अंधार्‍या रस्त्यावरची लिफ्ट

Submitted by स्वीट टॉकर on 16 April, 2015 - 04:15

मुंबईहून आम्ही नुकतेच पुण्याला स्थायिक झालो होतो. लोक काहीही म्हणोत, मला मात्र मुंबई आणि पुणं इथल्या लोकांच्या स्वभावात अजिबात तफावत वाटली नाही. पण त्याबद्दल नंतर कधीतरी बोलू.

दोन्हीकडच्या पावसांमध्ये मात्र दोन मोठे फरक आहेत. एक म्हणजे पावसाचं प्रमाण. मुंबईला प्रचंड पाऊस. संततधार लागायची. पुण्याचा पाऊस त्याच्या एक त्रितियांश. दुसरा फरक म्हणजे या पावसाचा विद्युतपुरवठ्यावर होणारा व्यस्त परिणाम. (मराठी भाषेत ‘व्यस्त’ म्हणजे inverse. हिंदी भाषेत ‘व्यस्त’ म्हणजे busy. पण मोबाइल टेलिफोन कंपन्यांच्या मराठी रेकॉर्डिंगमध्ये ‘व्यस्त’ हा शब्द चुकीच्या अर्थानी वापरलेला ऐकून ऐकून ऐकून ऐकून आता तो कोणालाच चुकीचा वाटत नाही. त्यातून बहुतेकांचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं. असो.) मुंबईला इतका पाऊस असूनदेखील वर्षानुवर्ष वीज जायची नाही. पुण्याला मात्र सर आली की वीज गेली अशी अवस्था आमच्या भागात होती.

रात्री आठचा सुमार होता. नुकताच पाऊस पडून गेला होता. अर्थातच वीज नव्हती. मी आणि माझी अर्धांगिनी शुभदा गाडीनी चाललो होतो. हाउसिंग सोसायट्यांच्या जवळपास घरांमधल्या इन्व्हर्टर्समुळे रस्त्यावर अंधुक का होईना, प्रकाश पडतो तरी. आमचा भाग नवीन. त्यामुळे रस्ते देखील नवीन आणि रुंद, घरं नावालाच. रस्ता निर्मनुष्य. मिट्ट काळोख. फक्त आमच्या हेडलाइट्सचा उजेड.

रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन मुलींनी लिफ्ट मागितली. मी गाडी थांबवेपर्यंत आम्ही वीस तीस मीटर पुढे गेलो होतो. माझं आणि शुभदाचं discussion. या मुलींना शूर म्हणायचं का मूर्ख? का या वेगळ्याच प्रकारच्या बायका आहेत. आणि त्यांना लिफ्ट देणं धोकादायक होईल?

गाडी नुकतीच विकत घेतली असल्या कारणानं चोरीला जायला खिशात पैसे उरेलेच नव्हते. लिफ्ट द्यायची आणि या फाजील आत्मविश्वास असलेल्या मुलींना चांगलं फैलावर घ्यायचं असं शुभदानी ठरवलं. रिव्हर्स गियर टाकला तोपर्यंत दोघीही गाडीपर्यंत येऊन पोहोचल्या देखील. छोटी चण असलेल्या कॉलेजकुमारी वाटल्या. त्यांची स्कूटर बंद पडली होती. दोघींना गाडीत घेतलं. त्यांना आमच्या घराच्या जवळच्या एका चष्म्याच्या दुकानात जायचं होतं.

एक मुलगी बडबडी होती. दुसरी शांत. मी मनातल्या मनात बडबडाबाईचं नाव ‘प्रफुल्ला’ ठेवलं. दुसरीचं ‘शांता’. प्रफुल्लानी दोघींची नावं सांगितली. बहिणी असाव्यात असं मला उगीचच वाटलं.

“मुलींनो, तुम्हाला वाटत नाही की तुम्ही मोठा धोका पत्करलात?” शुभदानी उलटतपासणीला सुरुवात केली. मागच्या सीटवर शांतता.

“आम्हा दोघांऐवजी कोणी भलतेसलते असते म्हणजे?” तरी शांतता.

