"मी सुसुंगगडी!"

Submitted by Adm on 18 May, 2015 - 20:17

१९ मे म्हणजे माझ्या आज्जीचा वाढदिवस. ती आज असती तर एकोणनव्वद वर्षांची झाली असती. आम्ही लहान असताना आज्जी आम्हांला खूप गोष्टी सांगायची. रोज दुपारी, रात्री झोपताना गोष्टी ऐकून मगच झोपायचो . तिच्याकडून मी आणि भावाने ज्या गोष्टी ऐकल्या, त्या पुढे भावाच्या मुलांनीही ऐकल्या. माझी मुलगी रिया सव्वा महिन्याची असताना आज्जी गेली त्यामुळे रियाला मात्र त्या गोष्टी आज्जीकडून (म्हणजे तिच्या पणजीकडून) ऐकायला मिळत नाहीत. आम्ही आठवतील तश्या सांगत असतो पण ती सर काही येत नाही. ही सुसुंगगड्याची गोष्ट रियासकट आमच्या सर्वांच्या आवडीची. आज्जीने कुठे वाचली की कोणाकडून ऐकली की स्वतःच रचली ते माहित नाही कारण आत्तापर्यंत मी वाचलेल्या गोष्टींच्या पुस्तकात कधी गोष्ट सापडली नाही. त्यामुळे आज्जीच्या वाढदिवसानिम्मित इथे लिहून ठेवतो आहे.
--------------

