भैरवी

Submitted by अमेय२८०८०७ on 13 April, 2015 - 23:47

(वृत्त : मंदाक्रांता)

रक्तामांसा कुठुन कळते कोणती मूळ पेशी
कोऱ्या भाळी नशिब-टवके जन्मतः दैव ताशी
आरस्पानी सलिल म्हणुनी ज्या प्रवाहात जावे
त्याच्याखाली बिकट भवरे, पोहणारा अपेशी

कोणासाठी सहन करतो झोंबरे जन्मदावे
गेले त्याची स्मरणभरती वाहताना स्वभावे
आकांताने सतत भरुनी देहप्याला विषारी
काळ्या डोही थरथर उठे आत्मभाना दुखावे

अंतःस्थाच्या सजग प्रहरी वेदनेची उभारी
आकाशीही दगड-खळगे मारताना भरारी
ज्वालाग्राही धग उसळते राख डोळ्यांस जाळे
झाकोळाचा कुरुप पडदा काजळाच्या दुपारी

सारीपाटी अथक झगडे खेळणारा मिषाने
गालामध्ये हसत नियती टाकते धूर्त दाने
खोटीनाटी कुठवर अशी गायची फोल गाणी
आता व्हावे सहज विझणे भैरवीच्या स्वराने

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेय बाबूंच्या अनेक कवितेत नेहमी दिसते ती काहीश्या कटू वैफल्याची छाया ह्या पण कवितेत दिसते आहे.. काही वेळा ती शेवटी आशावादी सुर पकडते तर काही वेळा त्या कटूतेच्या ;मळभा'त राहात मुक्ततेची प्रतिक्षा करत राहाते. ही कविता दुसर्‍या प्रकारची दिसते आहे.
हे अनामिक मळभ सहज , चपलख शब्दातून व्यक्त होताना मूळ 'मळभा'मागच्या नेमक्या कारणांचा पत्ता , मागमूस मात्र कवी महाशय कधीच लागून देत नाहीत.. कारणांचा शोध वाचकांवर सोडून देतात.
बाकी कविता नेहमी प्रमाणेच सुंदर ..

आभार सर्वांचे
अविनाश Happy

भारतीताई ती ओळ जास्तच obvious वाटली म्हणून बदलतोय आता, नाहीतरी या वृत्तात subtle मंद असाच आकांत अपेक्षित आहे, नाही का ?