उपनिषदांचा अभ्यास - भाग ३ - केनेषितम् (कुणाच्या इच्छेने ?)

Submitted by पुरंदरे शशांक on 20 May, 2015 - 06:58

उपनिषदांचा अभ्यास - भाग ३ - केनेषितम् (कुणाच्या इच्छेने ?)

केनोपनिषद

या उपनिषदाचे नावच खूप मजेशीर आहे - केन म्हणजे कोण/कुणाच्या -
या उपनिषदातील पहिलीच ऋचा आपल्याला असे काही विचारात पाडते की बस्स ...
हे एकच उपनिषद जरी आपण मुळातून अभ्यासले तरी एक काय पण अनेक आयुष्ये आपल्याला अपुरी वाटतील इतके हे सखोल, गंभीर आणि स्वानुभूतिपूर्ण असे उपनिषद आहे. कारण हे बौद्धिक मनोरंजन नाहीये वा स्पिरिच्युअल एंटरटेनमेंटही नाहीये - इथे अनुभव महत्वाचा आहे. यात दिलेले शब्द हे केवळ दिशा दाखवणारे आहेत. त्या दिशेने कोणी वाटचालच केली नाही तर काय उपयोग ? जसे "मुंबईकडे" अशा पाटीलाच (बोर्डला) जर मी कवटाळून बसलो तर मुंबईला कधीही पोहोचणारच नाही. तसे हे उपनिषद पाठ करुन यात सांगितलेले तत्व माझ्या कधीही लक्षात येणार नाही. याउलट या तत्वाचा ध्यास जर कोणी घेईल तर मात्र त्याचा नक्कीच काहीतरी उपयोग होईल.
वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा | येरांनी वहावा भार माथा || असे जे तुकोबारायांनी अतिशय परखडपणे म्हटले आहे ते याच अर्थाने. बुवांनी या उपनिषदात सांगितलेल्या तत्वाचा अनुभव घेतल्यामुळेच ते पुढे म्हणतात - खादल्याची गोडी देखिल्यासी नाही | भार धन वाही मजुरीचे || एखादे पक्वान्न खाण्यात जी मजा आहे ती काय ते नुसते पहाण्यात आहे का ? ज्याला या तत्वाचा नुसता शाब्दिक अर्थ माहित आहे तो केवळ भारवाही मजूर आहे झालं ...

तर आता पाहू यात - केनेषितम् (कुणाच्या इच्छेने ?)

ॐ केनेषितं पतति प्रेषितं मनः केन प्राणः प्रथमः प्रैति युक्तः ।
केनेषितां वाचमिमां वदन्ति चक्षुः श्रोत्रं क उ देवो युनक्ति ॥ १ ॥
कुणाच्या इच्छेने आणि प्रेरणेने मन धाव घेते ? कुणी योजलेला प्रथम प्राण हालचाल करतो ? कुणाच्या इच्छेने प्रेरिलेली ही वाणी (लोक) बोलतात ? कोणता देव चक्षु आणि श्रोत्र यांना त्या-त्या कामी योजतो ?

अशा प्रकारचे मूलभूत प्रश्न जिथे उपस्थित केले जातात त्या मंडळींबद्दल एकतर फक्त आदर दाखवला जातो वा या प्रश्नांकडे सरळ सरळ दुर्लक्षच केले जाते !!