एक असतं जंगल. त्या जंगलात रहात असतात खूप सारे प्राणी. वघोबा, सिंह, कोल्हा, लांडगा, हत्ती, रेडा, अस्वल वगैरे.. आणि बरेच पक्षी, कावळा, चिमणी, मोर, पोपट, कोंबडा वगैरे.. एकदा काय झालं, वाघोबा आपल्या गुहेतून निघून जंगलात फिरायला गेला. तिथेच जवळ खेळत असलेला कोंबडा खेळता खेळता चुकून वाघोबाच्या गुहेत शिरला. आधी तो घाबरला पण मग गंमत म्हणून त्याने गुहेचं दार बंद केलं आणि आतून कडी लावून घेतली. थोड्यावेळा वाघोबा आपल्या गुहेकडे परतला. येऊन बघतो तर काय, गुहेचं दार आतून बंद!
मग त्याने दार वाजवलं आणि दरडावून विचारलं, "आत कोणे ?"
कोंबड्याला कळेना की आता काय करावं. मग त्याने उत्तर दिलं, "मी सुसुंगगडी."
वाघोबाने विचारलं, "सुसुंगगडी ? तू काय करतो ?"
कोंबडा म्हणाला, "वाघाचं तंगडं मोडतो!"
वाघोबाने विचार केला, वाघाचं तंगडं मोडतो म्हणजे नक्कीच कोणतरी भला मोठा प्राणी असणार आणि मग घाबरून धुम पळत सुटला. आपल्याला वाघ घाबरला हे बघून कोंबड्याला मजा वाटली. पळता पळता वाघोबाला रस्त्यात भेटलं अस्वलं.
अस्वल म्हणालं, "अहो वाघोबा, तुम्ही असे का पळताय आणि इतके घाबरलेले का दिसताय ?"
वाघोबा म्हणाला, "अरे अस्वलभाऊ, तुला काय सांगू! माझ्या गुहेत सुसुंगगडी शिरलाय, तो म्हणतो मी वाघाचं तंगडं मोडतो."
अस्वल म्हणालं, "तुम्हांला कोणतरी फसवत असेल. चला मी येतो तुमच्याबरोबर. आपण बघुया." मग ते दोघं मिळून परत वाघाच्या गुहेकडे आले. आता अस्वलाने दार वाजवालं आणि विचारलं, "आता कोणे?"
कोंबडा म्हणाला, "मी सुसुंगगडी."
अस्वलाने विचारलं, "सुसुंगगडी ? तू काय करतो ?"
कोंबडा म्हणाला, "वाघाचं तंगडं मोडतो आणि अस्वलाच्या झिंजा ओढतो!"
ते ऐकल्यावर वाघ आणि अस्वल दोघही घाबरलो आणि धुम पळत सुटले. पळता पळता त्यांना रस्त्यात भेटला रेडा.
रेडा म्हणाला, "अरे अस्वलभाऊ आणि वाघोबा, तुम्ही असे का पळताय आणि इतके घाबरलेले का दिसताय ?"
अस्वल म्हणालं, "अरे रेडेदादा, काय सांगू तुला. वाघोबाच्या गुहेत शिरलाय एक सुसुंगगडी. तो म्हणतो मी वाघाचं तंगडं मोडतो आणि अस्वलाच्या झिंजा ओढतो!"
रेडा म्हणाला, "अरे असा कोणी सुसुंगगडी असतो का? तुम्हांला कोणतरी फसवत असेल. चला मी येतो तुमच्याबरोबर. आपण बघुया." मग ते तिघं मिळून परत वाघाच्या गुहेकडे आले. आता रेड्याने दार वाजवालं आणि विचारलं, "आता कोणे?"
कोंबडा म्हणाला, "मी सुसुंगगडी."
रेड्याने विचारलं, "सुसुंगगडी ? तू काय करतो ?"
कोंबडा म्हणाला, "वाघाचं तंगडं मोडतो, अस्वलाच्या झिंजा ओढतो आणि रेड्याची शिंग मोडतो!"
ते ऐकल्यावर वाघ, अस्वल आणि रेडा तिघही घाबरलो आणि धुम पळत सुटले. पळता पळता त्यांना रस्त्यात भेटला कोल्हा.
रेडा म्हणाला, "अरे रेडेदादा, अस्वलभाऊ आणि वाघोबा, तुम्ही असे का पळताय आणि इतके घाबरलेले का दिसताय ?"
रेडा म्हणाला, "अरे कोल्होबा, काय सांगू तुला. वाघाच्या गुहेत शिरलाय एक सुसुंगगडी. तो म्हणतो मी वाघाचं तंगडं मोडतो, अस्वलाच्या झिंजा ओढतो आणि रेड्याची शिंग मोडतो!"
कोल्हा म्हणाला, "तुम्हांला कोणतरी फसवत असेल. चला मी येतो तुमच्याबरोबर. आपण बघुया." मग ते चौघं मिळून परत वाघाच्या गुहेकडे आले. आता कोल्ह्याने दार वाजवालं आणि विचारलं, "आता कोणे?"
कोंबडा म्हणाला, "मी सुसुंगगडी."
कोल्ह्याने विचारलं, "सुसुंगगडी ? तू काय करतो ?"
कोंबडा म्हणाला, "वाघाचं तंगडं मोडतो, अस्वलाच्या झिंजा ओढतो आणि रेड्याची शिंग मोडतो आणि कोल्ह्याचं शेपुट तोडतो!"
पण कोल्हा होता हुषार आणि लबाड. तो काही घाबरला नाही. त्याने विचार केला हा आवाज तर ओळखीचा वाटतो आहे. मग त्याने काय केलं, ह्ळूच गुहेच्या मागच्या बाजूला गेला आणि तिथल्या खिडकीतून आत डोकावून पाहिलं आणि बघितलं तर कोंबडा! मग त्याने वाघ, अस्वल आणि रेड्या बोलावून सांगितलं की "बघा सुसुंगगडी वगैरे काही नाही. हा तर साधा कोंबडा आहे!!". त्या सगळ्यांनी मिळून मागची खिडकी हळूच उघडली, त्या कोंबड्याला धरून बाहेर काढलं आणि जोरात बदडायला सुरूवात केली. मग कोंबडा रडून गयावया करायला लागला, "सॉरी सॉरी, मी परत असं करणार नाही! कोणाला फसवणार नाही."
मग सगळ्यांनी त्याला सांगितलं की पुन्हा असं केलस तर तुला अजून मोठी शिक्षा करू. कोबंड्याने परत खोटं न बोलण्याचं आणि कोणाला न फसवण्याचं कबूल केल्यावर त्याला सोडून दिलं!
म्हणून खोटं कधी बोलू नये आणि कोणाला कधी फसवू नये!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुसुंगगडी इथेही आला!! Lol
सगळ्यात मजा म्हणजे रियाला रंगवून रंगवून ही गोष्ट सांगताना ऐकणं!
एकदम मस्त गोष्ट आणि सुसुंगगडी (म्हणजे काय?) हे नाव तर त्याहून भारी. Proud

अरे, ही गोष्ट मी वाचली आहे लहानपणी. पण त्याचं नाव सुसुंगगडीच होतं का हे नक्की आठवत नाही Happy
थँक्यू पराग! अगदीच नॉस्टॅल्जिया झाला.

