उन्हाळा लागला आहे जरा सांभाळ आभाळा

Submitted by बेफ़िकीर on 12 April, 2014 - 08:41

नको बाहेर उंडारूस... पथ्ये पाळ आभाळा
उन्हाळा लागला आहे जरा सांभाळ आभाळा

ढगांच्या ओढणीने झाक काही पोरकी शिखरे
कसे येते तुला समजेल मग आभाळ आभाळा

तुला दिसतात आनंदात वरुनी...पण इथे सारे
जणू आभाळ फुटल्यासारखे घायाळ आभाळा

क्षितीजाच्याच का घेतोस कायम चोरट्या भेटी
कधी माझ्या खुज्या वृत्तीवरीही भाळ आभाळा

इथे नाजूक वळणांचा जमाना चालला आहे
जरा अलवार स्पर्शांनी ऋतू हाताळ आभाळा

नकोशी वाटते माध्यान्ह एकाकी प्रवासाची
मला आणून दे तू थेट संध्याकाळ आभाळा

तुला वाटेल मी घेतो भरार्‍या गाजण्यासाठी
धरा फेटाळते आहे मला कवटाळ आभाळा

तुझी निर्लज्ज तलखी सोसतो आहोत केव्हाची
जगाच्या पश्चिमेला जाउनी ओशाळ आभाळा

कुणी गारांमुळे मेले कुणी वृष्टीमुळे मेले
कुणी उरलेच तर आहेच की दुष्काळ आभाळा

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नतमस्तक !!

एकाच गझलेत इतके नाविन्यपूर्ण खयाल , अचू़क शब्दवेध,
समर्पक मांड्णी दैवी प्रतिभा लाभलीय आपल्याला यात
वादच नाही !

-सुप्रिया.

__/\__!

तुला वाटेल मी घेतो भरार्‍या गाजण्यासाठी
धरा फेटाळते आहे मला कवटाळ आभाळा.... व्वाह, क्या बात है.

अप्रतिम रचना!

परमेश्वर खरोखर कलेतून दर्शन देतो......बेफि तुमच्या अफाट प्रतिभेसमोर खरोखर आजन्म लोटांगण घालायला तयार आहे मी...... रचना आवडली हे कसे सांगावे कळत नाही.....

गझलांना प्रतिसाद देताना थोडे वास्तववादी प्रतिसाद दिले गेले तर बरे होईल. दैवी प्रतिभा, परमेश्वराची प्रचीती वगैरे स्तुतीसुमने वाचून सुदैवाने हुरळून जायला होत नाही. ही गझल चांगली झाली आहे हे ठीक आहे. पण आपण शेरांपेक्षा जमीनीवर भाळलो आहोत का ह्याचाही थोडा विचार झाला तर बरे होईल. आस्वाद घेताना जमीनीचा प्रभावीपणा वेगळा काढता आला पाहिजे.

प्रेमपुर्वक दिलेल्या अभिप्रायांमागील भावनांचा यथोचित सन्मान राखून आभार मानतो.

धन्यवाद!

आस्वाद घेताना जमीनीचा प्रभावीपणा वेगळा काढता आला पाहिजे.<<खरे आहे

असो
मी जेव्हा जेव्हा आपली ही गझल वाचतो तेव्हा मला आपल्या 'दु:खानो' आणि 'आयुष्या' अश्या रदीफ असलेल्या गझल आठवल्यावाचून राहत नाहीत

आणि आपला एक शेरही ( जो मला आजवर कधीच नीट समजला नाही किंबहुना मुळीच समजला नाही असे मला वाटते ....)

निष्ठूर आकाशा तुला ही आर्तता समजेल का
अंतीम आहे भेट ही तू आज तेजाळू नको

>>>आणि आपला एक शेरही ( जो मला आजवर कधीच नीट समजला नाही किंबहुना मुळीच समजला नाही असे मला वाटते ....)

निष्ठूर आकाशा तुला ही आर्तता समजेल का
अंतीम आहे भेट ही तू आज तेजाळू नको <<<

त्यासाठी ती बदनाम (सध्या बावीसपर्यंत पोचलेली) चोवीस मालिका वाचावी लागेल तुम्हाला Happy

धन्यवाद!

काय ते इर्शाद की काय ..ते !! Happy येवूद्या येवूद्या आम्ही पथारी का काय ते अंथरून बसलोच आहोत केव्हाचे Happy

Pages