मी आणि माझे अध्यात्म

Submitted by पशुपति on 20 April, 2015 - 02:59

५८ वर्षांची सर्व्हिस झाल्यावर मी रिटायर व्हायचे ठरवले. कंपनीने मला २ वर्षांचे एक्स्टेंशन दिल्यामुळे ६० वर्षांपर्यंत मी काम केले. ५८ व्या वर्षी विचार केला पुढच्या २ वर्षांत विचार करूया साठीनंतर काय करायचे! पण २ वर्षे गेली तरी माझ्या डोक्यात काहीच आलं नाही...पण २ वर्षे तर निघून गेली. आणि मी पूर्णपणे वेळ रिकामा ठेवून रिटायर झालो. अशी ही माझी रिटायरमेंटची कथा. अनेक लोकांनी अनेक प्रकरचे सल्ले दिले. कोणी म्हणाले पुण्यात अनेक प्रकारचे कार्यक्रम चालू असतात. रोज एकेका कार्यक्रमाला जरी गेलात तरी तुम्हाला वेळ पुरणार नाही. बायको म्हणाली, “आता संसार पुरे झाला, माझ्यामागे लागण्यापेक्षा देवाच्या मागे लागा.” हा टोला मला वर्मी बसला पण वरकरणी मी काहीच बोललो नाही. खूप विचार करून असे ठरवले, की आता काही नाही बस.....फक्त अध्यात्म करायचे!!!
बायकांचं एक बरं असतं....त्यांच्या आयुष्यात देव देव आणि संसार समांतर जात असतो ! ! पूजा करता करता काम वाली बाईला कामे पण सांगत असतात तर दुसऱ्या बाजूला स्तोत्र म्हणत देवाशी पण संवाद चालू ठेवतात. त्यामुळे आता काय करायचं हा प्रश्न त्यांच्यापुढे नसतोच. मला हे काही जमणाऱ्या पैकी न्हवते म्हणून माझा पुढील तपास मी सुरु केला की अध्यात्म म्हणजे नक्की काय करायचे? त्यात पुन्हा अनेकांचे अनेक सल्ले आलेच. कोणी म्हणे ध्यान करा, कोणी म्हणे ज्ञानेश्वरी वाचा कोणी म्हणे यात्रेला जा. शेवटी एकाचा सल्ला पटला, आधी अध्यात्माबद्दल वाचन करा. म्हणजे अध्यात्म काय असते हे तरी कळेल. माझ्यापुढे पुन्हा प्रश्न, कोणते पुस्तक? मी उच्च शिक्षित ना, मग ऐरे गैरे पुस्तक कसे चालेल? गावठी पुस्तक तर अजिबात चालणार नाही... पुस्तक पण कसे वजनदार पाहिजे! मी वाचन करत आहे हे लोकांना कसे कळणार. अनेक पुस्तकांची दुकाने पालथी घातल्यावर त्या पुस्तकांमधील पतंजलींचे पुस्तक छान असावे असे वाटले. त्या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर लिहिले होते, चित्ताचा निरोध करा. मला वाटले छान !! आणि त्याच क्षणी वाटले की हे सोप्पे दिसतेय काम ! कोणतेच व्यसन नसल्याने चित्ताचा निरोध सोप्पा आहे, असेही वाटले. मनात आले.... गेला बाजार, फार फार तर १-२ वर्षांत आपल्याला मोक्ष मिळणार! किंवा अध्यात्मिक भाषेत म्हणायचे तर मी अधिकारी पुरुष होणार. २ वर्षांनी मोक्ष मिळाल्यावर पुढे काय करायचे ह्याचे विचार घोळू लागले . त्या पुस्तकात पुढे असेही लिहिले होते, तुम्ही ‘मी’पणा पण सोडायला हवा. इथे थोडीशी खोच होती नाही म्हणायला. ‘मी’पणा सोडायचा तर ह्या लेखाचे शीर्षक काय द्यायचे “मी आणि माझे अध्यात्म” जर आहे तर “मी” च्या जागी काय लिहायचे??? दिवसभर विचार करून डोकं नुसते शिणून गेलं. ठरवले सध्या ‘मी’ आहे तसाच राहू दे नंतर त्याचा विचार करूया. आणि गाडी पुढे ढकलायची ठरवली.
