योगवर्गातील योगाभ्यास, एक निरीक्षण - ३ (अंतिम भाग)

Submitted by अतुल ठाकुर on 12 May, 2015 - 08:54

11083877_638613782950364_4986888479483168835_n.jpg

योगाभ्यास करण्याचा क्रमही महत्त्वाचा असतो. अशावेळी त्याबाबतीत कंटाळा करणे इष्ट नसते. म्हणजे काहीवेळा ही कंटाळा करणारी मंडळी बसली कि बसुन करण्याची सर्व आसने "उरकतात". मग पाठिवर झोपली कि तीही उरकतात. खरं तर क्रम फार महत्त्वाचा असतो. येथे पुरक आसनांचा विचार केलेला असतो. उदाहरण द्यायचं झालं तर सर्वांगासन केल्यावर मत्स्यासन करायचे असते. सर्वांगासनात पाठिवर झोपुन खांद्यांच्या वरचे शरीर हातावर तोललेले असते. अशावेळी हनुवटी छातीवर घट्ट दबलेली असते. अशावेळी गळ्यातील थायरॉईड ग्रंथींवर चांगला परीणाम होणे हा एक महत्त्वाचा भाग या आसनात साधला जातो. यानंतर मत्स्यासन केल्यावर जेव्हा साधक पाठिवर झोपुन कमान करतो तेव्हा गळ्याचा भाग उलट्या दिशेने ताणला जातो. अगदी सर्वांगासनाच्या विरुद्ध. अशा तर्‍हेचा क्रम अनुसरल्यामुळे दोन्ही आसनांचे फायदे जास्त चांगल्या तर्‍हेने मिळतात. योगाभ्यास करताना मन आसनात असणे अत्यंत महत्त्वाचे असते. आसने करताना मन दुसर्‍याच गोष्टींमध्ये गुंतणे योग्य नाही. त्यामुळे सहजपणे जे ध्यान साधते ते घडत नाही. माणसे आसने करत राहतात आणि मनात दुसर्‍याच गोष्टींचा विचार करीत राहतात. अशावेळी मन प्रयत्नपुर्वक मागे आणुन आसनात गुंतवायला हवे. आसनांचा आकृतीबंध साधल्यावर काही वेळ तो सुखदरित्या तसाच ठेवायचा असतो. अशावेळी डोळे मिटता आले तर हे जास्त चांगल्या तर्‍हेने साधता येते. पण प्रत्येक आसनात डोळे मिटणे शक्य नसते. आणि इष्टही नसते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. विशेषतः उभे राहुन करण्याच्या आसनात तोल सांभाळताना डोळे मिटल्यास बर्‍याच जणांचा तोल जातो. अशावेळी डोळे उघडे ठेवावेत. सुरुवातीच्या अभ्यासात आवर्तने जास्त ठेऊन आसने करण्याचा सल्ला दिला जातो कारण साधकाची आसनात राहण्याची क्षमता कमी असते. नंतर हळुहळु ही क्षमता वाढणे अपेक्षित आहे. त्यामुळे काही कालानंतर आवर्तने कमी करुन आसनात जास्त काळ राहणे अपेक्षित असते.

