बदलापुर- सुडाग्नीचा वणवा

Submitted by ऋग्वेद on 27 February, 2015 - 07:22

An Eye for an Eye Will Make the Whole World Blind - M. Gandhi

महात्मा गांधींने सांगितले होते डोळ्यांच्या बदल्यात डोळे घेतले तर सारेच जग आंधळे होईल. म्हणजेच सुडाच्या भावनेत पेटलेल्या माणसाच्या हातात काहीच लागत नाही. ज्या सुडाग्नीमधे तो इतरांना जाळायला निघतो त्याच अग्नीत तो देखील भाजुन निघतो. बदला, सुड, revenge. माणसाच्या कोपर्‍यात काही ना काही कारणाने असतोच. जितका वेळ सुड घेण्यास लागेल तितका तो अधिक वाढत जातो. खुनशी होत जातो. थंड डोक्याने सुड घेणारा तर अजुनच धोकादायक. जीवनात अचानक आलेला कोळसारुपी अंधार बाहेर व्यवस्थित काढला नाही तर हात काळे होतात. आणि मग ते काळे हातच नकळत आपला चेहरा देखील काळा करतात. या नादात माणुस इतका वाहत जातो की थांबायचेच सुचत नाही. एकच लक्ष्य एकच ध्येय "मला सुड पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजेच कोणत्याही किंमतीत, त्यासाठी काहीही कसेही करायला तयार बस मला माझा सुडाग्नी शांत करायचा आहे." खरच होतो का सुडाग्नी शांत??? याचेच उत्तर शोधण्याचा प्रयत्न याचित्रपटात दिसुन येतो.

राघव (वरुण धवन) आपल्या बायको मिशा मुलाबरोबर ( यामी गौतम ) पुण्यात सुखाचे आयुष्य व्यतित करत असतो. एके दिवशी यामी मुलाबरोबर जात असताना अचानक बँक लुटुन पळणारे लायक आणि हर्मन या चोरांच्या तावडीत सापडते (नवाझुद्दीन आणि विनय ). पोलिसांचा पाठलाग चुकवताना त्यांच्या हातातुन मिशा आणि तिचा मुलगा यांचा दुर्दैवी मृत्यु होतो. या घटनेमुळे लायक हर्मनला पैश्यासकट सुरक्षित ठिकाणी उतरवुन देतो आणि स्वतः पोलिसांच्या तावडीत सापडतो.
राघवला आपल्या कुटुंबाबद्दल कळते. रागाच्या भरात राघव पोलिसस्टेशन मधे लायकला मारतो. लायक त्याला सांगतो की मी नाही माझ्या साथीदाराने तुझ्या बायकोला आणि मुलाला मारले. मी काहीच केले नाही. लायक आपल्या साथिदाराचे नाव सांगत नाही. त्यामुळे पोलीसांना दुसर्या साथीदाराला (हर्मनला) पकडण्यात अपयश येते. कोर्ट लायकला २० वर्षाची शिक्षा ठोठावते. आणि त्याची रवाणगी नाशिक जेल मधे करण्यात येते राघव दुसर्‍या साथीदाराच्या शोधात सुडाच्या अग्नीत पेटुन उठतो. दुसर्‍या साथीदाराच्या शोधात राघव मुंबईला झिमली (हुमा कुरेशी) पर्यंत पोहचतो. झिमलीच्या प्रेमात लायक असतो. तिच्याकडुन काही माहीती मिळेल या आशेत राघव तिला बरेच आमिष देतो. परंतु त्याच्या हाती निराशाच लागते. लायक कुणालाच त्याच्या दुसर्‍या साथीदाराचे नाव सांगत नाही. हताश राघव मुंबई मधुन निघतो.पण काही कारणामुळे त्याला मधेच ट्रेन मधुन "बदलापुर" स्टेशनवर उतरावे लागते. इथुन चित्रपट तब्बल १५ वर्षाचा गॅप घेतो.
या १५ वर्षात बरेच बदल झाले असतात. राघव सगळ्यांसोबतचे नाते तोडुन सगळ्या जगापासुन लांब बदलापुर मधे एकांतात जीवन जगत असतो. एका कंपनीत काम सुपरवाईझर म्हणुन करत असतो. दुसरीकडे लायक तुरुंगातुन सुटण्याचे २-३ प्रयत्न करुन बघतो पण काही यशस्वी होत नाही. बघता बघता काळ पुढे सरकतो. राघव पुढे काहीच धागेदोरे हाती न लागल्याने हताश झालेला असतो.पण एके दिवशी अचानक त्या निद्रास्त सुडाग्नीला हवा शोभा नामक समाजसेविका (दिव्या दत्ता) देते. लायक ला तुरुंगात पोटाचा कँन्सर झालेला असतो. शेवटचे वर्ष त्याच्या हाती असते. अश्यात मानवतावादी एनजीओ चालवणारी शोभा त्याची बाकीची शिक्षा माफ व्हावी म्हणुन प्रयत्न करते. त्यासाठी तिला राघवच्या माफी दिलेल्या पत्राची गरज लागते. राघवला शोधत शोधत शोभा बदलापुर मधे पोहचते. राघवच्या सुडाचा प्रवास पुन्हा सुरु होतो. माफीनामा देण्याच्या बदल्यात लायक कडुन त्याच्या साथीदाराचे नाव विचारतो. तेव्हा देखील लायक ते देत नाही. पुढे काय. ?