एके दिवशी सकाळच्या वेळी पेपर वाचत असताना डोक्यात एक भन्नाट आयडिया आली. तडक उठलो, कपडे बदलले आणि बायकोला सांगितले, बाहेर जाऊन येतो. “अहो, कुठे चाललात? लवकर घरी या.” अश्या स्वरुपात तिचे प्रश्न यायच्या आत मी स्कूटरला किक मारली सुद्धा. मनात म्हटले, मांजर आडवे जायला नको! लक्ष्मी रोडला आलो, स्कूटर लावायला जागा कुठे मिळेना, जनरल पब्लिकला मनातल्या मनात शिव्या देत जागा शोधणे चालूच होते. शेवट कशीबशी स्कूटर घुसवायला जागा मिळाली. तेवढ्यात मनात आले, ‘अरेच्चा, आपण अध्यात्म करणार नाही का!’ त्याच वेळेला देवाचा धावा केला, ‘ सॉरी देवा, मी शिव्या द्यायला नको होत्या! मला माफ कर.’ एवढे मनात म्हणून माझ्या मनाचे समाधान करून मी कपड्याच्या दुकानाच्या शोधात निघालो. मला नेमके काय हवे ते मिळेना. शेवटी एका खादीच्या दुकानात गेलो, तिथे मात्र मला हवी असलेली भगवी वस्त्रे मिळाली. मनात विचार आला, ‘आपण नाहीतरी सगळ्या गोष्टींचा त्याग करणार आहोत, तेव्हा कापड किती घ्यायचे ह्यावर चिकित्सा नको..’ असे मनात म्हणत त्या दुकानदाराला १० वार भगवे कापड पाहिजे असे सांगितले. तो दुकानदार कापड मोजता मोजता सहज म्हणाला, “तुम्ही एवढे १० वार कापड कश्यासाठी घेत आहात? ह्याचे काय शिवणार आहात?” अशी प्रश्नोत्तरे सुरु झाली. मी म्हटले, “मला कफनी शिवायचे आहेत.” तो म्हणाला, “साहेब, कफनीला १० वार कापड लागत नाही, तुम्हाला ५ वार पुरे होईल.” मी मनात म्हटले, “तुला काय करायचेय?” वरकरणी मात्र “बरं, दे ५ वार!” असे म्हणून मी कापड घेतले आणि तडक शिंप्याकडे गेलो. शिंप्याला म्हटले, “मला ह्याची कफनी शिवायची आहे, आत्ताच्या आत्ता शिवून दे. हवं तर डबल चार्ज देईन!” इथेही ‘मी’पणा आलाच! मनात म्हटले, ‘हा ‘मी’पणा भलताच त्रास देणार आहे, बघावे तेव्हा डोके वर काढतोच आहे!’ कफनीला काही फार शिवण्यासारखे नव्हतेच, त्या शिंप्याने अर्धा तासात माझी कफनी शिवून दिली. एव्हाना दुपारचा एक वाजून गेला होता. मी माझं सगळं अध्यात्म घेऊन घरी पोहोचलो. भगव्या रंगाचं बोचकं हातात बघून घरातले सगळे फिदीफिदी हसायला लागले! बायको म्हणाली, “ आता हे काय नवीन खूळ??” मी जरा रागातच म्हणले , “हसू नका तुम्ही सगळे, मी सिरीयसली अध्यात्म करणार आहे!” जेवण वगैरे उरकल्यावर २-४ पुस्तके उशा-पायथ्याशी मांडून त्यातले एक पुस्तक वाचायला हातात घेतलं.
“योगश्चित्त वृत्ती निरोध:” सामान्य भाषेत ह्याचा अर्थ चित्ताचे थांबणे किंवा अ-मन होणे असा आहे. मनात म्हंटले, ‘हे चित्त थांबावयाचं म्हणजे कसं काय थांबावयाचं?’ शिवाय मनातल्या मनात जर काही बोलायचे असेल तर काय करायचे. बाहेर नुसता हात जरी वर केला तरी रिक्षा थांबते. आत काय आहे थांबवायला. चित्त आत आहे कुठे हे तरी कुणाला ठाऊक. जितका मी जास्त विचार करू लागलो, चित्त तेवढेच पुढे पुढे धावू लागलं. शेवटी विचार केला, ह्याचा आपण विचार करूच नाही...कोणत्या तरी आश्रमात जाऊया.