आसने करताना सुरक्षा अतिशय महत्त्वाची. शिर्षासनासारखी आसने करताना जोपर्यंत आत्मविश्वास वाटत नाही तोपर्यंत योगशिक्षकाची मदत आवर्जुन घ्यायला हवी. काहींचे पाय इतके कडक असतात कि त्यांना वज्रासनात बसता येत नाही. अशांनी टॉवेलची मऊ घडी करुन ते पायाखाली ठेऊन त्यावर बसावे. पण कळ लागेपर्यंत रेटुन नेऊ नये. उभ्याने आसने करतान जर पायात अंतर ठेवायचे असेल तर पायाखाली अंथरलेली सतरंजी सरकणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. मयुरासन हे योगातल्या अत्यंत कठिण आसनांपैकी एक आसन. योगात अनेक कठिण आसने आहेत मात्र सर्वसामान्य अभ्यासात त्यांचा समावेश नसतो. मयुरासन मात्र अनेक ठिकाणी शिकवले जाते. हाताच्या कोपरांना ओटीपोटावर ठेऊन संपूर्ण शरीराचा तोल हाताच्या पंजांवर सांभाळायचा असतो. या आसनात फार काळ राहता येत नाही. आणि हे आसन सर्वांना जमतही नाही. मात्र या आसनाचा अभ्यास करणार्‍यांनी सुरुवातीपासुन समोर टॉवेलची घडी ठेवायला विसरु नये. हे आसन साधताना लवचिकता नसल्यास पुढच्या बाजुला डो़के एकदम आपटण्याची शक्यता असते. काहीवेळा शरीराचा भार सहन न होऊन तोंडावर आपटुन अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे "क्षमतेनुसार" हा मंत्र लक्षात ठेवावा. योगाभ्यासाच्या सुरुवातीला जेव्हा आपण योगवर्गात दाखल होतो तेव्हा आपल्या मनात अनेक विचार असु शकतात. शांतपणे बसुन काही क्षण प्रार्थना करण्याची सवय आपल्याला योगाभ्यासाठी योग्य वातावरण तयार करुन देते. काही परंपरांमध्ये यानंतर श्वसनमार्गशुद्धीसारखे काही सराव केले जातात. त्यामुळे श्वसनमार्ग मोकळा होऊन योगाभ्यास सुलभ होतो. योगाभ्यास करताना इतर व्यवधाने डोक्यात नसणे महत्त्वाचे आहे. मात्र हे एका दिवसात साधत नाही. काही कालावधी जावा लागतो.

सध्या जमाना सोपेपणाचा आहे. कुठेही गेल्यास तुम्हाला सर्व गोष्टी अगदी सोप्या करुन सांगीतल्या जातात, शिकवल्या जातात. उदाहरणार्थ पद्मासन हे बसुन करण्याच्या आसनातील प्रमुख आसन. त्यात पायाची गाठ मारल्याप्रमाणे माणुस बसतो आणि रूंद बेस असल्याने कमरेच्या वरच्या भागाला जास्त स्थैर्य मिळतं. कपालभातीसारख्या सरावात तर कमरेवरचं शरीर हलु नये म्हणुन पद्मासनाची मुद्दाम शिफारस केली जाते. पण हे आसन सोपं नाही. मात्र सुरुवातीला अर्धपद्मासन करायला लावुन हळुवार पणे साधकाला पद्मासनाकडे नेण्या ऐवजी पद्मासनाची गरजच नाही असे सांगणारे काही महाभाग असतात. हे योग्य नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. पद्मासनासारख्या आसनांचे स्वतःचे एक महत्त्व असते. त्याच्या फायद्यापासुन वंचित राहु नये. वेळ लागेल, काहींना वयोपरत्वे कदाचित पुर्ण आकृतीबंध जमणारही नाही. पण बहुतेक मंडळी अर्धपद्मासनापर्यंत पोहोचु शकतात. मात्र त्याची आवश्यकताच नाही असे सांगुन एकुणच अभ्यासाला खालच्या पातळीवर आणण्यात अर्थ नसतो. ज्या ठिकाणी आसनांना फारसे महत्त्व न देता ध्यान, प्राणायाम अशा गोष्टींनी सुरुवात केली जाते तेथे हा प्रकार आढळतो. मग कसेही बसलात तरी चालेल. खुर्चीवर बसुन प्राणायाम केलात तरी चालेल. हे प्रकार सुरु होतात. एक झाले एक टोक. दुसर्‍या टोकाची मंडळी शरीर ताणुन निरनिराळ्या कसरती करण्यात गुंगलेली आढळतात. कठिण आसनांचा फायदा असतोच पण ती योगाच्या पद्धतीने केल्यासच योगाचे फायदे मिळतात. व्यायामाच्या पद्धतीने जबरदस्तीने ताणुन करण्यात अर्थ नसतो. मी स्वतः अनेक वर्षे आसने व्यायामाच्या पद्धतीने केली हे सांगताना मला अतिशय दु:ख होते. गाढवाला गुळाची चव नसावी त्याप्रमाणे शिकवणारे चांगले शिक्षक असुनही योगविद्येचे ओझे नुसते बाळगले, त्याची चव घेतली नाही. आता हळुहळु स्वतःला ताळ्यावर आणत आहे. जोरजबरदस्तीच्या आसनांनी "योगाभ्यासाचे" फायदे मिळत नाहीत हा माझा स्वानुभव आहे.

शेवटी हे आवर्जुन सांगावेसे वाटते कि योग हा विषय अफाट आहे. त्याच्या अनेक परंपरा आहेत. एकाहुन एक पुढे गेलेली मंडळी ही विद्या शिकवत असतात. योगावर मुबलक साहित्य उपलब्ध आहे. आजच्या काळात युट्युबसारख्या ठिकाणी असंख्य विडियोज अपलोड केलेले आहेत. साहित्य वाचण्यास हरकत नाही. विडियोही पाहावेत. मात्र अभ्यास हा तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच करावा. पुस्तके वाचुन किंवा टिव्ही वर पाहुन काहीतरी करणे खरे नव्हे. आपल्या शरीराच्या क्षमता ओळखाव्यात. स्पर्धात्मकता बाळगु नये, क्षमतेपेक्षा जास्त करु नये. अशावेळी आमच्या गुरुवर्य निंबाळकर सरांनी सांगीतलेला "आपला योग टेलरमेड असावा, रेडीमेड असु नये" हा सल्ला लक्षात ठेवावा. (समाप्त)

अतुल ठाकुर

आधीचे दोन लेख

योगवर्गातील योगाभ्यास, एक निरीक्षण - १- http://www.maayboli.com/node/53389
योगवर्गातील योगाभ्यास, एक निरीक्षण - २- http://www.maayboli.com/node/53861

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिन्ही लेख वाचले. अत्यंत अभ्यासपूर्णं आहेत.. ओघवती शैली. सहज सोप्पी भाषा. आणि महत्वाचं म्हणजे विषय आणि त्यात तुम्हाला जे सांगायचय ते अत्यंत व्यवस्थित पोचतय.

सुरेख, अतुल.

चांगला उपक्रम.
शाळेत आम्हाला ही सर्व आसनं शिकवली होती आणि शाळेला भेट देण्यास पाहुणे आले की त्यांना मयुरासनसह सर्व आसने करून दाखवण्याचे मी सांपल होतो.परंतू मला यावर कधीच विश्वास नव्हता आजही नाही.

तिन्ही लेख खुप सुंदर झाले आहेत. अजुन वाचायला मिळेल असे वाटत असताना लेखमाला संपली.

या विषयावर अजुन वाचायला आवडेल.

>>> विशेषतः उभे राहुन करण्याच्या आसनात तोल सांभाळताना डोळे मिटल्यास बर्‍याच जणांचा तोल जातो. <<<<
छान तपशीलवार माहिती, अगदी बारकाईने दिली आहे वरील त्याचेच एक उदाहरण.
नीट समजून घ्यायला परत परत वाचावे लागेल.

मला फक्त मयुरासनच जमू शकते.... अगदी लहानपणापासून, सुरवातीस लाकडी स्टुलावर करायचो (तसे करू नये), मग प्रयत्न पूर्वक जमिनीवर करू लागलो. स्टुलवर करीत असताना एकदा पुढे तोल गेलेला..... सावरताना पुरेवाट झालेली.

बाकी योगासनांचे बाबतीत दुर्दैवाने तशी संगत म्हणा/मार्गदर्शन म्हणा, असे काही मिळालेच नाही. त्यामुळे सूर्यनमस्कार व जोर बैठकांवरच भागवतो.

तिन्ही लेख वाचले. अत्यंत अभ्यासपूर्णं आहेत.. ओघवती शैली. सहज सोप्पी भाषा. आणि महत्वाचं म्हणजे विषय आणि त्यात तुम्हाला जे सांगायचय ते अत्यंत व्यवस्थित पोचतय. >>> +१

तिन्ही लेख आत्ता वाचले. उत्तम उपक्रम..
माझ्या मनात योगाबद्दल असलेले काही गैरसमज दूर झाले. उदा. योग केल्यानंतर थकवा जाणवणे योग्य नाही, घाम येऊ नये इ.
तसेच स्पर्धात्मकता टाळणे, क्षमते नुसार करणे याही गोष्टी उपयुक्त ..

मी योगाभ्यास सुरु करण्याच्या बेतात असताना हि लेखमाला वाचयला मिळाली, माझ्या मनातल्या शंका दूर होऊन योगाभ्यासाकरता प्रोत्साहन मिळाले. Happy

खूप खूप आभार .. निवडक दहात नोंदवत आहे..
धन्यवाद ..