कायमच्या हरवलेल्या गोष्टी…

Submitted by Charudutt Ramti... on 5 April, 2015 - 05:21

कायमच्या हरवलेल्या गोष्टी…

परवा एक विनोद वाचायला मिळाला. वयात आलेल्या आपल्या लेकाला बाप म्हणतो “मला अस कळलय की तू आज काल ते काय ते ब्लॉगिंग वगरे करतोस म्हणे! मला ते काय आहे ते माहिती नाही, पण ते तू ताबडतोब बंद करावस हे बर...! "

तरुण पिढीत वाढलेला सोशल मीडीयाचा अनाठाई 'वावर' आणि मागच्या पिढीने, त्यांच्या वापरावर घालायचा 'आवर' या दोन्ही गोष्टी अगदी गंमतशीर होत चाललेल्या आहेत. फेसबूक, वॉटसॅप, ट्वीटर, लिंकडीन, आणि त्यावर चाललेले फॉलो, शेयर, लाइक, कॉमेंट ह्यान पिढी नुसती भारावून गेली आहे.

परवा असच एकान कुणीतरी माझ्या प्राथमिक शाळेचा ग्रूप व्हॉटसअप वर बनवला. आमची प्राथमिक शाळा म्हणजे बालवाडी ते चवथी. म्हणजे शाळा सोडून आता तब्बल अठठावीस वर्ष झालेली. डोक्यातल्या मेमरीकार्डावरचा आळसावलेला कर्सर अठठावीस वर्षांपूर्वी जायला एवढा सहजासहजी तयार होईना, आणि मग आठवडापन्ध्रा दिवस अक्षरशः धमाल उडाली. शाळेच्या हजेरी पटावरचे नाव आणि व्हॉटसअप च्या प्रोफाइल फोटो वरचा चेहरा, ह्यांची सांगड काही केल्या बसेना. जोड्या-जुळवा चा प्रश्नोतराचा तास सुरू झाला. मेंदूला अक्षरश: ‘दांडीवर वाळत घालण्यापूर्वी बॅनियन पिळावा ना !’ तस पिळल, तरी काही उपयोग होईना. फक्त हुशार हुशार मुल आणि गोड गोड गोर्या गोमट्या मुली डोळ्या समोर तरंगू लागल्या. पण त्या, एकोणीशसे सत्यांशी सालच्या. वीसशेपन्ध्रा च्या प्रोफाइल फोटो शी त्यांचा दुरानवयेही संदर्भ जुळेना.

मुल साधारण नऊ दहा वर्षाची असतील, प्राथमिक शाळा संपवून वेगवेगळ्या माध्यमिक शाळांत गेली तेंव्हा. खाकी हाफपॅंट पांढरा हाफशर्ट. (हाप-शर्ट) त्या शर्टाला दुसरा कोणताही रंग नव्हता म्हणून पांढरा रंग अस म्हणायच. प्रत्येक मुलाच्या घरच्या सांपत्तिक स्थिती वर आणि ते पोरग आईच कितव आहे? किंवा किती मायेच आहे? यावरून त्या पोराच्या शर्टाची 'इतनि सफ़ेदी' ठरायची. कुणाची आई नीळ घालून, कुणी निरम्यान पिवळसर केलेला, कुणी थोडे घरंदाज असतील क्वचित, तर चक्क इस्त्रि वगरे फिरवलेला. येताना सगळे पांढरे रंग दुपरच्या डब्याचा सुट्टी नंतर घरी जाईस्तोपर्यन्त मात्र एकाच रंगात मिसळून जायचे. सगळ्यांचा शर्ट सात आठ तासात मात्कट रंगात पूर्ण दिसेनासा झालेला असायचा. सोबतीला निळ्या शाईचे डाग. शाळेत येताना पांढर्या रंगाच्या वेगवेगळ्या स्तरातल्या छटा घेऊन येणारे पण, घरी जाताना मात्र एकच मात्कट रंग घेऊन जाणारे ते शर्ट, कोणत्या सोशल फॅब्रिकने विणले होते कोण जाणे?

मुलींची अवस्था मात्र किंचित निराळी. त्या पहिल्या पासून नाजूक नाजूक च राहायच्या. फुलपाखरान बागेत निर्व्याज पणे या फुलावरुन त्या फुलावर उडाव तश्या ह्या मुली. धसमुसळे पणा अगदी नखानखात. आपण मुली आहोत याची जाणीव असलेल्या आणि नसलेल्या पण. लन्गडी, दोरीउड्या, सेम-पिंच, तळहातावरची निळ्या बॉल्पेन-न काढलेली जॉली...डोक्यावरचा बो संभाळण्यात गुंग, रन्गबीरंगी हेअरपिना, कम्पासपेटीत ठेवलेल वासाच खोडरबर, अश्या नाजूक नाजूक हळूवार गोष्टीतच त्या रमून गेलेल्या असायच्या. कधी कधी तर स्वता:तच रमून जायच्या. बाईंनी दंडा वर चिमटा काढला की मग बेंबीच्या देठा पासून किंचाळायच्या, लगेच डोळ्यात पाणी. सगळा वर्ग मग मधल्या सुट्टी तिला चिडव चीडव चीडवणार. की मग पुन्हा एकदा पाणी!

आता फारस काही वाटणार नाही, पण तीसेक वर्षांपूर्वी को-एजुकेशन ही फार अप्रूपाची गोष्ट होती. हुजूरपागा वगेरे ठीक आहे, पण मिरजे सारख्या छोट्याश्याच गावात, एकाच बाकावर एक मुलगा आणि एक मुलगी हे तस पुरोगामीच. त्या अवखळ वयात याला को-एजुकेशन अस म्हणतात हेही माहिती नव्हते. मिरज म्हणजे एकतर गाणार्यांच गाव, नाहीतर एकदम कण्हणार्यांच. गाणारे दर्ग्यात....कण्हणारे मिशन हॉस्पिटल मधे. गावात जेम तेम तीनचार शाळा. त्यातली को-एजुकेशन पद्धत असलेली आमची शाळा एकमेव असावी बहुधा. निदान त्यावेळी तरी. गावच मुळी केवढ ते? सायकल वर टांग मारुन निघाल तर अक्ख्या गावाला फेरफटका मारुन माणूस धापा टाकत विसाव्या मिनिटात परत येईल. सायकलही भाड्यान मिळायची त्यावेळी, आताही मिळत असेल कदाचित पण नक्की माहिती नाही. त्यातल्या त्यात बानगूडे सायकल शॉप वाली बेस्ट, एकदम अर्जेंट ब्रेक. वीस मिनिटांचे दोनअडीच रुपये होत असावेत. तेही बरेच होते. शाळेला स्कूल बस वगरे फार फार लांबची गोष्ट. त्यावेळी टांगे असत मिरजेत. हा व्ययसाय बर्यापैकी नव्हे गॅरेंटेड मुसलमांनांकडे. मलमली अस्तर लावून शिवलेली पांढरी टोपी डोक्याला, दाढीला लालसर मेंदी, तोंडात पानाचा लाल कात, हातात चाबुक अश्या सुलेमानि अवतारातले असलेले हे पाच-नमाजी टान्गेवाले मिरजेत लक्ष्मीमार्केट, नदीवेस, गुरुवार पेठ ते अगदी पाटील हौद कुठेही सरसकट नजरेस येत. या टांग्यान्ना नगरपालिकेने नंबर दिले होते. रिक्षा आणि बसला असावेत तसे. एक किंवा दोन आकडीच. केशरी रंगाच्या टाग्यानवर हे नंबर पांढर्या वर्तुळात ऑइलपेंटने काढलेले असायचे. हीच सगळ्यांची स्कूलबस. त्या टांग्यात साधारण पंधरा सोळा मूलमुली, त्यांची दप्तर, वॉटर ब्यागा, हस्तकलेच्या तासाला केलेल्या विविध वस्तू, पावसाळ्यातला रेनकोट, कुणाचा वाढदिवस असेल तर वाटायला पार्ले किस्मी चा चॉकलेट पुडा… त्यावेळी पार्ले 'किस्मी' ला आम्ही 'किस्मीस' म्हणायचो...वयच नव्हत हो...! पुढच्या बाजूला टांगेवाल्या काकानच्या पायापाशी घोड्याला लागणारा थोडा फार चारा अशी सगळी ही अक्षरश: मिरवणूक असायची. ह्यूमन राइट्स वाल्यांचा जन्म त्यावेळी अजुन व्हयायचा होता. पण त्यावेळी मुल, टांगेवाले काका आणि घोड या तीनही जमातींचे अतोनात हाल व्हायचे. घोड दिसायला असायच अनिमियान ग्रस्त असल्यासारख पण एक आवाज काढला मियान चाबकाच्या काठीचा डाव्या चाकावर, की अस पळत सुटायच...विचारू नका. दोन तीन डब्यातले लाडू इतस्तत: विखुरलेच म्हणून समजा. काटकसरीच असेल पण तरी ते शिक्षण खडतर वगरे या सदरात नक्कीच मोडणार नाही. पुढची पिढी घडवतोय असली उदात्त भावना वगरेही टांगेवाल्या काकाकडे नव्हती. सकाळी आईच्या हातून सोडवलेल पोर संध्याकाळी सुखरूप आईच्या हाती परत सोपवायच ही जवाबदारीची जाणीव मात्र अब्दुल, रहमान किंवा आसलम् मियाकडे ठासून भरलेली होती. अर्ध्या हातात कणीक भिजवून आलेली आईही सकाळी सकाळी आपल्या मुलीच बोट मामाच्या हातात द्याव तसल्या उबेन उसमानकड सोपवायची. या माणसान्ची विश्वासार्हताच तशी जबरदस्त होती आमच्या गावात. मुंबईत ट्रामची जी शान होती तीच मिरजेत या टांग्यांची. टांग्यायात बसल्या पासून मुला-मुलींच्या ज्या खोड्या ( खोड्या हा शब्द गुरूजनांनी पालकांशी बोलताना वापरण्याचा ) मुलांच्या, म्हणजे आमच्या दृष्टीन तो चिमुकल्या जीवांनी चिमुकल्या जिवाशी केलेला तो अस्तित्वचा झगडा असायचा. त्या झगड्याचे प्रकार अनेक असत. मुंज झालेल्या मुलाच्या डोक्यात मिनिटाला दहा ते बारा या गतीने जोरात टपल्या मारणे. मुलींचा डबा त्यांच्या नकळत पळवून चोरून खाणे. चिमटे आणि चिमकुटे ह्यातला फरक प्रत्याक्षिकासह करून दाखवणे, अशी अभिव्यक्ती मुलांच्यातून मुक्तहस्ते ओसंडून वाहायची.

तीस वर्षे झाली...! मिरजेतून टांगे गेले कायमचे... टांगेवाले काका ही थकलेले असतील....मनाची समजूंत घालायला अस म्हणायच पण कदाचित गेलेही असतील देवजाणे ! आणि असतील तरी आमच्या आयुष्यातून मात्र कधीच कायमचे निघून गेले. खाकी दत्परात हात घालून शोधायच्या बारीक बारीक बोटांच्या पेरा एवढया, दगडी पाटीवर लिहायच्या पेन्सीलीचे तुकडे आयुष्यातून निघून गेले. वर्षभर एक एक करून जमवलेल्या काचेच्या रंगीत नक्षी असलेल्या गोट्यानचा संच आयुष्यातून निघून गेला. पतन्गाचा बोट कापणारा मांजा निघून गेला. बालभारतीच्या पुस्तकात पानाच्या नंबर वरुन तास चालू असताना मागच्या बाका वर बसून खेळलेल क्रिकेट आणि त्याचा स्कोर आयुष्यातून निघून गेला. भूगोलाच्या पुस्तकातल्या नकाशातून राजधानी, देश वगेरे शोधून काढण्याचा खेळही निघून गेला. इतिहासातल्या राण्यांना काढलेल्या मिश्यान्ची गंमत गेली, लाल महालात राहायला आलेला पळपुटा शाहिस्तेखान जसा निघून गेला, तसाच उर भरून आणणारा तानाजी मालुसुरेही आयुष्यातून निघून गेला.

जवळ राहीले ते फक्त वॉटसअपच्या ग्रूपवरचे प्रोफाइल पिक्चर्स आणि, पुस्तकात महिनोन्महिने जपून ठेवलेल ताम्बुस-करड्या रंगाचे पिंपळाचे पान, तेही आठवणी न्ची जाळी झालेले…परत कधीच पहिल्या सारखे हिरवे गार होऊ न शकणारे !!

चारूदत्त रामतीर्थकर
3 एप्रिल 2015, पुणे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राथमिक शाळा सोडून तुमच्यापेक्षा खूप जास्त वर्ष लोटली तरीसुध्दा त्या काळच्या आठवणींनी डोळे ओले केलेच. ते निरागस आणि नि:ष्पाप वय. आता आणि त्यावेळी. तुलनाच ऩको वाटते. परत एकदा ये कहा आ गये हम अशी अवस्ठा झाली.

प्रत्येक वाक्याला अगदी अगदी असं झालं! सगळा शाळेचा काळ डोळ्यापुढून सरकला. कुठल्याही वयातली असुदे .. पण शाळा सुटल्यांनतरची ती हुरहुर सारखीच!! छान लिहिलंय...

छान लिहिलंय. आधी लेखकाचे आडनाव बघून आता नक्की कशाबद्दल लेख आहे अशी जरा भिती वाटली. अपेक्षाभंग झाला ते बरे झाले.

नी Lol

छान Happy

Pages