काय गंमत आहे ना आपली - आयुष्यभर जी गोष्ट नैसर्गिकरित्या, सहज घडत असते - श्वसन, विचार करणे, पहाणे, ऐकणे याकडे आपण कधी विशेष गांभीर्याने पहातच नाही. या सार्‍या क्रियांमागचे सारे शास्त्र (सायन्स) आपल्याला माहित आहे (असे आपण समजतो झालं), त्यामुळे या अवयवांच्या कार्यात बिघाड झाला की त्याकरता करावे लागणारे विविध उपचार आपण धावधावून करतो - बस्स.. पण त्यापलिकडे काय आहे याचा कधी विचारच करीत नाही.
त्यामुळे हे जे प्रश्न आहेत ते मात्र जागच्या जागीच रहातात ---
खरोखर या मनाचा, डोळ्यांचा, कानाचा कोणी चालक आहे का हे आपले आपण चालतात ? असा हा मूलभूत प्रश्न. हा चालक असलाच तर त्याला जाणायचे कसे आणि जाणायचे तरी का ??
सर्वसाधारण माणसाला दररोजचे जगणे, त्याकरता लागणार्‍या सोयी-सुविधा यांचेच इतके महत्व वाटते की या असल्या बिनकामाच्या प्रश्नांची दखलही त्याला घ्यावीशी वाटत नाही. क्वचित कोणी सिद्धार्थ (गौतम बुद्ध), कोणी तुकोबा अशी नावे डोळ्यासमोर येतात आणि दुसर्‍याच क्षणी हे काही आपले काम नाही असे समजून आपण ते अतिशय सोयीस्कररीत्या नजरेआडही करतो. (इथे कोणाला दोष द्यायचा नाहीये वा कोणाच्या जगण्याची टिंगलटवाळीही करायची नाहीये तर या मूलभूत प्रश्नांकडे अतिशय गांभीर्याने पहाणार्‍याला फार मोठे धैर्य लागते हे अधोरेखित करायचे आहे इतकेच). कोणाला असेही वाटते की हे शोधणे फक्त ऋषीमुनींचे किंवा फारतर संतांचे काम आहे, याच्याशी आपला तसा काहीच संबंध नाहीये (?).

आपल्यात काही विचारवंत (?) असेही आहेत की त्यांना वाटते - हे सारेच्या सारे जीवन इतके गुंतागुंतीचे आहे की त्यातले प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे हे लक्षात न घेता असले निरर्थक (?) प्रश्न या लोकांना पडतातच कसे !!

मात्र या ऋषीमुनींना पूर्णपणे ज्ञात आहे की या सगळ्याचे मूळ आपल्यातच आहे. जोपर्यंत या पाच-सहा फुटी देहाला आपण "मी" म्हणतोय, या मनाला, या बुद्धीला मी समजतोय तोपर्यंत या जीवनातल्या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी आपण कधीही जाऊ शकणार नाही. या ऋषिंचा जो स्वानुभव आहे त्याच्या आधारे ते म्हणतात की या कानामागे कोणी वेगळाच चालक आहे, या डोळ्यामागेही तोच आहे इतकेच काय या मनामागेही तोच आहे. हा चालक कोण हे ओळखा. या ओळखण्याला प्रचंड धैर्य लागते. दररोजचे साधे जगताना समोर येणार्‍या अनंत अडचणींचा सामना करीत करीत, आजूबाजूच्या अनेक प्रलोभनांना दूर सारत सारत आपल्या देह-मन-बुद्धीच्या चालकाला ओळखणे ही अजिबात सामान्य गोष्ट नाहीये - हा परम पुरुषार्थ आहे.

तुकोबांसारखे महापुरुषही या शरीराच्या चालकाला जाणून होते -
चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलवितें हरीविण ॥१॥
देखवी दाखवी एक नारायण । तयाचें भजन चुकों नका ॥ध्रु.॥
मानसाची देव चालवी अहंता । मी चि एक कर्त्ता ह्मणों नये ॥२॥
वृक्षाचीं हीं पानें हाले त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ॥३॥
तुका ह्मणे विठो भरला सबाहीं । तया उणें कांहीं चराचरीं ॥४॥३९१३||

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या केवळ शाब्दिक वा बौद्धिक करामती नसून शुद्ध स्वानुभव आहे, तो कसा घ्यायचा याचेही मार्गदर्शन या ऋषीमुनींनी, संतांनी निरनिराळ्या पद्धतीने केलेले आहे. (त्यानुसार कृती मात्र आपल्यालाच करावी लागणार, तिथे ना शब्दपांडित्य उपयोगी पडत ना काही ठराविक आचारविधी)

ज्या कोणाला या व अशा प्रश्नांची फारच निकड वाटते तो वेगवेगळ्या पद्धतीने, मार्गाने हे शोधू जातो.