एके दिवशी पहाटे उठून कुणालाही न सांगता थोडेसे कपडे अन पैसे घेवून एस टी ने पुण्याजवळच एका शांत ठिकाणी एक आश्रम आहे तिथे पोचलो. तिथूनच घरी एक फोन करून टाकला, मी आत्म्याच्या शोधात इथे आलो आहे, पावला की येतोच परत, काळजी करू नका अगर शोध घेवू नका. आश्रमापर्यंत जायला कुठलेही वाहन दिसेना. एक दोन गावकऱ्यांना विचारले तर म्हणाले जावा की ‘पायी हितंच तर हाय दोन तीन कोसा वर.’ बापरे!!!!!!! सहा मैल चालायचे. मनात आले स्कूटर हवी होती इथे. आतून संदेश आलाच ......मिस्टर अ-मन करा. बोलताय काय.......चरफडून गप्प बसलो अन चालू लागलो. कसाबसा हाश्शहुश्श करत दुपार पर्यंत आश्रम गाठला. इतका दमलो होतो की आश्रमाच्या मुख्य दाराशीच बसकण मारली. नशीब जोरावर होते, कुणीतरी मला बसताना पहिले अन झटकन प्यायला पाणी आणून दिले. थोडी हुशारी वाटल्यावर मी माझ्या येण्याचे प्रयोजन त्या व्यक्तीला सांगितले. तो म्हणाला,” छान......तुम्ही योग्य वेळी आलात....हातपाय धुवून घ्या.....प्रसादाची वेळ झालीच आहे. तो ग्रहण करा मग स्वामींची भेट घ्या. मनात आले, व्वा....व्वा. किती योग्य ठिकाणी आलो आहे. भूक तर लागली होतीच. आश्रमातील लोकांच्या रांगेत एक ताट वाटी घेवून मी पण नंबर लावला. जेवण साधेच पण चांगले होते. जेवता जेवता माझे लक्ष तेथील साधकांकडे पण होते. काहींचे ड्रेस पिवळे तर काहींचे भगवे होते. मनात म्हंटले मी तर भगवी कफनी आणली आहे. बहुधा पिवळ्या रंगापेक्षा वरच्या लेव्हलची असावी. ह्या विचारांनी माझा उत्साह आणखी वाढला आणि मी जेवणावर ताव मारु लागलो. माझ्या बरोबर बसलेली मंडळी केंव्हाच उठून गेली होती. होती ती नंतर आली होती. मला थोडे ओशाळल्यागत झाले आणि झटकन उठलो. मी अ-मनालाच फटकारले, ह्या वेळेस का गप्प बसलास. माझी फजिती बघायला का ??????
भरपूर जेवणामुळे मला डुलकी येतच होती. एवढा मोठा आश्रम असून आत्मशोधार्थ आलेली मंडळी तशी मोजकीच होती. हॉलच्या एका कोपऱ्यात मी स्वतःला झोपेच्या स्वाधीन केले. किती झोपलो असेन काय माहित! पण उठलो तर स्वामीजींचे प्रवचन चालू होते. बरीच मंडळी दिसत होती. मी पण घाईघाईने उठलो. तोंडावर पाण्याचा हबका मारला आणि मिळेल जागा तिथे बसलो. माझे लक्ष प्रवचनाकडे होते कुठे. मी आपले वाट बघत बसलो होतो,‘प्रवचन केंव्हा संपतंय आणि मी स्वामीजींच्या पायाशी बसून अध्यात्मिक रसपान केंव्हा करतोय.’
