अष्टपैलू मॅन्युफॅक्चरर्स प्रा.लि.

Submitted by mi_anu on 25 March, 2015 - 14:07

आन्याला स्केटिंग क्लासहून घरी सोडून आणि दूध बिस्किट देऊन टिव्ही लावून देऊन आजोबा त्यांच्या नेहमीच्या कट्ट्यावर येऊन बसले.
या कट्ट्यावरुन बसल्या बसल्या सर्व सोसायटीतल्या घडामोडी कळत. तसा आज उशिरच झाला होता कट्ट्यावर यायला. नेहमीचे लोक जेवायला घरी गेले होते डोक्यावर डास घोंघावायला चालू झाले होते. अनिलचा दुपारीच फोन आला होता "बाबा आन्या आज शाळेतून थेट स्केटिंग क्लास समोर उतरेल.तुम्ही सहा ला घेऊन याल का तिला शेजारच्या सोसायटीतून? उद्या परवा रुद्राचे बाबा घेऊन येणार आहेत. नंतर रस्ता कळला की मुलं स्वतः येतीलच."

प्रत्येक घरटी २-११ वयातली मुलं असलेल्या या सोसायटीतल्या लोकांचा मुख्य धंदा नोकर्‍या करुन घरात पैसा आणून घरांचे प्रचंड कर्ज हफ्ते भरणे आणि जोडधंदा मुलांना वेगवेगळ्या क्लासेस ला घालून त्यांचे व्यक्तीमत्त्व अष्टपैलू आणि पॉलिश्ड बनवणे हा होता. त्यामुळे रुद्रा, अग्र, दक्ष, अर्णव, अर्थ, श्लोक, वेदा अश्या दोन अक्षरी नावांची मुलं सतत कोणत्यातरी क्लासांना जाताना किंवा तिथून त्यांच्या रंगीबेरंगी सायकली घेऊन येताना दिसायची. नावाचा विचार आल्यावर आजोबा मनात परत उखडले. "आन्या काय आन्या? छान अनया, अनुपमा, अनुराधा ठेवायचं तर नाही!! आन्या म्हणे. रशियन नाव. तरी हिने अश्विन नक्षत्रावर जन्मली म्हणून अश्विनी नाव ठेवा म्हणून किती सुचवून पाहिलं. पण अमेरिकेचे बूट, जर्मनीची गाडी, फ्रान्सचा परफ्युम, लंडन चा साबण वापरणारी मोठी मंडळी ही!! साधंसुधं छान नाव पटायचं कसं?" आता सोसायटीतल्या १० बायका वेगवेगळ्या विषयांचे क्लासेस घेऊन मुलांचा जाण्यायेण्याचा वेळ बराच वाचवायच्या म्हणून बरं होतं. त्यामुळे दुसर्‍या मजल्यावर अबॅकस, शेजारच्या विंगमध्ये स्केटिंग,शेजारी संस्कारभारती रांगोळी, नऊव्या मजल्यावर "बॉलीवूड डान्स" असं जवळच्या जवळ भागून जायचं. "काही दिवसांनी आपल्या सोसायटीत विद्यार्थीच राहणार नाहीत कारण सगळे क्लासेस उघडून बसलेले असतील" असं अनिल म्हणायचाच.

आता पण समोरचा दर्श सायकलीवरुन येताना दम खायला कट्ट्यापाशी थांबला आणि आजोबांना गप्पा मारायला नवं सावज मिळालं. "काय रे कुठून येतोयस?" "तायक्वांदोचा क्लास आहे." "आता परवा तर पर्सनॅलिटी ग्रूमिंगला जातो म्हणत होतास ना? आणि रस्ते माहित आहेत का तुला? मी सोडू का?" "ओह आजोबा, ते एव्हरी ट्युसडे फक्त. मन्डे, थर्स्डे तायक्वांदो, वेन्सडे ड्रॉईंग, फ्रायडे बॉलीवूड डान्सिंग अँड साल्सा, आणि सॅटरडे अबॅकस. तायक्वांदोहून मी आपला आपला येतो, पर्सनॅलिटी ग्रूमिंगवाल्यांचा ड्रॉप आहे, बॉलीवूड डान्सिंगहून तनिश्काची आई घेऊन येते, आणि सॅटरडे ला आई घ्यायला आणि न्यायला येते. माझ्याकडे या बुक मध्ये फोटो आहेत तेवढी माणसं पिक अप ला आली तरच जायचं नाहीतर "नो, थॅंक्स, माझा इथेच दुसरा क्लास आहे" असं सांगून तिथेच थांबायचं. ओके बाय आजोबा!! सी यु अगेन!" (हा सात वर्षाचा गडी एक चालती बोलती मेमरी बँकच होता. त्याला जगातल्या सगळ्या गोष्टी कोणी शिकवण्या आधीच माहिती असत.)