श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यत् वाचो ह वाचं स उ प्राणस्य प्राणः ।
चक्षुषश् चक्षु: अतिमुच्य धीराः प्रेत्यास्माल्लोकात् अमृता भवन्ति ॥ २ ॥
(श्रवणाचे जे श्रवण, मनाचे जे मन, वाणीची जी वाणी, प्राणाचा जो प्राण, चक्षुचा जो चक्षु, तोच तो देव. त्याला जाणून, देहभाव सोडून, धीर पुरुष या लोकातून निघून जाऊन अमर होतात.)

इथे देव म्हणून ज्याला संबोधले आहे ती कुठलीही मूर्ति, देवता, इ. नसून एक तत्व आहे हे लक्षात घ्यावे. हे तत्व त्या डोळ्यामागे आहे, त्या कानामागे आहे, त्या मनामागे आहे. या तत्वामुळे ते ते इंद्रिय कार्यरत होते. त्या तत्वाला कसे जाणायचे तर देहभावापलिकडे जाऊन, मनापलिकडे जाऊनच. दुसरे महत्वाचे की या प्रक्रियेला प्रचंड धैर्य लागते. एखादे गणितातले प्रमेय, सिद्धांत जाणावे तसे हे नाहीये. याला खूप काळही लागू शकतो. (पारमार्थिक साधनेचा धैर्य हा पाया आहे. सबुरी, धीर याला फार महत्व आहे)

सर्वसाधारण माणसाला आपला देह, मन, बुद्धी इतकेच कळते. डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ (वाणी व चव घेणे) ही जी आपली ज्ञानेंद्रिये आहेत त्यामुळे आपल्याला जे आसपासचे ज्ञान होते तेवढेच काय ते खरे असे बरेचदा वाटते. त्यामुळे यापलिकडेही काही आहे यावर विश्वास ठेवणे फारच कठीण जाते. जसे काहीशे वर्षांपूर्वी एक्स रे, यू व्ही रे, अल्ट्रासाऊंड याबद्दल कोणी सांगितले तर त्यावर विश्वास ठेवणे कठीण जात असेल.

यासंबंधात एच. जी. वेल्स या प्रसिद्ध लेखकाने लिहिलेली एक फार मार्मिक गोष्ट आठवते. - त्या गोष्टीत असे आहे की वेल्समहाशय एकदा भटकत भटकत एका अति दुर्गम दरीत पोहोचतात जिथे त्याआधी कोणीही मानव कधी गेलेलाच नसतो. त्या दरीतही एक मानव वस्ती असते पण ते सर्वच्या सर्व पूर्णपणे अंध असतात. वेल्सला फारच आश्चर्य वाटते की जरी ते पूर्ण आंधळे असतात तरी त्यांचे सर्व व्यवहार अतिशय सुरळीत चालू असतात. वेल्सची गाठ तिथल्या लोकांशी पडल्यावर त्या लोकांनाही फार आश्चर्य वाटते की हा कसा वेगळाच प्राणी जो बाकी तर अगदी आपल्यासारखाच आहे पण वेगवेगळे रंग, कुरुप-सुरुप असे काहीसे विचित्र, अनाकलनीय बोलतोय !!
मग ती मंडळी वेल्सला त्यांच्यातल्या तज्ज्ञ मंडळींकडे (त्यांच्यातल्या डॉ. कडे) नेतात - ते वेल्सला पूर्ण तपासतात आणि सांगतात की हा अगदी आपल्यासारखाच आहे फक्त याच्या कपाळावर दोन लिबलिबित गोळे आहेत ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत - ते काढले की हा अगदी आपल्यासारखाच "नॉर्मल" होईल ... Happy Wink

याच संबंधात विनोबा म्हणतात - जेवढी आपली ज्ञानेंद्रिये तेवढे आपले भोग्य विषय. ते पुढे म्हणतात की उद्या जर परग्रहावरुन कोणी सहा ज्ञानेंद्रियेवाला प्राणी आला तर पृथ्वीवरील पंच ज्ञानेंद्रियेवाला माणूस फारच खट्टू होईल - की याला अजून एक जास्त विषय भोगता येतो जो मला भोगता येत नाही. Happy Wink

