वेदाध्ययनातील- संथा देणे... अर्थात वेदाभ्यास शिक्षण/पाठांतर पद्धती.

Submitted by अत्रुप्त आत्मा on 25 March, 2015 - 08:42

खुलासा:- वेदपाठशाळांमधे प्राचीन काळापासून अध्ययन/अध्यापनाची एकच एक अशी, परंपरागत पद्धती रहात आलेली आहे. ही पद्धती फक्त पाठ करून ठेवण्याच्या विषयाकरिताच निर्माण झालेली आहे. हिला सामन्यतः मौखिकी अध्यापन पद्धती असे म्हटले जाते. ह्या पद्धती विषयी खूप जणांच्या मनात कुतुहल,आस्था,चिकित्साभाव इत्यादी असते. आंम्हा पुरोहित मंडळीना काम करत असताना,पाठांतर पाहुन ह्या अनुषंगानी काहि प्रश्नंही विचारले जात असतात. अश्या सर्व प्रश्नकर्त्यांना हा विषय नीट माहिती व्हावा,एव्हढ्याच हेतूने हा सदर लेख येथे देत आहे.

@संथा देणे म्हणजे काय? >> संथा देणे म्हणजे ,वेदपाठ शिकविणारे गुरुजी , समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचे छोटे तुकडे(चरण)पाडून ,वदवून आपल्या मागे घोकायला/म्हणायला सांगतात..याला प्राथमिक अर्थानी संथा-देणे असे म्हटले जाते. यापुढे...(विद्यार्थ्यांनी)संपूर्ण पाठांतर करण्याच्या विशिष्ट पद्धतीला, संथा घालणे अगर संथा म्हणणे ..असे म्हटले जाते. एखादा विषय/याज्ञिकातला प्रयोग/संहितेचा अध्याय (तोंड)पाठ करताना, संथा म्हणण्याचे ४ ट्प्पे असतात.
१) चरणाची संथा(४वेळा) २) अर्धनीची संथा(४वेळा) ३) ऋचेची संथा(४वेळा) ४) गुंडिकेची संथा(४वेळा) = एकंदर १६ संथा.

१)चरणाची संथा:- चरणाच्या संथेत, गुरुजिं..प्रथम समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचा एकेक चरण दोनदा सांगतात.. मग विद्यार्थ्यांनी पोथित बघून तो त्यांच्या मागून ७वेळा घोकायचा. यात म्हणताना चूक झाली,की पुन्हा सुरवात. यात शुद्धअक्षर,जोडाक्षर,त्याचे गुरुत्व,अनुस्वारांचे उच्चार,स्वराघात,र्‍हस्व आणि दीर्घ/प्रदीर्घ-अश्या काना ,मात्रा,वेलांट्या,उकार, विसर्ग आणि त्यांचे तसेच उच्चार ,हे शंभर टक्के शुद्ध होत आहेत की नाहीत? हे गुरुजी कसून तपासत असतात. (कारण एकदा अशुद्ध पाठ झालं..की ती (मेंदूत उमटलेली) प्रींटाऊट,नंतर पुसणं कर्मकठीण असतं.) तर..हे स्तोत्रातले पाडलेले एकेक चरण ७ वेळा घोकत संपूर्ण अध्याय वा स्तोत्र - पूर्ण केलं जातं... ही झाली "चरणाची" पहिली संथा. अश्या चार संथा झाल्या की 'चरण' पूर्ण होतो. ही सगळी संथा गुरुजिंसमक्ष होते. (कारण तेच-मंत्रात अजिबात अशुद्धी राहू नये.)

२)अर्धनीची संथा:- अर्धनीच्या संथेत ,सामान्यतः दोन चरण एकत्र घेऊन..किंवा मंत्राची अर्धी ओळ सात वेळा म्हटली जाते. (काहि वेळा जगतिच्छंदा सारखा,मंत्राचा लांबलचक छंद असेल,तर एका ओळीत ४/४ किंवा अगदी ६/६ चरणंही पाडावे लागतात) आधी चरण डोक्यात-बसलेला असतोच..त्यामुळे इथपासून गुरुजी समोर नसले,तरी चालते. तर.. ही...एकामागून एक ओळ पूर्ण ७ वेळा घोकत ...संपूर्ण अध्याय पूर्ण केला... की अर्धनीची १ संथा झाली...आता अश्याच पुढे अजुन ३ संथा म्हणायच्या..म्हणजे या अर्धनीच्या चार संथा होतात.