आजोबांना नेहमीप्रमाणे दर्शचा 'क्लासी' दिनक्रम ऐकून मानसिक थकवा आला. "सात वर्षाचं पोरगं सर्वकला निपुण व्हायलाच पाहिजे का? हा मुलगा मैदानावर खेळायला, स्वतःचा वेळ घालवायला, कधीतरी निवांत बसून मित्रांबरोबर गप्पा मारायला कधी शिकणार? सर्व कसं प्रोफेशनल. क्लास, पिक अप, ड्रॉप, क्लासची इमेल्स पालकांना. अजून मुलं क्लासेस ला आणि तिथून डिलीव्हर आणि पिक अप करणारी कुरियर निघाली नाहीत हे आश्चर्य. या मुलांच्या मैत्र्या पण या क्लासेस सारख्याच घडवलेल्या. ज्याची आई किंवा बाप पिक अप ड्रॉप आळीपाळीने करणार असतील त्यांची मुलं यांचे मित्र आणि मैत्रिणी." आपण का चिडतोय आजोबांना कळत नव्हतं. मुळात आपण चिडून काही उपयोग नसताना आपण का उगीचच त्रास करुन घेतोय? ती मुलं आणि त्यांचे आईबाप बघून घेतील बापडे. पण अनिलशी बोलून त्याला जरा गोडीत सांगावं की आन्या अजून पाच वर्षांचीच आहे, तिला असं दाबून टाकू नका क्लासेस च्या ओझ्याखाली. आजोबा उठले आणि घराकडे चालयाला लागले.

