अणुरेणुया थोकडा, तुका आकाशाएवढा ????

Submitted by पुरंदरे शशांक on 12 March, 2015 - 02:54

अणुरेणुया थोकडा, तुका आकाशाएवढा ????

जरी मी नव्हतों पतित । तरि तूं पावन कैंचा येथ ॥१॥
ह्मणोनि माझें नाम आधीं । मग तूं पावन कृपानिधी ॥ध्रु.॥
लोहो महिमान परिसा । नाहीं तरीं दगड जैसा ॥२॥
तुका ह्मणे याचकभावें। कल्पतरु मान पावे ॥३॥अभंगगाथा ७५२||

आपल्याला जर कोणी "देव" कुठे असतो असे विचारले तर तो कुठेतरी दूर आकाशात वा देवळात असतो असे काहीबाही आपण सांगतो. कोणी एखादा जास्त हुशार असला तर "देव" आपल्या अंतःकरणातच असतो असेही सांगेल खरे पण ती सगळी केवळ ऐकीव माहितीच. (अनुभवाच्या नावाने शून्यच.. ) Happy Wink
थोडक्यात आपल्याबाबतीत देव म्हणजे काहीतरी अगम्य अशी गोष्ट.

पण बुवांसारख्या भक्ताचा अनुभव पूर्ण वेगळा असतो. आपल्याला दुरावलेला देव भक्ताबाबत मात्र सदैव त्याच्यासोबतच असतो. कधी तो भक्त त्या देवाला आपला स्वामी, मालक समजून त्याची विनवणी करीत असेल तर कधी आपल्या जिवलग मित्रासारखा त्याच्याशी थट्टा-मस्करीही करीत असेल. हे सर्व वाचून आपला तर पूर्ण गोंधळच उडू शकेल पण बुवांचा हा जो अभंग आहे तो या सख्यभक्तिची साक्ष देणारा असा एक अतिशय विलक्षण भावपूर्ण पण बराचसा मजेशीर अभंग...
सख्यभक्तिमधे भक्त आणि भगवंत यामधील नाते किती जवळिकीचे - मित्रवत असते हे या अभंगातून कळून येते.

"पतितपावन" - भगवंताला हाक मारण्याकरता वापरला जाणारा एक नेहेमीचा साधा शब्द - पतितांना पावन करणारा तो भगवंत असा याचा साधासरळ अर्थ - पण हा शब्द मिळाल्याबरोबर बुवा काय म्हणताहेत ते पाहा ...
किती विविधप्रकारे ते विठ्ठलाशी संवाद साधत होते ते पाहिले की लक्षात येईल की त्यांचे संपूर्ण चित्तच त्या विठ्ठलाने कसे पार व्यापून टाकले होते -
बुवा कौतुकाने विठ्ठलाला म्हणताहेत -
विठूराया, तुला सारे जग पतितपावन या नावाने हाक मारते ते मलाही ठावकी आहेच की रे - पण या शब्दात आधी पतित हा शब्द येतो आणि मग पावन हा शब्द येतो -
म्हणजेच --- मी जर पतित नसतोच तर तुला ही पदवी मिळाली असती का रे ? थोडक्यात म्हणजे माझ्यामुळेच तुला मोठेपणा आहे हे लक्षात घे बरं... Happy Wink
पुढे बुवा परीसाचे उदाहरण देत आहेत. यातही एक गंमत आहे - परीस फक्त लोखंडाला लागला तरच त्याचे (लोखंडाचे) सोने होते, इतर धातूंना परीसस्पर्श झाला तरी त्याचे सोने होत नाही - म्हणजे लोखंडामुळे परीसाचे महत्व आहे (एरव्ही परीस तर एक दगडच की...) Happy Wink
सगळ्यात शेवटी बुवा कल्पतरुचे उदाहरण देत आहेत.
कल्पतरु म्हणजे ज्या वृक्षाखाली बसून काही इच्छा व्यक्त केल्यास ती पूर्ण करणारा असा तो वृक्ष. समजा त्या झाडाकडे कोणी याचक आलाच नाही तर त्या कल्पतरूचा मान तो काय - म्हणजेच याचकामुळेच त्या कल्पतरुला तो मान मिळतो (जी इच्छा व्यक्त करु ती पूर्ण करणारा म्हणून..) Happy Wink