“काय गं? तुमच्या आईला कळलं की तुम्ही एकट अंधार्‍या रस्त्यावर अशी लिफ्ट घेतलीत तर तुमची आई काय म्हणेल?” शांतता कायम.

“ऐकू येतय् का मी काय म्हणतिये ते?” हे अगदी मृदु आवाजात.

मला या मृदु आवाजाचा फार कठोर अनुभव आहे. आवाज अचानक मृदु होणं ही स्फोटाची पूर्वसूचना असते. आमच्या गाडीत नेहमी हलक्या आवाजात संगीत चालू असतं. मी ते बंद केलं. (नाटक सुरू होण्याची वेळ झाली की मोबाईल सायलेंट करावा.)

शांत मुलगी तोंडातल्या तोंडात काहीतरी बोलली.

“वा ! चारचारदा प्रश्न विचारल्यावर कंठ फुटला का आपल्याला? ज्ञानाचे चार मोती आमच्याकडे देखील भिरकवा की!” राग आल्यावर साधारण माणसाला शब्द पटापट सुचत नाहीत. हिचा म्हणजे झराच सुरू होतो.

“मीच तिची आई.” शांता म्हणाली.

“काऽऽऽ य?” शुभदा जवळजवळ किंचाळलीच. मी क्षणभर गोंधळलो पण मला आश्चर्य वाटलं असं मी म्हणणार नाही. कारण मला तिचं बोलणं खोटंच वाटलं. खोटं वाटायचं कारण काय?

मी शाळेत असताना आमच्या वर्गातल्या एका टवाळ मुलानी “तुझ्या पालकांना घेऊन ये” असं बाईंनी सांगितल्यामुळे आपल्याच गल्लीतल्या एका दारुड्या अंकलला आणलं होतं. व्यवस्थित प्लॅनिंग केलं होतं. त्याला पैसे दिले होते. बाईंनी तक्रार केली रे केली की भाडोत्री बापानी भयंकर राग आला आहे असं भासवून मित्राच्या पाठीत धपाटा घालायचा प्रयत्न करायचा. मित्र पळून जाणार. मग अनावर रागांत बाप त्याला “घरी येच, मुस्काट फोडतो की नाही बघ!” असं म्हणून, मग बाईंना उद्देशून, “काढून टाका सालेतनं याला. त्याला अन् त्याच्या मायला गावाकडं शेतीलाच लावतो.” असं म्हणत अंकलनी तरातरा निघून जायचं – असं ठरलं होतं.

प्रचंड दूरदृष्टी. आत्ताचाच प्रॉब्लेम नव्हे, तर बाईंची कायमचीच सहानुभूती मिळविण्याचा प्लॅन होता मित्राचा.

अपेक्षेप्रमाणे बाईंनी अंकलकडे तक्रार केली. मात्र रागानी लालबुंद होण्याऐवजी अंकलनी “असं का रे वागतोस बाळा,” असं म्हणत मित्राला जवळ घेतलं. “उफ्फ ! असल्या बापाचं पोर असंच असणार” असा चेहरा करून बाईंनी छताकडे डोळे फिरवले. स्क्रिप्टमध्ये अनपेक्षित बदलाव आल्यामुळे मित्र गोंधळला. Guidance साठी आळीपाळीनी आमच्याकडे आणि अंकलकडे बघायला लागला. असे काही सेकंद गेले, आणि अंकलनी दातओठ खाऊन अचानक मित्राच्या कानशिलात सणसणीत भडकावली !

तो लवंगी फटाक्यासारखा आवाज आणि त्या क्षणीचा मित्राचा चेहरा मी आयुष्यभर विसरणार नाही. आश्चर्या च्या पलिकडे असतो तो शॉक. शॉकच्या परिसीमेच्या पलिकडे जे काय असेल ते त्याच्या चेहर्‍यावर क्षणभरच दिसलं. तो गेला भेलकांडत. अंकल उलटपावली वळला आणि तरातरा निघून गेला.

मित्र शॉकच्या पलिकडे आणि आम्ही सगळे हसून हसून मुरकुंडीच्या पलीकडे ! वर्गातला प्रत्येक मुलगा बाकावर नाहीतर जमिनीवर गडाबडा लोळत होता! ते दृष्य अफलातूनच असणार. हे सारं बाईंच्या सहनशक्तीच्या पलीकडे होतं. “दुसर्‍याच्या दुःखाला हसता काय रे नालायकांनो” असं म्हणत बाईंनीही जमेल तितक्या मुलांना बदडलं.

भरपूर पण मजेदार violence झाला होता.

तात्पर्य काय, तर माझा काही तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही.

मी गाडीतला दिवा लावला. शुभदा सीट बेल्ट काढून पूर्ण मागे वळली. शांताचा चेहरा नीट न्याहाळल्यावर लक्षात आलं की ती खरं सांगत होती. दोघी मायलेकी होत्या ! मुलगी अठरा-वीस वर्षाची होती. म्हणजे त्या आई आम्हाला दहा पंधरा वर्ष सीनियर होत्या ! आपण त्यांना फाडफाड काय काय बोललो ते आठवून शुभदा ओशाळली. शांतेचं नाव मनातल्या मनात बदलून मी ‘शांताकाकू’ केलं.

मात्र embarrassment मधून पुढे सरकणं जरूर होतं. मी शुभदाचाच प्रश्न पुन्हा विचारला. “तुम्हाला वाटंत नाही की तुम्ही मोठी रिस्क घेतलीत म्हणून?”

“अजिबात नाही.” शांताकाकू उत्तरल्या.

आता मात्र मला फारच आश्चर्य वाटलं. इतक्या अनपेक्षित उत्तराला काय प्रतिप्रश्न करावा या विचारात मी असतानाच त्यांनी पर्समध्ये हात घालून काहीतरी काढलं.

“अय्याऽऽऽऽ.” शुभदा.

“काय आहे?” मी.

शांताकाकूंनी मला आरशात पिस्तुल दाखवलं !

“आइच्चा घो !” मी तोंड आवरायचा आत शब्द निघालेच.

“मला बघू, मला बघू .” शुभदा.

मुली बाहुल्यांशी खेळतात आणि मुलगे बंदुकींशी. इथे या दोघी बंदूक–बंदूक खेळत होत्या आणि मी स्टिअरिंगवर ! मी कचकन् गाडी थांबवली.

“हाः हाः हाः हाः. सारे जेवर मेरे हवाले कर दो. हाः हाः हाः हाः.” हिंदी चित्रपटातल्या खलनायकाच्या आवाजाची नक्कल करत त्यांनी बंदूक माझ्या कानशिलाला लावली.

माझी क्षणभर फाटली. पण प्रफुल्ला हसत होती त्या अर्थी त्या विनोदच करंत असणार.

“भंकस नको. चुकून गोळी सुटेल.” मी.

“छे हो. खोटी बंदूक आहे.” असं म्हणत त्यांनी ती माझ्यापुढे केली. हुबेहूब खर्‍यासारखीच दिसत होती. Beretta. जेम्स बॉन्डची आवडती बंदूक. खरोखर धातूची होती. वजनदेखील खणखणीत.

मग त्यांनी त्यांची हकीकत सांगितली.

बीडला राहात असत. यजमानांची बँकेत नोकरी. एकदा त्यांच्या घरावर दरोडा पडला आणि दुर्दैवानी त्यात यजमानांना वर्मी घाव लागला. ते वाचू शकले नाहीत. मग बँकेनी अनुकंपा तत्वावर नोकरी दिली.

जर चोरांकडे व्यवस्थित हत्यारं असतील तर आपल्या कुलुपांचा काहीच उपयोग नसतो. फारसा आवाज न करता कितीही कुलपं तोडता येतात. (ज्यांच्या घरी घरफोडी झाली आहे त्यांनी ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे.) त्या काळात कॉम्प्यूटर नव्हते आणि CCTV कॅमेरे परवडण्याच्या पलिकडे होते.

घरी आई आणि मुलगी दोघीच. त्यामुळे त्या कायम टेन्शनमध्ये असायच्या. काम नवीन, मुलगी लहान. वेळीअवेळी जाग यायची आणि मग रात्रभर झोप लागायची नाही. तब्येतीवर परिणाम व्हायला लागला. स्वतः आजारी पडल्या की मुलीची आबाळ व्हायची. तेव्हां त्यांच्या भावानी त्यांना ही बंदूक आणून दिली. तेव्हांपासून त्या निश्चिंत झाल्या. दोघींची आयुष्यं हळुहळु परत रुळावर आली.

घरी तर छकुली माझ्याबरोबर असतेच. रात्री बाहेर जाताना किंवा प्रवासाला जाताना मी नेहमी छकुलीला बरोबर घेते असं त्या म्हणाल्यामुळे मला वटलं त्या आपल्या मुलीबद्दल बोलताहेत. मग कळलं की त्यांनी बंदुकीला ‘छकुली’ असं नाव ठेवलं होतं !

छकुली ! छकुली ? हे काय बंदुकीला ठेवण्यासारखं नाव आहे? डोक्यात प्रश्न आला की लगेच तो विचारायची सवय असल्यामुळे मी कारण विचारलंच. ते त्यांनी सांगितलं ते असं.

त्या लहान असताना त्यांच्या बाहुलीचं नाव होत ‘छकुली’. त्यांची आई सावत्र होती. वारंवार घायाळ झालेल्या बालमनातले सगळे विचार, शंका, घालमेल, एकटेपणा, दुःख – सगळ्या सगळ्याची वाटेकरी असायची ती छकुली. कधी न कुरकुरता, न कंटाळता, एकही शब्द न बोलता ती छोटीला धीर द्यायची. तिची समजूत काढायची. जोपर्यंत छकुली आपल्या कुशीत आहे तोपर्यंत आपलं काहीही वाईट होणार नाही अशी त्या कोवळ्या मनाची खात्री होती. आणि ती खरी देखील ठरली.

पुढच्या आयुष्यात त्या बंदुकीनेही नेमकं हेच काम केलं. म्हणून तिचंही नाव ‘छकुली’ !

किती समर्पक ! काही मिनिटांपूर्वी मला हेच नाव हास्यास्पद वाटलं होतं. आपण कित्येकदा आपली मतं किती पटकन् आणि अपुर्‍या माहितीनिशी बनवतो ! माझ्या उथळ विचारांची मलाच लाज वाटली.

चष्म्याच्या दुकानापाशी सोडताना शुभदा त्यांना म्हणाली, “चाळिशी?.”

त्या हसल्या. म्हातारीच्या कापर्‍या आवाजाची नक्कल करंत म्हणाल्या, “मुलांऽऽनोऽऽ, चाळीशी म्हणजे काय ते तुम्हाला कळायला खूप वेळ आहे.”

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या लेखनशैलीमुळे मजा येते वाचायला.

आपण कित्येकदा आपली मतं किती पटकन् आणि अपुर्‍या माहितीनिशी बनवतो !>>>> अगदी खरं.

सर्वजण,
धन्यवाद.

मैत्रेयी आणि संदीप,
गेल्या वीस वर्षात मी पुणे सकाळकडे भरपूर लिखाण पाठवलं. एक देखील छापून आलं नाही असं मला वाटत होतं. हे आलं होतं असं दिसतय्. सांगितल्याबद्दल धन्यवाद.

On second thoughts, हा किस्सा मी सकाळला पाठवला होता असं काही मला वाटत नाही. साधारण कधी आलं होतं ते सांगू शकाल का? मी आणि शुभदानी तोंडी ही गोष्ट पन्नास वेळा तरी वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये सांगितली असेल. त्यातल्या कोणी लिहिली आहे का ह्याची माहिती काढतो.

मीही याअगोदर हा किस्सा कुठेतरी वाचल्याचं खात्रीपुर्वक आठवतयं. तुम्ही ह्या लेखनाची लिंक इथेच मायबोलीवर दिली होती का ?? मलातरी तसचं आठवतयं.

मस्त किस्सा. मजेशीर लेखन.
विशेषत: दुसर्‍या परिच्छेदातल्या "व्यस्त" शब्दाबद्दलच्या स्पष्टीकरणामुळे मी तुमचा जबरदस्त फॅन झालेलो आहे.

फक्त अनावश्यक हिंदी/इंग्रजी शब्द टाळता आल्यास पहा.

"मीच तिची आई.” शांता म्हणाली >>> Rofl
मला या मृदु आवाजाचा फार कठोर अनुभव आहे. >>> Biggrin
मित्राचा किस्सापण मस्त .. लेखनशैली आवडली ... Happy

वाचताना असाच विचार आला ,
खोटी बंदूक दाखवल्यावर तुम्ही शांत प्रतिक्रिया दिलीत म्हणून बर, नाहीतर एखाद्याने जेम्स बॉन्ड टाईप कलाकाराने जोरदार हालचाल करून खस्सकन बंदूक खेचून घेतली असती न त्यांना झोड देऊन बाहेर फेकल असत म्हणजे.? कसली फजिती झाली असती त्यांची... Rofl

शांताबाईचे स्पष्टीकरण वाचुन कुठेतरी आत कालवल्यासारखे झाले. एकटेपणा किती भयाण असु शकतो आणि प्रत्येकाचे त्यावरचे उपाय किती वेगवेगळे असु शकतात. Sad

खूप छान!
"व्यस्त" शब्दाबद्दल १००% अनुमोदन!!
त्यांची व्यस्त जीवनशैली असा वापर अगदी कानांना टोचतोच!
पण काय करणार???????

कित्येक मायबोलीकरांना वाचलेलं आठवत आहे ते बरोबरच आहे. अगोंनी म्हटल्याप्रमाणे मी जेव्हां मायबोलीवर रुजू झालो ते व्हां मला असं मराठी टंकलेखन येत नव्हतं. त्यामुळे मी पी डी एफ लिंक दिली होती. बर्याच जणांना ती उघडता आली नाही अशी प्रतिक्रिया आली होती. त्यामुळे ती पुन्हा टाइप केली आणि मीच विसरलो की मी हे दुसर्यांदा टाईप करीत आहे. अगोताई धन्यवाद.

पिकेश - गाडीमध्ये सीट बेल्ट लावून बसलेल्या व्यक्तीला स्वतःच्या खिशातला मोबाईल देखील लवकर काढता येत नाही. त्यामुळे मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीच्या हातातून बंदूक हिसकावून घ्यायला चित्रपटातला नायकच पाहिजे. (किंवा बंदूकधारी व्यक्ती कोमात असली पाहिजे!) हीरोगिरी करण्याचा विचार माझ्या मनाला शिवला देखील नाही.

आप्पाकाका धन्यवाद. आपण आज सर्वसाधारण संभाषणात कित्येक इंग्रजी शब्द वापरतो. त्यांची जरूर नाही हे जरी खरं असलं तरी ती वस्तुस्थिती आहे. मी हा प्रसंग तोंडी जसा सांगितला असता तसाच तो टाइप केला आहे त्यामुळे जे शब्द सहजपणे सुचत गेले तसेच ते लिहिले आहेत. शिवाय 'embarrassment' सारख्या शब्दाचा 'कानकोंडा' हा अनुवाद आपण बोलण्यात वापरत नाही. मला स्वतःला हा 'गागा पैलवान' यांच्या कडून मायबोलीवरच समजला.

“हाः हाः हाः हाः. सारे जेवर मेरे हवाले कर दो. हाः हाः हाः हाः.” हिंदी चित्रपटातल्या खलनायकाच्या आवाजाची नक्कल करत त्यांनी बंदूक माझ्या कानशिलाला लावली. :ड :ड अजुनहि हसतोय मी. मस्त अनुभव लिहिलात.

“हाः हाः हाः हाः. सारे जेवर मेरे हवाले कर दो. हाः हाः हाः हाः.” हिंदी चित्रपटातल्या खलनायकाच्या आवाजाची नक्कल करत त्यांनी बंदूक माझ्या कानशिलाला लावली. :ड :ड अजुनहि हसतोय मी. मस्त अनुभव लिहिलात.