राघव माफी देतो? कसा दुसर्‍या साथीदारापर्यंत पोहचतो? कसा घेतो आपला सुड? या तीन प्रश्नात चित्रपटाची उरलेली उत्सुक्ता आहे. जी मी कायम ठेवत आहे Happy

--------------------------------------------------------------
श्रीराम राघवन याने याआधी "एजंट विनोद" सारखा अत्यंत विनोदी चित्रपट बनवलेला होता. त्यामुळे हा देखील चित्रपट कोणत्या वाटेने जाणार याची भीती मनात होती. त्यातच नवाझुद्दीन समोर नवखा वरुण धवन असल्याने ती भीती अजुनच वाढलेली होती. आजकाल ट्रेलर बघुन चित्रपट बघणे अत्यंत धोकादायक बनले आहे. पण ट्रेलर मधे वरुण आश्वासक वाटला. म्हणुन एजंट विनोदला सिनेमागृहाबाहेर पहारा द्यायला लावुनच आत गेलो. सोबत आधी अग्लीचा अनुराग कश्यप असल्याने थोडा धीर आलेला. संपुर्ण चित्रपट कोंडलेले वातावरण आहे. सुरुवातीला जो हादरा बसतो. तो शेवटपर्यंत घेउन जाण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरतो. नविन दिग्दर्शक चित्रपट गुंफणारे धागे गुंतत असताना काही धागे असेच सोडुन देतात. हा प्रयोग यात देखील केला आहे. दर्शकांसाठी अर्थपुर्ण धागे चित्रपटात सोडले आहेत. कुणाला ही एक रंग न देता सगळ्यांना सारखे रंग देण्याचे चांगले काम केले आहे.

जेव्हा तुमच्याकडे नवाझुद्दीनसारखा वजीर पटलावर असतो तिथेच तुम्ही अर्धी बाजी जिंकतात. लायकच्या व्यक्तिरेखेत चपखल बसणारा लायकीची व्यक्ती म्हणजे नवाझुद्दीन हाच. परिस्थितीने पिचकलेला, बेरकी, पोलिसांच्या समोर निर्ढवलेला, प्रेयसीची फार काळजी करणारा, इतके उलटेसुलटे काम करुन देखील मनाच्या एका कोपर्‍यात चांगुलपणा शाबुत ठेवलेला. विविध शेड्स असलेले व्यक्तिमत्व उत्तम उभे करण्याचे काम नवाझुद्दीन ने केले आहे. या चित्रपटात एकही संवाद नवाझसाठी लिहिलेला नाही आहे. सगळे संवाद नवाझुद्दीनने स्वतः त्यावेळेला बोललेले आहेत. त्यामुळे भारीभक्कम डायलॉग असला प्रकार नाही. हे विशेष आहे.
वरुण धवन ने सुरुवातीलाच याप्रकारचा चित्रपट करुन "वझीर स्थानी पोहचणारे प्यादे" म्हणुन स्वतःचे स्थान ठाम केले आहे. छान सुखी आयुष्य जगणारा तरुण अचानक परिस्थिती बदलल्याने त्वेषाने शोध घेणारा एक नवर्‍यात रुपांतर कसा होतो. हे चांगले संयमित दाखवले आहे. अतिरंजितपणा दाखवण्याचा प्रयत्न टाळल्याचे दिसुन येते. चांगली सुरुवात आहे. बरेच सीन्स त्याने एकट्याने उचलुन घेतले आहे. यातच त्याचे काम दिसुन येते. थोडे चेहर्‍यावरचे भाव अजुन एक्स्प्रेस करता आले असते तर बरे वाटले असते. खासकरुन नवाझ बरोबरचे सीन्स.
नविन असल्यामुळे असेल बहुदा. वाव आहे बराच.
अशा चित्रपटात नायिकांना काहीच काम नसते. परंतु हुमा कुरेशी, दिव्या दत्ता, राधिका आपटे, यांनी आपापले काम चोख केले आहे. यामी गौतम फारच सुंदर दिसली आहे. हुमाच्या वाट्याला जे संवाद आले आहेत ते योग्य टायमिंगवर बोलली आहे. विशेषतः शेवटचे संवाद.

संगीत असुन नसल्यासारखेच आहे. "जीना जीना" हे गाणे योग्य ठिकाणी वापरले गेले आहे. गाण्यांमुळे चित्रपटाचा वेग कमी होत नाही. त्यामुळे गाणे कधी आले कधी गेले कळत नाही.

चित्रपटात बरेच दृश्य मनाला चटका लावुन जातात. शेवटचा बदलापुरच्या घरात वरुन - लायकचा प्रसंग, राघव क्रियाकर्म करुन घरी आलेला प्रसंग, लायक झिमलीला भेटण्याचा प्रसंग, लायक आणि त्याची आई मधला प्रसंग जेव्हा त्याची आई त्याच्यासमोर सतत त्याच्या वडीलांची निंदाच करत असते. शेवटी राहुन लायक विचारतो " कुछ तो अच्छा किया होगा ना मेरे बाप ने, कुछ तो, कल तुमसे मेरे बारे मे कोई पुछे तो उसे कुछ तो अच्छा बोलना."
इथुन चित्रपटाला एक वेगळीच दिशा मिळते. क्षणात रंग बदलतात. जे सकारात्मक विचाराच्या दिशेने जाणारे असतात.
सुडाच्या पुढची पायरी रागाची असते त्याच्या पुढची पायरी क्रौर्याची त्याच्यापुढची पायरी विकृती, खुनशी वेडेपणा राक्षसी कौर्य. ज्या दिवशी आपण पहिल्या पायरीवर पाउल ठेवतो तेव्हाच त्या पायर्‍या नाहीश्या होउन घसरण निर्माण होते. आणि आपण एक एक टप्पा वेगाने पार करत नीचतम पातळीपर्यंत कधी पोहचतो कळतच नाही.
पहिल्या पायरीवर पाय ठेवल्याने माणसाचे काय होते हे चित्रपट दाखवतो.

चित्रपटात ढोबळ चुका आहेत. उदा. बदलापुर हे लोकल स्टेशन आहे इथे एक्स्प्रेस ट्रेन थांबत नाही. अजुन आहेत पण ते सांगितले तर उत्सुक्ता नाहीशी होईल. पण अभिनयच तगडा असल्याने या चुकांकडे इतके लक्ष जाउन ही जात नाही.

( टीकात्मक लिहिण्याचा मोह टाळण्याचा प्रयत्न केला आहे)

चित्रपटात अत्यंत उच्चपातळीची हिंसा आणि प्रौढ दृष्ये असल्याने मुलांबरोबर अजिबात बघु नये.

त.टी:- "चित्रपटात खलनायक नवाझुद्दीन नाही" चित्रपट बघुनच ठरवा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय छान चित्रपट. वरूण / नावाझुद्दीनला फिल्म फ़ेअर मिळाले पाहिजे. त्यांनी आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. तिन्ही हिरोइनिनि आप आपली कामे यथातीत केली आहेत. एक आणि एक कलाकार वर्थ आहेत आप आपल्या भूमिकेत.

छान लिहिलंय. याची सर्वच समीक्षकांनी तारीफ केलीय. वरुणने लवकरच गुडी गुडी भुमिकांचा नाद सोडला म्हणायचा.

अशा चित्रपटात स्त्री कलाकार शोभेपुरतेच असतात सहसा, इथे त्यांनाही चांगल्या भुमिका मिळाल्यात.

( या चित्रपटाची पुर्ण कथा इतरत्र उपलब्ध आहे. )

आवडल. मस्त लिहिलंय परीक्षण. सुरूवातीच लिहिलेलं तर खूपच आवडलं.
सूड घेतल्यावर नक्की काय झालंय ते आपल्याला माहित असते, तरी नावाजुद्दिन आणि वरुण मधला शेवटचा प्रसंग हादरवतो. हुमाचा शेवटचा वरुण बरोबरचा सीन तर खूपच परिणामकारक.

परिक्षण मस्त लिहिले आहे. बरोबर चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली आहे. बघायचा आहेच.

फक्त श्रीराम राघवन वरची टीका नाही आवडली. जर तुम्ही एजंट विनोदच्या आधीचे त्याचे 'एक हसीना थी" आणि "जॉनी गद्दार" पाहिले असतील तर तुम्हाला असा धक्का अजिबात बसणार नाही. आता एजंट विनोद च्या वेळेस त्याला काय झाले होते काय माहिती. 'एक हसीना थी' पाहिला नसेल तर आवर्जुन पहा. उर्मिला आणि सैफनी तुफान काम केले आहे.

<<<< 'एक हसीना थी' पाहिला नसेल तर आवर्जुन पहा. उर्मिला आणि सैफनी तुफान काम केले आहे.>>>> +१००० आणि रसिका जोशी ! तिचही मस्त काम होत या चित्रपटात . मला आवडला होता हा सिनेमा. शेवटी ज्या पद्धतीने सूड घेतला जातो ते भारी वाटल होते.

बदलापूर बद्दल :- हा सिनेमा पाहायचा आहे . रिव्यूज चांगले आलेत . बघणार नक्की

ते अनेक वर्ष खळसेकर असंच म्हणतीये ते आडनाव , आमच्या ओळखीचे एक आहेत त्या आडनावाचे म्हणून असेल....... थँक्यु, आता करेक्ट करते Happy

जबरी लिहीले आहे. आवश्यक माहिती देउन स्पॉइलर होईल असे काही दिलेले नाही. आवडला लेख. चित्रपट पाहणारच आहे.

हे किती जणांच्या लक्षात आलेय देव जाणे पण नेटवर वाचलेले तसे
वरुण चे transition बॅटमन पासून थोरमधे होत जाते (सुरूवातीला घरात बॅटमन नि रॉबिनचे पोस्टर आहे नि मुलाचे नाव पण तेच असणे). थोडक्यात एका Responsible hero पासून तो बदलत जाऊन स्वतः शिक्षा देणारा देव बनतो.

