माझा सपशेल उडालेला फज्जा - BRM200

Submitted by limbutimbu on 30 March, 2015 - 06:59

यात सांगण्यासारखे, इथे लिहीण्यासारखे खरे तर काय आहे?
मी एका स्पर्धेत भाग घेतला, व अगदी सुरवातीच्या तासाभरातच मला स्पर्धेतून स्वेच्छेने बाहेर पडावे लागले, यात अभिमानाने सांगण्यासारखे खरे तर काहीही नाही. एका वाक्यात कळवता येते.
तरीही, वैयक्तिक अक्षमतेव्यतिरिक्तची बाहेर पडावे लागण्याची कारणमिमांसा माहित व्हावी म्हणून स्वतःच्याच फजितवड्याबद्दल हा लेखन प्रपंच.

दिनांक २८ मार्च, २०१५ रोजी पुणे युनिव्हर्सिटीच्या मुख्य गेटपासून रात्री ७ वाजता BRM200 या रेसला सुरुवात होणार होती व १३ तासात २०० किमी अंतर कापून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० ला संपणार होती.

ही शर्यत अर्थातच व्यक्तिव्यक्तिंमधिल नसून, व्यक्तिची स्वत:शी व वेळेशी होती. सर्व प्रवास रात्रीचा करायचा होता. व मार्ग पुणे युनिव्हर्सिटी, पाषाण रोडमार्गे देहू-कात्रज बायपासला चांदणी चौकात मिळायचे व पुढे जाऊन नविन कात्रज बोगद्यांमधुन पुढे कापुरहोळ ला पोहोचायचे, तिथे कंट्रोल पॉईंट होता, तिथुन परत फिरुन नविन कात्रज बोगद्यांकडून, कात्रज-देहूरोडबायपासने जाउन, पुढे जुन्या पुणे-मुंबै हायवेने लोणावळा गाठायचे, तिथुन परत फिरुन परत पुण्यात यायचे असा मार्ग होता.

आजवर कधीही मिळालेला नसेल इतका प्रतिसाद या शर्यतीला मिळून मजसारखे काही चूकार हवशेगवशे धरून एकूण ३६ जणांनी सहभाग घेतला, पैकी ३ जणांनी सुरवातच केली नाही, १३ जण क्विट झाले, व २० जणांनी शर्यत पूर्ण केली, पैकी सर्वात प्रथम आलेल्याने जवळपास आठ तासातच हे अंतर कापले.

खरे तर या शर्यतीत भाग घेण्याचे मी योजलेले नव्हते. पण गेले काही महिने या विचारात होतो, व म्हणून माझ्या मुलाची, तो शाळेत असताना वापरायचा, ती सायकल डागडुजी करुन घ्यायला सुरुवात केली होती. दोन महिन्यापूर्वी मुलानेच दोन्ही चाकांना टायरट्यूब बसवुन दिले. मग मी व माझा एक मित्र गिअरच्या शोधात राहिलो, अन् सरतेशेवटी आमच्या इथल्या “रोडसाईड” मेक्यानिककडून मागिल चाकास गिअर बसवून घेतले. मागिल गिअर व्हिल्सच्या रुंदीमुळे पुढील पेडलचे एकेरी चेनव्हील अडचणीचे ठरू लागले, व एकतर मागिल सर्वात लहान व सर्वात मोठ्या गिअरव्हिलवर चेन नेऊ पाहिल्यास चेन पडू लागली, म्हणून मेक्यानिकने ती व्हिल्स लॉक करुन ठेवली (म्हणजे तिथवर चेन जायचीच नाही). सर्वात बारके व्हिल वापरताच येणार नसेल, तर गिअरचा उपयोग काय? असे म्हणुन मी त्याला पुढेही गिअर व्हिल बसवायला सांगितले, ते त्याने बसवले. पण म्हणे त्याच्याकडे शिफ्टर नव्हताच. तर बिना शिफ्टरचे ते वापरू लागलो, पण आता पुढच्या चाकावरुन चेन पडू लागली. सबब, पुढच्या लहान (मध्यम) दात्यांच्या चाकावरुन चेन वापरु लागलो. या गिअरच्या मोठ्या चाकाचे दाते केवळ ४२ होते, तर मला ज्या चाकाचा उपयोग करता येत होता तिचे दाते केवळ ३२ होते. केवळ ३२ दात्यांच्या चक्रामुळे सायकल चालविने साध्या अंतराकरताही वैतागाचे होत होते व अक्षरष: २०/२२ चा वेग घेण्यासाठीदेखिल मेहनत करावी लागत होती. तेव्हा साधारण दोन आठवड्यांपूर्वी पुण्यात जाऊन पुढील बाजुस किमान ४४ वा ४८ दात्यांच्या मोठ्या व्हिलची सोय करण्याकरता शोध मोहिम घेतली, ती फसली. परत एकदा ८ दिवसांपुर्वीच्या शनिवारी पुण्यात गेलो, तर तब्बल तिन वेगवेगळ्या दुकानातुन तिन पार्ट्स खरेदी करावे लागले. ४८चे गिअर व्हील एका ठिकाणाहून, त्याचा खालचा शिफ्टर एका ठिकाणी, तर हॅंडलपासची लिव्हर एका ठिकाणाहून.
हे सर्व आणुन स्वत:च बसवले व पुढील दोनचार दिवस ऑफिसला रोज सायकलने जाऊयेऊ लागलो.
दरम्यान, वरील रेस जाहिर झालेली दिसली, तेव्हा करुन तर बघु, वाईटात वाईट काय होईल ? बाहेर पडावे लागेल.. असा विचार करुन घरात ही गोष्ट बोलल्यावर लिंबीची तत्काळ प्रतिक्रिया होती की “तू घरातला एकमेव कर्ता पुरुष, तुला काही झाले तर बाकिच्यांनी काय करायचे? काही नकोय भाग घ्यायला”……
मी शॉकमधे, पण कसेतरी तिची परवानगि घेण्यामधे यश मिळाले.