सुरुवातीची बुवांची जी साधकदशा होती ज्यात ते टाहो फोडून विठ्ठलाला हाका मारत होते, तुझ्याशिवाय सारे मला व्यर्थ आहे असे म्हणत होते ती दशा पार केल्यावर आता त्यांची भक्ति सखोल, शांत झाली आहे, तळमळ निवाली आहे. आता ते विठ्ठलाशी असे बोलताहेत जसे की जणु तो विठ्ठल त्यांचा अगदी जवळचा सखा आहे - त्याच्याशी थट्टा-विनोद नाही करायचे तर मग कोणाशी ??
अशा थट्टेत ते विठ्ठलाला हे सारे म्हणताहेत...

मनात येते काय वाटत असेल विठ्ठलाला, त्या जगन्नियंत्याला - की कोणी एक साधा साडेतीन हाताचा मानव त्याला म्हणतोय - अरे कसले कौतुक तुझ्या त्या पतितपावन या उपाधीचे - एक लक्षात घे, माझ्यासारख्या पतितामुळे तुझे महत्व आहे ....
तू असशील परीस पण लोखंडामुळे तुला ते महिमान प्राप्त झाले आहे ... (एरव्ही परीस जरी झाला तरी तो एक साधा दगडच)
मी याचकभावाने तुजसारख्या कल्पतरुपुढे उभा आहे म्हणून तुला किंमत (एरव्ही नाही)

पण हे सारे म्हणणारा हा कोणी सामान्य ( साडेतीन हाताचा मानव) नाहीये... या भक्ताने भगवंताला पुरेपूर ओळखले आहे - आणि म्हणूनच तो भगवंताशी असे बोलू धजावतोय. हा भक्त भगवंताशी असा काही एकरुप झालाय की पाहिजे तेव्हा पाहिजे त्या भावात तो भगवंताशी संवाद साधू शकतो, इतकेच काय त्याच्याशी कडाकडा भांडूही शकतो ....

यानिमित्ताने भागवतातील एक मजेशीर गोष्ट आठवते -
श्रीकृष्णाने उद्धवाला आत्मज्ञान दिले पण जेव्हा भगवंताच्या लक्षात आले की या ज्ञानाची परिणीती नम्रतेत झालेली नाहीये तेव्हा त्याने उद्धवाला सांगितले की - 'जा गोकुळात जा. तेथील भोळ्या-भाबड्या गोपी माझ्या विरहाने पार व्याकुळ झाल्यात... त्यांना तुला प्राप्त झालेले निर्गुणाचे ज्ञान देऊन त्यांना ज्ञानी कर ... माझे सारे बालपण मी जिथे घालवले तिथे मी परत गेलोच नाहीये - त्या बिचार्‍या सार्‍या गोपी सारखी माझी आठवण काढीत असतात, त्यांना तू शांत कर ...'

उद्धवजी मोठ्या तोर्‍यात गोकुळात आले. सर्व गोपी अगदी भावव्याकुळ होऊन त्याच्याभोवती जमा होऊन विचारु लागल्या आमचा कन्हैया कसा आहे, त्याला काही त्रास तर नाही ना ? आम्ही त्याच्या आठवणीने इथे किती झुरतो आहोत, त्याला आमची काही आठवण आहे का नाही ??