चित्रपटाचा जॉनर डार्क आहे हे निव्वळ understatement होईल. नवाजुद्दिन काय किंवा वरून काय दोघांमधे कोण व्हिलन आहे हे सांगता येत नाही. फार फार तर त्या spectrum मधे अमका आहे नि नंतरच्या spectrum मधे तमका अशी धेडगुजरी विभागणी करता येईल. माझ्या मते अशी वर्गवारी करता न येणे हे ह्या सिनेमाचे मोठे यश आहे.

निव्वळ ह्याच दोघांचाच नाही तर सगळ्या supporting cast चा अभिनय सुंदर झालेला आहे. हुमा कुरेशी, विनय पाठक, Inspector बनलेला कुमुद मिश्रा, राधिका आपटे, मुरली शर्म, अश्विनी कळसेकर, दिव्या दत्ता, प्रतिमा काझमी, यामी गौतम (कोणीतरी हिला जरा मोठा रोल द्या रे) कोणीच कुठेही कमी पडत नाही.

असामी, पुढचं सगळं पटलंच पण batman ते थोर हे ट्रान्झिशन दाखवणे हा उद्देश असेल तर ओढून ताणून वाटतंय.
वरुणला कौटुंबिक माणूस इ. दाखवलंय पण batman क्वालिटी मला नाही समजल्या. त्या पेक्षा सूड (दुर्गे सूड :D) म्हटलं की माणूस काय थर (तू थोर म्हण) गाठतो हे जे वर ऋग्वेद यांनी म्हटलंय तसच वाटलं.

batman ते थोर हे ट्रान्झिशन दाखवणे >> तो उद्देश होता कि नाहि मला माहित नाही खरच पण मला ते वाचलेले पटले (नेमके कुठे वाचले ते आठवत नाहीये) कारण बॅटमन ची सुरूवात पण तो त्याच्या आवडत्या व्यक्तीच्या म्रुत्युने होते जशी इथे होते. वरुण धवन च्या मुलाचे खेळणे थोरचा पुतळा होता हे लक्षात आले का ? शेवटी तो काय हत्यार वापरतो ते आठव किंवा त्याची दाढी वाढवणे वगैरे हे जाणून बुजून ठेवलेले क्लू असावेत. सिनेमात असे symbolism सोडले आहेत जे जाणून बुजून सोडले असावेत असे वाटले कारण Daphne DuMaurier च्या पुस्तकाचा सीन. त्या पुस्तकात thriller पलीकडे एक वेगळा undercurrent आहे असे म्हटले जाते तोच बदलापूर मधे आहे (काय ते लिहित नाही कारण ते ज्याने त्याने अनुभवायला हवे - हवे असेल तर विपू मधे मेसेज टाक, तिथे सांगेन) म्हणून सुपरहिरोबद्दलही संशय वाटला. (माणूस सूडासाठी काय थर गाठू शकतो हाच फक्त सिनेमाचा विषय नाही असे मला प्रामाणिकपणे वाटले. तो बदलापूर ला स्थायिक झाला इथे तो सूड ह्या थांब्यावर अडकला हे स्पष्ट झालय. पण त्याच्या पुढे काय आहे हे मह्त्वाचे. परत त्या पुस्तकाचे नाव नेमके ह्या सीनच्या आधीच येतेय म्हणूनही मला तसे वाटले असेल. पुस्तकाच्या नावावर खास फोकस केला होता, खरा.)

For all you know I might be reading too much into nothing. May be WC is taking it's toll due to lack of sleep Wink

वरूण धवन थॉर...??? Sad ते पण हातोडी वापरतो म्हणून?? आता लालच बिकीनी घालते म्हणून सई ताम्हणकर काय बेवॉच बया होते का???

पुस्तकाचा सीन १-२ वेळा येणे, हत्यार, आवडत्या व्यक्तीचा मृत्यू, दाढी (खेळण्यातला पुतळा आठवत नाही Sad ) ओके. परत एकदा पहिला पाहिजे.

Pages