या रेसेस् मधे भाग घ्यायचाच म्हणुन मी तिनेक महिन्यांपूर्वीच माझे वेळापत्रक आखले होते नि त्यानुसार मी निगडी ते हिंजवडी/बापुजी देवाची खिंड/ कात्रज-बिबवेवाडी/ कात्रज बोगदा, असे टप्प्याटप्प्याने अंतर वाढवित नेऊन सराव करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात यापैकी एकाही ठिकाणी जाणे शक्य झाले नाही. येऊन जाऊन निगडी ते आळंदी इतकेच एकदा जाणेयेणे झाले. रोजचा ऑफिसला जाण्यायेण्याचा घर ते ऑफिस हा साडेतिन किमीचा टप्पा इतकाच काय तो सराव(?) म्हणे.

रेसच्या नियमाप्रमाणे पुढिल व मागिल दिवे असणे जरुरीचे, तेव्हा ते घ्यायला वेळात वेळ काढून ते बुधवारी विकत आणले. तेव्हाच पंक्चरचे सामानही आणले.

तशात गुरुवारी ऑफिसबाहेर गाडी लावलेली असताना कुणीतरी हॅंडलपासच्या गिअरलिव्हरशी खेळ केला होता त्यामुळे आता चेन मोठ्या व्हिलवर ठरत नव्हती. 

शुक्रवारी एक चंडीयाग घेतलेला, तो सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० दरम्यान पुरा केला, तेव्हा जेवणखाण वगैरे काही झाले नव्हते, होमाचा धूर मात्र भरपूर प्यायला-खाल्ला होता.

त्याच दिवशी संयोजकांचा SMS आला, की तुम्ही whatsapp वर दिसत नाही, दुसरा कॉन्टॅक्ट नंबर द्या. तेव्हा त्यांना कळविले की आता एका android चि सोय करतो व कळवतो. लगेच रात्री १० वाजता मुलिकडे जाऊन तिला दिलेला android तात्पुरता घेतला तो रात्री एक पर्यंत घरी पोहोचलो.

दुसरे दिवशी शनिवार, रेसचा दिवस, पाणी भरणे, चूल पेटवून पाणी तापविणे इत्यादी आन्हिके उरकून, सकाळी १०.३० नंतर सायकल तयार करण्याची सुरुवात केली.

विकतचे दिवे वाटेत पडू शकतात हे इथे वाचलेले असल्याने, स्पेअर दिवे/बॅटरीलाईट बसवले. बाटल्या अडकवायला तारेचे स्टॅन्ड असतात ते बसवले. मधल्या बारवर दोन पर्स लटकवल्या. हे बसविण्याकरताच्या प्लॅस्टिक स्ट्रीप्स व लाल जिलेटीन आदले रात्रीच आणले होते. गाडीची (सायकलची) परिस्थिती बघता यच्चयावत नटबोल्टना बसणारे स्पॅनर्स, स्क्रूड्रायव्हर, पक्कड, पंक्चरचे पाने, ठ्यूब, व्हॉल्वट्यूब, हवा भरायचा भलाथोरला पंप, वगैरे घेतले. हे सामान इतके होते, की मी जर रेसच्या वाटेत सायकल दुरुस्तीचे दुकान टाकून बसलो असतो तरी चालले असते. Proud
त्याचवेळेस सायकलला पुढेमागे लावण्यासाठी वहीच्या पुठ्ठ्यांवर रायडर नंबरची दोन कार्ड्स तयार केली नाईट रिफ्लेक्टीव चिकटपट्टीने. ती लटकवली.

शनिवारी सर्व कामातुन/पाहुण्यांमधुन वेळ काढून एक क्षणभरही झोपता आले नाही. आदले दिवशी चंडीयागामुळे दुपारचे जेवण नाही, रात्री मुलिकडे जाऊन आलो, तेव्हाही जेवण नाही, व आज शनिवारी दुपारी केवळ एक पोळी खाल्लेली. या इतक्याच आहारावर मी दुपारी पावणेपाचला घरुन निघालो अन् वेळेत युनिव्हर्सिटीपाशी पोहोचलो. सोडवायला मुलगा आलेला.

तिथे यथावकाश सर्वजण गोळा झाले. मायबोलीकर केदार जोशीही भेटला. त्याचा पहिला प्रश्न होता, लिम्ब्या सराव काय केला आहेस? मी म्हणले अरे काहीच नाहीरे सराव  मग जमले नाही तर सोडून द्यायचा प्रयत्न या बोलीवर तो विषय संपला.

तिथे माझे कुणि फोटो काढले नाहीत, अगदी मुलानेही सजल्याधजल्या लिम्ब्याचा एकही फोटू काढला नाही, पण बरेच जणांनी माझ्या सायकलचे मात्र फोटो काढले. Proud

रेस सुरु होण्या आधी पाऊस झाला थोडासा, पण मुसळधार पाऊस होईल असे वातावरण होते. सबब, रेस सुरु होताना मी रेनसुटचा वरचा भाग अंगात चढवला. डोईचे हेल्मेट रस्त्यावर मिळते त्यातिल होते. त्यास व्हेन्टिलेशनची सुविधा (भोके असणे) नव्हती, व काल व आजच्या दिवसात मला भोके पाडणे जमले नव्हते. रेसला सुरुवात झाल्यावर मी तसाच निघालो, व पुढे दोन जण चालले होते त्यांना माझ्याही नकळत मीच फॉलो करू लागलो, व माझ्या नैसर्गिक ताकदीच्या कितीतरी पुढे जाऊन सायकल त्यांचेबरोबरीने वेगात दामटली. खरे तर मला श्वासाचा त्रास तेव्हा होत नव्हता, पण अंग घामाने निथळते आहे हे जाणवू लागले. थोड्या वेळाने पुढील सर्वजण दिसेनासे झाले व तोवर माझ्या शिंपीमधे जाम दुखायला लागलो, चढ सुरू झाला होता, तेव्हा श्वासही जोरजोरात होऊ लागला. हेल्मेट नजरेआड येते म्हणुन वर करावे लागायचे, तेव्हा आतिल स्पंजाला बोट लागल्यावर त्यातुन घामाची धार खाली पडू लागली. कपाळावरून ओघळून घाम डोळ्यात जाऊ लागला होता. इथेवर येईस्तोवरच पहिल्या साताठ किमीमधेच माझ्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. चक्कर येऊन तोल जाऊन पडतो की काय असे वाटू लागले. मागिल गिअर बदलायला डावी की उजवी लिव्हर वापरायची हे आठवेना, आठवले तर लिव्हर हाताला सापडेना. शेवटी चांदणी चौकाचा टॉप नजरेत् आला, पण मी इतका बधीर “एक्झॉस्टेड” झालो होतो की चक्क सायकलवरून उतरून तो पन्नास फुटांवरचा टॉप गाठला.