संध्याकाळी ६ च्या सुमारास स्वामीजींचे प्रवचन एकदाचे संपले. स्वामीजींची गाठ घ्यायची म्हणून मी तसाच बसून राहिलो. सर्व लोकं निघून गेल्यावर स्वामीजींनी मला जवळ बोलावून येण्याचे प्रयोजन विचारले. त्यावर मी तिथे येण्याचे कारण सांगितले. स्वामीजी म्हणाले, “छान छान!!” आणि एवढे बोलून त्यांनी कोणालातरी खुण केली. स्वामीजींचा एक शिष्य तत्परतेने हजर झाला. स्वामीजी मला म्हणाले, “तुम्ही ह्यांच्याबरोबर जा, ते तुमची सर्व व्यवस्था करतील.” त्या शिष्यानी मला माझी खोली दाखवली व सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा सर्व कार्यक्रम सांगितला. तो थोडक्यात असा- तिथे ७ दिवस राहता येईल, पुढची साधना तुमची तुम्ही घरी करायची. दररोज पहाटे ४ वाजता उठायचे. ४ ते ५ सामुहिक ध्यानास बसणे. ५ ते ७ स्वामीजींचे प्रवचन ऐकणे. ७ ते ७:३० चहा. ७:३० ते ९ अंघोळ वगैरे उरकणे. ९ ते १०पुन्हा ध्यानास बसणे. १० ते १२ लायब्ररीतून पुस्तके घेऊन वाचणे. १२ ते १२:३० सामुहिक प्रार्थना व आरती. १२:३० ते १:३० दुपारचे जेवण. १:३० ते ३:३० विश्रांती. ३:३० ते ४ चहा. ४ ते ६ पुन्हा प्रवचन. ६ ते ७ स्वामिजींशी गप्पा. ७ ते ८ रात्रीचे जेवण. ८ नंतर वैयक्तिक वेळ. ह्या वास्तव्यात तुम्हाला बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क साधता येणार नाही. अ.....बब.....बब...हे सर्व करावयाचे........ ह्याचा मोक्षासी काय संबंध. मी एक साधा संसारी माणूस....मला एखादा छोटा मोठा मोक्ष मिळाला तरी चालेल. हे सर्व वाचून तर माझं धाबंच दणाणलं. शेवटी मनाची समजून घातली, ‘काहीतरी मिळवायचे म्हणजे काहीतरी घालवणे आलेच. जगाची रीतच आहे ही !!’ असा विचार करून मी झोपेची आराधना करायला सुरुवात केली.
काही तरी खटट वाजल्याचा आवाजा मुळे रात्री मी खाडकन जागा झालो, समोर पाहतो तर काय. स्वामीजींचे चार पाच शिष्य दारात उभे. एकाच्या हातात दोरी, दुसऱ्याच्या हातात करवत, एक जण छीन्नी आणि हतोडी इत्यादी सामान घेवून माझ्याकडे येत होते. ते सर्व पाहून मला दरदरून घाम फुटला. हि मंडळी आता मोक्ष तर लांबच पण माझा कपाळ मोक्ष नक्की करणार ह्याची खात्री झाली. माणसांचे अवयव विकणारी टोळी तर नाहीना. अशा प्रकारचे शेकडो अशुभ विचार मनाला चाटू लागले. इकडे यायची दुर्बुद्धी कुठून सुचली अन ह्यांच्या तावडीत सापडलो. असे झाले. आलीया भोगासी. दुसरे आपण तरी अशा परिस्थितीत काय करणार. सर्वांनी धरुन मला कॉटला बांधून टाकले........
‘’ घाबरू नको बच्चा.....मोक्ष हवे ना...... थोडी कळ सोसावी लागेल .........आता आम्ही तुझ्या डोक्याचा थोडासा भाग कापणार आहोत अन बरोबर आणलेले मोक्ष त्यात भरणार आहोत. एवढे झाले की तुला मोक्ष मिळालेच म्हणून समज. तशी आम्हाला स्वामीजींची आज्ञा आहे. कारण त्यांनी आम्हाला सांगितले की ह्या व्यक्तीला मोक्ष लवकर हवे आहे. म्हणून तुला तत्काळ श्रेणीत टाकायला सांगितले. तर आता पुढच्या शल्य चिकित्सेला तयार हो........”
तेवढ्यात धाडकन पडल्याचा आवाजाने उठलो. पाहतो तर काय मी कॉट खाली पडलो होतो. स्वप्न होते तर ते. सर्व अंग घामानी डबडबलेले. छातीचा भाता जोरजोरात वर खाली हो होता. त्याही परिस्थितीत मी आधी डोक्याला हात लावून पहिला . डोके शाबूत होते. त्यानंतर मात्र मी झोपायची हिम्मत केली नाही, न जाणो खरच आले तर. सकाळी चार वाजता मात्र मला उठवावे लागले नाही.
सर्व कार्यक्रम शांतपणे ठरल्या प्रमाणे पार पडत होते. रात्रीच्या स्वप्नाचा मागसुमही न्हवता. पण माझे अ-मन होणे तर सोडाच पण मनाची धडधड मात्र स्पष्ट ऐकू येत होती. मनानी सुचवले “ आजची रात्र राहिलास तर तुझे काही खरे नाही. पोबारा कर. पळून जा. काहीतरी कारण सांग. पण जा................”