एवढेच काय सध्याच्या सुप्रसिद्ध मॅट्रिक्स या चित्रपटातील हे वाक्यदेखील याच अर्थाचे आहे -

What is real? How do you define real? If you're talking about what you can feel, what you can smell, what you can taste and see, then real is simply electrical signals interpreted by your brain.
- Morpheus (चित्रपट - मॅट्रिक्स)

श्री ज्ञानेश्वर माऊलींनीही याच अर्थाच्या ओव्या तेराव्या अध्यायातील सतराव्या श्लोकावर निरुपण करताना लिहिल्या आहेत - ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते |
ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विस्ठितम् ||अ.१३-१७||
(जे अंधारास अंधार तेजाचे तेज बोलिले
ज्ञानाचे ज्ञान ते ज्ञेय सर्वांच्या ह्रदयी वसे ||गीताई)
जें मनाचें मन| जें नेत्राचे नयन| कानाचे कान| वाचेची वाचा ||९३०||
जें प्राणाचा प्राण| जें गतीचे चरण| क्रियेचें कर्तेपण| जयाचेनि ||९३१||

जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल या सुप्रसिद्ध पुस्तकाचा लेखक रिचर्ड बाख यानेही देहभावापलिकडे असणार्‍या आपल्या मूळ स्वरुपाविषयी असे स्वच्छ लिहिलेले आहे -
The trick, according to Chiang, was for Jonathan to stop seeing himself as trapped inside a limited body that had a forty-two-inch wingspan and performance that could be plotted
on a chart. The trick was to know that his true nature lived, as perfect as an unwritten number, everywhere at once across space and time. (साभार - Jonathan Livingston Seagull by Richard Bach)

पांवसचे स्वामी स्वरुपानंद त्यांच्या 'अमृतधारा' या ग्रंथात म्हणतात -
'मी मी' म्हणसी परी जाणसी काय खरा 'मी' कोण
असे ' काय ' मी 'मन ' ' बुद्धी ' वा ' प्राण ' ? पहा निरखोन ।।११२||

प्राण बुद्धि मन काया माझी परि मी त्यांचा नाही
तीं हि नव्हती माझी कैसें लीला कौतुक पाही ! ||११३||

श्री समर्थ म्हणतात -
देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला।
देहातीत ते हीत सांडीत गेला॥
देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी।
सदा संगती सज्जनाची धरावी॥ मनोबोध १६३॥
मी कोण ऐसा हेत | धरुनि पहाता देहातीत | अवलोकिता नेमस्त | स्वरुपेचि होय || दा. ५-६-२१||
देहातीत वस्तू आहे | ते तू परब्रह्म पाहे | देहसंग हा न साहे | तुज विदेहासी || दा. ८-८-२८||

थोडक्यात सांगायचे तर - या उपनिषद्कालीन ऋषिमुनींनी (तसेच प्राचीन-अर्वाचीन सर्वच्या सर्व संतांनी) या देहापलिकडे, या मनापलिकडे "जे" काही आहे त्याचा शोध घ्या म्हणून कळवळून सांगितले आहे.
देह-मनापलिकडे जायला विलक्षण धैर्य लागते. कारण आधी या देहमनापलिकडे काही आहे यावर ठाम विश्वास ठेवावा लागतो. मग काही परमार्थ-साधना करुन (योग, सांख्य, इ.) कोणालाही याचा अनुभव घेता येतो. उदा. - जसे पतंजलिमुनी म्हणतात तसे योगाच्या सहाय्याने हे साधता येते. योग हा एक मार्ग झाला. असे उदंड साधना मार्ग आहेत.