हाहाहा फार आवडते ही गोष्ट. थँक्यू परत आठवण करून दिल्याबद्द्ल!

मी ऐकलेल्या व्हर्जनमध्ये - सशाच्या पिल्लाला आई सांगते गुहेकडे जाऊ नकोस आणि तरी ते जाते. मग "मी आहे ससुल्यागडी, वाघोबाचे कान ओढी, हत्तीची सोंड छाटी" करत गोष्ट लांबते, सगळे प्राणी घाबरतात. (जंगलात कुणाला ससा = ससुल्या कसे समजत नाही असले प्रश्न तेव्हा नाही पडायचे Happy ) शेवटी सशीण आपल्या पिल्लाचा आवाज ओळखते. गुहेच्या मागे जाऊन बोगदा करते आणि पिल्लाला घरी घेवून जाते.

आताचे भाचे पब्लिक त्या गोष्टीत पेग्विंन बिग्विंन पण आणते. Biggrin

एकदम लहान होऊन बाबांकडून हीच गोष्टं ऐकाविशी वाटली...
सीमंतिनी सेम.. आमच्याकडेही सुसुल्यागडीच होता असं आठवतय... आणि ते यमक जुळायचं... सुसुल्यागडी, शेपुट तोडी, झिंज्या ओढी...

मलाही ससुल्यागड्या version ठाऊक होते.

आज्जीच्या आठवणीनिमित्त गोष्ट लिहिन्याचीकल्पना आवडली!

अरे वा बर्‍याच जणांना आवडलेली दिसते आहे गोष्ट.. Happy

सगळ्यात मजा म्हणजे रियाला रंगवून रंगवून ही गोष्ट सांगताना ऐकणं! >>>> हो. ती भारी सांगते गोष्ट.. आणि "सुसुंगगाडी" म्हणते.. Proud

थँक्यू परत आठवण करून दिल्याबद्द्ल! >>> एनी टाईम.. Happy

आजीच्या इतरही गोष्टी इथे लिहून ठेव पराग. >>>> चांगली आयड्या आहे. आमच्या बाकीच्या फेवरीट गोष्टी म्हणजे कोल्होबा कोल्होबा बोरं पिकली, राजा आणि त्याच्या बोबड्या राण्या, पांडूची ज्याच्याकडे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी असते आणि सोनसाखळीची.

आज्जीच्या आठवणीनिमित्त गोष्ट लिहिन्याचीकल्पना आवडली! >>> Happy

यू मस्ट बी मिसिन्ग युअर ग्रॅनी >>>> व्हेरी मच. Sad

>>>शेवटी सशीण आपल्या पिल्लाचा आवाज ओळखते. गुहेच्या मागे जाऊन बोगदा करते आणि पिल्लाला घरी घेवून जाते.

हो हो. हेच व्हर्जन ऐकलंय. Happy

सोनसाखळीची कुठली ? ऐकल्यासारखी वाटत नाही.

आज ही गोष्ट आणि त्याखालच्या प्रतिक्रिया वाचताना कितीतरी गोष्टी धडाधड आठवल्या. मगर माकडाकडे काळीज मागते ती, कोल्होबा कोल्होबा बोरं पिकली, लांडगा आला रे आला, उंदराची 'राजा भिकारी, माझी टोपी चोरली', बोके आणि लोण्याची वाटणी, चल रे भोपळ्या अशा कितीतरी आजीच्या फेवरेट गोष्टी.
बोबड्या राण्यांची गोष्ट आमच्याकडे ब्राह्मण आणि त्याच्या उपवर तीन बोबड्या मुलींची होती. त्यातले संवाद नीट आठवत नाहीयेत आत्ता. 'पक्कन पै, त्याया मी काय कै" ( पटकन (हातातली पळी) पडली, त्याला मी काय करणार ! ) एवढाच आठवतोय Lol

मला तर ह्यातल्या बर्‍याचशा माहितही नाहीत .. Happy

पराग किंवा ज्यांनां कोणाला अशा गोष्टी येतात त्यांनीं प्लीज् लिहून ठेवा इकडे सगळ्या गोष्टी किंवा त्यांची मॉडर्न व्हर्जन्स् .. Happy

मस्त .. अश्या कथा वाचण्यापेक्षा ऐकायला जास्त मजा येते. मागे नीलम प्रभू, भक्ती बर्वे यांच्या कॅसेट्स होत्या.