उद्धवजी मोठ्या गंभीर मुद्रेने त्यांना निर्गुणाचे महत्व सांगू लागतात. तुम्ही जी आठवण काढता ती तर सगुणाची - ते सगुण तर आता आहे मग नाही असे, त्यामुळे निर्गुण किती श्रेष्ठ ... वगैरे...
त्याबरोबर त्या सगळ्या गोपी खूप हसू लागतात. उद्धवजी गडबडून जातात, विचारतात - आत्ता आत्ता तुम्ही अगदी व्याकुळ होऊन कृष्णाबाबत काही विचारत होता त्या एकदम हसता कशा काय ?
त्या गोपी म्हणतात - अरे, तुला त्या कृष्णाचा थट्टेखोर स्वभाव माहित नाही का ? त्याने तुझी चांगलीच थट्टा केली की रे.. Happy Wink
उद्धवजी एकदम अवाक् ...
त्यावर त्या (साध्या-भोळ्या) गोपी त्याला म्हणतात - अरे तुझे ते ज्ञान इतर कोणाला जाऊन सांग जा... तो कृष्ण निर्गुण का सगुण हे आम्हाला नको सांगू - आम्ही आमच्या भावानुसार त्याच्याशी खेळतो-बोलतो-रडतोही - तो तर कायम आमच्या ह्रदयातच असतो - त्याचे वेगळे ध्यान कशाला करायचे ?? त्याने तुझ्याबरोबर जोरदार मस्करी केलीये हेच खरे रे ..

उद्धवजी एवढे मोठे ज्ञानी, पण या उद्गाराने त्या सार्‍या गोपींना साष्टांग नमस्कार घालून रडू लागतात - म्हणतात कृष्णाने मला खरोखरच फसवले आहे - हे भक्तिचे अगाध वर्म मला सांगितलेच नाही की - तुम्ही सार्‍या मोठ्या भाग्यवान आहात की कृष्णाने हे सारे तुम्हाला सांगितले आहे आणि हे शिकवण्यासाठीच त्याने मला इथे पाठवले तर ... तुम्हा सार्‍यांच्या दर्शनाने मी आज अगदी कृतार्थ झालो आहे ...

जो भक्त भगवंताशी एकरुप झालेला असतो तो भगवंताबरोबर आपल्याला आवडत्या कोणत्याही भावात सहज रहात असतो, सतत भगवंताबरोबरच असतो - माऊलींनी एक फार सुरेख आणि मार्मिक दृष्टांत दिलाय - 'पिसे नेसले की नागवे | लोकी येउन जाणावे ||'
एखादा वेडा नग्न असेल किंवा वस्त्र पांघरलेला - त्याला त्याचे घेणे-देणे नसते - तो वेडाच असतो - लोक येऊन म्हणतात - की अरेच्चा, आज याने कधी नव्हे ते अंगावर काही घातलेले दिसते.. वेड्याला त्याची जाणीवच नसते - त्याला तर वेड लागलेले असते

तसे भक्ताला भगवंताचे असे काही वेड लागलेले असते -की कधी तो स्वतःला अगदी हीन-दीन म्हणवून घेत असतो तर कधी पार - तुका आकाशाएवढा...

.............. बुवांचरणी शिर साष्टांग दंडवत ..............

------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान! सुरेख निरुपण!
जसे तुकोबांना विठुराया आपला वाटतो...
तसेच तुकोबा ही आपल्या सारख्या सामन्यांना आपलेच वाटतात...पटतात.. Happy

सुन्दर. तु माझा सान्गति serial (etv marathi) मधे सध्या तुकाराम महाराजान्च साधाक जीवण खुप मस्त दाखवत आहेत.

सुरेख.
या काही ओळी आठवल्या...

श्याम के रंग की चादर ओढूँ
मीरा के गीत मगन हो गाऊँ
तेरे चरणों का लगन लगाऊँ
वारी जाऊँ बलिहारी जाऊँ....

आणि...

साधो गुह्यतम ग्यान सुनाऊँ ...

खुद की पूजा प्रार्थन वंदन
खुदको शीष झुकाऊँ
रंगबीरंगी कुंजगलीमें
खुदसे रास रचाऊँ

खुदसे जन्मू खुदमें तीरथ
खुद विश्राम मैं पाऊँ
खुद और खुदामें भेद न कोई
अंतिम सत्य बताऊँ...