तिथे दम खात थांबलो. मुलाला फोन केला की अरे मला खूप त्रास होतोय. याची अपेक्षा नव्हती. पण त्रास तर होतोय, काय करू? मला नाही वाटत मी पुढे जाऊ शकेन. मुलगा म्हणाला, थोडा दम खा, अन् प्रयत्न करा, नाहीच जमले तर बाहेर पडा अन् मला फोन करा, मी आत्ता निगडीच्या वाटेतच आहे आहे.
मग मी थोडे पाणी प्यायलो, ते पितानाही एकदम पिऊन चालत नव्हते, अजुनच त्रास झाला असता.. अजुनही मला असे का होते आहे याचे कारण कळत नव्हते, कारण श्वास जोरजोरात फुलला तरी तो “दम्याचा” ऍटॅक नव्हता, दमाही नव्हता तेव्हा, पण हातपाय गळून गेले होते. इतकुश्श्या अंतरातच माझे असे का व्हावे याचा विचार करीत मी परत सायकल पुढ चांदणीचौकाच्या उतारावरून बायपासकडे काढली. तिथेन पुढे सिंहगडरोडवरील उड्डाण्णपुलापर्यंत उतार असल्याने झकासपैकी गेलो, मनात वाटले की आपण उगीच घाबरलो, हे काय, हां हां म्हणता पार करू अंतर….

झाले , सिंहगडरोडवरील/कॅनॉलवरील उड्डाण पुल सुरु झाला, अन् मला परत त्यापुलाचा चढही पार करवेना, सर्वात उंचावर जाऊन परत थांबलो, थोडे पाणी प्यायलो. पाणि प्यायचीही भिती वाटत होती कारण एकदम पाणि प्यायल्यास नळ भरु शकतात व पोटात दुखू लागते. शिंपीतील दुखणे आता थांबले होते पण श्वास ताब्यात येत नव्हता. नाकाने श्वास घेऊन तोंडाने भसाभसा सोडीत होतो. परत एकदा जीव धरुन पुढे निघालो. शिंदेवाडीचा पुल लागला, तिथुन उजवीकडे वळण घेऊन नविन कात्रज बोगद्यांकडे जायचे होते. तो पुलही मला निभावेना, त्यावरही थांबायला लागले. अतिशय निराश झालो. परत थोडे पाणी पिऊन तसाच पुढे निघालो तर लक्षात आले की आता तर पुलाच्या उतारावरही मला वेग घेता येत नाही इतका शक्तिपात झालाय. मला असे का होतय काहीही कळत नव्हते. पुढे कात्रज बोगद्याकडचा चढ सुरू झाला. व एका विशिष्ट वेळेस मी सायकल थांबवली. मेंदु कलकलला होता. चक्कर येऊन पडण्यापेक्षा स्वत:च थांबणे हा चांगला उपाय सुचण्याइतकी बुद्धी शाबूत होती.
थांबल्यावर पहिल्यांदा लिंबीला फोन लावला व परिस्थिती सांगितली. सुरवातीला विरोध करणारी लिंबी तेव्हा फोनवर मात्र म्हणाली, की तू घाबरलेला आहेस, थकलेला आहेस, तरीही पंधरावीस मिनिटे अर्धातास विश्रांती घे, अन पुढे हो, तू जाऊ शकशील”. तिच्या म्हणण्यात बरेच तथ्य होते. पण मी त्या मन:स्थितीत नव्हतो, सबब तिला सांगितले की मी क्विट करतोय, मला पुढे जाऊन रिस्क घ्यायची नाही, जरी त्यांचि पिक अप् व्हॅन वगैरे असली तरीही. लिंबी बरे म्हणाली.

मग संयोजकांना फोन करुन सांगितले की मला क्विट करावे लागत आहे, तसदी बद्दल सॉरी, मुलाला बोलावतो आहे, माझे मी मॅनेज करेन.

मग मुलाला फोन करुन सांगितले, तेव्हा तो पिंपरीपाशी ट्रॅफिकजाम मधे अडकला होता. निगडीला घरी जाऊन मग येतो म्हणाला….
यथावकाश दोनअडिच तासांनी मुलगा आला, तोवर मी शिंदेवाडीपुलाचे खाली येऊन उभाच्या उभा. दरम्यान दीडेक लिटर पाणी रिचवले अन मग वाटू लागले की अरे उगीच सोडली, घाई केली सोडण्यात.
लक्षात आले की टेललॅम्प पडून गेलाय.

मग मुलाने सायकल चालवित घरी नेली, त्याचे मागोमाग स्कूटीवरुन मी गेलो.
BRM200 मधिल सहभागाचा माझा पहिलाच प्रयत्न सपशेल फसला होताच, तो देखिल केवळ एक तासाचे आत, वीसेक किमीमधेच. 

नंतर विचार करता यास अनेक बाबी कारणीभूत झाल्या होत्या असे जाणवले, त्या पुढील प्रमाणे.

