नसे, खुळेपणा वाटायचा पण आम्ही आमच्यात मग्न होतो. दोघेही बऱ्यापैकी क्रिकेट खेळाडू असल्याने गल्ली टीमचे अविभाज्य भाग होतो म्हणून पोरे जास्त चिडवायची नाहीत मात्र.

नंतर असे खेळणे फारसे झालेच नाही. शिक्षणादी व्यवधाने हात धुऊन मागे लागली, वयही वाढत गेले आणि आयुष्याने वाटाच वेगळ्या करुन टाकल्या. आपण इतक्या तुटपुंज्या साधनावर काय जागतिक काहीतरी खेळत असायचा आव आणायचो, हे आठवून थोडी लाज-युक्त-मौजही वाटत गेली.

आज इतक्या वर्षांनी या आठवणी सरसरून यायचे कारण म्हणजे मघाशी मुलगा एकदम उत्तेजित स्वरात माझ्याकडे आला. हातात बॅडमिंटन रॅकेट आणि स्मायलीचा सॉफ्ट बॉल नाचवत मोठ्या हर्षाने तो म्हणाला,"बाबू हे बघ मी एक नवीन गेम शोधलाय! आपल्या हॉलमध्ये आपण शटलऐवजी हा बॉल वापरून टेनिस खेळू शकतो. चल लवकर, मी नडाल (डोक्याला पट्टी बांधायची असते) आणि तू फेडरर.

हा गेम तुझ्या बापा-काकाने वीस वर्षापूर्वीच शोधलाय हे सांगून त्याचा रसभंग करावा वाटला नाही पण त्याच्यामागे खेळायला जाताना सूक्ष्म थरार उठला आणि लहान्या दिवसांचा वारा कानात ओळखीची शीळ वाजवत गेला, हे मात्र नक्की.

ती "पिढीचे पिढीत नेणाऱ्या" गुणसूत्रांची जीवशास्त्रीय भानगड, शाळेत केवळ कोक्या जोशी शिकवायचा म्हणून खोटी वाटायची (या शिक्षकाचा सदैव एकेरीच उल्लेख झाला का कोण जाणे, यांचे घर शाळेच्या रस्त्यावर होते आणि तिथे मुबलक असणाऱ्या केळीच्या झाडांना सदैव जांभळे कोके लगडलेले दिसत).

पण कोक्या खरे बोलत होता आफ्टरॉल!!
वळणाचे पाणी वळणाला.....वगैरे म्हणींतही राम असणारच.

याच न्यायाने तो मोठा झाल्यावर कपाटातले "वुडहाऊस" काढून एकटाच हसत बसलेला असेल, "Walden" वाचून थरारुन उठेल किंवा "अंतू बर्व्यासोबत" हसता हसता अन्तर्मुखही होईल ही आशा/इच्छा मूळ धरत आहे. एखादा चित्रपट पाहून आईबाबा एकमेकांच्या नकळत डोळे का पुसतात हेही कदाचित त्याला कधीतरी उमजेल. अर्थात नैसर्गिक आवडीने झाले तरच. यु कॅन ओन्ली लीड अ हॉर्स टू वॉटर.... असे आमचे "तत्त्वज्ञ सामंत"सर म्हणायचे(हे इंग्लिश कमी आणि तत्त्वज्ञान जास्त शिकवायचे!) .....तेही सत्यच आहे.

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच सुरेख लिहिलय.. लहान मुल मोठं होताना सगळेच जण नकळत का होइना त्याच्या आई-वडिलांचे गुण त्या मुलात शोधतच असतात Happy

छान लिहिलंयत.

खेळाची आवडच काय पण आपल्या अपत्याने एखादा शब्द बोलण्याची लकब अगदी आपल्यासारखीच उचलली आहे , हे जाणवले तरीही खूप भारी वाटते.

मस्तच लिहिलंय

होतं खरं असंच आणि मनातून आपल्यालाही वाटतच असतं की असं व्हावं

ज्या सहजतेने खेळांबाबत झालं त्याच सहजतेने वूडहाऊस, वॉल्डन करता व्हावं याकरता शुभेच्छा Happy

मस्त लिहिलयस अमेय..

त्याच्यामागे खेळायला जाताना सूक्ष्म थरार उठला आणि लहान्या दिवसांचा वारा कानात ओळखीची शीळ वाजवत गेला, हे मात्र नक्की. >>>> हे मनाला भिडल अगदीच.

फारच अफाट म्हणजे निव्वळ अफाट लिहिलं आहेस.
थोडक्यात बरंच काही व्यक्त करून गेलास आणि सांगूनही गेलास.
अनेक गोष्टी आहेत लेखात, लहानपण, ते वाढणं, अनेक गोष्टीतून मार्ग काढणं (स्वतच खेळायच आणि कॉमेंट्री पण स्वतच, फुलझाडाना नैसर्गिक विकेट्किपर बनवणे, साडी लावून बॅडमिंटन नेट इ. ) हे सगळं शिवाय शिक्षकांच्या शिकवणी वगैरे तु फार सुंदर गुंफल्यास एकात एक. सुरेख विचारांची माळ तयार झाली आहे हा लेख म्हणजे. Happy

पुलेशु!

सुंदर लिहिलं आहे. आवडलं. पोरांमध्ये आपले "गुण" दिसतात तेव्हा आनंद होतोच पण अनेकदा मावश्या, काका, आजी-आजोबा यांचा फारसा सहवास नसताना सुद्धा हमखास त्यांच्या लकबी दिसल्या की आश्चर्य आनंद सगळच एकत्र Happy

मस्त लिहिलंय ...
सुरेख विचारांची माळ तयार झाली आहे हा लेख म्हणजे. <<<<<+११

Pages