३)ऋचेची संथा:- ऋचेच्या संथेत..मागील अर्ध्या ओळीच्या संथेचा पुढचा भाग सुरु होतो..म्हणजे आता २ ओळिंची संपूर्ण ऋचा ,आणि पुढच्या ऋचेचा पहिला चरण(धरुन) ..,तसे ७ वेळा म्हणायचे. यातील पुढच्या ऋचेचा पहिला चरण त्यात घेण्याचे वैशिष्ठ्य असे..की यामुळे संपूर्ण अध्यायातल्या प्रत्येक पहिल्या ऋचेची-दुसर्‍या ऋचेशी गुंफण तयार होते. (कनेक्टींग होते.) ऋचे'तल्या या (पहिल्या)संथेवर,शिकविणार्‍या गुरुजिंचे बारीक लक्ष असते. (कारण तेचः- अशुद्धी आली कींवा मधे कुठे तयार झालेली आहे काय? हे पहाणे.) ह्या ऋचेच्या परत पुढे तीन संथा म्हणायच्या. म्हणजे या ऋचेच्याही एकंदर चार संथा पूर्ण होतात.

४) गुंडीकेची संथा:-..हा शेवटचा, परंतू अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. आता मागील ऋचेच्या संथेनी हीचेच निम्मे काम केलेले असते. पण तरिही.., आता कितीही पाठ येत असले..तरी(यातल्या पहिल्या संथेला) पोथीत पाहूनच..सदर पाठांतराच्या अध्यायाचा एकेक अनुवाक अथवा वर्ग (पॅरेग्राफ) ७/७ वेळा म्हणायचा असतो. आणि तो सगळा अध्याय पूर्ण करायचा असतो. ही झाली गुंडिकेची पहिली संथा.. अश्या अजुन तीन म्हणून ,ह्या गुंडिकेच्या चार संथा पूर्ण करायच्या. या गुंडिकेच्या संथेमधे, साधारणपणे दुसर्‍या किंवा तिसर्‍या संथेपासून ,(आता) विद्यार्थ्याची..इच्छा अगर तयारी-नसली तरी विद्यार्थ्यांनी पोथित न पहाताच ,मान वर करुन संथा म्हणायची असते. कारण त्याशिवाय-पाठ येणे..ही क्रीयाच आकाराला येऊ शकत नाही. अर्थात कोणत्याही सर्व सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याला यातल्या शेवटच्या २ संथांमधे सर्वकाहि बिनचूक तोंडपाठ-येतेच. पण त्याहून(बुद्धिनी) आगे/मागे जे असतील..त्यांना कमी अगर जास्त कष्ट घ्यावे लागतात. तर,अश्या ह्या एकंदर १६ संथा घातल्या की आपल्याला अपेक्षित असलेला पाठांतराचा विषय-तयार होतो.

आता आपण याचे-संकलित..,एका स्तोत्रपाठांतराच्या उदाहरणाद्वारे पाहुया. (हे आणखि डिटेलिंग,विशिष्ट हेतूनी आणि जाणिवपूर्वक करत आहे.)

चरणाची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं,(७वेळा) गौरीपुत्रं विनायकम् ।(७वेळा)
भक्तावासं स्मरेन्नित्यं, (७वेळा)आयुःकामार्थसिद्धये॥(७वेळा)

प्रथमं वक्रतुण्डं च,(७वेळा) एकदन्तं द्वितीयकम् ।(७वेळा)

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं,(७वेळा)गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ (७वेळा).....
असेच प्रत्येक चरण म्हणत स्तोत्राच्या शेवटापर्यंत जायचे असते..मग येथे चरणाची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की चरणाची मुख्य संथा पूर्ण होते.

अर्धनिची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् ।(७वेळा)
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥(७वेळा) ॥

प्रथमं वक्रतुण्डं च, एकदन्तं द्वितीयकम् ।(७वेळा)

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ (७वेळा).....
अशीच प्रत्येक अर्धनि/अर्धी ओळ म्हणत स्तोत्राच्या शेवटापर्यंत जायचे असते..मग येथे अर्धनिची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की अर्धनिची मुख्य संथा पूर्ण होते.

ऋचेची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥..प्रथमं वक्रतुण्डं च(७वेळा)

प्रथमं वक्रतुण्डं च, एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ लम्बोदरं पञ्चमं च(७वेळा).....
अशीच प्रत्येक ऋचा ,पुढल्या ऋचेचा पहिला चरण तिच्यात लावुन म्हणत स्तोत्र एकेक ऋचेनी म्हणत पूर्ण घोकायचे असते..मग येथे ऋचेची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की ऋचेची मुख्य संथा पूर्ण होते.