आणि लाकुडतोड्या, सिंह आणि उंदीर (हेल्पिंग इच अदरवाली), कोल्हा आणि करकोचा (सुरईवाली), ससा-कासव, आभाळ पडलं पळापळा, बिरबलाची खिचडी...
बोबड्या मुलींची अगोनी संवाद सांगितल्यावर आठवली.

बोबड्या राण्यांची गोष्ट >>>

पहिली : हिंग जियं घाईय्या त (म्हणजे तर) कढी गोद होईय्या..
दुसरी : याजाने सांगित्ते तई तू का गं बोईय्या ?
तिसरी : बोईय्या न चाईय्या दालाडं (म्हणजे दारा आड) धैय्या (म्हणजे लपली म्हणे ! )

Happy

त्या कॅसेट्स मध्ये एकदम दिग्गज लोकं होते, पण फारच नाटकी आणि प्रेमळपणे सांगून ऐकायला बोर व्हायचं, मे बी मोठं झाल्यावर ऐकल्यामुळे असेल.

>> त्या कॅसेट्स

तशी लेकाकरता कोणीतरी एक व्हीसीडी पाठवलेली आहे माझ्याकडे .. कोणास ठाऊक ससा, अस्सावा सुंदर चॉकलेट चा बंगला वगैरे गाण्यांची .. गाणी ऐकायला अजूनही गोड वाटतात (जरा जास्त लाडीक, बोबडा आवाज असला तरी) पण त्यातल्या त्या दोन काकूबाई मुली आणि त्यांची बळंच बडबड काही बघवत नाही .. Uhoh

मलाही ससुल्यागड्या version ठाऊक होते. ++

काल रात्रीच मुलांना वाचून दाखवली. त्यांना स्क्रिनवर चित्र वगैरे पण हवं होतं पण मी तु.क. टाकून गोष्ट सुरु केली. असो.

सुसुंगगडी आणि झिंज्या या दोन्ही शब्दांवर पब्लिक सॉलिड लोळत होतं. गोष्टींमुळे मराठी शब्दकोष वाढतो हे पुन्हा एकदा लक्षात आलं. धन्यवाद. आजीच्या गोष्टींचा खजाना येऊदेत अजून,

पराग, आमच्या मुलींचे बोबडे संवाद वेगळे होते. नीट आठवून किंवा आई/ आजीला विचारुन लिहिते Happy

छान छान गोष्टींच्या कॅसेट्स मध्ये मला करुणा देव ( म्हणजेच नीलम प्रभू का ? ) ह्यांच्या आवाजातल्या गोष्टी प्रचंड आवडायच्या. एका गोष्टीत एका मुलाला लाडू खाताना बघून कोंबडीच्या पिल्लांनाही रव्याचे लाडू खावेसे वाटतात म्हणून ती वाण्याकडे जाऊन 'रवा द्या मूठभर, साखर द्या पसाभर, जोडीला द्या तूप, लाडू करु खूप खूप.' असं गोड आवाजात सामान मागतात. पिल्लांची आई म्हणते की सामान ठेवा, काम आटोपल्यावर लाडू करते.
पण तेवढ्यात मुंग्या, उंदीर, मनीमाऊ त्या सामानाचा चट्टामट्टा करतात आणि बिचार्‍या पिल्लांना काहीच मिळत नाही. मग पिल्लं परत वाण्याकडे जाऊन 'रांगोळी द्या मूठभर, मीठ द्या पसाभर, जोडीला द्या चुना, शिक्षा करु चोरांना' असं म्हणून सामान आणतात. मुंग्या, उंदीर, माऊ ते थू थू करुन थुंकून टाकतात. अशी त्यांची फजिती केल्यावर पिल्लं परत लाडवाचं सामान आणून लाडू खातात. एकदम गोड गोष्ट Happy

Pages