चूर्ण प्राजक्त

Submitted by बेफ़िकीर on 17 March, 2015 - 13:28

ही साच बळींच्या किंकाळ्यांनी युक्त... नित्य अव्यक्त...होइना मुक्त
ही पाच दिवस केवळ न सांडते रक्त... जन्मभर फक्त...व्रणांनी युक्त
ह्या गंधावर जग होत पुरे आसक्त...चिरडते सक्त...चूर्ण प्राजक्त

जग गर्भामध्ये नष्ट करू पाहते
नाजूक शिश्निका पात्याने कापते
अट कौमार्याची पाळावी लागते

पाऊल मुडपती सुंदर ठरण्यासाठी
मानेस जखडती डौल वाढण्यासाठी
स्तन सपाट करती गुन्हे रोखण्यासाठी

स्त्रीप्राप्तीसाठी खूप लढाया झाल्या
टाळण्या लढाया स्त्रिया धाडल्या गेल्या
जिंकुनी लढाया शत्रुस्त्रिया बाटवल्या

देवास सोडल्या मुली कुणी वापरल्या
असहाय्य विधवा घरामधे नागवल्या
जौहार, सती जाणार्‍या देवी ठरल्या

बुरख्यात दाबले गेले त्यांचे म्हणणे
ठेचून मारले गेले त्यांचे जगणे
धंद्यास लावले गेले त्यांचे फुलणे

तीनदा म्हणाले तलाक, सुट्टे झाले
बायका ठेवल्या अनेक, राजे झाले
ते नग्न धिंड काढून म्होरके झाले

एकेक अंगप्रत्यंग नटवले गेले
स्त्रीशरीर केवळ नित्य मढवले गेले
पण पायदळी स्वातंत्र्य तुडवले गेले

ही साच बळींच्या किंकाळ्यांनी युक्त... नित्य अव्यक्त...होइना मुक्त
ही पाच दिवस केवळ न सांडते रक्त... जन्मभर फक्त...व्रणांनी युक्त
ह्या गंधावर जग होत पुरे आसक्त...चिरडते सक्त...चूर्ण प्राजक्त

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्यंत परिणामकारक माडणी
प्रचंड ताकदीची कविता

खूप आवडली