घरी आल्यावर नेहमीप्रमाणे टिव्हीवर ऑगी अँड कॉकरोचेस लागलं होतं आणि आन्या अनिमीष नजरेने बघत समोर ताटात जे असेल ते खात होती. अनिल-स्नेहा टेबलवर लॅपटॉप आणि आयपॅड उघडून बसले होते. त्यांच्या दिवसभराच्या सर्व गप्पा गाडीतून एकत्र येताना जो एक तास ट्रॅफिकमुळे लागायचा त्यात मारुन संपायच्या. जेवण झाल्यावर आन्या आणि स्नेहा झोपायला गेल्या आणि अनिलने टिव्हीचा ताबा घेतला.ऑगी आणि डोरेमॉन इ. च्या अखंड रतिबात अनिलला टिव्ही बघायला मिळणे हे लोक सिग्नल पिवळा झाल्यावर गाड्यांचा वेग कमी करण्याइतकेच दुर्मीळ होते. डिस्कव्हरीवर गाड्या, अ‍ॅनिमल प्लॅनेट वर विषारी साप किंवा कोणत्यातरी बातम्यांच्या चॅनेल वर कोण्यातरी हिंस्र पत्रकाराला कोण्यातरी अश्राप राजकारण्यावर शाब्दीक हल्ला करताना बघणे ही एक आठवडी किंवा मासिक चैन होती.
"काय रे, आता हा स्केटिंगचा क्लास किती दिवस चालणार?"
"तिला आवडला तर दोन वर्षं पण. पण सध्यातरी सहा महिन्याचा एक मॉड्युल आहे. आणि नंतर तिला कथ्थकला घालावं असं स्नेहा म्हणतेय."
"तू लहान असताना तुला पहिला क्लास दहावीत असताना लावला होता.पाच आणि सहा वर्षाच्या पोराला इतके क्लास कशाला?"
"बाबा, आजूबाजूच्या सगळ्याच मुलांना तीन क्लासेस आहेत. तरी आपण आन्याला एका वेळी एकच क्लास लावतो. तुम्हीच म्हणत होतात ना परवा, मुलांची मनं टीपकागद असतात म्हणून? मग या टीपकागदाला आताच शोषायला चांगल्या गोष्टी आम्ही देतोय."
"पण सगळे गोड, तिखट, आंबट, तुरट, कडू सर्व चवींचे घास एकदम भरवण्याची ही घाई कशाला? पोरं उद्या नोकरीला लागणार आहेत का? पोराने एकाचवेळी हॉकीत ध्यानचंद, भरतनाट्यममध्ये कोण ती मल्लिका साराभाई, स्केटिंगपटू, रेसिंगमध्ये शूमाकर वगैरे वगैरे सात वर्षं पूर्ण व्हायच्या आतच व्हायला हवंय का? क्लासला येणारी जाणारी यंत्रं बनतायत माझ्या आजू बाजूला. माझी पोरं हरवलीयेत आणि त्यांच्या देहात या क्लास हून त्या क्लास ला फिरणार्‍या शटल बसेस दिसतायेत." अनिलने टिव्ही बंद केला आणि तो जरा आश्चर्याने बघायला लागला. बाबांना सलग इतकी वाक्यं बोलताना त्याने आई गेल्यापासून पहिल्यांदाच पाहिलं होतं.
"आजूबाजूची मुलं पाहिली ना तुम्ही? आज शेजारचा सात वर्षाचा मुलगा अभ्यासात पहिला, श्लोकाच्या स्पर्धेत दुसरा,स्केटिंगमध्ये पहिला, तायक्वांदो मीट मध्ये रनर अप आहे. आपल्या आन्याला या लोकांच्यात, या जगात टिकाव धरायचाय.तिच्यावर क्लासेस चं पोतं लादायचं नाही आम्हाला, पण या ऑल राऊंडर मुलांबरोबर उठता बसता तिचा आत्मविश्वास कायम राहिला पाहिजे. आम्ही म्हणत नाही की ती प्रत्येक क्लास मध्ये पहिली यावी. पण आजूबाजूच्या पाच मुलांना जे येतं ते तिला यायला नको का? बाबा धिस इज नो लाँगर अ‍ॅन एक्स्ट्रा एफर्ट बट अ सर्व्हायवल."
"समजा नाही आलं तिला तायक्वांदो, नाही आलं ओरीगामी. आकाश कोसळणार आहे का?"
अनिल समोरच्या वर्तमानपत्राचा कागद फाडून रॉकेट करत होता. शून्यात बघत होता.
"वीस वर्षापूर्वी एका छोट्या खेड्यातून इंजिनीयरिंगला आलो होतो मी. आजूबाजूला सगळी झकपक कपडे वाली मुलं. सर्व संभाषण इंग्लिश मध्ये. मी वर्गात उशिरा आल्यावर आत यायला काय बोलावं लागतं त्याची वाक्यं जुळवत शेवटी पूर्ण तास चुकवायचो तेव्हा ही मुलं फिरोदिया आणि इंग्लिश डीबेट मध्ये भाग घेत असायची. शिकताना प्रोफेसरच्या नजरेला नजर मिळवायचो नाही मी. कोणी काही विचारलंच तर उत्तर द्यावं लागेल म्हणून. या काँप्लेक्स मधून बाहेर पडायला मला आठ वर्षं लागली.अजूनही इंटरव्ह्यू ला सोन्यासारखा एखादा हुशार मुलगा फक्त फर्ड्या इंग्लिश मध्ये नीट बोलला नाही म्हणून पहिल्या फेरीलाच बाहेर जाताना पाहतो. माझ्या साठी जो राक्षस इंग्लिश होता तो माझ्या मुलीसाठी तायक्वांदो किंवा हॉर्स रायडींग किंवा कथ्थक-बॉलीवूडी डान्स असू शकेल. मला यंत्र नाही बनवायचं पण इतर हंस टोचून त्रास देतील असं बदकाचं पिल्लू पण नाही बनवायचंय."
आजोबा शांत बसून राहिले. "आपण ज्याला एक्सलंस समजत होतो या मुलांचा तो यांचा सर्वात कमी उंचीचा बार आहे.सर्वांना त्या बार पर्यंत पोहचायलाच हवं.आपण फार फार तर त्यांचे खांदे अवघडणार नाहीत इतकं बघू शकतो, त्यांना आपण फक्त वर उंच होऊन हे बार धरायची मानसिक आणि शारिरीक शक्ती कशी येईल हे बघू शकतो." शांतता आजोबांच्या मनावर परत गार झालेल्या चहावर साय धरते तशी पसरायला लागली.

