"मी"- दोन गझला

Submitted by सुशांत खुरसाले on 13 April, 2015 - 03:31

जे मिळावे असे वाटते नेहमी
ते मिळाल्यावरी वाटते का कमी

ज्या मनाचा कुणीही न मी लागतो
त्या मनाची कशी द्यायची मी हमी

काय बोलायचे राहिले फारसे
काय ऐकायला राहिलो फार मी

फक्त गुंतून जाण्यात आहे मजा
फक्त आहेत हे सापळे रेशमी..

ही स्वतःची म्हणू की जगाची म्हणू
जी मिळे रोज ऐकायला बातमी

राहिलो..राहिलो..पण कुठे राहिलो ?
नेमका सांग बाहेर की आत मी ?
=======================
परतून आलो त्याच टप्प्यावर पुन्हा मी
ठाऊक आहे ना तुला..आहे कसा मी

माझ्या हवेलाही जणू ठाऊक नाही
की कोणत्या श्वासात आहे नेमका मी

जुळवून घेताना जगाशी एक केले -
संबंध माझ्याशीच माझा तोडला मी

कित्येक तासांची उडवली झोप त्याने
का हुंदका एका क्षणाचा ऐकला मी ?

वाहून जाऊ कोणत्या डोळ्यांबरोबर ?
वाचत बसावा सांग कुठला चेहरा मी ?

--सुशांत..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुळवून घेताना जगाशी एक केले -
संबंध माझ्याशीच माझा तोडला मी

कित्येक तासांची उडवली झोप त्याने
का हुंदका एका क्षणाचा ऐकला मी ?<<<

वा वा

दोन्ही गझला छान, सुबक! आवडल्या.

धन्यवाद!

हाही शेर मस्त आहे.

>>>राहिलो..राहिलो..पण कुठे राहिलो ?
नेमका सांग बाहेर की आत मी ?<<<