गुंडिकेची म्हणायची संथा:-
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥ (सुरवात ते शेवट -७वेळा..)
.....असेच सुरवात ते शेवट -७वेळा.. म्हटले,की मग येथे गुंडिकेची एक संथा पूर्ण होते.अश्याच प्रकारे अजुन तिन संथा म्हटल्या,की गुंडिकेची मुख्य संथा पूर्ण होते.

आता आपल्याला आवश्यमेव असा एक प्रश्न पडेल,की "(बुद्धिचा..)इतका बारीक किस पाडून, ही पाठांतर पद्धती तयार होण्या/करण्यामागचे प्रयोजन काय बरे असावे???" Happy

उत्तरः- ज्या काळात ही पद्धती आली/विकसीत झाली.तो काळ लेखनकलेची सुरवातहि न झालेला असा काळ होता. अश्या वेळी आपल्या जिवापाड जपाव्याश्या वाटणार्‍या गोष्टींपैकी, ही मंत्र /काव्य/स्तोत्र जतनाची एक गोष्ट होती. आणि याशिवायंही ,पुढे लेखनकला विकसीत झाल्यावर..जो विषय वारंवार म्हणावा,वापरावा लागणार आहे..त्यासाठी भल्यामोठ्ठ्या पोथ्यांची बाडे बरोबर घेऊन हिंडणे.हे ऋषीमुनिंपासून ते सामन्यजनांपर्यंत सर्वांनाच त्याकाळी सोपे नव्हते. त्याशिवाय पोथ्या पाण्यानि/आगिमुळे,वाळवी/कसर लागण्यापुळे खराब होणे अशिही कारणे होतिच. आणखि म्हणजे, परस्पर विरोधीमतांच्या गटांनी एकमेकाचे लिखित स्वरुपातिल वांङगमय नष्ट करणे,हे ही एक प्रबळ कारण त्याकाळी होतेच...या अश्या सर्व कारणांसाठी हे ज्ञान मुखोद्गत-पाठ ठेवावे लागले असेल.(आमच्याकडला अचुक शब्द म्हणजे-जिवंत ठेवावे लागले असेल.) आणि विशेषतः जर ते जसे च्या तसे पाठ ठेवावे लागले असेल,तर त्याला अशीच तंतोतंत शब्दपाठांतराची पद्धती असायला हवी होती. आणि म्हणुन तसे जर का एकदा पाठ झाले,आणि त्याच्या वारंवार आवृत्या* म्हणुन पाठ ठेवलेही गेले, तर वरिल कारणांनी येणारे नष्टतेचे भय बाळगावे लागत नाही, हे तर निश्चित आहे. (आज आपण हे आपल्याला हव्या त्या सर्व विषयांसाठि, हजारो प्रकारच्या रेकॉर्डिंगच्या साधनांनि करतच असतो. Happy )

आता जसेच्या तसे...म्हणजे काय हो नक्की? तर खाली दिलेले हे गणपतिस्तोत्र पहात पहात ह्या लिंकवर http://mfi.re/listen/zxd8acxaxqxwc2i/ganapatistotra_myself.mp3 जाऊन हे क्लिपिंग ऐका. जेणेकरुन ह्या पद्धतिनी पाठ केले असता,जसेच्या तसे मेंदुत उमटते..म्हणजे काय होते? ते कळणे सहज होइल Happy
(गायकबियक कुणी नाही.. मीच आमच्या(उच्चार)पद्धतिनी म्हटलेलं आहे हां! Wink )
http://mfi.re/listen/zxd8acxaxqxwc2i/ganapatistotra_myself.mp3
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥

.........................................................................................................................

आवृत्ति*:- हा वेदाध्ययनातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. एकदा पाठ झालेला विषय/अध्याय..किमान २ वर्ष तरी दररोज १ आवृत्ती म्हणून जिवंत-ठेवावा लागतो. नाहितर आमच्याकडल्या प्रसिद्ध म्हणी प्रमाणे..तो नवव्या दिवशी नवा-होतो. म्हणजे अक्षरशः पुन्हा संथा-घेऊन शिकण्याच्या पातळीवर येतो. आणि असंही हे सोपं काम नसतच. नुसती ऋग्वेदाची संहिता घेतली..तरी त्यात आठ अष्टके..म्हणजे ६४ अध्याय आहेत. अध्ययन सुरु झाल्यापासून जसजसे पाठांतर वाढत जाइल..तसतसा हा आवृतीचा काळ वाढत जातो. आणि दर दोन वर्षानी समांतर होत रहातो. मग पुढे ब्राम्हण/आरण्यक्/उपनिषदे/शिक्षाचतुष्टय/ज्योतिष(फलज्योतिषवालं नव्हे!)/शास्त्र/निरुक्त असे अनेक ग्रंथोपग्रंथ पचवत, जिवंत ठेवत, अध्ययन करावे लागते..एका वेदाच्या दशग्रंथांच्या अध्ययनाला पहिल्या वर्षाला ६ तास.. इथून सुरवात होऊन..शेवटच्या वर्षाला हा शिक्षण कालावधी १६ ते १८ तासांपर्यंत जाऊन बसतो. म्हणूनच ऋग्वेदाचे दशग्रंथ पूर्ण कंठस्थ (पाठ) होण्याचा कालावधी किमान १२ वर्षे आहे.

पाठांतरातील अग्निदिव्य :- संचार जाणे .. संचार.., हा पाठांतराच्या वाटेतला अटळ सहप्रवासी आहे. आता संचार म्हणजे काय? तर एकसमान किंवा तोच तोच.. शब्द वा मंत्र ,संपूर्ण अध्ययनाच्या विषयांमधे कुठेही वारंवार येणे.. यामुळे काय होते? तर ..एका महारस्त्यावर जवळ जवळ सारखी नावं असलेले दोन फाटे असतील..तर नामसाधर्म्याच्या गोंधळामुळे, माणूस जसा या ऐवजी त्या गावात पोहोचावा. तसे काहिसे, हे सारखे-मंत्र अथवा शब्द करीत असतात. ऋग्वेदाच्या नुसत्या संहितेमधे असे हजारो संचार आहेत. नुसतं त्याच संहितेमधून वेगवेगळे पाच अध्याय व दोन सूक्त एकत्र करून निर्मिलेलं जे पंचसूक्त पवमान आहे..त्यात सुमारे आडिचशे संचार आहेत. बरं.., हे संचार म्हणजे फक्त (समान)शब्द आणि संपूर्ण अथवा अर्ध्या (समान)मंत्राचेच आहेत काय? आणि नुसते तेव्हढेच आहेत काय? तर..तसे नाही. काहि ठिकाणी तर, फक्त या अध्यायात या ओळीत विशिष्ट शब्दावर मात्रा आहे ..आणि एकदम पुढच्या कुठल्या तरी अध्यायात तोच मंत्र पण त्याच ओळिवर विशिष्ट शब्दावर (आता) मात्रा नाही, एव्हढाच फरक आहे. म्हणजे ही पवमानातली गंमत बघा. एके ठिकाणी "शुंभमा ऋतायुभि:" असे आहे,तर दुसरीकडे , "शुंभमानो ऋतायुभि:" असे आहे. परत दोन्ही कडच्या पुढच्या ओळी निसंशय वेगळ्याच असतात. आणि मग जर का हे लक्षात राहिले नाही..तर या अध्यायातून त्या अध्यायात उडी पडते. याच घडणार्‍या प्रकाराला म्हणतात, संचार-जाणे! उदाहरणा दाखल आपण आजुन एक दोन संचार पाहू .. सुदुघाहि-पयस्वती: आणि सुदुघाहि-घृतःश्चुतः.. हा शब्दाचा संचार झाला.हा ही सहज लक्षात रहातो. पण अनुस्वारांचे संचार म्हणजे,मेंदूची शस्त्रक्रीया करतांना जितकं बारीक..आणि नजर न हलता लक्ष ठेवावं लागेल..तसला भयंकर प्रकार. तो असा - पतामांतरिक्षा आणि पवंतामांतरिक्षा - या शब्दातल्या दुसर्‍या अक्षरावर ,म्हणजे व - वर ..प्रथम अनुस्वार नाही आणि नंतर पुढे, तोच अनु-स्वार-झालेला आहे!!! इतका सूक्ष्म फरक लक्षात राहाणे मुश्किल..आणि मग इकडून तिकडच्या आध्यायात उडि पडणे निश्चित! (यातलं पंचसूक्त पवमान..हे पाठ-ठेवायला अत्यंत कर्मकठिण आहे. मला स्वतःला हे पाठ झाल्यापासून सलग तिन महिने याची आवृती ठेवल्यानंतरही..पुढे पुन्हा सलग २ महिने पाठ म्हणताना, रोज २ अथवा ३ संचार-जायचेच! आणि ते ही रोज वेगवेगळे! आज ह्या गल्लीत चुकलो,की उद्या त्या गल्लीत! रामा..शिवा..आणि गोविंदा..बाकि काही नाही! )

आता आपल्या सुप्रसिद्ध रुद्रातला हा शब्दसंचार..,प्रत्यक्षच कसा-जातो..?ते पहा...
(रुद्रामधे, आकरा नमका'चे आणि आकरा चमका'चे असे एकंदर २२अनुवाक आहेत.)

यातल्या नमकाच्या पहिल्या अनुवाकातल्या तिसर्‍या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनुरघोरा पापकाशिनी। आणि पुढची (वेगळी)ओळः- तयानस्तनुवा शंतमया गिरिशंता भिचाकशीहि॥

आता इथून सरळ नमकाच्या दहाव्या अनुवाकातली दुसर्‍या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनु:शिवाविश्वा हभेषजी। आणि पुढची (वेगळी)ओळ:- शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥

आता यात जर का रुद्र म्हणणारा माणूस पहिल्या अनुवाकात , यातेरुद्र शिवातनु च्या पुढे शिवाविश्वा हभेषजी असे चुकून म्हणून गेला..तर त्याची पाठांतर पद्धतीमुळे मेंदूत कोरली गेलेली पुढची ओळ ही दहाव्या अनुवाकातली ,म्हणजे शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥
.., हीच तोंडातून उमटणार. हा गेला संचार! आणि याच्याही अगदी उलट घडून दहाव्या अनुवाकातून पहिल्या अनुवाकात असा उलटंही तो येणार.म्हणजे - संचार जाणार!

आणि कित्तीही कुशाग्र बुद्धिमत्तेचा माणूस असला , तरी संपूर्ण एका वेदातले असे हजारो संचार लक्षात ठेवणं हे सामान्य बुद्धीमत्तेच्या बाहेरचचं काम.. मग हे काम सोप्प व्हावं म्हणून पुढे .. वेदांमधे पद/क्रम/जटा/माला/घन अशी सोय निर्माण करण्यात आली. याचा उचित वापर केला..कि हे संचारचं गाडं आडवं आलं, तरी त्याला नीट उभं करता येतं. (याविषयी पुन्हा केंव्हा तरी असच लिहिन! ) अर्थात, ज्या अध्ययनाचा आधार फक्त आणि फक्त पाठांतर हाच (राहिला)होता, त्या अतीप्राचीन (लेखनकलेची सुरवातही न झालेल्या) कालखंडात अश्या तर्‍हेच्या युक्त्या अथवा सोयी सुचणं, हे ही त्याच मानवी बुद्धीशी सुसंगतच म्हटलं पाहिजे. मग त्याचं समर्थन आजच्या आणि यापुढच्या काळात कोणत्याही पद्धतीनी अगर हेतूनी होवो.

आज हा पाठांतर पद्धतीचा छोटासा आढावा घेणारा लेख लिहुन झाला याचं समाधान एका कारणानी तर आहेच आहे.

१) वेदज्ञान.., हे त्या किंवा आजच्या अथवा पुढच्या काळात उपयोगी/अनुपयोगी .. उपकारक/अनुपकारक..असं कसंही असलं .तरी .. हे ज्ञान पूर्वी आणि आजही पाठ ठेवणारे जे वेदाध्यायी आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेची जाणिव..या लेखनामुळे करवून देता आली.(एरवी..हे नुसतं सांगून शक्य नाही,आणि नसलंही पाहिजे. Happy ) याशिवाय.., जे लोक:- "ह्हॅ!...हे शिकायला काय अक्कल अथवा बुद्धी लागते?" असे (कोणत्याही हेतूने) म्हणतात..त्यांना.. किमान हा लेख वाचल्यानंतर,पुन्हा असं म्हणताना,काहि क्षण थांबून विचार करावा लागेल...
धन्यवाद. Happy
===============================================
पराग दिवेकर..(हिंदू पुरोहित.)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ ते दिसायला चंद्रकोरीवर अनुस्वार आणि तिच्या खाली पाय मोडलेला असे असते. या चिन्हास काय म्हणतात? >>>>>> त्याला रंङग असे म्हणतात. उच्चार तुम्हाला सांगितला तसाच आहे.

पराग मस्त लेख.. छान माहिती.

चिंचवडात विघ्नहरी देव महाराज आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब (सौ. देव आणि त्यांची ४ अपत्ये) संस्कृत अध्ययनाचे कार्य गेली कित्येक वर्षे करत आहेत. लेख वाचून सर्व आठवणी जाग्या झाल्या. पूर्वी हे अध्ययन मंगलमूर्ती वाड्यात चालायचे. तिथेपण एक वेदपाठ शाळा आहे. टिमविच्या सर्व परिक्षा, कोविद, विशारद , पंडीत ई चे अभ्यासक्रम वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या (पुणे) प्रवेश परिक्षेचा अभ्यास असे सर्व काही असायचे. तुम्ही म्हणता तशाच पद्धतीने शिकल्याचे आठवते. आधी चरण ( र्‍ह्स्व, दिर्घ, मः आणि मा: चे होणारे उच्चारण, कुठे संधी करायचा ई ई) मग अर्धी ओळ, मग पूर्ण श्लोक.. बरीच मुले असली तरी कोण म्हणताना चुकला आहे हे बरोबर समजायचे.

वेदपाठ शाळेतल्या मुलांबद्दल तर कायम कौतुक आहे. केवढी लहान लहान मुले असायची. घर सोडून रहायचे, सोवळ्या ओवळ्याचे नियम, खाण्यापिण्याचे नियम, आणि एवढे प्रचंड पाठांतर करायचे. असो.. मस्तच लेख.

काउ

@ऑडिओ फाइल्स ओपन होत नाहीत >> होते आहे ओपन... अगदी व्यवस्थित. आपल्या इथुन सदर साइट बॅन आहे,किंवा ब्राऊजरला काहि अडचण आहे का? ते पहा.

धन्यवाद, पराग.

> वेदांमधे पद/क्रम/जटा/माला/घन अशी सोय निर्माण करण्यात आली.

या व्यतिरीक्त खालील संज्ञा सापडल्या. पण सविस्तर माहिती मात्र मिळाली नाही.
“वाक्य”, “पद”, “क्रम”, “जटा”, “माला”, “शिखा”, “रेखा”, “ध्वज”, “दंड”, “रथ”, “घन”

यातील भेद सांगू शकाल का? या सर्वांची काय गरज होती? या प्रत्येकातील पठन क्रम कसे ठरले?

रुद्र घनपाठाची ही एक लिंक मिळाली: https://www.youtube.com/watch?v=aoppjYkH9mQ
३:१७ ला सुरुवात होते.

अरे इथे पहिल्या पानावरच्या माझ्या दुसर्‍या प्रतिसादात लिंक दिली आहे. इथेच दुसर्‍या एका बीबीवर मी उदाहरण घेऊन पद, क्रम, घन अशा ३-४ पद्धती विशद केल्या होत्या

धन्यवाद - 3 May, 2013 - 00:37 आणि त्याखालील ...

हे प्रकार रिडन्डण्ट आहेत, काँप्लिमेण्टरी नाहीत.
हरिहरनी तिथे लिहिल्याप्रमाणे वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या शकली लढवलेल्या दिसतात
वेद आपल्यापर्यंत पोचण्याचं काम झालं हे महत्वाचं

हे प्रकार रिडन्डण्ट आहेत, काँप्लिमेण्टरी नाहीत. >> मेक्स सेन्स. १२३, ३२१ किंवा आणखी क्लिष्ट प्रकार करून मूळ साध्य (जर वेद पाठ करणे असेल तर) करण्यात काही मदत होत असेल असं (मला) वाटलं नाही. गुणाकार करायच्या १० पद्धती माहित असल्या तरी कुठलीही एक वापरून गुणाकार येणे महत्त्वाचे. अर्थात मूलभूत संशोधक आणखी पद्धती शोधून त्या वापारून त्यातून वेगळा शोध लावू शकतो हे मान्यच.

हो, कॉम्प्लिमेन्टरी नव्हेतच. पण त्यांच्या अवघडतेची चढती भाजणी असते आणि दहातील सर्वात क्लिष्ट म्हणजे घनपाठ. या पद्धती त्यांच्या क्लिष्टतेप्रमाणेच्या भाजणीत एकामागून एक शिकत टप्पे ओलांडत शेवटी घनपाठ जो शिकेल (म्हणजे दहांही पद्धती ज्याला पूर्ण अवगत होतील) तो घनपाठी.
तर्काने मग असेच पदपाठी, जटापाठी, रेखापाठी वगैरे ब्राह्मण ओळखले जात असतील पूर्वी असं वाटतं

दहांची चढती भाजणी किंवा विविध पद्धती एकामागून एक शिकणे म्हणजे, कुठल्याही एका पाठस्मरणात चूक असेल तर ती रहायचा संभव नाही. इतके वेळा विविध प्रकाराने घोटून घेतले जाते

@ वाक्य”, “पद”, “क्रम”, “जटा”, “माला”, “शिखा”, “रेखा”, “ध्वज”, “दंड”,
“रथ”, “घन”>> यातील ... मी ज्या प्र्कारांचा उल्लेख केलाय तेच उपयुक्त राहिले, बाकी लोप पावले. ह्या विकृति संचरांशि लढा देण्याच्या प्राथमिक गरजेतून जन्माला आल्या आहेत.

फार छान. अजून खूप वाचायला आवडेल. अल्पबुद्धीमुळे पडलेले काही प्रश्न -

१. चरण हे सात वेळाच का घोकायचे? तीन किंवा दहावेळेला का नाही? याबाबत काही मार्गदर्शन आहे का? की वेगवेगळे गुरू, वेगळी आवर्तनं?

२. 'षड्भिर्मासैः फलं' मधला फ हा इंग्रजी फ सारखा ऐकू येतोय, फणसातला फ नाही. कुठला बरोबर आहे? संस्कृतमध्ये इंग्रजी फ सारखा उच्चर होतो का हे जाणून घ्यायला आवडेल.

३. स्प्ष्टोच्चार आणि मंत्र म्हणताना होणारा नाद किंवा तयार झालेली लय याचा समतोल कसा राखावा? कधीकधी उच्चार अतिस्पष्ट झाले किंवा करायचे असतील तर त्याकडेच लक्ष जाते आणि श्लोक फक्त जोडाक्षरांची ओळ वाटू लागते. याबाबतीत काय अभिप्रेत आहे?

माहितीपूर्ण लेख. वर उल्लेखल्याप्रमाणे मलादेखील ७ वेळाच का पठण करायाचे हा प्रश्न पडला आहे. त्या काळी ७ या आकड्याला काही विशेष महत्त्व होते का?

अमितव
@मेक्स सेन्स. १२३, ३२१ किंवा आणखी क्लिष्ट प्रकार करून मूळ साध्य (जर वेद पाठ करणे असेल तर) करण्यात काही मदत होत असेल असं (मला) वाटलं नाही. गुणाकार करायच्या १० पद्धती माहित असल्या तरी कुठलीही एक वापरून गुणाकार येणे महत्त्वाचे. >>> बरोबर. परंतू हे तेव्हढ्यावर संपत नाही. हा जो प्रकार पदा'च्या पुढे वाढत जातो. तो आला कोणत्याही कारणानी असो. त्या पद्धती वापरून मंत्र अगर एखादा अध्याय वा कोणत्याही एका वेदाची संपूर्ण संहिता ही घना'मधे म्हणणे(पारायण करणे..),ह्याकरिता जो बुद्धीचा कस लागतो.विद्वत्तता लागते. त्या साठी ह्याचा वापर प्रामुख्यानी झालेला आहे. संचार जाताना सम शब्दाच्या पुढील वेगळा शब्द हा ह्या विकृतींच्या माध्यमातून म्हणताना चटकन सापडतो.(कॉट होतो.) हा मी पाहिलेला एकमेव फायदा वजा जाता,वरिल कारणास्तवच ह्या विकृतींचा वापर केला गेलेला आहे. (विकृती-हा शब्द सदर विषयासंदर्भात एक संज्ञा एव्हढ्याच अर्थाने अभिप्रेत आहे/असतो..) आजंही संहितेचे तोंडपाठ पारायण करणार्‍या वैदिकाला जितका मान दिला जातो. त्यापेक्षा कैक पटीनी त्याच संहितेचे घन-पारायण करणार्‍याला असतो. अगदी गेल्या १०० वर्षात असे घनांत पारायण (बिनचूक) केलेल्या वैदिकांची हत्तीवरून मिरवणूक काढली गेलेली आहे. काशीहून निरनिराळा मानाचा-मानसन्मान करवला गेलेला आहे. (वैदिक क्षेत्रात,काशीहून मिळणार्‍या सन्मानाला भारतात आजही सर्वोच्च समजले जाते)

==================================
विजिगीषु
@१. चरण हे सात वेळाच का घोकायचे? तीन किंवा दहावेळेला का नाही? याबाबत काही मार्गदर्शन आहे का? की वेगवेगळे गुरू, वेगळी आवर्तनं?>>> नाही आपण समजता तसे काहि एक नाही. ही एक अभ्यासंसिद्ध परंपरा आहे. मी लेखामधे उल्लेखिल्याप्रमाणे हे ७/७ वेळा आणि ४/४ संथा अश्या टप्यानी घोकणे व एकंदर १६ संथा म्हणणे. याचा सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेल्या कोणत्याही माणासाला होणार्‍या पाठांतराशी प्रमाणभूत संबंध आहे. जे लोक थोड्या कमी बुद्धीचे असतात.त्यांना एकेक संथा अधिक म्हणावी लागते.(त्यांच्या एकंदर २० होतात..) त्याहून कमी वाल्यांना प्रत्येकी७/७ संथा घालाव्या लागतात. त्याखाली असलेला माणूस ह्या शिक्षणाला सर्वस्वी अपात्र ठरतो.

@२. 'षड्भिर्मासैः फलं' मधला फ हा इंग्रजी फ सारखा ऐकू येतोय, फणसातला फ नाही. कुठला बरोबर आहे? संस्कृतमध्ये इंग्रजी फ सारखा उच्चर होतो का हे जाणून घ्यायला आवडेल.>>> विसर्गापुढे फ आला ,की उच्चाराच्या व्याकरणानुसार तसा उच्चार केला जातो. ते साधारण 'षड्भिर्मासैः(sssफ्) फलं' लभेत्। असे ऐकू येते. फ मधे विसर्गाचा उच्चार मिसळू नये,म्हणून ती योजना आहे.

@३. स्प्ष्टोच्चार आणि मंत्र म्हणताना होणारा नाद किंवा तयार झालेली लय याचा समतोल कसा राखावा?>> आपल्या नैसर्गिक-पट्टी'त किंवा प्रॅक्टीस झालेल्या पट्टी'त म्हणायला सुरवात केली की,हा समतोल आपोआप साधला जातो.

@कधीकधी उच्चार अतिस्पष्ट झाले किंवा करायचे असतील तर त्याकडेच लक्ष जाते आणि श्लोक फक्त जोडाक्षरांची ओळ वाटू लागते. याबाबतीत काय अभिप्रेत आहे? >> तसे होत असेल्,तर उच्चाराची तालीम बसे पर्यंत तिकडेच पूर्ण लक्ष जाऊ द्यावे. ते एकदा बसले..की पुढचे सगळे आपोआप सुरळीत होइल. परंतू तिकडे लक्ष देण्याचीच प्रवृत्ती असेल्,तर ह्याचा संबंध आपल्या स्वभावाशी असतो..त्याचे वर्काऊट स्वभावातच शोधावे लागेल.
==================================================================
charcha
वर उत्तर दिले आहे. तेच कारण आहे. बाकि काहिही नाही.
=====================================================

पराग दिवेकर,

तुम्ही उदाहरणासहित छान माहिती दिली आहे. असे अजून लेख वाचायला आवडतील. धन्यवाद.

फारच छान लेख.
संस्कृत भाषेचा अभ्यास असल्यास जास्त बरे असे वाटते. मग वरचे काही प्रश्न उद्भवणार नाहीत.

मी तुम्हाला विचारपूस मार्गे काही प्रश्न विचारले, माझी काही मते लिहीली तर तुम्हाला राग येईल का?
इथे विचारत नाही कारण इथे माझी कुप्रसिद्धी एक अत्यंत वात्रट, उथळ नि पांचट लिहीणारा अशी आहे. (सकारण!)
धन्यवाद.

शास्त्रीबुवा, संस्कृत स्तोत्रादींच्या लिखित स्वरुपात त्यावर आरोह, अवरोह दर्शविणारी चिन्हे असतात त्याबद्दल माहिती ऑडिओ फाईलसह द्यावी ही विनंती.

@संस्कृत स्तोत्रादींच्या लिखित स्वरुपात त्यावर आरोह, अवरोह दर्शविणारी चिन्हे असतात त्याबद्दल माहिती ऑडिओ फाईलसह द्यावी ही विनंती.>> ती सगळी मंत्रांची स्वरंरचना आहे. इथे ती केवळ (नुसती) निदर्शवून भागणार नाही. त्याला एखादं व्हिडिओ प्रात्यक्षिक करून इथे सादर करावं लागेल.

तरिही ऋग्वेद,कृष्ण यजुर्वेद्,अथर्ववेद यातील मंत्रांना उदात्त(वरचा) आणि अनुदात्त(खालचा), असे दोनच स्वर आहेत. शुक्ल यजुर्वेदाला सामान्यतः, तीन ते चार प्रकारचे स्वर आहेत. सामवेदाला स्वर आहेत,असे म्हणायचे..ते केवळ त्यातील मंत्र पाठ होण्यापुरते. असच म्हणावं लागेल. एरवी सामवेद हा मंत्रगायनाचाच वेद आहे.

अत्रुप्त, छान माहिती.

मंत्र पाठ असणारे अनेक पाहिलेत पण कित्येकांना आपण काय म्हणत आहोत त्याचा अर्थ माहिती नसतो. तुम्ही दिलेल्या पठण पद्धतीत अर्थ सांगितल्या जातो असे कुठेच लिहिले नाही. माझा प्रश्न आहे: एखादा मंत्र पाठ आहे पण त्याचा अर्थ माहिती नाही. असा फक्त मंत्र शिकवून काय फायदा होतो ? आपण फक्त मंत्र म्हणतो पण ज्ञान मिळत नाही.

Pages