आज बर्‍याच दिवसांनी कट्ट्यावर येणं झालं. दर्श त्याच्या स्केट वरुन तूफान वेगाने येत होता. आजोबांना बघून थांबला. "काय रे दर्श, आज कोणता क्लास?"
"आजोबा माझे ग्रूमिंग आणि बॉलीवूड डान्स क्लासेस आईने बंद केले. ती एका पॅरेंटल गायडन्स च्या क्लास ला जाते ना, तिथल्या सरांनी सांगितलं की मुलांना क्लासेस एक एक करुन लावा आणि बाकी स्पेस फिजीकल अ‍ॅक्टिव्हिटी वाल्या खेळाना द्या. सो आता माझा फक्त तायक्वांदो आणि शनिवारी "स्ट्रेस मॅनेजमेंट अँड टाईम मॅनेजमेंट" चा क्लास आहे. बाकी मज्जा!!!" म्हणून दर्श परत भरधाव वेगाने घराकडे सुटला आणि आजोबांचा रोखलेला श्वास पण सुटला.
"हॅ! आपण फुकटच त्रास करुन घेत होतो. एक क्लास आपणच उघडायला हवा "मुलांच्यात एकावेळी शंभर क्लासेस ला न घालताही आत्मविश्वास कसा आणावा याचा"!! हाय काय नि नाय काय!!"

(या लिखाणात कोणाचीही बाजू घेतलेली नाही कारण दोन्ही बाजूंची कैफियत तितकीच बरोबर आणि तितकीच खरी. आपण कोणाच्या जोड्यात पाय घालून बघतोय त्यावर सगळं आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं!
<< या सोसायटीतल्या लोकांचा मुख्य धंदा नोकर्‍या करुन घरात पैसा आणून घरांचे प्रचंड कर्ज हफ्ते भरणे आणि जोडधंदा मुलांना वेगवेगळ्या क्लासेस ला घालून त्यांचे व्यक्तीमत्त्व अष्टपैलू आणि पॉलिश्ड बनवणे हा होता.
>>
हे भारी आहे.

>>>>>>>>>>>स्ट्रेस मॅनेजमेंट अँड टाईम मॅनेजमेंट" चा क्लास<<<<<<<<<<<<<<<
हरे राम !

लेख सुंदर , तळटीप पण पटली , हतबलता जाणवतेय .. Sad

लेख आवडला. गंमत म्हणजे हे सगळीकडे आहे जगात! अमेरिकेत देखिल पालकांचा बराचवेळ मुलांना ह्या activity वरून pick up करून त्या activity साठी सोडायला जाणे ह्यात जाताना पाहिला आहे! आणि माझी चीनी मैत्रीण सांगते त्यावरून चीनमधे देखिल हेच आहे!

Happy
नॉर्थ अमेरिकेत activity अतिप्रचंड महाग आहेत की फार मागे लागणं होतचं नसेल. (असं आपलं सुपात असतानाचं मत)

क्लासची इमेल्स पालकांना. >> हा हा, हो. आमच्या ऑफिसमधील मॉम्स पण आपल्या मुलांच्या शाळेची वेबसाईट उघडणे, इमेल्स चेक करणे, त्याचे शेडुल बघणे वगैरे गोष्टी मौज घेत करत असतात. कदाचित उद्या मी वा माझी बायकोही हेच करत असू पण आता हसायला येते...

असो, लेख मस्त झालाय..

लहानपणी निबंधातले एक वाक्य होते, हे स्पर्धेचे युग आहे..
आताच्या लहान मुलांना बघून वाटते हे खरे स्पर्धेचे युग आहे..
याही पुढच्या नि त्याही पुढच्या पिढीत... अरे देवा.. हे वाढतच जाणार..

या स्पर्धेच्या नादात आपण मानवी क्षमतांचा पुरेपूर वापर करतोय (जे चांगले) की त्या स्ट्रेच करत त्यावर ताण पाडतोय (जे वाईट) हे ज्याचे त्याने ठरवायला हवे.

लेख आवडला. दोन्ही बाजूंनी पटला. खास करून लेकीच्या बाबाचे संवाद!! ही बाजू फारशी कुणी मांडत नाही.

आमच्याकडे सुदैवाने शाळेमध्येच भरतनाट्यम, संगीत (हाणामारीचं एक कायतरी आहे, बहुतेक लाठी घेऊन करतात तसलं पण ते मोठ्या वर्गांसाठी) असे विषय आहेत. सध्या एलकेजीला संगीत होतं. सारेगम वगैरे शिकवतात. शिवाय काही तमिळ भजनं. भरतनाट्यम युकेजीपासून. मज्जा!!!

छान आहे .