हा विषयच खूप गंभीर असल्याने या उपनिषदातील उरलेल्या ऋचांचा अभ्यास पुढील भागात पाहूयात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

१] http://www.maayboli.com/node/52366 उत्तिष्ठत् जाग्रत् - उपनिषदांचा अभ्यास - भाग १

२] http://www.maayboli.com/node/52840 - उपनिषदांचा अभ्यास - भाग २
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ -
१] श्री ज्ञानेश्वरी
२] श्री दासबोध
३] मनोबोध
४] श्री अभंगगाथा (श्री तुकोबाराय)
५] अष्टादशी - आ. विनोबा, परंधाम प्रकाशन.
६] जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगल - रिचर्ड बाख
७] अमृतधारा - स्वामी स्वरूपानंद, पांवस

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केनोपनिषदावरील निरुपण आपल्याकडून आम्हांस वाचावयास मिळावे असे वाटत होते, ते आज मिळाले. सुंदर सोप्या भाषेत आपण ते सांगितले आहे. अहंभाव सोडला की सारे सोपे होऊन जाते. पण सारे गाडे तिथेच तर अडते.
"कोणाचे हे घर?| हा देह कवणाचा?|| आत्मा राम त्याचा | तोचि जाणे|| आम्ही काय जाणणार आणि आम्हांला काय उमगणार?
धन्यवाद.

भाग-१ आणि भाग-२ या पूर्वी वाचले आहेतच. या विषयाबाबतची गोडी मनी अजूनही ताजी असताना हा तिसरा भाग समोर आला, जो पहिल्या दोन भागांइतकाच वाचनीय आणि शशांक जी यांच्या अभ्यासूवृत्तीची साक्ष देणारा आहे.

एखादे इप्सित गाठायचे असेल तर विचाराला कृतीचीच साथ मिळणे आवश्यक आहे. मुंबई पाटीला कवटाळून बसले म्हणजे मुंबईला मी पोचत नाही. त्यासाठी पायी वा वाहनाने प्रवास करणे क्रमप्राप्त आहे...हा दाखला विलक्षण प्रभावी आहे. तद्वतच उपनिषदे तोंडपाठ करून ती मजपर्यंत पोचली असे होत नसून त्याच्या प्राप्त होण्यासाठी गरजेचा ध्यास मी धरला पाहिजे...त्यांची शिकवण अगदी रक्तात भिनली तरच अभ्यासाला अर्थ राहील....खूप सुंदर विवेचन झाले आहे.

"...या देहमनापलिकडे काही आहे यावर ठाम विश्वास ठेवावा लागतो...~ या विधानाला तर माझा शतप्रतीशत पाठिंबा. हा विश्वासच अभ्यासाला उपयुक्त ठरू शकतो.

श्री.शशांक पुरंदरे यांचे या लेखमालेबद्दल अभिनंदन करावेच लागेल.

आहाहा... शशांक.. केवळ अप्रतिम... पहिले दोन मिसलेत.. ते वाचून काढतेच.
ज्ञानदेवांची विराणी आठवली - कानडा वो विठ्ठलू.. दृष्टीचा डोळा पाहो गेले Happy

खूप सुंदर. मी पुर्वी ऐकले आहे हे उपनिषद. इथे सिंगापुरात शिवम मंदिरामधे एकेक उपनिषद घेऊन त्याचे रसग्रहण केले होते. अजूनही करतात.

देह आणि मनाच्या पलिकडे खूप खूप काही आहे हे माहिती आहे पण ती वाट माहिती नाही आणि कुणी सांगितली तर ती वाट फार बिकट वाटते. बिकट ह्यसाठी वाटते की रोजच्या अन्न वस्त्र गरजा पुर्ण करायला जी नोकरी चाकरी कष्ट करावे लागतात त्यातच आयुष्य संपून जाते. आणि जेव्हा गात्र थकून जातात तेंव्हा वेळ असूनही उर्जा राहिलेली नसते शरिरात.

त्यामुळे एका जन्मात काय काय करावे हा गहन प्रश्न आहे.

खूप छान लिहीलय . सर्व सामान्यांना अगदी सहज समजेल असं अर्थपूर्ण रसाळ शैलीतलं तुमचं निरुपण पुन्हा पुन्हा वाचत रहावसं वाटणारे आहे .
कुणाच्या इच्छेने ?....या प्रश्नाच्या आवर्तात रात्री बराच काळ मन गरगरत राहिलं या प्रश्नातुन नवनवे उपप्रश्न कवितेसारखेच मनात थैमान घालु लागलेत आता.