दुपारच्या जेवणा नंतर मी स्वामीजींची तातडीने भेट घेतली व सांगितले मला बरे वाटत नाही, बरे वाटल्यावर पुन्हा येईन. स्वामीजी म्हणाले “ राहिला असतास तर बरे वाटले असते. ठीक आहे. ईश्वरी इच्छा बलीयसी. जाताना ऑफिस मध्ये सांगून जा म्हणजे ते तुझी एस.टी. stand पर्यंत पोचोवण्याची व्यवस्था करतील.” निरोप घेताना स्वामीजींचे एक पत्र त्यांनी मला हातात दिले.
stand वर पोचल्यावर मी ते उघडून पाहिले. त्यात लिहिले होते “ बेटा...... पुढच्या वेळेस येताना डोके मात्र घरीच ठेवून ये. परमेश्वर फक्त भावाचा भुकेला आहे. तो भाव आला की त्या परमेश्वराला बोलवायची आवश्यकता रहात नाही.” ते वाक्य वाचल्यावर माझ्या भ्रमाचा एक भोपळा तरी फुटला.
कसाबसा संध्याकाळी मी घरी पोचलो. सर्व जण माझी वाट पाहताच होते. मला आश्चर्याचा धक्काच बसला. जिथे मी कधी येणार हे मलाच माहित न्हवते ते ह्यांना कसे ठाऊक. मी बायकोला विचारलेच तुला कसे ठाऊक मी आजच येणार, उद्या, परवा, तेरवा कदाचित महिन्यांनी पण येऊ शकलो असतो. पण आजच हे कसे कळाले. बायको म्हणाली, “ अहो ! आम्ही रोज जी एक तास पूजा करतो ना वर्षानुवर्षे, त्यातच आम्हाला ओळखण्याची शक्ती मिळून जाते. पण तुमच्या सारखे दाखवत बसत नाही. किंवा चर्चा देखील करीत नाही. सध्या तुमची जी धावपळ चालली आहे ना त्यावरून तुम्ही कुठे गेला असणार, कशासाठी गेला असणार. तुम्ही एक दिवसाच्या वर राहू शकणार नाही हि माझी अटकळ होतीच. त्या प्रमाणे तुम्ही निघून आलात, खरे की नाही.” हो म्हणल्याशिवाय गत्यंतर न्हवते. खरेच होते. ती पुढे म्हणाली, “ अहो आपण साधी सामान्य माणसे. आपली शक्ती, बौद्धिक उंची, त्यागाची कुवत वगैरे ती अशी कितीशी असणार. त्या पेक्षा आहे त्यातच सुखासमाधानाने राहिले तर काय वाईट. जमेल तेवढा परोपकार करायचा, कुणाचे उणे दुणे काढायचे नाही, मनाची शांतता शक्यतो ढळू द्यायची नाही, ह्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी पाळल्या तरी मी म्हणते खूप झाले. कुठल्यातरी जन्मात आपला पण नंबर येईलच ह्याची मला तरी खात्री आहे.”
तिचे हे सगळे प्रवचन ऐकल्यावर एक तरी एक गोष्ट तरी लक्षात आली, “ योग हे येरा गबाळ्याचे काम न्हवे. त्याची पूर्व तयारी लहानपणापासूनच लागते. पातंजल योग दर्शन प्रथम समाधिपाद पहिल्याच श्लोकात लिहिले आहे.
“ अथ योगानुशासनम् “ II १.०१ II

अथ हा शब्द हिंदूंच्या अनेक ग्रंथात मंगलाचरण शब्द म्हणून वापरायची पद्धत आहे. पण इथे त्याचा अर्थ थोडा वेगळा आहे असे ओशोंनी त्यांच्या प्रवचनात म्हंटले आहे. ते म्हणजे संसारातले टक्के टोणपे खाऊन उमज पडला असेल, विचारांना प्रगल्भता आली असेल, संसाराच्या वासानाचक्राच्या बोधातून मोक्षाची इच्छा निर्माण झाली असेल तरच ‘अथ’ म्हणून योगाभ्यासाला सुरवात करावी. खरे तर कोणतीही अध्यात्मिक साधना मुमुक्षुसाठीच असते.
पहिल्याच श्लोकात जर एवढा अर्थ ठासून भरला आहे तर पुढे काय काय असेल ह्याचा विचार न केलेलाच बरा.
शेवटी असे ठरवले ह्या जन्मी फक्त गोळा करायचे. आणि पुढच्याच क्षणी मी जाहीर करून टाकले.
“ आज पासून पूजा माझ्याकडे लागली .”

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान