कॅलिफोर्नियाच्या तोंडचे पाणी पळते तेंव्हा…

Submitted by निकीत on 7 April, 2015 - 07:47

कॅलिफोर्नियात सध्या प्रचंड (ऐतिहासिक, न भूतो…, लय बेक्कार वगैरे वगैरे) दुष्काळ पडला आहे आणि त्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत हे प्रसारमाध्यमांतून आतापर्यंत आपल्याला समजले असेल; २०१२ साली सुरु झालेल्या दुष्काळाचे हे सलग चौथे वर्ष आहे. अमेरिकेची सुमारे १२% लोकसंख्या इथे राहते आणि एकून उत्पन्नापैकी २०% उत्पन्न इथून येते (सुमारे २ ट्रीलियन डॉलर). (अवांतर: कॅलिफोर्नियाची अर्थव्यवस्था इतकी मोठी आहे कि जर तिचा स्वतंत्रपणे विचार केला तर ती जगात ७व्या क्रमांकावर येते.) त्यामुळे इथल्या घडामोडी देशाच्याच दृष्टीने एक चिंतेचा विषय असतो. असो. तर, २०१३ पर्यंतचा दोन वर्षांचा दुष्काळ मी तरी फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम म्हणून सोडून दिला होता. काय तर म्हणे दुष्काळामुळे लॉनला आठवड्यातून तीनच वेळा पाणी घाला पण सक्ती नाही कशाचीच वगैरे. २०१४ मध्ये त्याची तीव्रता लक्षात येऊ लागली. त्या वर्षी सेन्ट्रल व्हेली मधील काही छोटी शहरे वगळता इतर कुठे पाणीकपात करावी लागली नव्हती. पण दुष्काळाच्या सलग चौथ्या वर्षामुळे मात्र आता सगळ्यांनाच याच्या झळा बसणार आहेत याची जाणीव झाली. सर्वात मोठा परिणाम अर्थात शेतीवर झालेला आहे. शेतकी उत्पन्न २०१४ मध्ये ४% घटले होते (उत्पादन जास्तच घटले होते) आणि २०१५ मध्ये त्यात आणखी घट होणार हे निश्चित आहे. अमेरिकेत वापरला जाणारा ५०% पेक्षा अधिक फ्रेश प्रोड्यूस (भाजीपाला, फळे, दूध, मांस इ.) हा एकट्या कॅलिफोर्निया मध्ये उत्पादित होतो. त्यामुळे अमेरिकेतील अन्नपदार्थाच्या किमतीवर या दुष्काळाचा परिणाम येत्या वर्षात होणारच आहे.

गेली ३ वर्षे काही ठोस कारवाई करण्यास कचणारया राज्य सरकारला अखेरीस गेल्या आठवड्यात जाग आली आणि गवर्नर जेरी ब्राऊन यांनी तातडीने घरगुती (शहरी उद्योग आणि हॉटेल इ. सहित) पाणीपुरवठ्यामध्ये २५% कपातीचे आदेश दिले. ब्राऊनसाहेब शेतीच्या पाणीपुरवठ्याबाबतचा निर्णय काही आठवड्यांनी घेणार आहेत म्हणे. गंमत म्हणजे, राज्यातील एकून पाणी वापराच्या ८०% पाणी शेतीलाच वापरले जाते घरगुती वापरासाठी सुमारे २०% पाणी वापरले जाते. त्यामुळे, शेतीच्या पाणीपुरवठ्याचा निर्णय खर्या अर्थाने महत्वाचा. आधीच गेल्या तीन वर्षात अनेक शेतकर्यांचे आणि शेतमजुरांचे कंबरडे मोडलेले आहे. त्यात कॅलिफोर्निया मधील पाणी हक्क (water rights) हे कायदेशीरदृष्ट्या अत्यंत जटील प्रकरण आहे. त्यातील अनेक लढाया अनेक वर्षांपासून अनेक कोर्टात (सुप्रीम कोर्टासकट) अव्याहतपणे चालू आहेत. त्याचबरोबर, लॉबिंग ग्रुप्समुळे शेतीसाठीचे पाणी हा एक चांगलाच राजकीय फोडणीचा विषय आहे. बघूया ब्राऊनसाहेब काय ठरवतायात ते. असो.

तर आता घरगुती वापराबद्दल. या २०% पैकी १४% पाणी हे एकट्या लॉस एंजिलीस शहर व उपनगरात वापरले जाते, ४% हे सॅन फ्रान्सिको बे एरियात तर उरलेल्या राज्यात फक्त २%च पाणी वापरले आते. गंमत अशी की लॉस एंजिलीस जवळ एकही मोठा पाणीपुरवठ्याचा स्त्रोत नाही. त्यामुळे तिथे लागणारे पाणी हे राज्याचा उत्तर भागातून पंप करून सुमारे ४०० मैल वाहून नेले जाते ! याला अर्थातच प्रचंड प्रमाणात उर्जा लागते - कॅलिफोर्नियाच्या एकून वीज वापरापैकी सुमारे २०% वीज ही फक्त पाणी लॉस एंजिलीसला वाहून नेण्यासाठी वापरली जाते (दरवर्षी सुमारे १०,००० मिलिअन युनिट्स = महाराष्ट्रातील १ कोटी घरे मिळून दरवर्षी जेव्हढी वीज वापरतात).

कॅलिफोर्नियाच्या पाण्याचे स्त्रोत म्हणजे पाउस आणि वितळणारा बर्फ़ - दोन्ही पडतात नोव्हेंबर ते मार्च दरम्यान. गेली ४ वर्ष पाउस कमी पडतोय आणि २ वर्ष बर्फ.गंमत म्हणजे अमेरिकेतल्या अनेक राज्यांमध्ये यंदा प्रचंड थंडी आणि बर्फ झाला (चुकीच्या किनाऱ्यावर अजूनही चालूच आहे :)) पण कॅलिफोर्निया मात्र कोरडाच राहिला. त्याची शेजारी राज्येदेखील (ओरेगन, नेवाडा - तसेही वाळवंटच आहे, Arizona इ.) थोडीफार कोरडी आहेत पण त्याची बरीच तीव्रता कमी आहे. ह्याला ग्लोबल वॉर्मिंग कारणीभूत की एल-निनो सिस्टीम याबाबत अजूनही संभ्रम आहे. ते काही असलं तरी ग्लोबल वॉर्मिंग मुळे या दुष्काळाची तीव्रता नक्कीच वाढली / वाढणार आहे. म्हणजे कसं हे थोडक्यात: जो स्नो फॉल (हिमवर्षाव) डोंगरांवर साठून राहतो त्याला स्नो पॅक म्हणतात. हा स्नो पॅकच उन्हाळ्यात वितळून नद्या आणि धरणामध्ये येतो. चांगला स्नो पॅक होण्यासाठी स्नो फॉल होण्यापूर्वी जमीन चांगली गोठून टणक होणे आवश्यक असते. म्हणजे बिलो फ्रीझिंग तापमान अनेक दिवस राहणे इ. जर जमीन टणक नसेल तर चांगला स्नो पॅक तयार होऊ शकत नाही. या वर्षी सरासरीच्या २५-३०% बर्फ पडूनही स्नो पॅक हा सरासरीच्या फक्त ८% च आहे. ग्लोबल वॉर्मिंग मुळे २०१४-१५ चा हिवाळा हा कॅलिफोर्नियामधील सर्वात उष्ण हिवाळा होता (warmest winter so far). किंबहुना, गेल्या १० वर्षात तापमानाचे अनेक उच्चांक सातत्याने मोडले गेले आहेत. तसेच उन्हाळ्यातील तापमानही वाढतच आहे - म्हणजे पाण्याची मागणीही वाढणार (त्याच प्रमाणात नाही, पण वाढणार). तसेच हायड्रो पॉवर जनरेशन कमी पण विजेची (एसी इ.) मागणी जास्त.

एक गोष्ट आहेच की या दुष्काळाची आणि भारतातील दुष्काळाची तुलनाच होऊ शकत नाही. कॅलिफोर्नियाचा घरगुती पाणीवापर सुमारे ५००-६०० लिटर प्रति माणशी प्रति दिन आहे; भारतात हा आकडा १००-१५० आहे (अनेक भागात याहूनही प्रचंड कमी). त्यामुळे २५% कपातीने कॅलिफोर्नियात काही जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही हे निश्चित. तसेच कॅलिफोर्निया मध्ये ग्राउंड वॉटर मुबलक असल्याने लोक बोअर / विहिरी खणून पाण्याची गरज भागवू शकतात आणि भागवतही आहेत. पण त्यालाही मर्यादा आहेत. ग्राउंड वॉटर टेबल गेल्या काही वर्षात घसरत आहे आणि पाणी हे एक सामुदायिक संसाधन आहे; एका माणसाने जर ते जास्त उपसले तर दुसऱ्या माणसाला ते कमी मिळेल.

आता यावर अनेक उपाय सुचवले गेले आहेत - पाणीकपात, पाणीबचत, कार्यक्षमता सुधारणा, पाण्याची किंमत वाढविणे (माझ्या मते सर्वात योग्य) वगैरे. नजीकच्या काळासाठी याहून अधिक फारसे पर्यायही नाहीत. पण दूरगामी दृष्टीकोनातून "नैसर्गिक संसाधने अमर्यादित आहेत" या गृहितकावर आधारलेले limitless growth हे विकासाचे प्रतिमान तपासण्याची अमेरिकेला आणि भारतासारख्या विकसनशील देशांनाही संधी आहे. त्याचबरोबर, यापुढील काळात अशा संकटाना सामोरं जाण्यासाठी आपण तयारच रहायला हवं. किंबहुना, ग्लोबल वार्मिंगमुळे त्यांची तीव्रता वाढणारच आहे (भारतात तर प्रकर्षाने - उदा. अनियमित मॉन्सून, हिमालयन ग्लेशिअल मेल्ट ई.).

या बाबतीत आपली काय मते आहेत, अनुभव काय आहेत, आणि भारतासारख्या देशाला काही शिकण्याजोगे आहे काय याची चर्चा करण्याकरता हा धागा काढला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रीबौंड इफेक्टमुळे कन्झम्प्शन वाढतं म्हणजे त्या वस्तूचं कन्झम्प्शन वाढतं - उर्जा वापर वाढतो असे नव्हे. एनर्जी एफिशियन्सी वाढल्याने उर्जा वापर (आणि म्हणूनच ग्रीनहाउस एमिशन्स) कमीच होतो. >> ओह निकित, मला हे माहित नव्हते. मी वाचलेले त्याप्रमाणे हा ईफेक्ट निगेटिव्ह असतो त्यामूळे जवळजवळ १००% नुकसान होते वगैरे. अर्थात माझी माहिती ही नुसती वाचलेली आहे, ह्याउलट तू ह्यात काम किंवा अभ्यास करतोयस त्यामूळे तू लिहिलेले अचूक असणार. हि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

जिज्ञासा वॉलमार्टचा उल्लेख तुझ्या 'तिथले लोक शोधतील काहितरी उपाय' ह्या विधानासंबंधी होता. (ref : economic viability). किती जणांना $२५ चे शर्ट्स घरगुती वापरसाठी पुरतील वगैरे वगैरे. टी शर्टचा मुख्य इंपॅक्ट तो बनवण्यासाठी (कच्चा माल धरून ) लागणार्‍या पाण्याचा असतो असे मला वाटते. लोकल असो वा बाहेरचा त्यात फरक पडत नाही असे मला वाटते. तो कुठून घेतो ह्यापेक्षा किती दिवस तो वापरतो किंवा किती अधिक प्रमाणात रीयुज करतो हा भाग अधिक मह्त्वाचा ठरतो असे मला वाटत होते. कदाचित हे चुकीचे असेल पण फक्त स्वस्त आहे म्हणून अधिक घेतले जातात म्हणून अधिक इंपॅक्ट होतो असे म्हणायचे आहे का ?

ग्लोबल वॉर्मिग वरचा उपाय म्हणुन शोधलेल्या कार्बन क्रेडीट बद्द्ल अजुन कोणी काहीच लिहील नाही.

प्रगत देशातिल ग्रीन हाउस गॅसेस चा बॅलन्स साधेण्या साठी कमी प्रगत देशात नविन तंत्रज्ञान वापरुन उर्जा निर्माण करायची ज्या योगे एमिशन कमी करुन .बॅलंस साधता येइल. या साठी प्रगत राष्ट्रांनी तंत्रज्ञान आणि आर्थिक मदत कमी प्रगत देशांना देवु करायची. असे प्रॉजेक्ट पूर्ण केल्यावर कार्बन क्रेडीत त्या देशाला मिळत असे. जर एखाद्या प्रगत राष्ट्राला आपल्या ग्रीन हाउस गॅसच्या एमिशन चे टारगेट पूर्ण करता आले नाही तर त्यांनी पैसे देउन कमी एमिशन करणार्‍या देशाकडुन ते विकत घ्यायचे.

२००७-०८ मधे हा प्रकार जोरात चालु होत.भारतात उत्तरांचल मधे अनेक हायडल पॉवर प्रॉजेक्ट उभे राहुन अनेक उद्योग समुहांनी कार्बन क्रेडीट मिळवण्याचा प्रयत्न केला होता.

पुढे उत्तरांचल मधे ढग्फ़ूटी होवुन पूर आल्यवर हेच प्रॉजेक्ट कसे जंगल तोड करुन केलेले पर्यावर्णाला घातक ठरले आहेत यावर चरचा चालु होती.

वाचतेय. चांगली चर्चा चालू आहे.

गरज , हौस आणि हव्यास ह्या मधल्या सीमारेषा फार धूसर असतात आणि सुबत्तेच्या भांडवलावर अनेक उच्चशिक्षित लोकंही त्या फार नकळत ओलांडताना दिसतात !>>
+१

गरज , हौस आणि हव्यास ह्या मधल्या सीमारेषा फार धूसर असतात आणि सुबत्तेच्या भांडवलावर अनेक उच्चशिक्षित लोकंही त्या फार नकळत ओलांडताना दिसतात !>>

हे खूप जबरी आणि अचूक निरिक्षण आहे
ह्या वाक्यासाठी रार तुला हजार देवराया ईनाम Happy

छान चर्चा.

बी ने जो शाकाहाराचा मुद्दा लिहिला होता, त्यासंबंधात होम या चित्रपटात काही माहिती होती. पेटाच्या वेबसाईटवर पण आहे हे.

http://www.peta.org/issues/animals-used-for-food/meat-wastes-natural-res...

तरीही, प्लीज चर्चा हा मुद्द्याकडे(च) वळवू नका. प्लीज.

कार्बन ट्रेडिंग चा मुद्दा मांडल्याबद्दल धन्यवाद. ती एक इकॉनॉमिकाली एफिशियंट पद्धत आहे आणि अनेक देशांत कार्बन ट्रेडिंग (आणि इतर एमिशन्स ट्रेडिंग) ठीक पद्धतीने सुरु आहेत/होती. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर (क्योटो प्रोटोकॉल मधील क्लीन डेव्हलपमेन्ट मेक्यानिझम) मात्र मॉनितरिंगच्या वाजलेल्या बोर्यामुळे तिचा गंडेश खन्ना झाला आहे. एमिशन्स खरच कमी करण्यात त्याचा काय वाटा हा एक संशोधनाचाच विषय आहे. भारत, चीन सगळीकडे तीच गत आहे.

दिनेशदा तुमचा मुद्दा अतिशयच रास्त आहे. जगाच्या एकून ग्रीनहाउस एमिशन्स पैकी सुमारे ३३% ही आपण काय खातो याच्याशी निगडीत असतात.हा आकडा थक्क करणारा आहे. आपण जे अन्न खातो ते कसं पिकतं, मांसाहार करत असू तर जनावरांना कसं वाढवलं जातं, ते आपल्यापर्यंत कसं पोचतं आणि या सगळ्याची पर्यावरणीय किंमत किती असे खूपच महत्वाचे मुद्दे आपण स्वतःच तपासून पहिले पाहिजेत. आपल्या अन्नाची तुलनात्मक कार्बन फूटप्रिंट इथे पाहता येईल. उदा: बीफ ची कार्बन फूटप्रिंट भाज्यांपेक्षा ६ पटीने जास्त आहे. चिकनची साधारण दीड ते दोन पट आहे. (**ही सरासरी आहे - डीस्ट्रीब्युशन दोन्ही बाजूला असणार आहे**). कार्बन फूटप्रिंट बरोबरच इतर इकोलॉजिकल नुकसानही आहेच. आणि तुम्ही दिलेल्या पेटाच्या लिंकमध्ये याचा उल्लेख आहेच. त्यामुळेच बाय लोकल. बाय नेटीव. बाय सिझनल. बाय organic/cage free etc.

असामी,
टी शर्टचा मुख्य इंपॅक्ट तो बनवण्यासाठी (कच्चा माल धरून ) लागणार्‍या पाण्याचा असतो असे मला वाटते. लोकल असो वा बाहेरचा त्यात फरक पडत नाही असे मला वाटते. तो कुठून घेतो ह्यापेक्षा किती दिवस तो वापरतो किंवा किती अधिक प्रमाणात रीयुज करतो हा भाग अधिक मह्त्वाचा ठरतो असे मला वाटत होते. कदाचित हे चुकीचे असेल पण फक्त स्वस्त आहे म्हणून अधिक घेतले जातात म्हणून अधिक इंपॅक्ट होतो असे म्हणायचे आहे का ?>> शर्ट कुठून येतो हे देखिल महत्वाचे नाही का? कंबोडियाहून न्यूयॉर्कला शर्ट आणणे आणि न्यू जर्सी हून न्यूयॉर्कला शर्ट आणणे ह्यात कोणत्या पर्यायाला अधिक इंधन उर्जा आणि इतर रिसोर्सेस लागतील? कशाची पर्यावरणीय किंमत जास्ती असेल? शिवाय स्वस्त असल्याने अधिक घेतले जाण्याचा संभव आहेच (impulsive buying). आता सद्य अर्थव्यवस्थेत न्यू जर्सी ला शर्ट बनणे शक्य नाही पण किमान शर्टस् ची गरज नसताना खरेदी होऊ नये हे शक्य आहे. शर्ट बनवूच नका असं म्हणणं ही शक्य नाही पण गरज कमी (किंवा नेमकी) झाल्यास कमी शर्ट बनतील!

युरो, हे कार्बन क्रेडीट अजूनही चालू आहे का?
दिनेशदा, सुमुक्ता, चांगली माहिती आहे तुम्ही दिलेल्या लिंक वर
निकित, बाय लोकल. बाय नेटीव. बाय सिझनल. बाय organic/cage free etc.>> अगदी अगदी!

मध्यंतरी मी अमेरीकेतल्या सिझनल फळांची / भाज्यांची यादी शोधायचा प्रयत्न केला होता. नीट माहिती सापडली नाही आणि मी पण फार खोलात जाऊन शोधली नाही. हल्ली स्ट्रॉबेरी, चेरी वगैरे सारखी फळं वर्षभर मिळतात. स्ट्रॉबेरीच्या पाकिटांवर प्रॉडक्ट ऑफ चिले लिहिलेलं असतं. स्ट्रॉबेरीचा सिझन स्प्रिंगमध्ये हे माहित होतं त्यामुळे अवेळी स्ट्रॉबेरी घेतली नाही कधी. पण बाकी फळ / भाज्यांबाबत नक्की माहित नाही (ह्यात इथे मिळणार्‍या भारतीय भाज्याही आल्या). तर अशी यादी कुठे आहे का?

हे कार्बन क्रेडीट अजूनही चालू आहे का? >> अनेक देशात देशांतर्गत चालू आहे. उदा. अमेरिका, युरोप (टेक्निकली international), ऑस्ट्रेलिया, जपान ई. International ट्रेडिंगदेखील (क्योटो प्रोटोकॉलमधील Clean Development Mechanism) चालु आहे पण त्यात २०१२ नंतर फारशी वाढ नाही. पण २०१२ पूर्वीचेही बरेचसे प्रोजेक्ट्स जरा गमतीशीरच होते.

पराग: अमेरिकेमधील सिझनल फळे आणि भाज्या यांची सरकारी लिस्ट इथे मिळेल. दुसऱ्या धाग्यावरही पोस्ट करतो.

निकीत.. माझ्या पण मनात रॉकी माउंटनचा विचार आला त्या प्रॉजेक्टचे ऐकुन पण म्हटले या अमेरिकन लोकांच काय सांगाव.. पॅनामा कॅनाल सारखा प्रॉजेक्ट ते १०० वर्षापुर्वी यशस्वी करु शकतात.. चंद्रावर ५० वर्षापुर्वी यशस्वी रित्या जाउन परत येउ शकतात.. तर आज २०१५ मधे ते हाही प्रॉजेक्ट मनात आणल तर यशस्वी करु शकतील.. मला वाट्त टेक्नॉलॉजी हिंडरंस पेक्षा फक्त सध्याच्या इकॉनॉमीमधे अश्या प्रॉजेक्टला लागणारा अमाप पैसा फायनांस कोण करणार हा जास्त महत्वाचा मुद्दा असेल. कारण २०१० मधे मिझुरी नदीचे पाणी डेनव्हर पर्यंत नेण्याच्या प्रॉजेक्टचा विचार चालु असताना तो कसा फिजिबल नाही त्यात मिझुरी नदीत त्याकरता लागणारे जास्तीचे पाणी नाही याबरोबर त्याला लागणारा १८ बिलिअन डॉलरचा प्राइस टॅग हा जास्त अडसराचा ठरला. असो.

अवांतर मोड ऑन...

" जिज्ञासा.. तु जर हेन्री थोरोचे वॉल्डेन वाचले असशील(ते तु वाचले असशीलच याची मला तुझे विचार वाचुन दाट शंका आहे :)) तर तुला कळुन आले असेल की ते लिहीण्यामागे जरी त्याची मिनिमलीस्ट थिअरी व नेचरवर असलेली श्रद्धा अजमावुन बघण्याची जिज्ञासा( नो पन इंटेंडेड!:) ) कारणीभुत असली तरी तसे मिनिमलिस्ट राहुन नेचरशी एकरुप राहु शकु की नाही याबाबतीत तो (व त्याचा फिलोसॉफिकल गुरु राल्फ वाल्डो इमर्सनसुद्धा) २ वर्षे लेक वॉल्डेनवर राहुनही.. १५० वर्षापुर्वीच्या अमेरिकेत.. शेवटपर्यंत शाशंकच होता. मग तर आज आपण त्याच्या काळच्या १५० वर्षाच्या पुढच्या अश्या प्रगत अमेरिकेत राहुन त्याच्या फिलॉसॉफीशी प्रतारणा न करता नेचरशी तसे एकरुप राहु शकु का हा मोठा कठीण व गहन प्रश्न आहे. माझ्या द्रुष्टीकोनातुन आजच्या टेक्नॉलॉजिकली अ‍ॅड्व्हान्स अमेरिकेत राहुन आपण चंगळवाद अवलंबायचा का नाही हा प्रश्न नसुन इंडस्ट्रिअल रेव्होल्युशन पासुन सुरु झालेले हे जे चक्र आहे त्या चक्राचा संवेग्(मोमेंटम) कमी करायचा किंवा ते चक्र आता उलट्या दिशेने करु शकु का हा आहे आणी ती बाब अशक्यप्राय आहे.. बिकॉज जिनी इज आउट ऑफ द बॉटल! मग त्या अनुषंगाने आलेल्या चांगल्या व वाइट अश्या सगळ्याच परिणांमाना आता आपल्याला सामोरे जावे लागणार आहे व टे़क्नॉलॉजीचाच वापर करुन अन इंटेडेड वाइट परिणामांना मिनिमाइज कसे करत येइल हेच आता आपल्याला बघावे लागणार आहे..म्हणतात ना काट्याने काटा काढायचा.. तसच काहीतरी.

आणी चंगळवादाची व्याख्या व्यक्तीसापेक्ष व देशसापेक्ष असु शकते. वर रारने अतिशय सुरेख शब्दात म्हटले आहे ना की.... " गरज , हौस आणि हव्यास ह्या मधल्या सीमारेषा फार धूसर असतात आणि सुबत्तेच्या भांडवलावर अनेक उच्चशिक्षित लोकंही त्या फार नकळत ओलांडताना दिसतात !" या तिच्या क्योटला तर सुवर्णाक्षरांनी कोरले पाहीजे... "

... अवांतर मोड ऑफ!

एका देशातला शेतमाल दुसर्‍या देशात जाणे हि मला वाटतं आजची गरज आहे. ( कदाचित बाजारने निर्माण केलेली आहे ) दोन्ही गोलार्धात उलट ऋतू असतात. त्यामूळे वर्षभर फळे पिकतच असतात. सफरचंद हे काही सिझनल फळ राहिलेले नाही आता.
दुबई आणि इतर आखाती भागात तर काहीच पिकत नाही, पण वर्षभर ताजी फळे तिथे उपलब्ध असतात. वाहतूक खर्च लक्षात घेऊनच त्याच्या किमती ठरतात.

याबाबतीत काही मुद्दे आहेत. काही देशात नैसर्गिक रित्याच या फळांचे अमाप उत्पादन होते. स्थानिक बाजारात किम्मत मिळत नाही. पण त्याला परदेशी बाजारपेठ मिळाली तर उत्पादक देशाचा फायदा होतो. भारतातही अनेक देशांतून फळे येतात.

ताजी फळे न विकता, काही प्रमाणात प्रोसेसिंग केले तर वाहतूक खर्च वाचेलही. ( म्हणजे वातानुकुलित कंटेनर्स व विमानानेच वाहतूक गरजेची राहणार नाही. ) प्रोसेसिंग मधे फुकट उपलब्ध असलेली आणि एरवी वाया जाणारी सोलर पॉवर वापरता येईल.

मला स्वतःला का कुणास ठाऊक, असे सारखे वाटत राहते कि आता एवढ्यातच एखादा महत्वाचा शोध लागून, या सोलर पॉवरचा उपयोग करण्याचा सुकर मार्ग उपलब्ध होईल.

मांसाहाराच्या बाबतीत, मी स्वतः क्रूरता हा निकष फारसा महत्वाचा मानत नाही. फारसे कृत्रिम अन्न न देता, नैसर्गिक खाद्य खात, नैसर्गिक वेगात अनेक प्राणी वाढतात / वाढवले जातात. घरगुति स्तरावर पशुपालन अनेक आशियायी देशात रुढ आहे.

पण जवळजवळ यांत्रिक पद्धतीने, अमाप पैदास जी केली जाते, त्यासाठीच भरमसाठ धान्य व पाणी वगैरे वापरले जाते, असे मला वाटते.

अनेक टिव्ही शो वर बर्गर वगैरे खाताना दाखवतात, ते बर्गर ( आणि खुपदा ती खाणारी व्यक्तीही ) "अमानवीय" आकाराच्या असतात. असा हव्यास ( हावरेपणा ) टाळायला हवा.

शर्ट कुठून येतो हे देखिल महत्वाचे नाही का? कंबोडियाहून न्यूयॉर्कला शर्ट आणणे आणि न्यू जर्सी हून न्यूयॉर्कला शर्ट आणणे ह्यात कोणत्या पर्यायाला अधिक इंधन उर्जा आणि इतर रिसोर्सेस लागतील? कशाची पर्यावरणीय किंमत जास्ती असेल? >> हे काढणे वाटते तेव्हढे सोपे नाहिये. इथे ग्रुहितक हे आहे कि लोकल कंपनी नि वॉलमारट्सारखी प्रचंड मोठी कंपनी एकाच वॉल्युमचे ट्रांस्पोर्ट करत आहे. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. तू मल्टीनॅशनल कंपनींच्या ट्रान्स्पोर्ट वरून लक्षात येईल कि अति प्रचंड वॉल्युम इज द की. तसेच ह्या बर्‍याच कंपनींनी pallets per trailer and better managing our route वापरून transportation costs खूप कमी केल्या असे बरेच रिपोर्ट्स मधे वाचलेले होते. (I think most famous article was why UPS or Fedex does not want to take left turns) त्यामूळे तो शर्ट अतिशय कमी किमतीमधे ठेवणे शक्य होते (अर्थात त्यात त्यांनी अजून कमी करून प्रतिस्पर्शी उडवले नसतील असे जरुरी नाह) . ह्याउलट impulsive buying टाळण्याबाबत अनुमोदन. मला वाटते तो प्रकार नि बिंज शॉपिंग हा जास्त धोकादायक प्रकार आहे. ह्या दोन गोष्टि तशाच राहिल्या तर लोकल काय किंवा मॅद इन कंबोडिया काय दोन्ही प्रकार तितकेच घातक राहतील.

उशीरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व.
मुकुंद: माहितीबद्दल धन्यवाद. मिडवेस्ट मधील पाणी खरच जर त्यांनी रॉकी फोडून कॅलिफोर्निया मध्ये आणलं तर अवघड आहे. पण तुम्ही म्हणता तशी अवाढव्य किंमत बघता अवघडच आहे. त्यात अशा प्रोजेक्टसचा टाइम आणि कॉस्ट ओव्हररन प्रचंड असतो (विकसित देशांतसुद्धा).

अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे कॅलिफोर्निया मध्ये अखेरीस अमेरिकेमधील सर्वात मोठा desalination plant उभा राहत आहे. सॅन डिएगो येथे ४०० दशलक्ष लिटर प्रति दिन क्षमतेचा प्रकल्प नोव्हेंबर २०१५ पर्यंत सुरु होइल. इतरही अनेक प्रकल्प प्रस्तावित आहे तर काही आधीच सुरु होऊन बंद देखील पडले आहेत. सर्वसाधारणपणे desalination plant चा वीज वापर सुमारे २ युनिट्स (किलोवॉटआवर्स) प्रति १००० लिटर इतका असतो. म्हणजे एका घराला जेमतेम एक दिवस पुरेल इतके पाणी मिळविण्यासाठी वीजेची २ युनिट्स खर्च होणार. घरापर्यंत पाणीपुरवठ्यासाठीची उर्जा अर्थातच वेगळी. विरोधाभास असा की ग्लोबल वॉर्मिंग मुळे कॅलिफोर्नियामधील दुष्काळाची तीव्रता अनेक पटीने वाढली; आणि त्यावरच्या ह्या उपायाच्या उर्जा वापरामुळे ग्लोबल वॉर्मिंगला अजूनच हातभार लागणार आहे !

अवांतर:
पृथ्वीवर खरेच किती रिसोर्सेस उपलब्ध आहेत याचा विचार करता आत्ताचा आपला लिमिटलेस ग्रोथ असणारा विकास किती दिवस शक्य आहे यावर अनेकांनी ४०-५० वर्षांपूर्वीच विचार करायला सुरुवात केली होती. एमआयटी (नाही, पुण्याचे नाही.) मधील काही संशोधकांनी १९७० साली असं दाखवलं कि एकविसाव्या शतकाच्या मध्यापर्यंतदेखील आपण "विकास" साधू शकणार नाही. त्यावरचं "लिमिट्स टू ग्रोथ" हे पुस्तक जरूर वाचा.

>>>> लिमिटलेस ग्रोथ असणारा विकास किती दिवस शक्य आहे यावर अनेकांनी ४०-५० वर्षांपूर्वीच विचार करायला सुरुवात केली होती >>>>
काही वर्षापूर्वी वाचलेले पुस्तक आठवते.
Small Is Beautiful: A Study of Economics As If People Mattered - collection of essays by British economist E. F. Schumacher
First published in 1973, Small Is Beautiful brought Schumacher's critiques of Western economics to a wider audience during the 1973 energy crisis and emergence of globalization. Natural resources (like fossil fuels), are treated as expendable income, when in fact they should be treated as capital, since they are not renewable, and thus subject to eventual depletion.

खूप छान पुस्तक आहे. पूर्वी स्वत:च्या गाडीने फिरण्यात मला मजा वाटायची. सुट्टीच्या दिवशी गाडीने फिरताना कसलाही किंतु वाटायचा नाही. पण हे पुस्तक वाचल्यावर का कोण जाने ते फोल वाटायला लागले. म्हणजे अजूनही तसं फिरण्यातली मजा कमी आहे असे वाटत नाही पण ती मजा उपभोगताना मनाच्या एका कोपर्यात महागडे पेट्रोल वापरले जाते आहे हे पण येत राहते. गेल्या काही वर्षात नकळत खाजगी वाहन, रिक्षा वापरणे कमी होत गेले. मुंबईत उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्याने हे सोपे आहे. इतरत्र तसे असेलच असे नाही.

लिमिट्स तो ग्रोथ.. बाबतीत मला असं वाटतं कि हा शेवट जसजसा जवळ येईल, तसतसा नव्या शोधांचा स्त्रोत सुरु होईल. अजूनही आपण सूर्य आणि समुद्र यांचा पुरेसा उपयोग करून घेत नाही.

निकीत.. आजच बातमी वाचली.

विल्यम शॅटनरचा(स्टार ट्रेक फेम कॅप्टन कर्क!) ३२ बिलिअन्स डॉलर्स उभे करायचा मनसुबा आहे.. तो म्हणतो की वॉशिंग्टन स्टेटमधले (बहुतेक कोलंबिया रिव्हर व कॅस्केड माउंटन मधुन)जे जास्तीचे पाणी आहे ते कॅलिफोर्नियात व थेट लेक मिडपर्यंत.. पाइपलाइनने आणायचे! कारण असाच जर दुष्काळ अजुन १-२ वर्षे चालला तर कॅलिफोर्नियाच्या भिमकाय इकॉनॉमीचे व तिथल्या लोकांचे धाबे दणाणुन जाइल व ते संपुर्ण अमेरिकेला घातक ठरु शकेल.

तो म्हणतो अलास्का पाइपलाइनने जर आपण अलास्काहुन तेल आणू शकतो तर वॉशिंग्टनहुन... इंटरस्टेट हायवे ५ च्या बाजुबाजुने.. कॅलिफोर्नियात पाणी का नाही आणु शकणार?

हे म्हणजे (मॉडर्न डे) विल्यम मुलहॉलंड सारख्या अभियंत्याचे काम आहे..(प्रोव्हायडेड ही हॅज द मनी!)

दरम्यान.. कॅलिफोर्निया सेंट्रल व्हॅली मधल्या बागाइती शेतकर्यांच्या.. ज्युनिअर राइट्सप्रमाणे.. सिनिअर राइट्सप्रमाणे व सेल्फ रिपोर्टिंग ऑनर सिस्टिंमने.. कोणता शेतकरी किती पाणी ऊपसतो आहे.. याबाबतीतल्या (गेली १०० वर्षे चाललेल्या) वादाला या महिन्यात.. या पाणी टंचाईच्या पार्श्वभुमीवर.. पुन्हा एकदा उकळी फुटली आहे.

मुकुंद, माहितीबद्दल धन्यवाद.

गेल्या आठवड्यात कॅलिफोर्नियात दुष्काळासाठी एक चांगलीच डिप्रेसिंग घटना घडली आहे.
सदर्न कॅलिफोर्निया मधल्या San Juan Capistrano शहराने पाण्याच्या किमती टियर्ड केल्या (जास्त पाणी वापरणाऱ्या लोकाना जास्त किंमत). पण नुकत्याच कोर्टाने हे प्रायसिंग स्ट्रक्चर बेकायदेशीर ठरवलं आहे. त्यामुळे किमती वाढवून पाण्याची बचत आता करता येणार नाही. वरच्या कोर्टात याला आव्हान देतीलच पण तोपर्यंत संपूर्ण राज्यातच या निर्णयाची रिपर्कशन्स जाणवतील असे वाटते.

याआधी नोव्हेंबर २०१४ मध्येच कॅलिफोर्नियाने पाण्याचे इन्फ्रास्ट्रकचर सुधारण्यासाठी ७ अब्ज डॉलरचा बॉन्ड जाहीर केला. यातला निम्म्याहून अधिक खर्च नवीन धरणे ई बांधण्याकरिता वापरला जाणार आहे ! आहे ते पाणी अधिक कार्यक्षमरित्या कसे वापरले जाइल हे न पाहता अजून नवीन इन्फ्रास्ट्रकचर बांधणे म्हणजे अकार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यासारखेच आहे.

अजून एक गंमतशीर गोष्ट: Nestle कंपनी (Arrowhead) सदर्न कॅलिफोर्नियामधल्या San Bernardino National Forest मधील पाणी त्यांच्या बॉटल्ड पाण्याकरिता वापरते (१०० वर्ष जुने परमिट आहे त्यामुळे सर्व कायदेशीर आहे पण Nestle पाण्यासाठी जी किंमत मोजते ती अत्यल्प आहे). राज्यात पाणी नसताना एका खाजगी कंपनीला बॉटलिंग करून विकायला ते पाणी द्यावे का असा एथिकल प्रश्न आहे. प्रत्येकाचे उत्तर वेगळे असू शकते.

आजची बातमी: पाण्याचा वापर दिवसेंदिवस कमी कमी होत असल्याने दरवर्षी पाण्याचा दर ६.५% इतक्या जास्त दराने वाढवूनही आमच्या शहराला पाणी आणि मलनिःसारण सुविधा देणं परवडत नाहीये. म्हणून फिक्स्ड चार्ज (जो पाणी वापरलं नाही तरी भरावा लागेल) लावा असा लकडा सिटीचा स्टाफ नगरसेवकांकडे लावतंय.
इकडे पाणी अगदी मुबलक आहे, कुठलही दुर्भिक्ष नाही.
http://www.cbc.ca/news/canada/ottawa/water-rate-charges-need-overhaul-sa...
थोडक्यात पाणी कमी वापरायला केवळ आणि केवळ पर्यावरण वाचवा हा स्वच्छ, उदात्त, निर्मळ दृष्टीकोन ठेवा, बिल कमी कधीही होत नाही. Happy Light 1

अमितव: इंटेरेस्टिंग. फिक्स्ड चार्ज वाढविणे म्हणजे एका अर्थाने कमी पाणी वापरणार्‍यांची (पक्षी: लो इन्कम) क्रॉस सबसिडी कमी करणं. याबद्दल काही मुद्दे उठलेत हा तिकडे ?

अमेरिकेतील मोठ्या शहरांमध्ये पाण्याचे रेट किती आणि २०१० पासून ते कसे वाढले याचे चार्ट्स:
http://www.circleofblue.org/waternews/wp-content/uploads/2015/04/WaterPr...

http://www.circleofblue.org/waternews/wp-content/uploads/2015/04/WaterPr...

पाणीटंचाई असलेल्या काही भागात (उदा. फ्रेस्नो, एलए, सॅन होजे ई.) पाण्याचे रेट्स अत्यन्त कमी आहेत हे पहाणे रोचक.

हा २०१६ च्या बजेट दृष्टीने खडा टाकलाय, आता चर्चा सुरु होईल. बातमीत इव्हन, जास्त पाणी वापरलं तर कमी रेट असा प्रस्तावही असू शकतो असं म्हटलंय. अर्थात पाणी वाचवणारे पिनलाईज होतील हे ही बातमीत आहेच.
निकीत, पाणी वाचवणारे == लो इन्कम हे पटलं नाही. हे दोन सर्वस्वी भिन्न सेट आहेत ना?
रादर, लो इन्कम असणारे कम्युनिटी हौसिंग/ अपार्टमेंट मध्ये राहतात असं गृहीत धरलं (जे चूक असूच शकतं, पण एक ग्रोस जनरलायझेशन म्हणून धरून चालू) तर तेथे भाड्यात गरम पाणी, हिटिंग (अनेकदा) समाविष्ट असतं, हायड्रोचे चार्जेस वेगळे भरावे लागतात. (इकडे तरी अशी पद्धत आहे).

Pages