टाईम वसूल! पैसा वसूल! टाईमपास टू वसूल!!

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 May, 2015 - 04:35

ही पोरी नाजूक लेल्यांऽऽची, तिला परबाचा लागलाऽय नाद ..
या नोटवर संपलेला टाईमपास-वन तेव्हा मनात बरेच प्रश्न सोडून गेलेला.
अमीर-गरीब लव्हस्टोरी बॉलीवूडी चित्रपटांना काही नवीन नाही, ना तो फॉर्म्युला कधी जुना होणार. ज्याच्या आधारावर हिरोईन सार्‍या जगाशी पंगा घेणार तो हिरोच जर आर्थिकद्रुष्ट्या कमकुवत दाखवला तर त्यांच्या प्रेमापुढे तेच एक आव्हान ठरते आणि सारे कथानक त्याभोवतीच फिरत राहते.

टाईमपास-वन हा चित्रपट देखील अश्याच पठडीतील एक असला तरी यात दोन वेगळेपण होते. एक म्हणजे पौगंडावस्थेतील प्रेमकथा आणि दुसरे म्हणजे प्रेमी युगुलांमध्ये निव्वळ आर्थिक दरी नसून दोघांच्या सुशिक्षित आणि सुसंस्कृतपणात दाखवलेली तफावत, नव्हे यांवरच हा चित्रपट बेतला होता.
या पहिल्या भागाचा शेवट दोघांची प्रेमकथा अर्ध्यावरच सोडून केला होता. ती कथेची मागणी असो वा दुसर्‍या भागाची सोय, पण लॉजिकली तेच पटणारे होते.

आणि तरीही तो चित्रपट मनात बरेच प्रश्न सोडून गेलेला. पैकी रेंगाळणारा एक असा - या चित्रपटाचे समाजमनावर काही पडसाद तर उमटणार नाहीत ना? यानंतर सुसंस्कृत मध्यमवर्गातील मुलींच्या पालकांना चित्रपटाच्या प्रभावाखाली आलेल्या एखाद्या दगडूपासून आपली मुलगी सांभाळावी तर लागणार नाही ना?
आणि म्हणूनच पहिला भाग पुरेसा आवडूनही मी या दुसर्‍या भागाबद्दल फारसे अनुकूल मत बनवून नव्हतो. ना या भागाची उत्सुकतेने प्रतीक्षा करत होतो.

पण आज दुसरा भाग पाहिला आणि तो या प्रश्नांची उकल करण्यास गरजेचा होता असे वाटले.

पहिल्या भागाची लिंक पकडून येणार्‍या दुसर्‍या भागातील कथा मात्र नेहमीचा फॉर्म्युला वापरतच पुढे सरकते. शिक्षणात कमी असलेल्या दगडूचे मेहनतीने अन सचोटीने मोठा माणूस बनणे. त्याचे प्राजक्तावरचे प्रेम तसूभरही कमी न होणे. तेच दुसरीकडे प्राजक्तादेखील अजूनही दगडूच्याच आठवणीत त्याचीच वाट बघत असणे. त्यांच्या या प्रेमकहाणीत त्यांच्या प्रेमाचे दुश्मन, प्राजक्ताचे वडील शाकाल उर्फ वैभव मांगले यांचाच काय तो एकमेव अडसर. बस्स एक त्यांची परवानगी मिळवली की हॅपी एण्डींग. चित्रपटाची स्टोरी सेट आहे हे समजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. काय होणार आहे हे ठाऊक असते. जसे घडत जाते तसे अंदाज येत जातो. पण ते घडते मात्र फार रंगतदार पद्धतीने.

वॅंऊऽ वॅंऊऽ वॅंअऊ वॅं.. वॅंऊऽ वॅंऊऽ वॅंअऊऽ वॅं....
अ‍ॅम्बुलन्स सायरनची थीम उचलून बनवलेले गाणे हिरोची एंट्री घेते आणि ते काय अतरंगी कॅरेक्टर आहे हे पाचच मिनिटांत समजून जाते. या आधी चित्रपटाचे प्रोमोज पाहिले होते, तेव्हा हे प्रकरण हिरो म्हणून आपल्याला काही झेपणार नाही, असेच वाटले होते. मात्र चित्रपट संपता संपता माझे माझ्याही नकळत मतपरीवर्तन झाले होते. एखाददुसर्‍या जागी भुमिकेचे बेअरींग पकडायच्या नादात थोडीफार ओव्हरअ‍ॅक्टींग होते. पण मुळात त्याचा प्लस पॉईंट हा आहे की तो चांगली अ‍ॅक्टींग करतो. पहिल्या भागाच्या तुलनेत या भागातील काही द्रुश्ये डोळ्यातून पाणी काढतात. याचाच आणखी एक अर्थ असाही होतो की आपण त्या हिरोला (किमान या चित्रपटापुरते) स्विकारले आहे आणि त्यांच्या प्रेम कहाणीशी रिलेट करू शकलो आहोत.

प्रिया बापट ही अभिनेत्री दिसायला प्रचंड गोड आहे यात दुमत नसावे, पण तरीही का माहीत नाही मला तिच्यात हिरोईन मटेरीअल नेहमीच मिसिंग वाटत आले आहे. आता ते नेमके काय हे मलाही सांगता येणार नाही, पण यात मात्र ते मला गवसले. हिरो म्हणून दगडू सर्व फोकस स्वतावर घेत सिनेमा खायला समोर उभा असताना प्रिया बापट तिच्यावरही तेवढेच लक्ष द्यायला आपल्याला भाग पाडते. तिची चित्रपटातील एंट्री "मी बावरू की सावरू, माझे मला ना कळे... प्राऽजू प्राऽजू" या गाण्यांतून तितकीच दमदार होते. बरेच दिवसांनी एखाद्या मराठी सिनेमात हिरो हिरोईनच्या अश्या कॅरेक्टर उभ्या करणार्‍या एंट्रया बघायला मिळाल्यात.

अर्थात यात वाटा गाण्यांचाही आहेच. या एंट्रीच्या दोन गाण्यांबरोबर "दगडूऽऽ सावधान" हे गाणेही चित्रपटात छान वाटते तर शेवटचे सॅड सॉंग "सुन्या सुन्या मनामध्ये" देखील आपण आठवणीने घरी आल्यावर डाऊनलोड करतो. थोडक्यात टाईमपास-वनच्या म्युझिक अल्बमने वाढवलेल्या अपेक्षा टा-टू मध्ये पुर्ण होतात.

सहकलाकार - शाकाल उर्फ वैभव मांगले बेस्टच. सहकलाकार हा शब्द चुकीचा ठरावा इतके हिरो-हिरोईन एवढीच महत्वाची भुमिका या कॅरेक्टरची आहे. मुन्नाभाई चित्रपटामधील मधील बोमन इराणी यांनी साकारलेल्या डॉं अस्थानाच्या भुमिकेशी तुलना करायचा मोह व्हावा असे कॅरेक्टर आपल्या देहबोलीतून उभे करतात मांगले. पहिल्या भागातीलच बेअरींग इथेही पकडतात पण यात त्या पात्राच्या स्वभावातील आणखी काही पैलूंचे दर्शन घडते. चित्रपटात एके ठिकाणी हिरो त्यांना काटेरी फणस म्हणतो. त्यातील काटेरी भाग आणि आतला गोड गरा असे दोन्ही पैलू जेव्हा दाखवतात तेव्हा ते दोन्ही विश्वासार्ह वाटते, त्या त्या वेळी हेच यांचे खरे रूप आहे असेच वाटते. त्यामुळे त्यांचे वेळप्रसंगी चिडणेही योग्य वाटते आणि शेवटी घडलेले मतपरीवर्तनही तितकेच सहज वाटते.

भाऊ कदम यांची भुमिका तर त्यांच्यासाठी घरचे मैदान आहे. सहज निभावून नेतात. त्यांच्याकडून विविध प्रकारच्या भुमिका बघायला आवडतील. इथे त्यांना मिळणार्‍या फुल्ल मार्क्स बरोबर त्यांना कास्ट करणार्‍याला देखील फुल्ल मार्क्स द्यावे लागतील.

दगडूच्या मित्रांना आपापली एकेक लकब दिली आहे आणि पैकी कोणीही कुठेही चित्रपटातील मनोरंजन कोशंटचा तोल ढळू देत नाहीत.

सर्वांच्याच तोंडी असलेले चुरचुरीत संवाद हा या भागाचाही प्लस पॉईंट. विनोदनिर्मिती मुख्यत्वे यातूनच होते. मात्र कुठेही ओढूनताणून विनोद केलेला आढळत नाही.

नाही म्हणायला मध्यांतरानंतर एके ठिकाणी सिनेमा थोडासा रेंगाळल्यासारखे होते, पण हे पाचदहा मिनिटांचेच आणि गरजेचे आहे म्हणून दाखवलेय असे म्हणत आपण पुढच्या भागाची वाट बघतो.

तांत्रिकद्रुष्ट्या हल्ली मराठी चित्रपटांबद्दलच्या वाढलेल्या अपेक्षा हा सहजी पुर्ण करतो.
पण चित्रीकरणात विशेष लक्षात राहते ते कोकणचे सौंदर्य!
प्रिया बापटच्या सोबतीने ते आणखी खुलून दिसते. मुद्दाम दाखवायचा अट्टाहास न करताही विलक्षण सुंदर दिसते. दिवेलागणीच्या वेळेस, अंधारलेल्या कौलारू घरांमध्येही ते जाणवत राहते. त्या सौंदर्यात दडलेली सात्विकता भजनांमधून उमटत राहाते. हे सारे टाईमपास टू मध्ये दिसणे हा माझ्यासाठी एक सुखद धक्का होता.

या आणि अश्या काही अंगाने हा चित्रपट मला स्वत:ला पहिल्यापेक्षा उजवा वाटला. जर तुम्हाला पहिला भाग थोडाफार जरी आवडला असेल, तर हा नक्की बघा. जर पहिल्यात काही खटकले असेल, तरी एक चान्स द्यायला हरकत नाही. कदाचित जे पहिल्या भागात खटकले ते खटकने दूर होण्यासाठी याची मदत होईल.

रेटींग - ती ज्याची त्याची वैयक्तिक असल्याने मी देत नाही.
पण चित्रपटाने मनावर गारूड केले की मी एखाददुसरा दिवस त्याच नशेत असतो. तुर्तास, "वॅंऊऽ वॅंऊऽ वॅंअऊ वॅं.." गाणे गुणगुणत त्यावर हॉर्न वाजवल्यासारखी सिग्नेचर स्टेप करत नाचणे चालू आहे.

- ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

माझं वैयक्तीक मत - 'टाईम पास'-१चा शेवट प्रभावी होता, वास्तववादी होता व मनाला भिडणारा होता व तो तसाच रहाणं हा त्या सिनेमाचा गाभा होता; म्हणूनच , मी टाईमपास-२ पहाणार नाहीं. [ ऑड्रे हेपबर्न व ग्रेगरी पेकला परत एकत्र आणण्याचा स्वभाविक मोह होवून कुणी 'रोमन हॉलीडे'-२ काढला तर तेंही मूळ सिनेमावर व मुख्यतः त्या सिनेमाच्या शेवटावर बोळा फिरवण्यासारखंच होईल ].
शिवाय, टाईमपास-२ च्या 'प्रमोशन'चा जो अतिरेक झी मराठीच्या सर्व चॅनेल्सवर चालला होता/आहे, त्यामुळेही माझ्या मनात त्या चित्रपटाबद्दल अनास्थाच निर्माण झाली असावी .

Promot.jpg

भाऊ आपल्या वैयक्तिक मताचा आदर आहे,

पहिल्या भागाची कथा एका शेवटाला येऊन संपली, मात्र प्रत्यक्षात असे काही घडता तोच शेवट असता का? त्यानंतरही आयुष्य असतेच, मग त्यात काय झाले हा प्रश्न तसाच उरणार.
जेव्हा चित्रपटात हॅपी एन्डींग असते तेव्हा हा प्रश्न प्रेक्षकाला पडत नाही, मात्र जेव्हा ती नसते तेव्हा पुढे काय याचे उत्तर आपापल्या परीने शोधत प्रेक्षक घरी जातात.
बहुधा तुम्ही त्याचे उत्तर आपल्या परीने शोधले आहे आणि ते या दुसर्‍या भागाशी विसंगत असल्याने आता बघणे नको म्हणत आहात.
तरीही शक्य असल्यास एक वेगळी कलाकृती म्हणूनही बघू शकता.

@ प्रमोशनाचा अतिरेक, याबद्दल कल्पना नाही.
तरी होत असल्यास चांगलेच आहे की, अन्यथा एकेकाळी काय मराठी चित्रपट यायचे आणि जायचे हे कलायचेच नाही, एखाद्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावरच त्याबद्दल समजायचे.

प्रिया बापट ही अभिनेत्री दिसायला प्रचंड गोड आहे यात दुमत नसावे, >>> दुर्दैवाने (कोणाच्या माहीत नाही), दुमत आहे :). दिदोदु मधले कोल्गेट ची जाहिरात वाटणारे क्लोज अप्स त्यास कारणीभूत असतील पण दुमत आहे.

मला पहिलाही आवडला नव्ह्ताच, पण तो सिन्सियर तरी वाटला. पण दिदोदु मधल्या प्रोमोशन नंतर हे दोघे खूप डोक्यात गेले आहेत.

वॅंऊऽ वॅंऊऽ वॅंअऊ वॅं.. >> म्हणजे दिदोदु मधल्या जाहिरातीत ते शेवटी नाचतात ते का? उगाच कायतरी होते ते Happy

दिदोदु किंवा कुठल्याही प्रमोशनला त्यांनी काय केले माहीत नाही. (आयपीएल सुरू झाल्यापासून आमच्याकडे मराठी मालिका चॅनेल बंद झालेत) पण सिरीअलमध्ये त्या बजेट नुसारच काय ते घडते. चित्रपटात दिग्दर्शक नावाचा माणूस बरेच काही घडवायची ताकद राखून असतो. जर योग्य प्रमोशन करण्यात ते फसले असतील आणि याचा फटका बसला तर हे दुर्दैवाचे ठरेल.

@ प्रिया बापट गोड दिसते यावर आमच्या ऑफिसमधील महिलांचे लंच टाईम गॉसिपिंगमध्ये एकमत झाले त्यामुळे ते विधान केले.

दिदोदु मधल्या प्रोमोशन नंतर हे दोघे खूप डोक्यात गेले आहेत. >>> +++१
फारएण्ड तुमच्या संपूर्ण प्रतिसादाला अनुमोदन.

माझं वैयक्तीक मत - 'टाईम पास'-१चा शेवट प्रभावी होता, वास्तववादी होता व मनाला भिडणारा होता व तो तसाच रहाणं हा त्या सिनेमाचा गाभा होता>>>>>>>>.. खरचचं तो शेवटच योग्य होता..
मी मोठा होणार खुप शिकणार असं काहितरी म्हणुन एंड होतो.. पण टि पी २ मधे तर तो अम्ब्लुबंस की काय म्हणत असतो म्हणजे काय शिकला काय माहिती (सिनेमा बघितला नाहिये .. फक्त अंदाज) .. गुंडच वाटतो.. त्यापेक्शा कथा तिथेच संपायला हवी होती..
प्रिया 'सुन्या सुन्या' गाण्यात छान वाटली 'प्राजु' गाण्यापेक्शा.

एकतर मोठा दगडु खूपच नकली बोलतो आणी वागतो, जो छोटा दगडु निदान नैसर्गीक दगडु वाटला होता, बोलत होता त्यापेक्षा. दिल दोस्ती मध्ये कृत्रिमपणाचा अतीरेक झाला. ज्यानी हे पाहीले नाही त्यानी कृपया यु ट्युबवर बघावे.

मी मोठा होणार खुप शिकणार असं काहितरी म्हणुन एंड होतो.. पण टि पी २ मधे तर तो अम्ब्लुबंस की काय म्हणत असतो म्हणजे काय शिकला काय माहिती
>>>>
इनफॅक्ट शिकून सवरून जंटलमन झाला असता तर ते परीकथेसारखे आणखी अविश्वसनीय नसते का वाटले. Happy

..

एकतर मोठा दगडु खूपच नकली बोलतो आणी वागतो, दिल दोस्ती मध्ये कृत्रिमपणाचा अतीरेक झाला.
>>>>
दिदोदु नाही पाहिला पण प्रोमोज बघून मलाही तसेच वाटलेले, मी जाणारच नव्हतो. पण काही मित्रांनी छान छान म्हटलेले आणि गर्लफ्रेंडच्या मैत्रीणींना बघायचाच होता म्हणून गेलेलो. आणि आवडला. म्हणून मुद्दाम यावर लिहिलेय. चुकीची मार्केटींग आणि प्रोमोजमुळे एका चांगल्या आणि टाईमपास मराठी सिनेमाचे नुकसान होऊ नये ही सद्भावना.

आमच्या कोकणासाठी तरी बघायचा विचार आहे...

पण प्रियदर्शन आणि प्रिया दोघेही आवडत नसल्याने चित्रपट बघायला जायचा प्लॅन कृतीत उतरत नाहीये.

>>>> या चित्रपटाचे समाजमनावर काही पडसाद तर उमटणार नाहीत ना? यानंतर सुसंस्कृत मध्यमवर्गातील मुलींच्या पालकांना चित्रपटाच्या प्रभावाखाली आलेल्या एखाद्या दगडूपासून आपली मुलगी सांभाळावी तर लागणार नाही ना? <<<<
हे वाक्य कम प्रश्न कम शन्का सगळ्यात महत्वाची !
गंमत म्हणजे असे सिनेमे, घडत असलेल्या वास्तवावर असतात की, अमुक असे वास्तवच घडावे म्हणुन विचारपेरणीकरता असतात हा मला पडलेला कायमचा प्रश्न आहे.

लिंबूजी आपल्या प्रश्नाचे नेमके उत्तर नाही देता येणार, कारण दिग्दर्शकाचा हेतू वेगळा आणि चित्रपटाने साधलेला परीणाम वेगळा असेही होऊ शकते.
उदाहरणार्थ एक दुजे के लिये किंवा क्यू से क्यू तक बनवताना प्रेमी युगुलांनी आत्महत्या कराव्यात असा हेतू नसणारच,
किंवा वास्तव बनवतानाही बेरोजगार युवकांनी संजय दत्तला हिरो म्हणून बघत त्याच्या भाईगिरीचे अनुकरण करावे असाही हेतू नसणारच.

टाईमपासबद्दल बोलायचे झाल्यास हा भाग आल्याने माझ्यापुरते ती शंका मिटली, कारण या दोन भागांचा एकत्रित योग्य तो परीणाम साधला जातो. मुलगी पहिल्या भागात दगडू जसा दाखवला जातो त्यावर नाही तर दुसर्‍या भागात जसा दाखवला जातो त्यावर पटते हे क्लीअर होते.

चुकीची मार्केटींग आणि प्रोमोजमुळे एका चांगल्या आणि टाईमपास मराठी सिनेमाचे नुकसान होऊ नये ही सद्भावना. >>

चुकीची मार्केटींग आणि प्रोमोजमुळे एका टुकार मराठी सिनेमाचा फायदाही होऊ नये ही सद्भावना. Wink

यानंतर सुसंस्कृत मध्यमवर्गातील मुलींच्या पालकांना चित्रपटाच्या प्रभावाखाली आलेल्या एखाद्या दगडूपासून आपली मुलगी सांभाळावी तर लागणार नाही ना? >>

अगदी योग्य शंका. असे सिनेमे विचारपेरणीकरता आणि विशिष्ठ लोकांना घाबरवण्याकरिता असतात हा मला पडलेला प्रश्न नाही झालेली खात्री आहे.

चुकीची मार्केटींग आणि प्रोमोजमुळे एका टुकार मराठी सिनेमाचा फायदाही होऊ नये ही सद्भावना.
>>>
या सदभावनेमुळेच मराठी माणूस धंद्यात मागे पडतो Happy

असे म्हणतात!

<< प्रमोशनाचा अतिरेक, याबद्दल कल्पना नाही .तरी होत असल्यास चांगलेच आहे की,>> ऋन्मेऽऽषजी, 'चला हवा येवू द्या' ही मालिका सर्वस्वी नाटक, सिनेमांच्या 'प्रमोशन'साठीच आहे व तिथल्या प्रमोशनबद्दल आक्षेप नाहीं; पण कथानकाशीं कांहींही संबंध नसताना 'दगडू' हें पात्र केवळ प्रमोशनसाठी इतर मालिकांत घुसडणे, हें प्रेक्षकाना नुसतें गृहीत धरणेंच नसून त्यांची चेष्टा केल्यासारखेंच आहे. निदान, 'होणार सून मी..' व ' दिल दोस्ती..' या दोन मालिकांत तरी अशी घुसडा- घुसडी झाली होती [ इतर मालिकांचं माहित नाही] व तें मला तरी खूपच खटकलं, हें खरं. कुणाला असं होणं ' चांगलच आहे कीं ' वाटलं, तर तें अर्थात त्यांचं मत झालं !

एकदम टुक्कार , तद्दन फालतू आणि गल्लाभरू .. अज्जून काही शब्दच नाहीत ,,
नाहीतरी त्या माठ RJ कडून हीच अपेक्ष होती

पण कथानकाशीं कांहींही संबंध नसताना 'दगडू' हें पात्र केवळ प्रमोशनसाठी इतर मालिकांत घुसडणे, हें प्रेक्षकाना नुसतें गृहीत धरणेंच नसून त्यांची चेष्टा केल्यासारखेंच आहे.
>>>>>

भाऊ, त्या डेलीसोप मालिकाच मुळात प्रेक्षकांना गृहीत धरून पाणी घालत चालू असतात. त्यामुळे त्याच्या प्रेक्षकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय वगैरे होतो हे मला पटत नाही. त्यांना दाखवतील ते बघायची सवय असते.

Priya bapat aawdat asli tari tila hasu nko mhanun sanga. Priydarshanchi acting tukar aahe.chitrapat fakt bhau kadan ani vaibhav mangle yanchya acting sathi pahava. Dagduchya mitrancha abhinay uttam. Story ugich pani takun vadhavli Aahe.

पहिल्या भागाची लाट ओसरून जाण्याआधी घाईघाईत बनवलेला चित्रपट आहे. पहिल्या भागातले तीन मित्र दुसऱ्या भागात मोठे झाल्यावर पाहवत नाहीत. अक्षरशः वाया घालवले आहे. पहिल्या भागातील दगडूचे character उभे करण्यात तिघांच्याही 'सहज' अभिनयाचा मोलाचा वाटा होता. दगडूलाच संपूर्ण स्क्रीनवर project केल्याने या तिघांकडेही दुर्लक्ष झाले आहे. त्याला उघडा का दाखवलाय, किळसवाणे वाटते. कमावलेले शरीरसौष्ठव असते तर एक वेळ समजू शकलो असतो.

प्रिया बापट दिसते सुंदरच एक तिचे हास्य सोडले तर, त्यात वादच नाही. पण ती सिनेमा मध्ये दुय्यम नर्तकीच्या भूमिका का स्विकारते, ते काही कळले नाही.

असो! सिनेमा बनवायचा तर पैसा लागतो आणि लागलेला पैसा वसूल करण्यास तडजोडी कराव्याच लागतात. झी वाले धर्मादाय संस्था चालवत नाहीत, त्यानाही लोकांची बिल चुकवायची आहेत.

<< पण स्वतः अनुभव न घेता टुक्कार ठरवण्याने नक्कीच! >>

याच न्यायाने दारू न पिता तिला नाव ठेवणेदेखील चूकच ठरेल का?
पुण्यात पुर्वी श्रीकृष्ण, न्यू एक्सेलसिअर अशा चित्रपटगृहांमध्ये फारच गंमतीदार चित्रपट लागत असे तिथून बाहेर पडणारे प्रेक्षक म्हणत. मी मात्र ते चित्रपट कधीच पाहिले नाहीत. न बघता केवळ बाहेर लावलेल्या पोस्टर्सवरूनच मी त्या चित्रपटांची लायकी ठरवून मोकळा होत असे. तेही चूकच म्हणायचे का?

>>>> त्याला उघडा का दाखवलाय, किळसवाणे वाटते. कमावलेले शरीरसौष्ठव असते तर एक वेळ समजू शकलो असतो. <<<
कस्ल अचूक लिहीलय....
पण नेहेमी नेहेमी असेच हेच दाखवित वर परत हीच तर हल्लीच्या "प्रेक्षकांचीच मागणी" आहे अशी भुलथाप मारित हेच केले जाईल, अन मग पैसे देऊन, उघडेवाघडे अंग - सिक्स प्याकच्या नावाखाली किळसवाणेपणे बरगड्या दाखविणारे पुचाट नायक / हिरो बघणे नशिबी येईल पुढच्या पिढीच्या...... Proud

Pages