चिकन - तामिळ पद्धतीने

Submitted by अल्पना on 20 July, 2014 - 06:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा किलो चिकनचे छोटे तुकडे, दोन मोठे कांदे, २ मोठे टॉमॅटो, आलं-लसूण पेस्ट २ चमचे, हळद, २ चमचे तिखट, ३ चमचे धण्याची पुड, २ चमचे मीरेपुड, मीठ, कोथिंबीर, तेल, २-३ चमचे ओल्या नारळाचा चव आणि थोडेसे ओल्या नारळाचे छोटे काप, मीठ, लिंबू

फोडणीसाठी : तेल पळीभर, कढिपत्ता १ काडी, सुक्या लाल मिरचीचे तुकडे २-३, दालचिनीचे तुकडे ३-४, तमालपत्र १-२, लवंगा ३-४, विलायची ३-४, जीरे, बडीशेप १ चमचा

क्रमवार पाककृती: 

चिकनचे तुकडे स्वच्छ धूवून त्यांना १ चमचा आलं-लसूण पेस्ट, थोडी हळद एक चमचा तिखट, एक चमचा धण्याची पुड आणि थोडं मीठ लावून २०-२५ मिनीटांसाठी मॅरिनेट करावे.

एका कढईमध्ये थोडं तेल घेवून त्यात फोडणीचं सामान घालून फोडणी करावी. त्यात बारिक चिरलेले कांदे आणि उरलेली आलं-लसूणाची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. त्यात बारिक चिरलेला टॉमॅटो घालून परत परतावे. परतताना शिजत आलेल्या टॉमॅटोला चमच्याने मॅश करावे. कांदा-टॉमॅटोचा मसाला व्यवस्थित एकजीव होत आला की त्यात थोडी हळद आणि उरलेले तिखट -धण्याची पुड घालून परत परतावे. नंतर त्यात नारळाचा चव आणि नारळाचे छोटे काप घालावेत. यात अर्धा कप पाणी घालून मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे व चवीप्रमाणे मीठ घालावे आणि झाकून शिजवून घ्यावे.
चिकन शिजत आले की त्यात ताजी मीर्‍याची पुड आणि एका लिंबाचा रस घालावा. जर पातळ रस्सा झाला असेल तर शिजल्यावर थोडावेळ आटवून घ्यावे.
वरून कोथिंबीर घालावी.

वाढणी/प्रमाण: 
२-३
अधिक टिपा: 

या प्रकारामध्ये रस्सा नसतोच. अगदी अंगासरशी रस असेल इतपत पातळ चालू शकेल.
धण्याची पुड शक्यतो धणे भाजून ताजीच वापरली तर जास्त छान चव येते.
हा प्रकार नुसता स्टार्टर म्हणून खाता येईल,
सांबार-भात किंवा चपातीबरोबर पण छान लागतो.

माहितीचा स्रोत: 
मेरी मामी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अल्पना.. सेल्व्हीची रेसिपी थोडीफार सेम आहे, पण ती मोठे कांदे वापरण्याऐवजी छोटे सांबार कांदे वापरते. मिरेपूडीसोबत फोडणीमध्ये अख्खे मिरे घालते. आणि नागकेशराचा छोटुस्सा तुकडापण घालते.

कढीपत्ता (१ काडी वगैरे नाही) भ र पू र घालते.

माझी मामी पण भरपूर घालते कढीपत्ता. पण मला तितका जास्त आवडत नाही. सांबार कांदेच घालते ती. आमच्याकडे फार कमीवेळा दिसतात ते म्हणून मोठे कांदे.

मामी रस्सा पण करते कढिपत्ता घातलेल्या चिकनचा. पुढच्या वेळी मुंबईला गेले की ती रेसेपी पण बघून घेईन. Happy

ही बहूतेक पारंपारिक तामिळ कॅथलिक ख्रिश्चनांची रेसेपी असेल. Happy

मस्त झालं होतं चिकन.

२ चमचे मिरेपुड लिहिली आहे म्हणून ५ मिरे फोडणीत घातले, अन ३ मिर्‍यांची पूड करून शेवटी टाकली. यात २ मिरे कमी टाकलेले चालले असते.

कढीपत्ता, मिरी अन नारळाने अगदी टिपिकल सौदिंडियन चव येते.

आम्ही केल्याचा पुरावा म्हणून स्टेप बाय स्टेप फोटू :
chk1.jpgchk2.jpgchk3.jpg

साईड डिश म्हणून जास्त चांगलं जाईल.

अरे वा! स्टेप बाय स्टेप फोटोंसाठी धन्यवाद. Happy
आम्ही मागे एकदा दोसे आणि हे चिकन खाल्लं होतं. चांगल लागलं. आप्पम बरोबर तर मस्तच लागतं.