आक्रंदते अता मी

Submitted by निशिकांत on 12 May, 2015 - 01:43

भिंतीत चार घरच्या आक्रंदते अता मी
माझा परीघ थोडा रुंदावते अता मी

मी चौकटीत जगले, पदरात काय पडले?
रूढी परंपरांना लाथाडते अता मी

उध्दार व्हावयाला राघव हवा कशाला?
माझ्या भविष्यरेषा आकारते अता मी

आवाज दाबलेला आहे तरी परंतू
मौनासवेच माझ्या संवादते अता मी

कोठे सराव होता अपुल्यात कौतुकाचा?
मिळता सहानभूती गंधाळते अता मी

नाही रुची कुणाला दु:खास ऐकण्याची
हास्यात बेगडाच्या हिंदोळते अता मी

गझलेतल्या स्त्रियांचा संबंध वास्तवाशी
नसतो कधी समजता, आक्रोशते अता मी

दिसता प्रभात किरणे, अंधारल्या मनाला
आशा धुमारते अन् उल्हासते अता मी

"निशिकांत" ऐकली का दुखरी व्यथा स्त्रियांची?
म्हणतेय स्त्री जगाला विद्रोहते अता मी"

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान