'आसक्त'चं 'रिंगण'

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

महाराष्ट्रातल्या नाट्यचळवळीला एक वेगळी दिशा देण्यात ज्या संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे, त्यांत पुण्याच्या ’आसक्त’ या संस्थेचं नाव अग्रभागी घ्यावं लागेल. 'तू', 'गार्बो', 'मात्र रात्र', 'काश्मीर काश्मीर', ’गजब कहानी’, ’उणे पुरे शहर एक’, ’चारशे कोटी विसरभोळे’, ’बेड के नीचे रहनेवाली’, ’F1/105’, ’तिची सतरा प्रकरणे’ अशी अत्यंत दर्जेदार नाटकं आजवर ’आसक्त’नं सादर केली आहेत. देशभरातल्या नामवंत रंगमहोत्सवांमध्ये ही नाटकं वाखाणली गेली आहेत. ’आसक्त’च्या नाटकांमुळे उत्तम प्रेक्षक तयार होण्यास मोठी मदत झाली आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. मात्र ’आसक्त’च्या दृष्टीने नाट्यचळवळ म्हणजे फक्त उत्तम नाटकांचे तितकेच उत्तम प्रयोग करणं नव्हे. ’आसक्त’च्या नाट्यचळवळीत महत्त्वाचा आहे तो समाज आणि प्रेक्षक. प्रेक्षकाशी नातं जोडणं हे ’आसक्त’च्या दृष्टीनं गरजेचं आहे, आणि या प्रेक्षकाचं नाटकाशी असलेलं नातं जितकं घट्ट, तितकी नाट्यचळवळ सशक्त होत जाईल, हे 'आसक्त' जाणून आहे.

प्रेक्षकांचं नाटकाशी आणि लेखक-कलावंताचं समाजाशी असलेलं नातं जोमदार व्हावं, या हेतूनं ’आसक्त’नं दहा महिन्यांपूर्वी ’रिंगण’ हा एक मस्त उपक्रम सुरू केला. ’रिगण’ या उपक्रमात नाटकाबरोबर संगीत, चित्रकला, इतर ललितकला, समाजशास्त्र यांचा उत्तम समन्वय घडवून आणला जातो. चांगला नट किंवा चांगला रंगकर्मी केवळ रंगमंचावर चांगला अभिनय करणं किंवा चांगलं दिग्दर्शन करणं यांत समाधानी नसतो. तो विचक्षण होण्याचा प्रयत्न करतो, आपल्या भवतालाकडे साकल्यानं बघतो. आपल्यातल्या नटाचा, दिग्दर्शकाचा, लेखकाचा विकास व्हावा यासाठी प्रत्येक रंगकर्मी समाज-संस्कृती-कला यांच्याशी जास्तीत जास्त ओळख करून घेण्याचा प्रयत्न करतो. ’रिंगण’ सुरू करण्यामागे हा एक उद्देश आहे. नाटक सादर करताना समोर एक जाणता प्रेक्षकवर्ग असणं, हे ’आसक्त’ला महत्त्वाचं वाटतं. हा प्रेक्षक फक्त नाटक ’बघत’ नाही; तर तो नाटक चिकित्सक नजरेनं बघतो, नाटकाबद्दल विचार करतो, चर्चा करतो, मुद्द्यांना सामोरं जातो, इतरांनाही या मुद्द्यांकडे बघायला उत्तेजन देतो. असा प्रेक्षक रंगकर्म्यांना उत्तम काम करण्यास भाग पाडतो. असा प्रेक्षकवर्ग तयार होण्यासाठी किंवा या वर्गाच्या विस्तारासाठी नाटक आणि नाटकाला पूरक असलेल्या कला व शास्त्र यांना एकत्र आणणारा एखादा उपक्रम सुरू व्हायला हवा, असं ’आसक्त’च्या सभासदांना वाटलं आणि त्यातून ’रिंगण’ची सुरुवात झाली.

चाकोरीबाहेर पडून वेगळं आणि उत्तम असं ऐकू-पाहू इच्छिणार्‍यांसाठी प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी-रविवारी सादर होणारा ’रिंगण’ हा उपक्रम एक पर्वणीच आहे. या उपक्रमात शेक्सपीयरच्या निवडक इंग्रजी लेखनाचं अतुल कुमार व रेचल डिसुझा यांनी केलेलं अभिवाचन, ’तर्काच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य’ या जयंत पवारांच्या कथेचं अतुल पेठ्यांनी केलेलं वाचन, प्राची दुबळे यांनी आदिवाशांच्या गाण्यांच्या आणि गाण्यांतून सांगितलेल्या गोष्टी, ’नांगी असलेले फुलपाखरू’ या द. ग. गोडश्यांच्या ललितलेखाचं प्रमोद काळे व माधुरी पुरंदरे यांनी केलेलं वाचन, ’संगीत बारी’त मोहनाबाई महाळंग्रेकर, शकुंतला नगरकर, गीता लाखे, पुष्पा सातारकर, सुनीता धोंडराईकर यांनी सादर केलेल्या लावण्या आणि या पुस्तकातल्या निवडक भागाचं गीतांजली कुलकर्णी यांनी केलेलं अभिवाचन, जितेंद्र जोशी, प्रिया जामकर, ओंकार गोवर्धन, अमृता सुभाष यांनी केलेलं दि. बा. मोकाशी, कमल देसाई, पु. शि. रेगे यांच्या कथा-कादंबरीचं वाचन, नागराज मंजुळेनं वाचलेल्या कविता, मोहित टाकळकरनं वाचलेला महेश एलकुंचवारांचा लेख, इस्रायल-गाझा संघर्षावर बेतलेल्या नाटकांचं राधिका आपटे, पर्ण पेठे, मृण्मयी गोडबोले, सारंग साठ्ये आदींनी केलेलं वाचन, अतुल कुलकर्णी, ज्योती सुभाष, गिरीश कुलकर्णी यांनी केलेलं नाट्यवाचन हे उत्कृष्ट सादरीकरणाचे वस्तुपाठ आहेत. ललितकलांच्या आणि समाजविज्ञानाच्या विविध अंगांचं दर्शन घडवणारी ही सादरीकरणं प्रेक्षकांना आणि रंगकर्म्यांना समृद्ध करून गेली, हे नक्की.

’रिंगण’चा या महिन्याचा कार्यक्रम खास लहान मुलांसाठी (आणि मोठ्यांसाठीही) आहे. वरुण नार्वेकर या तरुण लेखक-दिग्दर्शकानं लिहिलेल्या ’मी आणि टक्कूचे पंख’ या नाटकाचं वाचन शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजता सादर होणार आहे. आलोक राजवाडे यांनं या प्रयोगाचं दिग्दर्शन केलं आहे. रविवारी संध्याकाळी इंग्रजी भाषेतल्या काही कविता लहानगे कलाकार सादर करतील. अजिबात चुकवू नये, असे हे दोन्ही कार्यक्रम आहेत.

ringan.jpg

उत्तम रंगकर्मी आणि उत्तम प्रेक्षक तयार होण्यासाठी ’रिंगण’सारखे उपक्रम होत राहणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच ’आसक्त’च्या या उपक्रमाला जाणत्या प्रेक्षकांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.

प्रकार: 

चिनूक्सः मी तिथे असतांना आसक्त ज्या कार्यक्रमाला गेले होते, त्याचाच उल्लेख राहिला.

मोहित टाकळकर ने केलेले एलकुंचवारांच्या यथा काष्ठं च काष्ठं च लेखाचे वाचन. अप्रतिम. लेख
जिवंत झाला, आणि परत परत वाचावसा वाटला. अर्थात अजुनही बरेच संदर्भ कळताहेत.

फेसबुक वर आसक्त च्या कार्यक्रमांची जाहिरात पाहून हळहळ वाटते, पण काहितरी नविन घडतंय,
ही जाणीवही नक्कीच सुखावह!

इतक्या चांगल्या उपक्रमाविषयी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

परंतु पत्ता सविस्तर लिहिणार का ?
सुदर्शन रंगमंच , पुणे .
-- हे कुठे आहे ?

चाकोरीबाहेर पडून वेगळं आणि उत्तम असं ऐकू-पाहू इच्छिणार्‍यांसाठी प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी-रविवारी सादर होणारा ’रिंगण’ हा उपक्रम एक पर्वणीच आहे. >>

आता जेंव्हा पुण्याला येईल तेंव्हा हे दिवस लक्षात ठेवीन. धन्यवाद चिनूक्स. हा उपक्रम अव्याहत चालत राहो. ह्यांची जर एखादी वेब साईट असेल अर प्लीज दे.

धन्यवाद चिनुक्स.. छान माहिती दिली आहेस. मला केवळ आलोकने दिग्दर्शित केलेले लहान मुलांचे नाटक इतपतच माहित होते..

खूप मस्त उपक्रम!! पुढील भारतभेटीमध्ये उपस्थिती लावायला हवी.

परंतु पत्ता सविस्तर लिहिणार का सुदर्शन रंगमंच , पुणे -- हे कुठे आहे ? ? >> +१

अहिल्यादेवी शाळेच्या चौकात. अप्पा बळवंत चौकातून डावीकडे आणि मग पहिलंच उजवं वळण घेतलं की शाळेच्या अलीकडे, उजव्या हाताला

मस्त माहिती... अशा प्रकारचे नवीननवीन उपक्रम घडत आहे याबद्दल जबरदस्त समाधान वाटतं, आणि पुण्यात नसल्याने ह्या असल्या गोष्टींपासून वंचित रहावं लागतंय, ह्याबद्दल फारच जबरदस्त हळहळ वाटते.
पण ह्या अश्या लेखातून 'सध्या लोकं काय विचार करतात, नवीन लोकांची व्हीजन काय आहे' ह्याबद्दल उत्तम माहिती मिळते, हे ही नसे थोडके. ह्याबद्दल चिन्मयला मनापासून धन्यवाद.
ह्या आणि अश्या उपक्रमात 'नाट्यवाचन' आणि नाटकाशी संबंधीत इतर कला यांचाही समावेश होत आहे, ही फार फार महत्वाची गोष्ट आहे. लहानपणी सकाळ नाट्यवाचन स्पर्धा असायच्या, त्यातून मराठी - हिंदी- संस्कृत अश्या विविध भाषातून नाटकांचं 'नाट्यवाचन' होत असे. लहापणच्या ह्या संस्कारांनंतर - पुढे आयुष्यात जेव्हा अनेक ठिकाणी 'नाटकातील पात्रांची निवड - नाटकाचे वाचन न होतात केली जाते' ह्या क्लेशदायक वस्तुस्थीतीला सामोरं जावं लागतं - तेव्हा परत एकदा ह्या अश्या उपक्रमांची, आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याची किती आवश्यकता आहे हे जाणवतं.
९ मे चा कार्यक्रम लहान मुलांसाठी आहे... हे असे कार्यक्रम म्हणजे मुलांसाठी आणि पालकांसाठी एक प्रकारे 'मनोरंजनातून शिक्षणच'... एक प्रकारे 'बिनभींतींच्या शाळा च! '
मस्त वाटलं वाचून .. शुभेच्छा आणि कार्यक्रम कसा झाला ते जाणून घ्यायची उत्सुकता अर्थातच आहेच Happy

वा, वा.. सुंदर उपक्रम होतोय. माहितीबद्दल धन्यवाद.

पुण्यातील मित्र-मैत्रिणींना कळवण्यात येत आहे.

'मून कॅचींग नेट'-या कार्यक्रमाला जाता आले. सर्वांग सुंदर असे सादरीकरण होते.
मुलांची 'वाचन कला' अत्यंत सुंदर होती. कुठे ही थोडे से ही अडखळणेपण नव्हते. ही मुले वाचन-सादरीकरणात पारंगत असल्या सारखी होती.
संपुर्ण श्रेय मुलांना तर आहेच पण- रुपाली ताई (रुपाली भावे/शची वैद्य) आणि दिप्ती ताई (पुर्ण नाव माहित नाही) यांनाही!

येत्या शनिवारी-रविवारी बारावं 'रिंगण' आहे. ही 'रिंगण'ची वर्षपूर्ती. हा उपक्रम यानंतरही सुरू राहणार आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे.

ringan.jpg