लेख आवडला. गंमत म्हणजे हे सगळीकडे आहे जगात! अमेरिकेत देखिल पालकांचा बराचवेळ मुलांना ह्या activity वरून pick up करून त्या activity साठी सोडायला जाणे ह्यात जाताना पाहिला आहे! आणि माझी चीनी मैत्रीण सांगते त्यावरून चीनमधे देखिल हेच आहे! >>> माझी एक कलिग आहे. तिला एक्दा चांगल पुस्तक सुचवलं/दिलं तर काही दिवसानी परत दिलं न वाचता , वाचायला वेळच मिळत नाही म्हणाली .
मग तिने आपल्या ५ वर्शाच्या लेकीच टाईमटेबल वाचून दाखवलं . फोनिक्स क्लास , स्केटिंग , डान्स , स्विमिंग ,ड्रामा , शाळेचा होमवर्क , क्लासेसचा अभ्यास - घरी गेल्यावर तिच्यामागेच वेळ जातो म्हणाली .

khup chan lekh........

ani satya paristhiti ahe hi..
mulanvar ekdum evdha burden takunahi upyog nahi......tyanchya manachahi ani avadichahi vichar kela pahije...

अष्टपैलू मॅन्युफॅक्चरर्स प्रा.लि. >> मस्त !!!

अजून एक - शिक्षण जितके महाग तितके चांगले अशी काहीतरी धारणा असते यांची .. फार कौतुकाने सांगतात - दीड लाख फी आहे आत्ता 3rd ची .. 10th पर्यंत - अडीच होणार ..
त्यांना माहित नाही कि तुमची अडीच ची तयारी असेल तर घेणारे पाच काढणार .. असो ..

खूप आवडलं. तळटीपही मस्त.

लेख आवडला. दोन्ही बाजूंनी पटला. खास करून लेकीच्या बाबाचे संवाद!! ही बाजू फारशी कुणी मांडत नाही. -- +१

mi_anu,

तुमचा लेख मनापासून पटला. फॉर्म्युला काकू म्हणून एक लेख तीन वर्षांपूर्वी येऊन गेला होता. त्याची आठवण आली. अर्थात, फॉर्म्युला काकू जास्तंच अति प्रकरण आहे.

आ.न.,
-गा.पै.

छान लिहिलंय. आम्ही जात्यात असल्याने रिलेट पण झालं बर्^यापैकी.

अवांतर -
>> कदाचित उद्या मी वा माझी बायकोही हेच करत असू पण आता हसायला येते...

ऋन्मेषची प्रतिक्रिया वाचून हसायला आलं Wink

>>आमच्या ऑफिसमधील मॉम्स पण आपल्या मुलांच्या शाळेची वेबसाईट उघडणे, इमेल्स चेक करणे, त्याचे शेडुल बघणे वगैरे गोष्टी मौज घेत करत असतात.>>
यावरून काही गोष्टी आठवल्या. ऑफिस मधील एक कलीग बॉस तिच्या मुलाचा रोज फोनवर अभ्यास घायची. १-१:३० तास ऑफिसचा फोन बिझी असायचा. अगदी असा लिही तसा लिही हे सांगायची. रोजच्यारोज म्हणजे अति होता. माझ्या समोर बसत असल्याने मला सगळा ऐकू यायचं पण काही करू शकत नाही आपण.
अशीच अजून एक बॉसनी तिच्या मुलीच्या लग्नाची सगळी आमंत्रण ऑफिस चा फोन वरून केली. दिवसाला १-२ तास प्रत्येकाला तीच तीच रेकोर्ड ऐकवून कंटाळा कसा नाही आला देव जाणे.

Gàama pailwan
Formula kaku lekh avadala.but nowadays people getting access to knowledge and case studies even formula kaku will improvise her formula and widen horizons.main thing is feeling happy with whatever you do.

Sarv jan, prasadanbaddal abhar.
Not able to write marathifrom mobile.

अनु, चांगलं लिहिलंत.

मलाही उन्हाळ्याच्या सुट्टीतली मुलांची वेळापत्रकं ऐकायला मिळतात तेंव्हा दडपण येते. एरव्ही शाळा सुरू असते तेंव्हाची वेळापत्रकं ऐकली तर - एखादी फास्ट लोकल आपण फलाटावर पोचेस्तोवर चालू झालेली असावी, आपण नेटाने पळून चढायचा प्रयत्न करावा पण छे! तिच्या उत्तरोत्तर वाढत जाणार्‍या वेगापुढे अखेर आपण नांगी टाकावी अशी काहीशी अवस्था होते.

Pages