१. अजिबात सराव न करता / अपुऱ्या सरावानिशी रेसला उतरणे
२. शेवटच्या क्षणापर्यंत सायकलची डागडुजी करावी लागणे व त्यामुळे तिच्याशी वापरण्याबाबत/ हाताळण्याबाबत जवळीक निर्माण झालेली नसणे. अगदि सीटची उंची किती हे देखिल शेवटपर्यंत निश्चित झालेले नव्हते.
३. पावसाळी हवा म्हणुन घातलेले रेनसुटचे जाकिट व व्हेन्टिलेशन नसलेले हेल्मेट महाघातक ठरले. यामुळे अंगात निर्माण होत असलेली उष्णता आतच साठून राहून शरिराने घामाद्वारे त्याचा प्रतिकार केला, व एरवी अगदी क्वचितच घामाघुम होणारा मी त्यावेळेस मात्र नखशिखांत ओला झालो.
४. स्वत:च्या नैसर्गिक कमी गतिने न जाता पुढिल वेगवान एक्स्पर्ट लोकांना फॉलो करणे ही घोडचूक होती. त्यामुळेही एक्झर्शन वाढले.
५. आधिचे तिनचार दिवस अतिश्रम व अपुरा आहार, अगदी रेसच्या दिवशीही आहाराबाबत दुर्लक्ष,
६. रात्रीची रेस असुनही आधिच्या तिनचार दिवसात दिवसाची काय, रात्रीचीही पुरेशी झोप/विश्रांती नाहीच नाही.
७. चाराठ दिवस आधीपासून आईच्या पायावर सूज आलेली, तेव्हा त्या काळजीने मन चिंताग्रस्त, द्विधा मन:स्थितीत.
८. रेसकरता स्वत:स कुठल्याच पद्धतीने शारिरीक/मानसिक दृष्ट्या तयार करू न शकणे, अन् तरीही भाग घेणे.
९. “होय, तू मनात आणलेस तर ही रेस करू शकशील” अशा आशयाचे वाक्य नि:शंकपणे सांगणारी एकही व्यक्ति आजुबाजुला नाही. येऊनजाऊन मुलगा म्हणाला, “करा हो बाबा, जमेल तुम्हाला, नै जमले तर बाहेर पडा!” पण त्यात तितका जोर नव्हता हे त्याला अन् मलाही ठाऊक होते.

तर इतके असताना या प्रयत्नातून साध्य काय झाले? आत्मविश्वास कमावला की गमावला ? होता तो ओव्हरकॉन्फिडन्स होता का? परत सुयोग्य प्रयत्न करणार का?

तर इतके असताना या फसलेल्या प्रयत्नातून साध्य काय झाले?
रेसची, रेसमधिल सहभागी, त्यांच्या सायकली, हत्यारे इत्यादी अनेक बाबींची ओळख जवळून झाली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण किती बारकाईने विचार करुन उतरायला हवे, किती प्लॅनिंग हवे, किती सराव हवा, किती तयारी हवी याचा अंदाज आला. एका चांगल्या ग्रुपबरोबर ओळख झाली. शिवाय केदारजोशीचे प्रत्यक्ष दर्शन झाले.

आत्मविश्वास कमावला की गमावला ?
डिस्अपॉइंट नक्कीच झालो, उदास झालो, पण नाऊमेद नक्कीच नाही झालो. इतक्या कमी अंतरात मी बाहेर पडेन घरच्या कुणालाच अपेक्षित नव्हते. किमान कापुरहोळ करुन तरी येईल असे त्यांनाही वाटत होते.
मी आधी प्रेडिक्ट केले होते की जर मी अमुक वेळेपर्यंत कापुरहोळहून परत वारजे/चांदणीचौकापर्यंत आलो, अन् तेव्हा सुस्थितीत असलो, तरच पुढे जाऊ शकेन.
अन् मी रेस करीनच वा नाही याचा निर्णय बहुधा त्या आधीच शिंदेवाडी ओव्हरब्रीजपर्यंतच कदाचित लागलेला असेल. हेच भविष्य खरे ठरले.

होता तो ओव्हरकॉन्फिडन्स होता का?
माहित नाही, कदाचित असेलही, मला पहिल्या पन्नास किमीची कात्रज चढ धरुन खात्री होती. पण ते शक्य झाले नाही.
सहभाग घेणे हा वेडेपणाही असेल. पण असे वेड लागल्याखेरीज हातुन काहीच होत नाही. यामुळे मी परत परत असे वेडेपणे करीत रहाणार हे नक्की.

परत सुयोग्य प्रयत्न करणार का?
अर्थातच होय. अधिकाधिक तयारी व पूर्वीच्या चूका टाळून परत परत प्रयत्न करणार.

याव्यतिरिक्तही एक गोष्ट साध्य झाली.... अन एक बाप म्हणुन ती साध्य होण्याला अपरिमित महत्व आहे.
काय झाले? की एकुणात त्या दिवशी माझ्या मुलानेच माझ्यापेक्षा जास्त किमी अंतर सायकल चालविली, ते देखिल आधी न ठरविता. त्यामुळे मग तोच म्हणाला, की मी एक सायकल बघितली आहे, ती घेणार अन मीच उतरणार रेसला.
मी त्याला म्हणालो, की अरे मी तरी हे का करतो? माझे बघुन तुम्हाला निदान थोडीजरी इच्छा झालि, अन त्यादृष्टीने तुम्ही प्रयत्न केलेत तर किती चांगले? माझे बघुन तुम्हाला इतके जरी कळले की असाही वेडेपणा करता येतो, व केलाच तर अशाप्रकारचे वेडेपणेच करायचे असतात, तरी खूप झाले.
यामुळे झालय इतकेच, की इथुन पुढे माझ्या साथीला माझा मुलगा असेल. त्याचा मोरल सपोर्ट असेल.

माझा एक मित्र आहे, तो देखिल हेच म्हणाला, की नोव्हे/डिसेम्बरचे सुमारास आपण उतरू. आता पाहुया पुढे काय काय होते ते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान. अपयशाचं किती छान तर्‍हेने विश्लेषण केले आहे. इतक्या लॉजिकली अपयशाचा विचार केलात आता पुढच्या वेळेस यश तुमचेच आहे. ऑल द बेस्ट !!!

लिंब्याभाऊ, तुमची सायकल पहायलाच हवी...
प्रयत्नाबद्दल अभिनंदन.
मी अजून भारतात एकही राईड किंवा बी आरेम केलेली नाही, पण इथे २०० + माइल्स च्या राईड्स आता गेले २ वर्ष करत आहे. त्या अनुभवातून असं वाटतं की सराव नसणे (शारीरीक आणि मानसिक) हे महत्वाचे कारण... निदान पहिल्यांदा करताना सराव लागतो, नियमीत आणि थोडा थोडा वाढवत नेलेला... जेणेकरून मसल मेमरी बिल्ड होते. एकदा ती झाली की मग दुसर्‍या वर्षी/ नंतर/ काही काळाने सराव थोडा कमी चालतो हा माझा अनुभव. मानसिक सराव ही फार जास्त महत्वाचा. ह्यामधे स्वतःच्या शरीराला किती वेग आणी अंतर पेलता येतंय हे पाहणं.... शिवाय सायकलच्या सीट्ची उंची, आणि रायडींग अँगल नीट जमणं आवश्यक आहे. लांब अंतरं पार पाडताना हे फार महत्त्वाचं, एस्पेशियली जर पोस्ट राईड दुखापती कमी व्हायला हव्या असतील तर.
पुढच्या सरावाला आणि राईडसला शुभेच्छा Happy

लिंबूजीराव - या सगळ्या प्रयत्नाकरता एक शिरसाष्टांग दंडवत ...
चांगलेच जिद्दी आहात राव ...

भारी रे लिंब्या. वेलडन म्हणेन मी. असे होते अचानक. अनेक वर्षांपूर्वी रायगड चढताना पावसात रेनकोट घालुन चढताना मला अचानक प्र चं ड घाम आला व काहीच करता येईना. सोबतच्या लोकांना पुढे व्हायला सांगुन १५-२० मिनीट विश्रांती घेतली पाणी प्यायले. रेनकोट काढुन टाकला व एका दमात रायगड चढला होता.

परत नक्की प्रयत्न कर.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे असा त्रास होत असताना जवळच्या मित्रांना लगेच फोन करणे. सिंहगड रोडजवळ त्रास झाला होता तर मी, हिम्या, आशु, मयुरेश अशा लोकांना फोन केलास तर पटकन मद्त मिळु शकते.

इट्स ऑल इन द माईंड ह्यावर धकवून नेता येतात बर्‍याचदा स्पर्धा पण लहान पल्ल्याच्या. ( स्वानुभव) पण बीआरेम वगैरे म्हणजे जय्यत्तयारीत करायची बाब.
तुमची अ‍ॅटिट्युड मात्र आवडली. सायकल पहायची आहे.
केदार बोअर काही होत नाहीत रे तुझे लेख. सायकलीचा लेख दोनदा (समजेपर्यंत Wink ) वाचला .

limbutimbu , ग्रेट आहात!

यच्चयावत नटबोल्टना बसणारे स्पॅनर्स, स्क्रूड्रायव्हर, पक्कड, पंक्चरचे पाने, ठ्यूब, व्हॉल्वट्यूब, हवा भरायचा भलाथोरला पंप, वगैरे घेतले. हे सामान इतके होते, की मी जर रेसच्या वाटेत सायकल दुरुस्तीचे दुकान टाकून बसलो असतो तरी चालले असते.> ----^---- !

पुढच्या वेळेस यश तुमचेच आहे. ऑल द बेस्ट !!!>+१

लिंबु भाउ तुम्ची कमाल आहे. तुमच्यासर्खी साय्कल घेउन बहेर पडायची कल्पना पण मी करु शकत नाही. Hats off to you. Great Attempt !

केदार जोशी तुम्ही लिहायलाच हव. नाहितर आम्च्या सारख्या आळशी लोकाना 'स्टार्टर' कसा बसणार. नक्के लिहि रे.

हर्पेन, आशुचॅम्प, प्रवीण सुश्मा, हिम्सकूल, रॉबिनहूड, अग्निपंख, केदार, झकासराव, ललिता-प्रीति, मित, अमितव, दिनेश, चेतन सुभाष गुगळे, धनि, पराग, sulu, मानुषी, ऋन्मेऽऽष, वर्षू नील, असामी, maitreyee, मंदार, Bsk, vijaykulkarni, टण्या, मनोज., मनीमोहोर, rar, पुरंदरे शशांक, कांदापोहे, सुगध, इन्ना, रावी, अश्विनी के, अमित M.,

सर्व प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद.

>>>> पण तुझ्या लाईफमधे 'करून पाहणे ' ही गोष्ट फारच अमूल्य आहे आणि तीच तुझी एनर्जी आहे. <<< रॉबिनहूड, अरे तू तर हे "मिथुन" राशीचे वैशिष्ट्यच सांगितले.. अगदी खरे आहे ! (पण कधी कधी पाचर उचकटून शेपटी अडकवुन घेणार्‍या माकडाप्रमाणेही अवस्था होऊ शकते.... Wink ) [विकू, मी शीर्षकात "फज्जा" शब्द वापरण्याचे प्रयोजन ह्याच पाचरीच्या उदाहरणावरून केले... Proud ]

अग्निपंख, कोलंबसचा जोक कोणता?

केदार, तुझा सविस्तर प्रतिसाद लक्षात घेतला आहे. अरे सीटचा प्रॉब्लेम होताच, कितीही टाईट केले तरी पुढुनमागुन वरखाली होत होते, उंची सेट केली नव्हती. शिवाय, चांदणीचौक सोडल्यावर पुढल्या खिन्डीत रस्ता जेसीबीच्या पंजाने खरवडल्यामुळे खड्डे पडले आहेत, त्यावरुन सायकल दणदणून गेली असताना हॅन्डलही पुढे सरकले अन दिव्यांचा उजेड आभाळात..... तेव्हाच बहुधा टेललॅम्पही पडला.... आता हे नन्नाचे पाढेही किती गिरवावेत? Proud
बायदिवे, तेव्हा तुला तांदूळ मिळाले होते का? मला कसे आठवत नाही ते? तू माझ्या कोणत्या फोटोत सायकल पाहिलिस? कृपया ते फोटो मिळवू शकशील का? कारण या प्रसंगाचा एकही फोटो माझ्याकडे नाहीये, फोटो मिळाल्यास इथे / whatsapp वर पाठव ना प्लिज.
तुझ्या आधीच्या स्पेअर सायकलबाबत बोलू नंतर. Happy मी तो विषय लक्षात ठेवतो आहे.
श्री ठिपसे माझ्याशीही बोलले होते. सावकाश जा म्हणाले. भारीच व्यक्तिमत्व आहे.
अन तू तुझे अनुभव लिहीत रहा. मूळात तुम्ही (तू/मनोज/आशू वगैरे) लिहीताही कसलेल्या लेखकासारखे, अन तरी त्यात असत्य वा जुगवलेले काही नसते. त्यामुळे ते वास्तव वाचायला जास्त आवडते. (हो, अगदी हिंदु धर्माला "महान अडगळ" म्हणण्याकरता तिस तिस वर्षे घालवुन लिहिलेली मनोराज्यात्मक अवास्तव कादंबरी वाचण्यापेक्षा हे अस्सल अनुभव वाचणे केव्हाही श्रयस्कर, असे माझे मत)
काही चूकार बोअर होणारे बोअर होतील त्यांची फिकीर नको, पण त्यापेक्षा कितीतरी जास्त सन्ख्येने वाचकांना तुमच्या अनुभवातून बरेच काही मिळते.

मित, मलाही केदार, आशुचॅम्प, मनोज, हर्पेन इत्यादिंच्या लिखाणापासूनच स्फुर्ती मिळाली.

चेतन, हो, जरुर भेटू.

maitreyee, त्या लिंक बद्दल धन्यवाद.

अतिशय दुर्दैवाने, त्या सजल्याधजल्या सायकलीचा फोटु याक्षणी उपलब्ध नाही, सोमवारी ऑफिसला जायचे म्हणून सर्व गोष्टी काढल्या.
पण मी ती परत तशी तयार करीन लौकरच, तेव्हा नक्कीच फोटो टाकेन.

सायकलिंगबाबतच्या प्रतिसादकांच्या सर्व सूचना मी लक्षात घेतल्या आहेत, व त्या अनुसार पुढील सराव करीन.

पुनःश्च, सर्वांना धन्यवाद.

कोणत्या फोटोत सायकल पाहिलिस? कृपया ते फोटो मिळवू शकशील का? >>

अरे कालच्या नाही, तू जो फोटो प्रोफाईल म्हणून स्टरावावर अपलोड केला आहे तो पाहिला मी. सायकलवर असताना सहसा मी फोटोच काढत नाही त्यामुळे ह्या प्रसंगाचे फोटो देखील मी काढले नाहीत. दुसर्‍यांनी काढलेले मला दिले.

हो मलाही तांदूळ दिले होतेस तू.

पब्लिक मी थोड्यावेळातच लेख टाकतो. लिहून ऑलमोस्ट पूर्ण झाला. माझे लिखाण वाचण्यास उत्सुक (अजूनही) आहात म्हणून लेख लिहिणे माझे कर्त्यव्य आहे. धन्यवाद. Happy

टाकला. http://www.maayboli.com/node/53319

लिंबूभाऊ, थंब्जप!! एकदम सकारात्मक लेख आहे हा... पुढील अनेक सायकलवारी आणि स्पर्धांसाठी अनेकानेक शुभेच्छा!

खूप छान. अपयशाचं किती छान तर्‍हेने विश्लेषण केले आहे. इतक्या लॉजिकली अपयशाचा विचार केलात आता पुढच्या वेळेस यश तुमचेच आहे. ऑल द बेस्ट !!!>>>>>> +१००

लिंबुभाऊ, पुढच्या वेळी सराव आणि योग्य मार्गदर्शन याच्या जोरावर तुम्ही पुर्ण केलेल्या BRM200 रेसवरचा धागा येणार याची मला तरी पुर्ण खात्री आहे. लगे रहो.................

तीच तुझी एनर्जी आहे. <<< रॉबिनहूड, अरे तू तर हे "मिथुन" राशीचे वैशिष्ट्यच सांगितले..
>>
सब छोडेंगे लेकिन चाल नही छोडेंगे !
असो. तांदूळ मलाही मिळाले होते. भात खाताना तुझा जिव्हाळाच खात असल्यासारखे वाटले Happy

चांगला प्रयत्न! लिंबुदा,
पुढच्या मोहीमेत नक्की यश मिळेल, त्यासाठी शुभेच्छा!

मस्तच प्रयत्न!
पुढील वेळेसाठी आणि त्याच्या तयारीसाठी खुप खुप शुभेच्छा लिंबुभाऊ!
केदार, मीही तुझे लेख वाचते. तुझे जाम कौतुक वाट ते. तुला फ़्रांस मध्ये बघायचे आहे! प्रतिक्रिया द्यायला जमले नाही कारण मोबाइल वरुन लीहीन्याचा कंटाळा!

लिंबुटिंबु.. तुमच्या दांडग्या उत्साहाला व त्याहुनही जास्त या शर्यतीत भाग घेण्यासाठी तुम्ही जो खटाटोप केलात व तुमच्या परीने तुमची सायकल या शर्यतीत भाग घेण्याइतकी चांगली व्हावी म्हणुन तुम्ही जे प्रयत्न केले त्याला खरच मानल बुवा!

माझ्या दृष्टीकोनातुन हा मुळीच फज्जा नाही. यातुन जे शिकलात ते पुढच्या वेळेला नक्कीच कामी येइल. लक्षात ठेवा.. अपयश हीच यशाची पहीली पायरी असते..

तुमच्या पुढील शर्यतीला मनापासुन शुभेच्छा!

याव्यतिरिक्तही एक गोष्ट साध्य झाली.... अन एक बाप म्हणुन ती साध्य होण्याला अपरिमित महत्व आहे.
काय झाले? की एकुणात त्या दिवशी माझ्या मुलानेच माझ्यापेक्षा जास्त किमी अंतर सायकल चालविली, ते देखिल आधी न ठरविता. त्यामुळे मग तोच म्हणाला, की मी एक सायकल बघितली आहे, ती घेणार अन मीच उतरणार रेसला.
मी त्याला म्हणालो, की अरे मी तरी हे का करतो? माझे बघुन तुम्हाला निदान थोडीजरी इच्छा झालि, अन त्यादृष्टीने तुम्ही प्रयत्न केलेत तर किती चांगले? माझे बघुन तुम्हाला इतके जरी कळले की असाही वेडेपणा करता येतो, व केलाच तर अशाप्रकारचे वेडेपणेच करायचे असतात, तरी खूप झाले.
यामुळे झालय इतकेच, की इथुन पुढे माझ्या साथीला माझा मुलगा असेल. त्याचा मोरल सपोर्ट असेल
>> लिंबूभाऊ, हे कसलेल्या लेखकासारखे नाही तर काय आहे? तुमच्या या लेखानेही अनेकांना स्फूर्ती न मिळाली तरच नवल. तुमचे कलंदर व्यक्तिमत्व पाहून मनापासून अचंबा वाटतो. Happy

सायकल पूर्ण असेंबल करुन वापरली. धन्य आहात तुम्ही.

सायकल आणि तुमचे दर्शन घ्यायलाच लागेल. आणि हो दोघांचा फोटो मी काढेन हं..

अपयशास कारणीभूत बाबी वाचल्या पण एक अतिशय महत्त्वाची गोष्टं त्यात राहून गेल्यासारखी वाटली, ती म्हणजे डॉक्टरचा सल्ला. तुमचे शरीर एवढा ताण सहन करण्यास समर्थ आहे का?

ईथल्या प्रतिसादांतून स्फूर्ती मिळेल, सकारात्मक दृष्टीकोन, धाडस वगैरे ठीक आहे, तुम्ही सरावही कराल पण आपले शरीर अश्या अतिशय कष्टंप्रद कामाचा ताण घेऊ शकते ना हे तुमच्या डॉक्टर शिवाय कोणीच खात्रीने सांगू शकणार नाही.

धाडस करण्याआधी आपली सुरक्षितता आणि आपल्या शारिरिक कुवतीचा अंदाज असल्याशिवाय पुढे जाऊ नये ह्या मताचा मी आहे.

पुढील वाटचालीस शुभेच्छा!

हायझेनबर्ग.. अतिशय योग्य मुद्दा!

माझ्याही मनात हेच आले होते पण मी असे अद्दहृत धरले होते की लिंबुटिंबुनी त्या मुद्याचा विचार केला असेलच.

इथे घाबरवायचा हेतु नाही पण तुमचे हृदय म्हणजे एक पंप असतो. त्याचे काम म्हणजे रक्ताभिसरण.. फुफुस्साकडुन आलेले प्राणवायुयुक्त रक्त सर्व शरीरात पसरवण्याचे व सबंध शरीरातुन आलेले प्राणवायुरहीत रक्त परत फुफुस्साकडे प्राणवायु घेण्यासाठी पाठ्वणे हे त्या पंपाचे काम. ते व्यवस्थित व्हायला मुळात ह्रुदयाला पुरेसा प्राणवायु पुरतो की नाही हे तुमच्या कॉरोनरी आर्टरिज नॉर्मल आहेत की नाही याच्यावर व तुमच्या हृदयाच्या स्नायुच्या क्षमतेवर व फुफ्हुसाच्या क्षमतेवर अवलंबुन असते. ती क्षमता सवयीने वाढवता येते पण मुळात हृदयाचा पंपच जर क्षिण झाला असेल तर्(याची कारणे बरीच असु शकतात) तर कसुन सराव करुनही उपयोग होणार नाही.. किंबहुना अपायच होइल! म्हणुन हायझेनबर्ग म्हणतो त्या प्रमाणे आपल्या डॉक्टरकडुन जरुर त्या वैद्यकिय चाचण्या अश्या स्पर्धांमधे भाग घ्यायच्या आधीच नव्हे तर सायकलिंग,रनिंग, हायकिंग अश्या गोष्टी करायच्या आधी सगळ्यांनी..( यात वयाचा काहीच फरक पडत नाही हेही इथल्या तरुण व्यक्तींनी लक्षात घ्यावे..) करुन घ्याव्यात.

याचबरोबर तुमच्या रक्ताची प्राणवायु कॅरी करायची क्षमता तुमच्या रक्तात हिमोग्लोबिन किती आहे यावर अवलंबुन असते. ते जर कमी असेल्(म्हणजे तुम्ही जर अ‍ॅनिमिक असाल) तरीसुद्धा तुम्हाला तुमचे हृदय व फुफ्हुसे चांगली असुन सुद्धा धाप लागु शकते.

आता हृदय नामक पंपाची क्षमता कमी होण्याच्या असंख्य कारणांचा उहापोह करण्याचा हा बीबी नाही तरी तुम्हाला रक्तदाब ,मधुमेह व हाय कोलेस्टरॉल याचा त्रास नाही ना याची तरी निदान जरुर तपासणी करुन घ्यावी. कारण माझ्या असे पाहण्यात आले आहे की पुष्कळ वेळा ह्रुदयाचे दुखणे किंवा रक्तदाबाचे निदान होते तेव्हा लक्षात येते की रुंग्णाला मधुमेह व हाय कोलेस्टेरॉल चा त्रास आहे जो पुष्कळ वेळेला अनडिटे़क्टेड असल्यामुळे रुंग्णांना माहीतच नसतो!

तेव्हा थोडक्यात.. तुमच्या सायकलीला शर्यतीत उतरवण्याच्या लायकीची करण्यात जेवढा उत्साह व जेवढे बारकावे दाखवलेत तेवढ्याच उत्साहाने व बारकाव्याने तुमच्या शरीराकडेही लक्ष देण्याचे.. हायझेनबर्ग म्हणतो त्याप्रमाणे.. पुढच्या शर्यतीत भाग घ्यायच्या आधी विसरु नका.

अरे हो.. कालच मी रैनाची फुलोंकी घाटी ही तिच्या हिमालयाच्या ट्रीपची लेखमाला वाचली.. ती वाचल्यावर पण माझ्या मनात हेच विचार आले होते. तीने लिहीले जबरीच आहे पण ती सुद्धा तिथे अशीच धाप लागल्याची व खोकला आल्याचे म्हणत होती.. इट वॉज अ शुअर साईन ऑफ अक्युट पल्मनरी एडिमा! मी तिथेही आता जाउन लिहीतो की अश्या मोठ्या मोहीमेंवर जायच्या आधी खुप काळजी घ्यावी लागते नाहीतर जिवावर बेतु शकते!

हायझेनबर्ग आणि मुकुंद, अतिशय महत्त्वाचा मुद्दा व तपशील तुम्ही मांडला आहे.
आणि तो सर्वांनीच विचारात घेतला पाहिजे.
माझ्यापुरते म्हणाल, तर मी गेली ३/४ वर्षे नियमीत ब्लड डोनेशन करतो, हिमोग्लोबिनची पातळी चांगली आहे. ब्लडप्रेशरचा विकार नाही. इतकेच नव्हे तर माझ्या स्वतःकडेच ब्लडप्रेशर मोजायचे पार्‍याचे यंत्र/स्टेथास्कोप इत्यादी आहे, व वेळोवेळी स्वतः तपासुन घेत असतो. (हे यंत्र आणण्याचे कारण वेगळे होते... भावनिक उद्रेक/शांतता/मानसिक चलबिचल वगैरे वेळेस ब्लडप्रेशरवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी आणलेले). कोलेस्टेरॉलच्या बाबतीत गेल्याच वर्षी चाचणी करुन घेतली होती, ती नॉर्मल आलीये. मधुमेह नाहीये तसेच अ‍ॅनिमिकही नाहीये. मात्र या वयात इथुन पुढे दरवर्षी चाचणी करुन घ्यायला हवी हे नक्की.
तरीही काही शॉर्टफॉल्स आहेतच, ते असे की
४२ वर्षे बाळगलेला जुना दमा आहे. त्याला अनुसरून, सोबत आवश्यक ती औषधे बाळगावीच लागतात. तरीही मला दम्याची औषधे रोजच्या रोज घेतली तरच जगणे शक्य, अशी परिस्थिती सुदैवाने नाही. आत्यंतिक शारिरीक श्रम/विशिष्ट हवामान/थंडी व मानसिक तणाव/चिंता यापासून काळजी घेतली व आहारावर नियंत्रण ठेवले तर माझा दमा काबुत असतो. तरीही, असा मोठा प्रवास करताना, फुफ्फुसांना पुरेसा व हळूहळू वाढवित नेलेला सराव हवा हे मान्य. त्याची तयारी करतो आहे.
या व्यतिरिक्त, दातदुखी (वरखालीदोन्हीबाजुस दाढाच नसणे), पाईल्स-फिश्च्युला, कमरदुखी वगैरे अनुषंगिक दुखणी/व्याधी आहेतच. मी काळजी घेतो पण त्यांचे जास्त लाडही करीत नाही. ही दुखणी/व्याधी कुरवाळीत बसण्यात अर्थ नाही. असो.
या व्याधी/विकारांची पूर्वसूचना कुंडलीद्वारे माझी मला आधीच होत असतेच, व त्यानुसारही पूर्वतयारीतही असतो.
तुमचे मुद्दे लक्षात ठेवले आहेत. नक्कीच काळजी घेईन. मी अंगापलिकडे चार बोटे (क्षमतेपेक्षा जास्त) धाडस करणे शक्य नाही.
२०१२ मध्ये मी एक ट्रायल घेतली होती, लिंबीच्या गावी जाऊन लिंबीच्या शेतात एक शेततळे उभारले जिथे अ‍ॅक्च्युअल ४.५ वर्किंग डेज मधे पाचशेच्या आसपास सिमेंटची पोती मातीने भरून स्टेपल करून, उचलून नीट रचून, मध्ये काही ब्रास माती/मुरुमाची भर घालून काम केले. माती/मुरुम पहारीने खणून काढावा लागत होता. यावरून, तसेच लहान सायकल ट्रीप/चालणे केल्याने माझ्या एक लक्षात आले होते मी जर धाप लागेल अशा वेगात/ताकदीने श्रम केले नाहीत व नॉर्मल वा थोड्या जास्त श्वासगतीवर काम करीत राहिलो तर तासन्तास करू शकतो. माझी मर्यादा अशी की कोणत्याही परिस्थितीत मला "स्प्रिन्ट" सदृष घायताडलेली गोष्ट करून चालत नाही. अन आता इथुन पुढे सराव करायचा आहे तो हाच की मनाची आंतरीक वेगाची इच्छा/इर्ष्या दाबून धरुन निश्चित अशा कमी वेगानेच जास्त काळ जात रहाणे.
एनिवे, बघु पुढे काय काय शक्य होते ते. Happy

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

प्रतिसाद द्यायला उशीर झाला. लिंबू भाउ भाग घेतल्याबद्दल कौतूक आणि पुढील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.
तब्येतीस सांभाळून काय ते कर. मुलगा पण सायकलींग करणार हे फार छान आहे. केदारांचे लेख मी पण उत्साहाने वाचते. ( ऑफिसात एसीत लंचटाइम मध्ये!!) पण गुढघे दुखीमुळे सायकल चालवायचे सीरीअसली घेतले नव्हते. अकरावीत मी एकदा कोथरूड ते विमला बाई शाळा पावसात जोरात हाणलेली सायकल!! ते आठवले. आता एक लेडीज सायकल घ्यावीच म्हणते. घर ते ऑफिस तरी नक्की करता येइल.

समजुतदार लिंबू वहिनींना बेस्ट विशेस.

केदार तुम्ही छान लिहिता आणि सायकल चालवता. एकूणच वाहन सूख आहे तुम्हाला. जबरी. Happy

लिंबूभाउ तुमच्या जिगरीला सलाम. :). लेख ही उत्तम.
पण जरा सावकाश दमान घ्या. सौं. च जरा ऐकत जा.
तांत्रीक, शारिरीक व मानसीक तयारी विना अशी अचाट साहसे करणे नुसते धोक्याचे नाही, राग मानू नका , पण बेजबाबदार पणाचेही आहे.
कुठल्याही प्रोजेक्टची कुंडली आधी नीट मांडायला हवी. नाहीतर काय वक्री होइल सांगता येत नाही. Happy

मुळे झालय इतकेच, की इथुन पुढे माझ्या साथीला माझा मुलगा असेल. त्याचा मोरल सपोर्ट असेल. >>> ग्रेट! तुझ्या मेहनतीच चीज झालं.

Pages